डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हा तर भारतीय संस्कृतीचा गर्भपात!

मद्रासमधील चित्रा या 16 वर्षांच्या अनाथ मुलीने गुप्तपणे लग्न केल्यानंतर तिला गर्भ राहिला. तिचा गर्भपात करण्याच्या परवानगीसाठी तिच्या वडिलांनी मद्रास हायकोर्टाकडे अर्ज केला होता. परंतु चित्राने मात्र हे मूल आपले आहे आणि त्याव्यावर आपल्या आई-वडिलांचा काहीही हक्क नाही असे ठामपणे सांगितले.

'असाही एक निर्णय' हा साधना 24 डिसेंबरच्या अंकातील चित्रांगदा यांचा लेख वाचला आणि मनात विचारांचे काहूर माजले. मद्रासमधील चित्रा या 16 वर्षांच्या अनाथ मुलीने गुप्तपणे लग्न केल्यानंतर तिला गर्भ राहिला. तिचा गर्भपात करण्याच्या परवानगीसाठी तिच्या वडिलांनी मद्रास हायकोर्टाकडे अर्ज केला होता. परंतु चित्राने मात्र हे मूल आपले आहे आणि त्याव्यावर आपल्या आई-वडिलांचा काहीही हक्क नाही असे ठामपणे सांगितले. तिचे हे म्हणणे ग्राह्य मानताना खंडपीठाचे न्यायमूर्ती जस्टिस एस. श्रीनिवासन् आणि जस्टिस अब्दुल हादी यांनी घटनेच्या अगदी मुळाशी जाऊन हा निर्णय कायदेशीर, सामाजिक आणि वैद्यकीय अशा सर्व संदर्भाची भरपूर छाननी करून घेतलेला दिसतो. सदर निकालच्या पुष्टीसाठी त्यांनी हिंदु, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातील काही अवतरणेही उद्धृत केली आहेत.

चित्राने स्वतः धिटपणाने जो निर्णय घेतला त्याबद्दल ती कौतुकास पात्र आहे. किंबहुना तिच्या गर्भपातास मान्यता दिली गेली असती तर त्याचा तिच्यावर फार मोठा मानसिक परिणाम झाला असता हेही खरे आहे. या खळबळजनक निकालामुळे तथाकथित सज्ञान समाज ढवळून निघाला असेल यात संशय नाही.

हा लेख वाचल्यानंतर माझे सुधारक मनसुद्धा कमालीचे अस्वस्थ झाले. चित्राला जो न्याय मिळाला त्याबद्दल मला वैषम्य वाटत नाही. पण माझे मन एका वेगळ्याच विचाराने अशांत झाले. हे असे का घडले? चित्राला तिच्या त्या नवऱ्याबद्दल वाटले ते खरे प्रेम की केवळ लैगिक आकर्षण? 13-14 वर्षाच्या मुला-मुलींमध्ये अशा भिन्नलिंगी आकर्षणाची सुरुवात होणे यात तसे गैर काहीच नाही. फ्रॉईडच्या मते तर मातेच्या स्तनातले दूध संपले किंवा बालकाचे पोट भरले तरी तो आपल्या आईचे स्तन चोखत राहतो याचे कारण हेच आकर्षण! परंतु हे सर्व मान्य करूनही एक मूलभूत प्रश्न मनात निर्माण होतो. 13-14 वर्षाच्या मुल-मुलीमध्ये आताच हे इतके जबरदस्त आकर्षण का निर्माण व्हावे? आणि हे आकर्षण इतक्या निर्धास्तपणे, बिनदिक्कत फलद्रूप होते याचा अर्थ काय? मी कॉलेजमध्ये असताना माझ्याही मनात असे आकर्षण निर्माण झाले होते. परंतु माझी पावले कधी त्या दिशेने वळली नाहीत. एखाद्या गोष्टीबद्दल मोह वाटणे हे पाप नाही, परंतु त्या मोहाला बळी पडणे हे मात्र पाप आहे हे महात्मा गांधींचे वाक्य मला इथे आठवते.

चित्रासारख्या मुलीच्या मनास असा मोह होणे यात मला काही फार भयंकर अनर्थ वाटत नाही. परंतु या मोहाला बळी पडण्याइतकी आजची ही युवा पिढी बेताल आणि अविचारी कशी बनत चालली आहे?

या घटनेचा सूक्ष्मपणे विचार करताना मला नुकतीच घडलेली दोन उदाहरणे आठवली. पुण्यातील एका कॉलेजातील युवकाने प्रेमभंग झाल्यामुळे प्रथम आपल्या प्रेयसीची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. दुसरी ही एक घटना धक्कादायक आहे बोरिवलीच्या एका शाळेतील 13-14 वयोगटातील मुलांबाबत. ही मुले कॅम्पसाठी एका ठिकाणी गेली असता रात्री दहा साडेदहा वाजता लाईट गेल्यानंतर मुलींच्या रूमकडे वळली आणि त्यांनी त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही वृत्तांनी मला त्या वेळी सुन्न केले. आजची ही पिढी चालली आहे तरी कोठे? परंतु याला आपणच जबाबदार आहोत. उज्वल भारतीय संस्कृतीचे दर्शन या पिढीला घडलेले नाही हे कटु सत्य आहे. घरोघरी दूरदर्शनच्या 'इडियट बॉक्स' मधून पाश्चात्य संस्कृतीचा जबरदस्त पगडा बसून आज ही पिढी सुखाच्या मृगजळामागे धावते आहे. मेट्रो वाहिनीवरील 90% कार्यक्रम हिंदी सिनेसृष्टीवर आधारित असून दुर्देवाने त्यातून लिंगपिसाट वृत्तीच वाढीस लागते आहे. छायागीत, सुपरहीट मुकाबला यासारखे कार्यक्रम एकत्र बसून बघताना लहान मुलांसमोर आम्हां सुविध पालकांना मान खाली घालावी लागते.चित्रपटातले तथाकथित नायक, नायिका हेच आजच्या मुला-मुलींचे आदर्श ठरू पाहत आहेत. हा दारुण अधःपात आहे. स्वार्थी आणि भोगवादी वृत्तीतून विनाशाकडे अटळ वाटचाल चालू आहे. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' या गीतेतल्या तत्वज्ञानाची आज नितांत आवश्यकता आहे. पण हे सारे करायचे कुणी?

There can be no culture without civilization आणि Culture is the efflorescence of civilization हे डॉ. हुमायून कबीर यांचे विचार लक्षात घेतले तर विनाशाप्रत नेणाऱ्या ज्या सुधारणांच्या मागे आपण लागलो आहोत. त्यातून निर्माण होणारी संस्कृतीही किडलेलीच असणार! पाश्चात्यांच्या चांगल्या गोष्टी टाळून त्यांचा फक्त भोगवादी दृष्टिकोनच आपण स्वीकारावा ही आपली शोकांतिका आहे. त्यातून भारतीय संस्कृतीचा ऱ्हास तर होणार नाही ना असे एक भयानक चित्र आज दृष्टीसमोर उभे आहे. अज्ञान असतानाही चित्रा ज्या नैतिक अधःपाताला बळी पडली त्याचे कारण हेच आहे. तिच्यासंबंधीचा न्यायालयाचा निर्णय कितीही सूज्ञ असला तरी त्यापासून स्फूर्ती घेऊन घराघरातून अशा चित्रा निर्माण व्हाव्यात अशीच अपेक्षा आपण यापुढे करायची काय, याचा आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे. चित्राच्या गर्भपाताला जरी न्यायालयाने परवानगी नाकारली असली, तरी भारतीय संस्कृतीचा हा जो गर्भपात होत आहे त्याला कुणाचीच परावानगी नाही. त्यासाठी सदसद्विवेकबुद्धीच गहाण टाकलेली दिसतें आणि असदसद्विवेकबुद्धी बेसुमार फोफावत चालली आहे. यासाठी पालक आणि पाल्य यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने सुसंवाद साधला गेला पाहिजे परंतु आई वडील दोघेही बहुतेक कुटुंबांत नोकरी करणारे असल्यामुळे हे पाहिजे तसे होत नाही. मुलांना नुसते कोरडे उपदेश करून काही साध्य होणार नाही. आई वडील-मूल यांमध्ये एक प्रकारचे सौहार्दाचे नाते निर्माण व्हायला हवे. परंतु दुर्दैवाने आजची परिस्थिती वेगळी आहे. माता, पिता, आणि गुरुजन यांच्याबद्दल आजच्या पिढीत फारसा आदर आढळत नाही. मुंबईतील एका महापालिका शाळेतील एका विद्यार्थ्याला वर्गशिक्षकांनी काही अपमानास्पद शब्द बोलून वर्गाबाहेर काढले, त्यामुळे त्याने पुन्हा शाळेत येऊन त्या शिक्षिकेवर तलवारीने वार केला ही अत्यंत भयानक घटना आहे. त्या विद्यार्थ्याला तसे बोलण्यात त्या शिक्षिकेचीही चूक असेल हे अमान्य करता येत नाही. तरीसुद्धा त्याने आपल्या शिक्षिकेवर तलवार चालविणे ही अत्यंत गंभीर घटना आहे.

लिंगपिसाट (आणि हिंसक) चित्रपट, टी. व्ही.वर पुन्हा तशाच कार्यक्रमांची रेलचेल, एडस् आणि कुटुंबनियोजनासाठी दूरदर्शनवर होणारा कंड़ोमचा प्रचार, आणि अपुरे किंवा मुळीच नसलेले लैंगिक ज्ञान यामुळे काही मुले-मुली केवळ कुतुहल आणि आकर्षणापोटी या अशा प्रकारांना हकनाक बऴी पड़त आहेत. नीती-अनीती, सत्य-असत्य, चांगले-वाईट यांतील सीमारेषाच आता पुसली जात आहे. विधिनिषेधशून्य अशा अनाचारी प्रवृत्तींचा उदोउदो होत आहे. जे चित्राच्या बाबतीत घडले, त्याला जर सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली तर हळूहळू विवाहसंस्थाच नष्ट होईल की काय अशी भीती वाटते. मुला-मुलींना बदलत्या काळानुसार बदलायला हवे. त्यांना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे याचे भान कधीही सुटता कामा नये, ज्या महान भारतीय संस्कृतीचे रम्य-सुरम्य स्वप्न कै. पूज्य साने गुरुजींनी जोपासले आणि तिच्या रक्षणासाठी असंख्य 'धडपडणारी मुले' निर्माण केली. संस्कृतीचा हा केविलवाणा गर्भपात आपण ‘माझ्या मना बन दगड' असे म्हणत डोळे उघडे ठेवून मक्ख्पणे पाहत बसणार काय?

Tags: साने गुरुजी युवक युवा पिढी संस्कृती Sane Guruji Generation Culture #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके