आमची उमेद सतत वाढतच गेली होती. 2012 पर्यंतची वर्षं ही उमेदीची, उत्साहाची, आनंदाची अशीच होती. सहकार्य करणारे अनेक जण भेटल्यानं आम्ही त्या काळात कधीही खचून गेलो नाही. अंतर्नादच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन आनंद यादव यांच्या हस्ते झालं आणि त्या प्रकाशन समारंभाच्या शांता शेळके अध्यक्ष होत्या. समारंभात मुकुंदराव किर्लोस्कर उत्स्फूर्तपणे बोलले होते. ही मंडळी त्यावेळी साहित्यक्षेत्रात खूप नामांकित होती. प्रकाशनाला साहित्यक्षेत्रातील सर्व वयोगटातली माणसं आली होती. 'इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की, मानधनाची कोणतीही अट न घालता, आपलं उत्तोमत्तम लेखन त्यांनी अंतर्नादकडे द्यावं', असं आवाहन शांताबाईंनी त्यावेळी आपल्या भाषणात केलं होतं. लवकरच त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली. 'कविता स्मरणातल्या' नावाचं एक सदर त्यांनी अडीच-तीन वर्ष चालवलं.
'अंतर्नाद'चे संपादक 'भानू काळे' यांची दीर्घ मुलाखत आपण दोन भागात घेत आहोत. पूर्वार्धामध्ये अंतर्नाद सुरू होण्यापूर्वीचा, वयाच्या चाळीशीपर्यंतचा टप्पा आला आहे. त्या काळातलं त्यांचं वाचन, त्यांचं लेखन, त्यांनी 'हिंमत' या साप्ताहिकात केलेलं काम हे सगळं आलंय. त्या सगळ्या प्रक्रियेतून 'भानू काळे' नावाचे एक संपादक कसे आकाराला आले हे स्पष्ट होतं. या संपादकाची पूर्वतयारी कशी झाली हे समजून घेण्यासाठी हा पूर्वार्ध खूप महत्त्वाचा आहे. त्यातल्या शेवटच्या प्रश्नात 'अंतर्नाद' सुरू करण्याचा निर्णय फार पूर्वीच घेतलेला असला, तरी तिथपर्यंत पोचण्याची नेमकी प्रक्रिया काय होती, हे थोडक्यात आपल्याला सांगितलंय. मुलाखतीच्या उत्तरार्धात अंतर्नादची पाव शतकाची - नेमकेपणानं सांगायचं, तर 26 वर्षांची वाटचाल कशी होती, ते आपण बघणार आहोत.
ऑगस्ट 1995 मध्ये 'अंतर्नाद' हे मासिक सुरू झालं. त्यासाठी 1994 मध्ये भानू काळे त्यांच्या पत्नीसह मुंबईवरून पुण्याला स्थायिक झाले. पुण्यातून मराठी साहित्य आणि संस्कृती यांचं संवर्धन करण्यासाठी त्यांच्या मासिकाच्या माध्यमातून योगदान द्यावं, अशी त्यांची प्रामाणिक भूमिका होती. त्या भूमिकेसह अतिशय सचोटीने, पारदर्शकतेनं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुणवत्ता आणि दर्जा हे दोन्हीही राखून त्यांनी पाव शतक काम केलं.
अंतर्नादचा प्रारंभ कसा झाला, त्यात काय चढ-उतार आले, अंतर्नादमधून आत्ताचं 'मानस' कसं आकाराला आलं आणि या मासिकानं मराठी साहित्याला काय दिलं असा चर्चासंवाद होईल.
प्रश्न : 1994 मध्ये तुम्ही पुण्यात आला, तेव्हा तुम्हाला 'हिंमत'ची पार्श्वभूमी होती. राष्ट्रीय स्तरावरच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या नामवंतांचा सहवास तुम्हाला लाभला होतात आणि तुम्ही त्यांच्या संपर्कातही होतात. मराठी, इंग्रजीचं उत्तम वाचन होतं. दोन कादंबऱ्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. तोपर्यंत तुम्ही वयाच्या चाळीशीत आला होतात. म्हणजे समोरच्या वीस ते पंचवीस वर्षांची बांधणी तुम्हाला दोघांनाही करावी लागली असणार. अशा पार्श्वभूमीवर फार परिचय नसलेल्या एका शहरात जाऊन एक मासिक सुरू करायचं यासाठी तुम्ही कोणत्या स्वरूपाची तयारी केलीत?
- ही पूर्वतयारी मी पुण्याला आल्यावर नव्हे तर मुंबईत असतानाच, म्हणजे साधारण 1993 मध्ये सुरू केली होती. सगळ्यात पहिले म्हणजे माझ्याकडे संग्रही असलेले आणि अन्यत्र उपलब्ध होऊ शकणारे नव्या-जुन्या मासिकांचे जास्तीतजास्त अंक चाळून घेतले. त्यातल्या उणिवा कोणत्या होत्या, जमेच्या बाजू कोणत्या होत्या या सगळ्यांची पद्धतशीर नोंद करत गेलो. मराठी मासिकांना साधारण नव्वदचं दशक सुरू होतानाच अवकळा आली होती, हे तर उघड होतं. त्यांच्या हातून झालेल्या चुका आपण टाळाव्या आणि अधिक चांगली निर्मिती करू या, असा प्रयत्न होता. त्यानंतर या मासिकामागची आपली नेमकी भूमिका काय आहे आणि कशाकरता आपण हे सुरू करतो आहोत, ते कागदावर लिहिलं. त्यात समाविष्ट नव्हता असा एक व्यक्तिगत भाग म्हणजे मला आयुष्यात कधीच सर्वसामान्य माणसाप्रमाणे जगायचं नव्हतं. एक प्रकारचा आदर्शवाद माझ्या आयुष्यात नेहमीच होता. ज्यात आपली आवड जोपासली जाईल, पण त्याचबरोबर समाजालाही काही लाभ होईल अशा प्रकारचा काही उपक्रम करायचा असं आमच्या डोक्यात होतं. त्यामुळे हे सगळे विचार मी लिहून काढले. त्यात मराठी भाषेचं, मातृभाषेचं नेमकं महत्त्व काय आणि तिचं संवर्धन कशासाठी करायचं हेही होतं. हाच आमच्या कामाचा गाभा होता. त्यामुळे त्याबद्दलची कोणतीही मोघम, अर्धकच्ची भूमिका मला नको होती.
मातृभाषा हा आपला सगळ्यात मोठा सांस्कृतिक वारसा आहे, दोन माणसांना जोडणारा हा सर्वात महत्त्वाचा पूल आहे, आपल्या खोलवरच्या भावनांची अभिव्यक्ती मातृभाषेतच प्रभावीपणे होऊ शकते अशा सगळ्या गोष्टी मी लिहून काढल्या. त्याचबरोबर मासिक या प्रकाराचं वेगळेपणही मी लिहून काढलं. वृत्तपत्रात प्रत्येक घटनेवर घाईघाईनं भाष्य करणं आवश्यक असतं. उद्या ती बातमी शिळी होणार असते. पण मासिकाची ती गरज नसते. त्यामुळे मासिकानं प्रकाशित केलेल्या लेखनाकरता पुरेसा वेळ देता येतो. वाचकाच्या वेळेवरही मासिक आक्रमण करत नाही. त्याला वाचायला पुरेसा अवधी मिळतो. मासिक हे माध्यम साहित्याच्या प्रकटीकरणाकरता मला सर्वाधिक उपयुक्त वाटतं. त्याची पूर्वाश्रमीची उदाहरणं मी अभ्यासली होती. 'सत्यकथा', 'किर्लोस्कर', 'स्त्री' यांच्यासारख्या मासिकांनी किती मोठं योगदान दिलं आहे ते मला माहीत होतं. त्यामुळे मासिक हेच माध्यम निवडायचं याविषयी शंका नव्हती.
त्यातून ते तयार झालेलं निवेदन या क्षेत्रातील माझ्या माहितीतल्या साधारण 40-50 जणांना पाठवलं. शक्य होतं त्या सगळ्या लोकांना प्रत्यक्ष भेटलो. साहित्वर्तुळातल्या माझ्या माहितीच्या माणसांशी चर्चा केली. व्यावहारिकदृष्ट्या विचार केला तर मासिक सुरू करायच्या आधीच त्याचं नाव निश्चित करून घ्यावं लागतं. 'रजिस्ट्रार फॉर न्यूजपेपर्स ऑफ इंडिया' या माहिती आणि प्रसारण खात्याच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या केंद्रीय शासकीय संस्थेत अर्ज करावा लागतो. कलेक्टरकडे जाऊन डिक्लेरेशन करावं लागतं. अशा इतरही काही तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागते. या सगळ्या गोष्टी जुळण्यामध्ये साधारण एक- दीड वर्ष गेलं. 'अंतर्नाद' हे मला हवं असलेलं नावच सुदैवाने मला मंजूर झालं. माझ्या एकूण जीवनविषयक धारणेशी मिळताजुळता असल्यानं 'अंतर्नाद' हा शब्द मला खूप प्रिय होता.
कोणतीही कला म्हणजे त्या कलाकाराचा अंतर्नादच असतो. तो त्याचा खराखुरा अंतर्नाद असेल, तरच त्या कलेला जिवंतपणा, उत्कटता प्राप्त होते. माझ्याशेजारीच माझ्या भावाचा वर्गमित्र (आणि पर्यायानं माझाही) श्रीनिवास तळवलकर याची प्रिटिंग प्रेस होती. तो आणि मी वरचेवर एकमेकांना भेटायचो, गप्पा मारायचो. त्याच्या कुटुंबात सगळे बहुतेक डॉक्टरच होते. पण तो स्वतः मात्र एक मुद्रक होतं. स्वाध्याय परिवाराचे जनक पांडुरंगशास्त्री आठवले यांचा तो जावई होता. शास्त्रींच्या स्वाध्याय परिवाराचं काम जगभर पसरलं होतं. त्यांच्या पुस्तकाची छपाई जेकब सर्कलला असलेल्या त्यांच्या एका प्रेसमध्ये व्हायची. पण तेही काम श्रीनिवासच सांभाळायचा. त्यामुळे त्याला पुस्तकप्रकाशनाची आणि एकूणच साहित्यविश्वाची बरीच माहिती होती. त्याच्याशी गप्पा मारताना अंतर्नाद हे नाव पुढं आलं होतं. पुण्याला मुंबईपेक्षा जास्त चांगलं साहित्यिक वातावरण आहे असा माझा समज होता म्हणून इथं पुण्याला यायचं ठरलं. मला वाटतं ललितमध्ये 'ठणठणपाळ' यांचे लेख वाचून माझा तो समज झाला होता! श्री. ज. जोशी, विद्याधर पुंडलीक, वि. ग. कानिटकर वगैरे पुण्यातील साहित्यिकांविषयी विनोदी शैलीने ठणठणपाळ अनेकदा लिहीत असे ! शिवाय बऱ्याच प्रकाशकांची कार्यालये वगैरेही पुण्यातच अधिक होती.
पुण्यात आलो, तेव्हा पुण्यात आमचा दोघांचाही एकही नातेवाईक नव्हता. तरीही पुणं योग्य ठरेल असं आम्हाला वाटत होतं. तेव्हा पुण्यात स्वस्ताई होती. त्यामुळे औंधला फ्लॅट घेणं वगैरे जमून गेलं. सुरुवातीला गॅस सिलेंडर घेणं, बँक खातं उघडणं, मुलीला शाळेत प्रवेश घेणं वगैरे बरीच व्यावहारिक कामं करण्यात काही दिवस निघून गेले. पण मग त्यानंतर दिवसभर करायचं काय असा प्रश्न होता. मासिकाची पूर्वतयारी एकीकडे चालू असली तरी ते प्रत्यक्ष सुरू झालं नव्हतं व त्यामुळे तेव्हा मोकळा वेळ असा बराच असायचा. तेव्हा मग आम्ही औंध येथेच 'ऊर्मी वाचनालय' सुरू केलं. सुदैवाने आम्हाला त्यासाठी चांगली अशी जागाही मिळून गेली. वाचनालयाचं बहुतेक सर्व काम माझी पत्नी वर्षाच बघायची. तिच्या मदतीला मयुर जोगळेकर नावाचा जवळच राहणारा एक विद्यार्थी काम करायचा. आता तो मोठा वकील झाला आहे. जवळपास पुढची दहा वर्षं ऊर्मी वाचनालय उत्तम चाललं. तेच अंतर्नादचंही कार्यालय होतं. त्याच जागेत पार्टिशन घालून आम्ही दोन भाग केले होते. पुढच्या भागात वाचनालय आणि मागच्या भागात अंतर्नाद कार्यालय. मुख्य रस्त्यावर असल्याने आणि पार्किंगला समोर बरीच जागा असल्याने ऊर्मी वाचनालय चांगलं चालायलाही लागलं. त्याचा प्रचार करताना सांगितलेल्या गोष्टीही लोकांना भावल्या असाव्यात. 'तुम्ही तीस-चाळीस वर्षांपूर्वी वाचलेला रॉबिन हूड किंवा इसाप आजही आठवतो. पण टीव्हीवर परवा बघितलेल्या सिरियलमधल्या अमुक अमुक पात्राचं पुढे काय झालं असं विचारलं, तर ते आठवणार नाही. मानवी मनावर दीर्घकाळ टिकणारे संस्कार करण्याची लिखित शब्दांची क्षमता आजही अतुलनीय आहे', अशा काही गोष्टींचा समावेश असलेलं एक पत्रक आम्ही औंध भागात वाटलं होतं. त्याला छान प्रतिसाद मिळत गेला आणि बघताबघता पाचशे जण वाचनालयाचे सदस्य झाले. पुण्याला आलो तेव्हा आम्हाला ओळखणारं तिथे कुणीही नव्हतं. तशा औंध भागात आम्हाला एक वेगळी ओळख देऊन आमची ती आंतरिक गरज ग्रंथालयानं भागवली. त्यात आम्ही इंग्रजी पुस्तकंही ठेवायचो. त्यामुळे आजूबाजूच्या अमराठी लोकांमध्येदेखील आम्हाला एक ओळख प्राप्त झाली.
ऊर्मी वाचनालयातच अंतर्नाद मासिकाची सुरुवात झाली. सुरुवातीला वाचनालयाचं काम बघता बघता अंतर्नादचंही व्यावहारिक काम वर्षा पाहायची. हळूहळू लोकांशी संपर्क वाढत गेला. ज्याला आज नेटवर्किंग म्हणतात, असे 'ओळखीचे धागे जुळत जाणं' हे मासिकासाठी खूप आवश्यक होतं. मी कोणत्याही राजकीय पक्षाचं, विचारधारेचं, संघटनेचं प्रतिनिधित्व करत नव्हतो. त्यामुळे त्यांच्या रेडिमेड नेटवर्कचा मला काहीही उपयोग नव्हता. त्यामुळे अंतर्नादचं हे नेटवर्क स्वतः निर्माण करण्यात काही वेळ गेला, पण मासिकाची सुरुवात यथास्थित झाली. संपादन आणि व्यावहारिक कामं ही मासिकाची दोन महत्त्वाची चाकं सुरू झाली. अर्थात त्या दोन्ही पातळ्यांवर अडचणी येत होत्या, त्या आम्ही सोडवत गेलो. एका मासिकाचा उदयास्त या पुस्तकात हे सारं विस्ताराने लिहिलं आहे.
प्रश्न : ऑगस्ट 1995 नंतरचं सुरुवातीचं पहिलं वर्ष अर्थातच अतिशय महत्त्वाचं असणार. त्या काळात आपली पुढची वाटचाल कशी होईल याबद्दल संभ्रम निर्माण होऊ शकतो किंवा विचार डळमळीत होऊ शकतात. त्यात मालक, चालक, संपादक अशा दोन- तीन भूमिका तुम्ही निभावत होतात. त्याचं अर्थकारण जुळवणंही चाललं होतं. पुणेकरांसाठी तुम्ही नवीन होतात. आजच्या तुलनेत, पुण्यात कितीही नाही म्हटलं, तरी साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात दिग्गज म्हणावेत अशा लोकांची संख्या बरीच होती. पहिल्या महिन्यात मासिकाचे शंभरएक जण वर्गणीदार झाले आणि पहिल्या वर्षाच्या शेवटाला एक हजार वर्गणीदार असा तुमचा प्रवास झाला. हा प्रवास कसा होता? ज्या ऊर्मीने तुम्ही मासिक सुरू केलं, ती वर्षअखेर टिकून होती की मन थोडं चिंतीत झालं होतं?
- उलटंच होत होतं. आमची उमेद सतत वाढतच गेली होती. साधारण 2012 पर्यंतची वर्षं ही उमेदीची, उत्साहाची, आनंदाची अशीच होती. आम्हाला सहकार्य करणारे अनेक जण भेटल्यानं आम्ही त्या काळात कधीही खचून गेलो नाही. अंतर्नादच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन आनंद यादव यांच्या हस्ते झालं आणि त्या प्रकाशन समारंभाच्या शान्ता शेळके अध्यक्ष होत्या. समारंभात मुकुंदराव किर्लोस्कर हेही उत्स्फूर्तपणे बोलले होते. ही सर्वच मंडळी त्यावेळी साहित्यक्षेत्रात खूप नामांकित होती. प्रकाशनाला साहित्यक्षेत्रातील सगळ्या वयोगटातली माणसं आली होती. 'इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की, मानधनाची कोणतीही अट न घालता, आपलं उत्तोमत्तम लेखन त्यांनी अंतर्नादकडे द्यावं', असं आवाहन शान्ताबाईंनी त्यावेळी आपल्या भाषणात केलं होतं. लवकरच त्याची सुरुवात त्यांनी स्वतः पासून केली. 'कविता स्मरणातल्या' नावाचं एक सदर त्यांनी अडीच- तीन वर्षं चालवलं. केशवसुतांची 'तुतारी' किंवा बालकवींची 'फुलराणी' ही मराठी काव्यजगतातली उत्तुंग शिखरं आहेत. पण कधीकधी प्रतिभेच्या अवचित परिस स्पर्शानं छोट्याछोट्या टेकड्याही उजळून निघतात. तुलनेनं अप्रसिद्ध असलेली एखादी कविता अतिशय दर्जेदार असू शकते. अशा प्रकारची एक कविता आणि तिचं उत्तम रसग्रहण ('समीक्षा' हा जडजंबाल शब्द इथे अयोग्य ठरेल) असं या सदराचं स्वरूप होतं. मासिकाची साधारण अडीच-तीन पानं या सदरासाठी राखीव होती. त्या वर्षी शांता शेळके आळंदीला भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. त्यामुळे त्यांनी लिहिलेलं असलं सदर छापायला त्यावेळी कोणतंही नियतकालिक, किंवा वृत्तपत्रही, आनंदाने तयार झालं असतं; पण तरीही त्यांनी ते आमच्या नुकत्याच सुरू झालेल्या मासिकाला दिलं याबद्दल माझ्या मनात खूप कृतज्ञता आहे. मला आठवतं, सुरुवातीला आम्ही त्यांना एका लेखाचे फक्त अडीचशे रुपये मानधन देत होतो. त्यांच्या एकूण साहित्यिक स्थानाच्या मानाने ते नगण्यच होतं. नंतर ते आम्ही चारशे रुपये केलं. तेही खरंतर अपुरंच होतं. कारण त्या पूर्णवेळ लेखिका होत्या, प्रोफेशनल लेखिका होत्या; पण त्यांनी आमच्या अल्प मानधनाबद्दल एका शब्दानेही कधी तक्रार केली नाही. उलट एकदा त्या 'मला एवढे पैसे देत जाऊ नका', असंही म्हणाल्या होत्या. अर्थात प्रत्येकाला मानधन द्यायचंच हे बंधन आम्ही स्वतःवर पहिल्या अंकापासूनच घालून घेतलं होतं. इतरही अनेक चांगल्या लेखकांचं लेखनही अंतर्नादला मिळत गेलं. भारतासारख्या बहुभाषिक देशात अनुवाद हा साहित्यप्रकार खूप महत्त्वाचा आहे याची जाणीव असल्याने अनुवादावर आमचा प्रथमपासून भर होता. धारवाडला आयुष्य घालवलेले, साहित्यविश्वात फारसे परिचित नसलेले श्री. भा. श्रोत्री नावाचे एक प्राध्यापक होते. जर्मन साहित्यावर पीएच.डी. करणारी ही पहिलीच मराठी व्यक्ती. जर्मन भाषेवर त्यांचं असाधारण प्रभुत्व होतं. अनेक जण मूळ भाषेतले अनुवाद करत नाहीत, तर त्याच्या हिंदी किंवा इंग्रजी अनुवादावरून करतात. पण श्रोत्री मूळ जर्मन कथेवरून अनुवाद करायचे. त्यांचे अनेक अनुवाद आम्ही छापले. असे अनेक लेखक आम्हाला मिळत गेले; काही नामांकित, तर काही फारसे परिचित नसलेले.
लक्ष्मण लोंढे हे माझे आवडते लेखक होते. त्यांचं 'लक्ष्मणझुला' हे सदर आम्ही पहिल्या अंकापासून सुरू केलं होतं. निसर्ग, अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारं ते सदर साधारण तीन पानी असायचं. त्यांच्या लेखनातील टापटीपदेखील मला विशेष आवडायची. त्या काळी मराठी लेखक फारसे संगणक शिकलेले नव्हते. ते हातानेच लिहायचे. आम्ही अंतर्नाद सुरू केलं, त्याच वर्षी भारतात मोबाईल आणि इंटरनेटला सुरुवात झाली. पण मराठी लेखक त्यापासून खूप दूर होते. तशा काळातही लोंढे आपला सगळा लेख संगणकावर व्यवस्थित टंकित करून नेमक्या शब्दांत मला पाठवायचे. त्याचं फार कौतुक वाटायचं. अनंत सामंत यांचं ठणठणपाळच्या शैलीतील खुमासदार लेखन 'टोच्या मिरच्या' या नावानं आम्ही पहिलं एक वर्ष छापलं.
सहसा कुणी छापले नसते, असे काही वेगळ्या प्रकारचे लेखही आम्ही छापले. उदाहरणार्थ, पन्नासाव्या स्वातंत्र्यदिनाच्या वेळी आम्ही मुसाई सिंग नावाच्या क्रांतिकारकाचा परिचय करून देणारा एक विस्तृत लेख छापला होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वांत जास्त तुरुंगवास भोगणारा हा योद्धा. पन्नास वर्षांहून अधिक काळ तो अंदमानला तुरुंगात होता. त्याच्यावर केसरीच्या वा. द. दिवेकरांनी इंग्रजीत लिहिलेलं लेखन वि. ग. कानिटकरांनी आमच्यासाठी अनुवादित केलं होतं. वेगवेगळ्या लेखकांशी वेगवेगळ्या व्यक्तीच्या मार्फत माझा संपर्क होत गेला. सदानंद देशमुखांची त्यांनी उमेदवारीच्या काळात लिहिलेली एक खूप सुंदर दीर्घकथा मला अजून आठवते. खोट्या बियाणांच्या वापरामुळे एका शेतकऱ्याचं पीक उद्ध्वस्त झाल्यावर त्या शेतकऱ्याच्या दुःखाचा जो उद्रेक होतो त्याचं त्यात चित्रण होतं.
अशीच अजून एक मला बरीच आवडलेली 'आगीनझाड' नावाची कथा वैशाली पंडित या मालवणच्या एका नवोदित लेखिकेची होती. आमच्या वाचनालयात कॉलेजमधील एक मुलगी यायची. ती फक्त सुहास शिरवळकर वाचायची. त्यातून त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण झालं आणि मी त्यांना भेटायला गेलो. त्यांनी वैशाली पंडितांशी माझी ओळख करून दिली. एका खेड्यातली खानावळ 'आगीनझाड' या त्यांच्या कथेत दाखवली होती. ती चालवणारी तरुणी खानावळीच्या मालकाची सून होती. तिथं तिचा एका चित्रकाराशी परिचय होतो, त्यांच्यात नाजूक नातं निर्माण होतं. तिचा नवरा, सासरे तिच्यावर भडकतात. घराबाहेर पडायला बंदी घालतात. तरीही, शेकोटी पेटवताना उडणाऱ्या ठिणग्यांत ती त्याची चित्रं चितारायला लागली; असं आकर्षक चित्रण त्यात होतं. त्या कथेवर कोकण महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मालवण येथे एक परिसंवाद झाला होता. 'टाइम्स ऑफ इंडिया'णे त्या परिसंवादाचा चक्क पाच कॉलम रिपोर्ट इंग्रजीत छापला होता. ते बघून सगळ्यांनाच खूप नवल वाटलं होतं. 'आमच्या कार्यक्रमाची किंवा पुस्तकाची एका ओळीची बातमीही टाइम्स ऑफ इंडिया देत नाही आणि एका नवोदित कथाकाराच्या कलाकाराच्या एका कथेवरील चर्चेसाठी टाइम्सने इतकी जागा दिली', याचं मधु मंगेश कर्णिकांना फार कौतुकमिश्रित आश्चर्य वाटलं होतं. त्यांनी लिहिलेलं ते पत्र माझ्याकडे अजूनही आहे.
असं चांगलं साहित्य मिळत गेलं आणि वर्षं सरत गेली. अडचणी होत्याच, पण त्या सोडवताना आम्ही त्या काळात उदास किंवा व्यथित मात्र कधी झालो नव्हतो. एक सांगावंसं वाटतं की, मासिकाला पहिल्या वर्षी तोटा आला तरी चालेल अशी माझी तयारी होती. आमच्या पहिल्या वर्षी सुमारे हजार प्रती दरमहा खपत होत्या - वर्गणीदारांकडे जाणाऱ्या आणि पूनम एजन्सी, संदेश एजन्सी, बागवे आणि पाठक या विक्रेत्यांमार्फत विकल्या जाणाऱ्या. तेवढ्याही प्रती जर खपल्या नसत्या, तर कदाचित मी मासिक चालवलं नसतं. कारण निव्वळ स्वतःच्या समाधानासाठी, केवळ स्वतःला संपादक म्हणवून घेता यावं म्हणून एखादं मासिक चालवायचं हे मला पटणारं नव्हतं. कमीत-कमी हजार लोकांपर्यंत तरी ते पोहोचत नसेल, तर त्याचा काय उपयोग ?
प्रश्न : अंतर्नादचा पाचवा वर्धापन दिवस शिवाजीनगरला 'इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स'च्या सभागृहात झाला. अनिल अवचट त्याचे प्रमुख पाहुणे होते. दत्तप्रसाद दाभोळकर आणि पंकज कुरूलकर हे दोघेही त्या कार्यक्रमाला होते. तिथं मी अंतर्नादचा पहिला अंक पाहिला. मी तेव्हा विद्यार्थिदशेत होतो. अशा प्रकारचं एक मासिक गेली पाच वर्षं चालू आहे यानं मी खूप प्रभावित झालो होतो. मीही 1995 लाच पुण्यात आलो होतो. साहित्यसंस्कृती, वाचन यात खूप रमलेलो असलो, तरी पाच वर्षांत ते मासिक माझ्यापर्यंत आलंच नाही याचं मला आश्चर्य वाटलं. एक हजारच पण खूप चांगल्या, चोखंदळ लोकांपर्यंत ते गेलं. स्टॉलवर ते फारसं उपलब्ध नसावं. आत्ता तुमच्या बोलण्यातून आलं की, त्याचा खप हजार किंवा त्याहीपेक्षा कमी असला, तरी साहित्यविश्वाशी संबंध येणं, त्यातून लेखन मिळवणं, त्यातलं तुमचं योगदान याचं समाधान तुम्हाला मिळत असणार. पाच वर्षांत तुमचं बऱ्यापैकी बस्तान बसलं होतं, असं मला चांगलं आठवतंय. या पाच वर्षांत खूप चांगले विशेषांक - कालिदास, टागोर, शेक्सपिअर असे - निघाले होते. त्यानंतर समाजसेवा (एनजीओ) या संदर्भातला तुमचा एक दिवाळी अंक होता. त्यात मिलिंद बोकीलांपासून शरद जोशींपर्यंत अनेकांचे लेख होते. हे विशेषांक, त्याला मिळालेला प्रतिसाद आणि स्तंभलेखन हे कसं होतं? असे विशेषांक पुढे दिसले नाहीत. असं का?
- सुरुवातीला अंतर्नादची मासिक प्रिंट ऑर्डर अकराशे प्रतींची होती. मासिक अंकाचा तीन हजार प्रतींपेक्षा जास्त खप कधीच झाला नाही. दिवाळी अंकाचा खप दरवर्षी वेगवेगळा असायचा पण तो साधारण पाच हजारापर्यंत जायचा. मासिक अंकाचा खप त्या- त्या मर्यादित वर्तुळापुरताच राहणार होता. कालिदास, शेक्सपिअर, रवींद्रनाथ यांच्यावर विशेषांक काढणारे अलीकडच्या काळात फक्त आम्हीच होतो. ही मंडळी आपल्या क्षेत्रात दिग्गज असली, तरी अलीकडच्या मराठी वाचकांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती हे ते विशेषांक काढण्यामागचं मुख्य कारण होतं. विस्मृतीत जात चाललेल्या या दिग्गजांवर पुन्हा प्रकाशझोत टाकणं हे संपादक म्हणून माझं कर्तव्यच होतं.
तुम्ही उल्लेख केला आहे तो 'स्वयंस्फूर्त कार्याचं समाजजीवनातील स्थान' हा विषय असलेला दिवाळी अंक 1999 सालचा होता. त्यातला एक विस्तृत लेख शरद जोशींचा होता 'बस करा हे समाजसेवेचं ढोंग!' हे त्याचे शीर्षक होते. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन रावसाहेब शिंदे आणि शरद जोशी यांच्याशी माझा संबंध, माझ्याशेजारी राहणाऱ्या बद्रिनाथ देवकर यांच्यामुळे आला होता. शरद जोशींचं त्यावेळी पुण्यात घर नव्हतं. त्यावेळी ते बीना अपार्टमेंटमध्ये सेनापती बापट रोडला राहायचे. त्यांची तब्येत बरी नसायची. तेव्हा मीच त्या लेखाचं शब्दांकन केलं होतं. त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक मोठमोठ्या समाजसेवकांवर नावानिशी टीका केली होती. आपला वाचक हे स्वीकारणं शक्य नाही, असं मला वाटलं. मी माझ्या अधिकारात (पण त्यांची अनुमती घेऊन) बहुतेक सगळी नावं गाळून टाकली आणि मग तो लेख छापला. शरद जोशी आपल्या मांडणीत अगदी खोलात गेले होते. त्या सगळ्या समाजसेवकांचे ट्रस्ट, त्यांची प्रॉपर्टी कोणाच्या नावाने आहे, त्यामध्ये कोणाकोणाला महत्त्वाचं स्थान आहे वगैरे बरंच कायकाय त्यात लिहिलं होतं. मिलिंद बोकील, अनिल शिदोरे, स. ह. देशपांडे अशा अंकातील बाकीच्या सगळ्यांनी समाजसेवेची भलावण करणारे लेख लिहिले होते. अंक काढण्याआधी त्याचं नियोजन आम्ही देशपांडेंच्याच घरी केलं होतं. शरद जोशींची मांडणी मूलभूत स्वरूपातच वेगळी होती. विकास ही व्यक्तिगत प्रक्रिया आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. आपण दुसऱ्या कुणाचा विकास घडवून आणू शकतो, उद्धार करू शकतो हा फार मोठा अहंकार आहे. 'सगळे समाजसेवक अशा अहंकारानं ग्रस्त असतात. ही एक झिंग असते' असा शब्दप्रयोग त्यांनी केला होता. 'ही सगळी मंडळी बोलण्यात कशी चतुर असतात, त्यांच्याकडे कसे काही विशिष्ट शब्द ठरलेले असतात, ते टाकाटाकी कशी करतात' अशी खूप स्फोटक शब्दांत त्यांनी मांडणी केली होती. तिचा गाभा आयन रँड या अमेरिकन लेखिकेच्या विचारसरणीशी मिळणारा होता. माणसाच्या विकासाची सगळ्यात मूलभूत प्रेरणा स्वार्थ ही आहे; जे स्वतःकरता अर्थपूर्ण आहे, तो स्वार्थ; तो वाईट कसा असेल; अशी काहीशी ती मांडणी होती.
एक योगायोग म्हणजे या संदर्भातील आचार्य रजनीशांचंही मतही साधारण तसंच होतं. स्वार्थ हीच जर मूलभूत प्रेरणा असेल आणि वाढ ही नैसर्गिक क्रिया असेल, तर कोणीही दुसऱ्या कुणाचा कृत्रिमरीत्या विकास कशाला करायचा? लहान मूल वाढावं म्हणून आईला त्याचे हात-पाय ओढावे लागत नाहीत. तसं व्यक्तीच्या, समाजाच्या बाबतीतही आहे, असा त्यांचा दावा होता. मला त्यांचं सगळं म्हणणं पटलेलं नव्हतं. संपादकीयामध्ये मी त्याच्या विरोधातही लिहिलं होतं. नंतर त्यांनी तो सौम्य करून परत एकदा लिहिला. 'समाजसेवेला विरोध नाही, पण तुमची समाजसेवेच्या नावाने चालू असलेली दुकानदारी बंद करा' अशा आशयाचा तो सुधारित लेख लिहिला. अर्थात त्यावरही अनेकांनी टीका केली.
दुसऱ्या कुणाचीतरी श्रद्धा हलवायचा आपल्याला अधिकार नाही, असा माझा एक आक्षेप होता. म्हणजे एखाद्या गोष्टीवर असलेली तुमची श्रद्धा नष्ट व्हावी असं काही मी करू नये. तुमच्या विचारांतील उणिवा तुमच्या स्वतःच्या लक्षात आल्या तर ती गोष्ट वेगळी परंतु तुमच्या भ्रमनिरासाला माझे लेखन कधीही कारणीभूत होता कामा नये; कारण ती श्रद्धा हा तुमचा जीवनरस आहे असं मला वाटे. पण शरद जोशींच्या लेखामुळे अनेक जण खूप दुखावले गेले. तशी बरीच पत्रं आमच्याकडे आली. त्यातली काही आम्ही छापलीही होती. त्यातलं एक पत्र लिहिणाऱ्या माणसाच्या मनात, 35 वर्ष या विशिष्ट क्षेत्रात आपण केलेलं समाजकार्य फुकट गेल्याची भावना होती. जोशींच्या लेखाचा तो परिणाम दुर्दैवीच होता असं म्हणावं लागेल. पण एका अर्थानं त्यांचा तो लेख म्हणजे अनेक समाजसेवकांपुढे धरलेला एक आरसाही होता. आपण जे काम करतोय, त्याची समाजाला खरंच गरज आहे का? ते आपण कशासाठी करतो? त्यांच्यासाठी का केवळ आपल्या समाधानासाठी, त्याचा दीर्घकाळ टिकणारा असा प्रभाव किती पडतो? त्यानं खरोखर समाज बदलतो का? अशा प्रश्नांचा विचार समाजसेवी संस्थांनीही करायला हवा. या कामामागे आत्मप्रकटीकरण हीच मुख्य प्रेरणा आहे की समाजाचं भलं करणं ही मुख्य प्रेरणा आहे हे त्या समाजसेवी संस्थांच्या चालकांच्या मनात स्पष्ट असलं पाहिजे. अशा काही मुद्द्यांसह त्या लेखात आयन रँडचं तत्त्वज्ञान खूप होतं.
प्रश्न : हा अंक मी उशिरा वाचला. पण तेव्हाच आयन रँडचीही माझी ओळख झाली होती. तिच्या 'फाऊंटनहेड' कादंबरीत टोकाच्या व्यक्तिवादाचं उदाहरण होतं. त्यामुळे वाचकांतही त्यानं हलचल माजणं स्वाभाविकच होतं. शरद जोशींचा तो वादग्रस्त लेख सोडला, तर पहिल्या पाच वर्षांत 'अंतर्नाद'ला, तुमच्या लेखकांना आणि संपादक म्हणून तुम्हालाही खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या. नवे-जुने नामवंत साहित्यिक, सामान्य वाचक यांच्याकडून खूप कौतुकही झालं. त्या काळात 'सत्यकथा' बंद पडलं, तरी हे नव्या स्वरूपातलं 'सत्यकथा' आहे, अशीही कुजबुज झाली. त्याच काळात अंतर्नादच्या मर्यादाही अधोरेखित झाल्या आहेत अशी अंतर्नादवर टीकाही झाली. त्यातली काही तुम्हाला मान्य असेल तर काही अमान्य. तिचं काय स्वरूप होतं? तशाच प्रकारची टीका पुढेही आली असणार. पण पहिली वर्षं वर्षं महत्त्वाची वाटतात.
- खूप जणांनी टीका केली. सगळेच लोक आपल्या बाजूनं बोलतील असं कसं म्हणता येईल? मग एखादं विरूद्ध बाजूचं लेखनही प्रसिद्ध व्हावं असं मला वाटतं. त्यांच्या लिखाणातून, बोलण्यातून आपल्यात काय कमी आहे तेही कळतं. अशा टीकेचं मी स्वागतच करत होतो. पण कधीकधी ही टीका अगदी नाउमेद करणारी असायची.
उद्दाहरणार्थ, अंतर्नादला काही प्रसिद्धी मिळेल का याचा शोध घेण्यासाठी एका बड्या पत्रकाराला मी भेटायला गेलो होतो. त्यांना मी पूर्वी पाठवलेले चार- पाच अंक त्यांच्यासमोरच टेबलावर होते. त्यातला एक अंक त्यांनी उचलला आणि 'याच्यात काय नवंय?' असा खोचक प्रश्न करत पुन्हा खाली ठेवला. 'कुठलंही मासिक चालणार की नाही हे पहिल्या वर्षभरात कळतं. ज्याअर्थी अजूनही अंतर्नाद नीट चालत नसेल तर त्याचा अर्थ यापुढेही ते कधीच चालणार नाही,' अशी त्यांची प्रतिक्रिया होती. मी त्यांना तोंडावर काहीच बोललो नाही, पण अंतर्यामी अगदी उदास होऊन मी त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडलो. दुसऱ्या एका मुंबईच्या लेखकांनी 'तुम्ही हा किती फालतू अंक काढला आहे? हा कागदाचा आणि शाईचा अपव्यय आहे, बंद करा हा अंक' अशा अर्थाचं एक पत्र पाठवलं होतं. आदर्श अंक कसा असावा हे सांगण्यासाठी त्यांनी स्वतःच संपादित केलेला 'आत्मकथन' या विषयाला वाहिलेला एक दिवाळी अंक पाठवला होता. त्यांना एकदा जाऊन भेटावं असंही माझ्या मनात आलं होतं, पण कामात ते राहून गेलं.
आमचं मासिक इंटरनेट, मोबाईल आणि नंतर व्हॉट्सअप या जमान्यात सुरू झालेलं आहे, आणि त्यामुळे इतर कोणत्याही पूर्वीच्या मासिकासोबत आमची तुलना करणं अन्यायकारक होतं. इतर मासिकं काढली गेली, तो एकूण काळ साहित्याला पूरकच होता. त्या काळात बहुसंख्य विद्यार्थी मराठी माध्यमातून शिक्षण घेत होते. साहित्याव्यतिरिक्त अभिव्यक्तीसाठीची माध्यमं मर्यादित होती. ज्या काळी टीव्ही नव्हता, अशा काळात हे साहित्यिक आणि ती मासिकं प्रस्थापित झाली होती. लोकांपुढे पर्यायच कमी असल्यानं साहित्याला एक महत्त्वाचं स्थान आपोआपच प्राप्त झालं होतं. 'कवी तो दिसे कसा आननी' हे एकेकाळी अगदी स्वाभाविक असलेलं समाजातील कुतूहल अंतर्नादच्या काळात अजिबात नव्हतं. त्यामुळे उदाहरण द्यायचंय असेल, तर आजच्या काळातलं द्या; अनेक वर्षांपूर्वी कुणी कसा अंक काढला ते सांगू नका; तो काळच वेगळा असल्यानं तशी तुलना करताच येणार नाही; आता आम्ही प्रवाहाच्या विरोधात पोहतो आहोत; अशी माझी भूमिका होती.
आणखी एक गोष्ट मला उघड दिसत होती. अनेकदा ही टीका मत्सरग्रस्त होती. आपल्याला जे जमलं नाही ते अंतर्नादला जमतं आहे याचा राग येणारे अनेक जण होते. वरवर माझ्याबद्दल चांगलं बोलणारे पण पाठीमागे माझी थट्टा करणारे काही 'मित्र' देखील होतेच आणि त्यांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचतच होत्या. अशावेळी राग यायचा, त्याहून जास्त वाईट वाटायचं पण त्याबद्दल काही करणं मला शक्य नव्हतं. एकदा एखाद्याने तुमच्याविषयी काही पूर्वग्रह करून घेतला, तर तो दूर करणं जवळजवळ अशक्य असतं हेही माझ्या लक्षात आलं होतं. आपली केमिस्ट्री सगळ्यांशी जुळणं कधीच शक्य नसतं; अजातशत्रुत्व ही साहित्यिक क्षेत्रात केवळ कविकल्पना आहे !
अर्थात काही टीकाकारांनी केलेली टीका वाजवीही होती हे मान्य करायला हवं. एकानं 'अंतर्नाद फार गंभीर आणि जड वाटतं. त्यात गंमत असायला हवी. ते वाचताना थोडीतरी मजा आली पाहिजे, थोडंतरी हलकंफुलकं वाटलं पाहिजे..' असं त्यांचं म्हणणं होतं. त्याने अगदी माझ्या मर्मावर जणू बोट ठेवलं होतं! पण तसं काही करणं हा माझा पिंडच नव्हता. मी सहसा कधी कुणाच्या खांद्यावर हात ठेवत नाही, सहसा कधी कुणाला टाळीही देत नाही. माझा स्वभावच काहीसा अलिप्त असल्यानं हलकंफुलकं असं मी काही करूच शकलो नसतो. आणि त्या माझ्या गंभीर वृत्तीचं प्रतिबिंब मासिकात उमटलं होतं. आणि त्याचा तोटा आम्हाला नक्कीच झाला. पुस्तकात हे सारं विस्ताराने आलेलं आहे.
प्रश्न : अंतर्नादच्या 26 वर्षांपैकी, 2012 पर्यंतची म्हणजे सुरुवातीची 17 वर्ष आनंदाची, उमेदीची होती आणि नंतर मात्र उतार सुरू झाला, असा उल्लेख तुम्ही स्वतःच या पुस्तकात केलेला आहे. आत्ता आपण पाचवा वर्धापन दिवस म्हणजे 2000 सालापर्यंतचा प्रवास पाहिला. त्या नंतरची जवळपास बारा वर्ष मासिकाचा विस्तार झाला. आर्थिकदृष्ट्याही ते स्थिर झालं. जाहिराती मिळू लागल्या. वाचकांचा प्रतिसाद मासिकातल्या सदरातून दिसतच होता. तर तो आधीचा काळ उमेदीचा का होता, याची काही कारणमीमांसा तुम्हाला करता येईल का?
- त्यासाठी थोडं मागे जावं लागेल. मासिक सुरू केल्यानंतर ते टिकवण्यासाठी काय करायचे याचा विचार सुरू होताच. सुरुवातीला या मासिकासाठी म्हणून मी चार लाख रुपये वेगळे काढले होते. ते माझं भांडवल होतं. हे मुद्दाम सांगायचं कारण की, मराठी साहित्यविश्वात नेमकी आकडेवारी सहसा कुणी देत नाही आणि त्यामुळे संदिग्ध असंच चित्र वाचकापुढे उभं राहतं....
प्रश्न : मध्येच थोडं सांगतो. मी एक गोष्ट नेहमी सांगत आलेलो आहे. ती गोष्ट म्हणजे 'मराठी साहित्यविश्वात फक्त दोनच नियतकालिकं खात्रीनं खरं सांगतील, अन्य लोकांचं माहीत नाही.' डॉ. नरेंद्र दाभोळकर असतानाही आणि ते गेल्यानंतरही मी हे म्हणायचो. साधनेचा खप, त्याची आर्थिक उलाढाल किती वगैरे गोष्टी मी उघड सांगितल्या आहेत. त्यावेळी मी म्हणायचो, 'साधनाचे वर्गणीदार किती असं तुम्ही विचारलं, तर 6,200 असा आकडा मी अंदाजे सांगेन. पण तुम्ही अंतर्नादच्या संपादकांना तेच विचारलं, तर ते सरळ 2721 असा नेमका आकडा सांगतील.' तुमचा हा नेमकेपणा आणि प्रांजळपणा महत्त्वाचा गुण होता आणि तुमच्या संपादकीयांतूनदेखील तो व्यक्त व्हायचा. त्या गुणाची या मुलाखतीतदेखील नोंद होणं मला महत्त्वाचं वाटतं.
- खूप धन्यवाद!
पहिल्या वर्षी अंतर्नादची वार्षिक वर्गणी 160 रुपये होती. मासिक सुरू करण्यापूर्वी मी त-हेत-हेच्या याद्या गोळा केल्या होत्या आणि अनेक गणितंही मांडली होती. अमेरिकेत इतके मराठी बांधव आहेत, ते इतक्या जहिराती देतील; इतक्या सरकारी कंपन्या आहेत, त्यांच्याकडून इतक्या जाहिराती मिळतील वगैरे. प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही. पण 160 रुपये देणारे 2500 वर्गणीदार गोळा केले, तर जवळपास चार लाख रुपये जमा होतील असा माझा हिशोब होता. तो ब्रेक- इव्हन पॉइंट होता. शिवाय, मासिकाच्या मुखपृष्ठाची तीन पाने कोरी असतात. त्यांच्यावर छापण्यासाठी प्रत्येक अंकात तीन पूर्ण पानांच्या जाहिराती मिळाल्या, तर मासिकाच्या वाढीसाठी आणखी आर्थिक स्थैर्य मिळेल आणि आपण इतर काही सांस्कृतिक उपक्रम ही राबवू शकू असे माझे विचार होते.
एक सांगायला हवं. सुरुवातीच्या काळात आम्ही मासिकासोबत असे बरेच सांस्कृतिक कार्यक्रम केलेले आहेत. पंडित अरविंद गजेंद्रगडकरांनी मध्यंतरी बरीच वर्षं आपलं जाहीर बासरीवादन बंद केलं होतं. त्यानंतर कित्येक वर्षांनी त्यांचा बासरीवादनाचा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदा केला. मीना प्रभु लॅटिन अमेरिकेहून आल्या, तेव्हा त्यांचा प्रवासवर्णनाचा जाहीर स्लाईड शो आम्ही ठेवला होता. पु. ना. ओक हे 'ताजमहाल हा हिंदूचा आहे' या त्यांच्या मताकरता प्रसिद्ध होते. त्यातील वादग्रस्त भाग बाजूला ठेवून 'नेताजींच्या सहवासात' या विषयावर आम्ही त्यांचं भाषण ठेवलं होतं. कारण ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे व्यक्तिगत सचिव होते ही गोष्ट फारशी कोणाला ठाऊक नव्हती. असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही करत होतो आणि त्यांना प्रतिसाद चांगला मिळत होता.
अडीच हजार वर्गणीदारांची साथ असेल, तर असे अनेक कार्यक्रम आपण करू शकू असं मनात होतं. पण हे खूप अवघड आहे, लोक वर्गणीदार व्हायला खिशात हात घालत नाही, मात्र तोंडानं भरपूर काय काय बोलतील, हे आम्हाला अनुभवाने लवकरच कळत गेलं. कुमार गुर्जर नावाच्या माझ्या एका मुंबईच्या सी.ए. मित्रानं 'वर्गणीदार गोळा करून त्यांच्या वर्गणीचं नूतनीकरण करत राहण्यापेक्षा आजीव सदस्यत्व नोंदवावेत. प्रत्येकाकडून 2000 रुपये घ्यावेत. तशी हजार माणसं मिळाली, तर हजार सुसंस्कृत कुटुंबांशी तू जोडला जातोस. ती माणसं काळजीपूर्वक निवडायला हवीत. आमंत्रणातूनच सदस्यत्व मिळेल अशी रचना ठेव. त्यातून जवळपास 20 लाखांचा निधी संकलित होईल', असा सल्ला त्याने मला दिला. त्यावेळी पुण्यातल्या कितीतरी सहकारी बँका सोळा टक्के व्याज देत होत्या, त्या हिशोबानं दरवर्षी 3,20,000 रुपये जमतील.
बाकी 80,000 रुपये आपण किरकोळ अंकविक्रीतून जमवू, असं आम्ही ठरवलं. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. जवळपास साडे आठशे वाचक आजीव सदस्य झाले. तेव्हा श्री. पु. भागवतांचं एक सुंदर पत्रही मला आलं होतं आणि आम्ही ते त्यावेळी अंकातही ते छापलेलं आहे.
वेगवेगळ्या जीवनक्षेत्रांमधला निवडक वाचक या आजीव सदस्य योजनेतून आम्ही जोडला. त्यासाठी वेगवेगळ्या याद्या वापरल्या. व्यक्तिगत संपर्क साधला. भेटीही घेतल्या. लेखक, पत्रकार, प्रकाशक, वकील, डॉक्टर, सरकारी अधिकारी अशा विविध क्षेत्रांतली वरच्या स्थानावरची अनेक माणसं अंतर्नादशी यातून जोडली गेली. आमच्या 'चोखंदळ वाचक वर्गाचं' आजीव सदस्य योजना हे एक रहस्य होतं. त्याच काळात 'चोखंदळ वाचकांसाठी' अशी अंतर्नादची एक टॅगलाईन खूप चांगली चालली. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत यातले अनेक जण आमचे वर्गणीदार म्हणून कायम होते. त्यांची यादी वाचताना आज माझे डोळे भरून येतात. ही सगळी माणसं आपली वर्गणीदार कशी झाली, याचं खरंच आश्चर्य वाटतं.
पण नंतर बँकांचे व्याजदर झपाट्याने कमी होत गेले आणि खर्च मात्र वाढत गेला. ते गणित जमेना म्हणून ती योजना बंद करून सगळ्यांचे पैसे परत करायचं ठरवलं. त्यावेळी अनेक लोकांनी मला वेड्यात काढलं होतं. 'हातात आलेले पैसे परत करायचे कशासाठी? त्यापेक्षा त्यांच्याकडून अधिक पैसे मागून घ्या,' असं त्यांचं मत होतं. पण ते आम्हाला पटलं नाही. कारण केव्हातरी ते अधिक घेतलेले पैसेही अपुरे पडणारच होते. त्यापेक्षा आम्ही सरळ त्यांचे पैसे चेकने परत करायचे असं ठरवलं. पण सोबत आम्ही एक पत्र पाठवलं. 'तुम्ही वर्गणीदार म्हणून पुढेही राहा आणि तुमच्यासारखा आणखी एक चोखंदळ वाचक आम्हाला वर्गणीदार म्हणून मिळवून द्या. त्या पोटी आम्ही तुमचे पैसे जमा करू. अर्थात ते पसंत नसेल तर तुमचे पैसे अर्थातच परत करत आहोत.' यातून आमच्या वर्गणीदारांचा आमच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला. शिवाय यामुळे आमच्या वर्गणीदारांची संख्या जवळपास दुप्पट झाली. तो नवा वर्गणीदार त्यांनीच निवडलेला असल्यानं तो चांगला वाचकही होता.
या चोखंदळ वर्गणीदारांमुळे अंतर्नादला साहित्यवर्तुळात एक आदराचं स्थान प्राप्त झालं. एकं प्रतिष्ठा प्राप्त झाली. या अंकाचा खप कमी असला तरीही आपलं लेखन याच अंकात छापून यावं असं अनेक लेखकांना वाटू लागलं. अनेक लेखक त्यांचं लेखन आपणहून आमच्याकडे पाठवू लागले.
प्रश्न : दोन प्रकारची टीका तुमच्या या बहराच्या काळात केली गेली होती. तुमच्यापर्यंतही कमी-अधिक फरकानं ती पोचली असेल. त्यातली एक अशी की, 'अंतर्नादमध्ये ग्रामीण भागातल्या लोकांचं लेखन, कथा, अनुभवविश्व नसतं. लिहिणारे सगळे लोक हे शहरातले, पुणे-मुंबई-नाशिक-नागपूर या पट्ट्यातले आहेत' असं म्हटलं जातं. 'संपादकीय 'नंतरची 3 ते 6 ही पानं 'प्रतिसाद'साठी असायची. वाचक प्रतिसादाला एवढं महत्त्व दिलं जायचं, याचं कौतुकही होतं. इतका मोठा प्रतिसाद मराठीत कोणत्याही नियतकालिकाला मिळतही नसावा आणि तो छापलाही जात नसावा. त्यामुळे 'लेखकांनी लेखकांसाठी चालवलेलं मासिक' असंही त्याला म्हटलं जाऊ लागलं. ही टीका अतिशयोक्तपूर्ण होती, हे खरं आहे; पण 'ग्रामीण भागातल्या लेखकांना तुम्ही स्थान देत नाही', या टीकेकडे तुम्ही कसं पाहता ?
- माझ्या आयुष्यातली 40 वर्ष मी मुंबईत राहिलो. माझी बायकोही मुंबईतच होती. आमचा जन्मही तिथलाच. आमची गावाला शेती वगैरे असं काही नव्हतं. खरं तर आम्हाला गाव असं काही कधीच नव्हतं. माझं मित्रवर्तुळही शहरीच होतं. पुण्यात आल्यानंतरही ते शहरीच राहिलं. ही माझी एक मर्यादा होती हे मी मान्य करतो. पण याचा अर्थ ग्रामीण लेखक आम्ही घेतलेच नाही, असा नाही. सदानंद देशमुख त्या वेळेला बुलढाणा जिल्ह्यात जानेफळसारख्या ठिकाणी असायचे. आमच्या पहिल्याच अंकात त्यांच्या कविता आहेत. कृष्णात खोत यांच्याही कथा, अनुभव आम्ही छापले होते. अंतर्नादमधे ज्यांचे साहित्य छापले असे असे अनेक लेखक ग्रामीण होते. आणि खरं सांगायचं तर गेल्या पंधरा-वीस वर्षांत मोठ्या शहरांपेक्षा ग्रामीण भागातच अधिक लेखक लिहीत आहेत.
प्रश्न : कदाचित इतरांच्या तुलनेत ग्रामीण लेखक कमी असतील. तुम्ही म्हणालात तेही बरोबरच आहे. तुमचं अनुभवविश्व त्या प्रकारचं नसेल, तर ते शक्य होणार नाही. कितीही नाही म्हटलं, तरी अशा प्रकारच्या वाङ्मयीन मासिकावर संपादकाच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहतोच. ते अपरिहार्य आहे. जशी त्याची बलस्थानं आहेत, तशा मर्यादाही आहेत. असो. वाचकपत्रांना सातत्याने इतकी जागा तुम्हाला का द्यावीशी वाटत होती ?
- मुळात चोखंदळ वाचक निवडावा लागतो. थोडं विषयांतर होईल, पण सांगतो. पुण्यातले एक मोठे डॉक्टर आमच्या ग्रंथालयाचे सदस्य होते. ते आले की, अनेक पुस्तकं बघून निवडीला फार वेळ घ्यायचे. 'तुमच्यासारखे डॉक्टर इतके बिझी असतात की रुग्णाला बघायलाही तुम्हाला फारसा वेळ नसतो, मग पुस्तकनिवडीसाठी तुम्ही एवढा वेळ का घेता?' असं मी त्यांना एकदा विचारलं. त्यावर 'मी खूप बिझी आहे म्हणूनच मी यासाठी एवढा वेळ घेतो. फालतू पुस्तकं वाचण्यात मला आयुष्याचा मर्यादित वेळ घालवायचा नाही. त्यामुळे वाचण्यासाठीचं पुस्तक मी खूप विचारपूर्वकच निवडतो,' असं ते म्हणाले. असा विचारपूर्वक चांगलं निवडणारा वाचकवर्ग साहित्यात हवा असतो. या वाचकवर्गाला आपले विचार लेखकांपर्यंत पोहोचवायची सवय अंतर्नादनं लावली, असं मी नम्रपणे म्हणेन. भालचंद्र नेमाडेंचं माझ्याकडे असलेलं एक पत्र तारखेसह मी आगामी पुस्तकात छापलंय. 'मराठीत वाचकांनी व्यक्त व्हायचा एक पायंडा तुम्ही पाडत आहात. तो आवश्यक आहे. त्यामुळे प्रतिसादासाठीची पानं वाढवत जा', असं ते म्हणाले होते. असं केलं नाही, तर साहित्य ही एकेरी वाहतूक होते. लेखक त्याला वाटेल ते लिहीत जातो. वाचकाला काय वाटतंय हे त्यानंही जाणून घेतलं पाहिजे. तेव्हा ई-मेल नसल्यानं पत्रानं प्रतिक्रिया यायच्या. अनेकदा उशिरा हातात पडायच्या, हे खरंय.
प्रश्न : मासिक असल्यानं उशीर होणारंच. कधी कधी तीन महिनेही उलटून जायची. पण इतक्या जुन्या लेखावरचा प्रतिसाद इतक्या उशिराही छापतात, असं लोकांना वाटायचं. अर्थात, तसे म्हणणारा वर्ग खरं म्हणजे प्रतिसाद बारकाईनं वाचायचा.
- अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. कारण आमचा भर शेवटी वर्गणीदारांवरच होता. आमचा आश्रय, माय-बाप कोण होता? वर्गणीदारच. किरकोळ अंक असे कितीसे विकले जायचे? पूनम, संदेश, बागवे आणि नाशिकचे पाठक ब्रदर्स असे चारच विक्रेते होते. त्यांची विक्री अगदी किरकोळ असायची. तेही अंक खपावा म्हणून काही विशेष प्रयत्न करायचे नाहीत. अनेकदा त्यांच्याकडचे अंक परत यायचे. ते परत आणण्यासाठीही आम्हाला त्यांच्याकडे जावं लागायचं. ते न खपलेले अंक बिनधास्त पाठवून द्यायचे. पण ते गड्ढे पाहिले की आम्हाला रडायला यायचं. वर्गणीदार हा मात्र आमच्याशी बांधलेला होता. शिवाय, ते कायमस्वरूपी नातं होतं, कारण आमच्या नूतनीकरणही मोठ्या प्रमाणावर व्हायचं. त्यामुळे आम्ही वर्गणीदारांवरच भर दिला. आणि त्यांच्याकडे जुने अंकही संदर्भासाठी असायचेच.
प्रश्न : अंतर्नाद सुरू करण्यापूर्वी तुम्ही कादंबऱ्या आणि कथा लिहीत होतात. पण त्यात तुमची एखादी कादंबरी क्रमशः येणं किंवा काही कथा प्रकाशित होणं असं फार दिसलं नाही. मध्यंतरी काळात 'बदलता भारत' आणि आणखी एक अशा तुमच्या दोन लेखमाला आल्या. 2002 च्या दरम्यान मी तुम्हाला तुमच्या ऑफिसला पहिल्यांदा भेटलो होतो. तेव्हा 'अंतर्नादचा अंक तुम्ही नियमितपणे काढताय. पण संपादक म्हणून काम करताना स्वतःच्या लेखनावर आपण अन्याय करतोय याची काही खंत वाटते का?' असा प्रश्नही मी विचारला होता. त्यावेळी 'काही प्रमाणात ते खरं आहे' असं तुम्ही म्हणाला होतात. पण तुम्ही संपादकीय नियमितपणे लिहीत होतात. कधी दोन-चार पानांचं, कधी मोठं. त्याला निश्चित असा आकार नव्हता. कधी एखादी गोष्ट असायची, कधी एखादी जुनी आठवण, तर कधी भाष्य केलं जायचं. तुमचे संपादकीय लेख हे अत्यंत वाचनीय होते. तर त्यामागचा विचार काय होता. आणि त्याचा आकार असा मोकळा आहे, याबाबत काही टीका होत होती का?
- तुमच्या प्रश्नाच्या पूर्वार्धात तथ्य आहेच. कारण, लेखकाला अंतर्मुखता महत्त्वाची, तर संपादकाला बहिर्मुखता आवश्यक आहे. लेखकासारखा अंतर्मुख होऊनच मी त्या काळात वावरलो असतो, तर कुणी येणं, दुसऱ्या माणसाला भेटणं हे मला संकटच वाटलं असतं. विशेषतः ललितलेखकांच्या बाबतीत हे होतं. चांगल्या संपादकाला साहजिकच खूप फिरावं लागतं, लोकांना भेटावं लागतं. ही बहिर्मुखता अंतर्मुखतेला मारक आहे. संपादकाचं काम बऱ्याच प्रमाणात मखर सजवण्यासारखं आहे. त्यामध्ये येऊन बसणारी मूर्ती वेगळीच असते. कौतुक होतं ते विशिष्ट
लेखकाचं. पण लेखकाने जे लिहिलंय, त्यावर संस्कार करण्यासाठी किती श्रम घेतले जातात हे कुणाला कळतच नाही.
यास्मिन शेख आमच्या व्याकरण सल्लागार होत्या. त्या प्रुफंदेखील तपासायच्या. त्यांच्याकडून आणि माझ्याकडून ही प्रुफं तपासली जायची. त्यात इतक्या चुका असायच्या की, लाल शाईनं कागद भरलेला असायचा. 'तुमची ही रक्तबंबाळ प्रुफं हाती आली की, मला आत्महत्या करावीशी वाटते', असं आमचा डीटीपी करणारा एकदा म्हणाला होता! तो वैतागून जायचा. पण 'आपल्या अंकात चूक दिसली की, मला आपल्या अंगावर ओरखडा उमटल्यासारखं वाटतं', असं शेखबाईंचं म्हणणं होतं. 'आम्ही पहिलं प्रुफ हेच फायनल म्हणतो. ही दुसरा कुणीतरी तपासतो. वाचकालाही अंकात चुका असल्या तर काय एवढा फरक पडतो !' असं एक संपादक मला म्हणाले होते. पण आम्हाला तसं नको होतं.
आपण प्रमाणभाषा वापरली पाहिजे, असा माझ्याप्रमाणे शेखबाईंचाही आग्रह होता. तसंच वळण अंतर्नादला पडत गेलं. हे सगळं करत असतानाही आमच्या मासिकावर टीका होत होती. पण कुठे तरी 'माझ्यातल्या लेखकाकडे दुर्लक्ष होत होतं' या तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. नंतर मी काही चरित्रं लिहिली. कारणपरत्वे मी त्या माणसांच्या संपर्कात गेलो आणि त्यांच्याविषयी काही लिहिलंच गेलं नाहीये, हे माझ्या लक्षात आलं.
शरद जोशींच्या नावानं बरीच पुस्तकं आहेत. पण ती जोशींनी 'शेतकरी संघटक' या संघटनेच्या मुखपत्रात लिहिलेल्या लेखांची संकलनं आहेत. त्यांतून त्यांचे विचार कळतात, पण समग्र चरित्र असं उभं राहत नाही. त्यामुळे मी त्यांचं चरित्र लिहिलं. तसं चरित्र ही मोठीच गरज होती. त्यांचा स्वतःचा त्याला विरोधच होता. तेव्हा त्या काळात लोकप्रिय असलेल्या दोन इंग्रजी पुस्तकांचा संदर्भ मी त्यांना दिला. एक, पी. साईनाथ यांचं 'एव्हरीवन लव्ह्ज अ गुड ड्राउट' आणि दुसरं, रामचंद्र गुहा यांचं 'इंडिया आफ्टर गांधी'. पहिलं पुस्तक शेतीबद्दल असूनही शरद जोशी, शेतकरी संघटना, शेतकरी आंदोलन हे शब्दच त्यात नाहीत. आणि दुसऱ्या रामचंद्र गुहांच्या पुस्तकात त्यांचा उल्लेख फक्त तीन वाक्यांत आहे. तोही महेंद्रसिंग टिकैत यांच्या जोडीने आहे. ते बड्या बागाईतदारांचे हितरक्षण करत आहेत असे मत तिथे व्यक्त झालं आहे. मी त्यांच्या कितीतरी सभांना अनवाणी, भाकरी बांधून येणारे लोक पाहिलेत. पण तरीही त्यांच्याबद्दल खूप गैरसमज विचारवंतांमधे आहेत. म्हणूनच लिहिणाऱ्या मंडळींनी त्यांच्याविषयी चुकीचं लिहिलं आहे. शरद जोशींची जीवनशैली कुठल्याही सामान्य मध्यमवर्गीय माणसापेक्षा उच्च नव्हती. कित्येक वर्षं त्यांचं स्वतःचं घरही नव्हतं. पण 'हा बड्या बागायतदारांचा प्रतिनिधी आहे', असा आरोप करणारे स्वतः मात्र त्यांच्यापेक्षा जास्त चैनीत जगत होते! आरोप करणारी काही माणसं दर दोन-तीन महिन्यांनी परदेशवारी करायची. मात्र शरद जोशींच्या दोन्ही मुली अमेरिकेत असून ते फक्त दोन किंवा तीन वेळा अमेरिकेत गेले. त्यांची राहणी खरंच खूप साधी होती. पण आपला समाज विचित्रच आहे, त्याला काय करणार! म्हणून मी त्यांचं चरित्र लिहिलं. रयत शिक्षण संस्थेच्या रावसाहेब शिंदें यांचंही चरित्र मी का लिहिलं ? तर त्यांच्या कुटुंबानी समाजाकरता खूप काही केलं होतं. त्यांचे भाऊ अण्णासाहेब शिंदे सलग 14 वर्ष भारताचे कृषीमंत्री होते. पण त्यांच्या योगदानाबद्दल फारसं कुठे छापून आलं नव्हतं.
रयत शिक्षण संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या 450- 500 शाळांची जाणीवही शहरी लोकांना फारशी नव्हती. ते सारं वाचकांना कळावं म्हणून अशी काही चरित्रं मी लिहिली. पण माझ्या आवडीचं कथा-कादंबरी यांसारखं ललित साहित्य मात्र त्या काळात लिहू शकलो नाही, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे.
प्रश्न : तुम्ही आत्ता संपादकाच्या भूमिकेबद्दल बोललात आणि रामचंद्र गुहा यांच्याबद्दलही बोललात. गुहांनी अलीकडेच रुकून अडवाणी या त्यांच्या प्रकाशनाच्या संपादकाबद्दल म्हणजे लेखक आणि संपादक यांच्या नात्यावर 'कुकिंग ऑफ बुक्स' हे छोटंसं इंटरेस्टिंग पुस्तक लिहिलं आहे. त्यावर अडवाणी यांनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली 'एखाद्या संपादकाला मिळालेली ही लाँगेस्ट थैंक्यू नोट आहे.' तसंच या 25 वर्षांच्या काळात तुम्हाला महत्त्वाची वाटलेली, रुचलेली एखादी-दुसरी थैंक्यू नोट आहे का?
- तशा अनेक आहेत. शांता शेळके यांचं एक पत्र 'एका मासिकाचा उदयास्त' या पुस्तकात पुनर्मुद्रित केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, 'एके काळी लेखकाचे संपादकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. माझ्या सगळ्या प्रकाशकांशी माझे तसे संबंध राहिले. मी भागवत संप्रदायाची लेखिका नव्हे, पण सगळ्या भागवत बंधुंशी माझे संबंध प्रेमाचेच राहिले. अलीकडच्या काळात व्यवहाराला आलेल्या महत्त्वामुळे संपादक आणि लेखक यांच्यातल्या संबंधांना व्यावहारिक स्वरूप प्राप्त झालंय. याला अपवाद फक्त तुम्ही पती-पत्नी आहात. दुसऱ्या कोणत्याही संपादकाशी माझे असे भावबंध जुळले गेले नाहीत. माझ्यासाठी ते नातं अतिशय मोलाचं आहे.'
असं पत्र साधारण 20 वर्षांपूर्वी त्यांनी मला लिहिलं होतं. अलीकडेच माझा सत्तरावा वाढदिवस पुण्यातील डेक्कन जिमखान्यावर काही जवळच्या मित्रांनी खासगी स्वरूपात साजरा केला होता. केवळ व्हॉटसअपवर आमंत्रण असूनही त्यावेळी 60-70 जण हजर होते. त्या वेळी काही जणांनी आपल्या भावना व्यक्तही केल्या. 'भानू काळे यांना मी माझ्या पोटातून जन्म दिलेला नसला, तरीसुद्धा ते माझे मानसपुत्रच आहेत असं मी मानते', असं यास्मिन शेख तेव्हा सगळ्यांसमोर भाषण करताना म्हणाल्या होत्या. 98 वर्षांच्या एखाद्या विदुषीने असं सगळ्यांसमोर म्हणणं हे माझ्यासाठी फार मोठं प्रशस्तिपत्रक होतं. अगदी आयुष्याचं सार्थक झालं असं वाटावं, इतकं ते वाक्य माझ्यासाठी मोलाचं होतं.
प्रश्न : नंतरच्या काळात तुमच्या दोन लेखमाला अंतर्नादमधून प्रसिद्ध झाल्या. त्यातली 'बदलता भारत' ही जास्त स्वीकारली गेली असावी. कदाचित दुसरी लेखमाला चालू होती, तेव्हा माझंच अंतर्नाद वाचणं कमी झालं असेल. तुम्ही म्हणताय, तसा तो जरा उतरता काळही होता. पण बदलता भारत हा मासिकाचा बहरता काळ होता. शिवाय, ती कमालीची लोकप्रिय ठरलेली लेखमाला होती. त्याचं नंतर 'मौज' कडून पुस्तकंही आलं. त्याच्या पाच-सहा आवृत्त्याही निघाल्या. बदलता भारतमध्ये त्यावेळी तुम्ही मांडलेलं आज बऱ्यापैकी स्वीकारलं जातं. पण त्यावेळी तुम्हाला दिसणारा 'बदलता भारत' हा असा बेटाबेटांवरचा, तुकड्यातुकड्यांतला, ठरावीक ठिकाणांचा आहे आणि उर्वरित भारत बदललेलाच नाहीये, अशी टीका विशेषतः पुरोगामी वर्तुळात झाली. जाहीरपणे लेखी स्वरूपात नसली झाली, तरी थोडी हेटाळणीच्या स्वरूपात ती करण्यात आली. तुमच्या लेखनाबद्दल आक्षेप नव्हता. पण 'तुम्ही जो बदल दाखवताय तो तर इंडिया आहे; खरा बदलता भारत यांनी पाहिलेलाच नाहीये' असं म्हटलं गेलं. ते तुमच्यापर्यंत कसं आलं आणि त्यावरची तुमची प्रतिक्रिया काय होती?
- मला मुळात हे पटतच नाही. एक साधं उदाहरण सांगतो. आमच्या घरात आम्हा पाच भावांत रोज सकाळी महाभारत घडायचं. मारामाऱ्या व्हायच्या. त्या कशावर? शंकराचार्यांच्या अध्यात्मावर किंवा भारत- पाकिस्तान संबंध कसे सुधारता येतील यावर किंवा एखादा नेता खरा पुरोगामी आहे की प्रतिगामी यावर त्या होत नव्हत्या. आज सकाळी दूध आणायला कोण जाणार याबद्दल आमच्या मारामाऱ्या व्हायच्या! कारण त्यावेळी दुधाच्या सेंटरवर येणारं दूध जेमतेम पंधरा मिनिटांत संपायचं. दुधाचं कार्ड असायचं आणि आमच्या कार्डवर आम्हाला जेमतेम दोन बाटल्या दूध मिळायचं. दूध केंद्रावर गर्दी इतकी असायची की, अनेकदा ते दूध मिळायचंही नाही. आमच्या परिसरात एखाद-दुसरा अपवाद सोडला, तर दूध इतरत्र कुठंही उपलब्ध नसायचं. आज मात्र मी राहतो त्या पुण्यातल्या किंबहुना सगळ्या लहान-मोठ्या गावांतल्या, कोणत्याही भागात कधीही जा, दूध मिळतं. शिवाय दुधाचा तुटवडा दूर होणं, हा बदल ग्रामीण भागापासूनच झालेला आहे. खेड्यातला शेतकरी त्याच्या गाईपासून दूध काढतो, त्याचं संकलन होतं, पुढे त्यावर प्रक्रिया होते आणि शेवटी त्याचं वितरण होतं. हे सगळं मी गुजरात, संगमनेर, श्रीरामपूर, आंध्र अशा अनेक ठिकाणी पाहिलंय. तेव्हा ग्रामीण शेतकऱ्यांत हा बदल झालेला नाही, असं म्हणणं मला पटतच नाही. 'श्वेतक्रांती' हा वरवरचा बदल नक्कीच नाही. तो बऱ्यापैकी मूलगामी असाच बदल आहे.
माझ्या लहानपणी आमच्या घरी दारावर रोज रात्री 'अम्माss तायेsss' असं म्हणत भिकारी यायचे. त्यांना आम्ही उरलेलं शिळंपाकं अन्न द्यायचो. तशी गरज असणारे एक-दोन नाही, तर प्रचंड संख्येने भिकारी तेव्हा जागोजागी होते. आज मात्र घरात रात्रीचा स्वयंपाक उरला, तर तो कुणाला द्यायचा? हा प्रश्न आमच्या घरी पडतो. मोलकरीण, बिल्डिंगचे वॉचमन यांनाही ते शिळं अन्न नको असतं. आजूबाजूला कुठे भिकारीही नसतात. म्हणजे तशा अर्थानं भूक, उपासमार ही भारतात मला आज तरी दिसलेली नाही. आणि मी इतरांपेक्षा कमी प्रवास करतो, असं मला अजिबात वाटत नाही. अगदी वाद घालायचा म्हणून मुद्दाम उपाशी माणसं शोधूनच काढायची असा निश्चय असेल, तर कुठे तरी ती सापडतीलच ! पण तशी ती जगात कुठेही सापडतील!
प्रश्न : अशी अनेक उदाहरणं देता येतील. उदाहरणार्थ, मोबाईलमुळे परस्परांशी संपर्क साधणं किती सोपं, कमी खर्चिक झालं आणि त्यामुळे सामान्य माणसांच्या हाती खूप काही आलं, असंही विश्लेषण करता येईल. पण याबद्दल आणि तशी टीका करणाऱ्या माणसांबद्दल तुम्हाला काय वाटतं? या प्रश्नाच्या अधिकृत उत्तराची नोंद आपल्याकडे व्हावी म्हणून केवळ आपण हा प्रश्न घेतला. आता शेवटचे दोन प्रश्न. 
सुरुवातीपासून 2012 पर्यंतचा म्हणजे 17 वर्षांचा काळ अंतर्नादचा बहराचा काळ होता, असं तुम्हीच या पुस्तकात लिहिलं आहे. त्यानंतरची आठ-नऊ वर्ष हा उताराचा काळ आहे. त्याची दोन-तीन महत्त्वाची कारणं समोर दिसतात. कदाचित तुम्हाला सगळीच कारणं महत्त्वाची वाटत असतील. पण कोणत्या कारणांची तीव्रता जास्त आहे? सुरू केल्यानंतर 17 वर्ष मासिक चालवलं, याचा अर्थ तोपर्यंत तुम्ही साठीच्या उंबरठ्यावर पोहोचलात. कितीही नाही म्हटलं तरी दीर्घकाळ काम करणं अवघड होणं, शारीरिक क्षमता कमी होणं याचा परिणाम झालाच असणार. दुसरं म्हणजे, इतकं सगळं करूनही मराठी साहित्य आणि संस्कृती ही एका मर्यादेपलीकडे वाढत नाही, त्यातून फारसा काही प्रतिसाद मिळत नाही, वर्गणीदारांच्या नूतनीकरणासाठी वेगळे कष्ट घ्यावेच लागतात, लेखकांवर काम करावं लागतं, पुनर्लेखन करून घ्यावं लागतं, या प्रकारचा वैताग, त्रागा आवडीचं काम असलं तरी होतोच. तिसरं, बाहेर इतकी माध्यमं आलेली असताना एक नियतकालिक चालवण्यातून आपल्याला किंवा वाचकांना समाधान मिळणं कमी झालं. तुमच्यासाठी या तीनपैकी कशाचं महत्त्व किती होतं?
- तुम्ही सांगितलीत, ती सगळी कारणं त्यांच्या- त्यांच्या परीने योग्यच आहेत; सारख्याच महत्त्वाची आहेत. 'सांस्कृतिक समृद्धी' ज्या प्रकारे समाजात रुजायला हवी असं आम्हाला वाटत होतं, तशी ती रुजत आहे असं कुठेही आढळत नाही.
दर्जेदार साहित्य मिळत नाही हे महत्त्वाचे कारण आहेच. 'दर्जेदार' कशाला म्हणायचं हा अर्थात एक सनातन प्रश्न आहे. दर्जेदार शब्दाची नेमकी व्याख्या कुणीही, कधीही करू शकणार नाही. पण ज्याला मी 'दर्जेदार' मानतो असं साहित्य आम्हाला पुढेपुढे मिळत नव्हतं. तसं साहित्य लिहिलंच कमी जात होतं. ते अजिबातच लिहिलं जात नव्हतं, असं मी म्हणणार नाही. पण ते इतकं कमी लिहिलं जात होतं की, ते इतर सगळ्या अंकांत वाटलं गेल्यावर आमच्या वाट्याला काय उरणार?
आर्थिक कारणंही नक्कीच होती. जहिराती मिळत नव्हत्या. त्यासाठी लाचारीनं वागावं लागत होतं. अनेकदा मला ते सहन व्हायचं नाही. 'आपण जहिरात मागायला जातो म्हणजे आपण याचक आहोत आणि जाहिरात देणारा हा दाता आहे' ही भूमिका शब्दांत व्यक्त झाली नाही, तरी त्यांच्या देहबोलीत मला जाणवायची. समोर आलेली ब्याद कशी टाळता येईल हा भाव त्यांच्या चेहऱ्यावर असायचा. व्यावसायिक रचना नसली, तर पैसे वसुलीकरता विक्रेत्यांकडे जाणं हे शेवटी मालकालाच करायला लागतं. त्यामुळे मला व्यक्तिशः मानहानीकारक वाटणाऱ्या अशा अनेक गोष्टी कराव्या लागत होत्या. या सगळ्यातून अगदी गळून जायला होत असे. पुन्हा हे सारं कोणाला सांगायची काहीच सोय नव्हती. आमचं दुःख शेवटी आम्हालाच कळणार होतं. 'जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे' हे खरंच आहे.
विशेष महत्त्वाचं म्हणजे हल्ली उत्तम लेखक मिळत नाहीत. वाचक तरी पुरेसे कुठे आहेत? मी मासिक सुरू केलं, तेव्हा माझी मित्रमंडळी ही साधारण चाळीशीतली म्हणजे माझ्या वयातली होती. आता ती सगळीच म्हातारी होत होत साठीच्या पलीकडे गेली आहेत. आता मी कोणत्याही साहित्यिक कार्यक्रमाला जातो, तेव्हा बहुतेक मंडळी 'धवलकेशी' वर्गातली असल्याचं लगेचच लक्षात येतं. बहुसंख्य लोकांना टक्कल पडलेलं उघड दिसतं. साठी काय सत्तरीच्या पुढचीच मंडळी बहुसंख्य असतात. मी कुणा लेखकाच्या घरी भेटायला गेलो, तरी त्याच्या घरातली तरुण पिढी माझ्याशी बोलत नव्हती. 'या काका, बसा' एवढं बोलून ते आत निघून जात. मी कोणाचा पाहुणा होतो? खूपदा त्यांच्या वडिलांचा किंवा कधीकधी अगदी आजोबांचासुद्धा ! तरुण वर्ग साहित्यात नसणं हे मला खूप खटकत आलेलं आहे.
लेखकांचा विचार करा. भालचंद्र नेमाडेंची 'कोसला' प्रकाशित झाली, तेव्हा त्यांचं वय किती होतं? फक्त 25. शिवाजी सावंतांची 'मृत्युंजय' प्रकाशित झाली, तेव्हा त्यांचं वय फक्त 27 वर्षं होतं आणि हे त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या तेव्हाचे आहे. त्यांनी त्या प्रत्यक्षात लिहिल्या, तेव्हा त्यांचं वय आणखी एक-दोन वर्षं कमी असेल. गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर यांचं वय त्यांनी त्यांचं सगळ्यात उत्तम साहित्य लिहिलं तेव्हा काय होतं? 'माणदेशी माणसे' लिहिलं तेव्हा माडगूळकर अवघे 21 वर्षांचे होते. हे सारं मी माझ्या पुस्तकातही मांडलं आहे. त्या वयाचा आजचा तरुण मराठी साहित्यापासून किती दूर गेलाय याचा विचार करायला हवा. लिहिणाऱ्या बहुतेक लेखकांचं वय हे आज साठीच्या पुढे आहे. माणसाच्या आयुष्यात तारुण्य हा असा घटक आहे की, ज्याची भरपाई कधीच होत नाही. तुम्ही आर्थिक भरपाई करू शकाल; पण तारुण्य कुठून आणणार? तारुण्यातच सर्जनशीलतेचं प्रकटीकरण सर्वाधिक असतं. आजच्या या वयाच्या मराठी तरुणाला साहित्याशी काहीच देणं-घेणं नाही. साहित्यात साचलेपण येण्याचं हे एक प्रमुख कारण आहे. दुर्दैवाने त्याचा कधीच, कुठेच उल्लेख केला जात नाही.
प्रश्न : 'उत्तम दर्जाचं लेखन पुरेसं मिळत नाही' हेही तुम्ही अंतर्नाद उताराला लागण्याचं एक कारण सांगितलंत. माझंही स्वतःचं तेच मत आहे. पण मराठीतला खूप मोठा वर्ग तुमच्या-माझ्या या मताशी सहमत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की, तुम्ही ते लेखन बघत नाही. आमची खेड्यापाड्यांतून, दुर्गम भागांतून, बहुजन समाजातून आलेली मंडळी उत्तम दर्जाचं लिहितायेत. ते तुम्हाला दर्जेदार वाटत नाही. तुम्ही तुमचे पांढरपेशी, उच्चभ्रू, मध्यमवर्गीय निकष लावता. हा वाद कायमचा राहणार. त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. शेवटी, एका मर्यादेनंतर अभ्यास आणि अनुभव यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा असतो. तुम्हाला आणि मला ज्या दर्जाचा मजकूर हवा आहे, तो पुरेसा मिळत नाहीये असं आपलं एकमत असेल; तर तुम्हाला काय शक्यता दिसते ? पुढच्या काळात अशीच घसरण होत राहणार? की काही मार्ग अवलंबले, तर तर पुढच्या काळात चांगला मजकूर मिळू शकेल असं तुम्हाला वाटतं?
- काही उपाय आपण करू शकू. उदाहरणार्थ, साहित्याला दिल्या जाणाऱ्या अत्यल्प मानधनाचा मुद्दा घ्या. मराठी संस्कृतीत सादरीकरणाला असलेलं महत्त्व दुर्दैवानं साहित्य लेखनाला नाहीये. मुंबईला आम्ही एक कविसंमेलन आयोजित केलं होतं. ते रात्री उशिरापर्यंत रंगलं. त्यानंतर मी रात्री शिवाजी पार्कला माझ्या एका मित्राकडे राहायला गेलो. संमेलनात आलेल्या अशोक नायगावकर, इंद्रजित भालेराव, कविता महाजन, दासू वैद्य, अरूण म्हात्रे वगैरे आमंत्रित कवींना 'मी किती मानधन दिलं' असं त्या मित्रानं मला रात्री गप्पा मारताना विचारलं. मी काय 'हजार-बाराशे' असा होता तो आकडा सांगून 'ते नेहमी घेतात, त्यापेक्षा ते कमीच आहे' असंही म्हटलं.
त्यावर तो मित्र म्हणाला, "मग तू माझ्यावर अन्याय करत नाहीस का?"
"का? अन्याय कसला?" मी.
"मी कथा लिहिली, तर तू मला किती मानधन देतोस ?" - मित्र.
"काहीतरी रुपये 800 वगैरे." मी.
"मला कथा लिहायला आठ दिवस लागतात; त्याला कविता करायला फारतर दोन-तीन तास लागतात. मला त्या कथेचं मानधन फक्त एकदाच मिळतं. तो मात्र शंभर ठिकाणी याच कविता म्हणतो आणि त्याला प्रत्येक वेळी वेगळं मानधन मिळतं. पुन्हा ते प्रत्येक वेळी त्याला मिळणारं मानधनही मला फक्त एकदाच मिळणाऱ्या मानधनापेक्षा जास्त आहे. मग हा माझ्यावर अन्याय नाही का?"
असं तो मित्र म्हणाला. तसा सगळा संवाद हसतहसतच चालला होता, त्यात कटुता अशी काही नव्हती. पण त्याचा मुद्दा खराच होता.
आणि हे फक्त कथेच्या बाबतीत नव्हे, तर एकूणच साहित्याच्या बाबतीत खरं आहे. एखादा प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन मराठी लेखकांपेक्षा जास्त कमवत असेल ! मराठी लेखकाला दिलं जाणारं मानधन खरोखरच खूप कमी आहे, हे वास्तव आहे. सादरीकरणाला नक्कीच जास्त भाव आहे. सिनेमा वगैरेची तर गोष्ट राहूच द्या; पण दुय्यम, तिय्यम दर्जाच्या सिरियलमधली नटीही बहुतेक मराठी लेखकांपेक्षा जास्त मोठेपणा, जास्त प्रसिद्धी आणि जास्त मानधन मिळवते. अनेकदा एखाद्या कार्यक्रमाला मला बोलावलं जातं, तेव्हा दिल्या जाणाऱ्या मानधनातून माझं रिक्षाभाडंही सुटत नाही आणि कधीकधी ते दिलंही जात नाही हे वास्तव आहे. भविष्याचा विचार करताना मराठी साहित्यिकाला मिळणारं मानधन हे आजच्यापेक्षा खूप जास्त हवं, असं मला वाटतं. ही अर्थातच एक गोष्ट झाली.
दुसरी गोष्ट म्हणजे, लेखकानंही लेखनपूर्व चिंतनाला पुरेसा वेळ द्यायला हवा. हल्ली अनेक लेखकांना प्रसिद्धीची घाई झालेली असते. पटपट लिहून, काही नाही तर व्हॉट्सअपवर पाठवून, त्यावर मिळालेल्या अंगठ्यांमध्ये समाधान मिळवणारा मोठा वर्ग आहे. आपण लिहितो ते खूप दर्जेदार आहे, असं त्यांना वाटतं. आपण त्याला दर्जेदार म्हटलं नाही, तर ते नाराज होतात. खरं तर लेखनालाही रियाज लागतो. गायक गातो त्या आधी दोन-तीन तास आणि खरं तर रोजच तो गायनाचा रियाज करत असतो. कुणीही लेखक बनू शकतं, हे अर्धसत्य आहे. त्यासाठी तुमची शब्दसंपत्ती अधिक हवी, वाचन, चिंतन हेही करायला हवं. हे सगळं लेखकांना पटल्यानंतर जेव्हा लेखन केलं जाईल, तेव्हा त्याचा दर्जा नक्कीच उंचावलेला असेल.
आज लोक वाचनाकडे केव्हा वळतील? जेव्हा त्यांना वाचनातून त्यांच्या खोलवरच्या आंतरिक गरजा भागवणारं काहीतरी मिळेल तेव्हा. एखाद्या माणसाला आज नुसती माहितीच घ्यायची असेल, तर त्यासाठी गुगलवर जाऊन थोडे शब्द फक्त टाईप केले, तरी त्याला ती माहिती मिळते. इंटरनेटवर इतरही शंभर गोष्टी त्याला मिळतात. करमणूकही आता कुठेही मिळते. पूर्वीप्रमाणे ज्ञान आणि करमणूक यांसाठी त्याला साहित्याची गरज उरलेली नाही. त्यासाठी इतर माध्यमं आता अगदी हातातल्या मोबाइलवर उपलब्ध आहेत. पण आंतरिक गरजा भागवणारं, जगण्याचं बळ देणारं असं काही त्या माणसाला साहित्यातून मिळालं, तर तो ते साहित्य नक्की वाचेल. तशा स्वरूपाच्या लेखनाला आजही खूप वाव आहे आणि भविष्यातही नक्की असेल.
प्रश्न : अन्य माध्यमं देऊ शकत नाहीत, ते दिलं तरच नियतकालिकं टिकतील. नाहीतर रडतखडत जगतील किंवा मरतील.
- मरतील वगैरे मी म्हणणार नाही. मी मासिक बंद केलं म्हणून बाकीच्यांनीही बंद करावं असं मुळीच नाही. पण दिवसेंदिवस परिस्थिती कठीण होत आहे. सरकार स्वतः मराठी शाळा बंद करत नाही. पालकांनाच आपली मुलं इंग्रजी शाळेत घालायची आहेत. इंग्रजीमध्ये वाचणारा, लिहिणारा, विचार करणारा माणूस स्वप्नही इंग्रजीतच पाहतो. त्याची अभिव्यक्ती मराठीत होण्याकरता गरजेची असणारी भाषिक पकड आणि सामर्थ्य त्या शिक्षणातून त्याला मिळत नाही.
प्रश्न : 'एका मासिकाचा उदयास्त' हे तुमचं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. 'मौज' या मराठीतल्या अतिशय प्रख्यात प्रकाशन संस्थेकडून ते येतंय. तुमची पूर्वीची काही पुस्तकंही मौजने काढली आहेत. या पुस्तकावर मी साधनात लेख किंवा संपादकीयही लिहील. मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रातल्या, तसंच प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातल्या सगळ्यांनी हे पुस्तक वाचावं असं मला वाटतं. ते का वाचावं याबद्दल मी माझ्या लेखात लिहील. पण हे पुस्तक लोकांनी वाचावं असं तुम्हाला का वाटतं?
- एखादं नियतकालिक कसं सुरू होतं आणि कसं बंद होतं याबद्दल मराठीत आजवर कुठलं पुस्तक लिहिलं गेल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. अशा प्रकारची मांडणी करणारं हे मराठीतील बहुधा पहिलंच पुस्तक असावं. हे सर्वंकष आहे. त्यात व्यावहारिक आणि संपादकीय असे दोन्ही भाग आहेत. साधारण 1993 ते 2023 असा तीस वर्षांचा कालखंड त्यात आलेला आहे. अंतर्नादच्या खिडकीतून मला दिसलेलं साहित्यविश्वदेखील या पुस्तकात आहे. म्हणजे शासन आणि साहित्यिक संबंध, साहित्य संमेलनं, ग्रंथालयं, साहित्याचं अर्थकारण, भविष्यात साहित्यसृष्टी कशी असेल हे सारंही या पुस्तकात आहे. उगाचच काहीतरी खोटं किंवा अवास्तव लिहून भ्रामक चित्र वाचकांपुढे उभं करणं मी जाणीवपूर्वक टाळलं आहे.
अनेकदा या साहित्यव्यवहारातील व्यक्ती एखाद्या पुस्तकाचा किती उत्तम खप झाला, किती कोटी रुपयांची पुस्तकं विकली गेली, किती लोकांनी कार्यक्रमाला गर्दी केली, किती मोठ्या प्रमाणावर लोक कवितासंग्रह विकत घेत आहेत अशा स्वरूपाचे चित्र माध्यमांतून रंगवायचे. त्याचा प्रतिवाद करायचा मला काहीही अधिकार नाही. कुणाचा अनुभव तसा असेल, तर मला आनंदच आहे. पण माझा अनुभव कसा वेगळा होता, ते मी या पुस्तकात लिहिलं आहे आणि तेही वाचकांपर्यंत पोचायला हवं. शिवाय या पुस्तकात असणारी एकूण साहित्यविश्वाबद्दलची निरीक्षणं वाचकाला नक्कीच काहीतरी वेगळं देऊ शकतील, असं मला वाटतं. म्हणूनही वाचकांनी हे पुस्तक वाचावं. हे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवेल असा विश्वास मला वाटतो.
प्रश्न : या मुलाखतीचा समारोप तुमच्याकडून व्हावा असं मला वाटतंय. मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलो होतो ते 2001-02 च्या दरम्यान. तेव्हा 'तुमची आवडती कविता कुठली' असं मी विचारलं होतं. त्यावेळी तुम्ही मला ऐकवलेल्या त्या कवितेच्या चार ओळींनी आपण शेवट करावा असं मला वाटतं.
- अवश्य. मर्डेकरांची ती कविता मला खूप आवडते. सुरुवातीच्या ओळीच पहिला शब्द बदलून शेवटी पुन्हा येतात...
तरीही येतो वास फुलांना,
तरीही माती लाल चमकते;
खुरट्या बुंध्यावरी चढून
तरीही बकरी पाला खाते.
अस्मानावर भगवा रंग (आदर्शवाद)
आणि नागवे समोर पोर; (वास्तव)
तरीही डुलक्या घेत मोजते
ह्या दोहोंतील अंतर ढोर. (प्रयत्नवाद)
या ओळी मला नेहमीच प्रेरित करणाऱ्या आहेत. साहित्यक्षेत्रातही उद्या हेच घडू शकेल, नवा बहर येऊ शकेल. वाचनाचं माध्यम कदाचित पुस्तकांऐवजी मोबाईल हे बनेल आणि त्या माध्यमातून साहित्य वाचकांपर्यंत संक्रमित होईल. पण जोवर आपल्या मनातलं इतरांपर्यंत पोचवावं असं माणसाला वाटत राहील, तोवर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात साहित्याची निर्मिती ही होतच राहील, असा मला ठाम विश्वास वाटतो.
संवादक : विनोद शिरसाठ
शब्दांकन : रेणुका कल्पना
—
भानू काळे यांना वाचनाची, लेखनाची आणि संपादनाची आवड होती, छंद होता. त्यातून त्यांना आनंद मिळत होता हे खरंच आहे. पण सुरुवातीपासून नियतकालिक ही समाजाची गरज असते अशी त्यांची पक्की धारणा होती. ती मनाशी बाळगून त्यांनी पाव शतकाहून अधिक काळ अंतर्नादच्या माध्यमातून जे योगदान दिलं, ते विशेष महत्त्वाचं आहे. 'एका मासिकाचा उदयास्त' हे पुस्तक ज्यांना शक्य असेल त्यांनी अवश्य वाचावं. या मुलाखतीत आलेले अनेक मुद्दे त्या पुस्तकात अधिक स्पष्टपणे आलेले आहेत आणि या मुलाखतीत येऊ न शकलेल्या अनेक गोष्टीही त्या पुस्तकात आहेत.
या मुलाखतीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या