डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘कवितेचा रस्ता’या बीजभाषणाविषयी

‘कविता’ या वाङ्‌मय प्रकाराला केंद्र मानून, पणजी (गोवा) येथे झालेल्या साधना साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाच्या सत्रात, वसंत आबाजी डहाके यांनी ‘बीजभाषण’ केले. बीजभाषणावर चर्चा करणारे एकसत्रही त्या संमेलनात झाले. पुणे विद्यापीठात मराठी विभागात एम.फिल. करीत असलेल्या विद्यार्थिनीची त्या भाषणावरील ही एक प्रतिक्रिया...

19 डिसेंबर 2009च्या ‘साधना’ अंकातील वसंत आबाजी डहाके यांचे साधना साहित्यसंमेलनातील ‘बीजभाषण’ (कवितेचा रस्ता) वाचले. या संपूर्ण भाषणाचा समग्रपणे विचार करता असे लक्षात येते, की जरी यांची सुरुवात कवितेच्या आतल्या वाटेच्या विशदीकरणाने झालेली असली, तरी या सूत्राची आवर्तने संपूर्ण भाषणभर पसरत नाहीत. उलट पहिल्या एक-दोन परिच्छेदांनंतर भाषण अधिकाधिक अवयवनिष्ठ होऊन अखेरीस घोषवाक्याकडे वाटचाल करते. त्यामुळे यातून कवितेबाबत नवे काही हाती लागत नाही व संपूर्ण लेखाचे स्वरूप उत्तरोत्तर अधिकाधिक माहितीपर बनत जाते. खरे पाहता, लेखातील कवितेबाबतची अवयवनिष्ठता गृहीत धरूनही ‘आतली वाट’ या सूत्रापर्यत पोहोचणे शक्य झाले असते; मात्र तसे होत नाही. आतल्या वाटेचे सूत्र मध्येच बाजूला पडते. त्यामुळे जेथे कवितेचे बीज/चैतन्य/आत्मा सामावलेला असतो, त्याबाबत सुरुवातीला निर्माण झालेली उत्सुकता अखेरपर्यंत तरंगतच राहते. त्यामुळे संपूर्ण वर्णन कृत्रिम होते व त्याला विधानात्मकता येत नाही.

आतल्या वाटेची जगण्याशी जी उलथापालथ घडते, तेथे कविता अस्तित्वात येते आणि त्या अस्तित्वाच्या अविभाज्य फांद्यांमधून लय, नाद, मिती इत्यादी घटक उत्पन्न होतात. त्यामुळे आतली वाट आणि जगणे यांची एकमेकांशी भिडतानाची प्रक्रिया सांगणे, म्हणजे कवितेच्या रस्त्याविषयी काही सांगणे अथवा विधान करणे ठरले असते; परंतु मुळात जेथे जगण्यातील प्रत्यक्ष क्षणातून पिंजून निघणेच येत नाही. त्यामुळे एकूण कवितेचे घडणे, अर्थात तिच्या जन्माच्या शक्यताच प्रस्थापित होत नाहीत. त्यामुळे काळ, त्यातील कवी, त्यांची कविता, लय, नाद, वास्तव, मिती या सर्वांचे वितरण हा कवितेच्या अवयवांकित अंगाबद्दल घेतलेला आढावा ठरतो. मुळात, या सर्व घटकांमधून ‘कवितापणा’बद्दल काहीच पुढे न आल्याने हा आढावा ‘सार्थ’ ठरत नाही. वेगवेगळ्या प्रवाहांच्या खाली वाहणारे ‘कवितापण’ न पकडल्याने या घटकांच्या नोंदी विस्कळीत ठरतात.

मुळात, प्रश्नांना भिडणाऱ्या प्रवृत्ती या भाषणात असल्या, तरी प्रश्नांना भिडण्याच्या कोणत्या सामाईक प्रवृत्तीतून कविता सिद्ध होते, या बाबत काहीच विशद केले जात नाही. थोडक्यात, प्रश्नांना भिडण्याच्या ‘कविता’ या प्रवृत्तीबाबतचे उर्ध्वपतन या लेखात नाही. प्रातिनिधिक स्वरूपात तटस्थ आणि सहृदयतेने संपूर्ण कवितेचा/कवितेच्या रस्त्याचा घेतलेला हा शोध नाही; तर अनेक ठिकाणी कवितेचा कैवार घेऊन केलेले हे लेखन आहे, असे आढळते. त्यामुळे दिलेल्या नोंदी जरी ‘कविता’ या वाङ्‌मय प्रकाराचा विचार करता समर्पक असल्या, तरी त्यातून कवितेचा स्थायी भाव आणि तिची म्हणून असणारी स्वतंत्र क्षमता सिद्ध होत नाही. त्यामुळे कवितेबाबत एक प्रकारची गोंजारलेपणाची भावना भाषणातून प्रतीत होत राहते. परिणामी, संवेदनशीलता व हळुवारपणा यांतून तिला प्राप्त झालेली बारीक धार बोथट होते.

मुळात, जगणे केंद्रस्थानी ठेवून त्याला शोधता-शोधता सापडलेला एक मार्ग म्हणून कवितेचे निश्चित आकलन समोर येत नाही; तर बऱ्याच ठिकाणी कविता हा एक निश्चित आकार, निश्चित प्रवृत्ती मानून केलेले आकलन पुढे येते. त्यामुळे कविता या प्रवृत्तीचा शोध अखंड राहत नाही. मानण्याने त्यातील गतिमानता व ओघ संपुष्टात येतो. अनेक ठिकाणी कविता गृहीत धरून जगणे सिद्ध होते. जगण्याच्या विच्छेदनातून कवितेचे कवितापण, तिचा आकार सिद्ध होत नाही. परिणामत: तिचे जिवंत असलेले ऊर्जारूप समोर न येता, ती केवळ ‘ऐतिहासिक सांगाडा’ म्हणून पुढे येते. खरे पाहता, जगण्याच्या बिघडणाऱ्या चयापचयातून स्वत:ला मोडून निरनिराळ्या ऊर्जा स्वरूपात कविता सिद्ध होत राहते. मात्र प्रस्तुत लेखात जगण्याचे बिघडलेपणच ‘अधोरेखित’ न झाल्याने कविता अधिकाधिक पार्थिव रूप धारण करते. उदाहरणार्थ, विभाग तीन मधील एकसलग दिलेल्या कवितांची उदाहरणे ही भाषणाच्या संपूर्ण रचनेमुळे निव्वळ आकृतिबंधातील विविधतेची उदाहरणे म्हणून प्रस्थापित होतात. मात्र एकूण जगण्याशी, त्यातील बदललेल्या आकृतिबंधाशी, गतीशी, मितीशी त्यांचा संबंध जोडून घेता आलेला चर्चा-मंथन नाही. परिणामी, हे विश्लेषण कवितेच्या आतल्या वाटांपर्यंत पोहोचतच नाही. तर ते निव्वळ कवितानिष्ठ अर्थाचे विश्लेषण करत राहते. जीवननिष्ठ कवितेची सिद्धता त्यातून होत नाही. त्यामुळे कवितेच्या वैविध्यपूर्ण उदाहरणांतूनही कविता हे एक सामाईक, संपृक्त तत्त्व म्हणून पुढे येत नाही. त्यामुळे ही संपूर्ण रचना प्रकारनिष्ठ व अधिकाधिक उर्जा विभाजित ठरते. मात्र उर्जेच्या मूळ स्रोतांबाबत, या प्रकारनिष्ठतेच्या खाली वाहणाऱ्या सामाईक, सर्वसमावेशक आणि कवितेच्या बीजतत्त्वाबद्दल हे विश्लेषण कोणतेही विधान करत नाही. त्यामुळे कवितेचे सर्वसाधारण स्वरूप लक्षात येऊनही तिच्या निर्मितीच्या शक्यतांच्या जागा अनुत्तरित राहतात.

या संपूर्ण भाषणाचा विचार करता, सतत कवितेच्या असामान्यत्वाचा सूर केंद्रभागी असल्याचे जाणवते. हे असामान्यत्व संपूर्ण लेखावर सतत प्रभाव टाकत राहते. मग असा प्रश्न उपस्थित होतो, की कवितेची वाट ही रूढ पठडीतीलच वाट आहे का? तिच्यातील असामान्यत्व नाकारल्यास रूढ पद्धतीने ती कविता म्हणून उभी राहील का? याचे उत्तर ‘नाही’ असेच असेल; परंतु असामान्यत्व अधोरेखित करताना ती अधिकाधिक नैसर्गिक होत सामान्यत्व कवेत घेते, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. सामान्यत्वाचा स्वच्छ आणि सामाईक उद्‌गार तिच्यात एकवटलेला असतो. सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याच्या पातळीवरून स्वत:ला सोलत ती अधिकाधिक टोकदार (असामान्य) बनत जाते.  सामान्य माणसाची शक्ती, त्याच्या पापभीरूते मागच्या इच्छा आणि त्याची अगतिकता यांच्या करुणेचा टोकदार, अचूक आणि सामाईक उच्चार म्हणून झालेला कवितेचा विचार या भाषणात आढळत नाही, तर संवेदनशीलतेच्या कवचाखाली ती अधिकाधिक कमकुवत स्वरूपात नजरेस येते; जे खरे पाहता असामान्यत्वापेक्षा सामान्यपणाचेच लक्षण अधिक आहे. कारण यातून कवितेची प्रतिमा हळवेपणापेक्षा रडवेपणाकडे अधिक झुकते व तीव्र वेदनेतून येणाऱ्या बदलाच्या शक्यतांपासून कविता दूर पळू लागते, जे खरे पाहता तिचे प्राणतत्त्व आहे. जेव्हा ती या प्राणतत्त्वांसकट येते, तेव्हाच ती आतल्या नव्या वाटा व त्या मागची कारणे वेदनेसकट शोधू धजते. त्यामुळे सामान्य तत्वाच्या धर्तीवरच तिचे असामान्यत्व सिद्ध होते; किंबहुना या धर्तीवर सिद्ध होण्यातच तिचे कवितापण सामावलेले आहे. स्वत:च्या असामान्यत्वाला परखडपणे भिडून, त्यात सोलवटून निघण्यातच कविता शक्य पावते. उलट स्वत:चे असामान्यत्व मान्य केल्याने स्वत:ची घुसमट होण्याच्या, वास्तव आत घेऊन पिळवटून निघण्याच्या आणि त्यामुळे घडण्याबद्दल सतत अद्ययावत राहण्याच्या तिच्या शक्यता निकालात निघतात व यामध्ये तिचे कवितापण खलास होते. ती एक स्पष्ट, कृत्रिम आणि अधिकाधिक सहानुभूती अनुकूल रचना होऊन बसते. स्वत:ला प्रतिनिधी मानून दुसऱ्याच्या ठिकाणी ठेवण्यातून उत्पन्न होणारी संवेदनशीलता हरवून ती कोती होते; शोधापासून परावृत्त होते. या अर्थी सामान्यपण मान्य करून घेतलेला आतल्या वाटेचा शोध म्हणून कवितेचे विश्लेषण न येता एक ‘मानलेली मानसिकता’ म्हणून येणारा तिचा स्वर सतत जाणवत राहतो. त्यामुळे काळ, लय,नाद, शब्द, प्रतिमा यांचाही संबंध तिच्या चैतन्य निष्ठेशी प्रस्थापित न होता, हे दुवेही घटक निष्ठता दर्शवितात. त्यामुळे तिचे विश्लेषण विज्ञाननिष्ठ न होता अधिकाधिक तंत्रनिष्ठ होते,जे कवितेच्या स्वभावास/कवितापणास बाधक ठरते.

तसेच संपूर्ण लेखभर येणाऱ्या कवितेसंदर्भातील ‘मी’चा स्वर अखेरपर्यंत परखड, स्पष्ट आणि खणखणीत येत नाही. उलट सर्वसमावेशकतेच्या धोरणाखाली तो अधिकाधिक तडजोडनिष्ठ आणि संहितानिष्ठ होताना दिसतो. सर्वसमावेशकतेत अनुस्यूत असणाऱ्या तटस्थ नकारात कवितेचे निरागसपण लख्ख होते. मात्र या निरागसतेत वास्तवाच्या स्पष्ट आणि सहानुभावी आकलनाचा समावेश होतो. मात्र लेखात जेथे जेथे नकाराची नोंद आढळते, तेथे तेथे सांगण्याचा सूर सहानुभूतीमुक्त व कौतुकमिश्रित जाणवतो. त्यामुळे त्या नोंदींना एक प्रकारचा कनवाळूपणा प्राप्त होऊन त्यातील निरपेक्ष भूमिकानिष्ठता हरपते. त्यामुळे कविता या थेट आणि पातळस्वराला एक प्रकारचा फुगवटा व पोकळ स्वरूप प्राप्त होऊन तिच्यातील बोचरेपणा हरवतो व ती बद्द होते. संपूर्ण कवितेसंदर्भातील ‘मी’चा स्वर भाषणासोबत चढत जाणारी गतिमानता हरवून बसतो, ही या नोंदीची महत्त्वाची मर्यादा मानावी लागेल.

भाषणाच्या अखेरच्या भागात दिलेली कवितेची उपयुक्तता सांगणे, हे एक प्रकारे कवितेला ओढून-ताणून जगवण्यासाठी तिचे केलेले ‘मार्केटिंग’ वाटते. जेथे गुंतागुंत असेल, तेथे माती आहे, तोवर कविता खदखदेलच. ती प्रचारावर जगणारी मानसिकता नाही. उलटपक्षी अशा पद्धतीने केलेली नोंद म्हणजे स्वत:चे जगणे दुभंगत जाण्याने कवितेची झालेली दिशाभूल आहे. ‘कविता लिहिण्याची हीच खरी वेळ आहे’ असे सांगणे, हे कवितेला राबवणे तर आहेच; पण कविता हा स्वभाव हरपत गेल्याचे ते एक महत्त्वाचे लक्षणही आहे. तिचे ‘माध्यम’ स्वरूप हरवत जाऊन तिला साधनत्व प्राप्त होत असल्याच्या या महत्त्वाच्या खुणा आहेत. त्यामुळेच भाषणाच्या अखेरी ती घट्ट संवेदनशीलतेपेक्षा ‘मेलोड्रॅमॅटिक प्रोलॉग’ म्हणून अधिक प्रस्थापित होताना दिसते.

थोडक्यात, कविता या मानसिकतेचा घेतलेला हा शोध नसून एक व्यवस्था म्हणून केलेल्या आकलनाच्या स्वरूपात ती आपल्यासमोर येते; त्यामुळे एकूण शीर्षकाच्या आणि सांगण्याच्या मूळ उद्देशापर्यंत ती पोहोचू शकत नाही.

Tags: मेलोड्रामाटिक प्रोलॉग कवितेचा रस्ता कवितेचे मार्केटिंग प्रतिक्रिया बीजभाषण कविता साधना साहित्य संमेलन वसंत आबाजी डहाके chairperson speech Vasant Abaji Dahake Sadhna Sahitya Sammelan Medium Of poetry Thoughts of poetry Marketing Speech Poetry Criticism of Speech Article Bhagyashree Bhagwat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके