डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

2017 या वर्षी सहा वेगवेगळ्या देशांतील सहा बालकुमारांचे पराक्रम (ज्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली) सांगणारे गोष्टीवजा लेख प्रसिद्ध केले होते. या अंकाचे अभूतपूर्व स्वागत झाले होते. इतके की, त्यानंतरच्या वर्षी कोणती थीम घेऊन अंक काढला तर आधीच्याइतका नाही, पण त्याच्या जवळपास जाईल असा प्रश्न आम्हाला पडला होता. उपलब्ध वेळेत त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते, म्हणून मग गेल्या वर्षीही आणखी वेगवेगळ्या सहा देशांतील सहा मुला-मुलींची (आंतरराष्ट्रीय म्हणावी अशी) कर्तबगारी सांगणारा अंक काढला होता. त्या अंकालाही जवळपास आधीइतका प्रतिसाद मिळाला होता.

भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. गेली 71 वर्षे ते अखंड प्रकाशित होत आहे. गुरुजींच्यानंतर आचार्य जावडेकर, रावसाहेब पटवर्धन, यदुनाथ थत्ते, नानासाहेब गोरे, वसंत बापट, ग.प्र.प्रधान या संपादकांनी अनेक लहानथोरांच्या मदतीने साधनाला सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत आणले. त्यानंतरची पंधरा वर्षे डॉ.नरेंद्र दाभोलकर साधनाचे संपादक होते. साधना साप्ताहिकातून प्रामुख्याने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन प्रसिद्ध केले जाते. त्यातील भूमिका भारतीय संविधानाला सुसंगत राहतील अशी दक्षता घेतली जाते. त्यामुळे साधनाची ओळख एक वैचारिक व परिवर्तनवादी नियतकालिक अशीच राहिली आहे.
 
तरीही अगदी सुरुवातीपासून साधनाच्या अंकांतून बालकुमारांसाठी दरमहा एक-दोन पाने राखून ठेवलेली असायची, वर्षातून एखादा विशेषांकही निघायचा. त्यामुळे ‘साधनातील लेखन आम्ही लहान असताना वाचले आहे, त्याचा आमच्यावर प्रभाव पडला होता,’ अशा प्रतिक्रिया आजही अनेक लोक देत असतात. त्यातही साधनाने बालकुमारांसाठी स्वतंत्र अंक, दरवर्षी अतिशय नियमितपणे काढले, तो कालखंड म्हणजे 1957 ते 68 ही बारा वर्षे. ते अंक साने गुरुजींच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दरवर्षी 11 जूनला काढले जात असत. त्यात लहानांची अभिव्यक्ती (चित्रे, कविता व अन्य मजकूर) असे, पण मोठ्यांनी लहानांसाठी केलेले लेखनच प्रामुख्याने असे. अगदी ना.ग.गोरे, श्री.म.माटे, दुर्गा भागवत यांच्यापासून हमीद दलवाई यांच्यापर्यंतचे अनेक मान्यवर त्या अंकासाठी लेखन करीत असत. त्यामुळे त्या बारा वर्षांच्या काळातल्या बालकुमारांवर साधनाचा प्रभाव जास्त राहिला असावा.
 
असाच काहीसा प्रभाव 2008 ते 2019 या बारा वर्षांच्या काळातील बालकुमारांवर असू शकतो. कारण ही बारा वर्षे अतिशय सातत्याने साधनाने बालकुमार दिवाळी अंक काढले आणि ते मोठ्या प्रमाणात पोहोचवले. या सर्व अंकांमधून प्रामुख्याने मोठ्यांनी लहानांसाठी केलेले लेखन आहे. विविध क्षेत्रांतील अनेक नामवंतांचा सहभाग त्यात आहे. या बारा वर्षांपैकी शेवटची तीन वर्षे मात्र एक थीम घेऊन अंक काढले आहेत.
 
2017 या वर्षी सहा वेगवेगळ्या देशांतील सहा बालकुमारांचे पराक्रम (ज्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली) सांगणारे गोष्टीवजा लेख प्रसिद्ध केले होते. या अंकाचे अभूतपूर्व स्वागत झाले होते. इतके की, त्यानंतरच्या वर्षी कोणती थीम घेऊन अंक काढला तर आधीच्याइतका नाही, पण त्याच्या जवळपास जाईल असा प्रश्न आम्हाला पडला होता. उपलब्ध वेळेत त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते, म्हणून मग गेल्या वर्षीही आणखी वेगवेगळ्या सहा देशांतील सहा मुला-मुलींची (आंतरराष्ट्रीय म्हणावी अशी) कर्तबगारी सांगणारा अंक काढला होता. त्या अंकालाही जवळपास आधीइतका प्रतिसाद मिळाला होता.
 
आणि मग या वर्षी त्या थीममध्ये किंचित बदल करून भारतातील सहा राज्यांतील सहा मुला-मुलींवर अंक काढला आहे. म्हणजे मागील एक तपाच्या बालकुमार अंकांमध्ये अशी एक हॅट्रीक साधली गेली आहे. पुढील म्हणजे तेराव्या वर्षी मात्र ‘विज्ञान’ किंवा ‘संशोधन’ किंवा ‘विषय’ यापैकी एक थीम घेऊन अंक काढला जाणार आहे. कदाचित पुढे याच तीन थीमवरील अंक दुसरी हॅट्रीक साधणारे ठरतील.

Tags: Balkumar Editorial संपादकीय बालकुमार weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रतिक्रिया द्या

अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके