डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माधवरावजींच्या अंगचा पहिला गुण  हा होय की, सर्व बाजूंनी राष्ट्राची उन्नती झाली पाहिजे, असे त्यांस वाटत होते.  या सर्व दिशांचे व बाजूंचे सांगोपांग परीक्षण करून त्यांच्या योग्यायोग्यतेबद्दल निर्णय करण्याइतकी परमेश्वराने त्यांस प्रगल्भ  व व्यापक बुद्धी दिली होती. धर्मव्यवस्था, समाजसुधारणा, उद्योगधंदे, शिक्षण, राजकीय व्यवस्था वगैरे सर्व बाबतींत आम्ही मागे आहोत आणि या सर्व गोष्टींत सुधारणा झाल्याखेरीज इतर सुधारलेल्या राष्ट्राशी आपणास बरोबरी करता यावयाची नाही, असा त्यांचा पक्का ग्रह झालेला होता. यांपैकी काही बाबतींत त्यांची मते पुढे  ज्या नवीन चळवळी निघाल्या, त्यामुळे सर्व लोकांस पसंत पडेनाशी झाली होती. पण तेवढ्याने त्याची योग्यता कमी होते असे नाही. घाटातून एकदा एका कुशल इंजिनिअरने आगगाडीची लाइन मारल्यानंतर त्यात सुधारणा करणारे जरी पुष्कळ लोक निघाले, तरी ज्याप्रमाणे मूळ इंजिनिअरच्या कल्पकपणास कमीपणा येत नाही, तद्वत्‌च रावसाहेब रानडे यांची स्थिती होय.

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या मृत्यूची वार्ता ऐकून हिंदुस्थानातील, महाराष्ट्रातील व विशेषतः पुण्यातील लोकास आपल्या घरचाच एक कार्यकर्ता पुरुष गेल्याइतके दुःसह दुःख होईल व निदान काही कालपर्यंत तरी या दुःखदायक बातमीने त्यांचे भान नाहीसे होईल, यात शंका नाही. मनुष्याचे जीवित नश्वर आहे वगैरे तत्त्वज्ञानाचे विचार कितीही डोक्यात घोळत असले तरी वैभवाने, बुद्धीने, कर्तृत्वाने किंवा विद्वत्तेने ज्या थोर गृहस्थांनी राष्ट्राचा कार्यभार उचलून पुढाकार घेतलेला असतो, त्यांच्या मृत्यूने काही कालपर्यंत तरी जग शून्यवत्‌ भासणे अगदी स्वाभाविक आहे. माधवरावजींचे चरित्र दुसरीकडे सविस्तर दिले आहे त्यावरून कॉलेजात असताना त्यांच्या विद्वत्तेचा लौकिक कसा वाढला होता, पुढे नोकरीत त्यांचा प्रवेश कसा झाला, तेथे त्यास कोणकोणते मान मिळाले व अखेरीस हायकोर्ट जज्जाच्या जागेपर्यंत त्यांची मजल कशी पोहोचली वगैरे गोष्टी वाचकास कळून येतील. अलौकिक बुद्धिमत्ता, दीर्घ व सतत व्यासंग, देशाबद्दलची खरी कळकळ, विद्यार्जनाचे स्वाभाविक जडलेले व्यसन, अचूक कल्पकपणा वगैरे अनेक गुणांनी माधवरावजींचे चरित्र बोधप्रद असून महत्त्वाचे झाले आहे. याखेरीज राजदरबारी व लोकांत त्यांस जो वेळोवेळी मान मिळत गेला आणि लोकांची व सरकारची जी कामगिरी त्यांनी बजाविली, तीही काही साधारण नाही. दुसऱ्या कोणा पुरुषाच्या हातून एवढीच कामगिरी जरी झाली असती, तरीदेखील त्यांची थोर पुरुषांत गणना करावी लागली असती. पण रावसाहेबांकरता (न्यायमूर्ती हे कृत्रिम नाव सोडून देऊन आम्हा पुणेकर लोकांच्या तोंडी बसलेल्या त्यांच्या नेहमीच्या नावानेच येथे उल्लेख करणे आम्हांस अधिक प्रशस्त वाटते.) आज महाराष्ट्रातील प्रत्येक समजूतदार मनुष्य जो हळहळत आहे तो ते काही हायकोर्टचे जज्ज होते, प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते किंवा सामाजिक सुधारणेचे अध्वर्यू होते म्हणून नव्हे. या गोष्टी थोरपणा प्राप्त होण्यास साधनीभूत नाहीत असे नाही. पण तेवढ्याने माधवरावजींच्या थोरपणाची उपपत्ती लागत नाही, अशी आमची समजूत आहे. 

कै.कृष्णशास्त्री चिपळूणकरांसारखे बुद्धीने बृहस्पतितुल्य विद्वान आमच्यात झाले नाहीत असे नाही. प्रार्थना समाज किंवा समाजसुधारणा यांचे नि:सीम भक्तही माधवरावजींच्या बरोबरीचे किंवा कांकणभर जास्त असू शकतात. हायकोर्टात एक नेटिव्ह जज्ज असावयाचा असा सरकारचा जोपर्यंत विचार आहे, तोपर्यंत नेटिव्ह हायकोर्ट जज्जाचीही परंपरा कायम राहील. माधवरावजींकरता महाराष्ट्रदेश जो आज हळहळत आहे व आपले अपरिमित नुकसान झाले असे आज जे प्रत्येकास वाटत आहे, ते काही असल्या बाह्य गुणांकरिता नव्हे. न्यायमूर्ती हे मार्मिक लेखक, चांगले वक्ते, उत्तम विद्वान अलौकिक बुद्धिमान, जबर विद्याव्यासंगी, असाधारण कल्पक आणि सरळ मनाचे व शांत स्वभावाचे होते, हे सर्वांस महशूर आहे. पण कमलाची खरी योग्यता ज्याप्रमाणे पाकळ्यांच्या आकारात, रंगात किंवा मार्दवात नसता त्याच्या सुगंधीपणात असते, तद्वत्‌ माधवरावजींच्या खऱ्या लोकप्रियतेचे व मोठेपणाचे बीज ज्यास पाहणे आहे, त्याने वरील गुणांखेरीज दुसऱ्या काही गोष्टींचा विचार केला पाहिजे.

हा विचार कोणता, हे सांगण्यापूर्वी माधवरावजी पुण्यास पहिल्याने जेव्हा आले तेव्हा पुणे किंवा महाराष्ट्र याची काय स्थिती होती, याचे थोडक्यात निदर्शन केले पाहिजे. एक राज्य जाऊन दुसरे राज्य कायम होईपर्यंत मध्यंतरी जो काल जातो, तो राष्ट्राच्या अभिवृद्धीस पुष्कळ प्रकारे प्रतिबंधक असतो, हे ऐतिहासिक तत्त्व सुप्रसिद्ध आहे. सन 1820 पासून 1870 पर्यंत महाराष्ट्रदेशाची स्थिती अशाच प्रकारची होती. ज्या पुणे शहरात नाना फडणीसासारख्या मुत्सद्यानी काही वर्षे वास्तव्य करून मराठी राज्याचा गाडा हाकला आणि जेथे पेशवाईची अखेर होईपर्यंत मुत्सद्दी व शूर पुरुषांची परंपरा कायम होती, तेथे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सर्व बाबतींत बहुतेक प्रेतकळा आली होती, असे म्हटले असता त्यात अतिशयोक्ती होणार नाही. ज्या सरदार घराण्यातील पुरुषांनी  पेशवाईत मोठमोठी कामे केली होती, त्याच्या वंशजास इंग्रज सरकारने पेन्शन घेऊन स्वस्थ बसण्यास सांगितले असल्यामुळे नवीन राज्यव्यवस्थेच्या बरे-वाईटपणाबद्दल विचार करण्याचे त्याचे कुलव्रत त्यांनी सोडून दिले होते. देशाचे पुढारीच असे कर्तव्यपराङ्‌मुख झाल्यावर गरीब रयतेची स्थिती कशी झाली असेल, हे सांगावयास नकोच. टोपीवाल्याची राज्य करण्याची शिस्तवार रीत, चोहीकडे त्याने घालून दिलेली कायद्याची बंधने, जमीनपाहणी, आगगाड्या, तारायंत्रे, शाळा, पोस्ट ऑफिस वगैरे राज्यव्यवस्थेच्या अपूर्व थाटाने लोक दिपून गेल्यासारखे झाले होते. त्यातून बंडवाल्यांचा पराभव झाल्यानंतर तर इंग्रजी राज्याची अधिकच छाप बसली गेली. जुन्या सरदार घराण्यांतील पुरुषांस राजकारणात पडण्याची जरूर नसल्यामुळे त्याच्या अंगचे गुण लुप्तप्राय झाले व पुणे पाठशाळेतून तयार झालेले नवीन विद्वान सरकारी नोकरीत आणि त्यामुळे प्राप्त झालेल्या मानातच दंग होऊन राहिले. जी पुण्याची, तीच सगळ्या महाराष्ट्राची स्थिती होती. माधवरावजी पुण्यास येण्यापूर्वी  येथील विश्रामबाग कॉलेज किंवा पूना कॉलेजमधून बुद्धिवान व विद्वान मंडळी तयार होऊन बाहेर पडली नव्हती असे नाही, पण वर निर्दिष्ट केलेल्या अनेक कारणांमुळे राष्ट्रामधील चळवळ अगदी बंद पडून गेली होती व कोणास आपण पुठे काय करावे, हे सुचत नसून आपली हल्लीची स्थिती बरी किंवा वाईट हेही कळत नव्हते. ज्या प्रांतातील लोकांनी एकदा मराठी राज्याचा गाडा हाकला होता, त्यातील पुढाऱ्यांच्या वंशजांची दोन पिढ्यांत अशी स्थिती होऊन जावी, ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट होय. पण माधवरावजींनी पुण्यात जेव्हा पाऊल ठेवले, तेव्हा या महाराष्ट्राच्या जुन्या राजधानीची स्थिती वरच्याप्रमाणे झाली होती, यांत बिलकुल संदेह नाही. कोणत्याही प्रकारची चळवळ करण्याविषयी पराङ्‌मुखता आणि केवळ स्वहितपरायणतेमुळे अथवा पूर्वीच्या अमदानीत ज्या गुणाची चाह होत होती तेच गुण नेटिवांच्या अंगी तरी असण्याची आवश्यकता न राहिल्यामुळे एक प्रकारचे लोकांच्या पुढाऱ्यांच्या अंगी आलेले शैथिल्य हेच काय ते सर्व देशभर नजरेस येत होते. 

लोकांच्या अंगचे तेज अगदीच नाहीसे झालेले होते असे नाही, पण वर लिहिलेल्या कारणांमुळे महाराष्ट्रदेश म्हणजे त्या वेळी एक थंड गोळा होऊन पडला होता. या थंड्या गोळ्यास कोणत्या तऱ्हेने ऊब दिली असता तो पुन्हा सजीव होईल व हात-पाय हलवू लागेल- याचा रात्रंदिवस एकसारखा विचार करून अनेक दिशांनी, अनेक उपायांनी, अनेक रीतींनी त्यास पुन्हा सजीव करण्याचे दुर्धर काम अंगावर घेऊन त्याकरता जिवापाड जर कोणी मेहनत केली असेल, तर ती प्रथमतः माधवरावजींनीच केली, असे म्हटले पाहिजे. व आमच्या मते, हेच त्यांच्या थोरवीचे  किंवा असामान्य मोठेपणाचे मुख्य चिन्ह होय. मुंबईच्या कॉलेजात विद्याभ्यास करीत असताना इंग्रजी विद्येने माधवरावजींच्या मनावर जे परिणाम झाले असतील अथवा त्यांच्या अंत:करणात जो प्रकाश पडला असेल, त्याखेरीज त्यांच्या मनाची सार्वजनिक चळवळीकडे प्रवृत्ती होण्यास डॉ.भाऊ दाजी, दादाभाई नौरोजी वगैरे थोर गृहस्थांची प्रत्यक्ष उदाहरणे बरीच कारणीभूत झाली असावीत. 

एवढी गोष्ट निर्विवाद आहे की, माधवराव मुंबई सोडून कायमचे पुण्याच्या प्रिन्सिपॉल सदर अमिनच्या जागेवर आले, तेव्हा दादाभाई नौरोजींसारख्या पुढारी गृहस्थाच्या उदाहरणाने व कृतीने त्यांच्या मनावर बराच परिणाम झालेला होता. माधवरावजी मुंबईसच राहाते, तर आपल्या असाधारण बुद्धिसामर्थ्याने त्यांनी तेथेही उत्तम लौकिक संपादन केला असता, यात बिलकुल शंका नाही. तथापि, महाराष्ट्राची राजधानी जे पुणे शहर- तेथे येऊन त्यांस जी कामगिरी करावयास सापडली, त्यामुळे माधवरावजींच्या अंगचे अलौकिक गुण लोकांच्या पूर्णपणे नजरेस आले, असे म्हणण्यास काही हरकत नाही. सरकारी नोकरीचे काम चांगल्या रीतीने सांभाळून देशाच्या उत्कर्षाकरिता कोणकोणत्या दिशेने काय काय प्रयत्न केले पाहिजेत हे ठरविणे व ते अमलात आणण्याकरिता सतत परिश्रम करून जागरूकता ठेवणे, हे काही सामान्य बुद्धिमान पुरुषाचे काम नव्हे. कित्येकांस नित्य व्यवसायापुढे सार्वजनिक कामे सुचत नाहीत, सुचली तर करण्याची उमेद नसते; आणि यदाकदाचित करण्यास प्रवृत्त झाले तर त्यास मनुष्यबळ किंवा इतर जी सामग्री लागते, ती ज्या उपायांनी प्राप्त करून घ्यावयाची ते उपाय योजण्यास ते असमर्थ असतात. कित्येक विद्वानांची तर या व्यापक प्रश्नाने बुद्धीच गुंग होऊन जाते व कित्येक एकदेशीय असून कोणास अमुक एक दिशेने राष्ट्राची उन्नती होईल असे वाटत असल्यास दुसरीच दिशा पसंत पडते.

 माधवरावजींच्या अंगचा पहिला गुण हा होय की, सर्व बाजूंनी राष्ट्राची उन्नती झाली पाहिजे असे त्यांस वाटत होते. या सर्व दिशांचे व बाजूंचे सांगोपांग परीक्षण करून त्यांच्या योग्यायोग्यतेबद्दल निर्णय करण्याइतकी परमेश्वराने त्यांस प्रगल्भ व व्यापक बुद्धी दिली होती. धर्मव्यवस्था, समाजसुधारणा, उद्योगधंदे, शिक्षण, राजकीय व्यवस्था वगैरे सर्व बाबतींत आम्ही मागे आहोत आणि या सर्व गोष्टींत सुधारणा झाल्याखेरीज इतर सुधारलेल्या राष्ट्राची आपणास बरोबरी करता यावयाची नाही, असा त्यांचा पक्का ग्रह झालेला होता. यांपैकी काही बाबतींत त्यांची मते पुढे ज्या नवीन चळवळी निघाल्या, त्यामुळे सर्व लोकांस पसंत पडेनाशी झाली होती. पण तेवढ्याने त्याची योग्यता कमी होते असे नाही. घाटातून एकदा एका कुशल इंजिनिअरने आगगाडीची लाइन मारल्यानंतर त्यात सुधारणा करणारे जरी पुष्कळ लोक निघाले, तरी ज्याप्रमाणे मूळ इंजिनिअरच्या कल्पकपणास कमीपणा येत नाही, तद्वत्‌च रावसाहेब रानडे यांची स्थिती होय. वर सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारे थंड झालेल्या देशाच्या प्रत्येक गात्रास कसे सजीव करता येईल, याचा रात्रंदिवस विचार करणारा तीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एकच पुरुष झाला. सन 1800 मध्ये निवर्तलेल्या नाना फडणीसास मोडकळीस आलेली पेशवाई कशी सुरक्षित ठेवावी याची ज्याप्रमाणे रात्रंदिवस काळजी वाटत असे, तद्वत्‌च एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी पंचवीस-तीस वर्षे माधवरावजींनी राज्यक्रांतीने काही वेळ स्तब्ध झालेल्या महाराष्ट्रास कसे सजीव करता येईल, या काळजीत घालविली. केवळ महाराष्ट्राकरताच नव्हेत, तर सर्व हिंदुस्थानबद्दल अशाच तऱ्हेचे  विचार त्यांच्या मनामध्ये सदैव घोळत असत. पाश्चिमात्य शिक्षणाबरोबरच एक प्रकारची सार्वजनिक जबाबदारी आपणावर येऊन पडते, ही गोष्ट माधवरावांनी पुरी ओळखली होती व आपल्या पंचवीस-तीस वर्षांच्या वर्तनक्रमाने लोकांस ती जबाबदारी कशी बजवावी, याचे उत्कृष्ट उदाहरण घालून देऊन त्यांनी महाराष्ट्राचाच नव्हे तर हिंदुस्थान देशाचा लौकिक राखला, असे म्हणणे भाग आहे.

हिंदुस्थानची किंवा महाराष्ट्रदेशाची जागृती अमुक उपायाने होईल आणि अमुक उपायाने होणार नाही, हे ठरविण्यास असामान्य व व्यापक बुद्धी लागते, हे वर सांगितलेच आहे. पण अशा प्रकारची अलौकिक बुद्धी असूनही जर दुसरे गुण पुढाऱ्यांच्या  अंगी नसतील, तर त्यांच्या हातून मोठीशी कामगिरी कधीही व्हावयाची नाही. राष्ट्राची उन्नती होण्यास ज्या हजारो गोष्टी कराव्या लागतात, त्या एकट्याच्या हातून होत नाहीत. त्यास योग्य माणसांची निवड करून त्यांचे साह्य घ्यावे लागते; किंबहुना, अशा प्रकारची माणसे तयार करावी लागतात, असे म्हटले तरी चालेल. माणसे तयार करण्याचे हे काम किती कठीण आहे, हे अनुभवांवाचून समजणे अशक्य आहे. मनुष्याची पारख, त्यांच्या हातून चुका घडल्या असताना त्यांस शांतपणे सांभाळून घेऊन पुन्हा उत्तेजन देण्यास अवश्य लागणारे उत्साह, शांती वगैरे गुण पुढाऱ्यांचे अंगी जरूर असावे लागतात. माधवरावजींच्या अंगी हे गुण पूर्णपणे वसत होते व म्हणूनच त्यांच्या हातून इतकी कामे येथे सिद्धीस गेली. सार्वजनिक सभा, वक्तृत्व सभा, लवाद कोर्ट, प्रार्थना समाज, फिमेल हायस्कूल, औद्योगिक चळवळ वगैरे ज्या अनेक संस्था पुणे शहरात झाल्या किंवा आहेत, त्या सर्वांशी माधवरावजींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने संबंध होता असे आढळून येईल. या सर्व चळवळी सुरू ठेवण्याबद्दल लोकमत जागृत करून कायम ठेवणे, निरनिराळ्या संस्थांकरता निरनिराळी मनुष्ये पाहून त्यांच्या हातून ती ती कामे करून घेणे, स्वदेशातल्या किंवा परदेशातल्या सर्व प्रकारच्या हालचालींवर नजर ठेवून त्याचा देशाच्या उत्कर्षाशी कसा संबंध पोहोचतो, याचे अहोरात्र मनन करणे- हे माधवरावजींचे व्यसनच होऊन राहिले होते. त्यांच्या घरी केव्हाही जा, तेथे काही ना काही तरी सार्वजनिक विषयाची चर्चा चालू असावयाचीच. बारा आणि बारा चोवीस तास अशा रीतीने सार्वजनिक कामांत एकसारखे मन घालून ती सुयंत्रित रीतीने चालविण्याइतके बुद्धिसामर्थ्यच आधी फार थोड्या लोकांत असते आणि ज्या थोड्या लोकांच्या अंगी अशा प्रकारचे सामर्थ्य असते त्यांस आलस्याने, स्वहितपरतेने किंवा उत्साहभंगाने पछाडले असल्यामुळे युनिव्हर्सिटीतून दरसाल शेकडो ग्रॅज्युएट बाहेर पडताहेत, तरी रात्रंदिवस देशहितार्थ तन-मन-धन अर्पणारा ‘यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः’ या न्यायाने एखादाच माधवरावजींसारखा पुरुष निर्माण होतो. असा पुरुष आपल्यामधून गेला असता, एकाएकी सूर्यास्त झाल्याप्रमाणे सर्व लोक दिङ्‌मूढ झाले, यात काही आश्चर्य नाही.


माधवरावजींनी जी ही सर्व कामे केली, ती त्यांस सुखाने करता आली, अशी जर कोणाची समजूत असेल, तर ती चुकीची आहे. मुंबईपेक्षा पुणे किंवा महाराष्ट्रदेश यांतील अधिक एकरूप असल्यामुळे सार्वजनिक चळवळीचे माधवरावजींनी मुंबईहून आणलेले बी येथे लवकरच उदयास आले, हे गेल्या पंचवीस-तीस वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहासावरून कोणासही सहज समजण्यासारखे आहे. हे बी रुजत घालून त्यास पाणी घालणे व पुढे तज्जन्य वृक्षाचे पालनपोषण करणे, हे सर्व काम माधवरावजीच करीत होते. त्यांच्या हाताखाली कै. सार्वजनिक काका, कै. सीतारामपंत चिपळोणकर, रा.रा.शिवराम हरि साठे वगैरे बरीच मंडळी असून पुढे पुढेे कै.रा.ब. नूलकर, कै.कुंटेंसारख्यांचेही साह्य त्यास मिळाले होते. पण या सर्व गृहस्थांची व त्यांनी चालविलेल्या कामाची मदार काय ती माधवरावजींवरच असे. ही गोष्ट लवकरच सरकारच्या नजरेस आली. मल्हारराव गायकवाड यांस पदच्युत केल्यानंतर त्यांची कमिशनमार्फत जी चौकशी झाली, तेव्हा पुणे शहरात झालेली चळवळ आणि सन 1879 मध्ये बुधवारवाडा जळाला असता, गावात झालेली धामधूम ज्यास आठवत असेल, ते रावसाहेबांनी अंगीकारलेला क्रम बिनधोक्याचा होता, असे कधीही म्हणणार नाहीत. महाराष्ट्रातील लोकांस सार्वजनिक बाबतींत चळवळ करण्याचे जर कोणी शिक्षण देत असेल तर ते माधवरावजीच होत. ही गोष्ट सरकारास कळून चुकली होती आणि माधवरावजींची पुण्याहून नाशिक व नाशिकाहून धुळ्यास जी उचलबांगडी झाली, ती काही केवळ एक जागी एक मनुष्य पुष्कळ वेळ ठेवणे योग्य नाही एवढ्याचकरता नव्हे, हे सर्वांस माहीत आहेच. फार लांब कशाला, माधवरावजींनी स्थापन केलेली सार्वजनिक सभा ही राजद्रोही आहे, असा सर रिचर्ड टेपलच्या कारकिर्दीत बूट निघाला होता; पण या सर्व अडचणींतून आणि संकटांतून धिमेपणाने माधवराव यांनी हातात धरलेली सर्व कार्ये तडीस नेली. यांच्यापेक्षा कमी उत्साहाचा पुरुष प्रसंगी डगमगून गेला असता. पण रावसाहेबांच्या बुद्धीचे व्यापकत्व जितके अलौकिक होते तितकाच शांती हा गुण त्यांचे अंगांत असामान्य असल्यामुळे त्यांच्या दीर्घोद्योगास अखेरीस यश येऊन मुंबई इलाख्याच्या मध्यभागात एक प्रकारची विशेष जागृती प्राप्त झाली. माधवरावजींसारखे पुरुष जेथे निपजले नाहीत, तेथल्या आणि महाराष्ट्राच्या स्थितीची तुलना केली असता आमच्या म्हणण्याची सत्यता कळून येईल. सारांश- महाराष्ट्रात जर काही आजमितीस जोम आढळून येत असला, त्यातील वक्ते व लेखक जर निर्भयपणे सार्वजनिक गोष्टीची चर्चा करीत असले; तर ते माधवरावजींच्या 25 वर्षांच्या दीर्घोद्योगाचे फल होय, असे म्हणण्यास कोणतीही हरकत नाही.

अशा तऱ्हेचा पुरुष देशात निर्माण होणे हे देशाचे एक भाग्यच आहे. विद्वत्ता, मुत्सद्दीपणा, काम करण्याची हौस, सार्वजनिक हित कोणत्या उपायांनी करता येईल याबद्दल एकसारखा निदिध्यास आणि लोकांनी नेहमी आपल्या उन्नतीच्या चळवळीत व्यग्र असावं अशी अनिवार इच्छा- इतके गुण अंगी वसत असलेले थोर पुरुष राष्ट्रांत वारंवार निपजत नसतात. महाराष्ट्रदेशात अठराव्या शतकात नाना फडणीस अशा प्रकारचे मुत्सद्दी होऊन गेले खरे, पण विद्वत्तेचे मान लक्षात आणता, त्यांची आणि माधवरावजींची तुलना करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या किंवा दक्षिणेच्या प्राचीन इतिहासात प्रसिद्धीस आलेले हेमाद्री किंवा माधवाचार्य यांची उपमा आमच्या मते माधवरावजींस अधिक साजण्यासारखी आहे. माधवाचार्यांची बुद्धी चोहोकडे अकुंठित असल्यामुळे त्यांस ‘सर्वज्ञ: स हि माधवः’ असे म्हणत असत. माधवरावजींचे बुद्धिवैभवही अशाच प्रकारचे विस्तृत व व्यापक होते आणि या इंग्रजी राज्यांत जर हायकोर्टच्या जज्जाच्या कामापलीकडे त्यांच्या विशाल बुद्धीचा उपयोग झाला नाही तर, तो दोष माधवरावजींचा नव्हे- हल्लीच्या राज्यपद्धतीचा आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. माधवरावजी जर आणखी काही दिवस जगते, तर त्यांनी सुरू केलेल्या चळवळी उघड रीतीने हाती घेऊन दादाभाई किंवा ह्यूम यांच्याप्रमाणे त्या शेवटास नेण्याचा उद्योग निकराने होण्याचा संभव होता. पण त्यांच्या हातून आम्हा लोकांचे अशा प्रकारे कल्याण व्हावे असा ईश्वरी संकेत नव्हता, असेच म्हटले पाहिजे. एरव्ही त्यांस 60 वे वर्ष लागले म्हणून त्यांची ज्युबिली करण्याऐवजी त्यांचा मृत्युलेख लिहिण्याचा दुःखकारक प्रसंग आमच्यावर  आला आहे तो आला नसता.

माधवरावजींचा महाराष्ट्राकडे आणि महाराष्ट्राचा  माधवरावजींकडे विशेष ओढा का होता, याचा यावरून विशेष खुलासा होईल. कायदेपंडित, लेखक वगैरे बाबतींत माधवरावजींची योग्यता इतर कोणत्याही राष्ट्रीय पुढाऱ्यापेक्षा कमी नव्हती. किंबहुना, सर्व विषय अवगत करून घेण्याची हौस आणि कोणताही विषय हाती घेतला असता त्यासंबंधी काही तरी नवी शक्कल काढून त्यास मनोहर रूप देण्याची त्यांची अपूर्व हातोटी दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रीय पुढाऱ्यांत सापडेल, असे आम्हास वाटत नाही. पण याहीपेक्षा त्यांच्या अंगचा लोकोत्तर गुण म्हटला म्हणजे- आपल्या राष्ट्राचा, अभ्युदय केव्हा ना केव्हा तरी खास झाला पाहिजे, किंबहुना ही गोष्ट परमेश्वरानेच संकल्पित आहे, अशी जी त्यांच्या ठायी उमेद होती, ती होय. भावी सुपरिणामाबद्दल अशा तऱ्हेची निःसंशय मनोवृत्ती फारच थोड्या पुढाऱ्यांचे ठायी आढळून येते. सरकारचा ताबेदारपणा, योग्य माणसांची कमतरता, समाजामध्ये रूढ असलेल्या समजुती इ. अनेक कारणांनी माधवरावजींस आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी करता आल्या नाहीत, तथापि दूरवर नजर देऊन धीमेपणाने अंगीकृत कार्ये त्यानी अव्याहत रीतीने चालू ठेवली होती.

प्राचीन व अर्वाचीन सुधारणेच्या झगड्यात मनुष्यास पदोपदी कसे बुचकळल्यासारखे होते, याचे एके प्रसंगी त्यांनी मोठ्या मार्मिक रीतीने वर्णन केले आहे. या सर्व अडचणी सोसून देशोन्नतीच्या कार्याकरता उत्साहाने भगवा झेंडा हाती घेऊन बिनतक्रार सदैव पुढे राहणे, हे काही लहानसहान मुत्सद्दीपणाचे काम नव्हे. पण माधवरावजींची लोकसेवा एवढ्यावरच थांबली नाही. त्यांनी आपल्या हयातीत आपल्या जन्मभूमीतील लोकांस शहाणे करून सोडण्याचा क्रम अबाधित चालू ठेवला होता. राष्ट्रामध्ये लिहिणारे व बोलणारे पुढारी जरी पुष्कळ असले, तरी अशा रीतीने समाजामध्ये जागृती उत्पन्न करण्याचे गुरुत्व ज्यांच्याकडे देता येईल, असे लोक फारच विरळा आहेत. माधवरावजी हे अशा विभूतींपैकीच एक होते व म्हणूनच त्याचकरिता आज सर्व लोक आम्हा सर्वांचा एक अप्रतिम हितकर्ता गेला म्हणून हळहळत आहेत. अशा तऱ्हेचा पुरुष इंग्रजी राज्य झाल्यापासून तरी महाराष्ट्रात निघाला नाही व पुढेही माधवरावजींची जागा लवकर भरून येईल असे वाटत नाही.

अशा तऱ्हेचा  पुरुष काळाने आमच्यामधून ओढून न्यावा, हे आमचे मोठे दुर्दैव होय. माधवरावजींच्या कुटुंबाची त्यांच्या मृत्यूने जी हानी झाली आहे, ती तर खरोखरीच दुष्परिहार्य होय. त्यांच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे खरा व आम्ही कितीही शांतवन केले तरी ते दुःख कमी होणे कठीण आहे. तथापि, महाराष्ट्रातील प्रत्येक जण त्यांच्या दुःखाचा वाटेकरी आहे, या गोष्टीकडे लक्ष देऊन त्या आपले मन विवेकाने आवरतील आणि महाराष्ट्रातील लोक ज्या महापुरुषाच्या मृत्यूकरता आज आपण सर्व जण दुःख करीत आहोत, त्यांचेच उदाहरण आपणांपुढे ठेवून यथाशक्ती पण खऱ्या कळकळीने त्यांनी घालून दिलेला कित्ता गिरवून त्यांच्या ऋणांतून अंशतः तरी मुक्त होतील, अशी आम्हास आशा आहे. माधवरावजी तर गेलेच पण त्यांनी घालून दिलेले उदाहरण डोळ्यांपुढे ठेवून सर्व जण जर देशकार्याकरता यथाशक्ती झटण्याचा प्रयत्न करतील, तर आपल्या सर्वांस जी गोष्ट हवी आहे, ती प्राप्त झाल्याखेरीज कधीही राहणार नाही. माधवरावजींच्या गुणाबद्दल जितके जास्त लिहावे तितके थोडेच आहे; याकरता आजचा लेख आम्हास जरी अपुरा वाटत आहे, तरी माधवरावजींस त्यांच्या सत्‌क्रमाप्रमाणे गती मिळो, एवढी अखेरीस प्रार्थना करून दुखवट्याचा लेख येथेच संपवितो.

(लोकमान्य टिळक यांनी 1887 ते 1920 या काळात ‘केसरी’चे संपादक असताना विपुल लेखन केले, ते सर्व अनेक खंडांमध्ये संग्रहित करण्यात आले आहे. त्यातील ‘लोकमान्य टिळक लेखसंग्रह’मधील संकीर्ण खंडातून हा लेख घेतला आहे.)

Tags: टिळक स्मृतिशताब्दी स्मृतीलेख केसरी न्यायमूर्ती रानडे महादेव गोविंद रानडे लोकमान्य टिळक बाळ गंगाधर टिळक tilak death anniversary tilak 100 tilak obituary on ranade lokmanya tilak justice m g ranade tilak on ranade weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके