डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साधना 3 जुलै 94 च्या अंकातील प्रा. ग. प्र. प्रधान यांचा ‘एक द्रष्टा तत्वचिंतक आणि ज्ञानतपस्वी - आल्डस हक्सले’ हा नितांतसुंदर लेख वाचता वाचता मी प्रथम मंत्रमुग्ध झालो. संपूर्ण लेख वाचून झाल्यानंतर मात्र हक्सले यांच्या साहित्यातील जी काही मोजकीच विधाने प्रा. प्रधानांनी उद्धृत केली आहेत त्यांनी माझ्या विचारचक्राला चालना मिळाली आणि मनात काही प्रश्न निर्माण झाले.

साधना 3 जुलै 94 च्या अंकातील प्रा. ग. प्र. प्रधान यांचा ‘एक द्रष्टा तत्वचिंतक आणि ज्ञानतपस्वी - आल्डस हक्सले’ हा नितांतसुंदर लेख वाचता वाचता मी प्रथम मंत्रमुग्ध झालो. संपूर्ण लेख वाचून झाल्यानंतर मात्र हक्सले यांच्या साहित्यातील जी काही मोजकीच विधाने प्रा. प्रधानांनी उद्धृत केली आहेत त्यांनी माझ्या विचारचक्राला चालना मिळाली आणि मनात काही प्रश्न निर्माण झाले.

‘व्रेव्ह न्यू वर्ल्ड' या हक्सले यांच्या कादंबरीसंबंधी लिहिताना प्रा. प्रधान यांनी प्रस्तुत कादंबरीतील वर्णन केलेले दोन-तीन प्रसंग व त्यांवरील त्यांचे भाष्य हे सूज्ञ वाचकांना वैचारिक पातळीवर नेणारे आहे. विज्ञानाचे भावी काळातील प्रयोग व त्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम हा प्रस्तुत कादंबरीचा विषय आहे. स्त्री-पुरुषांना परस्परांबद्दल वाटणारी प्रेमभावना नष्ट करून प्रेमामुळे निर्माण होणारी कोमलता आणि हळवेपणा यांचे निर्मूलन शास्त्रज्ञ करतात. प्रेम संपल्यामुळे वासना शमविण्यासाठी स्त्री पुरुष मुक्तपणे स्वैराचार करतात या हक्सले यांच्या विचाराच्या समर्थनासाठी प्रधानांनी एक रांगडा आदिवासी तरुण आणि त्याची वैज्ञानिक जगात वावरणारी प्रेयसी यांचे मार्मिक उदाहरण दिले आहे. हा प्रियकर आपल्या प्रियेचे प्रियाराधन करताना तिच्या घरातला केरसुद्धा काढण्याची तयारी दर्शवितो. परंतु ती प्रेयसी 'व्हॅक्यूम क्लीनर्स असताना माणसाने कशाला केर काढायचा?' असे त्याला उत्तर देते! खरोखरच विज्ञानाच्या दुरुपयोगातून मानवी जीवनातील सौंदर्य व कोमल भावना नष्ट होत आहेत याचे दुर्दैवी प्रत्यंतर आज किती भयानक रीतीने येत आहे.

नुकतेच उजेडात आलेले जळगावचे वासनाकांड अणि सावंतवाडीतील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार ही मानवी विकृतीची दोन भयानक उदाहरणे. जळगावच्या हॉटेल तिरुपतीमधील खोल्यांमध्ये छुपे कॅमेरे बसविण्यात आले होते. हा विज्ञानाचा भ्रष्ट दुरुपयोगच. याच कॅमेऱ्यांनी त्या असहाय तरुणींची अश्लील चित्रे टिपली आणि त्यांना ब्लॅकमेल करण्यात येऊन या वासनकांडाची नांदी सुरू झाली आणि माणुसकीला कलंक लावणाऱ्या नाटकांचे छुपे प्रयोग हॉटेल तिरुपतीमध्ये बेशरमपणे करण्यात आले.

'कंडोम्स’ चा शोध हा कुटुंबनियोजनासाठी, कुटुंब कल्याणासाठी आहे. पण आज त्यांचा दुरुपयोग करून कॉलेज तरुण-तरुणींमध्ये जी अनैतिकता बोकाळत आहे त्यामुळे प्रेमातील सौंदर्य, कोमलता, शुचिता या साऱ्यांचा बळी दिला जात आहे. सावंतवाडीत ज्या प्रतिष्ठितांच्या धनिक (कु)पुत्रांनी दहावीतल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केले त्या संदर्भात असे काही कंडोम्स पोलिसांना सापडले आहेत.. पशूप्रमाणे वासनाशमन करू इच्छिणाऱ्या पुरुषांबद्दल हक्सले यांनी जरी उपरोधाने लिहिले असले तरी त्यांनी केवढ्या द्रष्टेपणाने एक भयानक सत्य सांगितले आहे!

या उलट 'आयलंड' या कादंबरीत निसर्गाची लय न बिघडवता माणसाला सुखी जीवन कसे जगता येईल ते दर्शविणाऱ्या आदर्श समाजाचे चित्र हक्सले यांनी शब्दांकित केले आहे हे सांगताना, एक पाश्चात्त्य पत्रकार जेव्हा पाला या बेटावर येतो तेव्हा तेथील मैनेचा 'अटेन्शन अटेन्शन' असा शब्द काढणारा आवाज त्याला ऐकू येतो असा उल्लेख प्रधानांनी केला आहे. झपाट्याने बदलत जाणाऱ्या आजच्या भारतीय संस्कृतीला, नव्हे त्या संस्कृतीला विद्रूप करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या लोकांना ताळ्यावर आणण्यासाठी अशा ‘अटेन्शन’ चा संदेश देणाऱ्या असंख्य मैनांची आवश्यकता आहे. प्रधान सर, आता तुम्हीच सांगा, अशा मैना कुठे मिळतील?

विज्ञानाचा आणखी एक आजचा लाडका चमत्कार म्हणजे दूरदर्शन! परंतु आपले सुजाण(?) सरकारच याचा दुरुपयोग करते आहे हे कुणाचे दुर्दैव? दर्जाहीन हिंदी सिनेमा, छायागीत आणि सुपरहिट मुकावला यांसारख्या कार्यक्रमांतून ज्या प्रकारे स्त्री-पुरुष प्रेमाचे अश्लील चित्रण दाखविण्यात येत आहे त्यामुळेच या वासनाकांडाला प्रेरणा मिळत आहे. या छोट्या पडद्यावर 'अटेन्शन' म्हणणारी एकही मैना कुणाला का सापडू नये?

‘एंडस अँड मीनस्' या ग्रंथात 'साध्य जर उदात्त असेल तर साधनेही शुद्ध आणि साध्याला अनुरूप असली पाहिजेत.' या महात्मा गांधींच्या मतांशी समानार्थी विचार हक्सले यांनी मांडले आहेत. या वाक्याने माझ्या मनात एकच मूलभूत प्रश्न निर्माण झाला. देशाचे कल्याण करणे हे आपल्या राजकीय नेत्यांचे उदात्त साध्य आहे. परंतु या साध्यासाठी सत्तारूढ पक्षापासून ते विरोधी पक्षापर्यंत कोणती साधने वापरली जातात? आज आपण साधनशुचिताच गमावून बसलो आहोत. मुक्त व न्यायाधिष्ठित समाजनिर्मितीसाठी धर्मात सांगितलेल्या मूल्यांचा आधार घेतला पाहिजे असेही हक्सले यांनी म्हटले आहे. यावावत काही मतभेद होतीलही. परंतु मुळात मला पडलेला प्रश्न म्हणजे आज आपण कोणत्या धर्माचे पालन करतो आहोत? आज अधर्म हाच धर्म झाला आहे. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके