डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘हिंदू’ कादंबरीच्या हिंदी अनुवादाचे पुस्तक राजकमल प्रकाशन, नवी दिल्ली यांनी प्रकाशित केले आहे. त्या प्रकाशनसमारंभात भालचंद्र नेमाडे यांनी 28 फेब्रुवारी 2015 रोजी केलेले भाषण.

माझ्या एका सिंधी मित्राने आपली ओळख करून देताना आपणा सर्वांना एक मानदंड घालून दिला आहे. तो म्हणाला, ‘‘मागील साठ वर्षांपासून मी पाकिस्तानी होतो, त्याआधी जवळजवळ दोनशे वर्षे मी भारतीय होतो; परंतु मागील पाच हजार वर्षांपासून मी सिंधी आहे.’’

मित्रांनो, भारतीय उपखंडातील प्रत्येक व्यक्तीची ओळख अशी बहुआयामी पद्धतीने होते, ज्यावर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. धर्म, भाषा, राष्ट्र बदलत जातात. राजनैतिक मानचिन्हं तर एका शतकात तीन-चार वेळा बनवावी लागतात, तरीही आपली भूमी तीच राहते. देश तोच राहतो. राष्ट्रीयत्व तर कल्पनाविलासाचा एक अदृश्य हिस्सा आहे. पंचतंत्रातील कथा आपल्या देशात कमीत कमी पाच हजार वर्षांपासून घराघरांत ऐकवल्या जातात. आपले विचार, कल्पना आणि संगीतादी कलांवर आपल्या भूमीचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे पुराणकाळापासून आपल्या देशाबाबत आपलेपणाने ‘मातृभूमी’ या शब्दाचा प्रयोग करत आलो आहोत.

माता भूमि: पुत्रोहं पृथि व्या: (ऋग्वेद संहिता 12.1.12). युरोप किंवा अन्य देशांमध्ये ‘फादरलँड’असे संबोधले जाते, याउलट आपल्याकडे ‘मदरलँड’ म्हणतात. यामध्ये हजारो वर्षांपासून विकसित होत असलेल्या आपल्या संस्कृतीचे संदर्भ आहेत. यालाच मी देशीयता म्हणतो, जी प्रत्येक शब्दातून प्रकट होते. कोणती रचना, कोणत्या जागी आणि कोणत्या काळात निर्माण झाली आहे, हेसुद्धा तंतोतंत सांगता येते. आम्ही भारतीय कधी काळी मातृसत्ताक होतो, याचाच हा एक भाग आहे.

‘हिंदू’ कादंबरीच्या पहिल्या खंडाचे शीर्षक ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ असे आहे. ‘अडगळ’ घरातील एक असा भाग आहे की, जो दिवसेंदिवस जमा होत जातो. आजही वापरात नसलेल्या अनेक वस्तू आपण येथे फेकून देतो. आजोबांची काठी असो, आजीची पेटी असो, नाही तर बहिणीची लहानपणीची बाहुली, भावाचा बॉल असो. या सगळ्या नको असलेल्या वस्तू वापरात नाहीत, म्हणून आपण फेकून देत नाही. आधुनिक व्यक्तीवादी महानगरीय विभक्त कुटुंबपद्धतीत जे ‘कालबाह्य’ आहे, ते फेकून देण्याची प्रवृत्ती स्वत:ला प्रगतिवादी समजण्याची खूण समजली जाऊ शकते. याच संस्कृतीत आजोबा आणि आजीलाही फेकून देणे, हे प्रगतीचे लक्षण समजले जाऊ शकते. एवढेच नाही, तर लग्न झाल्या-झाल्या आई-वडिलांना फेकून देण्याचे लक्षण याच संस्कृतीचा एक भाग आहे. परंतु अडगळ का असेना; परंपरेने आलेल्या मूल्यांच्या रूपामध्ये तिला सांभाळून ठेवणे- मग ती कितीही जुनी का असेना- ती कुठे तरी अंधाऱ्या तळघरात किंवा एखाद्या माळ्यावर, जिथे जागा मिळेल तिथे सांभाळून ठेवणे ही सिंधू संस्कृती आधीपासून आपली परंपरा आहे.

आपल्या संस्कृतीत सर्व काही आपले होऊन जाते. म्हणूनच सर्व काही जपून ठेवले जाते. मुंडा, तिबेटोबर्मन, आदिवासी, नागा, द्रविडी, आर्य, ग्रीक, शक, हूण, तुर्की, अरबी, मुगल आणि शेवटी पोर्तुगीज म्हणजेच अँग्लो-इंडियनपर्यंतची सगळी अडगळ आपण मोठ्या प्रेमाने आपल्या तळघरात जपून ठेवली आहे. हे मानवी समाजात हिंदू संस्कृतीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. अजूनही देशभरातील गावागावांत अनेक प्रकारच्या जीवनपद्धती, मूल्य, आचार-विचार, खाणं-पिणं, पेहरावाच्या विभिन्न पद्धती, रीती-रिवाज, भाषा, संप्रदाय, वांशिक प्रथा, लोकसाहित्य, लोकसंगीत जिवंत आहे. यामुळेच ‘हिंदू’ हा शब्दसुद्धा अनेकदा अनेकवचनी वापरला जातो.

अशा या बहुआयामी ‘हिंदू’ शब्दाला पारतंत्र्यानंतर संकुचित अर्थ प्राप्त झाला. त्यामुळेच भारतीयत्व आणि हिंदू हे दोन्ही विचार परस्परविरोधी व्यक्त होत आहेत, याचे मला खूप दु:ख होत आहे. खरे तर या दोन्ही संकल्पना परस्परांच्या अर्थकक्षांना व्यक्त करतात. भारतीय उपखंडासाठी हिंदुस्थान हा शब्द मुसलमानांसहित सर्व जण वापरत आले आहेत आणि तेच सर्वाधिक सार्थ आहे. भारतीय संविधानात इंग्रजीमध्ये ‘इंडिया’ या शब्दाचा प्रयोग केला आहे. या उपखंडासाठी मेलुहा, भारतवर्ष, आर्यदेश, जम्बुद्वीप, हिमवर्ष, हैमवत, सनातन अशा अनेक कमी-अधिक व्याप्तीच्या आधारावर नावे दिली; मात्र ती सर्वसंमत झाली नाहीत. थोड्याशा ध्वनिपरिवर्तनातून ‘हिंद’ (पश्चिम आणि मध्य आशिया), इंटू (चीन), इंडो (युरोप) यांसारखे शब्द या खंडाशी संबंधित भूभाग आणि स्वायत्त संस्कृतीसाठी वापरले  जातात.

आता ‘हिंदू’ आणि ‘भारत’ या दोन्ही संकल्पना परस्परांना पूरक अर्थ व्यक्त करत आल्या आहेत. ‘हिंदू’ प्राचीन सांस्कृतिक परंपरेसाठी आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या 66 वर्षांसाठीचा एक भाग आहे. जागतिक साहित्यात प्रमुख चार परंपरा आहेत. यामध्ये पश्चिमी : 1. युरो-अमेरिकन, 2. भूमध्य समुद्रीय : उत्तर आफ्रिकी, 3. चिनी : पूर्व आशियाई आणि 4. हिंदू : भारतीय दक्षिण आशियाई. या सगळ्यात सर्वांत समृद्ध आणि सगळ्यात प्राचीन परंपरा कोणती आहे? ‘हिंदू’ परंपरा आपली आहे. तरीही संख्यात्मकता, मूल्यात्मकता आणि बहुविविधतेसारख्या वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारावर पडताळून पाहिले, तर आपल्याला अभिमान वाटेल की, एका प्रदीर्घ काळावर आपला प्रभाव टाकणारी, व्यापून टाकणारी तसेच सर्व कला आणि साहित्य प्रकारांमध्येम्हणजे महाकाव्यापासून कथेपर्यंत- ही व्यापकता दिसते. मार्क ट्‌वेनच्या भाषेत सांगायचे झाले तर, हिंदू परंपरा सगळ्या परंपरांची आजी आहे.

 इंग्रजांनी ‘रिलिजन’सारख्या एकसूत्री संकुचित शब्दात हिंदू परंपरेच्या भू-सांस्कृतिक संदर्भाला संकुचित करून/ परिवर्तित करून आपले भाषिक वर्चस्व सिद्ध केले. सप्तसिंधू अफगाणिस्तान ते वर्तमान उपखंडातील सगळ्या राष्ट्रांचा असंख्य मानवी समुदाय हिंदू परंपरेला विकसित करत आला आहे. आज ती जगातील एक विशाल बहुव्यवस्थेच्या रूपाने स्वीकृत झाली आहे. याच्या महाव्यवस्था, व्यवस्था आणि उपव्यवस्थेचे स्तर कधी एक-दुसऱ्याच्या आधाराने, तर कधी परस्परांच्या स्वायत्ततेचे रक्षण करत, कधी विरोध तर कधी सहकार्य करत आणि कधी कॅटेलिस्ट बनून पसरत गेल्या आहेत. या अतिप्राचीन समृद्ध संस्कृतीचा एक साक्षीदार आणि लेखक म्हणून मला उत्सुकता आहे की, हे स्तर एक- दुसऱ्याला नष्ट करण्यास अनुकूल असतानाही परस्पर विकसित होत पाच हजार वर्षे कसे काय जिवंत राहिले!

के.एस.सिंह यांनी 2004 मध्ये केलेल्या आपल्या सर्वेक्षणात केवळ भारतातील 4700 स्वतंत्र जाती आणि जमाती शोधून या क्षेत्रातील विविधता सिद्ध केली आहे. हार्वर्ड विद्यापीठाचे डेव्हिड रेइच आणि अन्य चार आंतरशाखीय वैज्ञानिकांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व प्रदेशांमध्ये पसरलेल्या जाती-जमाती आणि आदिवासींचे भटके तांडे, भटक्या जमातींच्या रक्तवर्गांचे संशोधन केले. युरोपमध्येसुद्धा शक्य नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीवशास्त्रीय विविधतेचे संकर प्रजनन हिंदू परंपरेच्या सर्वसमावेशक आणि सहिष्णुतेला सिद्ध करत आले आहेत. सांस्कृतिक उत्क्रांतीचा अभ्यास करणाऱ्या पुढच्या पिढीसाठी या उपखंडातील अद्वितीय सांस्कृतिक गुणसूत्रांचा अभ्यास करणे बंधनकारक असेल. मातृसत्ता, जातिव्यवस्था, ग्रामसत्ता, अहिंसा, शाकाहार, कुटुंबव्यवस्था, विविधतेसारख्या किती तरी कथासूत्रांवर हे संशोधन होऊ शकते.

‘हिंदू’च्या माध्यमातून मी एवढेच सिद्ध करू इच्छित आहे की, योगायोगानेच आपण या संस्कृतीचा भाग बनलो आहोत. ही संस्कृती, आपल्या देशाची विविधता, भाषा, रीती-रिवाज, मूल्ये, धर्म, संस्कार यांचा समृद्ध परीघ कसा तयार झाला, या व्यवस्थेच्या मागे काय स्ट्रक्चर/ बांधणी आहे, कोणते सिद्धांत आहेत, हे माहीत करून घेणे आपले कर्तव्य आहे. याचे मूळ शोधण्यासाठी आपल्याला भूतकाळात जावे लागेल. यामुळेच ‘हिंदू’ कादंबरीत मोहंजोदडोच्या काळातील इसपूर्व 3000 च्या पूर्वीची प्रसंग-योजना केली आहे. हे भूतकाळातील महानगरीय लोकनायक कोडवर्ड सांगितल्याशिवाय आत येऊ शकत नव्हते. त्या नायकाप्रमाणेच आपलासुद्धा एक कोडवर्ड आहे, ‘बहुवचन भूतकाळ’.

हा बहुवचन भूतकाळ आपल्या लक्षात आला की, आम्हाला आपली संस्कृती समजायला कोणतीही अडचण येणार नाही. बहुवचन भूतकाळ म्हणजे आपली ही जी काही विविधता आहे, ती सगळीच्या सगळी बहुवचनी आहे. एकवचन आपल्याकडे नाहीच. आपल्याकडे अनेक जाती, अनेक जमाती, अनेक नाती, कित्येक प्रकारची पिके, जेवणखाणं आहे. आपण तर गाय, बैल, डुक्कर, मोर, बकरे आणि एवढंच कशाला कुत्र्यांचे मांसपण खाद्य म्हणून वापरतो. ही संस्कृती बहुवचनी आहे. कपड्यांच्या बाबतीत अनेक पद्धती आहेत. पूर्ण नागडे राहण्यापासून सूट घालण्यापर्यंत अनेक प्रकारचे लोक आपल्याकडे आहेत. एकवचन कधीच नाही. भाषा आणि धर्माच्या बाबतीतही एकवचन नाही.

यामुळेच आजकाल जो सांस्कृतिक कट्टरतावाद वाढत चालला आहे, तो एकवचनी आहे. आपल्याकडे हिंदू आणि मुसलमान अशी फाळणी झाली आहे, ती या पळपुट्या जहाल एकवचनातून निर्माण झाली आहे. समजा- आपण बहुवचनी बनलो असतो, तर ही फाळणी झाली नसती. कारण बहुवचनातूनच ‘सर्व लोक आपले आणि आपण त्यांचे’ ही भावना वाढीला लागते. काबुल- अफगाणिस्तानपासून ते तमिळनाडू आणि आसामपर्यंतच्या आपल्या या उपमहाद्वीपापर्यंत ही बहुआयामी संस्कृती पसरली आहे; परंतु ती विसरल्याने आपले भीषण नुकसान झाले आहे.  म्हणूनच या विविधतेला कायम ठेवण्याची आणि याच्या ऱ्हासाला कारणीभूत असलेल्या विचारांना नष्ट करण्याची गरज आहे. त्याचबरोबर आपल्याकडे स्त्रीत्वाचा जो घोर अपमान सुरू आहे, तो बंद करून पुन्हा नव्याने मातृसत्तेची स्थापना करण्याची गरज आहे.

प्राचीन काळात आपला निसर्गाशी सामंजस्य करार होता. जुने लोक सण, व्रत, अनुष्ठानांच्या माध्यमातून ते प्रकट करत होते. पशु-पक्ष्यांवर प्रेम करत होते. या सगळ्या गोष्टी आपल्याला सुरू ठेवल्या पाहिजेत. बरं, आता ‘या सगळ्या गोष्टी पुन्हा सुरू ठेवून आपण आधुनिक कसे होऊ?’ असा एक प्रश्न आपल्या या पिढीसमोर आहे आणि याच कसोटीवर आपल्या बुद्धीची परीक्षा होणार आहे. समजा- आपण आधुनिक बनतो आहोत आणि यातून आपण एकवचनी बनलो तर मी याला प्रगती म्हणणार नाही. वर्तमान सांस्कृतिक समृद्धी कायम ठेवून आपण अजून किती पुढे जाऊ शकतो, यावर आपल्या संस्कृती आधारित आहे. वर्तमान स्थितीबरोबरच आपल्याला आधुनिक व्हावे लागेल.

एका बाजूने विचार केला; तर आपण भलेही आधुनिक बनलो नाही, तरीही आपली बहुवचनी संपन्नता आणि विविधतेची शृंखला कायम ठेवणे गरजेचे आहे. कारण हा गेल्या कित्येक शतकांचा वारसा आहे. आपल्या पूर्वजांनी हे सांभाळून ठेवले होते, म्हणूनच ते आपल्याला मिळाले आहे. आता कदाचित हीच भविष्यातील मानवी समाजाची आधुनिकता असेल. या विविधतेचे संगोपन/ संरक्षणाच्या पद्धतींना आधुनिक करणे सहज शक्य आहे. ते आपल्याला करून दाखवावे लागेल, नाही तर आपल्या आधुनिकतेला कोणताही अर्थ राहणार नाही. आधुनिकता एक फॉर्म आहे. फीचर म्हणजे अंतरंग नाही. ते बाह्यांग आहे आणि आपल्याला याच रूपात ते व्यक्त करावे लागेल. आपण कॅपिटालिझम, सोशालिझम वगैरे कोणतेही रूप निवडू; परंतु ते सगळे विविधतेत एकरूप झाले पाहिजे. ते केवळ भावनेचा मुद्दा नाही, तर परिसरवादाला न्याय देणारा आणि आपल्या सर्वांच्या हसत्या-खेळत्या सहजीवनाला पोषक असे तथ्यसुद्धा आहे.

असे म्हटले जाते की- भौगोलिक विस्तारामुळे, व्यवस्थेच्या प्रभावांमुळे संतुलन ठेवत मानवी समुदायांमध्ये प्रादेशिक मनोवैज्ञानिक प्रवृत्ती आणि जैविक लक्षणे आपोआप उतरतात. यामुळे इतिहासाचा प्रभाव समान नैसर्गिक गुणविशेष आणि समान विचारपद्धती शक्य आहे. एका महाराष्ट्रात धर्मांचे संप्रदाय जरी पाहिले तरी आदिवासी, भिल्ल, कोरकू, गोंड आदी; महानुभाव, वारकरी, नाथ, वीरशैव, जैन आणि कित्येक बौद्ध संप्रदाय, विविध धार्मिक संघटनांच्या सीमेवर घुटमळणारे मांत्रिक, तसेच भक्ती, सूफी, अघोरी आदी; विद्रोह विचारसरणी आणि विविध विचारधारा आहेत. यांच्यामागे कित्येक शतकांचे स्रोत असतील? ही भूमिनिष्ठ प्रक्रिया या अनेकवचनी भूतकाळाच्या भारतीयत्वाची एक महत्त्वपूर्ण बाजू आहे. बाहेरून आलेल्या ऋणात्मक आणि घनात्मक मूल्यांना देशी बनवून वनस्पतींसारखे आपले रक्षण करण्याची, अंगभूत क्षमता वाढवण्याची कला/गुण प्राचीन हिंदू जीवनपद्धतीत असतील.

खरे तर, एकीकडे अतिप्राचीन श्रमण जैन, लोकायत चार्वाक, ईश्वराला न मानणारे, ईश्वराचे मध्यवर्ती अस्तित्व झुगारणारे वगैरे सगळ्यांच्या आध्यात्मिक श्रद्धेचा एक पदर आणि दुसरीकडे गणित, भूमिती, भूगोल, धातुविद्या, रसायन, औषधी, शल्य, कृषी यांसारख्या विज्ञांनामध्ये विज्ञाननिष्ठा मानणारा एक पदर- अशा परस्परविरोधी वाटणाऱ्या दोन पदरांना एकत्र सुरक्षित ठेवणारी हिंदू संस्कृती अल्पसंख्याकांचीच संस्कृती आहे. कारण भारतात सगळ्याच जाती अल्पसंख्य आहेत आणि अल्पसंख्य संस्कृती नेहमी अनेकवचनी असते.

परंतु वसाहतवादी इंग्रजांच्या काळात मेकॉलेची इंग्रजी शिक्षणप्रणाली लागू झाल्यानंतर आणि विशेषत: 1857 च्या स्वातंत्र्य आंदोलनानंतर आपली बहुवचनी हिंदू भारतीयतेची वीण काहीशी उसवल्याचे दिसते. गौडपाल बौद्ध पंडितांचे शिष्य शंकराचार्य अद्वैतवादाचा पुरस्कार करतात. गुरू नानकदेवांचे अनुयायी हिंदू आणि मुसलमान दोघेही होते. संत एकनाथ आणि तुकारामांची गुरुपरंपरा सूफी आहे. वारकरी संप्रदायात मुसलमान संतांची पूजा होते. रामानंदांचे शिष्य कबीर आणि कबीरांचे हिंदू-मुसलमान शिष्यसुद्धा या खंडातीलच होते. हीच गोष्ट असंख्य जाती- जमातींमध्ये असते. परंतु आपला हा तेजस्वी इतिहास एकवचनी, एकांगी आणि असहिष्णू होत चालला आहे. धार्मिक समुदायांचे काल्पनिक एकधर्मीय केंद्रीकरण होऊन त्याचे राजकीय मतदारसंघ झाले आहेत.

सन 1861 पासून इंग्रजांनी जनगणना सुरू करून येथील लवचिक, सातत्याने परिवर्तनशील जातिव्यवस्थेला स्थिर करून तिला अधिक कट्टर आणि कर्मठ जातिव्यवस्थेत परिवर्तित केले आहे. या जनगणनेतून आपल्याकडे ‘मेजॉरिटी’ जाती निर्माण होऊ लागल्या आणि या प्रकारे त्यांनी या अल्पसंख्याक बहुविविधतेच्या परंपरेला संपवून टाकले. पुढे जाऊन धार्मिक  समस्यांवर कठोरपणे भाष्य करणाऱ्या बुद्धिजीवींचाही अंत झाला. ‘काबा माझ्या मागे आहे, कलीसा माझ्या पुढे’ सारख्या भाषेचा वापर करणारे किंवा ‘काबा ओ बुतकदा यह महमिल ए ख्वाब ए संगी’ (मस्जिद काय किंवा मंदिर काय दोन्हीही भयानक दु:स्वप्नात ढकलणारे पडदे आहेत.) या प्रकारे एकवचनीयतेची कठोर समीक्षा करणारे संपूर्ण हिंदुस्थानी जनतेसाठी पूजनीय असलेले गालिबसारखे कवीसुद्धा गायब झाले आणि पूर्ण भारतीय उपखंडात फॅसिस्ट प्रवृत्ती जिभल्या चाटत उठली.

इंग्रजी शिक्षणाने 1930 च्या दशकात प्रेरित वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणादी जातींनी कल्पनेवर आधारित एक राष्ट्र, एक धर्म, एक चर्चसारख्या हिटलरवादी प्रवृत्तीचे एक काल्पनिक हिंदुत्ववाद जन्माला घातला. त्याचा परिणाम असा झाला की, पश्चिमी संस्कृतीच्या प्रभावाखाली येऊन याच प्रवृत्तीच्या कट्टर इस्लामिस्टांनी देशीय परंपरांना झुगारून देशाची फाळणी केली. (मौलाना आझाद यांनी 1946 मध्ये जीनांसारख्या फाळणीसमर्थक नेत्यांना ‘कायर’/ डरपोक असे संबोधले होते.) या ध्रुवीकरणामुळे भारतीय उपखंडात सहिष्णू परंपरा पूर्ण संपुष्टात आली आणि हिंसक धर्मयुगाचा प्रारंभ झाला. हिंदू, शीख, मुसलमान- सगळ्यांचेच अमानवीकरण झाले. ‘मेजॉरिटी’ आणि ‘मायनॉरिटी’ची मूल्यव्यवस्था लागू झाल्याने अनेकवचनी भारतीय हिंदू विविधता अडगळीत पडली. उदाहरणार्थ- ‘अधिकाधिक हिंदूंना जन्माला घाला’ किंवा ‘भगवद्गीतेलाच राष्ट्रीय ग्रंथ माना’ वगैरे.

खरे तर वैदिक परंपरेतील महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी याच भगवद्गीतेला पाखंडी ग्रंथ म्हणून हिणवत बहिष्कार घातला. कारण हा धर्म अवैदिक धर्माचा पुरस्कार करतो. यातूनच हिंदुत्व आणि भारतीयत्व यांच्यातील आजकाल वाढत असलेली दरी स्पष्ट होते. एवढ्या सगळ्या राष्ट्रीय ग्रंथांमधून एकाच ग्रंथाला राष्ट्रीय मानणं, हे या प्राचीन आणि समृद्ध परंपरेमध्ये शक्य आहे?

स्वामी विवेकानंद किंवा महात्मा गांधींसारख्या विभूतींचे हिंदू असणे आणि भारतीय असणे हे दोन्ही प्रवृत्ती प्रखरतेने एकत्र असल्याचे दर्शविते. मी मुस्लिम लीगच्या नेत्यांना विनंती करतो की, ‘कोणत्याही भारतीयाला त्यांनी आपला शत्रू मानू नये.’ मी इंग्रजांना आवाहन करतो की, हिंदू आणि मुसलमानांना वेगळे करण्याचा तुमचा विचार वास्तवात आणू नका.’ पुढे काय झाले, ते सगळ्यांना माहीत आहे. परंतु हे केवळ हिमनगाचे टोक आहे. एक हजार वर्षांपूर्वी हे हिमनग बनत आले आहेत.

 अनुवाद : बाळासाहेब पाटील

Tags: बाळासाहेब पाटील हिंदू भारत समाज संस्कृती भालचंद्र नेमाडे हिंदुत्व आणि भारतीयता थेट सभागृहातून hindu translation balasaheb patil India society civilization Bhalchandra Nemade Hindutwa aani Bhartiyata Thet Sabhagruhatun weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भालचंद्र नेमाडे

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके