डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ज्या काळात मराठीमध्ये गजल लोकप्रिय होत होती, तो काळ विचित्र गुंतागुंतीचा असा होता. स्वातंत्र्योत्तर काळातील परिवर्तनाचे वारे वाहत असतानाच रसिकतेचे म्हणून रूढ असलेले मानदंडसुद्धा सरकायला लागले होते. या काळात कवी सुरेश भटांनी गजल सर्वत्र पोहोचवली. कवीची अडचण येथूनच सुरू होते. जे सांगायचे आहे ते समाज ऐकत नाही असे वाटत असेल, तर कवी हा आक्रमक होताना दिसतो. कवी सुरेश भटदेखील या विधानाला अपवाद नव्हते. त्यांची आक्रमकता, सांगण्याचा आणि ऐकवण्याचा आग्रह एक विलक्षण वस्तुस्थिती अधोरेखित करतो.

‘गजलसम्राट सुरेश भट आणि...’ या चरित्रात्मक आठवणींच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष माननीय विजय कुवळेकर, सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आणि साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय डॉ.अक्षयकुमार काळे, सूत्रसंचालक आनंद देशमुख, प्रदीप निफाडकर, पुष्पा भट आणि या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपण सर्व रसिक मर्मज्ञ, जाणकार मित्रहो!

‘गजलसम्राट सुरेश भट आणि...’ या पुस्तकाचे प्रकाशन होते आहे याचा मला विशेष आनंद आहे. याची दोन-तीन कारणे आहेत. एक म्हणजे, कवींच्या संदर्भातील आणि त्यांच्या व्यक्तिगत आठवणींवर प्रकाश टाकणारी पुस्तके मराठीमध्ये संख्येने कमीच आहेत. कवीला कवितेतून शोधायचे असते, हे खरेच आहे; पण त्याव्यतिरिक्त किमयागार कवींसंदर्भात एक सुप्त असे आकर्षण रसिकांच्या मनात दडलेले असते. या आकर्षणाच्या पोटी कवींच्या व्यक्तिगत आयुष्याच्या पर्यावरणात डोकावण्याचा प्रयत्न रसिक करीत असतो. ही उत्सुकता स्वाभाविक म्हटली पाहिजे. मात्र, या उत्सुकतेचे शमन होतेच, असे नाही. म्हणून अजूनदेखील विविध कवींच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल विविध प्रकारचे संशोधन चालूच राहिलेले दिसते. मर्ढेकरांबाबत आपल्या कुतूहलाचे अद्याप शमन झालेले नाही. कवी ग्रेसबाबत देखील अशीच परिस्थिती आहे. गजलसम्राट अशी उपाधी ज्यांना लावण्यात येते, ते कवी सुरेश भट यांच्याबाबत समाजामध्ये अशाच प्रकारचे कुतूहल आणि त्यांना जाणून घ्यायची उत्सुकता कायम स्वरूपात आढळत आली आहे. कवी आणि गजलकार प्रदीप निफाडकर यांनी हे पुस्तक लिहून समाजाच्या कुतूहलाचे काही अंशी शमन केले आहे आणि म्हणून या पुस्तकाचे मी हार्दिक स्वागत करतो. दुसरे कारण असे की, मराठीच्या एकूण काव्यक्षेत्रात गजल या काव्यप्रकाराला एक वेगळीच लोकप्रियता प्राप्त झालेली आहे; तथापि, या गजलबद्दल शास्त्रीय अशी चर्चा सहसा कोठे होत नाही. आज प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाच्या अनुषंगाने गजलबाबत काही चर्चा होते आहे आणि रसिकांना एक मौल्यवान खजिना उपलब्ध होतो आहे, या कारणासाठीसुद्धा मला विशेष आनंद होतो आहे. म्हणून कवी निफाडकर यांचे मी अभिनंदन करतो.

उर्दू आणि फारसी इत्यादी भाषांमधून स्वीकृत करून मराठीमध्ये गजल आणण्याचे श्रेय कवी माधव  ज्यूलियन यांना दिले जाते. गजलमधील विविध प्रयोग त्यांच्या काळात आणि सन १९३९पूर्वी झालेले आहेत. नंतरच्या काळात मराठीत गजल हा केवळ एक काव्यप्रकार म्हणून न राहता काव्याविष्काराच्या शक्यता शोधणारा साहित्यप्रकार झाला. अनेक कवी या प्रयत्नात आपल्या अंतस्‌ प्रकटीकरणासाठी गजलच्या वाटेने जाताना दिसत आले. कवींच्या दृष्टीने गजल ही अतिशय कठीण अशी वाट. या आविष्कारात तंत्राचा बडेजाव तर आहेच, पण तंत्र आत्मसात करून आकाशसदृश आशय अल्पाक्षरात व्यक्त करण्याचे सामर्थ्य प्रकट करण्याचे कसबसुद्धा प्रकट करावे लागते. त्यामुळे फार थोडे कवी या वाटेने जाऊन यशस्वीपणे अंतिम ठिकाणाला पोहोचलेले दिसतात. ‘इमान अबाधित राखत मुक्कामापर्यंत पोहोचण्याची मोमिनांची धडपड’ अशीच म्हणावी लागते. पर्शियन भाषेकडून उर्दू भाषेला गजलच्या रूपाने एक अनमोल अशी देणगी मिळालेली आहे, म्हणून गजलला ‘आबरू-ए-शायरी’ म्हटले जाते. गजलमुळे कलात्मक भाषाविष्कार शक्य झाला, असेही म्हटले गेले आहे. इसवी सन ८८० ते ९४९ या कालखंडातील पर्शियन कवींनी दोन-दोन ओळींची गजल पहिल्यांदा सादर केली. येथूनच गेल हा प्रकार धर्मप्रचारक, मोगल सैनिक आणि अन्य यांच्यामार्फत पहिल्यांदा भारतामध्ये दाखल झाला. त्या वेळेस अर्थात उर्दू ही भाषा अजून तयार होऊन पूर्णपणे विकसित होऊन अस्तित्वात यायची होती. पर्शियन कवी अमीर खुसरोच्या नंतर जवळपास चारशे वर्षांनंतर म्हणजेच सन १६००च्या आसपास उर्दू भाषेचा जन्म झालेला आहे. सुरुवातीला या भाषेला ‘रेख्त’ असं म्हटलं जात होतं. शहाजहानच्या कालखंडात या भाषेला नंतर ‘उर्दू’ असं म्हटलं जाऊ लागलेलं आहे. अगदी प्राथमिक व्याख्येनुसार गजल म्हणजे ‘स्त्रियांसोबत केलेली बातचित’ असा अर्थ दिलेला आहे. यावरून गजलचे सुरुवातीचे स्वरूप स्पष्ट होत असले तरी गजल सतत बदलत राहिली आणि अतिशय झगड्यातून, परिवर्तनातून जात-जात तिने आपले अप्रतिम आणि अद्वितीय स्वरूप सिद्ध केलं. उर्दू भाषेतील गजलने जी स्थित्यंतरं पाहिली, त्यांचा धावता आढावा घेणे उपयुक्त ठरेल. अमीर खुसरोच्या कालखंडात गजलचा पहिला टप्पा सुरू होतो. अमीर खुसरोला तत्कालीन हिंदी भाषेचा अभिमान होता. त्यामुळे पर्शियन गजलचे त्याने ताबडतोब स्वागत केले नसले, तरी त्याच्या नावावर ५४० गजलरचना दाखविल्या जातात. दुसऱ्या टप्प्यात मात्र गजल उर्दूमध्ये लिहिली जाऊ लागली. दख्खनचे बादशहा महंमद कुली कुतुबशाह यांच्या काळात गजल या कथित वृत्ताच्या स्थित्यंतराचा दुसरा टप्पा अस्तित्वात आला. उर्दूचे आद्य कवी म्हणून वली दखनी यांचे नाव येते. यांनी पर्शियन भाषेचा बडेजाव कमी करून उर्दू शायरीत गजलला निश्चित स्वरूप दिले. मीर तकी मीर आणि सौदा यांच्या काळात गजलचे चौथे युग सुरू झालेले आहे. हा उर्दू कवितेचा सुवर्णकाळ मानला जातो.

या काळातील बहुतांश उर्दू कवी सूफी संप्रदायाचे असल्यामुळे तत्कालीन उर्दू कवितेवर सूफी तत्त्वज्ञानाची सावली पडलेली दिसून येते. याच काळात एका बाजूने उर्दू काव्यरचनेचा स्तर खालावतानासुद्धा दिसू लागला होता. सुदैवाने ही परिस्थिती फार दिवस राहिली नाही आणि समाजाने निकृष्ट कवितेला मान्यता दिली नाही. पाचवे युग मिर्झा गालिब, जौक, मोमीन, बहादूरशाह जफर आदी कवींच्या नावाने ओळखले जाते. गजल या काव्यप्रकाराने या काळात उत्तुंग असे शिखर पाहिले. मुघलसत्ता अस्तंगत होऊ लागली होती, ते गजलच्या स्थित्यंतराचे सहावे युग मानले जाते. याच काळात इंग्रजी हुकूमत स्थापन झाली होती आणि स्वातंत्र्ययुद्धाची चाहूलसुद्धा लागली होती. साहजिकच हे इन्कलाबी वातावरण उर्दू काव्यात आणि गजलमध्येसुद्धा प्रतिबिंबित होऊ लागलं होतं. गजलचे त्यानंतरचे सातवे युग हे आधुनिक युग आहे. ‘शब्द, स्वर आणि संगीत’ यांचा त्रिवेणी संगम याच आधुनिक काळामध्ये होताना दिसून येतो. या सातव्या टप्प्यापर्यंत येता-येता गजल या काव्यप्रकाराने अनेक स्थित्यंतरे पाहिली, जिचा धावता आढावा आापण घेतला.

सन १९३०च्या आधीपासूनच उर्दूमध्ये ‘तरक्की पसंद’ अर्थात पुरोगामी आधुनिकवादी साहित्यकारांची एक विशेष चळवळ अस्तित्वात आलेली आहे. सर्वसामान्य, दुबळ्या, शोषित अशा स्त्री-पुरुषांचा आवाज समाजातील धुरिणांसमोर ठेवण्याची प्रतिज्ञा या चळवळीने घेतली होती. आधुनिक काळातील कित्येक साहित्यिक आणि शायर या चळवळीत उतरले होते. जनसामान्यांचा दबलेला आवाज मांडण्यासाठी त्यांनी गजल या काव्यप्रकाराचा उपयोग करून घेतलेला आहे. म्हणजेच उर्दूमधील गजल ही केवळ सौंदर्याची अभिव्यक्ती करण्यासाठीच न वापरता सामाजिकतेच्या संदर्भातदेखील वापरली जाऊ लागली  आणि एक विलक्षण सामर्थ्याने परिपूर्ण होऊन ती सिद्ध झाली.

आपली काव्यप्रकृती व काव्यप्रकार सिद्ध करण्यासाठी मराठी भाषेला संघर्ष करण्याची आणि परिवर्तनातून जाण्याची फारशी गरज भासली नसावी. विविध स्थित्यंतरांतून सिद्ध झालेली गजल एका काव्यप्रकाराच्या स्वरूपात मराठीने स्वीकारली. सुरुवातीच्या काळात मराठीमध्ये गजल लगेच रुळली नसली तरी गजलची लोकप्रियता हळूहळू पसरू लागल्याचे दिसलेले आहे. याच काळातील समर्थ असे गजलकार म्हणून सुरेश भटांचे नाव घ्यावे लागते. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सुरेश भटांनी गजल या काव्यप्रकाराचा प्रचार आणि प्रसार अत्यंत प्रभावीपणे केल्याचे आपणास ज्ञात आहे. ज्या काळात मराठीमध्ये गजल लोकप्रिय होत होती, तो काळ विचित्र गुंतागुंतीचा असा होता. स्वातंत्र्योत्तर काळातील परिवर्तनाचे वारे वाहत असतानाच रसिकतेचे म्हणून रूढ असलेले मानदंडसुद्धा सरकायला लागले होते. या काळात कवी सुरेश भटांनी गजल सर्वत्र पोहोचवली.

कवीची अडचण येथूनच सुरू होते. जे सांगायचे आहे ते समाज ऐकत नाही असे वाटत असेल, तर कवी हा आक्रमक होताना दिसतो. कवी सुरेश भटदेखील या विधानाला अपवाद नव्हते. त्यांची आक्रमकता, सांगण्याचा आणि ऐकवण्याचा आग्रह एक विलक्षण वस्तुस्थिती अधोरेखित करतो. स्वतःचा आवाज ऐकतऐकत, स्वतःची अहंता कुरवाळत बधिर झालेल्या समाजाला आपले म्हणणे कसे ऐकवायचे, हा मोठा प्रश्न कवीला पडलेला असतो.

‘अपनी आवाज से बहरे हुये जाते है यहाँ सब
ऐसे आलम में सदा-ए-दिगराँ कौन सुनेगा।’

असं म्हणण्याची वेळ कवी वर आलेली असते. ‘सदा- ए-दिगराँ’ म्हणजे दुसऱ्याचा आवाज, दुसऱ्याचं म्हणणं, दुसऱ्याची संवेदना. आत्मकेंद्री समाजाला जागं करण्यासाठी तीव्र उपहास आणि टोचण्या उपयोगी असतात. कवी सुरेश भट यांनी आपल्या उपहासातून, टोचणीतून, फटकाऱ्यातून आत्मलोलुप समाजाला जागं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे एक व्रतच त्यांनी घेतलं होतं, असा उल्लेख कवी निफाडकर आपल्या पुस्तकात करतात. ठिकठिकाणी जाऊन गजलच्या मैफली रंगवण्यामागे कवी सुरेश भटांचा काहीएक हेतू असणारच. बहिऱ्या आणि बधिर समाजाला या आक्रमक काव्यशैलीमुळे काही प्रमाणात तरी जाग आली होती, असे म्हणावे लागते. गजलच्या सादरीकरणात त्यांचा एक आविर्भाव होता, अशी चर्चा आणि टीकाही वाचनात आली आहे. पण अभिव्यक्तीसाठी आविर्भावसुद्धा आवश्यकच असतो.

‘मैने भी सीख ली अदाकारी
मुझ पे हैरान, ये जहाँ क्यों है?’

असा प्रश्न उर्दू कवी उपस्थित करतोच. या प्रश्नाचं उत्तर कवी निफाडकर आपल्या पुस्तकात देतातच.

पारंपरिक सौंदर्याविष्कारासोबतच आधुनिक काळात उर्दू गजलने सामाजिकतासुद्धा स्वीकारली. सौंदर्य आणि तीव्र सामाजिक भान या दोन्ही बाबी स्वीकारून मराठीतील गजलने पुढचे पाऊल टाकले. कवी सुरेश भटांच्या गजलने हे काम केले आहे. म्हणून, सात कालखंडांचा-युगांचा उल्लेख केल्यानंतर, उत्तराधुनिक कालखंड केवळ सुरेश भटांच्या गजलांचा आहे,’ हे आवर्जून सांगायचे आहे. या गजलच्या विकास-काळावर फक्त सुरेश भटांची मुद्रा उमटलेली दिसते. मराठीत गजलला नवी उंची, नवे परिमाण, नवे सौंदर्य आणि नवी अर्थपूर्णता सुरेश भटांच्या गजलमुळे मिळाली आहे.

त्यांची आणि आपली पहिली भेट कुठे अन्‌ कशी झाली इथून सुरू करून निफाडकरांनी सुरेश भटांच्या अनेक हृद्य आठवणी सांगितल्या आहेत. पुस्तकाचे शीर्षक मोठे वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘गजलसम्राट सुरेश भट आणि...’ असं म्हणताना, भटांचा समाजातल्या इतर घटकांशी आलेला संबंध अधोरेखित होतो.

सोळा प्रकरणांत विभागलेले हे देखणे पुस्तक अनेक प्रकारची दुर्मिळ माहिती घेऊन येते. अन्य कवी आणि साहित्यिकांनी कवी सुरेश भटांबद्दल वेळोवेळी जे सांगितले, लिहून ठेवले- त्यांचे चकित करणारे आणि महत्त्वाचे असे संकलन या पुस्तकात वाचायला मिळते. उदाहरणार्थ- कवी अनिलांनी भटांना म्हटलं की, ‘तुम्ही काव्याचा आत्मा पकडून ठेवला आहे.’ कवी आणि गजलकार प्रदीप निफाडकर यांनी ललित मासिकासाठी घेतलेली कवी सुरेश भटांची मुलाखत मुळातून वाचण्यासारखी आहे. ‘काव्यलेखनातून केव्हा आनंद मिळतो?’ या प्रश्नाला त्यांनी मार्मिक उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटलंय की- ‘पदरात पडलेले जगण्याचे प्रत्यय’ जसेच्या तसे व्यक्त करता येतात, तेव्हा काव्यलेखनाचा आनंद मिळतो.

गजलसमोरच्या आव्हानाबद्दल निफाडकर चर्चा करतात. ही चर्चा त्रोटक जरी असली तरी वाचक- रसिकांना अंतर्मुख करते. सुरेश भटांच्या काव्याने मुग्ध झालेल्या आपल्या सर्वांना या कवीबद्दल वाटणाऱ्या कुतूहलाचे काही अंशी शमन या पुस्तकाने होत राहते आहे, हे विशेष.

कवितादेवी दयावान असते. उपासना करणाऱ्या प्रत्येक कवीला ती केव्हा तरी भेटतेच. पण कोणत्या स्वरूपात भेटते, हे मात्र सांगता येत नाही. कवी सुरेश भटांनी अन्य काव्यप्रकार जरी हाताळले असले तरी कवितादेवी त्यांना गजलच्या रूपात भेटलेली आहे. उर्दू कवीची एक नेहमीची कैफियत राहिलेली असते. तो असं म्हणतो की, हे कवितादेवी-हे प्रसिद्धीच्या देवते! तू मला का हुलकावण्या देते आहेस? नवथर, उथळ आणि नव्या कवींच्या बरोबर मात्र तू हिंडताना दिसतेस, चुंबाचुंबी करतेस, बोसेबाजी करतेस, बागेत हातात हात घालून हिंडतेस; मला मात्र भेटत नाहीस. कवितादेवी आणि प्रसिद्धीची देवता या दोन्ही एकाच शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. त्या असं म्हणतात की- अरे, तुझी आणि माझी भेट शाश्वत असल्यामुळे कालांतराने होणारच आहे. हे नवथर कवी तर काल होते, आज नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर दया करून मी त्यांना भेटते; पण तुझी अन्‌ माझी भेट तर शतकानंतरसुद्धा होतच राहणार आहे आणि या भेटीमुळे तू अमर होणार आहेस. तेव्हा तू खंत करू नकोस.

कवी सुरेश भट यांच्याबाबत कवितादेवीने आणि प्रसिद्धीच्या देवतेने आपला दिलेला शब्द खरा केला आहे. उर्दू कवींच्या भाषेतच बोलायचं झालं तर, त्यांना ‘अमरत्वाचा शाप’ मिळालेला आहे. म्हणून आज आणि उद्यादेखील आपण या कवीच्या क्षमतेबद्दल, त्याच्या कवितेबद्दल बोलत राहू. उत्सुकता व्यक्त करू, उत्सुकतेचे शमन करीत राहू. निफाडकरांच्या अशा पुस्तकांचे हे प्रयोजन आहे. मी प्रदीप निफाडकर यांचे अभिनंदन करतो. आज प्रकाशित होणाऱ्या त्यांच्या या नव्या पुस्तकाचे मी स्वागत करतो. गजलबाबतच्या संदर्भातील दुसरे अधिक चिंतनात्मक असे पुस्तक त्यांनी लिहून प्रकाशित करावे, अशी शुभ-सूचना करतो. आपल्या मोठ्या स्वप्नाचा तो एक भाग असणार आहे, हे त्यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटलेच आहे. हे स्वप्न खरे ठरावे, अशी शुभेच्छा देतो. नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी देखणे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल त्यांचेही मी अभिनंदन करतो. माझे चिंतन शांतपणे ऐकून घेतलेत याबद्दल आपल्या सर्वांचे आणि मला येथे वक्ता म्हणून बोलावले याबद्दल संबंधितांचे मी अतिशय आभार व्यक्त करतो. धन्यवाद!

‘गझलसम्राट सुरेश भट आणि’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ११ जानेवारी २०१७ रोजी पुणे येथे केलेले भाषण.

Tags: प्रदीप निफाडकर गझलसम्राट सुरेश भट भारत सासणे प्रकाशन समारंभातील भाषण नंदिनी पब्लिशिंग हाऊस रेख्त कवी आबरू-ए-शायरी पुस्तक प्रकाशन गजल उर्दू फारसी माधव ज्यूलियन प्रदीप निफाडकर Aabaru e shayari Nandini Publishing House Rekhat Book Publication Poet Kavi gazal Farasi Urdu Madahv Julian Pradip Nifadkar Gazal samrat Suresh Bhat Bharat Sasane Speech for book publishing weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भारत सासणे,  पुणे
bjsasane@yahoo.co.in

मागील चार दशके भारत सासणे हे मराठीतील आघाडीचे साहित्यिक मानले जात असून, त्यात कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, अनुवाद इत्यादी प्रकारचे लेखन आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके