डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

महात्मा फुले बाल कल्याण गृह धर्माबाद, जि. नांदेडतर्फे आंध्रप्रदेशात बाल अभियान आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र आंध्रच्या सीमावर्ती प्रदेशातील बाल अभियानच्या अनुभवांचे हे टाचण. अनुभव उत्साहवर्धक आहेत.

 

आंतरराष्ट्रीय बालक वर्षानिमित्त संधिविहीन मुलांच्या समस्यांकडे समाजाने लक्ष वेधुन जनजागरण व्हावे, तसेच तर अनेक मुलांमध्ये या मुलांना मिसळण्याची संधी मिळावी व समाजातील विभिन्न प्रकारच्या लोकांचा परिचय व्हावा, निसर्गदर्शन घडावे. अशा विविध हेतूंनी धर्मावाद ते निजामाबाद अशी पदयात्रा, निजामाबाद ते हैद्राबाद अशी सहल आंध्रप्रदेशात आयोजित करण्यात आली होती. 

31 मुले व शिक्षक महात्मा फुले बालकल्याण गृहासमोर आपापले सर्व सामान असलेल्या पिशव्या घेऊन पदयात्रेकरता तयार झाले. प्रत्येकाच्या पिशवीत एक ताट, वाटी, ग्लास, चादर, सतरंजी व वापरण्याचे कपडे भरलेले होते. दोन मुलांनी समोर एक मोठा फलक धरला होता.

त्यावर लिहिले होते. 

आंतरराष्ट्रीय बालक वर्ष 1979 

इन्टरनॅशनल वॉकिंग क्रूसेड 

महात्मा फुले बाल कल्याण गृह धर्माबाद. 

पदयात्रा घोषणा देत गावातून निघाली. ‘हमारा नारा भारत जोडो’, ‘भारत का निर्माण कौन करेगा?’, ‘हम करेंगे हम करेंगे’ अशा अनेक घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. नगरपालिकेसमोर येताच नगराध्यक्ष श्री. बाबा पाटील, इतर अधिकारी, गावातील प्रमुख व्यापारी व नगरसेवक पदयात्रेत सामील झाले. घराघरांतूनच व रस्त्यातून दुतर्फा लोकांची गर्दी होती. हा अपूर्व सोहळा गावाच्या शिवेपर्यन्त आला. त्यानंतर अधीक्षक श्री. लुत्फी यांनी सर्वांना पदयात्रेचा उद्देश स्पष्ट केला. नगराध्यक्षांनी व इतर काही लोकांनी समयोचित भाषणे केली. मुलांच्या समस्यांकडे यापुढे खास लक्ष देण्याचे आश्वासनही ग्रामस्थांनी दिले. सर्वांचा शुभाशीर्वाद घेऊन पदयात्रा 'बासर’ या गावाकडे निघाली.

धर्माबाद ते बासर हे अंतर सुमारे 12 किलोमीटरचे होते.

पहिल्या मुक्कामाच्या गावाजवळ पदयात्रा पोहचली, घोषणांना सुरुवात झाली. गावातील अबाल, वृद्ध रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पाहू लागले. याच वेळी बासर गावातील अॅडव्होकेट श्री. रामराव, डॉ. दिगंबरराव, भुजंगराव व इतर अनेक लोक सामोरे येऊन त्यांनी मुलांचे स्वागत केले. यानंतर सर्व मिळून मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे सरस्वती देवीच्या मंदिराकडे निघाली पदयात्रेची शोभा अपूर्व दिसत होती. गावकरी मुलांबरोबर दोन दोनची ओळ करून चालले. या दिवशी गावचा बाजार असल्यामुळे पदयात्रा बाजारातून पुढे गेली. त्यावेळी बघणारांची खुप गर्दी झाली. पदयात्रा मंदिराजवळ येताच मंदिराचे व्यवस्थापन अधिकारी सामोरे आले. त्यांनी सर्वांचे स्वागत केले. 

बासरचे हे सरस्वती मंदिर फार प्रसिद्ध आहे. दूरदूरचे लोक हजारोंच्या संख्येने दर्शनाकरता येथे येतात.

रात्री भजनाचा कार्यक्रम झाला. सकाळपासूनच सर्व आंध्रप्रदेशात सौम्य वादळ झाल्यामुळे आकाश अभ्राच्छादीत होते. थंडी मात्र फारशी नव्हती. मुले गावाजवळूनच वाहणाऱ्या गोदावरी नदीकडे रवाना झाली. याच नदीवर रेल्वेचा एक भव्य पूलही आहे तोही मुलांनी पाहिला. इतर काही ठिकाणे पाहुन व गावातून फेरफटका मारून मुले परत आली.

सायंकाळी देवीच्या मंदिरासमोरील बागेत गावकरी, गावातील मुले व पदयात्रेतील मुले यांची सभा झाली. बालसमस्यांवर व्याख्याने झाली. त्यानंतर गावातील प्रमुख व्यक्तीच्या हस्ते 'बालतरू' सामन्यात आले. पदयात्रेची आठवण म्हणून व बालसमस्यांची आठवण म्हणून या तरुचे रक्षण करण्याचे गावकऱ्यांनी जाहीर वचन दिले. संध्याकाळी भक्तीगीते,गजल व कव्वाली गायन झाले. मंदिरात आलेल्या एका अंध गायकाने कार्यक्रमात फार मजा आणली.

जड अंत: करणाने बासर सोडले, दोन दिवस गावकऱ्यांनी एवढे उत्तम स्वागत केले होते. त्यांना सोडून जाणे जिवावर आले होते. निरोप देण्याकरता काही गावकरी सीमेपर्यन्त आले, घोषणा देत निघाली. पुढचा मुक्काम नवी पेठ या ठिकाणी होता. बासरपासून हे गाव सुमारे 12 किलोमीटर अंतरावर आहे. वेळ सकाळची. आकाशात सर्व ढगांनी गर्दी केलेली, आसपासचा प्रदेश भाताचा शेतांनी व्यापलेला, नजर जात होती तेथपर्यन्त सर्व हिरवे हिरवे दिसत होते! ठिकठिकाणी लहानमोठी तळी, डोंगरांचे सुळके, लहान लहान दऱ्या, सौंदर्यात भर घालत होत्या उत्साहाच्या भरात नवी पेठला कधी पोहचली हे कळलेसुद्धा नाही.

गावच्या सीमेवर ग्रामपंचायतीचे काही सभासद व एक्झीक्युटिव्ह ऑफिसर आलेले होते. त्यांनी स्वागत केले. त्यांच्याबरोबर घोषणा देत बाल अभियान गावात शिरले.  गाव बरेच मोठे. शाळा, हायस्कूल, वाचनालय,दवाखाना, या सर्वांची गावात सोय होती. घोषणा ऐकून रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी झाली. आम्हाला ग्रामपंचायत ऑफिसमध्ये नेण्यात आले. जवळच एक मोठा कॅनाल तुडुंब भरून वाहत होता. कधी एकदाचे कॅनालमध्ये उड्या टाकून मनसोक्त डुंबतो असे मुलांना झाले. मुले मनसोक्त कॅनालमध्ये पोहली. ज्यांना पोहता येत नव्हते, त्यांनी काठावर बसून अंघोळी केल्या. 

नवी पेठ हे गाव तांदळकरता फार प्रसिद्ध आहे. येथून रोज हजारो गोणी तांदूळ महाराष्ट्रात येतो! गावातले बरेच प्रमुख लोक भेटून गेले. विचारपूस केली व पदयात्रेचा उद्देशही विचारला. आज या गावचा बाजार होता. बाजार खुप मोठा होता. मुलांनी गावातून व बाजारातून फेरफटका मारला प्राथमिक शाळा, हायस्कूल, हेल्थसेन्टर, सिनेमागृह वगैरे अनेक ठिकाणी मुले जाऊन आली.

ग्रामपंचायतीचा कंम्पाउन्डमध्ये ‘बालतरु’ अशोक लावण्यात आला. या कार्यक्रमास बरीच ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. सायंकाळी सभा घेण्यात आली. बालकल्याणाबाबतची कल्पना व जनजागरण याबाबतचे स्पष्टीकरण श्री. लुत्फी यांनी केले. पदयात्रेचा वृतान्तही सांगितला. गावकऱ्यांनी मुलांबद्दल विशेष कळकळ व आस्था दाखवली. एवढेच नव्हे तर सर्व मुले सहलीकरता हैद्राबादला जाणार म्हणून प्रत्येक मुलाला दोन रुपयेप्रमाणे एकूण 62.00 रुपये सर्वांसाठी गावातर्फे देण्यात आले. मुलांबद्दल हे प्रेम पाहून सर्वांची अंतःकरणे भरून आली. रात्री भजन व करमणुकीचे कार्यक्रम झाले.

फलक धरुन घोषणा देत पुढील गावाकडे निघाली. नवी पेठच्या लोकांनी जे प्रेम व आपुलकी दाखवली. ती सतत स्मरणात ठेवून जड अंत: करणाने सर्वांचा निरोप घेतला. गावकरी सीमेपर्यंत आले! 

मुक्काम सारंगपुर.

या गावी शुगर फॅक्टरीमध्ये मुक्कामाची व्यवस्था होती. 

नवी पेठ ते सारंगपूर हा रस्ता मोठा, रुंद व डांबरी होता. हा रस्ता पुढे निजामाबादपर्यंत जातो. पुढे तो बेंगलूरपर्यंत जाणारा हमरस्ताही होतो. त्यामुळे मोटारी, रिक्षा, बसेस, मालट्रक यांची एकच गर्दी या रस्त्यावर होती. 

अंतर सुमारे 13 किलोमीटर होते. परंतु ऊन नसल्यामुळे तसेच रस्त्याच्या दुतर्फा उसाचे मळे, ठिकठिकाणी असलेले तलाव, कॅनालचे जाळे, डोंगरांचा चढ, उतार व डोंगरांच्या उतरणीवर लहान लहान गावांची दिसणारी कवलारू छपरे ही शोभा अपूर्वच होती. महाराष्ट्रातील रुक्ष प्रदेश कोठे आणि आंध्रातील हे सृष्टिसौंदर्य कोठे?

मुलांना या दोन्ही प्रदेशातील फरक लगेच कळून आला. या उत्साहवर्धक वातावरणात व रम्य परिसरात सारंगपूर शुगर फॅक्टरी कधी आली याचा पत्ताही लागला नाही. शुगर फॅक्टरी सारंगपूर हल्ली सरकारने आपल्या ताब्यात घेतली आहे. 

सायंकाळी सर्व मुलांना शुगर फॅक्टरी दाखवण्याकरता नेण्यात आले. ऊस लावल्यापासून साखर बाहेर पडेपर्यंतची सर्व यंत्रसामुग्री दाखवण्यात आली व ही यंत्रे कसे काम करतात हे समजावून सांगण्यात आले. एका बाजुला ऊस लावून दुसऱ्या बाजूला साखर पडते, हे दृश्य प्रथमच मुले पाहात होती! फॅक्टरीच्या परिसरात ऊसच ऊस दिसत होता. आसपास सर्वत्र हिरवीगार ऊसाची व भाताची शेते, डोंगर दऱ्यांची उतरण, एका बाजूने निजामसागरचा भव्य कॅनाल तर दुसऱ्या बाजूने रेल्वे रस्ता आणि फॅक्टरी समोरून प्रशस्त डांबरी सड़क. सायंकाळी सभा घेण्यात आली. या सभेत तेथील शाळेतील मुलेही उपस्थित होती. बालसमस्यांवर व मुलांनी आपला जास्तीत जास्त मिळालेल्या संधीचा कसा फायदा करून घ्यावा. याबाबत में. डायरेक्टरांचे फार सुंदर भाषण झाले. इंग्रजी शाळेतील काही मुले व पदयात्रेतील मुले यांचे अनेकविध कार्यक्रम झाले.

निजामाबाद 11 किलोमीटर. आजचे हवामानही उत्साहवर्धक असून आसपासचा प्रदेश रम्य होता. निजामाबाद शहरातील टिळक गार्डनमध्ये येऊन सर्वांनी विश्रांती घेतली. मुक्काम वुमेन्स कॉलेज होस्टेलमध्ये होता. शहराच्या मध्यातून आमची पदयात्रा चालली. मोठमोठ्या घोषणा देत होतो. माणसांनी गच्च भरलेले रस्ते कुतूहलाने आमच्याकडे पाहात होते. निजामाबाद हे जिल्हयाचे ठिकाण असून फार मोठे शहर आहे. येथील व्यापारही फार मोठा आहे. अनेक प्रकारच्या फॅक्टऱ्या, भाताच्या अनेक गिरण्या, उंच उंच इमारती, प्रशस्त सिनेमा गृहे, प्रवासी बसेसची धावपळ हे सर्व पाहून क्षणभर सर्व मुले गोंधळून गेली. कारण एवढे मोठे शहर मुले प्रथमच पाहात होती. लॉयन्स क्लबचे सेक्रेटरी श्री. एम्. गगारेडी यांनी स्वागत केले. या ठिकाणी क्रिकेट रणजी ट्रॉफी मॅच चालू होती व त्याकरिता प्रसिद्ध टेस्ट खेळाडू श्री. रामलाल यादव व श्री. नरसिंह हे आलेले होते. या खेळाडूंना पहावे व क्रिकेट मॅचही पहावी, अशी मुलांची उत्कट इच्छा होती. सर्व मुलांना एक ते पाच मॅच पाहण्यास परवानगी मिळाली. सायंकाळी पदयात्री मुले व हायस्कूलमधील मुले किक्रेट मॅच खेळली. 

'बालतरु' होस्टेल परिसरात लावण्यात आला. त्या नंतर बालसमस्यांवर भाषणे झाली. रात्री 11.00 वाजता काचीगुडाकडे जाणाऱ्या गाडीने आम्ही हैद्राबादला रवाना झालो.

Tags: नु. रा. लुत्फी बाल अभियान #Weekly sadhana N. R. Lutfi Children's Campaign weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके