डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शरद माझ्यापेक्षा सात वर्षांनी लहान आहे आणि स्वप्नील तीस वर्षांनी. पण मित्रत्वाला वयाची पर्वा नसते. मी त्यांच्याबरोबर जे पाहिले, ऐकले, अनुभवले ते इतरांना थोडेतरी वाटून द्यावे या हेतूने हा खटाटोप केला आहे. माझ्या अनुभवांना त्या त्या स्थलकालांचे संदर्भ देणे जरूर होते. पण शरद व स्वप्नील यांची सहज मिळण्यासारखी माहिती इतकी तुटपुंजी आहे की असे संदर्भ मला लपूनछपूनच मिळवावे लागले. कोणी व्यक्ती इतिहासजमा झाली की तिची महती गाण्याचा रिवाज आहे. पण त्यापेक्षा ती व्यक्ती हयात असताना, चालती बोलती असताना आजूबाजूच्या लोकांनी तिची कदर करणे आणि तिच्यापासून प्रेरणा घेणे जास्त सयुक्तिक नाही का? आपले आयुष्य सुरळीत चालू राहण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी शरद आणि स्वप्नील करत आले, पण अन्यथा त्यांनी आपले तन आणि मन गणितावर ओवाळून टाकले.

आपल्याकडे गणितातले प्रावीण्य आणि माणसाची हुशारी यांचे जणू समीकरणच झाले आहे, निदान आपण शाळा-कॉलेजांत असताना तरी. ‘आमचा आनंदा हुशार आहे हो, गणितात पैकीच्या पैकी मार्क असतात त्याला’ असे उद्‌गार आपण नेहमीच ऐकत असतो. याच समीकरणामुळे ज्याला गणितात गती नसेल, त्याला विनाकारण न्यूनगंड प्राप्त होण्याची भीती असते. हे असे गणित या एकाच विषयाबद्दल का आहे हे सांगणे कठीण आहे. पूर्वी संस्कृत या विषयाला असा मान होता, तो आता जवळजवळ नाहीसा झाला आहे. कदाचित भविष्यकाळात गणिताची ही अनन्यसाधारण प्रतिमा झाकोळून जाईलही.

शाळेत असताना मी काही गणिताच्या प्रेमाबिमात पडलो नव्हतो. माझ्या दृष्टीने गणित ही एक दुभती गाय होती, म्हणजे गणित हा भरपूर मार्क मिळवून देणारा विषय होता. मला माझ्या वडिलांसारखे संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवायचे होते. म्हणून मॅट्रिक झाल्यानंतर मी सरळ बी.ए. करण्यासाठी कला शाखेत प्रवेश घेतला. पण गणित जसे एक शास्त्र आहे तशी ती एक कलाही आहे. म्हणून मी संस्कृत व गणित हे दोन्ही विषय कॉलेजात शिकू शकलो. त्या वेळी गणितातही आवड निर्माण झाली. शेवटी संस्कृत का गणित हे ठरवण्यासाठी नाणेफेक करावी लागली. तिचा कौल गणिताकडे लागला आणि मी तिकडे आकृष्ट झालो. माझ्या गणिती प्रवासात वेगवेगळ्या प्रकारच्या गणितांत काम करणाऱ्या आणि वेगवेगळ्या स्तरांवर काम करणाऱ्या अनेक व्यक्ती मला भेटल्या. त्यापैकी काहींच्या कामाकडे बघून अचंबा वाटला असला तरी मी त्यांना व्यक्ती म्हणून जाणत नव्हतो. दोन व्यक्ती मात्र अशा आहेत की, त्या गणितावरील प्रेमात वेड्या होऊन गेल्या आहेत आणि मी त्यांना जवळून ओळखतोही. दोघेही माझे मित्र आहेत, पण त्यांचा एकमेकांशी परिचयही नाही. त्या दोघांत गणितप्रेम हा समान धागा असला तरी त्यांचे जीवन अगदी वेगळ्या प्रकारे व्यतीत होत आहे. त्यांची नावे आहेत शरद कानेटकर आणि स्वप्नील महाजन. आपल्या गणितप्रेमावर दृढ राहण्यासाठी दोघांनी काय काय केले व अजूनही ते प्रेम कसे टिकवून ठेवले आहे, याच्या कहाण्या भिन्न असल्या तरी विलक्षण आहेत. गीतेतल्या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो ‘‘स्थितप्रज्ञस्य का भाषा?’’ म्हणजे ‘स्थितप्रज्ञाची व्याख्या काय, तो कसा बोलतो, कसा राहतो, कसा वावरतो?’ स्थितप्रज्ञ या शब्दाचा अर्थ ‘ज्याची प्रज्ञा गणितावर स्थिरावली आहे’ असा मर्यादित रूपाने केला, तर तो शब्द शरद आणि स्वप्नील या दोघांनाही पुरेपूर लागू पडेल.

1992 मध्ये मी फ्रान्समधील सॅन्तएतिएन विद्यापीठात दोन फ्रेंच गणितज्ञांबरोबर संशोधन करण्यासाठी गेलो होतो. माझे दोन महिन्यांचे वास्तव्य संपवून भारतात परत जाण्यासाठी 27 मे रोजी पॅरिसच्या शार्ल द्‌ गोल्‌ विमानतळावर आलो होतो. बोर्डिंग सुरू व्हायची वाट बघत प्रस्थानकक्षात बसून राहिलो असताना अचानक एका माणसाची आणि माझी नजर भिडली आणि आम्ही दोघे ताडकन उठून उभे राहिलो. जवळपासच्या लोकांना आता काही तरी अतिप्रसंग होणार असे वाटले असेल. कित्येक वर्षांत भेटलो नसलो तरी आम्ही दोघे एकमेकांना चांगले ओळखत होतो. तेवढ्यात विमानात जाऊन बसण्याची सूचना झाली. विमानात सगळे स्थिरस्थावर झाल्यावर आम्ही चटकन जागा बदलून एकमेकांच्या शेजारी बसलो. मग गप्पांना ऊत आला. तो होता शरद कानेटकर. अमेरिकेतील बारा वर्षांचे वास्तव्य संपवून तो भारतात परत येत होता. त्याने बऱ्याच वर्षांपूर्वी मला म्हटले होते की तो असे काही करणार आहे.

इंटर सायन्स परीक्षेत चांगले गुण कमावल्यावर इंजिनिअरिंगसाठी बऱ्यापैकी संस्थेत प्रवेश मिळत असतानाही शरदने पदार्थविज्ञान (Physics) हा विषय घेऊन मुंबई विद्यापीठात बी.एस्सी. व एम.एस्सी. या पदव्या मिळवल्या. त्याचे कारण म्हणजे शरदने वाचलेली रिचर्ड फाइन्मन याची पाठ्यपुस्तके (The Feynman Lectures on Physics). 1965 मध्ये फाइन्मनला क्वॉन्टम इलेक्ट्रोडायनॅमिक्स या विषयातील कामाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले होते. फाइन्मनबद्दलचे अनेक गमतीदार किस्से इतके लोकप्रिय झाले होते की कुठलाही हुशार तरुण भारावून जावा. तसा शरदही भारावला होता. पण एम.एस्सी. झाल्यानंतर पोटापाण्याचा जास्त विचार करून (त्याच्या भाषेत लक्ष्मीधराने ओढून नेल्यामुळे) त्याने पवईमधील आय.आय.टी.च्या विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering) विभागामध्ये इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील एम.टेक. ही पदवी मिळवली. त्यानंतर तेथीलच संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी (Computer Science and Engineering) या विभागात तो पीएच.डी.चा अभ्यास करू लागला. तेव्हा त्याच इमारतीमधील गणित विभागात मी काम करत होतो. तिथेच त्याचा आणि माझा परिचय झाला. त्याचे वडील विष्णू नरहर कानेटकर यांना गणिताची खूप आवड होती. पुण्याच्या स.प. महाविद्यालयात प्राध्यापक केरकरांच्याकडे शिकून त्यांनी (माझ्यासारखीच) गणितात बी.ए. पदवी मिळवली होती. ते नोकरी जरी अकौंटंट जनरलच्या कार्यालयात करत असले तरी निरनिराळी गणितावरची पुस्तके मिळवून घरी आणत. पाटावर जेवायला बसले असतानाही त्यांच्या मुलांबरोबर गणित, गणिती, शास्त्रज्ञ यांबद्दलची चर्चा चालू ठेवत, भूमितीतील प्रमेये (theorems) सोडवून दाखवत व उपप्रमेये (riders)) सोडवायला सांगत. संध्याकाळी वडिलांनी विचारलेला प्रश्न सुटेपर्यंत शरदला झोप यायची नाही. वडिलांची ही गणिताची आवड शरदकडे आपोआप आली होती.

शरद खूपसा स्वशिक्षित होता. कोणी काही शिकवले नसताना नुसती पुस्तके वाचून त्याला गणितातील अवघड संकल्पना चटकन समजत. शरदने मला सांगितले की एमिल आर्टिन (Emil Artin) याच्या ‘गाल्वा थिअरी (Galois Theory)  या प्राथमिक स्वरूपाच्या पण मूलभूत पुस्तकाने त्याला गणिताकडे खेचून आणले. फार पूर्वी 1940 च्या सुमारास अमेरिकेतील नॉट्र दाम विद्यापीठात (University of Notre Dame) एमिल आर्टिन या ऑस्ट्रियन गणितज्ञाने दिलेल्या व्याख्यानांवर हे पुस्तक आधारले आहे. ते आता एक चिरंतन मूल्याचा ग्रंथ (classic book) म्हणून ओळखले जाते. आय.आय.टी.मध्ये एम.टेक. करत असताना जेव्हा हे पुस्तक शरद वाचू लागला, तेव्हा वाळवंटात फिरताना अचानक एक मरुवन (oasis) लागावे तसे झाले. या पुस्तकातील अमूर्त संरचना (abstract structures)  व तर्कशुद्ध युक्तिवाद यांचा शरदवर इतका खोलवर परिणाम झाला की गणितापुढे इतर विषय फिके पडू लागले.

काही दिवसांपूर्वी फोनवर बोलताना मी शरदला विचारले की आता वयाच्या सत्तराव्या वर्षी मागे वळून बघताना त्याला अभिप्रेत असलेल्या सर्व गोष्टी घडून आल्या का? त्याने एक नि:श्वास टाकला. तो म्हणाला की अमेरिकेहून परतल्यावर त्याने मनात योजलेले मोकळे, पूर्णपणे गणितावर ओवाळून टाकलेले आयुष्य तो दहा-बारा वर्षे जगला. त्या अवधीत दोनच गोष्टी त्याच्याकडून नैसर्गिकरीत्या होत होत्या. त्या म्हणजे श्वास घेणे आणि गणितात रंगणे. त्याच्यासाठी गणित अफूसारखे होते. एखादे उत्तम प्रमेय नव्याने कळले की त्याला नशाच चढायची.

पीएच.डी. जरी वेगळ्या विषयात करत असला तरी शरद आमच्या गणित विभागातील चर्चासत्रांना उपस्थित राहत असे. विशेषतः भूमिती, संस्थिती (Topology) आणि बीजगणित यांच्याशी संबधित असलेल्या विषयांत त्याला रस होता. शरदने मला तेव्हाच सांगून टाकले होते की अभियांत्रिकी विषयांत तो पदव्या मिळवतोय त्या फक्त पैसे कमावण्याच्या हेतूने. हा हेतू साध्य झाला की तो आणि गणित यांच्यामध्ये कोणीही येणार नाही.

तीन-चार वर्षांत पीएच.डी. संपवून तो कॉन्कॉर्डिया विद्यापीठात अधिछात्रवृत्ती (fellowship) मिळवून कॅनडाला पसार झाला. नंतर त्याला अमेरिकेमध़ील नॉरफोक गावातील ओल्ड डॉमिनिअन विद्यापीठात अध्यापनाची नोकरी मिळाली. तेथील विद्युत अभियांत्रिकी विभागात शरदला जे अभ्यासक्रम (courses) शिकवायचे होते ते त्याच्या दृष्टीने अगदीच मामुली होते. परिपथशास्त्राचे (Circuit Theory) जे तीन अभ्यासक्रम तीन सत्रांत (semesters) पूर्ण करायचे होते, त्यांचा मथितार्थ तीन दिवसांत शिकवता आला असता; किर्चाफचे नियम समजवून घ्यायला आणखी किती वेळ लागणार असे त्याला वाटे. पण असे सगळे अभ्यासक्रम शरदने इमाने इतबारे शिकवले.

मिळालेल्या पगारातील 80 ते 90 टक्के रक्कम तो बँकेत शिल्लक टाकत असे. एका पदवीधर विद्यार्थ्याबरोबर तो एका लहानशा खोलीत राहायचा. शरदकडे झोपायला पलंगपण नव्हता; झोपायच्या उबदार पिशवीत (sleeping bag) ताणून दिली की झाले! त्याची मालमत्ता म्हणजे एक कपाट आणि त्यातली पुस्तके. बाहेरच कुठेतरी तो जेवायचा. आपल्या प्राथमिक गरजा भागल्या की झाले, कुठलाही वाह्यात खर्च करायचा नाही असे त्याचे धोरण होते. मनाने मात्र शरद अगदी उदार होता. त्या काळात ओल्ड डॉमिनिअन विद्यापीठाच्या सांख्यिकी (Statistics)  विभागात पीएच.डी.चा अभ्यास करत असलेले संजीव सबनीस कालांतराने आय.आय.टी.मध्ये माझे सहकारी झाले. त्यांचा आणि त्यांची पत्नी शीला हिचा नॉरफोकमध्ये शरदशी चांगला परिचय झाला होता. ते सांगत होते की जवळपासच्या लोटस टेंपलसारख्या ठिकाणी जायचे म्हटले की शरद नेहमी आपली गाडी काढायचा, सगळ्यांच्या खाण्याचा खर्च आपणहून करायचा. शरदचा काटकसरीपणा स्वतःपुरता होता, एक नेमके लक्ष्य साधण्यासाठी.

अशी शरदने पाच-सहा वर्षे काढली. नॉरफॉकच्या जवळच हॅम्पटन येथे नासा (NASA : National Aeronautics and Space Administration)  या संस्थेचे लँग्ली संशोधन केंद्र आहे. मध्यंतरी तेथील एका प्रकल्पात काम करणाऱ्यांना गणितासंबंधी काही अडचण आली. कुणी त्यांचा प्रश्न सोडवणारे भेटते का हे बघत ते शरदच्या विभागात पोहोचले. शरदने त्या प्रश्नाचे उत्तर चटकन काढून दिले. नासाचे लोक खूश झाले. शरदच्या विभागप्रमुखाने यावर शरदला तीन शोधनिबंध लिहायला आणि दोन पेटंट्‌स घ्यायला भाग पाडले. याच सुमारास शरदची नेमणूक कायम करण्याचा निर्णय विद्यापीठाला घ्यायचा होता. पण त्याला कायमची नेमणूक नकोच होती. त्याला हवे होते पुरेसे पैसे आणि उच्च स्तराचे गणित शिकायची संधी. यासाठी त्याने मॅसॅच्युसेट्‌स विद्यापीठाच्या बोस्टन कँपसमध्ये नोकरी शोधली. हेतू असा की तिथे पाट्या टाकल्यासारखे अभ्यासक्रम शिकवायचे, पण जवळच्या हार्वर्ड विद्यापीठ व एम.आय.टी. (MIT : Massachusetts Institute of Technology) या संस्थांमध्ये सहज  जाऊन तेथे चालू असलेल्या ज्ञानयज्ञाला साक्षी राहायचे. नोकरी दिलेल्या मायबाप विद्यापीठात दिवसाकाठची व्याख्याने देऊन झाली की हा माणूस हार्वर्डच्या किंवा एम.आय.टी.च्या गणित विभागातील चर्चासत्रांत (seminars) जाऊन बसायचा. जसा उत्तम गवयाचा एक वेगळाच अंदाज असतो, तशी उच्च प्रतीच्या गणितज्ञांचीही काही वैशिष्ट्ये असतात. ती शरदला जवळून पाहायची होती. त्यांना कोणत्या प्रकारच्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात हे जाणून घ्यायचे होते. एकदा राऊल बॉट हा महान गणितज्ञ तेथे भाषण देत असताना बारीक सारीक तांत्रिक बाबी राहून जात होत्या. श्रोत्यांपैकी कुणी तरी ते तपशील सहजपणे पुरवत होता; असे वाटून जावे की तो बॉटपेक्षा वरचढ विशेष तज्ज्ञ आहे. शरदला या दोन गोष्टीतला फरक प्रकर्षाने दिसून आला. एकीकडे विचारांची गहनता तर दुसरीकडे तांत्रिक काटेकोरपणा. गणितज्ञात दोन्ही गोष्टी असाव्या लागतात, पण पहिल्या गोष्टीशिवाय गणितातील सौंदर्य फुलणारच नाही, हा दृष्टिकोन शरदला आपल्यात बाणवायचा होता. हार्वर्ड व एम.आय.टी.ला दिलेल्या भेटी ही शरदसाठी तीर्थयात्राच होती; या तीर्थक्षेत्रांतले देव होते तिथल्या गणित विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक.

आणखी एक-दोन गोष्टी शरदला जाणून घ्यायच्या होत्या. त्या म्हणजे उच्च प्रतीच्या विद्यापीठांमध्ये पीएच.डी. करण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याची पद्धत आणि निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या संगोपनाची प्रक्रिया. बारकाईने निरीक्षण करत या उत्कृष्ट दर्जाच्या वातावरणात शरद

पाच-सहा वर्षे राहिला. हार्वर्डच्या गणित विभागाने एका वर्षी कोणाही पदव्युत्तर विद्यार्थ्याला निवडले नव्हते. नंतरच्या वर्षी त्यांनी एकाच विद्यार्थ्याला पीएच.डी.साठी प्रवेश दिला. शरद त्या विद्यार्थ्याशी सहज बोलला तेव्हा त्या विद्यार्थ्याला अगदी प्राथमिक गोष्टींव्यतिरिक्त फारसे गणित येत नव्हते असे दिसले. पण दोन वर्षांत त्या विद्यार्थ्याने अफलातून प्रगती केली. नंतरच्या काळात त्याने खूप महत्त्वाचे शोध लावले. मुद्दा असा की कुणाला किती गोष्टी माहीत आहेत याला शून्य किंमत द्यायची, तो सर्जनशील किती आहे यावर सगळी मदार ठेवायची. शरदने मनात आखलेल्या त्याच्या पुढच्या मार्गक्रमात या बाबी महत्त्वपूर्ण ठरणार होत्या.

अशा प्रकारे साधेपणाने व काटकसरीने आयुष्य जगत आणि प्रेरणादायी विचार बाणवत शरद बारा वर्षे अमेरिकेत राहिला. बारा वर्षे म्हणजे एक तप. या काळात तो एक प्रकारचे तपच करत होता. महाभारतातील पांडवांचा वनवास हा धर्मराजाच्या द्यूतव्यसनाचा परिपाक होता, पण इथे शरदने एका ध्येयापोटी ऐच्छिक वनवास पत्करला होता. पॅरिसपासून मुंबईला पोहोचेपर्यंत त्याने ही सगळी हकिकत मला सांगितली, एकीकडे विमानात मोफत मिळणाऱ्या शॅम्पेनचे घुटके घेत. विमानातून उतरल्यावर तो त्याच्या वडिलांच्या घरी डोंबिवलीला निघून गेला आणि मी पवईला पोहोचलो.

यानंतर एक-दोन वर्षांनी आय.आय.टी.च्या गणित विभागात आम्ही एक नवीन कार्यक्रम सुरू करत होतो; त्याचे नाव होते उपयोजित संख्याशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान या विषयातील एम.एस्सी. (M. Sc. in Applied Statistics and Informatics). त्याचे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी आम्हांला वेगळ्या प्रकारच्या गणितज्ञांची जरूर होती. माझ्या मनात डॉ. शरद कानेटकर हे नाव येणे साहजिक होते. पुण्याला गेलो असताना मी शरदची मुद्दाम गाठ घेतली आणि त्याच्यापुढे प्रस्ताव मांडला. तो माझ्याकडे बघून नुसता हसला आणि म्हणाला ‘‘बालमोहन, मी अमेरिकेत बारा वर्षे हलाखीच्या परिस्थितीत काढली, ती काही भारतात येऊन नोकरी करण्यासाठी नाही.’’ मलाच ओशाळल्यासारखे झाले, आणि माझा प्रस्ताव मी मागे घेतला. त्याने अमेरिकेतून परतताना दोनच गोष्टी आणल्या होत्या, पुरेसे पैसे आणि गणिताची ढीगभर पुस्तके. लवकरच त्याने पुण्यात दोन शेजारचे फ्लॅट्‌स विकत घेतले, आणि एक खोली पूर्णपणे वातानुकूलित व ध्वनिरोधक करून घेतली. ती त्याची अभ्यासिका बनली. कशाचाही त्रास न होता तो तेथे स्वच्छंदपणे गणितात रमू शकत होता. सीमाशी लग्न करण्यापूर्वी शरदने तिला स्वच्छ सांगून टाकले होते की मी जन्मात कधी नोकरी करणार नाही, पण कुटुंबाला काहीही कमी पडू देणार नाही. 1994 मध्ये म्हणजे वयाच्या 43व्या वर्षी त्याला एक मुलगा झाला; त्याचे नाव सलिल. सीमा बँकेत नोकरी करत होती, ती तिने चालू ठेवली. कामाची 20 वर्षे पुरी झाल्यावर तिने 1999 मध्ये ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली.

सीमाने संसाराची पूर्ण जबाबदारी घेतल्यामुळेच शरद गणिताच्या अभ्यासात रममाण होऊ शकत होता. सीमा आणि सलिल यांचे आयुष्य चारचौघांसारखे होते, पण शरदचे अगदी आगळे. सकाळी तो दोन तास सावकाश पळायला (jogging) जात असे. नंतर न्याहरी केल्यावर आपल्या अभ्यासिकेचे दार बंद करून तो गणिताच्या डोहात डुंबत असे. तो फक्त दोन जेवणांसाठी बाहेर यायचा. त्याच वेळी बायको व मुलगा यांच्याबरोबर गप्पा मारायचा, विचारपूस करायचा. बाकीच्या वेळी शरदची जिज्ञासा पुरवायला अमेरिकेहून मागवलेले ग्रंथराज काचेच्या तावदानांमध्ये विराजित होतेच. त्यातली खूपशी पुस्तके स्प्रिंगर (Springer) या शास्त्रशाखेतील प्रसिद्ध कंपनीने प्रकाशित केली होती. त्या सगळ्यांची बांधणी वरून पिवळ्या रंगाची असल्याने ती पुस्तके उठून दिसायची. मी मुंबईहून फोनवर शरदचा दिनक्रम जेव्हा ऐकायचो तेव्हा मला कधी कधी शरदचा हेवा वाटायचा. पण असे एकट्या-दुकट्याने जीवन कंठणे आपल्याला जमणार नाही हेदेखील लक्षात यायचे.

दरवर्षी आय.आय.टी.तील बी.टेक.च्या वेगवेगळ्या शाखांमध्ये काही थोडे हुशार विद्यार्थी असे असतात की ज्यांना मुळापासूनच गणिताची आवड असते आणि गतीही असते, पण फक्त पालकांच्या दबावामुळे आणि बरोबरीच्या मित्रांच्या संगतीसाठी त्यांनी अभियांत्रिकी (Engineering) शाखांमध्ये प्रवेश घेतलेला असतो. अशा विद्यार्थ्यांचे गणितप्रेम केव्हा उफाळून येईल याचा नेम नसतो. तसे झाले की मग पत्करलेल्या विषयांत त्यांना रस वाटेनासा होतो. त्यांच्यासमोर साधारणपणे एकच पर्याय असतो. तो म्हणजे निवडलेल्या विषयांत बी.टेक. करताना गणितासंबंधीचे काही ऐच्छिक अभ्यासक्रम घ्यायचे. मात्र मुंबईच्या आय.आय.टी.मध्ये दुसरा एक मार्ग ते निवडू शकतात. मुळातील अभियांत्रिकी शाखा सोडून आणि एक वर्ष जास्त वेळ देऊन गणितात ‘संघटित एम.एस्सी.’ (Integrated M. Sc.)  करता येते. 1997 मध्ये आय.आय.टी. बॉम्बेमध्ये प्रवेश केलेल्यांपैकी वैभव गद्रे याने पहिला मार्ग निवडला व त्याने अभियांत्रिकी पदार्थविज्ञान (Engineering Physics) या शाखेमध्येच राहून गणिताचा जास्त अभ्यास करायचे ठरवले. त्याला त्याच्या आईने- विद्याने- खूप प्रोत्साहन दिले. मात्र अमित होगाडी आणि चैतन्य गुट्टीकर या दोघांनी त्यांचे यांत्रिकी अभियांत्रिकी (Mechanical Engineering) आणि विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering) या शाखांतील अभ्यासक्रम सोडून दिले, आणि ते गणित विभागात दाखल झाले. तिघेही खूप हुशार, प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे होते. तिघेही खोलवर गणित शिकण्यासाठी आतुर आहेत हे लक्षात आल्यावर मी त्यांना पुण्याला जाऊन डॉ. शरद कानेटकर यांना भेटायला सांगितले.

त्या काळात शरद पुण्यातील ‘भास्कराचार्य प्रतिष्ठान’ या प्राध्यापक श्रीराम अभ्यंकर यांनी स्थापलेल्या संस्थेशी निगडित होता. ह्या तीन विद्यार्थ्यांना गणिताची पाणपोई उपलब्ध करून द्यायचे त्याने तत्काळ मान्य केले. सन 2000 ते 2002 या दरम्यान हे विद्यार्थी शुक्रवारी रेल्वेने पुण्याला पोहोचायचे. कधी कधी शुक्रवारचे आय.आय.टी.तील वर्ग बुडवून ते गुरुवारीच पुण्याला पळायचे. सुदैवाने पुण्यात त्यांची राहण्याची खाजगी व्यवस्था होती. पूर्ण शनिवार आणि रविवार दुपारपर्यंत जितके जमतील तितके तास ते भास्कराचार्य प्रतिष्ठानमध्ये जमायचे. कानेटकर सर त्यांना भरभरून अखंडपणे शिकवायचे, फक्त चहा-कॉफी व दुपारच्या जेवणाचा वेळ सोडून. तल्लख मुलांना दिवसाकाठी सात-आठ तास शिकवणे ही काही साधी गोष्ट नसते. त्यासाठी शरद हे विद्यार्थी यायच्या आधी बरेच वाचायचा, चर्चेत सुसूत्रता आणण्यासाठी आराखडा रचायचा. स्वत: कधी न शिकलेले गणितातील भागही त्याने या निमित्ताने अभ्यासले. ती सगळी ज्ञानाची दालने त्याने या विद्यार्थ्यांना खुली करून दिली. त्यामुळे गणितातील गुंतागुंतीच्या शाखांतही या मुलांचा चंचुप्रवेश झाला. त्याचे गणिताबाबतचे उत्कट प्रेम संसर्गजन्य होते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणितातील कोणत्या गोष्टी मूलभूत, सुंदर, गहन आहेत याचे प्रत्यक्ष दर्शन त्याने घडवले. याला दिव्य दृष्टीच म्हटले पाहिजे. ती अशीतशी जाता जाता मिळत नसते. गणितात चांगले काम करण्यासाठी दीर्घोद्योग करणे जरूर असते, लांबचा पल्ला गाठावा लागतो, नुसतीच चमक दाखवणे पुरेसे नसते. या गोष्टी शरदने हार्वर्ड व एम.आय.टी. येथे बघितल्या होत्या. त्या त्याने आपल्या शिष्यांपर्यंत पोहोचवल्या. शरद आपल्याआपण गणित शिकला असल्याने ते दुसऱ्यांना समजवून सांगणे त्याला छान जमत असे. त्याच्याकडे अमूर्त कल्पना साध्या शब्दांत सोप्या करून सांगायची हातोटी होती. शिवाय तो स्वतः अभियांत्रिकी शाखांमध्ये शिकला असल्याने ठोस उदाहरणे देऊन एखाद्या प्रमेयामागची प्रेरणा काय असली पाहिजे याचा त्याला चांगला अंदाज यायचा. तो विशद करण्याची कला त्याने आत्मसात केली होती.

फालतू गोष्टीपासून लांब राहण्याचे धडे या तिघांना मिळाले. ‘‘पीएच.डी. तर तुम्ही करालच, पण तुमचे काम किती भक्कम स्वरूपाचे आहे, त्याने किती सैद्धान्तिक प्रगती (theoretical advance) होते याचे भान ठेवले पाहिजे,’’ असे तो म्हणायचा. ‘‘ ‘अठराव्या शतकातील सण’ अशा विषयांवरही प्रबंध लिहितात काही बापुडे. असा प्रबंध माहितीपूर्ण असू शकतो, परंतु त्यातून नवनिर्मिती काहीच होत नाही. तुम्ही त्यातले असता कामा नये. झाडाच्या खालच्या भागाला लागलेली फळे कोणीही तोडू शकतो; तुम्हांला झाडावर उंच चढून त्याचा शेंडा काबीज करायचा आहे,’’ हे बाळकडू तिघांच्याही रक्तात त्याने भिनवले. पण शरदचा सल्ला एकांगी नसतो. त्याला माहीत आहे की या जगात नोकरी मिळवण्यासाठी, ती टिकवण्यासाठी, संशोधनासाठी अनुदाने प्राप्त करून घेण्यासाठी आणि पदोन्नती होण्यासाठी शोधनिबंध प्रसिद्ध करत राहावे लागते. म्हणून त्याच्या मते चांगल्या संशोधकाने दुहेरी कार्यक्रम आखावा. एका बाजूने एखाद्या गहन प्रश्नाला हात घालायचा. तो सोडवण्यात अंशतः यश मिळाले तरी उत्तम. त्याच वेळी दुसऱ्या बाजूने काही किरकोळ प्रश्न हाताळत रहायचे, आणि ते जसजसे सुटत जातील, तसतसे लहानसहान शोधनिबंध लिहीत राहायचे. प्राध्यापक श्रीराम अभ्यंकरांसारख्या महारथीनेदेखील सुरुवातीला अशीच रणनीती बाळगल्याचे त्यांनी स्वतः शरदला सांगितले होते.

शिकणे-शिकवणे सोडले तर शरदचे या मुलांबरोबरचे वागणे अगदी अनौपचारिक असे. तिघांनाही राजेशाही वागणूक मिळायची. राहत्या जागेपासून कानेटकर सर त्यांना आपल्या गाडीतून भास्कराचार्य प्रतिष्ठानला घेऊन जायचे, आणि संध्याकाळी उशीर झाला तर परतही पोहोचवायचे. जवळच्या रेस्टॉरंटमध्ये चहा आणि खाद्यपदार्थांचे पैसे सरच देऊन टाकायचे. एकदा सिंहगडची ट्रिपही काढून झाली. इतर शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये तरुण लोकांना मिळणाऱ्या वागणुकीच्या तुलनेत हे सगळे अजबच होते.

चार वर्षांचा बी.टेक.चा अभ्यासक्रम संपवून गणित विषयात संशोधन करण्यासाठी वैभव गद्रे अमेरिकेला रवाना झाला, 2001 मध्ये. अमित होगाडी आणि चैतन्य गुट्टीकर आणखी एक वर्ष शरदकडे गणित शिकायला येत राहिले. कधी एकदा शुक्रवार उजाडतोय आणि आपण पुण्याला पळतोय असे त्यांना होत असे. नंतर त्या दोघांनीही अमेरिकेला प्रयाण केले. कानेटकर सरांनी करून दिलेली या तिघांची जय्यत तयारी तिथे आलेल्या देशोदेशींच्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या तुलनेतही सरस होती. वैभवने कॅल्टेकमध्ये (Caltech : California Institute of Technology), तर अमित व चैतन्य यांनी प्रिन्सटन विद्यापीठात पीएच.डी. पूर्ण केली. आपल्या प्रबंधांच्या सुरुवातीला प्रस्तावना लिहिताना त्यांनी कानेटकर सरांच्या गुरुऋणाचा आदराने उल्लेख केला. अमितने तर आपला प्रबंध शरद कानेटकरांनाच अर्पण केला. आपण केलेली पराकाष्ठा अशी फलद्रूप झालेली ऐकून शरदला अत्यानंद होत असे. हार्वर्ड विद्यापीठात पोस्ट डॉक्टोरल फेलोशिप केल्यानंतर वैभव गद्रे आता स्कॉटलंडमधील ग्लासगो विद्यापीठाच्या गणित विभागात संशोधन करत आहे, शिकवत आहे. अमित होगाडीने मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये काही वर्षे काम केले आणि आता तो पुण्याच्या आयसर (IISER : Indian Institute of Science Education and Research) या संस्थेमध्ये कार्यरत आहे. माॲमी विद्यापीठात दोन वर्षे काम केल्यावर चैतन्य गुट्टीकरने मात्र एकदम वेगळाच मार्ग निवडला. लहानपणापासून त्याला छायाचित्रणाची आवड होती, नाद होता. अमेरिकेत एकीकडे गणितात प्रावीण्य मिळवत असताना तो छायाचित्रणातही तरबेज झाला. आता पुण्याला त्याची चलच्चित्रणाची कंपनी आहे. शिवाय तो ॲमाझॉन प्राइमवरील कार्यक्रमांसाठी गणिती सल्लागार म्हणूनही काम करतो. आपल्या आंतरिक ऊर्मींना दाद दिली तर माणूस कुठून कुठे जाऊन पोहोचतो नाही!

2008 मध्ये गणित विभागातील काही प्राध्यापकांनी डॉ. शरद कानेटकर यांचे नाव पुणे विद्यापीठातील लोकमान्य टिळक गणित अध्यासनासाठी (Lokmanya Tilak Chair of Mathematics)  सुचवले. 1956 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जन्मशताब्दी सर्वत्र साजरी झाली होती. त्या निमित्ताने पुण्यात जमा केलेल्या निधीपैकी काही रक्कम शिल्लक राहिली होती. टिळकांचे गणितावरील प्रेम व प्रभुत्व लक्षात घेऊन व शिल्लक रकमेचा विनियोग करून पुणे विद्यापीठात हे अध्यासन सुरू झाले होते. जयंत नारळीकरांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर यांनी 1966 ते 1973 मध्ये या अध्यासनावर काम केले. त्या वेळेपर्यंत अध्यासनाचे मानधन बऱ्यापैकी होते. आता मात्र त्या अध्यासनाचे मानधन फारच तुटपुंजे झाले होते. पैशाचा मुद्दा शरदच्या खिजगणतीतही नव्हता, पण प्रश्न निर्माण झाला तो असा की त्याची डॉक्टरेट संगणकशास्त्रातील होती, गणितातील नव्हती. मग त्याची नियुक्ती गणिताच्या अध्यासनावर कशी करायची? त्या वेळचे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नरेंद्र जाधव यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी शरद कानेटकर यांची या अध्यासनाचे समन्वयक (coordinator) अशी नेमणूक केली आणि ती समस्या सोडवली. त्याच वेळी अध्यासनाचे मानधनही वाढवले. या अध्यासनावरून आणि नंतरही 2014 पर्यंत शरदने पुणे विद्यापीठात गणिताचे वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले. हे सर्व तो ‘स्वान्तःसुखाय’ म्हणजे स्वतःला आवडते म्हणून करत होता. सदासर्वदा आपल्या वेळेचा आणि ऊर्जेचा धनी तो स्वतःच राहिला. त्यामुळे मिंधेपणाचा लवलेशही त्याच्या वागण्यात नसे. हे आपले व्यक्तिस्वातंत्र्य त्याने कमावले होते. अमेरिकन विद्यापीठांच्या विद्युत अभियांत्रिकी विभागात न आवडणारे अभ्यासक्रम शरदने शिकवले होते व बरेच पैसे कमावले होते. आता त्याला पैशांची काहीच गरज नव्हती. फक्त शिकवायचे समाधान हवे होते. किती जमीन-अस्मानाचा फरक होता तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत! तरीही सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर आपल्याला रस नसलेल्या काही गोष्टी करणे त्याला भाग पडले. म्हणूनच ‘आधुनिक बीजगणित (Modern Algebra)’ या विषयावरील 2011 मध्ये दिलेल्या काही व्याख्यानांचे ध्वनिचित्रमुद्रण (audio-video recording) त्याने करू दिले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रसृत केलेली ही फीत (tape)  यू ट्यूब सरणीवर (YouTube channel) उपलब्ध आहे.

पवईतील आय.आय.टी.हून दर आठवड्याला येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना शरदने तयार केले होतेच. त्यानंतर प्रियव्रत देशपांडे या विद्यार्थ्याला संधी मिळाली शरदकडून धडे घेण्याची. पुणे विद्यापीठात गणितात एम.एस्सी. करताना, आणि ती पुरी केल्यानंतर 2006 मध्ये पीएच.डी. करण्यासाठी कॅनडाला जाईपर्यंत एक-दीड वर्षे तो कानेटकर सरांच्या घरी जात असे. गणिताचे नवे पुस्तक किंवा नवा शोधनिबंध वाचताना बारीक-सारीक तपशिलांमध्ये अडकून न पडता त्याचे विहंगावलोकन कसे करावे आणि त्याच्या गाभ्यापर्यंत कसे जावे या गोष्टी शरदने त्याला समोरासमोर समजावून दिल्या. गणित शिकताना कोणते चांगले प्रश्न विचारायचे याचे ज्ञान, जे कुठल्याच पुस्तकात मिळत नाही, ते शरदने त्याला दिले. प्रियव्रत आता चेन्नई गणिती संस्थेत (CMI : Chennai Mathematical Institute) संशोधन करतो.

असेच गणितातील उत्तमोत्तम विद्यार्थी मधूनमधून शरदकडे आकृष्ट होत राहिले. शरदनेही त्यांना आपल्याजवळचे ज्ञानानुभव वाटून दिले. पुण्यातील आयसर या संस्थेमधील चैतन्य आंबी या उत्तम विद्यार्थ्याला शरदने 2014 पासून पाच-सहा वर्षे सर्वतोपरी साहाय्य केले. अगदी पायाभूत गोष्टींपासून अत्याधुनिक संशोधनापर्यंत शरद त्याचा गुरू होता. शरदची गणिताबद्दलची समर्पित वृत्ती चैतन्यला खूप प्रेरणादायी ठरली. सगळे जातात तसे अभियांत्रिकीकडे वळायचे का गणिताकडे जायचे हे ठरवण्याआधी चैतन्यने शरदला विचारले होते की या दोन गोष्टींत नेमका काय फरक आहे. शरदने सांगितले की कपभर पाण्यात आणि समुद्राच्या पाण्यात जो फरक आहे तोच; मात्र पैसे मिळवणे हे ध्येय असेल तर गणिताकडे न वळलेले बरे, कारण व्यवसाय करताना वापरावी लागणारी बुद्धी आणि त्यातून मिळणारी कमाई यांचे व्यस्त प्रमाण असते! तरीही चैतन्यने आय.आय.टी.ची बी.टेक. पदवी मिळवली. नंतर एका  संगणक कंपनीत नोकरी करून तो कंटाळला व परत शरदकडे आला. आता प्राध्यापक ए.रघुराम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पुरी करून त्यानेही चेन्नई गणिती संस्थेत आपल्याला आवडणारे काम करायला सुरुवात केली आहे.

मधूनमधून शरदला त्याच्याच पठडीतले कोणी तरी भेटते. दररोज सकाळी लांबवर पळायला जात असताना तुषार गुरुमूर्तीची आणि शरदची ओळख झाली. अर्धे धोतर नेसून, पायांत चपलाही न घालता तुषार चांदणी चौकाजवळील घैसास गुरुजींच्या वेदपाठशाळेत जातो व दररोज एक तरी नवीन ऋचा शिकतो. त्याचे वडील पुणे विद्यापीठात प्राध्यापक होते. तुषारने कानपूरच्या आय.आय.टी.मधून बी.टेक. पदवी मिळवली होती. नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएच.डी. मिळवल्यावर बॉस्टनजवळील आय.आय.टी.मध्ये तो अधिछात्र होता. त्याची बायको अमेरिकेतच वाढलेली आहे व त्यांना सोळा वर्षांची मुलगीही आहे. आता असा हा तुषार आपला व्यवसाय सोडून, अतिशय साधेपणाने राहून प्रतिदिन वेदभवनात का जातो? जसे शरदला गणिताचे वेड लागले आहे, तसेच तुषारला वेदांचे वेड आहे. संस्कृत आणि गणित यांची सांगड घालायची त्याची इच्छा आहे. असे झाले की बाकीच्या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात. तुषारसारखी व्यक्ती भेटली की शरदला जरा दिलासा येतो; त्याच्यासारखे इतरही काही जण आहेत म्हणायचे, तो एकटाच नाहीये वेडा!

शरदला गणिताची मनापासून आवड तर आहेच, पण गणिताची आवड असणारेही त्याला फार आवडतात. त्यांच्याबरोबर भटकायला जाणे, छानशा उपाहारगृहामध्ये न्याहरी करणे अशा गोष्टी तो मनापासून करतो. पुण्याला गेल्यावर मी त्याला क्वचितच भेटत असलो तरी तो मला ॲम्ब्रोसिआ रेझॉर्टमध्ये घेऊन गेल्याचे आठवते. प्रियव्रत देशपांडे कानेटकर सरांबद्दल एकदा सांगत होता की एकीकडे गणितातील कडक शिस्त राखणारा तर दुसरीकडे मस्त कलंदर अशा दोन बाजू होत्या त्यांच्या. दररोज पळायला जाण्याखेरीज शरदला दुसरा नाद आहे तो म्हणजे केशवसुत, भा. रा. तांबे, बालकवी यासारख्यांनी लिहिलेल्या कविता ऐकण्याचा. सध्या यूट्यूबवर अशा जुन्या कविता, भावगीते सहज उपलब्ध होतात.

शरदला स्वतःकडून फार मोठ्या अपेक्षा नाहीत. पण एका गोष्टीची त्याला खंत वाटते. आपल्या समाजातील बऱ्याच क्षेत्रांत बाह्यतः तरबेज वाटणाऱ्या परंतु वस्तुतः अगदी सामान्य प्रतीच्या माणसांना आदर्श व्यक्ती (role model) मानले जाते. अशा दिखाऊ, अवडंबर बाळगणाऱ्या माणसांचा उदो उदो झालेला पाहून त्याला कळ येते. कुठलीही गोष्ट खोलवर जाऊन समजून घ्यायची, तपासून बघायची प्रवृत्ती समाजात नसल्याने असे अनाठायी महत्त्व दिले जाते. गणिताच्या क्षेत्रातील अशी चुकीच्या ‘दैवतां’ची उदाहरणे शरदने मला पटापटा दिली. 

काही दिवसांपूर्वी फोनवर बोलताना मी शरदला विचारले की आता वयाच्या सत्तराव्या वर्षी मागे वळून बघताना त्याला अभिप्रेत असलेल्या सर्व गोष्टी घडून आल्या का? त्याने एक नि:श्वास टाकला. तो म्हणाला की अमेरिकेहून परतल्यावर त्याने मनात योजलेले मोकळे, पूर्णपणे गणितावर ओवाळून टाकलेले आयुष्य तो दहा-बारा वर्षे जगला. त्या अवधीत दोनच गोष्टी त्याच्याकडून नैसर्गिकरीत्या होत होत्या. त्या म्हणजे श्वास घेणे आणि गणितात रंगणे. त्याच्यासाठी गणित अफूसारखे होते. एखादे उत्तम प्रमेय नव्याने कळले की त्याला नशाच चढायची. स्वतः गणितात नवीन संशोधन केले नसले तरी इतरांनी निर्माण केलेल्या सुंदर गणिताचे रसग्रहण त्याने केले, त्याचा आस्वाद घेतला. शरद म्हणाला की मी तानसेन नसलो तरी कानसेन नक्कीच आहे. आपण मिळवलेला आनंद त्याने अनेकांना वाटूनही दिला.

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी, कठीण प्रसंग येत असतात, आपल्याला निरनिराळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. अशा प्रसंगांतून जाताना गणिताची ओढ टिकवून ठेवणे किती दुरापास्त असते हे मला स्वतःच्या अनुभवावरून माहीत आहे. पण माझ्या नोकरीमुळे मला गणितात काम करावेच लागत होते. तशी काही निकड नसतानाही आजपर्यंत गणिताची ओढ कायम ठेवत चैतन्य आंबीसारख्या विद्यार्थ्यांना शरद हवी ती मदत कशी करत राहतो हे त्याचे तोच जाणे!

अमेरिकेतून शरद कानेटकर पुण्याला परतला त्याच वर्षी, म्हणजे 1992 मध्ये, शरदसारखीच गणिताबद्दलची तळमळ बाळगणाऱ्या एका विद्यार्थ्याने, मुंबईच्या आय.आय.टी. (IIT : Indian Institute of Technology) मध्ये प्रवेश घेतला होता. त्याचे नाव होते स्वप्नील महाजन. संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE : Joint Entrance Examination) या कठीण दिव्यातून तो गेला होता. गणित, पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्र हे तीनच विषय या परीक्षेच्या पाठ्यक्रमात असतात. 1992 मध्ये लाखो जणांनी ही परीक्षा दिली आणि सबंध भारतात स्वप्नील छपन्नाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्या काळी खरगपूर, मुंबई, चेन्नई, कानपूर व दिल्ली या ठिकाणच्या फक्त पाच आय. आय. टी. होत्या. मुलांना त्यांच्या क्रमांकानुसार पण त्यांची पसंती लक्षात घेऊन पाचपैकी एके ठिकाणच्या कुठल्यातरी अभियांत्रिकी विभागात प्रवेश मिळायचा. त्यांपैकी मुंबईमधल्या संगणकशास्त्र व अभियांत्रिकी या भरपूर मागणी असलेल्या विभागात स्वप्नीलने प्रवेश घेतला.

पहिल्या सत्रात (semester) असताना सचिन पटवर्धन या पीएच.डी. करणाऱ्या एका विद्यार्थ्याबरोबर स्वप्नील आय.आय.टी. परिसरातील आमच्या निवासस्थानी आला होता. पहिल्या सत्रात सर्व विद्यार्थ्यांना कलन (Calculus)  हा अभ्यासक्रम (course) घ्यावा लागतो. त्या वर्षी मी तो शिकवत नव्हतो, पण मी आधी बरेच वेळा शिकवला होता. तेव्हा वर्गामध्ये मी काही आव्हानात्मक प्रश्न विचारत असे, पण क्वचितच कुणाला ते सोडवता येत असत. त्यांपैकी एक प्रश्न मी स्वप्नीलला विचारला. त्या प्रश्नाचे दोन भाग होते. त्यातला एक भाग स्वप्नीलने लगेच सोडवला, पण दुसऱ्या भागाचे उत्तर काय असावे याबद्दल तो साशंक होता. संध्याकाळच्या सुमाराला आमच्या घरून बाहेर पडल्यावर व त्याच्या वसतिगृहात पोहोचल्यावरही स्वप्नीलचे विचारचक्र चालू होते. नेटाने प्रयत्न करून उत्तर मिळवल्यावरच तो त्या रात्री झोपू शकला. दुसऱ्या दिवशी गणित विभागात येऊन मला त्याने ते उत्तर ऐकवले, आणि अशा प्रकारचे आणखी प्रश्न विचारायला सांगितले. मी ते नंतर कधी न विचारल्याबद्दल तो नाराजही झाला होता म्हणे! मी सुचवलेली काही गणितातील पायाभूत पुस्तके त्याने प्रयत्नपूर्वक, स्वकष्टाने वाचून काढली. चार वर्षांत त्याने संगणकशास्त्र विभागातील आवश्यक त्या सर्व गोष्टी पूर्ण केल्याच, शिवाय त्याला गणित विभागातील अनेक अभ्यासक्रम करण्याची तीव्र इच्छा होती, पण ती पाठ्यक्रमाच्या नियमांमुळे अल्प प्रमाणातच पुरी करता आली. मग शेवटच्या वर्षात ही बंधने धुडकावून लावून आता जीवनमरणाचा प्रश्न असल्यासारखा तो सरळ गणित विभागातील व्याख्याने ऐकायला येऊ लागला, त्याच वेळी संगणकशास्त्र विभागातील त्याने पत्करलेली व्याख्याने चालू असली तरीही. ज्यांच्यात रस आहे त्याच गोष्टी करण्याचा त्याचा स्वभाव होता. बी.टेक. पदवी मिळवल्यावर मात्र त्याने बाकी सर्व सोडून गणित एके गणित करण्याचे ठरवले.

गणिताला जीवनात सर्वोच्च स्थान दिल्यावर दैनंदिन व्यवहारांसाठी नोकरी पत्करणे ही स्वप्नीलच्या दृष्टीने एक तडजोडच आहे. स्वप्नीलचे भाग्य एवढेच आहे की कुठले संशोधन करायचे ते तो स्वतः ठरवू शकतो; तसेच जर शिकवण्याबाबत झाले असते, तर सोन्याहून पिवळे झाले असते. जेव्हा गणितातील एखाद्या गोष्टीचा त्याला शोध लागतो, त्या क्षणी त्याला असे वाटते तो गणिताने केलेला त्याचा सन्मान आहे, त्याचे बुद्धिनिष्ठ प्रयत्न पाहून. तो शोध त्यालाच का लागावा याचे उत्तर म्हणजे गणित ही एक शक्ती आहे, ती ठरवते तिच्याजवळचे कोणते रत्न कुणाला व केव्हा द्यायचे.

प्राध्यापकांनी दिलेल्या चांगल्या शिफारसपत्रांच्या जोरावर अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या गणित विभागात पीएच.डी. करण्यासाठी त्याला 1996 मध्ये शिष्यवृत्ती मिळाली. त्याचा कॉर्नेलमधील प्रवेश त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. आय.आय.टी.त झालेली घुसमट संपून एका मुक्त वातावरणात तो वावरू लागला. काय शिकायचे आणि आपले भवितव्य कसे घडवायचे ते आता त्याच्या स्वतःच्या हातात होते; इतर कुणाला किंवा नियतीलाही दोष देण्याचे कारण राहिले नव्हते. पहिल्या वर्षात सगळे पायाभूत अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत तो रिचर्ड एहरेनबोर्गबरोबर समचयशास्त्रातील (Combinatorics) एका प्रश्नावर काम करू लागला. रिचर्ड एक पोस्ट डॉक्टोरल फेलो होता, पीएच.डी. नंतरचे संशोधन करणारा अधिछात्र. रिचर्ड जो प्रश्न सोडवू पाहत होता तो सोडवण्यात स्वप्नीलने चांगला हातभार लावला, आणि सुट्टी संपेपर्यंत ते काम पूर्णही केले.

कॉर्नेलमधील दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस स्वप्नीलला त्याच्या पीएच.डी.चा मार्गदर्शक ठरवायचा होता. त्याने प्राध्यापक केनेथ ब्राउन यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी स्वप्नीलची पार्श्वभूमी समजून घेतली. स्वप्नीलने रिचर्डबरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेल्या संशोधनाबाबत जो सेमिनार दिला होता, त्याला ते उपस्थित होते व स्वप्नीलच्या संशोधनाने ते प्रभावित झाले होते. त्यांनी होकार दिल्यावर स्वप्नीलने त्यांच्या विषयात काम करून पुढच्या दोन वर्षांत दोन शोधनिबंध लिहिले. आपला प्रबंध लवकर आटपून त्याला कॉर्नेल विद्यापीठातून पाय काढता आला असता. पण स्वप्नीलने तसे केले नाही. कॉर्नेल विद्यापीठ ज्ञानसामग्रीने परिपूर्ण होते आणि तिथे हवे ते शिकायची त्याला मोकळीक होती. कितीतरी थोर गणितज्ञ येत आणि त्यांची व्याख्यानसत्रे चालू असत. त्यांत उपस्थित राहून गणितातील निपुणता वाढवण्याची केवढी मोठी संधी उपलब्ध होती. कॉर्नेल विद्यापीठ ज्या इथाका (Ithaca) नावाच्या न्यू यॉर्क राज्यातील छोट्या गावात आहे, तेथील ग्रामीण वातावरणही स्वप्नीलला खूप आल्हाददायक वाटत असे. या सगळ्यांबरोबरच स्वप्नीलला त्याचे मार्गदर्शक केन ब्राऊन यांचे सान्निध्य हवे होते. त्यांचा गणिताविषयीचा दृष्टिकोन विशाल होता, गणिताच्या सर्व शाखांत त्यांना चौफेर गती होती. याला साजेसे दिलदार व्यक्तिमत्त्व होते; कुठल्याही शाखेला किंवा त्या शाखेत काम करणाऱ्या व्यक्तीला ते कमी लेखत नसत. त्यांच्याबरोबर चर्चा करत राहून स्वप्नील अनेक विषय शिकला, गणितातील आपला स्तर वाढवत गेला. एखाद्या प्रश्नाचा सर्वांगीण पूर्ण अभ्यास केल्यावर सगळी सूत्रे हातात आली की मगच काही लिहायला घ्यायचे, आपले लिखाण आपल्या विचारांचा अर्कच असला पाहिजे असे त्यांचे संस्कार स्वप्नीलने आपल्या अंगी बाणवले. तेव्हापासून केन ब्राउन स्वप्नीलचे स्फूर्तिस्थान बनून राहिले. बीजगणित, भूमिती व संभाव्यता शास्त्र (Probability Theory) यांच्या सीमारेषांवरील विषयांत काम करून, तब्बल सहा वर्षे कॉर्नेल विद्यापीठात राहून मगच 2002 मध्ये स्वप्नीलने आपला पीएच.डी.चा प्रबंध सादर केला.

कॉर्नेलमध्ये विद्यार्थी असतानाच स्वप्नीलची मार्सेलो आगियार (Marcelo Aguiar) या ज्येष्ठ विद्यार्थ्याशी ओळख झाली. मार्सेलो स्वप्नीलच्या आधी चार वर्षे कॉर्नेलला आला होता, उरुग्वे (Uruguay) या देशातून. स्वप्नीलच्या आगमनानंतर वर्षभरात जरी मार्सेलोने कॉर्नेल सोडले असले, तरी दर उन्हाळ्याच्या सुट्टीत तो कॉर्नेलला यायचा. समचय शास्त्रातील एका भागात बीजगणिताचा वापर करण्याबाबत एकत्र चर्चा व संशोधन करताना त्यांचे सूर जुळले. 2001 व 2002 मध्ये स्वप्नील कॉर्नेल सोडेपर्यंत दोघांनी इतके सुसूत्र संशोधन केले की ते पुढे 2006 मध्ये पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. दोघांच्या दीर्घकालीन व अतिशय मोठा आवाका असलेल्या सहयोगाची ही नांदी होती. स्वप्नील मार्सेलोला मोठ्या भावाच्या जागीच पाहतो. स्वप्नील कामात स्वतःला झोकून देणारा आहे, पण मार्सेलो त्याला भरकटू देत नाही. पुस्तकरूपाने त्यांच्या संशोधनाला वाव करून देण्याचे दालन मार्सेलोनेच उघडले होते.

कॉर्नेलनंतर बेल्जिअममधील ब्रुसेल येथील फ्री युनिव्हर्सटीत वर्षभर काम केल्यावर स्वप्नील भारतात परतला. 2003 मध्ये मुंबईतील टिफ्र (TIFR : Tata Institute of Fundamental Research) या संस्थेमधील गणित विभागात त्याची अभ्यागत सदस्य (Visiting Member) म्हणून नेमणूक झाली. सुमारे दोन वर्षांनी त्याने आय.आय.टी. बॉम्बेच्या गणित विभागाकडे अर्ज केला. मुलाखतीपूर्वी त्याने दिलेल्या छोट्या सेमिनारला मी हजर होतो. फक्त तीन-चार पारदर्शिकांच्या (transparencies) आधारे दिलेले अगदी मुद्देसूद होते त्याचे भाषण. 2005 मध्ये स्वप्नीलची आमच्या विभागात निवड झाली, तेव्हा कुणाला कल्पना नसेल की आय.आय.टी.चा केवढा फायदा होणार आहे, आणि टिफ्रचे केवढे नुकसान. आमच्या गणित विभागात 2006 मध्ये नियमित स्वरूपाची नेमणूक स्वीकारण्याआधी स्वप्नील कॉलेज स्टेशन येथील टेक्सास ए. ॲन्ड एम. विद्यापीठामध्ये सहा महिन्यांसाठी गेला आणि त्याने मार्सेलोबरोबरचे संशोधन नेटाने पुढे नेले.

आय.आय.टी.च्या कुठल्याही विभागातील प्राध्यापकाला संशोधन, अध्यापन आणि प्रशासन अशी तीन प्रकारची कामे करायची असतात. यांपैकी संशोधन सर्वांत प्रमुख. संशोधनाची गुणवत्ता आणि परिमाण यांवर पदोन्नती- सहायक प्राध्यापकानंतर सहयोगी प्राध्यापक आणि नंतर पूर्ण प्राध्यापक अशी- बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. या प्रगतीत अध्यापनाचा दर्जाही विचारात घेतला जातो, पण मामुली स्वरूपात. प्रशासनाचे काम कोणीतरी एक प्राध्यापक तीन वर्षांसाठी विभागप्रमुख बनून करतो. त्याला इतरांनी साथ द्यायची असते, निरनिराळ्या समित्यांमध्ये काम करून. संशोधन, अध्यापन आणि प्रशासन या तीनही गोष्टी उत्कृष्टपणे करणारा प्राध्यापक विरळाच! यांपैकी पहिल्या दोन गोष्टींत निष्णात असलेली पण तिसऱ्या गोष्टीत गती नसलेली आमच्या गणित विभागातील एकमेव व्यक्ती म्हणजे स्वप्नील महाजन.

गणितज्ञांचे दोन प्रकार करता येतील. काही असतात प्रमेय सोडवणारे (Problem Solvers) आणि दुसरे काही असतात सैद्धांतिक इमारत रचणारे (Theory Builders). पहिल्या प्रकारचे गणिती खूप काळ अनिर्णित राहिलेले जटिल पण विशिष्ट प्रश्न सोडवू पाहतात, तर दुसऱ्या प्रकारचे गणिती वरपांगी भिन्न दिसणाऱ्या विषयांतील साम्य शोधून त्या सगळ्या विषयांना एक सैद्धांतिक चौकट मिळवून देतात. स्वप्नील आणि त्याचा सहयोगी मार्सेलो आगियार हे दुसऱ्या प्रकारचे, अव्वल दर्जाचे गणिती आहेत. बीजगणित, संस्थिती (Topology) आणि समचयशास्त्र (Combinatorics)  या सर्वांना एक समान चौकट प्राप्त करून देणारा लांब पल्ल्याचा प्रकल्प आहे त्यांचा. त्यांचे दृष्टिकोन परस्परांना पूरक आहेत, मार्सेलोचा समचयात्मक, तर स्वप्नीलचा भूमितीय. अंकगणिताला आकडेमोड म्हटले तर बीजगणिताला चिन्हमोड म्हणता येईल, पण या दोन्ही गोष्टींना चित्रमय करून भूमितीच्या स्वरूपात बघायला स्वप्नीलला आवडते. मार्सेलो व स्वप्नील यांची इतकी जोडी जमली आहे की दोघांनी मिळून आजतागायत चार जाडजूड पुस्तके लिहिली आहेत व ती गणितविश्वातील जगन्मान्य प्रकाशकांनी प्रसिद्ध केली आहेत : 2006 मध्ये पहिले 181 पानांचे, 2010 मध्ये दुसरे 784 पानांचे, तिसरे 2017 मध्ये 611 पानांचे आणि चौथे 2020 मध्ये 832 पानांचे. पहिल्या तीन पुस्तकांचे प्रकाशन केले आहे अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीने, तर चौथ्याचे केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसने. दोघांचा सहयोग अखंड चालू आहे. आतापर्यंत केलल्या कामातून निघणारे धागे पुढे नेत जेव्हा सगळे सांधे जोडले जातील व कामाला एक प्रकारचे पूर्णत्व येईल, तेव्हा पाचवे पुस्तकही निर्माण होईल!

स्वप्नील आणि मार्सेलो यांच्या 2010 मध्ये लिहिलेल्या दुसऱ्या पुस्तकाच्या सुरुवातीला गणितज्ञ आंद्रे जोयाल याचे प्राक्कथन (Foreword) आहे. जोयालला या पुस्तकातील काही विषयांचा आद्य प्रवर्तक मानले जाते. अशा एखाद्या प्रथितयश माणसाचे प्राक्कथन सर्वसाधारणपणे अर्ध्या पानाचे, फार तर एक पानभर असते. जोयालने लिहिली आहेत पाच पाने. त्यातली शेवटची दोन वाक्ये उद्‌धृत करतो. "The book of Aguiar and Mahajan is a quantum leap toward the mathematics of the future. I strongly recommend it to all researchers in algebra, topology and combinatorics." याचे मराठीत भाषांतर असे करता येईल : ‘आगियार आणि महाजन यांचे पुस्तक ही गणिताच्या भविष्यकाळाकडे घेतलेली उत्तुंग भरारी आहे. मी बीजगणित, संस्थिती आणि समचयशास्त्र या विषयांतील सर्व संशोधकांना त्याची जोरदार शिफारस करतो.’ कोणते प्राक्कथन यापेक्षा जास्त प्रशंसात्मक असू शकते? जोयालच्या दृष्टीने हे पुस्तक एका मानबिंदूसारखे आहे.

स्वप्नीलचे काम अव्याहतपणे चालू असते. सकाळी 9 ते दुपारी 1 आणि पुन्हा 2 ते 6 तो फक्त त्याच्या ऑफिसातच सापडू शकतो, मग मुसळधार पाऊस असो की रखरखीत ऊन असो, शनिवार-रविवार असो की दुसरी कुठली सुट्टी असो, किंवा कोविड-19ची टाळेबंदी असो. सर्व लक्ष आपल्या संशोधनाकडे देता यावे म्हणून तो फक्त गणित विभागाच्या ईमेलचा वापर करतो व तेही आलेल्या अधिकृत सूचना वाचण्यासाठी. फक्त अंतर्गत (intercom) फोन वापरतो व ओळखीचा नंबर असेल तरच फोन उचलतो. 2010 मध्ये गणित विभागातील काही खोल्यांचे नूतनीकरण झाल्यावर स्वप्नीलची खोली बदलायची होती. नव्या खोलीच्या दारावर ‘प्रा. स्वप्निल महाजन’ अशी पाटी लटकावली होती. त्याच्या नावातील ‘नी’ दीर्घ न लिहिता ऱ्हस्व लिहिला होता म्हणून स्वप्नीलने ती पाटी काढून ठेवली, आणि ‘‘आता माझ्या नावाची पाटी लावूच नका,’’ असे सांगून तो मोकळा झाला. नावातील ऱ्हस्व ‘नि’ ही फक्त सबब होती. त्याचे म्हणणे असे की जर कुणाला खरोखर भेटायचेच असेल तर तो माणूस पुरेशी चौकशी करून नक्कीच त्याच्या खोलीवर पोहोचू शकतो! मला वाटते की मी सोडून गणित विभागातील दुसरे कोणीच तातडीच्या कारणाशिवाय स्वप्नीलकडे जात नाही. असा आहे स्वप्नील एकांडा शिलेदार! गीतेतील तेराव्या अध्यायात ‘क्षेत्रज्ञा’चे, म्हणजे खऱ्या जाणकाराचे, वर्णन आले आहे. त्यातील ‘विविक्तदेशसेवित्वम्‌ अरतिर्जनसंसदि’ या ओळीची मला आठवण होते, आणि तिथे म्हटल्याप्रमाणे एका विवक्षित जागी बसलेला, लोकांच्या घोळक्यात जाण्याची नावड असलेला स्वप्नील डोळ्यांसमोर उभा रहातो. स्वप्नीलने पीएच.डी. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली केली ते केन ब्राउन ज्या वाटेने गेले तीच वाट स्वप्नीलसाठी नैसर्गिक होती, त्यांचाच दृष्टिकोन स्वप्नीलने प्रगल्भ केला. तरीही आपण केन ब्राउनपुढे कमी पडतो व कमीच पडत राहणार, अशी स्वप्नीलची भावना आहे.

मी आणि माझा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातला प्राध्यापक मित्र एच. नारायण एकमेकांच्या विभागात नव्याने रुजू झालेल्या सदस्यांबद्दल बोलत असू. मी जेव्हा स्वप्नील महाजनचे प्रताप नारायणला सांगितले, तेव्हा त्याला सानंद कुतूहल वाटले. पण त्याने मला दोन प्रश्न विचारले : स्वप्नीलचा विवाह झाला आहे का आणि त्याला मुले आहेत का. दोन्ही प्रश्नांची होकारार्थी उत्तरे ऐकून नारायण म्हणाला, ‘‘मग सगळे ठीक आहे. नाहीतर स्वप्नीलसारखी माणसे वाहवून जाऊ शकतात. स्वप्नीलच्या कौटुंबिक स्वास्थ्यामुळे तशी काही भीती नाही.’’ स्वप्नीलची पत्नी शिवांगी. तिने घर सांभाळण्याचा, रोहिणी व विशाखा या दोन मुलींना वाढवण्याचा मक्ता घेतला आहे. ती हे अगदी खुशीने करते आणि स्वप्नीलला जितके मनमुराद काम करायचे असेल तितके करू देते. स्वप्नील करत असलेल्या मूलभूत कामाचे महत्त्व ती जाणून आहे. तिचे हे योगदान फार मोलाचे आहे.

जी गोष्ट संशोधनाबाबत, तीच गोष्ट अध्यापनाबाबत. या दोनच गोष्टींत स्वप्नील पूर्णपणे गुंतून जातो. संशोधनातील त्याचा आधुनिक दृष्टिकोन त्याच्या शिकवण्यातही दिसून येतो, आशय व तंत्र या दोन्ही बाबतींत. तो जे जे स्वतः समजू शकला आहे, ते ते मुलांना समजावून देता आले पाहिजे अशी त्याची भूमिका आहे. विभागप्रमुखाने नेमलेल्या समितीकडून स्वप्नीलच्या वाट्याला जे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी येतील, बी.टेक.चे, एम.एस्सी.चे किंवा पीएच.डी.चे, ते सर्व तो मन लावून, खोलात जाऊन शिकवतो. कोविड-19ची साथ सुरू व्हायच्या आधी, कुठलाही अभ्यासक्रम सुरू होण्यापूर्वी सर्व व्याख्यानांच्या तो टिपण्या (notes) लिहून काढत असे आणि त्यांची एक प्रत मुलांना देत असे. उद्देश असा की तो शिकवत असताना विद्यार्थ्यांनी तो जे बोलत असेल किंवा फळ्यावर जे लिहीत असेल त्याकडे सगळे लक्ष द्यावे, नोट्‌स काढण्याच्या फंदात न पडता. मुलांचे लक्ष टिकवून ठेवण्यासाठी तो काही युक्त्या वापरतो. एक म्हणजे तो मुलांना मधून मधून कोडी घालतो. दुसरे म्हणजे पत्त्याच्या जादू दाखवतो. असे केले की वातावरण हलके होते; मुले एकदम कान टवकारतात. या सगळ्यांचा वर्गात चालू असलेल्या अभ्यासाशी काही ना काही संबंध असतो. कधी कधी वर्गावर जाताना तो बरोबर लहान प्रतिकृती (models) घेऊन जातो. त्यांमुळे गणिती कल्पनांना मूर्त स्वरूप मिळते. एकदा त्याच्या एका मोठ्या वर्गात मी गुपचूप मागे जाऊन बसलो होतो; तेव्हा तो घरात ताक करण्याची रवी घेऊन आला होता, कर्ल (curl) ही संकल्पना विशद करण्यासाठी! अर्थातच मुलांचे कुतूहल चांगले जागृत झाले. काही वेळा स्पष्टीकरणाच्या ओघात तो समान मथितार्थ असणारे संस्कृत श्लोक म्हणून दाखवतो, फळ्यावर लिहितो.

पण इतके सगळे करूनही त्याचा अनुभव असा आहे की आजकाल फारच थोड्या जणांना शिकण्यात खराखुरा रस असतो. मग तो अशा थोड्या मुलांकडेच जास्त लक्ष पुरवतो, त्यांना काही कमी पडू देत नाही. इतरांचे काय, ती पास झाली म्हणजे त्यांचा त्रास वाचला!

कोविड-19 च्या साथीमुळे ऑनलाइन शिकवणे सुरू झाल्यावर या नव्या पद्धतीचा पुरेपूर फायदा मुलांना करून देण्यासाठी स्वप्नील सरसावला. व्याख्यानाच्या नुसत्या लेखी टिपण्याच नव्हे, तर ध्वनिमुद्रित फितीदेखील मुलांना उपलब्ध करून देणे आता त्याला सहज शक्य झाले. शिक्षणाच्या तंत्रात इतका चटकन बदलाव घडून आणण्याच्या बाबतीत कोविड-19ची साथ म्हणजे एक वरदानच ठरली आहे असे त्याचे मत आहे. अंततः ऑनलाइन पद्धतच सर्वत्र प्रसारात येणार आहे अशी त्याला खात्री आहे. 2012 पासून वर्गामध्ये फक्त फळ्यावर न लिहिता तो सरकचित्रे वापरू लागला होता व ती मुलांना उपलब्ध करून देत होता. आता त्याच्या पुढची पायरी म्हणजे ध्वनियुक्त सरकचित्रे! मुलेही खूश आहेत या नवीन भरीमुळे.

स्वप्नीलने एम.एस्सी.च्या स्तरावरील विविध विषय शिकवले. खूपसे प्राध्यापक आपल्या संशोधनाच्या विषयाशी निगडित असतील तेवढेच विषय वर्षानुवर्षे शिकवणे पसंत करतात. स्वप्नीलचे तसे नाही. माझ्या बेचाळीस वर्षांच्या गणित विभागातील अनुभवावरून मी निश्चित म्हणू शकतो की इतर कोणाहीपेक्षा स्वप्नीलचे शिकवणे जास्त चौफेर, वैविध्यपूर्ण आहे. ही गोष्ट त्याच्या संशोधनातील सर्वसमावेशक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. गणिताचे कप्पे न करता तो विषय एकसंध आहे असे शिक्षकाने स्वतः मानले तर तशीच विद्यार्थ्यांचीही भावना होते. स्वप्नीलला विद्यार्थ्यांकडून प्रतिसादही चांगला मिळत आला आहे. एखाद्या उत्तम विद्यार्थ्यांला बी.टेक.च्या पहिल्या-दुसऱ्या वर्षात स्वप्नीलने शिकवले असेल तर तो विद्यार्थी स्वप्नील शिकवत असलेले पीएच.डी.पर्यंतचे सगळे अभ्यासक्रम घेत जातो आणि स्वप्नीलचा जणू भक्तच बनून जातो. खरे म्हणजे असे पदवीपूर्व वर्षांतील उत्तम विद्यार्थीच स्वप्नीलच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये चमकत असतात.   

चार वर्षांपूर्वी स्वप्नीलला गणित विभागाकडून अध्यापनातील गुणवत्तेबद्दल पुरस्कार (Excellence in Teaching Award) मिळाला. तो पूर्णत: विद्यार्थ्यांनी केलेल्या मोजमापावर ठरवला जातो व दरवर्षी दोन प्राध्यापकांना तो देण्यात येतो. पण स्वप्नील अस्वस्थ झाला. कुठल्याही प्रकारचा प्रकाशझोत स्वतःवर आलेला त्याच्या प्रकृतीला मानवत नाही. नंतर त्याने आय.आय.टी.च्या प्रशासनाला चक्क सांगून टाकले की यापुढे अशा कुठल्याही पुरस्कारासाठी त्याच्या नावाचा विचार करू नये.

आता राहता राहिली कामगिरी म्हणजे प्रशासनाची. या बाबत मात्र स्वप्नीलकडून कोणतीच अपेक्षा बाळगू नये. एखाद्या विभागीय समितीचा सदस्य म्हणून स्वप्नीलकडे काही काम आलेच, तर तो ते चोख बजावेल इतकेच. एखाद्या समितीत इतरांबरोबर काम करायचे म्हणजे समझोता, तडजोड या गोष्टी ओघानेच आल्या. पण तसे करायला स्वप्नीलची मुळीच तयारी नसते. मग खटके तरी उडतात किंवा गप्प तरी बसायला लागते. या दोन्हींचा त्याला त्रास होतो. स्पष्टपणे आपली मते मांडायला तो कचरत नसल्याने संघर्ष टळण्यासाठी तो इतरांपासून लांबच राहू इच्छितो. म्हणूनच तो एकसदस्य समितीचे काम करणेच पसंत करतो. तेच त्याच्या स्वभावात बसते. एकाच व्यक्तीकडून सर्व प्रकारच्या अपेक्षा करणे बरोबरही नाही.

आम्हां दोघांचा परिचय वाढल्यावर लक्षात आले की, गणिताशिवाय स्वप्नीलला माझ्यासारखी संस्कृतचीही खूप आवड आहे. मग संस्कृतच आमचा सामाईक विषय बनला. स्वप्नील शाळेत दहावीपर्यंत संस्कृत शिकला, तेव्हा त्याला गणितासारखेच संस्कृतचेही वेड लागले होते. पण शास्त्र शाखेकडे गेल्यामुळे त्याला संस्कृतपासून लांब राहावे लागले याचे त्याला दुःख होत असे. नंतर अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या ग्रंथालयात संस्कृत वाङ्‌मयावर इंग्लिशमध्ये पुस्तके होती ती त्याने वाचून काढली. पण त्याचा कल मुळाकडे जाण्याचा असल्याने त्याचे समाधान होत नसे. मी मात्र महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत संस्कृतचा अभ्यास केला होता, आणि मुख्य म्हणजे माझे वडील आचार्य वि.प्र.लिमये संस्कृतचे विद्वान असल्याने माझ्या घरी संस्कृतमय वातावरण होते. मग असा पायंडा पडला की जेव्हा जेव्हा मी स्वप्नीलच्या ऑफिसवरून जात असेन तेव्हा आत शिरून त्याला संस्कृतचा एक श्लोक म्हणून दाखवायचा, तो त्याच्या एका वहीमध्ये लिहून काढायचा, त्याचा अन्वय लावायचा आणि  अर्थाची फोड करून सांगायची. स्वप्नीलचा तवा तापलेला होता, त्याच्यावर पोळ्या चांगल्या भाजल्या जात. मी सुरुवात केली सहा प्रीतिलक्षणे सांगणाऱ्या अनुष्टुभ छंदातील एका सोप्या पण मार्मिक श्लोकाने. मला माझ्या वडिलांकडून ऐकायला मिळालेली इतर अनेक वचने व सुभाषिते मी स्वप्नीलच्या वहीत लिहीत गेलो. हे चालू असताना स्वप्नीलने माझ्या नकळत स्वतःहून संस्कृतचा सखोल अभ्यास सुरू केला होता. पुण्यामधील अप्पा बळवंत चौकातील एका दुकानातून अनेक पुस्तके घेऊन आल्यावर हे वाचू का ते वाचू असे त्याला होत असे. एकीकडे ग्रंथाभ्यास चालू असताना, प्रथम बोली भाषा आणि नंतर व्याकरण शिकवणाऱ्या संस्कृत भारतीच्या कॅसेट्‌स त्याला योगायोगाने मिळाल्या. कानांवर पडत गेली तशी संस्कृत भाषा आपलीशी होऊ लागली.

एके दिवशी कालिदासाने लिहिलेल्या ‘रघुवंश’ या काव्यातील एक श्लोक मी त्याच्या वहीत लिहिला. सहाव्या सर्गात इंदुमतीच्या विवाहप्रसंगी तिला कालिदासाने दिलेली ‘संचारिणी दीपशिखे’ची उपमा त्यात होती. त्या श्लोकाची गणिती रचना पाहून स्वप्नील मंत्रमुग्ध झाला. कुठल्या धुंदीत कालिदासाने हा श्लोक लिहिला असेल या विचाराने तो नतमस्तक झाला. या उपमेमुळेच ‘दीपशिखा कालिदास’ हा शब्दप्रयोग प्रचलित झाला आहे. नंतर कवीच्या विनम्रतेने आणि रघुकुलातील राजांच्या महतीने ओथंबलेले पहिल्या सर्गातील पहिले दहा श्लोक आम्ही अभ्यासले. ते उच्चारताना एका अत्युच्च स्तरावर पोहोचून डोळ्यांत पाणी आणणारा अनुभव मी स्वप्नीलबरोबर पुन्हा घेतला. कालिदास निवडतो ते शब्द आणि त्यांची मांडणी गणितातील शिस्तीसारखी इतकी चपखल असते की दुसऱ्या कोणाचेही काव्य स्वप्नीलला कमी प्रतीचे वाटू लागले. असा एखादा श्लोक आढळला की तो म्हणतो, ‘‘कालिदासाकडे पाठवून नीटनेटका करून आणला पाहिजे!’’ 

स्वप्नीलने अनुभवलेली सर्वोत्कृष्ट मानवी कलाकृती म्हणजे कालिदासाचे मेघदूत हे काव्य. पूर्वमेघ 66 श्लोकांचा व उत्तर मेघ 55 श्लोकांचा असे मिळून फक्त 121 श्लोक, पण एकेक श्लोक म्हणजे एकेक रत्न आहे, आपण लिहिलेल्या एखाद्या भल्या मोठ्या पुस्तकापेक्षा जास्त मौल्यवान, असे त्याला वाटते. मेघदूताचा स्वप्नीलवर इतका विलक्षण परिणाम झाला की ते त्याचे एक प्रेरणास्थान बनले. 2009 मध्ये स्वप्नीलने कालिदास, भवभूति आणि भास या तिघांना समकालीन कल्पून त्यांचे व्यक्तिमत्त्व विशद करणारे ‘त्रिवेणी संगम’ नावाचे मराठी नाटक लिहिले. या नाटकात कलेचा साक्षात्कार म्हणता येईल असे कलावती नामक एक काल्पनिक स्त्रीपात्रही गुंफले. हे नाटक लिहिण्यात स्वप्नीलने आपले सर्वस्व ओतले होते. पण नाटक हे नुसते लिहून पुरत नाही, ते रंगमंचावर यावे लागते. 2013पर्यंत प्रामाणिक प्रयत्न करूनही तसे झाले नाही याची त्याला फार खंत आहे.

स्वप्नील संस्कृतमध्ये इतका पुढे गेला की त्याला सांगायची माझ्याकडची सामग्री तुटपुंजी पडू लागली. परंपरेच्या पलीकडे जाऊन नवीन गोष्टी तो सुचवू लागला. त्याचे एक उदाहरण असे. एखाद्या संस्कृत श्लोकाचा अर्थ लावण्याआधी तो गद्य स्वरूपात लिहितात, त्याला अन्वय असे म्हणतात. परंतु तो एकरेषीय (linear) असल्याने शब्दांची एकमेकांशी असलेली सगळी नाती दाखवू शकत नाही. श्लोकाची फोड अनेक स्तरांवर केली, म्हणजे झाडाच्या फांद्या वेगवेगळ्या पातळींवर असतात तसे पद्यातले शब्द वर-खाली लिहिले आणि कुठल्या विभक्तीने ते संबंधित आहेत ते बाण काढून दाखवले तर श्लोकाचा अर्थबोध चटकन आणि पूर्णपणे होऊ शकतो. स्वप्नीलने श्लोकाच्या या बहुस्तरीय मांडणीला ‘द्रुमान्वय’ असे नाव दिले. द्रुम म्हणजे झाड. आलेखशास्त्रात (Graph Theory) जी ‘द्रुम’ (tree) नावाची संकल्पना आहे, ती इथे जरा वेगळ्या अर्थाने वापरली आहे. हा काही नवा शोध नाही; संस्कृतमधील विभक्तीची कल्पना चित्ररूपाने दाखवली तर संस्कृत व्याकरण नीट समजायला मदत होते इतकेच. 2009 मध्ये आम्ही दोघांनी, मुख्यतः स्वप्नीलने, रघुवंशातील बऱ्याच श्लोकांचा आणि इतरही काही पद्यांचा द्रुमान्वय लिहून काढला. असे करण्यात अडचणी येत गेल्या. पण त्या निवारताही आल्या, इतकेच नव्हे तर त्या निवारताना काही नवीन संकल्पनाही राबवता आल्या. हे काम अजून पूर्णत्वाला जायचे आहे.

जगातील सर्व भाषांच्या व्याकरणांमध्ये संस्कृत भाषेचे व्याकरण जास्त काटेकोर मानले जाते. पाणिनीने ‘अष्टाध्यायी’ या ग्रंथात अतिशय सूत्रमय पद्धतीने संस्कृत व्याकरण नियमबद्ध केले आहे. पण त्या सूत्रांची मांडणी नवख्या माणसाला बुचकळ्यात टाकू शकते. सूत्रांचा क्रमही बुद्धीबळातील घोड्यासारखा तिरकस असू शकतो. बाळबोध गणिती भाषेत, म्हणजे संच आणि फलन (set and function)  वापरून, या सूत्रांचा उलगडा होऊ शकेल असे वाटून प्रथम संस्कृत व्याकरणातील प्रत्ययांची गणिती भाषेत मांडणी करावी असा विचार स्वप्नीलच्या डोक्यात आला. आय.आय.टी.च्या मानविकी आणि सामाजिक विज्ञान (Humanities and Social Sciences) विभागातील संस्कृतचे प्राध्यापक मल्हार कुलकर्णी यांना मी स्वप्नीलच्या संस्कृतप्रेमाबद्दल बोललो होतो. मल्हार कुलकर्णी हे पाणिनीय व्याकरणातील एक गाढे अभ्यासक, अधिकारी व्यक्ती मानले जातात. त्यांनी पारंपरिक व आधुनिक अशा दोन्ही पद्धतींनी संस्कृत शिकले आहे. स्वप्नील आणि मल्हार यांच्या एकत्र मार्गदर्शनाखाली अनुप्रिया अग्रवाल या विद्यार्थिनीने ‘पाणिनीय व्याकरणातील गणिती फलने’ (Mathematical Functions in Paninian Grammar) या शीर्षकाचा प्रबंध लिहिला. त्यात णिच्‌, तुमुन्‌, सन्‌ आणि यङ्‌, या चार प्रत्ययांची गणिती मांडणी करून दाखवली आहे. तो पीएच.डी. या पदवीसाठी 2021च्या मे महिन्यात मान्यही झाला. स्वप्नीलच्या आग्रहामुळे अनुप्रियाच्या लिखाणाला नेमकेपणा आला होता. तिला फापटपसारा, पाल्हाळ टाळता आला. संस्कृतचे व्याकरण गणिती पद्धतीने मांडण्याची ही फक्त सुरुवात होती, मोठा प्रकल्प अजून बाकी आहे.        

ऑफिसहून संध्याकाळी घरी परतल्यावर विरंगुळा म्हणून स्वप्नील बासरी वाजवतो. लहानपणी तो उभी बासरी गमतीने वाजवायचा. त्याच्या पत्नीने, शिवांगीने, त्याला आडवी बासरी शिकायचा आग्रह केला. सुरुवातीला त्याला बासरीची फुंकही येत नव्हती. पण चिकाटीने प्रयत्न करून त्याने ती आत्मसात केली, अगदी परिपूर्णपणे. नंतर बासरीवादनाच्या एका पुस्तकाच्या आधारे आणि आपल्या सर्जनशीलतेच्या जोरावर तो सुरेल बासरी वाजवू लागला, स्वतःचा गुरू स्वतःच बनून. गीतरामायणातील गाण्यांना सुधीर फडक्यांनी दिलेल्या चाली बासरीवर वाजवायला सोप्या नाहीत. पण तीही गाणी आता स्वप्नील वाजवू शकतो. संस्कृत व्याकरणाचा गाभा काय किंवा संगीताच्या तालासुरांच्या चमत्कृती काय, दोन्ही ठिकाणी स्वप्नीलला गणितच दिसते. बासरी वाजवणे हा स्वप्नीलकरता फक्त विरंगुळा नाही, तर ते त्याच्या कलासक्तीचे द्योतक आहे. गणिताबरोबरच अभिजात साहित्य व संगीत या कलांचाही तो उपासक आहे.

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) म्हणून आमच्या संस्थेमध्ये प्रवेश झाल्यावर सहयोगी प्राध्यापक या पदोन्नतीसाठी प्रत्येक विभाग काही निकष ठरवतो, जसे अमुक इतके शोधनिबंध प्रकाशित केले पाहिजेत किंवा अमुक इतक्या विद्यार्थ्यांना पीएच.डी.चे मार्गदर्शन केले पाहिजे वगैरे. स्वप्नीलने अशा कृत्रिम निकषांची कधीच पर्वा केली नाही. स्वत: ठरवलेल्या पद्धतीनेच त्याने आपले मार्गक्रमण चालू ठेवले. त्याच्या मते लहान-मोठे,

अर्धे-कच्चे शोधनिबंध लिहिणे हा सगळ्यांच्याच शक्तीचा व वेळेचा अपव्यय आहे. त्यापेक्षा सखोल विचारांती, सुसंबद्ध आणि विस्तृत लिखाण करून पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले तर ते जास्त टिकाऊ ठरते, अधिक संशोधनाला चालना देते. स्वप्नील अशा प्रकारची पुस्तके लिहिणेच सयुक्तिक मानतो. ज्याच्याबरोबर स्वप्नीलने संशोधन केले आहे त्याने फार हट्ट धरला तर क्वचितच स्वप्नील त्या शोधनिबंधाचा सहलेखक होणे मान्य करतो. आय.आय.टी.च्या गणित विभागाच्या प्रमुखाने सुचवल्यावरून स्वप्नीलने सहयोगी प्राध्यापकाच्या पदासाठी अर्ज केला. स्वप्नीलबद्दल आलेल्या जगभरातील ज्येष्ठ प्राध्यापकांच्या शिफारसपत्रांमध्ये लिहिले होते की स्वप्नीलने लिहिलेल्या पुस्तकांतील संशोधन सर्वोच्च प्रतीच्या संशोधन पत्रिकांतील दहा ते पंधरा शोधनिबंधांच्या तोडीचे आहे. मग नेहमीचे निकष बाजूला ठेवून स्वप्नीलला मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. मुलाखतीपूर्वी आपण केलेल्या कामावर त्याला एक सेमिनार द्यायचा होता. त्यासाठी त्याने जुजबीच तयारी केली. मी स्वप्नीलला म्हटले की, जरा रंगीत तालीम करून बघ ना माझ्यासमोर. त्याने नुसती मान हलवून नकार दिला. त्याच्यापेक्षा मलाच विवंचना लागली होती त्याचा सेमिनार नीट होण्याची! 2011 मध्ये स्वप्नीलला पदोन्नती मिळाली, पण त्याच्या दृष्टीने ती क्षुल्लक बाब होती. याच्या पुढच्या पदोन्नतीसाठी स्वप्नीलने आजतागायत अर्ज केला नाही. इतका तो अशा गोष्टींपासून अलिप्त झाला आहे आता.

गणिताला जीवनात सर्वोच्च स्थान दिल्यावर दैनंदिन व्यवहारांसाठी नोकरी पत्करणे ही स्वप्नीलच्या दृष्टीने एक तडजोडच आहे. स्वप्नीलचे भाग्य एवढेच आहे की कुठले संशोधन करायचे ते तो स्वतः ठरवू शकतो; तसेच जर शिकवण्याबाबत झाले असते, तर सोन्याहून पिवळे झाले असते. जेव्हा गणितातील एखाद्या गोष्टीचा त्याला शोध लागतो, त्या क्षणी त्याला असे वाटते तो गणिताने केलेला त्याचा सन्मान आहे, त्याचे बुद्धिनिष्ठ प्रयत्न पाहून. तो शोध त्यालाच का लागावा याचे उत्तर म्हणजे गणित ही एक शक्ती आहे, ती ठरवते तिच्याजवळचे कोणते रत्न कुणाला व केव्हा द्यायचे. त्याला आपल्या पत्नीला सांगावेसे वाटते की मी इतके सातत्याने काम करत असूनसुद्धा लौकिकदृष्ट्या आपली प्रगती दिसत नाही याबद्दल दुःखीकष्टी होऊ नकोस. पण ही वेळ येतच नाही. शिवांगी स्वप्नीलला पूर्ण ओळखून आहे. स्वप्नीलही म्हणतो की तिच्यासारखी बायको शोधशोध शोधूनही सापडली नसती. स्वप्नीलची आई तर त्याचे दैवत आहे. तिनेच त्याला घडवले, त्याच्यावर योग्य संस्कार केले. अगदी लहानपणापासून त्याची गणितातली आवड ओळखून ती जोपासण्यासाठी जे जे करता येईल ते सर्व केले; आज पंचाहत्तराव्या वर्षी तसूभरही काही करायचे ती ठेवत नाही. कुठल्याही पारितोषिकाची हाव न ठेवण्याचे बाळकडू स्वप्नीलला त्याच्या आईकडूनच मिळाले आहे.

तर हे असे आहेत माझे दोन गणितवेडे मित्र, शरद आणि स्वप्नील. पैसा आणि मानमरातब यांच्यापासून ते लांब राहिले. शरद पैसे मिळवण्यासाठी अमेरिकेला गेला खरा, पण त्यात वाहून न जाता ठरल्याप्रमाणे योग्य वेळी तो थांबला. स्वप्नीलला अमेरिकेतील ऐश्वर्याचा मोह पडला नाही. शरद विद्यापीठीय व्यवस्थेतून बाहेर पडला, पण गणिताचा ध्यास त्याने सोडला नाही, कित्येक होतकरू विद्यार्थ्यांना त्याने गणितातले मर्म समजावून दिले आणि मूलभूत संशोधनासाठी तयार केले. स्वप्नील सुरुवातीला प्रस्थापित व्यवस्थेचा भाग बनून गणिताचे अध्ययन-अध्यापन करीत राहिला, अगदी निरिच्छ वृत्तीने; नंतर मात्र त्याच्या संस्थेप्रति असलेल्या निष्ठेला व्यवहाराचे रूप आले, म्हणजे तो संस्थेकडून पगार घेतो आणि संस्थेच्या अपेक्षेप्रमाणे शिकवतो व संशोधन करतो, बस्स. दोघांची निष्ठा फक्त गणिताप्रति आहे. दोघेही गीतेतील ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ म्हणजे ‘कर्म करत राहणे हाच तुझा अधिकार आहे, फलाची कधीही चिंता बाळगू नकोस’ ही शिकवण तंतोतंत आचरणात आणत राहिले.

शरद माझ्यापेक्षा सात वर्षांनी लहान आहे आणि स्वप्नील तीस वर्षांनी. पण मित्रत्वाला वयाची पर्वा नसते. मी या दोघांबद्दल काही लिहिणे त्यांना बिलकूल आवडणार नाही हे मी जाणून आहे. पण मी त्यांच्याबरोबर जे पाहिले, ऐकले, अनुभवले ते इतरांना थोडेतरी वाटून द्यावे या हेतूने हा खटाटोप केला आहे. माझ्या अनुभवांना त्या त्या स्थलकालांचे संदर्भ देणे जरूर होते. पण शरद व स्वप्नील यांची सहज मिळण्यासारखी माहिती इतकी तुटपुंजी आहे की असे संदर्भ मला लपूनछपूनच मिळवावे लागले. कोणी व्यक्ती इतिहासजमा झाली की तिची महती गाण्याचा रिवाज आहे. पण त्यापेक्षा ती व्यक्ती हयात असताना, चालती बोलती असताना आजूबाजूच्या लोकांनी तिची कदर करणे आणि तिच्यापासून प्रेरणा घेणे जास्त सयुक्तिक नाही का? आपले आयुष्य सुरळीत चालू राहण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी शरद आणि स्वप्नील करत आले, पण अन्यथा त्यांनी आपले तन आणि मन गणितावर ओवाळून टाकले. गणितप्रेमाची तीव्रता मोजण्याचे यंत्र कोणी शोधून काढलेच आणि माझ्या गणितप्रेमाची तीव्रता दहा अंश निघाली, तर या दोघांचीही तीव्रता किमान शंभर अंश तरी नक्कीच निघेल! 

Tags: संस्कृत स्वप्नील महाजन शरद कानेटकर बालमोहन लिमये गणित weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

बालमोहन लिमये
balmohan.limaye@gmail.com


Comments

  1. Shrisiddha Dhavale- 24 Nov 2021

    अत्यंत प्रेरणादायी लिहिलं आहे तुम्ही! असे आधुनिक काळातले ऋषी आपल्या समाजात असतात आणि आपल्याला याची कल्पनाही नसते. गीतेतल्या 'अमानित्व' ह्या गुणाची हटकून आठवण झाली!

    save

  1. Ranga Joshi- 24 Nov 2021

    खूपच वाचनीय लेख .....सुंदर

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके