डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कोत्तापल्लेंची लेखणी सामाजिक प्रश्नांबद्दल आस्था व्यक्त करते, परंतु हे करीत असताना रसिकमान्यतेसाठी ‘चलाख अशी समीकरणे’ मांडत नाही. ही व्यवस्था कुचकामाची आहे, व्यवस्था राबवणारे अधिकारी नालायक आहेत, त्यामुळे ही व्यवस्था मोडून-तोडून टाकली पाहिजे व व्यवस्था राबविणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या खुर्च्यांपासून दूर करून त्यांना दंडीत केलं पाहिजे अशा स्वरूपाच्या लोकप्रिय घोषणा, विचार आणि ‘चलाख अभिनिवेश’ त्यांच्या कलाकृतीत व्यक्त होत नाहीत. त्याऐवजी त्यांच्या साहित्यकृती स्वतःत स्थिर होऊन मौलिक चिंतन मांडतात. विचार करतात. विचार करायला लावतात. अंतर्मुख होण्यास भाग पाडतात. व्यावहारिक अभिनिवेशाच्या पलीकडे जाऊन समस्येचा विचार करताना समस्या सोडवण्यासाठी काही मार्गही सांगतात. 

एका लेखकाने दुसऱ्या लेखकावर लिहिण्याचा मराठीमध्ये प्रघात नाही म्हणतात. आत्मीयता असेल, स्नेह आणि मैत्री असेल तर कदाचित परस्परांवर लिहिलं जात असेल. पण तेही दुर्मिळच आहे. एकाचं लिखाण दुसऱ्याने नीट वाचलेलं नसणं, इगोच्या भानगडी इत्यादींमुळे एका लेखकाने दुसऱ्या लेखकावर लिहिलेलं मराठी भाषेत सहसा आढळत नाही. अन्य भारतीय भाषांधून असे लिखाण आढळत असेल. हिंदीत तर असे लिखाण, असे प्रयोग मी पाहिले-वाचले आहेत. अशा पार्श्वभूीवर साधनाच्या प्रस्तावानुसार मला डॉ.नागनाथ कोत्तापल्ले या लेखक-समीक्षक मित्राबद्दल काही लिहायचं आहे. हनुवटीवर बोट ठेवून व टेबलाजवळ बसून मी विचार करतो आहे. 

कोत्तापल्लेंचं कवी असणं, कथा-दीर्घकथाकार असणं, कादंबरीकार असणं, विचारवंत-समीक्षक असणं, ललितगद्यकार असणं, व्याख्याता असणं- मुख्यतः शिक्षक असणं, या सगळ्यांमुळे त्यांच्यावर अनेक लेख लिहावे लागतील. एका संक्षिप्त लेखात त्यांचा कोणता म्हणून चेहरा रेखाटायचा ही समस्या दिसते आहे. त्यातून, एक मूल्याग्रही व सज्जन असा माणूस त्यांच्यात दिसतो ही वेगळीच वस्तुस्थिती. या मूल्याग्रही माणसावर वेगळं असं लिहावं लागेल. थोडक्यात, एका लेखात न सापडणारा असा हा लेखक. 

मराठी समीक्षेने नोंदवल्याप्रमाणे मराठी साहित्याला 1970 नंतर प्रामुख्याने नवे धुमारे फुटू लागले. साहित्याच्या कथित साचलेपणाला छेद दिला जाऊन नवी चिंतनशीलता साहित्यात प्रकटू लागली आणि वेगवेगळे प्रयोग दृष्टीस पडू लागले. साहित्यांतर्गत ‘नव्या चेतनेचे पुनरूत्थान होणे’ असे या घटनेचे वर्णन समीक्षेने या संदर्भात केले आहे. नव्या जाणीवा प्रकट करून सर्वदूर पसरलेल्या उपेक्षित माणसाबद्दल आस्था दाखविणारे साहित्य प्रकट होऊ लागले, त्याच काळात नागनाथ कोत्तापल्ले लिहितांना दिसतात. कोत्तापल्ल्यांच्या कलाकृती सामान्य माणसाबद्दल आस्था दाखवतात आणि चिंता प्रकट करतात. हा सामान्य माणूस त्यांनी केंद्रस्थानी मानलेला असतो. या सामान्य माणसाचं शोषण हा त्यांच्या चिंतनाचा विषय. व्यवस्था आणि व्यवस्था राबविणाऱ्या शक्ती, व्यवस्थेला मुठीत आणि खिशात ठेवू इच्छिणारे स्वार्थी राजकारणी यांच्याबद्दल त्यांच्या कृती क्षोभ व्यक्त करतात. हा सर्वसामान्य माणूस नाडला जातो आहे, पिळवटून टाकला जातो आहे, त्याच्या श्रमाचं आणि भावनेचं मोठ्या प्रमाणात शोषण होतं आहे, तो लुटला जातो आहे याबद्दल त्यांच्या कथा चीड व्यक्त करतात आणि प्रभावीपणे चिंतन मांडतात. सन 1970 पासून पुढच्या कालखंडामध्ये मराठी कलाकृतींतून साम्यवादी विचारांचा एक प्रभाव जाणवू लागला. सामान्य माणसाची पारध होत असून बिनचेहऱ्याची भावनाशून्य व कठोर अशी व्यवस्था सामान्य माणसाचा घात करताना दिसते, असे सूत्र सामान्यतः अशा प्रकारच्या लेखनातून दिसत असे. कोत्तापल्ल्यांनी सामान्य माणसाबद्दल चिंता व्यक्त करीत असताना व कथित साम्यवादाशी जवळीक साधक असतानासुद्धा रूढ संकेतापलीकडे जाऊन शोषणाच्या समस्येवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे, हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. याच वैशिष्ट्यामुळे त्यांचे लेखन श्रेष्ठ साहित्याकडे वाटचाल करू लागले हे माझे निरीक्षण! 

कोत्तापल्लेंची लेखणी सामाजिक प्रश्नांबद्दल आस्था व्यक्त करते, परंतु हे करीत असताना रसिकमान्यतेसाठी ‘चलाख अशी समीकरणे’ मांडत नाही. ही व्यवस्था कुचकामाची आहे, व्यवस्था राबवणारे अधिकारी नालायक आहेत, त्यामुळे ही व्यवस्था मोडून-तोडून टाकली पाहिजे व व्यवस्था राबविणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या खुर्च्यांपासून दूर करून त्यांना दंडीत केलं पाहिजे अशा स्वरूपाच्या लोकप्रिय घोषणा, विचार आणि ‘चलाख अभिनिवेश’ त्यांच्या कलाकृतीत व्यक्त होत नाहीत. त्याऐवजी त्यांच्या साहित्यकृती स्वतःत स्थिर होऊन मौलिक चिंतन मांडतात. विचार करतात. विचार करायला लावतात. अंतर्मुख होण्यास भाग पाडतात. व्यावहारिक अभिनिवेशाच्या पलीकडे जाऊन समस्येचा विचार करताना समस्या सोडवण्यासाठी काही मार्गही सांगतात. त्यांच्या कलाकृती, त्यामुळे वैचारिक पक्वतेची लक्षणे दाखवतातव्य क्त करतात. ही पक्वता मला मूल्यवान आणि लोभस वाटत आली आहे. लेखकाला वैश्विक करूणा सापडल्याचे हे लक्षण असते. 

लेखक द्रष्टा असतो. दूरचे पाहतो. याची एक साक्ष त्यांच्या ‘राजधानी’ या दीर्घकथेत दिसते. ही दीर्घकथा सन 1983 पूर्वी लिहिलेली आहे. नायक नोकरीच्या निमित्ताने एका तालुकासदृश्य गावात आलेला आहे आणि सगळं गाव घाणीने व्याप्त आहे. सगळं गाव नैसर्गिक विधीसाठी-शौचासाठी उघड्यावर जातं आहे आणि सर्वत्र नरकासारखी अवस्था झालेली आहे. या परिस्थितीत बदल झाला पाहिजे असे नायकाला वाटते आहे. नायक प्रयत्न करतो. सर्व पातळ्यांवर जागरूकता आणण्याचा प्रयास करतो. चर्चा करतो, अर्ज लिहितो. सर्वांना भेटतो. काहीच होत नाही. कोणाला ही समस्याच महत्त्वाची वाटत नाही तर कोणाला यात राजकारण दिसायला लागतं. नगराध्यक्षासारख्या माणसाला कथानायक प्रतिस्पर्धी वाटायला लागतो आणि कथानायकाला साथ देण्याच्याऐवजी त्याच्या विरोधात कारस्थाने रचायला लागतो. चेतनाशून्य, निगरगट्ट अशी व्यवस्था आणि लबाड माणुसकीशून्य असे व्यवस्था राबविणारे अधिकारी या सगळ्यांच्याविरूद्ध एकट्याने लढण्याचे कथानायकाने ठरविणे आणि स्वतःच ‘महात्मा गांधी की जय!’ असे म्हणून घाण साफ करायला एकट्याने सुरुवात करणे हा कथेचा शेवट आहे. कोणीतरी एकाने या सफाई आंदोलनाला साथ देणे आणि दिवसभर रिकामटेकड्या लोकांनी त्या दोघांना पाहून जाणे असा विषाद कथेतून दिसतो. म्हणजे संघर्ष संपत नसतो आणि तो संपवायचादेखील नसतो. कोणी साथ देवो अथवा न देवो रचनात्मक कार्य स्वतःच करायला सुरुवात करायची असते, असा विचार या कथेतून व्यक्त होतो. 

कथाकाराच्या द्रष्टेपणाचा हाच विचार पुढे चालवून आज देशभरामध्ये स्वीकारला गेला आहे. ‘हागनदारीमुक्त गाव-निर्मलग्राम’ इत्यादी संकल्पना आज तीस वर्षांनंतर सर्वत्र स्वीकृत व्हायला लागलेल्या आहेत. लोकांनी ठरवलं तर त्यांचा गाव निर्मल होऊ शकतो हे लोकांनीच दाखवून दिलं आहे. व्यवस्था केवळ सुविधा उपलब्ध करून देऊ शकते आणि व्यवस्थेतील माणसे सुविधा राबविण्यासाठी मदत करू शकतात. मात्र इच्छाशक्ती लोकांचीच जागृत असावी लागते व आपले जीवनमान लोकांनीच सुधारायचे असते हे तथ्य अलीकडच्या काळात स्वच्छपणे सर्वांना दिसले आहे. देशपातळीवर महाराष्ट्रातील सर्वाधिक गावे निर्मलग्राम म्हणून घोषित झाली आहेत. नगराध्यक्षाच्या पातळीवरील ‘प्रातिनिधीक लोकशक्ती’ आणि व्यवस्थेतील अधिकाऱ्यांची व्यक्त होणारी आस्था जेव्हा जेव्हा मी पाहात आलो तेव्हा प्रत्येक वेळेस मला ‘राजधानी’ या दीर्घकथेची आठवण होत राहिली. कोत्तापल्ले यांनी 30-35 वर्षांपूर्वी या कथेतून थोड्याशा सांकेतिक पद्धतीने ही समस्या मांडली. कोणीच मदत केली नाही तरी घमेलं व फावडं घेऊन एकट्याने साफसफाईची सुरुवात करणारा कथानायक ‘आदर्शवादा’ची व थोड्याशा ‘रोमेटिसिझम’ची आठवण करून देत असला तरी समाजपरिवर्तन आपणच करू शकतो हा त्यांच्या कथेतला संदेश महत्वाचा आहे. ही दीर्घकथा आज गावोगावीच्या सफाई आंदोलनाच्या रूपाने वस्तुस्थिती म्हणून समोर आली आहे. म्हणून ही कालातीत अशी दीर्घकथा. लेखक द्रष्टा असतो. कोत्तापल्ल्यांच्या कथेतील द्रष्टेपणा हा असा आपल्याला उमगतो. 

भल्या पहाटे कथानायकाला व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी उचलून नेणे आणि एका चौकीत त्याला बसवून ठेवून त्याच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती करणे ही ‘थीम’ परदेशी साम्यवादी साहित्यातून आपल्यापर्यंत आली. बिनचेहऱ्याची व्यवस्था कथानायकाला त्याच्या बालपणीपासूनच्या आठवणी सांगण्याची सूचना करते व तो जे काही सांगेल त्याची नोंद केली जाते. त्याचे आवडते लेखक कोण, त्याचे विचार कोणते आहेत, त्याचे मित्र-मैत्रिणी कोण, त्याचे छंद कोणते, इत्यादी प्रश्न आरोपासारखे कथानायकासमोर येतात आणि कथानायकाचे निवेदन जणू अपराधकबुली असल्याप्रमाणे नोंदवले जाते. अशा प्रकारच्या ‘ट्रायल्स’ परदेशी संकल्पनेतून आणि अनुवादातून साम्यवादाच्या साहाय्याने मराठी साहित्यामध्ये डोकावू लागल्या त्यावेळेस शोषणाबद्दल चीड व्यक्त करणारे लिखाण कोत्तापल्ले करीत असतांना दिसत असले तरीसुद्धा त्यांचे लिखाण मानवी चेहरा- मोहरा आणि या मातीतला आशावाद टिकवून ठेवताना दिसते. त्यामुळे त्यांचे लिखाण कोणत्या तरी ‘इझम’च्या आहारी जात नाही. उलट त्यापलीकडे बघते. मानवी जीवनातील समस्येचे समाधान शोधण्यासाठी विचार करते. त्यामुळे ते लिखाण या मातीशी संलग्न राहते. इथल्या मातीतून जीवनरस शोषून घेते. म्हणून ते लिखाण द्रष्टे, आणि शक्तीमान असे व्हायला लागते. 

आदर्शवाद हा केवळ भाबड्या साहित्यिकांचा विषय नसतो तर ते जीवनाचे आकलनसुद्धा असू शकते, हे या लेखनातून मांडले गेले. कोत्तापल्ल्यांच्या कलाकृतींमधून दिसणारा आशावाद काहीएक आश्वासन देताना दिसतो. माणसाने ताठ उभे राहावे, कोसळून पडू नये, त्याने लढावे, संघर्ष करावा, परिस्थिती बदलून टाकावी अशी इच्छा त्यांच्या कलाकृती व्यक्त करतात. ‘असं पडून राहून कसं चालेल? आपल्या गरिबांना काहीतरी केलं पाहिजे...’ असा आशावाद त्यांची पात्रं सहजच व्यक्त करतात. नैतिकतेच्या प्रश्नांपेक्षा पोटाचे प्रश्न जास्त महत्त्वाचे असतात हे ‘भयानक सत्य’ कथानायकाला कळणे आणि तरीही शेतकरी असलेल्या कथानायकाला दुष्काळानंतरच्या पावसाने अचानक बळ देणे या बाबी कोत्तापल्ल्यांच्या कथांधून काही शाश्वत सत्य सांगतात. ‘रक्त आणि पाऊस’ या कथेचा शेवट बघण्यासारखा आहे. ‘...मोडून पडलेला शिवा पावसात शक्तिमान झाला होता आणि ताडताड पावलं टाकत तो मास्तरांच्या घराकडे परत निघाला होता. एखाद्या खुन्याला रक्त चढावे तसा पाऊस त्याच्या डोक्यात चढला होता.’ उद्विग्न आणि पराभूत कथानायकाला निसर्गातील शक्तींमुळे प्रेरणा मिळणे आणि त्यातून त्याची अस्मिता जागृत होणे, त्याला शक्ती प्राप्त होणे या बाबी कोत्तापल्ल्यांना कथित इझमच्या पलीकडे नेऊन जीवनवादी साहित्यिक बनवतात. 

1984 पूर्वी लिहिलेली ‘वारसा’ ही कोत्तापल्ल्यांची समर्थ अशी कथा आहे. आपला समाज विविध संस्कृतीचे एकत्रित रंग घेऊन बनलेला आहे. पंढरपूरच्या वारीला मुसलमानांनीसुद्धा नियमितपणे जाणे ही अनोखी वस्तुस्थिती आजही समाजात दिसते. अनेक वर्षांपासून अशा वारीला जाणाऱ्या ‘चाचा’ची ही कथा. मूलतत्त्ववादी मुसलमान पुरोहित चाच्याला विरोध करतात आणि हिंदूंच्या पंढरीच्या वारीला वारकरी म्हणून जाणार असाल तर तुमच्या मृत्यूनंतर तुमचे मुसलमानी धर्माप्रमाणे अंतिम संस्कार होणार नाहीत असे निक्षून सांगतात. मृत्यूनंतर आपल्या प्रेताला कोणीही हात लावणार नाही ही भयप्रद कल्पना स्वीकारूनसुद्धा चाचा वारीमध्ये सामील होतो हा कथेचा शेवट आहे. पराभवाच्या रेषा आकाशभर पसरल्या होत्या असा शेवट कथेमध्ये नोंदवला जातो. आता, पराभव कोणाचा हे कथाकाराने आपल्यावर सोडलेले असते. धर्म, धर्माधिष्ठित शोषण व दहशतवाद याच्या पलीकडे कुठेतरी मानवी प्रेरणा व आशादायी मानवी चेहरा असण्याचे सूचन कोत्तापल्ल्यांच्या कथा करतात ही महत्त्वाची बाब आहे. भलेही व्यवस्थेला चेहरा नसेल, भलेही व्यवस्था राबविणारा प्रत्येक अधिकारी माणूस एका प्रचंड अशा यंत्राचा एक छोटासा भाग असेल तरीही शोषण केले जाणाऱ्या सर्वसामान्य माणसाला मात्र मानवीय चेहरा आहे आणि त्याच्या समस्येला उत्तरदेखील आहे अशा आशावादी संकल्पनेवर त्यांचे लिखाण थबकते, विचार करते, वैश्विक करूणा जपत स्वतःच्या सामर्थ्याने उभे राहते ही अत्यंत आश्वासक अशी बाब. 11 जानेवारी 2013 रोजी चिपळूण येथे सुरू होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या मंचावरून डॉ.नागनाथ कोत्तापल्ले आपले अध्यक्षीय भाषण वाचतील. सर्वसामान्य माणसाच्या शोषणाचा विषय साहित्यांतर्गत आस्थेचा असून मध्यवर्ती आहे असे मानणाऱ्या मानवतावादी-जीवनवादी अशा लेखकमित्राला या छोट्याशा लेखाद्वारे मी शुभेच्छा देत आहे. 

Tags: चिपळूण अखिल भारतीय साहित्य संमेलन रक्त आणि पाउस राजधानी लेखक मराठी साहित्य साम्यवाद भारत सासणे नागनाथ कोतापल्ले जीवनवादी साहित्यिक Chipalun Akhil Bhartiy Sahity Sanmelan Rakt Aani Paus Rajdhani Lekhak Marathi Sahitya Samyvad Bharat Sasane Nagnath Kotapalle Jivanvadi Sahityik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भारत सासणे,  पुणे
bjsasane@yahoo.co.in

मागील चार दशके भारत सासणे हे मराठीतील आघाडीचे साहित्यिक मानले जात असून, त्यात कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, अनुवाद इत्यादी प्रकारचे लेखन आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके