आमच्या हिंमतमधल्या दहा-बारा जणांच्या टीममधले जवळजवळ सगळेच त्यावेळी तरुण होते. ही सगळी मंडळी अतिशय प्रामाणिक, निष्ठावान आणि ध्येयवादी होती. राजमोहन गांधी हे मुख्य संपादक असले, तरी ते सगळी कामं स्वतः करत नव्हते. आर. एम. लाला संपादनाचं काम बघायचे. कल्पना शर्मा, निरजा चौधरी, रूपा चिनाई, शहनाझ अंकलेसरिया, संजय हझारिका, डेव्हिड डेविदार, विजिथा यापा वगैरे जवळजवळ सगळ्यांच्या आयुष्याची ती सुरुवात होती. आज आपापल्या क्षेत्रात त्यांची उंची खूप आहे. पण त्या सर्वांची सुरुवात हिंमत ही होती. ती 'नोकरी' असंही म्हणता येणार नाही, कारण सगळे नाममात्र मानधन घेऊनच काम करत होते. सगळे एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारायचे. उच्च-कनिष्ठ असा काहीही भेदभाव नव्हता. हिंमतमध्ये कोणत्याही प्रकारचं कामाचं विभाजनही नव्हतं.
'सांस्कृतिक समृद्धी वाढवणारं मासिक' अशा ध्येयवाक्यासोबत भानू काळे यांनी ऑगस्ट 1995 मध्ये सुरू केलेलं अंतर्नाद हे मासिक काही काळापूर्वी बंद झालं. साधारण सव्वीस वर्षं या मासिकानं मराठीतील साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात लेखकांच्या, वाचकांच्या आणि वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात खूप चांगल्या प्रकारे योगदान दिले. या मासिकाची कहाणी सांगणारं 'एका मासिकाचा उदयास्त' हे पुस्तक नुकतंच मौज प्रकाशनाकडून प्रकाशित झालं आहे. त्या निमित्ताने मासिकाचे संपादक भानू काळे यांची घेतलेली ही मुलाखत.
मुलाखतीच्या पूर्वार्धात 'अंतर्नाद'च्या आधीचे भानू काळे, त्यांचं वाचक आणि लेखक म्हणून घडत जाणं, प्रिंटिंग प्रेस चालवणं आणि एका इंग्रजी साप्ताहिकाच्या कामात सहभागी होणं असा त्यांच्या वयाच्या साधारण चाळीशीपर्यंतचा कालखंड आला आहे. तर मुलाखतीच्या उत्तरार्धात 'अंतर्नाद'चे संपादक, प्रकाशक आणि मालक या तीन नात्यांभोवतीची चर्चा आहे.
प्रश्न : पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू मे 1964 मध्ये झाला, तेव्हा तुमचं वय अकरा होतं. त्यावेळी त्या वयाला साजेसं असं एक हस्तलिखित तुम्ही तयार केलं होतं असं उपरोक्त पुस्तकात तुम्ही नमूद केलं आहे. तिथेच भविष्यात आकाराला आलेल्या किंवा येणाऱ्या मासिकाच्या जन्माचं बीज पडलं असावं अशी एक शक्यताही तुमच्या या पुस्तकात तुम्ही व्यक्त केली आहे. पुढच्या साधारण दहाएक वर्षांत तुमचं शिक्षणही पूर्ण झालं आणि त्यानंतर लगेचच इंदिरा गांधींनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. तर नेहरूंचा मृत्यू ते आणीबाणी, म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या वयवर्ष 11 ते 21 या काळातलं तुमचं मराठी, इंग्रजी वाचन कसं होतं?
- वाचनातूनच माझ्या मनात लेखनाची उर्मी येत गेली. वाचनाची आवड नसती, तर भविष्यात कधी अंतर्नादसारखं एखादं मासिक सुरू करण्याचं धाडस मी केलं असतं, असं मला अजिबात वाटत नाही. या आवडीला घरातल्या आणि शाळेतल्या वातावरणाची मदत झालीच; पण त्यासाठी माझ्यातली वाचनाबद्दलची ओढ ही सर्वाधिक महत्त्वाची ठरली.
आमची आर्थिक परिस्थिती फार चांगली होती असं नाही. माझे वडील पूर्ण वेळ कामगार चळवळीत, तर आई मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका. आम्ही पाच भाऊ. पण तशा आर्थिक ओढगस्तीच्या काळातही आमच्या घरात त्या वेळेला दोन वृत्तपत्रं यायची - एक आचार्य अत्रे यांचं 'दैनिक मराठा' आणि दुसरं, सदानंद यांचं इंग्रजी 'फ्री प्रेस जर्नल' ही वृत्तपत्रं घरी आली रे आली की, आम्ही त्यावर तुटून पडायचो. जे आपल्याला आवडेल, ते मोठ्याने इतरांना वाचून दाखवायची पद्धतही घरात होती. त्यामुळे साहजिकच जे वाचलं, ते मनावर ठसत गेलं. वृत्तपत्रांपासून सुरू झालेली वाचनाची आवड लगेचच पुस्तकांपर्यंत गेली.
पुस्तकवाचनाची सुरुवात अर्थातच सर्वसामान्य वाचकांप्रमाणेच पंचतंत्र वगैरे वाचून झाली. पण लवकरच मी गंभीर वाचनाकडे वळलो. शाळेत असतानाच 'हिंदू व्यवहारधर्म शास्त्र' यांसारखी पुस्तकं वाचल्याचं स्पष्ट आठवतं. ज्याला कॉमिक्स म्हणतात, अशा 'चांदोबा'सारख्या हलक्याफुलक्या मासिकांकडे किंवा पुस्तकांकडे मी कधीच गेलो नाही. पण रहस्यकथा आवडीनं वाचत होतो. बाबुराव अर्नाळकर यांच्या रहस्यकथा त्या वेळेला दर महिन्याला आमच्या हाती यायच्या. त्या स्वस्तही असायच्या. त्यात आम्ही इतके समरसून जायचो की, खूपदा रस्त्याने चालताना, रेशनच्या किंवा दुधाच्या रांगेत उभं असतानासुद्धा मी ते वाचत असे. मला आठवतं, अर्नाळकरांच्या कादंबऱ्यांतील 'झुंजार' नावाच्या नायकाचं मरीन ड्राईव्हला 'झुंजार महाल' नावाचं घर आहे असा उल्लेख त्यांच्या एका 'झुंजार' कथेत होता. तो वाचल्यावर मरीन ड्राईव्हला खरंच त्याचं असं घर आहे का, हे बघण्यासाठी मी दोन-तीन वेळा तिथं फेऱ्या मारल्या होत्या. वेडेपणाच तो ! पण वाचनाशी मी किती एकरूप होऊन जायचो ते दर्शवणारा.
या वाचनाला हळूहळू कथा-कादंबऱ्यांची जोड मिळत गेली. मी मुंबईत किंग्ज सर्कलला राहत होतो. तिथून मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि दादर सार्वजनिक वाचनालय पायी चालत जावं, इतक्या अंतरावर होतं. मी या दोन्ही वाचनालयांचा सदस्य होतो. आमच्या खाली राहणाऱ्या एक काकू मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात नोकरी करत होत्या. त्या रोज एखाददुसरं पुस्तक घरी आणायच्या. ते लगेच वाचून व्हायचं. वाचनाचा वेग प्रचंड असायचा. त्यातलं किती ग्रहण करत होतो, हे सांगणं अवघड आहे. पण रोज एक पुस्तक वाचणं ही अगदी सर्वसामान्य गोष्ट होती. सुरुवातीला एखादा लेखक घ्यायचा आणि त्याचं मिळेल ते सगळं वाचून पूर्ण करायचं अशी माझी पद्धत होती. मग ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, ग. त्र्यं. माडखोलकर वगैरे संपवले. एक-एक करत मी अशा अनेक कादंबऱ्या, कथासंग्रहांचा फडशा पाडत गेलो.
या वाचनानं ज्या गोष्टी मी कधीही अनुभवल्या नव्हत्या त्यांचीही जाणीव मला होत गेली. उदाहरणार्थ, शिवकाळ मी कधीच अनुभवला नव्हता; पण नाथमाधवांच्या 'स्वराज्यावरील संकट' वगैरे कादंबऱ्या वाचून तो सगळा शिवकाळ मी जगलो. ब. मो. पुरंदरे यांचं शिवचरित्रकथन मी दोन-तीन वेळा तरी ऐकलं असेल. वाचनाला अशा व्याख्यानांचीही जोड होतीच. आमच्या जवळच्या राजा शिवाजी (त्या वेळच्या किंग जॉर्ज) विद्यालयाच्या पटागंणात किंवा शिवाजी पार्कवर अथवा अमरहिंद मंडळात त्यांची तसंच इतरही अनेकांची व्याख्यानं व्हायची. वाचनाला पूरक अशा या व्याख्यानांचीही आवड मनात निर्माण झाली होती. 'मराठा' नियमित वाचत असल्यानं आचार्य अत्रे हे आमचं दैवतच होतं. शिवाजी पार्कवरची त्यांची कुठलीही महत्त्वाची सभा मी चुकवली नव्हती. त्या वेळेला ते शिवाजी पार्कचे सम्राटच होते. साठच्या दशकाच्या उत्तरार्धात शिवसेनेची सुरुवात झाली, तेव्हा अर्थातच ते चित्र पालटलं. नवे सम्राट गादीवर बसले. पण त्या वेळेपावेतो अप्रेंच्या बहुतेक महत्त्वाच्या सभांना मी हजर असायचो. त्याचप्रमाणे कामगार मैदानही फार लांब नव्हतं. माझं आजोळ परळलाच आहे. त्यामुळे तिकडे खूपदा माझं जाणं असायचं. कामगार मैदानावरच्या कॉम्रेड डांगेंच्या सभांनाही आम्ही आवर्जून जायचो.
मराठी माध्यमात शिकत असलो तरीही मराठीकडून इंग्रजी वाचनाकडे मी तसा लवकरच वळलो. मगाशी म्हटल्याप्रमाणे इंग्रजी वाचनाची सुरुवात फ्री प्रेस जर्नलपासून झाली. पण त्याचबरोबर माझ्या वडलांच्या साम्यवादी विचारांमुळे 'ब्लिट्झ' हे आर. के. करंजिया यांचं साप्ताहिक नेहमी घरी यायचं. या साप्ताहिकात के. ए. अब्बास हे साम्यवादी विचारवंत नेहमी शेवटचं पान लिहायचे. मी ते नेहमी वाचायचो. त्या पानावरच्या उजव्या कोपऱ्यात कुठल्या तरी परदेशी पिन-अप गर्लचा एक फोटो असायचा. त्याचा बाकीच्या मजकुराशी काहीही संबंध नसायचा! पण त्या वयात त्या फोटोचंही आकर्षण होतंच. वाचताना ब्लिट्झमधल्या काही विसंगतीही लक्षात आल्या. साम्यवादी विचारसरणीचा कट्टर पुरस्कार करताना करंजिया त्या विचारसरणीत जराही न बसणाऱ्या साईबाबांची, इराणच्या शहाचीही भलावण करायचे ! या विरोधाभासाची गंमत वाटायची.
अनेक अमराठी वक्त्यांच्याही भाषणांना माझी हजेरी असायची. आचार्य रजनीश; जे अजून भगवान व्हायचे होते; त्यांची व्याख्यानं हिंदीतून व्हायची. मी ऐकलेल्या सर्वांत प्रभावी वक्त्यांमध्ये त्यांचं नाव मी निश्चितच घेईन. श्रोत्यांना मंत्रमुग्ध कसं करायचं, ते रजनीशांकडून बघायला मिळालं. जॉर्ज फर्नांडिसांपासून तारकेश्वरी सिन्हांपर्यंत आणि जगन्नाथराव जोशींपासून ते आप्पा पेंडसेंपर्यंत अनेक चांगले ओजस्वी वक्ते त्या काळात ऐकले. अशा प्रकारे व्याख्यानं, वाचन या सगळ्यातून माझा पिंड, माझ्या सामाजिक जाणिवा विकसित होत गेल्या.
पुढे मी इंग्रजी वाचनाकडे वळलो, तेव्हा माझ्याकरता ती अलिबाबाची गुहाच ठरली. कारण मराठीच्या तुलनेत इंग्रजीचं साहित्यविश्व खूपच विशाल आहे. माझं शिक्षण मराठीत झालं. मराठीवर माझं प्रेमही होतं, ती माझी मातृभाषाच होती; पण आमच्या घरात मराठीवरचं प्रेम म्हणजे इंग्रजी किंवा हिंदीचा तिरस्कार ही भूमिका कधीच नव्हती. मी राहत होतो, तो भागही मुंबईचा सगळ्यात कॉस्मोपॉलिटन म्हणता येईल असा भाग होता. आमच्या इमारतीत 24 बिऱ्हाडं होती पण त्यातली फक्त दोन मराठी होती. त्या भोवतालच्या वातावरणामुळे इंग्रजी वाचनाकडेही मी सहजरीत्या वळलो आणि त्याचाही माझ्या जडणघडणीवर खूप परिणाम झाला हे मला मागे वळून बघताना नीट जाणवतं.
प्रश्न : तुम्ही आत्ता म्हटल्याप्रमाणे, मुंबईसारख्या प्रचंड महानगरात राहताना एका बाजूला तुम्ही भाषणं ऐकत होतात, तर दुसऱ्या बाजूला इंग्रजी, मराठी वाचन होतं. त्याला पूरक असंच घरातलं वातावरण होतं. पण याच दरम्यानच्या काळात तुम्ही लिहायला लागलात. तर लेखन करण्यासाठी तुमच्यावर त्या काळातल्या कोणत्या लेखकांचा आणि पुस्तकांचा विशेष प्रभाव राहिला?
- खरं तर, अशी अनेक नावं सांगता येतील. मुळातच मराठी साहित्याचा इतिहास पाहिला, तर 1960 ते 1980 हा वीस वर्षांचा कालखंड सर्वांत प्रभावी होता. माझ्याही दृष्टीने वाचक म्हणून जडणघडण होण्याकरता तो काळ सर्वात प्रभावी होता. मराठी मासिकांचा तर तो अगदी वसंतऋतू होता. अनेक मराठी मासिकं आमच्या घरी येत होती. माझ्या आईनं घरच्या घरी एक फिरतं वाचनालयच चालवलं होतं. आसपास राहणारे 30- 35 जण त्याचे सदस्य होते. बहुतेक गाजलेलं साहित्य एके काळी मासिकांतून प्रसिद्ध झालंय. आज लोकांना हे पटवणं कदाचित अवघड असेल, कारण आज तशी मासिकं राहिलेली नाहीत. पण तुम्ही जुन्या काळातले संदर्भ पाहिलेत, तर ते लक्षात येईल. उदाहरणार्थ, 'गाय ही माता नव्हे, केवळ एक पशू' किंवा 'मंत्र नव्हे, यंत्र' असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गाजलेले निबंध पूर्वी किर्लोस्कर मासिकातच आलेले आहेत.
हरीभाऊ आपटेंच्या प्रत्येक कादंबरीचं पहिलं प्रकाशनही नियतकालिकांतच झालेलं आहे. त्यांनी 'करमणूक' नावाचं एक साप्ताहिकही त्यासाठी चालवलं होतं. गंगाधर गाडगीळांची 'प्रिया आणि मांजर' ही पहिली कथा 1942 मध्ये 'अभिरुची' मासिकात प्रसिद्ध झाली होती. त्यांच्या नंतरच्याही इतर सर्व कथा 'सत्यकथा' आणि इतर काही मासिकांत आलेल्या आहेत. जी. ए. कुलकर्णीच्या कथाही मुख्यतः 'हंस'मधून यायच्या. पु. ल. देशपांडेंचं 'अपूर्वाई' हे किर्लोस्करमध्ये आलेलं आहे. 'बटाट्याची चाळ', 'व्यक्ती आणि वल्ली' हे 'सत्यकथे'त आलेलं आहे. पुलंचं कुठलंही पुस्तक काढा, त्यातल्या बहुतेक मजकुराची पूर्वप्रसिद्धी मासिकात झालेली आहे. त्यामुळे 'मासिकाच्या वाचनातून साहित्याचं वाचन' हा प्रवास आपसूकच होत गेला.
नियतकालिकांची वाढ आणि साहित्याची वाढ या दोन्ही समांतर घडलेल्या गोष्टी आहेत. इंग्रजीमधलेही महत्त्वाचे लेखक साप्ताहिकं आणि मासिकांतूनच व्यापक वाचकवर्गापुढे आलेले आहेत. अमेरिकन सरकारची मुंबईत मरिन लाइन्सला मोठी लायब्ररी होती. त्याला 'युनायडेट स्टेट्स इन्फॉर्मेशन सर्व्हिस' किंवा युसिसची लायब्ररी असं म्हटलं जायचं. अशीच नरिमन पॉईंटजवळ ब्रिटिश काऊन्सिलची लायब्ररी होती. या दोन्हींचा मी सदस्य होतो. तिथं एका वेळी चार पुस्तकं घरी नेता यायची. त्यामुळे इंग्रजी वाचनही मोठ्या प्रमाणावर झालं. त्याचेही माझ्यावर खूप संस्कार आहेत.
प्रश्न : आपला दृष्टीकोन आकाराला येतो, त्या 20- 21 वर्षे वयापर्यंतच्या कालखंडात वाचन करणं आणि भाषणं ऐकणं हे दोन घटक तुम्हाला विशेष उपयुक्त ठरले. हाच तुमच्या ऐन उमेदीचा काळ. म्हणजे साधारण 1964 ते 1974 हा कालखंड. या काळात आपल्या देशात चार वेगवेगळे राजकीय प्रवाह कार्यरत होते. त्यातला एक तर तुमच्या घरातही होता. तुमचे वडील कम्युनिस्ट विचारांचे होते, कामगार चळवळीतील पुढारी होते. त्यामुळे कम्युनिझम तुमच्या घरातून तुमच्यापर्यंत पोहोचत होता. दुसरा, सत्ताधारी पक्ष काँग्रेस होता. उरलेले दोन - जनसंघ आणि समाजवादी हे प्रवाह तेवढेच बळकट होते. या चार प्रमुख प्रवाहांमध्ये होणाऱ्या घटनांचा, त्यांनी घेतलेल्या भूमिकांचा, वेगवेगळ्या घटनांना त्यांनी दिलेल्या प्रतिसादाचा तुमच्यावर काय प्रभाव पडत होता? तुमचं वाचन आणि बाहेरचं, कुटुंबातलं वातावरण यातून तुमचा स्वतःचा असा जो एक दृष्टीकोन आकाराला आला, त्याचं स्वरूप नेमकं कसं होतं?
- मी याची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरूंपासून करेन. कारण मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे, 27 मे 1964 रोजी त्यांचं निधन झालं, तेव्हा मी वेगवेगळ्या वृत्तपत्रांतले लेख कापून त्यांचं एक हस्तलिखित तयार केलं होतं. त्यात रंगीबेरंगी - पिवळे, हिरवे, निळे, लाल जिलेटिन पेपर लावले होते. अवतीभवती रंगीत पेन्सिलीने नक्षीकाम केलं होतं. त्यात थोडं लेखनही मी केलं होतं. तसा तो एक बाळबोधच प्रकार होता. गंभीर काहीच नाही. पण आपणही मासिक काढावं असा विचार माझ्या मनात त्या वेळीच रुजला होता का? याचं नेमकं उत्तर देणं कठीण आहे. आपल्या अंतर्मनात इतके प्रवाह कार्यरत असतात की, कोणत्या प्रवाहाचा आपल्यावर नेमका काय परिणाम होतोय हे आपण कधीच सांगू शकणार नाही. पंडित नेहरूंचं आम्हाला खूप आकर्षण होतं हे मात्र नक्की. मला अजूनही वाटतं की, मागील पिढीच्या भारतीय लोकांनी नेहरूंवर जितकं प्रेम केलं, तितकं दुसऱ्या कोणत्याही नेत्यावर केलेलं नाही. काही विशिष्ट भागात, विशिष्ट नेते लोकप्रिय होते. उदाहरणार्थ, मुंबईत साधारण 1967 नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरे हिरोच होते. पण पंडित नेहरूंची जी अखिल भारतीय प्रतिमा होती, ती वेगळीच होती आणि त्यांचं आम्हाला खूप आकर्षण होतं. एकदा आमच्या घरासमोरच्या, नुकत्याच उद्घाटन झालेल्या, षण्मुखानंद हॉलमध्ये काँग्रेसचं चार दिवसांचं अखिल भारतीय अधिवेशन होतं. सकाळी नऊ वाजता पंडितजी तिथं पोहोचायचे. दुपारी बारा-साडेबाराला जेवायला तिथूनच राजभवनला जायचे. मग परत तीनच्या सुमारास अधिवेशनाला यायचे आणि संध्याकाळी सहा- सातच्या सुमारास परत जायचे. जाताना दोनदा, आणि येताना दोनदा असे दिवसातून चार वेळेला आम्हाला मोटारीतून जाणारे पंडित नेहरू बघायला मिळायचे ! आजच्या काळातल्या नेत्यांची सिक्युरिटी वगैरे पाहता त्यांचं तसं दर्शन होणं आज अगदी अशक्य वाटतं; पण पंडितजींना आम्ही चक्क आमच्या घराच्या गॅलरीतून बघायचो ! उघड्या मोटरीत ते कधीकधी उभेही राहायचे, दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांकडे बघत हात हलवायचे. या साऱ्यातूनही त्यांच्याविषयी जवळीक निर्माण व्हायची.
भारतातील पहिली अखिल भारतीय कामगार संघटना म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. तिचे पंडितजी 1929 मध्ये अध्यक्ष होते. तेव्हापासून त्यांना कामगार चळवळीत रस होता. माझ्या वडलांचाही त्यांच्याशी संबंध आला होता. माझे वडील ऑल इंडिया पोर्ट अॅण्ड डॉक वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष असताना, म्हणजे जून 1958 मधे, देशभरातील सर्व बंदर आणि गोदी कामगारांचा संप झाला. भारतातला सार्वजनिक क्षेत्रातला, देशव्यापी असा, हा पहिला संप. त्यावेळी देशात धान्याचा तुटवडा इतका असायचा की, बंदरात अमेरिकेहून धान्य घेऊन येणारी बोट लागली, की मगच रेशनच्या दुकानात धान्य उपलब्ध होईल अशी परिस्थिती होती. त्यामुळे साहजिकच देशातल्या सर्वच बंदरांतला संप म्हटल्यावर खूपच खळबळ माजली होती. तेव्हा पंडितजींनी स्वतः त्या संपात हस्तक्षेप केला होता. त्या वेळच्या आठवणी माझ्या वडिलांकडून मी खूपदा ऐकायचो. पंडितजींविषयी आदरापेक्षा प्रेम ही भावना सर्वांच्या मनात खूप होती. माझे वडील एक गमतीदार आठवण सांगायचे. या संपाच्या वेळी ते फेडरेशनच्या शिष्टमंडळासह दिल्लीला पंडितजींना भेटायला गेले, तेव्हा पंडितजींनी आधी प्रत्येकाला सिगरेट ऑफर केली होती ! ते म्हणाले होते, 'A friend from Turkey has sent it for me. Why don't you have one?" त्यातले एक कामगारनेते तर असे होते की, ज्यांनी आयुष्यात कधीच सिगरेट ओढली नव्हती. पण पंडितजींना 'नाही'
कसं म्हणायचं, म्हणून त्यांनी ती पेटवली आणि झुरका मारताच त्यांना जोरदार ठसका लागला होता! पण या साऱ्यात एक अनौपचारिक मित्रभावही होता आणि त्याचाही प्रभाव सर्वांवर पडतच होता.
प्रश्न : नेहरूंचा प्रभाव होता, त्यांच्याविषयी प्रेम व आकर्षण होतं, तसं काँग्रेस पक्षाच्या विचारधारेविषयी किंवा अन्य नेत्यांबद्दल काय वाटायचं?
- 1 मे 1960 रोजी, मागील काही वर्षं जोरदार चळवळ झाल्यानंतर, संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. पण त्या वेळेला सगळ्याच पक्षांमध्ये आजच्यासारखं परस्परविरोधी कटू वातावरण असं नव्हतं. संयुक्त महाराष्ट्र समितीत अनेक पक्ष होते, सगळ्यांचंच कडबोळं होतं ते. आघाडीच होती ती. त्यामुळे वेगवेगळे पक्षभेद हे तेव्हा आजच्याइतक्या तीव्रतेनं जाणवणारे नव्हते. संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून समिती लढत होती हे खरं आहे, पण राज्यातील काँग्रेसचाही संयुक्त महाराष्ट्राला विरोध असा नव्हताच. यशवंतराव चव्हाणांनी त्याला नंतर पाठिंबाच दिला होता. अशा वातावरणात पक्षीय राजकारण, नेत्यांमधली दुही यांचा खास असा काही परिणाम माझ्यावर झाला नाही.
पण थोडी काळाची उडी घेऊन एक नक्की सांगावंसं वाटतं की, देशात 1975 साली आणीबाणी आली त्यावेळी मात्र एकदम राजकीय जाणिवा धारदार बनल्या. तेव्हा 'हिंमत' नावाच्या एका इंग्रजी साप्ताहिकात दहा- बारा तरुणांच्या एका गटासोबत मी काम करत होतो.
नंतर इंदिरा गांधींनी अगदी अचानक आणीबाणी उठवली आणि 1977 मध्ये निवडणुका जाहीर केल्या. तेव्हा आम्ही सर्वांनी जनता पक्षाचा हिरीरीने प्रचार केला होता. त्या जनता पक्षात तेव्हा काँग्रेस सोडून जवळजवळ सगळे विरोधी पक्ष होते. 'इंदिरा हटाव' हेच एकमेव उद्दिष्ट त्यांना एकत्र आणणारं होतं. पण पुढे प्रत्यक्षात हे सरकार सत्तेवर आलं, तेव्हा ज्यांना आम्ही हिरो मानलं होतं; ती माणसं आधीच्या नेत्यांसारखीच भ्रष्ट होती, हे आमच्या लक्षात यायला लागलं. त्यामुळेच ते जनता पक्षाचं सरकार आपापसातील भांडणांमुळे बघताबघता पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळलं. पुन्हा इंदिरा गांधी सत्तेवर आल्या ! आम्ही पुरते गोंधळून गेलो. ज्यावेळी इंदिरा गांधी निवडणूक हरल्या आणि आमच्या जनता पक्षाच्या प्रचाराला फळ मिळालं असं आम्हाला वाटत होतं, तेव्हा जनता किती सुज्ञ, हुशार असते, लोकांना कसं सगळं योग्य-अयोग्य माहीत असतं, अशी आमची प्रामाणिक भावना झाली होती. पण मग हेच तथाकथित सुज्ञ मतदार दोन वर्षातच त्याच इंदिरा गांधींना इतक्या भरघोस मतांनी कसं निवडून देतात ? म्हणजे मतदारांच्या शहाणपणाबद्दल आम्ही जो समज करून घेतला होता, तो तसा करून घेणं ही निव्वळ आमची गरज होती. प्रत्यक्षात तसा तो मतदार खरंच समजदार होता की नाही याविषयी मला आजही शंका वाटते. त्यामुळे एक प्रचंड भ्रमनिरास झाला. आणीबाणीविरोधात लढणारी आमच्यासारखी सामान्य मंडळी प्रत्यक्षात कुणाच्या तरी हातची खेळणी बनली होती का? लोकांचा आणीबाणीला खरंच विरोध होता की नव्हता ? की आम्हीच लोकांचा आणीबाणीला विरोध आहे असं म्हणत होतो? असे अनेक अस्वस्थकारक विचार मनात येऊ लागले. आणीबाणीच्या काळातही बहुसंख्य माणसं त्यांचं नेहमीचंच रुटीन आयुष्य जगतच होती हे लक्षात आलं. यातून एकूण राजकीय प्रक्रियेविषयीच माझा भ्रमनिरास झाला. त्या भ्रमनिरासाचा माझ्यावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे कदाचित पक्षीय राजकारणाविषयी माझ्या मनात पुढे कोणत्याही प्रकारचा आपलेपणा, ममत्व निर्माण झालं नाही; किंवा तशा पक्षीय राजकारणात सहभाग घ्यावा अशी इच्छाही नंतर कधीच निर्माण झाली नाही.
प्रश्न : जनसंघ आणि समाजवादी हे काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांच्यापेक्षा दोन वेगळे प्रवाह. त्यांचं तुमच्या मनावर काही आदळत होतं किंवा त्यांचं काही अनुसरण करत होता?
- या सगळ्याशी संबंध येत होता आणि त्याचा परिणामही होत होता. अटल बिहारी वाजपेयी आणि जगन्नाथराव जोशी हे जनसंघाचे प्रभावी वक्ते होते. आमच्या माटुंग्याला साऊथ इंडियन जिमखान्यावर त्यांची भाषणं व्हायची. वाजपेयी हिंदीत बोलायचे. जोशी कधी मराठीत तर कधी हिंदीत. त्याचा माझ्यावर निःसंशय परिणाम होता होता. तसंच कामगार चळवळ हे अनेक समाजवादी नेत्यांचं मूळचं स्थान असल्यानं तेही संपर्कात होते. 'बंदसम्राट' जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईतल्या कामगार चळवळीचे त्या काळाततरी हिरो होते. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात त्यांनी एस. के. पाटलांचा पराभव केला, तेव्हा सगळ्यांना किती आनंद झाला होता हे मी पाहिलं होतं. त्यांची 'पाटील पडलाच पाहिजे (पी.पी.पी.)' ही पोस्टर्स मला आठवतात. जॉर्ज फर्नांडिस हे एक ख्रिश्चन, त्यात मंगळूरवरून आलेले. पण त्या गोष्टी त्यांच्या लोकप्रियतेच्या आड कधीच आल्या नाहीत. त्यांनी चक्क एस. के. पाटलांना हरवलं ! पाटील हे मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी, ज्याला बीपीसीसी म्हणायचे, त्याचे सर्वेसर्वा होते. संबंध देशात काँग्रेस पक्षाचं फंडिंग त्याकाळात मुंबईकडून यायचं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी वेगळी. ती तशी गरीब होती. बीपीसीसीकडेच सगळा पैसा असायचा. त्यामुळे एस. के. पाटलांचं भारतीय राजकारणातलं महत्त्व त्यावेळी अनन्यसाधारण होतं.
प्रश्न : याबद्दल अनेक आठवणी सांगितल्या जातात. त्यावेळी 'तुम्ही एस. के. पाटील यांना पराभूत करू शकता' असं एकच वाक्य असणारं पोस्टर प्रचंड प्रमाणात लावून जनतेला मोठं आव्हान दिलं होतं. तिथंपासून ते 'तुम्ही एस. के. पाटील यांना पराभूत करणारच' आणि शेवटी निकाल लागल्यावर 'तुम्ही एस. के. पाटील यांना पराभूत केले' अशीही पोस्टर्स लागली होती.
- हे अगदी बरोबर आहे. एखादा नेता अगदी अजिंक्य आहे, तो हरणं शक्यच नाही असं कधीकधी आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात तो हरतो, तेव्हा फारच वेगळं वाटतं. तसं मुंबईत एस. के. पाटलांच्या बाबतीत झालं होतं. पण यावरून जनता फार सुज्ञ होती असा निष्कर्ष मात्र काढता येणार नाही. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेदेखील मुंबईतल्या कामगार भागातल्या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक हरले होते. मध्य मुंबई या कामगारांचा मुख्य समावेश असलेल्या मतदारसंघात काँग्रेसचे नारायणराव काजरोळकर यांनी त्यांचा पराभव केला होता.
प्रश्न : भंडाऱ्यातही असंच झालं होतं. डॉ. आबंडेकरांना हरवणारे उमेदवार त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या दृष्टीने इतके छोटे होते की, त्याची आज कुणाला आठवणही नाही.
- याचं एक कारण असं की, पंडित नेहरूंचा जनमानसावर इतका प्रभाव होता की, 'नेहरूंनी इलेक्ट्रिकचा खांब जरी निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा केला, तरी लोक त्याला निवडून देतील', असं म्हटलं जायचं. त्यामुळेच ज्यांना नेहरूंचा पाठिंबा असायचा त्यांचा विजय गृहीतच धरला जायचा आणि अनेक जण तसे निवडूनही आलेले होते. 
पुन्हा राजकीय पक्षांच्या प्रभावाकडे येतो. आपण सगळेच निवडणुकीत मतदान करतो. म्हणजे कुठल्या तरी पक्षाचं आपण समर्थन करतो. मतदानाचा हक्क मिळाल्यानंतर झालेल्या जवळपास सगळ्याच निवडणुकीत मी मतदान केलेलं आहे. आणि त्यावेळी त्या त्या काळातील परिस्थितीनुसार वेगवेगळ्या पक्षांना मी मतं दिलेली आहेत. एक काळ असा होता की, मुंबईतले सगळेच तरुण बाळासाहेब ठाकरेंच्या प्रभावानं भारले होते. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला मत देण्याबद्दल कुणी सांगायची गरजच नव्हती. सत्तरच्या दशकात जेव्हा मला मतदानाचा हक्क प्रथम मिळाला तेव्हा आम्ही सगळेच मराठी तरुण शिवसेनेचे मतदार होतो. त्यामुळेच शिवसेना मुंबईत एवढी मजबूत होत गेली. त्या आधी ती भूमिका संयुक्त महाराष्ट्र समितीकडे होती. चांगला असेल, तर एखाद्या वेळी काँग्रेसच्या उमेदवारालाही आम्ही मत दिलंय. 'मतदान करताना राजकीय पक्ष कुठला ते पाहाण्यापेक्षा उमेदवार कोण आहे, तो चांगला आहे का, ते पाहून मत द्यायचं' असंही, प्रत्येक वेळी नाही तरी खूपदा, माझ्या बाबतीत घडलं आहे. याचं कारण कुठेतरी राजकीय प्रक्रियेबद्दलच्या माझ्या भ्रमनिरासात असू शकेल.
या संदर्भात एक अनुभव इथे सांगावासा वाटतो. ही घटना आहे साधारण 1975 सालची. त्यावेळी म्हणजे इंदिरा गांधी सत्तेवर असताना मी दिल्लीत कॅनॉट प्लेस भागात बघितलेलं हे एक दृश्य. अलाहाबाद कोर्टाचं इंदिरा गांधींच्या विरोधातलं जजमेंट आलं, तेव्हा 'त्यांनी राजीनामा द्यावा' अशी विरोधी पक्षाची मागणी होती. याउलट त्याच वेळी इंदिराजींच्या बाजूने घोषणा करणाऱ्यांची प्रचंड गर्दी त्यांच्या निवासस्थानी रोज होत असे. त्या वेळेला कॅनॉट प्लेसच्या एका आडगल्लीत तीन-चार ट्रक उभे असलेले मला दिसले. चौकशीनंतर कळलं की, कुठल्याशा ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टरचे ते ट्रक आहेत आणि त्यात माणसं भरून राजकीय नेत्यांच्या समर्थनार्थ किंवा विरोधार्थ घोषणा देण्यासाठी त्यांना नेणं हा चक्क त्याचा बिझनेस आहे! राजकीय प्रक्रियेविषयीचा भ्रमनिरास तेव्हापासूनचा आहे! आणखी एक गोष्ट तेव्हा लक्षात आली की, सर्वसामान्य कार्यकर्ते एकमेकांशी आपापल्या राजकीय मतावरून अगदी हिरिरीने भांडतो; प्रसंगी एकमेकांशी वैरही धरतो; पण त्याच वेळेला त्या-त्या पक्षाचे सर्वोच्च नेते मात्र एकमेकांना अगदी व्यवस्थित संभाळून घेत असतात! अशा अनेक कारणांनी मला स्वतःला राजकारणात शिरावं असं कधीच वाटलं नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रभावाखालीही मी कधी आलो नाही. मी माझं क्षेत्र साहित्य, वैचारिकता आणि समाजकारण यापुरतंच ठेवलं; राजकारणापासून दूर राहिलो.
प्रश्न : तुमची ही सर्व जडणघडण वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंतची आहे असं म्हणता येईल. म्हणजे 1975 ला आणीबाणी आणि त्यानंतरची दोन वर्षं जनता पार्टीचा प्रयोग. त्याच वयाच्या आसपास एक दृष्टीकोन आकाराला येत असतो, धारणा पक्क्या होतात, राजकीय-सामाजिक कल लक्षात येतो. साधारणतः याच काळात तुम्ही लेखक म्हणूनही उदयाला येत होतात. तुम्ही कथालेखनापासून प्रारंभ केला आणि दोन अतिशय महत्त्वाच्या कादंबऱ्या लिहिल्या. त्यातली एक 'तिसरी चांदणी' ही आणीबाणीच्या काळाबद्दल आहे आणि दुसरी 'कॉम्रेड' कादंबरी काशाबद्दल आहे ते नावातूनच स्पष्ट होतं. त्या दोन्ही कादंबऱ्यांकडे मी पुढच्या प्रश्नात वळणार आहे. पण त्या आधी तुम्ही प्रामुख्यानं कथा लिहित होता, कदाचित नॉन-फिक्शन स्वरूपाचे लेखही लिहित असाल. तुमच्या लेखनाचा प्रारंभ कसा झाला? सुरवातीच्या काळातल्या कथा कशा होत्या? तुमची 'उच्चभ्रू कलिंगड' ही पहिली छोटी कादंबरी किंवा दीर्घकथा. या दोन-तीन गोष्टी सोडल्या, तर त्यानंतर तुमचे कथासंग्रह कधीच आलेले दिसत नाहीत. तुम्ही कथा लिहिल्या, त्या चांगल्या नियतकालिकांत प्रकाशितही होत होत्या आणि त्या लेखनाच्याच निमित्ताने तुमची ज्या मुलीशी ओळख झाली, ती तुमची भावी पत्नी झाली. हे सगळं फारच इंटरेस्टिंग होतं. तर याबद्दल सांगा. आणि तुमच्या कथांचं नंतर पुस्तक का आलं नाही तेही सांगा?
- कथालेखनाकडे वळण्याचं मुख्य कारण माझं वाचनप्रेम. आज कथेचा वाचक कमी झालाय; पण 1960 ते 1980 या काळात कथा हा मराठी साहित्याचा, मासिकांचा आत्माच होता. प्रत्येक मासिकात पाच-सहा कथा असायच्याच. अगदी अरविंद गोखले, पु. भा. भावे, गंगाधर गाडगीळांपासून बाबुराव बागुल, शंकर पाटील, जी. ए. कुलकर्णी यांच्यापर्यंतच्या सगळ्यांचा तो बहराचा काळ होता, वसंत ऋतू होता. नव्या उमेदीने ते सारे कथा लिहित होते. आमच्यासारख्या मराठी माध्यमातून शिकलेल्या वाचकांवर साहजिकच त्या कथांचा खूप प्रभाव पडला. मी लिहिलेल्या कथांचे विषय वेगवेगळे होते. त्यातून माझ्या अवतीभवतीचं सामाजिक वास्तव मी प्रतिबिंबित करत होतो. त्यातल्या 'अॅडमपासून अॅडमपर्यंत' नावाच्या 'सत्यकथा' दिवाळी अंकात आलेल्या दीर्घकथेचा इथे उल्लेख करतो. त्यात ओडिसातल्या राजगांगपूरमध्ये एका मोठ्या उद्योगपतीची मोठी सिमेंट फॅक्टरी आणि त्यात काम करणाऱ्या एका आदिवासी तरुणाच्या छातीत सिमेंटची धूळ जाऊन झालेली नासाडी दाखवली होती. त्याला कंपनीनं मुखवटे, म्हणजे सेफ्टी मास्क, देऊनही त्यानं ते न घालणं, त्याचं दारूचं व्यसन अशीही कारणं होती. एकीकडे औद्योगिक संस्कृतीची आवश्यकता त्या कारखान्यात मला जाणवत होती. दुसरीकडे अॅडम म्हणजे आदिमानव या अर्थानं आदिवासींचं प्रातिनिधिक चित्रही त्यात मी रंगवलं होतं. अॅडम स्मिथ हा कॅपिटॅलिझमचा जनक मानला जातो. तो अॅडम आणि अॅडम इव्हमधला अॅडम , म्हणजे आदिमानव, यांच्यातलं नातं या कथेत मी चितारलं होतं. शेवटी दारूच्या आहारी जाऊन त्याच्या जीवनाची कशी नासाडी होते, हे त्यात होतं. अशा वेगवेगळ्या कथा मी लिहीत होतो. त्यावर अनेक पत्रं यायची. तो व्हॉट्सअप पूर्वीचा काळ होता. एकदा असंच एक सुवाच्च अक्षरात वहीच्या पानावर लिहिलेलं पत्र आलं. अक्षरावरून आणि भाषेवरून ते एखाद्या तरुण मुलीनं लिहिलेलं वाटलं. पुढे तिची बरीच पत्रं येऊ लागली. त्यातील काही तर तीन-चार पानांची असायची. ती मुलगी विलेपार्ल्याला राहायची. पुढे आमची प्रत्यक्ष भेट झाली, मैत्री जुळली आणि नंतर लग्नही झालं. 'एका अपरिचित लेखकाला अशी तीन- चार पानी भरभरून पत्रं लिहिताना तुला संकोच कसा वाटला नाही?' असं एकदा मी तिला लग्न ठरल्यानंतर विचारलं असताना 'तुझं लेखन वाचून तू कमीत-कमी साठ वर्षांचा आहेस, असं मला वाटलं होतं', असं ती म्हणाली! प्रत्यक्षात माझं वय तेव्हा 25 होतं! बहुधा माझा पिंडच गंभीर असल्यानं माझ्या लेखनातही प्रौढता, गांभीर्य असायचं.
'या कथांचा कथासंग्रह मी का काढला नाही' हा प्रश्न आज मलाही पडतो. माझा एक मित्र प्रत्येक भेटीत 'तुझा कथासंग्रह निघायला पाहिजे होता' असं म्हणतो. त्याचं म्हणणं बरोबर आहे, पण तुमचा कथासंग्रह काढायची माझी इच्छा आहे असं म्हणणारा कोणी प्रकाशक मला भेटलाच नाही! तसा कथासंग्रह काढायचा मी आपणहूनही प्रयत्न केला नाही. ही बहुधा माझी चूक होती. भविष्यात कदाचित माझा एखादा कथासंग्रह निघेलही. कारण, माझ्या आठवणीप्रमाणे मी 25-30 तरी कथा लिहिल्या असाव्यात. त्या सगळ्या, त्या वेळेला जी दर्जेदार मासिकं म्हटली जायची, त्यांच्यात प्रकाशितही झाल्या होत्या.
प्रश्न : वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत तुम्ही दोन महत्त्वाच्या कादंबऱ्या लिहिल्या. त्यानंतर मात्र तुमच्या कादंबऱ्या आल्या नाहीत. 'तिसरी चांदणी'ला आणीबाणीची पार्श्वभूमी आहे. 'कॉम्रेड'ची पार्श्वभूमी वडिलांमुळे पाहिलेल्या कामगार चळवळीत असणार. तर या दोन कादंबऱ्यांची मध्यवर्ती कल्पना काय आणि त्यातून तुम्ही काय मांडू पाहताय हे सांगा. शिवाय, आज इतक्या वर्षांनंतर मागे वळून पाहताना तुम्ही त्याकडे कसं पाहता?
- राजकीय पार्श्वभूमीवर मराठीत कादंबरीलेखन झालेलं नाही किंवा पुरेसं झालेलं नाही व त्यामुळे तशा कादंबरीलेखनासाठी मॅजेस्टिक प्रकाशनाचे केशवराव कोठावळे यांनी एक स्पर्धा जाहीर केली होती. त्या स्पर्धेसाठी मी 'तिसरी चांदणी' लिहिली होती. त्यात ती एकच कादंबरी पारितोषिक प्राप्त ठरली आणि तिला तीन हजार रुपयांचं पारितोषिकही मिळालं. स. गं. मालशे परीक्षक होते. त्यावेळी ती रक्कम घसघशीत होती. पुढे मॅजेस्टिकने ती प्रकाशितही केली. त्यानंतर मी 'कॉम्रेड' ही कादंबरी ग्रंथाली प्रकाशनाकरता लिहिली. 'तिसरी चांदणी'मध्ये माझे स्वतःचे तसेच माझ्या जवळच्या मित्रांचेही अनेक अनुभव आहेत. कादंबरीचा इंजिनियर असलेला तरुण नायक, किरण, परदेशी शिकून आलाय. प्रामाणिकपणे उद्योग करण्याच्या जिद्दीतून तो एक कारखाना सुरू करतो, पण राजकीय हस्तक्षेपामुळे तो अजिबात चालत नाही. त्याला तो बंद करावा लागतो. हा त्याचा आयुष्यातला पहिला भ्रमनिरास. त्याला खुणावणारी आणि मग अस्तंगत झालेली पहिली चांदणी. त्या भ्रमनिरासासाठी राजकीय हस्तक्षेप, देशातला भ्रष्टाचार कारणीभूत ठरतो. माझ्या एका मित्रावरच ते कथानक बेतलेलं होतं. सगळी कादंबरी घडते बिहारमध्ये जमशेदपूर परिसरात. त्यानंतर तो नायक एका गांधीवाद्यांच्या, सर्वोदयवाद्यांच्या आश्रमात सामील होतो. तिथलं वातावरण हे सर्वसामान्य आश्रमाप्रमाणेच, पण त्याच्या दैनंदिन जीवनशैलीशी विपरित असं असतं. त्यातही तो जीव रमवतो. पुढे जयप्रकाश नारायण यांचं संपूर्ण क्रांतीचं आंदोलन बिहारमध्ये सुरू होतं. त्या वेळेला बहुतेक सगळ्या गांधीवादी आश्रमांत फूट पडते. कारण, तिथे कार्यरत असणारा एक मोठा गट त्या राजकीय चळवळीत सामील होतो. तर विनोबांच्या आधिपत्याखाली असणारा एक छोटा गट त्या राजकीय चळवळीपासून अलिप्त राहतो. स्वतः किरणला राजकीय प्रक्रियेत अजिबात जायचं नसतं. त्यामुळे तो जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनात सामील होत नाही. मग त्या आश्रमावर गुंड आणि स्थानिक राजकारणी यांच्याकडून संकटं येऊ लागतात. चॅरिटी कमिशनरकडूनदेखील अनेक अडचणी यायला लागतात. त्यातून कसं बाहेर पडायचं हे त्याला कळत नाही. इतर बहुतेक सहकारी त्याला सोडून गेले असतात. बऱ्याच मोठ्या रकमेची खोटीच थकबाकी त्याच्या आश्रमावर लादली जाते. यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला फक्त जेपी मदत करू शकतील असं वाटल्यानं, तो 24 जून 1975 ला त्यांना भेटायला दिल्लीत जातो. पण दिवसभर खूप प्रयत्न करूनही ते भेटू शकत नाहीत. त्याच दिवशी संध्याकाळी जेपींची रामलीला मैदानावर प्रचंड जाहीर सभा असते. सगळे जण त्यातच बिझी असतात. तो जेपींच्याजवळही जाऊ शकत नाही. त्याची ती शेवटची आशाही मावळते. डोळ्यांपुढची दुसरी चांदणीही गळून पडते. पण तरीही शेवटी तो जेपी राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीत जाऊन, पूर्ण अंधारलेल्या आकाशात, एखादी चांदणी कुठे दिसते का याचा शोध घेत राहतो. त्याच्या आयुष्यातील ती 'तिसरी चांदणी' असू शकणार होती. अशा काहीशा आशावादी शक्यतेवर ती कादंबरी संपते.
'कॉम्रेड' या कादंबरीमध्ये मध्यवर्ती पात्र माझ्या वडिलांच्या आयुष्यावर आधारित आहे पण ती एक कादंबरी आहे. त्यातील बहुतेक सर्व पात्रे आणि घटना प्रत्यक्षावर आधारलेल्या आहेत पण तो इतिहास नाही. त्यात कल्पिताचा भागही बराच आहे. भारतातली कामगार चळवळ हा पूर्वीपासून माझ्या अभ्यासाचा विषय असल्यानं कादंबरीतही त्या चळवळीचे चित्रण आणि त्या चळवळीतील विविध टप्पे हे सारं ओघानेच आलेलं आहे.
प्रश्न : 'कॉम्रेड' कादंबरीत कम्युनिस्ट नेते, कार्यकर्ते आणि कमुनिस्ट विचार कसे आलेत? कम्युनिस्ट नेत्यांनी त्या वेळी घेतलेल्या भूमिका याबद्दल काही आलंय का?
- 'तिसरी चांदणी'पेक्षा 'कॉम्रेड'मध्ये ते भरपूर आलेलं आहे. वस्तुस्थिती अशी की, जगभरच्या कम्युनिस्ट पक्षांचं धोरण फार मोठ्या प्रमाणावर मॉस्कोमध्ये, 'कॉमिंट्रॉन' या मध्यवर्ती साम्यवादी संस्थेतर्फे ठरवलं जायचं. कॅपिटॅलिस्ट इंग्रजांविरोधातल्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला कम्युनिस्ट सत्ताधीश स्टॅलिनचा सुरुवातीला शंभर टक्के पाठिंबा होता. 'तुम्ही इंग्रजांशी लढता आहात, म्हणजेच भांडवलशाहीविरुद्ध लढता आहात, आम्हीही त्यांच्याच विरुद्ध लढत आहोत आणि समान शत्रू असल्याने तुम्ही आणि आम्ही मित्र आहोत' अशी त्याची भूमिका होती. पण पुढे दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर जून 1941 मध्ये हिटलरने आपल्या फौजा रशियात घुसवल्या, तेव्हा स्टॅलिनचं धोरण रातोरात बदललं. कारण हिटलरविरुद्ध लढणारी रशिया आणि इंग्लंड ही दोन्ही राष्ट्रे आता अचानक 'मित्र राष्ट्र' बनली. कारण दोघांचा सामायिक शत्रू जर्मनी, म्हणजे हिटलर हा होता. साहजिकच, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातून भारतीय कम्युनिस्टांनी अंग काढून घेतलं. 'ब्रिटिश आपले मित्र आहेत, त्यांच्याविरोधात काय लढायचं?' अशी कोलांटी उडी रशियन दबावामुळे त्यांना मारावी लागली. ते महायुद्ध संपल्यानंतर स्टॅलिनने पुन्हा एकदा आपली भूमिका बदलली. अँटी-ब्रिटन, अँटी कॅपिटॅलिझम ही जुनी भूमिका पुन्हा एकदा स्टॅलिनने स्वीकारली. केंद्रातील काँग्रेस सरकार हे भांडवलशाहीला मदत करणारं आहे अशी भूमिका घेऊन भारतीय कम्युनिस्ट भारत सरकारच्या विरोधात गेले. तेलंगणा येथील सशस्त्र उठाव हे त्याचंच एक अंग होतं. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडितजींनी सुरू केलेल्या पंचवार्षिक योजनांमध्ये परदेशी गुंतवणूक फार मोठ्या प्रमाणावर आवश्यक होती आणि तिथे रशियन सरकारला मोठी संधी दिसत होती. परदेशी मदतीशिवाय पंडितजी ज्याला 'कमांडिंग हाईट्स ऑफ द इकॉनॉमी' असं म्हणत त्या मोठ्या पब्लिक सेक्टर कंपन्या उभ्याच राहू शकल्या नसत्या. त्या वेळी भारतात पब्लिक सेक्टर मध्ये उभारल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पायाभूत कारखान्यांमध्ये, वीजकेंद्रांमध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी रशियाला उपलब्ध झाली. तशी संधी ही दुसऱ्या महायुद्धात झालेल्या नुकसानानंतर रशियासाठीही त्यावेळी आवश्यक होती. कारण महायुद्धात जेवढं नुकसान जर्मनीचं झालं होतं, तेवढंच रशियाचंही झालं होतं. हे सगळं एका मोठ्या पटावरचं चित्र मी इथे अगदी स्थूलमानाने मांडतो आहे. प्रत्यक्षातले ताणे-बाणे थोडेफार वेगळे असणार. अशावेळी जर भारतात आर्थिक गुंतवणूक करायची असेल, तर सत्तारूढ काँग्रेस पक्षाच्या विरोधात आपण जाऊ शकत नाही, हे रशियानं हेरलं. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधातली भूमिका घ्यायची नाही, हे भारतातल्या कम्युनिस्ट पक्षानं स्टॅलिनच्या आदेशानुसार ठरवलं. साहजिकच, भारतातील सार्वजनिक क्षेत्रात फार मोठी गुंतवणूक रशिया करू शकलं. प्रचंड प्रमाणावर रशियन यंत्रसामग्री इथं येऊ शकली. हे सगळं मूलतः रशियाच्या फायद्याचंच होतं.
या कोलांट्या उड्यांची कारणं जेवढी भारतीय, त्यापेक्षा कितीतरी जास्त आंतरराष्ट्रीय आहेत. माझं एक निरीक्षण असं आहे की, भारतात जे घडतं त्यासाठी आपण कुठल्या तरी भारतातील पक्षाला किंवा नेत्याला पूर्णतः जबाबदार धरतो. पण प्रत्यक्षात तसं नसतं. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि समीकरणे त्यासाठी अगदी पूर्णतः नाही तरी बऱ्याच प्रमाणात कारणीभूत असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही घडत असतं, त्याचं प्रतिबिंब भारतात पडत असतं. गेल्या महिन्यात मी पाँडिचेरीला गेलो होतो. एक टीचभर फ्रेंच वसाहत होती ती. अख्खा भारत इंग्रजांनी काबीज केला; अगदी अफगाणीस्तानपासून ब्रम्हदेशापर्यंत. पण हे छोटसं पाँडिचेरी (आत्ताचं नाव पुहूचेरी) जिंकायचा त्यांनी कधी प्रयत्नही केला नाही. त्याचप्रमाणे पोर्तुगीज अंमलाखालील गोवा आपल्यात सामील करून घ्यावा असं त्यांना एकदाही वाटलं नाही. मनात आणलं असतं, तर खरंतर एका दिवसात त्यांना गोवा जिंकता आला असता. तेच पाँडिचेरीबाबतही म्हणता येईल. पण तसं झालं नाही, याचं कारण युरोपात ब्रिटिश आणि पोर्तुगिजांमध्ये तसेच ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यात झालेले समझौत्याचे करार. त्यामुळे 'जिथं पोर्तुगिजांचा किंवा फ्रेंचांचा इंटरेस्ट आहे, तिथं आपण धक्का लावायचा नाही' ही ब्रिटनची भूमिका बनली होती. म्हणजेच इंग्रजांच्या भारतातल्या अनेक धोरणांवर उघडउघड आंतरराष्ट्रीय ठसा होता. तसंच भारतीय कम्युनिस्ट पक्षाबद्दल घडत गेलं. मॉस्कोतील कॉमिन्ट्रॉनच्या भूमिकेवरच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं धोरण ठरत होतं. ही विसंगती काही प्रमाणात 'तिसरी चांदणी'मध्ये शब्दबद्ध झालीय; पण अधिकत्वाने ती 'कॉम्रेड 'मध्ये आलीय.
प्रश्न : या दोन्ही कादंबऱ्या तुमच्या वयाच्या पंचविशीतल्या असाव्यात. त्याच काळात तुमचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर तुम्हाला एका आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत काम करायची संधी मिळाली. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून दीड वर्षं तुम्ही युरोपात तिथल्या वेगवेगळ्या कुटुंबांसोबत त्यांच्या घरी राहिलात असं तुमच्या पुस्तकात तुम्ही लिहिलं आहे. हा काळ इंटरेस्टिंग तर असणारंच, शिवाय तुमचा जगाविषयीचा दृष्टीकोन आकाराला येण्यामागे याचा सहभाग राहिला असणार. कादंबरीलेखनाची प्रक्रिया सुरू असतानाच तुम्ही तिथं होतात की तो काळ जरा मागे-पुढे होता?
कोणत्याही कादंबरीचं लेखन हे त्या विशिष्ट कालखंडातच होत नाही; आपल्या डोक्यात ते कथानक सतत शिजतच असतं. दीर्घकाळ चालणारी ती प्रक्रिया असते. पण प्रत्यक्ष कादंबरीलेखन हे त्या नंतरच्या काळातलं आहे. आधी तिसरी चांदणी आणि मग काही वर्षांनी कॉम्रेड असा तो क्रम आहे.
युरोपमधल्या वास्तव्याचा किंवा एकूणच पाश्चात्त्य संस्कृतीचाही माझ्यावर प्रभाव आहे. मराठी भाषा आणि साहित्यासाठी मासिक चालवणाऱ्या माणसानं असं बोलणं धाडसाचं आणि गैरसमजही निर्माण करणारं आहे; पण ज्याला आपण आधुनिक म्हणतो ती अनेक मूल्यं आणि संस्था यांची निर्मिती बऱ्याच प्रमाणात युरोपात झालेली आहे. लोकशाही, निवडणुका, व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्री- पुरुष समानता, पोलीस यंत्रणा, न्यायालये, आधुनिक विद्यापीठे, आधुनिक वास्तुशास्त्र, पर्यावरणप्रेम, उद्योगसंस्कृती, वैद्यक, नर्सिंग, तंत्रज्ञान, कामगार चळवळ या सगळ्याची सुरुवात मुख्यतः युरोपमध्ये झाली आहे. उदाहरणार्थ, कामगार चळवळीची सुरुवात इंग्लंडमधल्या 'ट्रेड युनियन काँग्रेस (टीयूसी)' या जगातल्या पहिल्या कामगार संघटनेपासून झाली आहे. आधुनिक जगातल्या बहुतेक विचारांची सुरुवातही मुख्यत्वे युरोपात झाली आहे. कम्युनिस्ट मॅनिफेस्टोही मार्क्सनं लंडनमध्येच लिहिला.
एक घटना मला ठळकपणे आठवते. पूर्व आणि पश्चिम असं जर्मनीचं दुसऱ्या महायुद्धानंतर विभाजन झालं हे सगळ्यांनाच माहिती आहे. पश्चिम जर्मनी हा देश मुक्त अर्थव्यवस्था राबवत होता तर पूर्व जर्मनी हा देश साम्यवादी अर्थव्यवस्था राबवत होता. त्यातला पश्चिम जर्मनी हा देश अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांच्या प्रभावाखाली होता तर पूर्व जर्मनी हा देश रशियाच्या प्रभावाखाली होता. बर्लिन हे शहर पूर्व जर्मनीत होतं, पण एखाद्या बेटाप्रमाणे ते होतं; चारी बाजूंनी पूर्व जर्मनी या देशाने वेढलेलं. त्या बर्लिन शहराचीही पूर्व बर्लिन आणि पश्चिम बर्लिन अशी फाळणी झाली होती. बर्लिन ही पूर्वी हिटलरची राजधानी असल्यानं असं महत्त्वाचं शहर कुठल्याच बाजूला दुसऱ्या बाजूसाठी पूर्णतः सोडायचं नव्हतं. त्यामुळे दोन्ही बाजूंनी एकत्र बसून बर्लिन शहराची फाळणी केली. पूर्व बर्लिन साम्यवादी सत्तेखाली आलं, तर पश्चिम बर्लिन मुक्त अर्थव्यवस्थेखाली आलं. मी तिकडे गेलो होतो तेव्हा माझा मुक्काम पश्चिम बर्लिनमधे होता. त्यावेळी मी रशियानं बर्लिनची फाळणी करण्यासाठी उभारलेल्या बर्लिन वॉलला अनेकदा भेट दिली होती. आपल्या साम्यवादी पूर्व जर्मनीतले लोक, पश्चिमेकडे जाऊ नयेत यासाठी बांधलेली ती भिंत होती. त्या भिंतीवर लोखंडी तारांचं कुंपण होतं आणि त्यातून विद्युतप्रवाह खेळवला जायचा. शिकारी कुत्रे त्या तटबंदीच्या अवतीभवती पहारा देत. कडक सशस्त्र सैनिक चोवीस तास तिथे असत. पण त्या सगळ्या जीवघेण्या संकटांवर मात करून कम्युनिस्ट पूर्व जर्मनीतले अनेक तरुण जिवाच्या करारानं पश्चिम जर्मनीत जायचे. म्हणजेच पूर्व बर्लिनमधून पश्चिम बर्लिनमधे यायचे. कारण, एकदा पश्चिम बर्लिनमधे त्यांनी प्रवेश केला की, आपण नक्की समृद्ध होऊ, याची त्यांना खात्री असायची. पश्चिमेची समृद्धी त्यांना थोडीफार ठाऊक झाली होती. शिवाय एकदा पश्चिम बर्लिनमधे गेलं की पश्चिम जर्मनीसह जगातील कोणत्याही मुक्त अर्थव्यवस्थेच्या देशात त्यांना जाता येत होतं. त्यासाठी जिवावर उदार व्हायला हे तरुण तयार होत, त्यांच्यापैकी अनेक त्या प्रयत्नात मृत्युमुखीही पडत. त्यांची ती धडपड बघणे हा माझ्यासाठी खूपच धक्कादायक अनुभव होता. लहानपणापासून मी 'सोव्हिएत लँड' हे नियतकालिक आणि त्यांची अन्य प्रकाशने वाचत होतो. तिथली सगळी प्रकाशनं आमच्याकडे फुकट यायची. पूर्व जर्मनीहूनदेखील अनेक प्रकाशने घरी यायची. 'धुक्यातून लाल ताऱ्याकडे' या अनंत काणेकरांच्या रशियन प्रवासाचं वर्णन करणाऱ्या पुस्तकानं आम्हाला भुरळ घातली होती. बर्लिनमधली परिस्थिती बघितल्यावर 'ते सगळं खरं होतं का?' असा प्रश्न मला पडला. कम्युनिस्ट राजवट म्हणजे खरंच स्वर्ग होता का? आणि तसं असेल, तर हे सगळे पूर्व बर्लिनमधील बुद्धिमान तरुण स्वतःचा जीव धोक्यात टाकून पश्चिमेकडे का जात होते? बर्लिन भिंतीनं माझ्या तोवरच्या विचारसरणीलाच मोठा धक्का दिला.
प्रश्न : युरोपातल्या दीड वर्षांच्या काळात तुम्ही काय अनुभवलं? काय पाहिलं?
- याचं उत्तर म्हणजे खरं तर एका स्वतंत्र मोठ्या लेखाचा विषय आहे! तुम्ही विचारता म्हणून अगदी थोडक्यात दोन-चार गोष्टी सांगतो. तिथल्या युरोपियन कुटुंबांसोबत राहताना जे संस्कार माझ्यावर झाले, ते संस्कारशील वयात फारच महत्त्वाचे होते. आपली बॅग आपण उचलणं ही अगदी साधी गोष्ट. पण तिथे ती मी प्रथम अंगी बाणवली. त्यामुळेच आता माझी बॅग कुणी दुसरं उचलत असेल, तर त्यानंही मी अस्वस्थ होतो. किंवा माझी प्लेट अथवा कप मी स्वतः उचलून, विसळून ठेवणं हे माझ्यात नैसर्गिकपणे येतं. स्वतःचे कपडे स्वतः धुणं, शक्यतो आपली व्यक्तिगत कामं दुसऱ्याला न सांगणं, ती स्वतः करणं हा श्रमसंस्कार युरोपातूनच आलाय. दिलेला शब्द, तसेच दिलेली वेळ कटाक्षाने पाळणं हे तिथलेच संस्कार. त्याचबरोबर करुणेपोटी केलेली रुग्णसेवा किंवा समाजसेवा ही तिथलीच. स्वामी विवेकानंदांनीही म्हटलंय की, बायबलमध्ये जशी चॅरिटी सांगितली आहे, तशी कोणत्याही अन्य धर्मात नाही. हे सगळं थोडक्यात सांगणं फार अवघड आहे.
एक छोटासा प्रसंग सांगतो. एकदा मी आनंदवनात गेलो होतो. भारतीताई या बाबा आमटेंच्या सुनेशी बोलणं सुरू होतं. त्या पुण्यातल्या बी. जे. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी. त्या शिकत असतानाचा एक अनुभव त्या सांगत होत्या. त्यांच्याकडे एक पेशंट आला. त्याचा पाय पूर्णतः सडला होता, पू वगैरेही झाला होता. त्याला हात लावायचीही त्यांना भीती वाटत होती. तिथं शेजारीच एक केरळची कॅथलिक ख्रिश्चन नर्स होती. तिनं मात्र सरळ तो सडलेला पाय उचलला, आपल्या मांडीवर घेतला, ड्रेसिंग केलं, सगळं साफही केलं. 'तुला हे सगळं करताना त्याची किळस वाटली नाही का?' असं भारतीताईंनी त्या ख्रिश्चन नर्सला नंतर विचारलं. त्यावर ती नर्स म्हणाली, 'अजिबात नाही. कारण माझा येशू स्वतः हे करायचा' अशी रूग्णसेवा हे मुख्यतः पाश्चिमात्यांचं योगदान आहे. स्वतः नास्तिक असलेले एसेम जोशी जेव्हा रुग्णालयात अखेरच्या घटका मोजत होते तेव्हा त्यांनाही आलेला एका कॅथॉलिक नर्सचा अनुभव असाच असल्याचं त्यांनी लिहून ठेवलं आहे.
प्रश्न : या सगळ्या अनुभवांवर एखादी छोटी पुस्तिका, पुस्तक किंवा फारतर एखादा दीर्घलेख लिहावा असं तुम्हाला कधीच नाही वाटलं?
- पुस्तक वगैरे कधी नाही लिहिलं; पण 'माणूस' साप्ताहिकात मी तेथील अनुभवांवर आधारित दोन दीर्घ लेख लिहिले होते. त्यांचं शीर्षक होतं, 'गरीब राष्ट्रे आणि श्रीमंत राष्ट्र'. इतिहासात सगळं जग गरीबच होतं; काही मूठभर राजेरजवाडे किंवा जमीनदार श्रीमंत असतीलही, पण जगातील सर्वसामान्य जनता साधारण सोळाव्या शतकापर्यंत गरीबच होती. त्यानंतर सोळाव्या-सतराव्या शतकापासून जी क्रांती झाली, त्यात मध्यमवर्ग पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर उदयाला आला. तसं पाहिलं तर समाजाची गरिबी सगळ्याच राष्ट्रांना दूर करायची होती. 'गरिबी हटाओ'चा नारा एका अर्थाने जगभराचा होता! पण मग काही देशांमध्येच ती गरिबी का दूर झाली आणि काही देशांमध्ये ती दीर्घकाळ का कायम राहिली याचं विश्लेषण त्या दोन लेखांत मी केलं होतं. या पाश्चात्त्य देशांनी त्यांच्या वसाहतींच्या केलेल्या शोषणातून श्रीमंती निर्माण झाली असं अनेक भारतीय मांडतात. तसं त्यांनी आपलं शोषण केलंही; कारण शेवटी ते जेते होते आणि आपण जीत होतो. पण त्यांनी केलेलं वसाहतींचं शोषण हे त्यांच्या श्रीमंतीचं एकमेव कारण होतं हे मात्र मला कधीच पटलं नाही. उदाहरणार्थ, स्वित्झर्लंडसारखा जगभरात एकही वसाहत नसणारा देश युरोपात सगळ्यात श्रीमंत आहे. वसाहतींच्या शोषणातूनच संपत्ती निर्माण झाली असती, तर स्वित्झर्लंड वर्षानुवर्षापासून सगळ्यात श्रीमंत कसा ? उलटपक्षी, जगभरात सगळ्यात जास्त काळ वसाहती असणारा पोर्तुगालसारखा देश युरोपात सगळ्यात गरीब आहे. म्हणजे संपत्तीची कारणं इतकी साधी, वरवरची नाहीत. मग ती नेमकी काय असतील याचाही वेध मी त्या लेखात घेतला होता. मी अर्थतज्ज्ञ नसल्यामुळे माझ्या मताला कोण किंमत देणार, असा विचार करून पुढे या विचारावर मी काहीही लिहिलं नाही!
प्रश्न : तुमच्या अंतर्नादपूर्व वाटचालीतला एक भाग म्हणजे 'हिंमत' नावाचं इंग्रजीतून प्रकाशित होणारं नियतकालिक. राजमोहन गांधी हे त्याचे संपादक होते. हिंमतबरोबरच्या काळानं तुम्हाला काय दिलं?
- त्या काळानं मला खूप काही दिलं. आमच्या हिंमतमधल्या दहा-बारा जणांच्या टीममधले जवळजवळ सगळेच त्यावेळी तरुण होते. ही सगळी मंडळी अतिशय प्रामाणिक, निष्ठावान आणि ध्येयवादी होती. राजमोहन गांधी हे मुख्य संपादक असले, तरी ते सगळी कामं स्वतः करत नव्हते. आर. एम. लाला संपादनाचं काम बघायचे. कल्पना शर्मा, निरजा चौधरी, रूपा चिनाई, शहनाझ अंकलेसरिया, संजय हझारिका, डेव्हिड डेविदार, विजिथा यापा वगैरे जवळजवळ सगळ्यांच्या आयुष्याची ती सुरुवात होती. आज आपापल्या क्षेत्रात त्यांची उंची खूप आहे. पण त्या सर्वांची सुरुवात हिंमत ही होती. ती 'नोकरी' असंही म्हणता येणार नाही, कारण सगळे नाममात्र मानधन घेऊनच काम करत होते. सगळे एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारायचे. उच्च-कनिष्ठ असा काहीही भेदभाव नव्हता. हिंमतमध्ये कोणत्याही प्रकारचं कामाचं विभाजनही नव्हतं. त्यामुळे मासिकाचे गड्ढे उचलण्यापासून सगळी कामं सगळे करत होते. ते एक वेगळंच वातावरण होतं. पुढे अनेक कारणांनी हिंमत बंद पडलं. ही सगळी मंडळी विखुरली. राजमोहन गांधी अमेरिकेत शिकवायला गेले आणि चरित्रकार झाले. रुसी लाला दोराब टाटा ट्रस्ट या टाटांच्या सर्वांत मोठ्या ट्रस्टचे डायरेक्टर बनले; टाटांचे अधिकृत चरित्रकार बनले. कल्पना शर्मा 'हिंदू'मध्ये, तर रूपा चिनाई 'टाइम्स'मध्ये गेली. शहनाझ अंकलेसरियाने स्वामिनाथन अय्यर यांच्यासोबत लग्न केलं आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली. निरजा चौधरी 'इंडियन एक्सप्रेस'मधे गेली. आज जवळजवळ रोजच टीव्हीवरच्या कुठल्या ना कुठल्या परिसंवादात ती असते. दिल्लीहून पुण्यात आली की अनेकदा मला भेटते. पण बाकी कुणाशी मात्र माझा फार काही संपर्क येत नाही. परंतु एक सांगावंसं वाटतं की, पत्रकारितेत ज्या प्रकारचे समझोते केले जातात, तसे यांच्यापैकी कोणीच कधी केले नाहीत.
हिंमतमध्ये काही गोष्टी खूप कटाक्षाने पाळल्या जायच्या. त्या तिथे माझ्या अंगवळणी पडल्या. तुम्ही जे काही लिहाल, ते अचूक आहे की नाही याची खात्री करून घ्यायची, त्यात कंटाळा करायचा नाही, गरज पडेल तसे संदर्भ तपासायचे. त्यावेळी गुगल नव्हतं. त्यामुळे वेगवेगळी पुस्तकं वाचायला लागायची; पण छापू ते अचूकच असलं पाहिजे, असा आग्रह असायचा. पुस्तकात नसेल, तर वेगवेगळ्या माणसांना भेटणं अपेक्षित असायचं. आपल्या लेखनात स्वतःचा ब्रँड पुढे न रेटणं हेही तिथं शिकायला मिळालं. वाचन, व्यासंग, मेहनतीनं काम करणं, वक्तशीरपणा असे बरेच गुण हिंमतमध्ये मला प्रत्यक्ष बघायला आणि शिकायला मिळाले.
एकदा नानासाहेब गोरेंची मुलाखत घ्यायला मी पुण्याला आलो होतो. सदाशिव पेठेत त्यांचं घर शोधलं, दिवसभर त्यांच्या सोबत राहिलो. तेव्हा दिल्लीवरून जनता पार्टीनं त्यांची नेमणूक लंडनमध्ये हाय कमिशनर म्हणून केली होती. मी त्यांच्यावर एक लेख लिहिला होता, 'फ्रॉम सदाशिव पेठ टू इंडिया हाऊस'. दत्ता सामंतांवर एक प्रदीर्घ मुखपृष्ठकथा केली होती. जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनामध्ये आपापले कॉलेज सोडून सामील झालेल्या तरुणांचं पुढं काय झालं हे शोधण्यासाठी मी पटण्यालाही गेलो होतो. त्यातल्या अनेक तरुणांना भेटलो. अशा विविध प्रकारचं लेखन इंग्रजीत करायची संधी मिळाली हे हिंमतचं माझ्यावरचं मोठं ऋण आहे. मी त्यापासून पूर्णतः कधीच मुक्त होऊ शकणार नाही. पुढे हिंमतमधल्या निवडक लेखांचं एक संकलन मी हिंमत पब्लिकेशन्स ट्रस्टच्या वतीनं माझ्या पुढाकारातून प्रसिद्ध केलं. कुमार केतकरांच्या हस्ते 2 ऑक्टोबर 2009 रोजी वरळीला नेहरू सेंटरला त्याचं प्रकाशन झालं. त्याचं थोडं समाधान मनात आहे.
हिंमतमधली सगळी मंडळी प्रामाणिक होती, पण एक गोष्ट लक्षात आली की, ती सारी मंडळी आंग्लाळलेली होती. ते अशा अर्थानं की, त्यातल्या कुणाचंच शिक्षण आपल्या मातृभाषेत झालं नव्हतं. मी मराठीत लिहितो, मराठी भाषेबद्दल मला ममत्व आहे हे त्यांना माहीत होतं; पण त्यांच्यापैकी कुणालाच कोणत्याही भारतीय भाषेबद्दल तसं प्रेम नव्हतं. त्यामुळे मी अंतर्नाद सुरू करायचं ठरवलं, तेव्हा मी 'वरच्या पायरीवरून खालच्या पायरीवर आलो' असं त्यांना वाटत असावं. एक सुरेश वझिरानी सोडला, तर त्यांच्यापैकी कुणीही अंतर्नादमधे रस दाखवला नाही. त्याविषयी माझ्या मनात काही राग मात्र नाही; कारण माझी त्यांच्याकडून तशी अपेक्षाही नव्हती. ती मंडळी वागायला साधीच होती. त्यांनी कुठलंही बुरखा वगैरे पांघरलेला नव्हता. खोट्या नम्रतेचा आवही नव्हता. मात्र माझ्यापुरता आयुष्यातला तो अध्याय संपला आहे असंच मी समजतो.
प्रश्न : हिंमतनंतर एक मोठा वळण बिंदू आला आणि तुमच्या आयुष्याचा उत्तरार्ध सुरू झाला. हिंमत आर्थिक आणि अन्य कारणांमुळे डबघाईला येणं ही प्रक्रिया एका बाजूला चालू असताना तुम्ही अंतर्नाद सुरू करण्याचा निर्णय घेतला का? का काही झालं तरी एक मराठी मासिक मला सुरू करायचंय हे तुमचं आधीच ठरलं होतं?
- हे दोन्ही मुद्दे तसे बरोबर आहेत. मी आणि वर्षानं लग्न करायचं ठरवलं, तेव्हा त्याआधीच आमची मराठी मासिक सुरू करण्याविषयीची चर्चा चालायची. कारण मासिकं वाचून आमच्या जीवनात प्रचंड आनंद निर्माण झाला होता; आम्ही त्या वाचनातून बरंच काही शिकलो होतो. पण त्याच वेळी मराठी मासिकांची दैन्यावस्था आम्हाला ठाऊक होती. आमच्याकडे आर्थिक भांडवल काहीही नव्हतं. त्यामुळे मासिकावर आपला संसार चालणार नाही याचीही जाणीव होती. तेव्हा 'आपल्या आमटी-भाताची सोय होईपर्यंत आपण प्रिंटिंग बिझनेस करू आणि सोय झाली असं वाटलं की मग मात्र लगेचच मासिक सुरू करू' असं आम्ही ठरवलं होतं; शिवाय त्यासाठी फार वय होईस्तोवर थांबायचं नाही हेही ठरवलं होतं. कारण बरेच लोक आयुष्यात जे त्यांना मनापासून करावंसं वाटतं, ते करण्यासाठी अगदी वृद्धावस्थेपर्यंत वाट पाहतात. तोवर बराच उशीर झालेला असतो. प्रत्येकानं त्याचा 'अंतर्नाद' ऐकून त्यानुसार वागायचा प्रयत्न शक्य तितक्या लवकर करायला हवा असं आम्हाला वाटायचं. त्यानुसार मग साधारण 1993 साली आम्ही आयुष्याचा नीट आढावा घेतला. विचार केला, की आपल्या गरजा आता बऱ्यापैकी पुऱ्या होतील इतकी तजवीज झालेली आहे, आपल्याला एकच मुलगी आहे, आपल्याला कुणाचं कर्ज नाही. त्यामुळे थोडाफार धोका पत्करूनही आता आपण मासिक सुरू करू शकतो. त्यासाठी पुण्याला जायचं आम्ही ठरवलं. ते चूक होतं की बरोबर, हे सांगणं आता अवघड आहे. पण त्या काळी पुण्यात जागेच्या किमतीही खूप कमी होत्या. त्यामुळे ते फार काही जड गेलं नाही. अर्थात हे सारं स्थित्यंतर सहजगत्या झालं असंही नाही. प्रत्येक दिवस बऱ्यापैकी संघर्षाचा होता.
संवादक : विनोद शिरसाठ
शब्दांकन : रेणुका कल्पना
या मुलाखतीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Tags: antarnaad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या