डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

वतनदार कुटुंबाच्या सर्वनाशाची शोकात्म कहाणी : 'बारदाना'

लालासाहेबही असाच ‘मालकपणा' मिरविणारा. पण बदलता काळ ओळखून बांधकाम खात्यात सबओव्हरसीयरची नोकरी करणारा, छक्के पंजे करून माया जमवलेला, वरिष्ठांची खातिरदारी करून वर्षानुवर्षे गावातच ठाण मांडून बसलेला 'चतरा' माणूस. त्याचेही 'काप' गेले आहेत पण 'पोके' उरली आहेत याचेच समाधान तो मिरवतो आहे.

प्रकाश देशपांडे-केजकर यांची 'बारदाना' ही कादंबरी. निझाम संस्थानातील एका वतनदार कुटुंबाची निझामी संपल्यानंतरच्या पंधरा-वीस वर्षांत कशी वाताहत होते, याचे प्रत्ययकारी चित्रण या कादंबरीत करण्यात आले आहे. निझाम संस्थानातील एका छोट्या गावातील देशपांडे हे कुटुंब, जमीन-जुमला, सोने- नाणे, बैल बारदाना, बरे-वाडे, गडी माणसे अशी समृद्धी असणारे. ऐषआरामी, निष्क्रियपणा, मोठेपणाविषयीच्या भ्रामक समजुती यांमुळे ही समृद्धी ओसरत जाते आणि अखेरच्या टप्प्यात गरज पडेल तेव्हा उरली-सुरली शेती आणि जे-जे हाताशी असेल ते विकून पैसा उभा करण्याच्या जीवनशैलीमुळे सर्वनाश कसा ओढवतो हे यात दाखवले आहे. देशपांडे यांनी या कुटुंबाच्या चार शाखा, त्यांतील बडेजाबी वृत्ती, 'बशी' पुरुष-माणसे; आल्या प्रसंगाला निमूटपणे सामोरे जात, मूकपणे दुःख भोगणाऱ्या अगतिक स्त्रिया; अर्थहीन वर्तमान आणि पूर्णपणे अंधारलेले भविष्य, त्यामुळे बकालपणे जगणारी तरुण मुले, यांच्या जगण्याच्या चित्रणातून हा सर्वनाश समर्थपणे साकार केला आहे.

युवराज, लालासाहेब, बाळासाहेब आणि रावसाहेब हे या वतनदार कुटुंबाच्या चार शाखांतील कर्ते पुरुष. एकाच मुळाच्या वंशवृक्षाच्या चार शाखांतील या चार पुरुषांचे वागणे- बोलणे, त्यातून प्रकट होणारे त्यांचे स्वभावधर्म यांचे दर्शन लेखकाने अनेक घटनाप्रसंगांतून प्रत्ययकारीपणे घडवले आहे. डामडौली वृत्तीचे, पोकळ बडेजाव मिरविणारे, उपभोगी आणि आळशी असे युवराज आणि त्यांचा गतवैभवाच्या दीनवाण्या खुणा अंगावर वागवणारा थोरला वाडा, हा या कादंबरीतील एक केंद्रबिंदू. बैठक न सोडता, घराबाहेर न पडता, कसलेही काम न करता उधारी करीत आणि गरजेप्रमाणे हाती असेल ते येईल त्या किंमतीला विकून टाकत जगत राहणे, यालाच हे युवराज मोठेपणा समजतात. सारे काही मोडीत निघाले असूनही आपला 'मालकपणा' विसरायला युवराज तयार नाहीत. चुलत घरातला रावसाहेब मागिल्याप्रमाणे पैसे देत नाही हे पाहिल्यावर त्याच्या शिकून नोकरी करणाऱ्या भावाच्या मनात विकल्प आणून रावसाहेबाची चांगली चाललेली कुणबीक मोडकळीला आणण्याचा कारस्थानी उद्योग ते करतात. दारू पिऊन रंडीबाजी करणे हेही त्यांना 'खानदानी मोठेपणाचेच' लक्षण वाटते.

लालासाहेबही असाच ‘मालकपणा' मिरविणारा. पण बदलता काळ ओळखून बांधकाम खात्यात सबओव्हरसीयरची नोकरी करणारा, छक्के पंजे करून माया जमवलेला, वरिष्ठांची खातिरदारी करून वर्षानुवर्षे गावातच ठाण मांडून बसलेला 'चतरा' माणूस. त्याचेही 'काप' गेले आहेत पण 'पोके' उरली आहेत याचेच समाधान तो मिरवतो आहे. थाटामाटात देवाला अभिषेक करून ब्राह्मणभोजन घालणे, यातच त्याला मोठेपणा वाटतो. आमदाराच्या भावाशी खटका उडाल्यावर त्याची गेवराईला बदली होते; पण खटपटी-लटपटी करून मंत्र्यांशी संधान बांधून परत येतो तेही दारूच्या दुकानाचे लायसन्स मिळवून. कसलाही विधिनिषेध न बाळगता लाचारी करीत, पण वरवर मोठेपणा मिरवत जगत राहणे हीच त्याची रीत.

बाळासाहेबही कसली तरी नोकरी करत जगणारा; सतत घाबरलेला, खर्चाचे कसलेही कलम अंगाला लागू नये म्हणून धडपडणारा; आजारी बायको, पस्तिशी गाठलेल्या अविवाहित बहिणी, अर्धशिक्षित बेकार भाऊराजा, यांच्यासहित संसाराचा न सोसणारा भार वाहणारा. उधारी करणे, नातेवाईकांचे पैसे बुडवणे प्रौढ वयात आजारी बिजवराशी लग्न झालेल्या बहिणीची अंगठी तिला फसवून विकून टाकणारा; भावाच्या नावावरची जमीन विकून टाकणारा; या साऱ्यालाच मुत्सद्देगिरी मानून मोठेपणाचा आव आणणारा.

रावसाहेब मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळा, शेतीशी पक्केपणाने नाळ जुळलेला. जमीन हाथ देव आहे आणि कुणबिकी हाच आपला धर्म आहे या वृत्तीने जगणारा. घाम गाळून जमीन कसणारा. स्वावलंबी, मोठेपणाचं, 'मालकपणारच' कसलंही ओझं न बाळगणारा रावसाहेब लेखकाने अत्यंत जिवंतपणे साकार केला आहे. त्याचं रहाणं, वागणं, बोलणं, वृत्ती, संवेदनशीलता या सगळ्यांतून त्याचा कुणबीपणा पदोपदी प्रकट होतो. शेत, बैल, विहीर, शेतातील पीक, जांबांची बाग, शेतातील गडी-माणसे, त्याचा बालमित्र भिवा, त्याचे आई-वडील हे सगळे रावसाहेबाच्या जगण्याचे, त्याच्या भावजीवनाथे घटक आहेत. शेतीतील चढउताराबरोबरच जणू त्याची हृदयस्पंदनेही कमी-अधिक होत जातात.

नवीन जमीन लागवडीसाठी तयार करणे, विहिरीवर इंजिन बसवणे, शेजारच्या शेतकऱ्याच्या बैलाने पिकाची नासधूस केल्यानंतर रावसाहेबाचे बेभान होणे, भावाभावाने त्याच्या हिश्श्याची जमीन उभ्या पिकासह ताब्यात घेऊन परक्या तात्यारावाला कसण्यासाठी दिल्यावर रावसाहेबाच्या जिवाची असहाय तगमग होणे या सगळ्याने रावसाहेबाचं लेखकाने उभे केलेलं व्यक्तिमत्त्व अस्सल शेतकन्याचं आहे. असा रक्तामांसाचा शेतकरी रावसाहेबाच्या रूपाने उभा करण्यात लेखकाला मोठेच यश मिळाले आहे.

रावसाहेबाच्या व्यक्तिमत्त्वाला आध्यात्मिकतेचाही एक पदर असल्याचे लेखकाने दाखविले आहे. तेही स्वाभाविकच वाटावे असेच रावसाहेबाचे चित्रण लेखकाने केले आहे. शेतातील डोह, शेताच्या वाटेवरची लहानशी नदी, डोंगर, झाडे, पाऊस-वारा या साऱ्यांतून रावसाहेबाला एक अतींद्रिय अशी जाणीव सतत होत राहते. कधी स्वप्नांत, तर कधी वाय वादळात, पुराच्या प्रवाहात सापडल्यावर त्याला अनंतातून 'अलख निरंजन' असा नाद ऐकू येत राहतो. कोणीतरी पैलतीरावरून आपल्याला साद घालत आहे. असे रावसाहेबाला मनोमन वाटत राहते. जिवाभावाची जमीन भाऊ घेऊन टाकतो तेव्हा हकीमसाहेब रावसाहेबाला 'जे आपले नव्हतेच, ते गेल्याची खंत कशाला? उलट आपण एकेका ओझ्यातून मुक्त होत आहोत याचा आनंद माना.' असे सांगतात आणि ते पटून रावसाहेबाचे समाधानही होते. हकीमसाहेब हे रावसाहेबाला अशा बंधमुक्त होऊन जगण्याचे प्रतीकच वाटतात. ही आध्यात्मिकता रावसाहेबाच्या कुणबिकीलाही एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाते.

रावसाहेबाची कुणबिकी पंचमहाभुतांशी संवाद साधणारी, नाते जोडणारी (आणि हकीमसाहेबांच्या शब्दांत) ईश्वराच्या जवळ जाऊन जगायला लावणारे होते. देशपांडे यांनी 'कृषी चे या पातळीवरून केलेले हे चित्रण मराठी ग्रामीण कादंबरीत अभावानेच आढळणारे असे तर आहेच; पण अस्सल भारतीय मानसिकतेचे भान प्रकट करणारे आहे. रावसाहेबाचे कृषीशी असणारे हे आंतरिक बंध आणि त्याच्या अंतर्मनाला 'बंधमुक्तेची' सतत वाटणारी ओढ या बाबी त्याचे अस्सल भारतीय कृषिवलत्व साकार करून या कादंबरीला एक वेगळेच परिमाण प्राप्त करून देतात.

युवराज, बाळासाहेब, लालासाहेब हे एकमेकांना तोडून तर टाकू शकत नाहीत, पण त्यांपैकी कोणालाही परस्परांबद्दल प्रेम नाही. रावसाहेबाविषयी तर या तिघांनाही असूयाच वाटते. त्याच्याविषयी तुच्छतेने बोलून, त्याला 'कुणबट', 'धनगर' असे संबोधून ते ती वेळोवेळी प्रकट करतात. सर्वनाशाकडेच जाणारे हे सगळेचजण आपल्या अगोदर दुसरा कसा संपेल याचीय काळजी वाहतात आणि तसे होण्याची थोडी जरी चिन्हे दिसली तरी मनोमन सुखावतात, भांगेत तुळस उगवावी तसा रावसाहेब मात्र या सर्वामध्ये वेगळा उमटून दिसतो.

या वतनदार कुटुंबाचा पडता काळ आणि अडचणीच्या वेळी शेत विकण्याधी पद्धत हेरून संधी येताच पडत्या भावानं शेत विकत घेण्यासाठी तर कधी दीडपट रक्कम ठराविक मुदतीत न दिल्यास शेत त्याच्या मालकीचे होईल या अटीवर गहाण ठेवून घेण्यास टपलेले तात्याराव, सत्तार यांच्यासारखे 'डाव साधून घेणारे' लोक साकार करण्यालाही लेखक यशस्वी झाला आहे.

युवराज, सालासाहेब, बाळासाहेब या सर्वांचे जगणे, त्यांचे परस्परांशी असणारे प्रेमरहित नातेसंबंध, दुसऱ्याला दुःख देण्यात त्यांना मिळणारा आनंद या सान्यांचे प्रतीक म्हणून की काय, या कादंबरीत 'मठाच्या वाड्यातील' मुलांच्या गोट्या खेळण्याच्या प्रसंगाचे चित्रण येते. नागुशा हा मतिमंद मुलगा आणि त्याचे काल्पनिक खेळाच्या रूपाने जगणे हेही या साऱ्या कुटुंबाच्या आजच्या-उद्याच्या जीवनाचेच प्रतीक आहे. ही प्रतीकरूप चित्रणेही या कादंबरीला एका वेगळ्याच उंचीवर नेतात. 

'बारदाना' कादंबरीतील स्त्रियांच्या जगण्याचे चित्रण तर विलक्षण चटका लावणारे आहे. युवराज, बाळासाहेब, लालासाहेब या सर्वांच्याच बायका मूकपणाने दुःख सोसत आल्या प्रसंगाला सामोया जाणान्या आहेत. घराण्याच्या नामांकितपणाचे, त्याच्या एकेकाळच्या वैभवाचे ओझे सगळ्यांत अधिक तापदायक होते ते या स्त्रियांना मोठेपणातील पोकळपणा, वैभवाच्या देखाव्यामारगील दारिय, वतनदारीच्या आड दडलेले दारिय यांचे सर्वाधिक चटके या स्विरियांना बसतात. बेताल, दरिद्री, मोठेपणा मिरवणाऱ्या निष्क्रिय पुरुषांचे पत्नीपण निभावताना त्यांना भोगाव्या लागणाऱ्या यातनांचे चित्रण लेखकाने अत्यंत प्रत्ययकारीपणे केले आहे. सर्वांत अधिक कीव येते ती, यमी, सुमी, सुशी या प्रौढ कुमारिकांची. सगळ्यांनाच नकोशा झालेल्या प्रौढ तरुणींचे, आपण तसे नकोसे झालेलो आहोत हे जाणवल्यानंतरही जगत राहणे कमालीचे केविलवाणे झालेले आहे. त्यांचे हे दुःखी मन आणि जीवन लेखकाने जिवंतपणे उभे केलेले आहे.

इथेच एक विचार मनात येतो; या सगळ्याच स्त्रिया इतक्या अगतिक कशा? अशा वतनदार घराण्यात एखादी तरी स्त्री अशी निघते जी आपल्या कर्तृत्वाने होणारी पडझड थांबवू जरी शकली नाही, तरी लांबवू तरी शकते. येथे मात्र सगळ्याच स्त्रिया इतक्या दुबळ्या कशा? कोणीही नवऱ्याच्या 'बशेपणा बद्दल माजघरात किंवा शेजघरात आवाजही कावत नाहीत, हे कसे? ही अनुभवाची मर्यादा की लेखकाचा उणेपणा?

दुसराही एक उलगडा या कादंबरीत होत नाही; स्वतःचेच दैनंदिन जगणे अशक्य झालेल्या या वतनदार कुटुंबाशी सोनाजीसारखे नोकर मात्र कमालीची निष्ठा ठेवून राहतात. हे कसे? सारेच ओरबाडताहेत तर आपणही का नको? असा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही, उलट या स्थितीतही मालकाचे भलेच व्हावे, असेच त्यांना वाटते हे कशामुळे? सोनाजीसारख्यांना असे वाटते हा त्यांचा चांगुलपणा असेही म्हणता येईल, पण तो टिकवून ठेवावा असे वाटण्यासारखे या 'मालकांत' किंवा त्यांच्या पूर्वजांत काय होते? याचा शोध लेखकाने घेतला असता, तर कदाचित या वतनदारांच्या जीवनशैलीचा एखादा वेगळा पैलू प्रकाशात आला असता. तसे या कादंबरीत झाल्याचे दिसत नाही.

वर्तमानातील जगणे या सगळ्याच मालक' लोकांना असह्य ओझ्यासारखे झाले आहे. त्यातून मुक्त होण्याचा मार्ग त्यांच्यापैकी प्रत्येकजण आपापल्या क्षमतेप्रमाणे शोधतो आहे. युवराज घरातील लहानमोठी भांडी, पाट अशा सगळ्या वस्तू विक्रीला काढतो, शेत आधीच गेलेले आहे. थोरला वाडाही गहाण टाकून तो देशांतराला जातो. हे सर्व चित्रण अत्यंत हृदयस्पर्शी झाडे आहे. शेवटच्या रात्रीची ऐष करण्यासाठी 'शांती'कडे येतात; दारू पिऊन शुद्ध हरपल्यासारखे नाचतात, गाणी म्हणतात, अंगावरच्या कपड्यांचेही भान त्यांना राहत नाही. देशांतरी जाण्यापूर्वी युवराज सर्व उधान्या-उसनवाच्यांची परतफेड करतात. मोलकरीण रखमाची माहवारी देतात. सोनाजीला सर्वात जास्त बक्षिसी देतात. अखेरची निरवानिरव करतानाही युवराज हे विसरत नाहीत हे लक्षात घेण्यासारखे आहे. थोरल्या वाड्याला भलेमोठे लोखंडी कुलूप लागते. त्याच्या दरवाजावरील कमानीत कोरलेल्या लक्ष्मीच्या प्रतिमेला तडा जातो.

बाळासाहेबांची डोंगरातल्या आडबाजूच्या खेड्यात बदली होते. वरिष्ठांच्या मिनतवान्या करूनही ती रद्द होत नाही. संसाराचे ओझे असह्य झालेले दुबळे बाळासाहेब नोकरीच्या गावी निघून जातात.

बाळासाहेब मंत्र्यांशी संधान बांधून परत स्वतःच्या गावी बदली करून घेतात. दारूच्या दुकानाचे लायसन्स त्यांनी मिळविलेले असते. आता आपण 'मालामाल' होऊ अशी स्वप्ने रंगवत ते घरी येतात, तर त्यांची मुले जीवघेणी मारामारी करीत असल्याचे त्यांना समजते. कोणासाठी ही 'माया' जमा करायची असा प्रश्न त्यांना पडतो. गावी परत येण्यातील अर्थशून्यता लालासाहेबांना पूर्णपणे घेरून टाकते. 

भाऊबंदकीमुळे व्यग्र झालेला रावसाहेब अधिकाधिक अंतर्मुख होत जातो. त्याचे जिव्हाळ्याचे ठिकाण असलेले हकीमसाहेब मृत्यू पावतात. कुणबिकीत जीव रमवणाऱ्या रावसाहेबाला 'इथले' काहीच आपले नव्हे. हे ओझे उतरवून ठेवून मुक्त झाले पाहिजे ही भावना व्यापून टाकते. अज्ञातातून येणारी 'अलख निरंजन’ ची गाज त्याला सतत ऐकू येऊ लागते. तिच्या दिशेने जाण्याची ऊर्मी अनावर होऊन अज्ञात परमतत्त्वाच्या दिशेने चालू लागतो. मुक्तीचा हा मार्गच त्याला परमशांती प्राप्त करून देतो.

नोकरी सोडून गावी परत आलेला बाळासाहेबांचा भाऊ राजा रिकाम्या घरात येऊन ढाळजेत बसून सिगारेट ओढू लागतो. सुनसान घरातल्या जीवघेण्या उदासीत तो एकाकीपणे बुडून जातो. 

प्रकाश देशपांडे-केजकर यांनी केलेले हे सर्वनाशाचे चित्रण एकाच वतनदार कुटुंबापुरते मर्यादित राहत नाही. त्याचा विदारक प्रत्यय तर ते देतेच, पण सर्वनाशाकडे जाणाऱ्या या हासपर्वाचा 'इथॉस' नेमकेपणे पकडण्यात ते यशस्वी झाल्यामुळे हे चित्रण वतनदारीच्या ऱ्हासाचे, सर्वनाशाकडे जाताना या वतनदारांच्या होणाऱ्या केविलवाण्या तडफडीचे प्रातिनिधीक चित्रणही होते. हे सारे अटळच आहे याची जाणीव करून देतानाच हे चित्रण वाचकांना चटका लावून अस्वस्थ करणारेही होते, हे त्याचे मोठेच यश मानावे लागते.

निझामी संपल्यानंतरच्या दहा-वीस वर्षांतील मराठवाड्यातील हे चित्रण खास मराठवाडी शब्दांत केलेले असल्यामुळे या कादंबरीच्या भाषेतही एक वेगळेपणा आलेला आहे. लालासाहेब, युवराज, बाळासाहेब यांच्या तोंडी येणारे अनेक शब्द आणि वाक्प्रयोग मराठवाड्यातही आज लुप्तप्राय झालेले आहेत. नष्ट झालेल्या जीवनशैलीबरोबरच सुप्त झालेले हे शब्द, वाक्प्रयोग यांनी युक्त अशी भाषा जिवंतपणे उपयोगात आणणे हे यशही लेखकाच्या जमेच्या बाजूने नोंदवले पाहिजे.

शेवटी... 'बारदाना’ ही एक ग्रामीण कादंबरी आहे असे मानले (तशी ती आहेच) तर आजवरच्या मराठी ग्रामीण साहित्यात न आलेले एक वेगळे समाजवास्तव चित्रित करून प्रकाश देशपांडे-केजकर यांनी मराठी ग्रामीण कादंबरीला एक समर्थ असे नवे परिमाण प्राप्त करून दिले आहे, याचाही उल्लेख केला पाहिजे.

बारदाना (कादंबरी)
लेखक : प्रकाश देशपांडे-केजकर
स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद.
किंमत : रु. 200/-

Tags: कुणबी शेती वतनदारी ग्रामीण कादंबरी बारदाना Literature Marathi Book Book review Book weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

बाळकृष्ण कवठेकर
balkrishna.kawathekar@gmail.com
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके