डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बहिणाबाईंचे लग्न तेराव्या वर्षी झाले; तीन लहान मुले पदरात असताना त्यांचा नवरा वारला. बहिणाबाईंनी बालविवाहाचे आणि अकाली विधवा होण्याचे दु:ख स्वत: अनुभवले. अशा इतरही स्त्रिया त्यांच्या आजूबाजूला खूप असणार. बहिणाबाई संवेदनशील होत्या, अभिव्यक्तिप्रवण होत्या आणि तरीही बहिणाबाईंच्या कवितेत स्त्रियांच्या परिस्थितीचे, स्त्रियांच्या दु:खाचे चित्रण का नाही?- हा प्रश्न मला भेडसावतो आहे. या प्रश्नाला सहज-सोपे उत्तर सापडत नाही. मी काही तर्क करू शकतो.   

उत्पादक श्रमात, त्यांतून मिळणाऱ्या आनंदात ‘माणूसपण’ आहे याचा समग्र जीवनस्पर्शी अनुभव बहिणाबाईंच्या कवितांत आहे. शेतीतील कामे नेमकेपणे आणि तरीही रसाळ भावस्पर्शीपणे त्यांच्या कवितांतून रेखाटली आहेत. कवितांची नावेच आहेत- ‘पेरनी’, ‘कापनी’, ‘रगडनी’, ‘उपननी’. या कामांचे वर्णन करताना त्यांना फार सुरेख आणि आगळ्याच उपमा सुचतात:

“उठा उठा बहिनाई

बोंडं कपाशीचे वेचा

बोट हालवा हालवा

जशा पाखराच्या चोचा”

शेतीतील अवजारांवरही त्यांची कविता आहे, तिचा शेवट त्या “नागर नागर सर्व्या सुखाचे आगर”, असा करतात.

बहिणाबाईंचा उत्पादक कामातील आणि यंत्रातील ‘रस’ शेतीपुरता मर्यादित नाही. गावातल्या लहान छापखान्याच्या कामातही त्यांना रस आहे. त्यांना ते मनोरंजनाचे साधनही वाटते. त्या लिहितात-

“किती शिसाच्या चिमट्या

ठसे काढले त्यावर

कसे निघती कागद

छापिसनी भराभर

चाले ‘छाप्याचं यंतर’

जीव आठें बी रमतो

टाकीसनी रे मंतर

जसा भगत घुमतो”

घरकामाचे वर्णनही त्या सामान्यत: प्रेमाने करतात. दळण दळताना हाताला थकवा येतो, भाकरी भाजताना हाताला चटके बसतात, विहिरीची मोट उतरते आणि चढते- यातही त्या जीवनातील महत्त्वाची सत्ये शोधतात. ‘चुल्हा पेटता पेटेना’मध्ये सुरुवातीला काड्यापेटीमधील काड्या संपल्या तरीसुद्धा विस्तव पेटत नाही म्हणून आलेला वैताग आहे, मग भाकरी छान भाजल्याचा आनंद आहे आणि शेवटी तापलेल्या तव्यावर पाणी शिंपडल्यावर आलेल्या आवाजात तवा ‘खसा खदाखदा हासे’ असा श्रमपरिहारी काव्यानुभावही आहे. बहिणाबाईंना, ‘उठ जानं शेती, कामाचा किती घोर। तू गोठ्यामधलं ढोर’ असे क्वचितच वाटते, पण तो अगदी अपवाद आहे.

उत्पादक श्रमांच्या जोडीलाच बहिणाबाईंच्या कवितांत नातेवाइकांचे, गावातील लहान-थोर व्यक्तींचे, गावगाड्याचे चांगले सामाजिक भान आहे. कोठल्या बलुतेदार जाती कोठले काम करतात याचे चांगले विनोदी व्यंग्यचित्रात्मक वर्णन ‘अनागोंदी कारभार’ या कवितेत आहे.

महारवाड्याचे वर्णन बहिणाबाई मनाला वेदना होतील असे सांगतात :

“देखा महारवाड्यात

नावाचेच घरदार

भटकती गावामधी

चाले तोंडाने जोहार

देखा महारवाड्यात

कशी माणसाची दैना

पोटामधी उठे आग

चुल्हा पेटता पेटेना!

महारकी महारकी

गावकरी ठेकेदार

गावातल्या पाटलाचे

हुकूमाचे ताबेदार!”

सावकाराची श्रीमंती आणि शेतकऱ्याची गरिबी त्यांना जाणवते. त्या दोघांमधील नातेही त्यांना कळते. त्याचे वर्णन त्या देवांची आणि त्यांच्या मंदिरांची तुलना करून करतात; सावकाराची त्या टिंगलही करतात-

“सोन्यारुपानं मढला

मारवाड्याचा बालाजी

शेतकऱ्याचा इठोबा

पानाफुलामधी राजी

सावकारा, तुझं

मन मोहोरी एवढं

तुझा राकेसाच डाच

तुझं पोट रे केव्हढं?”

स्त्रीचे आनंद, स्त्रीचे दु:ख, स्त्रियांची परिस्थिती

उत्पादक श्रम, अनेक लोक, नातेवाईक, सर्व गाव, निसर्ग यांचे इतके समर्थ चित्रण करणाऱ्या बहिणाबाईंच्या कवितेत स्त्रियांच्या आनंदाचे, स्त्रियांच्या दु:खाचे, स्त्रियांच्या परिस्थितीचे चित्रण अजिबात नाही. जणू हे सार्वत्रिक विधान सत्य वाटावे म्हणून, अपवाद म्हणून, सासूबद्दल दोन ओळी अशा आहेत :

“उठ सासुरवाशिन बाई

सुरू झाली वटवट,

कातावली वो सासू

पूस डोयान मधिले आसू

उठ सासुरवाशिन बाई

घे सोशिसन घे,

घालू नको वो वाद

कर माहेराची याद”

आणि एके ठिकाणी बाईकडे रस्त्यात वळून पाहणाऱ्या पुरुषाला झापलेले आहे :

“रस्त्यानं चालली

मायबहीन आपली

मांघे फिरी पाह्य पाप्या

धरत्री कापली”

इतरत्र सासूच्या विनोदी स्वभावाचे वर्णन आहे, तिचे गुण सांगून ‘ती माझी दुसरी आई आहे’ असेही म्हटले आहे. माहेरच्या आठवणी आहेत आणि ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदिते’ अशी हृद्य काव्यपंक्तीही आहे. (योगी आणि सासुरवाशीण, बहिणाबाईची गाणी, साहित्यप्रसार केंद्र, 2014. पृ.58). पण माहेरची ओढ हे स्त्रीचे आनंद, स्त्रीचे दु:ख, स्त्रियांची परिस्थिती यांचे विशेष वर्णन नाही.

बहिणाबाईंचे लग्न तेराव्या वर्षी झाले; तीन लहान मुले पदरात असताना त्यांचा नवरा वारला. बहिणाबाईंनी बालविवाहाचे आणि अकाली विधवा होण्याचे दु:ख स्वत: अनुभवले. अशा इतरही स्त्रिया त्यांच्या आजूबाजूला खूप असणार. बहिणाबाई संवेदनशील होत्या, अभिव्यक्तिप्रवण होत्या आणि तरीही बहिणाबाईंच्या कवितेत स्त्रियांच्या परिस्थितीचे, स्त्रियांच्या दु:खाचे चित्रण का नाही?- हा प्रश्न  मला भेडसावतो आहे. या प्रश्नाला सहज-सोपे उत्तर सापडत नाही. मी काही तर्क करू शकतो.

पहिली शक्यता ही की- बहिणाबाईंनी पुरुषप्रधान, पुरुषसत्ताक व्यवस्था इतकी सहज, नैसर्गिक म्हणून स्वीकारली होती की; त्यातून निर्माण होणारी परिस्थिती त्यांना कमालीची स्वाभाविक वाटली. त्याबद्दल काय लिहायचे, काय कविता करायची, हे असेच असायचे- अशी त्यांची धारणा असावी. त्यांनी पुरुषप्रधानता स्वाभाविकपणे स्वीकारली होती, याला दुजोरा मिळेल अशा चार ओळी त्यांच्या काव्यात आहेत. या कवितेत आपले दोन ‘लाल’ सुखी राहोत, असे देवाला मागणे आहे :

“राहो दोन लाल सुखी

हेच देवाले मागनं

त्यात आलं रे नशीब

काय सांगे पंचागन!”

बहिणाबाईंना काशी नावाची मुलगीही होती, पण तिच्या नशिबाचे भान त्यांना या वेळी राहिलेले नाही! बहिणाबाईंच्या या विषयावरील मुकेपणामागे दुसरेही एक कारण असू शकेल, असे मला वाटते. बऱ्याच वर्षांपूर्वी मी ‘खेळू भोंडला मना विरंगुळा’ असा लेख लिहिला होता. भोंडल्याच्या अनेक गाण्यांत एक असंबद्धता आहे.

‘एक लिंब झेलु बाई, दोन लिंबं झेलू। पाचा लिंबांचा पागोटा। माळ घाली हनुमंता।’ इत्यादी. पण प्रत्येक गाण्याच्या ‘समे’वर स्त्री-दु:खाचे क्लेशदायी वर्णन आहे.

‘अस्सं सासर द्वाड बाई। कोंडूनी मारीतं।।’... ‘वेड्याची बायको झोपली होती। मेली मेली म्हणून जाळून टाकिली।।’ इत्यादी. ही भोंडल्याची गाणी लहान वयातील माहेरवाशिणी फेर धरून सामूहिक पद्धतीने गायच्या. हे काय घडत होते? जेव्हा अत्यंत क्लेशकारक अनुभव जागृत मनाला पेलणे अशक्य बनते; तेव्हा ते अंतर्मनात दडपले जातात, गाडले जातात. त्यामुळे मानसिक आजार संभवतात, ते अनुभव स्वप्नात ‘जागृत’ होतात, हे फ्रॉइडने सांगितले. या अल्पवयीन मुलींचे अत्यंत कोवळ्या वयात अनुभवायला लागलेल्या जबरी संभोगाचे, कमालीच्या सासुरवासाचे कमालीचे क्लेशकारक अनुभव अंतर्मनात दडपले गेले, गाडले गेले. ते फक्त सामूहिक गानाच्या-नाचाच्या तंद्रीत, स्वप्नवत्‌ अवस्थेत प्रगट होतात, तेही स्वप्नामधल्या असंबद्ध पद्धतीने? मन अजाणतेपणे या अनुभवांना विसरते. जागृत मनाची, वेडे न बनण्यासाठीची, ती स्वसंरक्षक अजाण कृती असते.

या संदर्भात इंदिरा संतांच्या कवितेतील काही ओळी लक्षात घेण्यासारख्या आहेत :

“इथे वेदना लालताम्बडी;

इथे बधिरता संगमरवरी;

इथे उकळते रक्त तापुनी

बेहोशी अन येथे काळी”

इथे वेदना’ (इंदिरा, पृ.2३0)

“तप्त निखाऱ्यावर विझताना

तडफडणाऱ्या

त्या दु:खाने मला शापिले

तेंव्हापासून

सदा सारखी हसते... हसते

दु:खवेगळी

भरात... नकळत” (इंदिरा, पृ.187)

बहिणाबाईंच्या मनात हेच सारे भयानक घडले का? बहिणाबाईंनी आपले मानसिक संतुलन राखण्यासाठी कामाचा, श्रमांचा, त्यांतून मिळणाऱ्या आनंदाचा मार्ग चोखाळला का? नवरा गेला तर मला शोक करत बसायचा नाही; माझ्या मनगटात ‘करतूत’ आहे, माझ्यासाठी रडत बसणे पुरे झाले, आता मला माझे जगणे जगू द्या- असे त्या सांगतात:

“जरी फुटल्या बांगड्या मनगटी करतूत

तुटे मंगयसूतर उरे गयाची शपथ

नका नका आया बाया नका करू माझी कीव

झालं माझं समाधान आता माझा मले जीव”

हे सगळे बहिणाबाईंच्या च्या मनाने अतीव दु:खापासून केलेले अजाण स्वसंरक्षण आहे का? नाहीच, याची मला खात्री नाही. मग माझ्या मनात एक प्रश्न येतो- जर स्त्रीमुक्ती चळवळीचा विचार बहिणाबाईंपर्यंत पोचला असता, जर चळवळीने चालवलेल्या एखाद्या समुपदेशन केंद्राने बहिणाबाईंना ‘स्त्री अनुभवांबद्दल’, ‘स्त्री जाणिवांबद्दल’ बोलके केले असते... तर? काय कविता वाचायला मिळाली असती याच्या कल्पनेने माझ्या अंगावर काटा उभा राहतो!!

Tags: मराठी कविता स्त्रीवाद आनंद करंदीकर बहिणाबाई इंदिरा संत Indira Sant StreeVad Feminism Anand Karandikar Kavita Marathi Poetry Bahinabai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके