डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वाचन संस्कृतीपुढील आव्हानांची चर्चा करताना, सर्वप्रथम सर्वच साहित्यिकांनी (व प्रकाशक, संपादक, समीक्षक अशा नात्यांनी साहित्य व्यवहारात गुंतलेल्या प्रत्येकानेच) थोडे आत्मपरीक्षण करायची खूप आवश्यकता आहे. त्या प्रक्रियेला चालना देण्यासाठीच हे मनोगत.

मुंबईतील शीव येथील धर्मप्रकाश श्रीनिवासय्या विद्यालयातून (डी. एस. हायस्कूलमधून) 1969 साली मी अकरावीची परीक्षा उत्तीर्ण झालो. शाळेवर जीव होता, नाही असे नाही, पण पुन्हा त्या शाळेत जायचा प्रसंग फारसा कधी आला नाही. त्यानंतर अलीकडे, तब्बल 36 वर्षानंतर, तो आला. आमच्या तुकडीतील विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने. काही माजी विद्यार्थ्यांनी बरेच कष्ट घेऊन, जागोजागी विखुरलेल्या मित्र- मैत्रिणींचे पत्ते मिळविले, सर्वांना आमंत्रणे पाठवली. एका संध्याकाळी शाळेच्या आवारातच आम्ही एकत्र जमलो, सुरुवातीचा अर्धा-पाऊण तास एक विचित्र हुरहूर मनात दाटून आली होती. एकेकाळी चिरपरिचित असलेल्या त्या परिसात आज काहीसे अवघडल्यासारखे वाटत होते. पण काही वेळात वातावरण एकदम बदलले. पद्या-ढवळ्या-शंभू अशा त्यावेळच्या नावांनी मारलेल्या हाका आणि पाठीवरच्या थापा हां हां म्हणता सगळ्यांना भूतकाळात घेऊन गेल्या. दशकांची अंतरे कापून सगळे पुन्हा एकदा शाळकरी बनलो. 

आपण काय काय करतो, हे प्रत्येकाने दोन-चार वाक्यांत सांगायचे ठरले. माझी पाळी आली, तशी मीही पुढे झालो. पण मी काही बोलायच्या आधीच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्याने प्रश्न केला; "तुमच्यापैकी कोणी-कोणी अंतर्नाद मासिकाचे नाव ऐकले आहे? हात वर करा?"
अगदी थेट शाळेतल्यासारखा प्रश्न! 

पाच-सहा हात वर झाले. सुमारे सत्तर- ऐशी जणांपैकी. 

"आणि यातल्या किती जणांनी हे मासिक वाचले आहे?"- पुढचा प्रश्न. 

दोन-दोन हात खाली झाले. 

कुठलीही प्रचंड पाहाणी-व्यासंग न करता माझ्या डोळ्यांपुढे आमच्या आजच्या वाचनसंस्कृतीचे चित्र उभे राहिले. 

ही सर्व मंडळी आज वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या व्यवसायांत, वेगवेगळ्या पातळ्यांवर असली तरी मूळची ती होती मध्यमवर्गातली. किंबहुना कनिष्ठ मध्यम वर्गातली. मराठी माध्यमातच शिकलेली. घरी मराठीच बोलणारी. मराठी साहित्याचा पारंपरिक प्रातिनिधिक मतदारसंघ (टिपिकल कॉन्स्टिट्युअन्सी) म्हणता येईल, तो हाच मतदारसंघ. यातून 'अंतर्नाद'च्या मर्यादा स्पष्ट होतच होत्या, पण एकूण मराठी वाचन संस्कृतीच्या मर्यादाही सूचित होत होत्या. 

हिंदू संस्कृती, ग्रामीण संस्कृती, दलित संस्कृती, ग्राहक संस्कृती अशा शब्दप्रयोगांमधली व्यापकता वाचन संस्कृती या शब्दप्रयोगात अजिबात नाही. एकूण समाजाचा विचार करता वाचकांचे प्रमाण चार-पाच टक्क्यांपेक्षा अधिक असेल, असे मला तरी वाटत नाही. आज नाही, पूर्वीही नसावे. 

ज्या अर्थाने वाचन संस्कृती पाश्चात्त्य समाजात रूजली त्या अर्थाने आपल्या भारतीय समाजात वाचन संस्कृती कधी रुजलीच नाही. त्यासाठी पोषक अशी समृद्धी, असे स्वास्थ्य आपल्या समाजात फारसे कधी उपलब्धच नव्हते. ही पोषक भूमी निर्माण व्हायला आत्ताआत्ता, गेल्या दोन-तीन पिढ्यांमध्ये सुरुवात होऊ लागली होती आणि तेवढ्यातच या बाल्यावस्थेतील वाचन संस्कृतीपुढे दृक्श्राव्य माध्यम आणि जागतिकीकरणाचा रेटा यांनी गंभीर आव्हाने उभी केली आहेत. 

त्या सर्वांचा विस्तृत ऊहापोह करणे, हा खरे तर एका लेखमालेचा विषय आहे. वरवर हाताळायचा हा विषय नाही. पण या आव्हानांना तोंड द्यायची सुरुवात ज्यांचे अवघे अस्तित्वच वाचन संस्कृतीवर अवलंबून आहे, त्या साहित्यिकांकडून व्हायला हवी, असे मात्र आवर्जून सांगावेसे वाटते. अंतर्नादमध्ये पूर्वी साहित्यिकांसाठी उपस्थित केलेल्या दहा प्रश्नांचा या ठिकाणी पुनरुच्चार करावासा वाटतो. हे दहा प्रश्न पुढीलप्रमाणे... 

1. समाजाने साहित्याला महत्त्वाचे स्थान द्यायला हवे असेल, तर साहित्यानेही समाजाला महत्त्वाचे स्थान द्यायला, सामाजिक सामिलकीचे भान ठेवायला नको का?

2. ज्या सामान्य वाचकांच्या जिवावर मला मोठेपणा प्राप्त होतो, त्या सामान्य वाचकांशी फटकून न वागता, किंवा त्यांची कुचेष्टा न करता, उलट त्यांच्याविषयी योग्य तो आदर मी माझ्या दैनंदिन वागण्या-बोलण्यात दाखवतो का?

3. आवश्यक तेवढा वेळ देऊन, जरूर तेव्हा पुनर्लेखनाचे कष्ट घेऊन आणि मुख्य म्हणजे निष्ठापूर्वक व स्वतःच्या अंतर्नादाशी इमान राखून मी साहित्यनिर्मिती करतो का?

4. वाचनसंस्कृती टिकवली पाहिजे, असे म्हणत असताना मी स्वतः इतरांनी लिहिलेले वाचण्यासाठी पुरेसा वेळ देतो का? नवोदित लेखकांना मार्गदर्शन करतो का?

5. इतरांच्या साहित्याविषयीची माझी प्रतिक्रिया आत्मीयतेने आणि प्रामाणिकपणे त्यांना कळवण्याची तसदी मी घेतो का?

6. मानधनाची/प्रवासखर्चाची अपेक्षा न ठेवता, स्वत:च्या खिशाला तोशीस देऊन मी साहित्य संमेलनासारख्या कार्यक्रमांना उपस्थित राहतो का? 

7. संस्थेच्या सदस्यत्वापोटी येणाऱ्या, वा 'सप्रेम भेट' मिळणाऱ्या नियतकालिकांव्यतिरिक्त काही नियतकालिके मी वर्गणीदार म्हणून घेतो का?

8. वर्षातून आठ-दहा पुस्तके तरी मी विकत घेतो का?

9. केवळ अन्य पर्याय उपलब्ध नाही म्हणून मराठीकडे वळलेल्यांकडे साहित्य व्यवहाराची सर्व सूत्रे जाऊ नयेत, असे म्हणत असताना, स्वत:च्या कुटुंबीयांना मराठी साहित्याकडे आकर्षित करण्याचा मी प्रयत्न करतो का?

10. माझ्या दैनंदिन व्यवहारात मी मराठीचा शक्य तितका वापर करतो का?

वाचन संस्कृतीपुढील आव्हानांची चर्चा करताना, सर्वप्रथम सर्वच साहित्यिकांनी (व प्रकाशक, संपादक, समीक्षक अशा नात्यांनी साहित्य व्यवहारात गुंतलेल्या प्रत्येकानेच) थोडे आत्मपरीक्षण करायची खूप आवश्यकता आहे. त्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी हे दहा प्रश्न.

Tags: भाषा वाचनसंस्कृती वाचन पुस्तके साहित्य Books Language Reading Rural Youth Literature weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके