डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘पुनश्च’ आम्ही केले, ‘बहुविध’ तुम्ही करा!

सध्या विविध माध्यमांतून माहितीचा लोकांवर अक्षरशः भडिमार होत आहे. अगदी अमेझॉन प्राइम किंवा नेटफ्लिक्ससारख्या सशुल्क डिजिटल वाहिन्याही हवे तेवढे साहित्य दर्शकाला पुरवण्यास सज्ज आहेत. मात्र या सर्व माध्यमांमध्ये चांगले काय आहे, दर्जेदार काय आहे, कुठले साहित्य उपयुक्त आहे- हे सांगणारे कुणीच नाही. त्यामुळे यूजरचा 70 टक्के वेळ ब्राऊझ करण्यात जातो आणि प्रत्यक्षात हाताशी काहीच लागत नाही. या डिजिटल समुद्रात बुडलेल्या माणसाला कुणी तरी असा माहीतगार मित्र हवा आहे की, जो त्याला सांगेल,-मी सांगतो, तू हे वाच, तू हे ऐक, तू हे बघ. आणि नेमकं हेच क्युरेटिंगचं काम बहुविधवरील संपादक आपापल्या कॅटेगरीत करत आहेत. पुनश्चपासून सुरू झालेला हा प्रवास एका अशा बिंदूपाशी आला आहे की, जिथे आज विविध कॅटेगरींच्या 7 उपनद्या उत्पन्न झालेल्या दिसतात. पण आम्हाला अशा असंख्य उपनद्यांची शक्यताही जाणवत आहे. मग त्यांचे विषय विभिन्न असतील.  

विविध डिजिटल माध्यमांवर उपलब्ध असलेलं सगळं साहित्य फुकटच असलं पाहिजे, या लोकप्रिय गैरसमजाला तडा देणारा पहिला मराठी प्रयत्न म्हणजे ‘पुनश्च’! वर्षभरात दीड हजार साहित्यप्रेमींनी याचे सशुल्क सभासदत्व घेऊन हा प्रयत्न सार्थ ठरवला. सन 2018 च्या जानेवारीत सुरू केलेला हा उपक्रम त्याला मिळालेल्या या प्रतिसादाच्या बळावरच नव्या वर्षात एक पाऊल पुढे टाकून बहुविध.कॉम या नावाने विस्तारत आहे. म्हटलं तर ‘बहुविध’ हा अगदीच ढोबळ शब्द आहे, पण आम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ त्यात पुरेपूर आहे. ‘पुनश्च’ हे एकाच प्रकारचं- म्हणजे एकच कसोटी लावलेलं साहित्य देणारं व्यासपीठ किंवा कॅटेगरी होती. तिचं रूपांतर मल्टि-कॅटेगरी उपक्रमात करायचं ठरवलं, तेव्हा यापेक्षा चपखल शब्द आम्हाला सापडला नाही. पण मुळात ‘पुनश्च’ हे काय आहे, त्याला प्रतिसाद का आणि कसा मिळाला, हे आधी सांगितलं पाहिजे. 

गेली शेकडो वर्षे मासिके, साप्ताहिके, दिवाळी अंक, वृत्तपत्रे, अनियतकालिके यांच्यातून विविध विषयांवर अक्षरशः लाखो लेख प्रसिद्ध झाले असतील. त्यातले हजारो लेख अप्रतिम असतील. परंतु त्यातले आपण शंभरही वाचलेले नसतात. त्यातील बहुतांश लेख, त्यातील विचार-अनुभव आजही तेवढेच महत्त्वाचे असतात; कालातीत असतात. परंतु ते कुठल्या तरी वाचनालयातील तळघरात, कपाटात, एखाद्या ग्रंथ संग्राहकाच्या घरात नव्या वाचकांची वाट पाहत असतात. 

‘पुनश्च’ने त्यातील निवडक लेखांना ‘डिजिटल पुनर्जन्म’ देण्यासाठी पुढाकार घेतला. असे लेख शोधून, ते परत टाइप करून, त्यांना छायाचित्रांनी सजवून, लेखकांची/ वारसांची परवानगी घेऊन, शक्य तेवढे मानधन देऊन ते वाचकांना पुन्हा उपलब्ध करून दिले. म्हणून आम्ही त्याला ‘पुनश्च’ म्हणालो. सोशल माध्यमांवर सध्या फुकट वाचायला खूप असलं तरी ते निवडक नसतं. नव्या जगात चांगलं ते निवडून हवं असलं, तरी तसं ते देण्यासाठी कोणाला वेळ कुठे आहे? भाजीवालीसुद्धा चांगली, एका आकाराची वांगी निवडून बाजूला ठेवते आणि त्यासाठी चार पैसे जास्त घेते. वाचकांची गरज-आवड लक्षात घेऊन निवडलेले उत्तम साहित्य- म्हणजेच आजच्या भाषेत ‘क्युरेटेड साहित्य’ डिजिटल माध्यमांवर उपलब्ध करून देणे, ही आजची खरी गरज आहे; ती आम्ही ओळखली. अंक साठवून ठेवण्याची गरज नाही, खुणेसाठी पान दुमडून ठेवण्याची जरुरी नाही आणि वेळ मिळेल तेव्हा मोबाईलच्या पडद्यावरही लेख वाचनाची सोय. या सोई वाचकांना आवडल्या, आम्ही चोखंदळपणे केलेली लेखांची निवड आवडली आणि पैसे भरून ‘पुनश्च’चे सदस्यत्व अनेकांनी घेतले. 

दर आठवड्याला ठरलेल्या दिवशी लेख वाचायला मिळणार म्हणजे मिळणारच, ही शिस्त आम्ही पाळली. वर्षभरात हजारांचा टप्पा ओलांडताना आमच्या लक्षात आलं की, या निवडक अर्थात ‘क्युरेटेड कंटेंट’ला विविध प्रकारे देता येईल आणि डिजिटल युगाने दिलेल्या मल्टिमीडियाच्या सोईचाही उपयोग करून घेता येईल. कारण व्हिडिओ ब्रॉडकास्टिंगदेखील सपोर्ट करत असल्याने याची परिणामकारकता अधिकच वाढते. यातूनच जन्माला आली ‘बहुविध.कॉम’ ही संकल्पना. त्यातून मग विषयानुरूप वेगवेगळ्या कॅटेगरीजही तयार झाल्या. दिवाळी अंक हे मराठी भाषेचे अनोखे वैशिष्ट्य. दर वर्षी प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकांची सर्व मराठी साहित्यप्रेमी चातकासारखी वाट बघत असतात. अशा रसिकांसाठीच दिवाळी अंकांचे संग्राहक आणि अभ्यासक मकरंद जोशी यांनी ‘निवडक दिवाळी अंक’ ही कॅटेगरी बहुविधवर सुरू केली आहे. त्यात 2018 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सुमारे 500 विविध दिवाळी अंकांतून उत्कृष्ट, वेगळे साहित्य निवडून, त्या-त्या लेखकांच्या, संपादकांच्या संमतीने ते लेख वाचकांसाठी अतिशय माफक शुल्कात उपलब्ध करून दिले. 

बहुविधवर सुरू झालेली दुसरी अगदी वेगळी कॅटेगरी म्हणजे ‘सिनेमॅजिक’. यात नावाला अनुरूप अशी सिनेमातली जादू दाखवण्याची जबाबदारी घेतली. या क्षेत्रातील जाणकार व अभ्यासू संतोष पाठारे आणि त्यांच्या चमूने. दिलीप ठाकूर, गणेश मतकरी, अभिजित देशपांडे, मयूर अडकर, अक्षय शेलार असे तगडे नामवंत लेखक या चमूत असल्याने वाचकांना मिळणारा सिनेमॅजिकचा अनुभव अनोखा आहे. शिवाय जुन्या उत्तम लेखांमधून विजय पाडळकरांपासून अशोक राणेंपर्यंत आणि इसाक मुजावरांपासून अरुण पुराणिकांपर्यंतचे लेखक यात भेटत राहतीलच. व्हिडिओची जोड मिळताच ही कॅटेगरी आता चित्रपटांची व्हिडिओ समीक्षणे, थेट गप्पा, लघुचित्रपट अशी विस्तारणार आहे. जगात, भारतात, राज्यात, या क्षेत्रात काय काय चालले आहे, त्याचा अंदाज ही कॅटेगरी देत राहणार आहे. 

बालसाहित्य हा विषय डिजिटल माध्यमांवर म्हणावा तेवढा हाताळला गेलेला नाही. पण दर्जेदार बालसाहित्याची गरज मात्र सदैव जाणवत असते. ‘वयम्‌’ या बाल-युवा मासिकाच्या संपादिका शुभदा चौकर यांनी या संदर्भात पुढाकार घेतला आणि त्यांचा अंक डिजिटल माध्यमातून वाचणाऱ्या मुलांसाठी उपलब्ध करून द्यायचं ठरवलं. त्यामुळे बालसाहित्याला वाहिलेली कॅटेगरी बहुविधवर सुरू झाली आहे.
 
महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, झारखंड, मध्य प्रदेश व राजस्थान या सर्व राज्यांत अगदी छोट्यातील छोट्या गावांमधील माध्यमिक शाळांमध्ये मिळून 4,270 वाचनालये ज्यांनी उभी केली; या वाचनालयांच्या माध्यमातून 10 लाखांपेक्षा जास्त ग्रामीण विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि 49,000 पेक्षा जास्त शिक्षक यांना मराठीतील उत्तमोत्तम पुस्तके ज्यांनी उपलब्ध करून दिली- ते पुण्याचे श्री. प्रदीप लोखंडे. याच लोखंडेंनी आता पुस्तक या विषयाला वाहिलेली ‘ई ग्यान की’ ही कॅटेगरी बहुविधवर सुरू केली आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्या शैलीला अनुसरून त्यांनी ही कॅटेगरी  निःशुल्क ठेवली आहे. अर्थात ‘पुनश्च’- ज्यातून या संपूर्ण संकल्पनेचा उगम झाला, ती कॅटेगरी- तर आमच्या साहित्यप्रेमी वाचकांसाठी सुरू राहणार आहेच. पण त्यातही काही पट्टीचे वाचक असतात, ज्यांना जुने दीर्घ लेख वाचण्यात रस असतो. अभ्यास म्हणूनही या लेखांकडे पाहणारा एक वर्ग आमच्या लक्षात आला. अशा वर्गासाठी ‘दीर्घा’ ही दीर्घ लेखांची नवी कॅटेगरी सुरू केली आहे. 
याशिवाय ‘अवांतर’ ही एक निःशुल्क कॅटेगरी आम्ही बहुविधवर चालवत आहोत. त्यात प्रामुख्याने सोशल मीडियात जे दर्जेदार व माहितीपूर्ण लिखाण होत असतं, ते सर्व साहित्य आपल्या पोर्टलवर संग्रहित करावे आणि सर्व वाचकांना ते कधीही वाचण्यास उपलब्ध व्हावे, असा आमचा उद्देश आहे. सध्या विविध माध्यमांतून माहितीचा लोकांवर अक्षरशः भडिमार होत आहे. अगदी अमेझॉन प्राइम किंवा नेटफ्लिक्ससारख्या सशुल्क डिजिटल वाहिन्याही हवे तेवढे साहित्य दर्शकाला पुरवण्यास सज्ज आहेत. मात्र या सर्व माध्यमांमध्ये चांगले काय आहे, दर्जेदार काय आहे, कुठले साहित्य उपयुक्त आहे- हे सांगणारे कुणीच नाही. त्यामुळे यूजरचा 70 टक्के वेळ ब्राऊझ करण्यात जातो आणि प्रत्यक्षात हाताशी काहीच लागत नाही. या डिजिटल समुद्रात बुडलेल्या माणसाला कुणी तरी असा माहीतगार मित्र हवा आहे की, जो त्याला सांगेल,-मी सांगतो, तू हे वाच, तू हे ऐक, तू हे बघ. आणि नेमकं हेच क्युरेटिंगचं काम बहुविधवरील संपादक आपापल्या कॅटेगरीत करत आहेत. 

पुनश्चपासून सुरू झालेला हा प्रवास एका अशा बिंदूपाशी आला आहे की, जिथे आज विविध कॅटेगरींच्या 7 उपनद्या उत्पन्न झालेल्या दिसतात. पण आम्हाला अशा असंख्य उपनद्यांची शक्यताही जाणवत आहे. मग त्यांचे विषय विभिन्न असतील. नाटक, संगीत, समीक्षा, अनुवादित साहित्य, काव्य, क्रीडा, शास्त्रीय संगीत, अध्यात्म, सामाजिक चळवळ, उपक्रम, स्पर्धात्मक परीक्षा, शैक्षणिक विषय, आरोग्य, वैद्यकीय सल्ला, फिटनेस ग्रुप... अशा अगणित क्षेत्रांना आम्ही अजून स्पर्शही करू शकलेलो नाही. एखादा कल्पक योजक आणि संग्राहक यातील शक्यतांचा वापर करून बहुविधवर स्वतःची कॅटेगरी सुरू करू इच्छित असेल, तर त्याचे स्वागतच आहे. त्या-त्या विषयांतील तज्ज्ञ, अनुभवी संपादक मंडळींनी या नव्या मंचाचा वापर करावा, मोबाईलधारक वाचकांपर्यंत आपापले साहित्य पोहोचवावे- असा विचार करूनच बहुविध.कॉम हा डिजिटल प्लॅटफॉर्म आपण सुरू केला आहे. लेखक/संपादकांवर छपाईचा बोजा पडू नये, त्याला त्याचे पारिश्रमिक आर्थिक रूपात मिळावे, डिजिटल वाचकांना माफक दरात हे साहित्य वाचायला मिळावे आणि शक्य तितक्या साहित्यविषयांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे अनेक उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन बहुविधने ही उडी मारली आहे.

 डिजिटल नियतकालिक सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक गुंतवणूक आणि त्याचे तांत्रिक सोपस्कार पार पाडण्यात बरेच पैसे, खूप वेळ व त्याहूनही अधिक माथेफोड करावी लागते, याचा अनुभव पुनश्चच्या वाटचालीत आम्ही जवळून घेतला होता. हे सगळं काम प्रचंड आहे आणि त्याची पायाभरणी आम्ही केली आहे. आमचे आता असे आवाहन आहे की, तुम्ही आपापल्या कल्पना आणि साहित्य घेऊन या. तांत्रिक बाबींची काळजी आम्ही घेऊ. तुम्ही केवळ उत्तम दर्जेदार साहित्य देण्यावर लक्ष केंद्रित करा. त्या-त्या साहित्याची आवड असणाऱ्यांपर्यंत कॅटेगरी पोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करा. ज्या निग्रहाने आणि वारंवारतेने आम्ही पुनश्च चालवत आहोत, त्याच निश्चयाने तुमची कॅटेगरी चालवा. तुम्हाला इथे यश मिळेलच याची खात्री आम्ही आता देऊ शकतो. 
www.bahuvidh.com
 

Tags: किरण भिडे बहुविध kiran bhide bahuvidh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

किरण भिडे,  ठाणे, महाराष्ट्र

सेल्स एक्सिक्युटीव्ह- मल्टिनॅशनल कंपनी, संस्थापक मालक- 'मेतकूट' (मराठी खाद्यपदार्थांचे रेस्टॉरंट), संचालक- 'माधवबाग' (ह्रदयोपचार संस्था) 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके