डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हे प्रिय देशा!
आता माझ्याच मनात
नवीन सूर्योदय होतोय
वारा शीळ घालतोय

तेजःपुंज स्वयंभू सूर्य
मेघांच्या बुरख्याआड
तोंड लपवून बसलेला...
झुळझुळणारा वाराही पक्षाघात झाल्यासारखा
पाय ओढत खुरडत चाललेला...
पक्षी घरट्याघरट्यातच
पंखातले त्राण गळून गेल्यासारखे
जागच्या जागी फडफडणारे...
चोचीतले त्राण हरवल्यासारखे
आर्तपणे चित्कारणारे...
इवल्या रोपट्यापासून वृक्षावृक्षांची प्रचंड अरण्ये
सुतकात बुडाल्यासारखी स्तब्ध निःशब्द..

जाती-जातीच्या, धर्मा-धर्माच्या
आणि राजकीय पक्षांच्या
महाकाय वारुळात
डंख मारणारे विषारी फूत्कार... 
माणुसकीला विद्रूप करणारा
अक्राळविक्राळ दहशतवाद
भरपावसातही मृद्गंधाएवजी
लालजर्द रक्ताचा उग्र दर्प...

शिळ्या भाकरीच्या तुकडयासारखे 
मोडून पडणारे एकेक आयुष्य
ओसाड उन्हातल्या ढेकळांसारख्या 
ढेपाळणाऱ्या आशा-आकांक्षा...
चैतन्यहीन पांगुळगाड्यासारखे
कणा मोडलेले पराधीन स्वातंत्र्य...

हे प्रिय देशा!
आता माझ्याच मनात
नवीन सूर्योदय होतोय
वारा शीळ घालतोय
रंध्रारंध्रातून हिरवे कोंब फुटताहेत
साऱ्या देहातच 
हिरव्यागर्द पानांची सळसळ होतेय
मनाचे पाखरू
उर्जस्वल सूर्यसूक्त गात
आभाळात झेपावू लागलंय
नव्या पहाटेची उन्मेषी झांजरवेळ होते आहे...!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके