डिजिटल अर्काईव्ह

कार्यक्रम यशस्वी होण्यास लागणाऱ्या सर्व सुविधांचा कोतवालवाडी या दूरस्थित ठिकाणी प्रकर्षाने अभाव आहे. पाण्याचा ठणठणाट असल्यामुळे पिण्याचे अर्धी बादली पाणी मिळविण्याकरिता जेथे घोर तपस्या करावी लागते व सेवकवर्ग इकडे फिरकत नसल्यामुळे खडतर स्वावलंबनाशिवाय जेथे तरणोपाय नाही अशा ठिकाणी हा समारंभ अतिशय देखणा व यशस्वी झाला ही गोष्ट खास आनंदाची आहे.

22 मे 1996 रोजी सकाळी 11 वाजता कोतवालवाडी नेरळ जि. रायगड या ठिकाणी एक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व श्रेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. हरी धोंडो भडसावळे यांचा 80 वा वाढदिवस मोठया थाटात साजरा करण्यात आला. समारंभास थोर गांधीवादी विचारवंत श्री. बाळासाहेब भारदे हे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यास लागणाऱ्या सर्व सुविधांचा कोतवालवाडी या दूरस्थित ठिकाणी प्रकर्षाने अभाव आहे. पाण्याचा ठणठणाट असल्यामुळे पिण्याचे अर्धी बादली पाणी मिळविण्याकरिता जेथे घोर तपस्या करावी लागते व सेवकवर्ग इकडे फिरकत नसल्यामुळे खडतर स्वावलंबनाशिवाय जेथे तरणोपाय नाही अशा ठिकाणी हा समारंभ अतिशय देखणा व यशस्वी झाला ही गोष्ट खास आनंदाची आहे. 

हरिभाऊंचे चिरंजीव श्री. शेखर भडसावळे यांनी पाण्याचा एक टँकर पाठविल्यामुळे व 250 लोकांचे जेवण करण्यास दोन कातकरी आचारी मिळाल्यामुळे कोठलीही गैरसोय झाली नाही. कातकरी नि आचारी ही कल्पनाच मुळी देशभक्त नि पुढारी या इतकी अतर्क्य आहे. परंतु विश्वास ठेवा, याच आचार्यांनी जेवण इतके चवदार व स्वादिष्ट बनवले, की आलेली सर्व पाहुणे मंडळी खूष होऊन गेली. रणरणते ऊन, गावापासून दूर व तो दिवस कामाचा असल्यामुळे कार्यक्रमास उपस्थिती जरा कमी होती. परंतु ही उणीव अनेक जुने सेवाभावी, कधीही न भेटणारे कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित राहिल्याने भरून निघाली.

वाढदिवसानिमित्त हरिभाऊंना रु. 51,000/- ची थैली देण्यात आली, त्यात स्वतःची रु 10,000/- ची भर घालून हरिभाऊंनी त्यातील रु.51,000/- आदिवासी विद्यार्थ्यांच्या संदर्भ वाचनालया- करिता व रु. 10,000/- ट्रस्टच्या कायमस्वरूपी निधीकरिता दिले. हे वाचनालय व अभ्यासिका नवीन होणाऱ्या वसतिगृहाच्या इमारतीतच असेल व त्यात आदिवासी विद्यार्थ्यांना न परवडणारी सर्व शालेय पुस्तके व इतर ग्रंथ वाचावयास मिळतील. तसेच या अभ्यासिकेत निवांतपणे अभ्यास करता येईल व मुलांना शैक्षणिक कॅसेट्स दाखविण्याची सोय होईल. या वाचनालयास 'हरिभाऊ भडसावळे प्रेरणा वाचनालय' असे नाव द्यावे अशी सूचना आहे. गौरवनिधी देण्यापूर्वी हरिभाऊंना ट्रस्टतर्फे एक मानपत्र देण्यात आले व त्याचे वाचन ट्रस्टचे एक उत्साही विश्वस्त श्री. शरद पाटील यांनी केले.

सभेत अनेक गौरवपर भाषणे झाली. ख्यातनाम कथाकथनकार व लेखिका श्रीमती गिरिजा कीर यांनी हरिभाऊंच्या काही हृद्य आठवणी सांगितल्या. त्या म्हणाल्या 'हरिभाऊंच्या पत्नी शकुंतलाबाई यांनी खूप भोगले आहे. हरिभाऊंबरोबर संसार करण्याचे दिव्य या बाईने एक कर्तव्य म्हणून केले व त्याची कोठे वाच्यता केली नाही. यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे नेहमी एक स्त्री असते असे म्हणतात. पण, मी विचारते पाठीमागे का म्हणून? ती खरे म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी असते व त्यांच्या यशस्वितेत चांगली अर्धी वाटेकरी असते. 

शकुंतलाबाईंनी आपल्या जीवनातील अनेक कटु गोड आठवणी सांगितल्या. त्या म्हणाल्या, हे जमदग्नी आहेत, तसे देशभक्तही आहेत ही जाणीव ठेवून व मुलांकडे पाहून मी एक कर्तव्य म्हणून संसार केला. ज्यांनी ज्यांनी आम्हांला संकटात मदत केली त्यांची आज तीव्रतेने आठवण येते. त्यांना मी आज वंदन करते. प्रा. कोकजे यांनी या उल्हास नदीच्या काठावरील कर्मयोग्याला कवितारूपी मुजरा केला. 

हरिभाऊंचे एक जानी दोस्त श्री. दत्ता ताम्हणे अगदी मनापासून बोलले. ते म्हणाले, 'मी हरिभाऊंना तीन वर्षांनी सीनिअर आहे. आमचे मैत्र फार जुने आहे. हरिभाऊंनी केलेला त्याग, सेवा यात आश्चर्य करण्यासारखे काय आहे? त्या वेळचे संस्कारच असे होते की हरिभाऊ दुसरे काही करूच शकले नसते. त्या काळातील स्वामी आनंद यांचा आध्यात्मिक अधिकार मोठा व त्यांचेच संस्कार हरिभाऊंवर झालेले आहेत.' 

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गौरवनिधी संकलन समितीचे सचिव श्री. बाळ बर्वे यांनी सर्वांचे हार्दिक स्वागत केले. ते म्हणाले. हरिभाऊंचा आज 80 वा वाढदिवस आहे व आजही या घडीला त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांचा उत्साह, व कार्यक्षमता ही एखाद्या तरुणाला लाजवेल अशी आहे. हरिभाऊंचा ज्या वेळी जन्म झाला, त्या वेळी या देशात 'वंदे मातरम्' म्हणण्याची चोरी होती. सर्व भारतीय समाज एक बंड, निर्जीव व चैतन्यहीन गोळा झाला होता. लोकमान्यांनी त्यात चैतन्य ओतले व ज्या वेळी त्यांनी ती ऐतिहासिक गर्जना केली की, 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवीनच, त्या वेळी मात्र भारतीय समाज अगदी खडबडून जागा झाला. टिळकांची ही परंपरा गांधीजींनी पुढे चालू ठेवली. त्यांनी सांगितले 'या देशाची प्रगती झपाट्याने व्हावयाची असेल तर राजकीय सुधारणांबरोबरच सामाजिक सुधारणाही व्हावयास हव्यात.' 

गांधीजींचे जे सच्चे अनुयायी होते त्यांची एक खासियत होती, ते स्वातंत्र्याची चळवळ थांबली की आपणाला कोठल्या ना कोठल्या तरी रचनात्मक किंवा मानवतावादी कामात गुंतवून घेत असत. हरिभाऊंनी स्वातंत्र्यपूर्व काळात वयाच्या 16 व्या वर्षीच घराला रामराम ठोकला व स्वातंत्र्ययुद्धात मोठ्या धड़ाडीने उडी घेतली. त्याबद्दल त्यांना काही वर्षे तुरुंगवासही भोगावा लागला. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात मात्र जंजिरा विलिनीकरणाचा लढा हा एक अपवाद सोडला तर त्यांनी अनेक रचनात्मक कामे हाती घेतली. 

हरिभाऊंच्या बाबतीत एक खास उल्लेखनीय व आदर्श गोष्ट म्हणजे त्यांनी सत्तेच्या राजकारणाकडे मात्र नेहमीच पाठ फिरविली. सत्तेच्या राजकारणाला लागणारी सारी अनुकूलता असताना, म्हणजे बऱ्यापैकी व्यक्तिमत्त्व, चाणाक्ष बुद्धिमत्ता व अगदी मुसमुसणारी महत्त्वाकांक्षा हे गुण असूनसुद्धा त्यांनी कधी सत्तेचे राजकारण केले नाही. तरुण पिढीने याची जरूर नोंद घेतली पाहिजे. त्यांनी केलेल्या अनेक विधायक कामांचा उल्लेख करून ते पुढे म्हणाले, 'मित्रहो हे मी जे तुम्हांला सांगतो आहे, त्यातून हरिभाऊ हे कोणी महामानव आहेत असे मला मुळीच सुचवायचे नाही. एस.एम., सेनापती बापटांना 100 नंबरी सोने म्हणत आणि हे तात्यांच्या बाबतीत 100 टक्के खरे होते. परंतु हा अपवाद नाही. तुम्ही आम्ही सर्वजणच काहींना काही हिणकस घेऊन जन्माला आलेलो असतो. तुमच्या आमच्या सर्वांच्या मर्यादा असतात व हरिभाऊंच्या तर त्या अनेक आहेत. परंतु एक मात्र निश्चित की हा सामान्यतला एक असामान्य माणूस आहे.' 

हरिभाऊ उत्तरादाखलच्या भाषणात म्हणाले की, 'स्वामी आनंद हे माझे गुरू. त्यांनी मला घडवले. मी माझ्या पत्नीवर व कुटुंबावर तसा अन्यायच केला आहे. खरे म्हणजे मी अपराधीच आहे आणि त्याची जाहीर कबुली मी येथे देतो, पण या जगात काही गोष्टींना इलाज नसतो हेच खरे. मी काँग्रेसमध्ये होतो. परंतु काँग्रेसचे ज्या वेळी तीन तुकडे झाले आणि भाकरीचा तुकडा कोणाला मिळतो यात सारे गुंतले त्या वेळी मी माझा मार्ग बदलला. हे स्वातंत्र्य ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यापर्यंत ते पोचले पाहिजे. तुमच्या सर्वाच्या सदिच्छा व प्रेम बरोबर घेऊनच मी यापुढे काम चालू ठेवणार आहे. 

श्री. भारदे आपल्या समारोपाच्या औचित्यपूर्ण भाषणात म्हणाले 'तुम्ही स्वतः काही समाजाचे चांगले काम करीत असतानाच हा जो हरिभाऊंचा गौरव करीत आहात तो मला मोलाचा वाटतो. मानवी जीवनाचे सार्थक होण्याचा मार्ग त्याग आणि सेवा आहे. हरिभाऊ लोकांसाठी राबले, त्यामुळे माझ्या हातून हरिभाऊंचा सत्कार होतो आहे, याचाही मला आनंद वाटतो. आज सर्वत्र सर्वांनी विधायक कार्य सोडलेले दिसून येत आहे. पूर्वी सांगकामे असत आता कामसांग्याची संख्या वाढत आहे. तुम्ही लोक तसे खरे भाग्यवानच आहात, कारण आता तुम्हांला कोतवालांप्रमाणे फासावर चढण्याची किंवा बलिदान करण्याची जरूर नाही. आठवड्यातून अगदी एक तास जरी तुम्हांला या समाजासाठी काही थोडेफार करता आले तर त्याची मात्र आज जरूर आहे. आजचे सर्व राजकारणच मुळी भ्रष्ट झाले आहे. त्याच्या जरा पल्याड जाऊन हा देश सेवाभावी कार्यकर्त्यांचा झाला पाहिजे, स्वार्थी पुढाऱ्यांचा नाही.' तीन तास चाललेल्या या आनंदमयी कार्यक्रमाची सांगता सुग्रास सहभोजनाने झाली.

Tags: स्वामी आनंद  बाळासाहेब भारदे महात्मा गांधी लोकमान्य टिळक काँग्रेस Swami Anand Balasaheb Bharade Mahatma Gandhi Lokmanya Tilak Congress weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी