डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आजच्या साहित्याकडे पाहताना निदर्शनास येत आहे की, या साहित्यातून सामान्य माणसाचा चेहरा हरवत चाललेला आहे. कधी काळी नारायण सुर्वेंच्या कवितांतून किंवा तेंडुलकरांच्या नाटकांतून किंवा अन्य वास्तववादी लिखाणातून क्वचितपणे तो दिसला होता. आता मात्र हा चेहरा पुन्हा हरवला आहे. पुनरुज्जीवनवादी, स्मरणरंजनवादी किंवा मनोरंजनपर असं साहित्य जास्त प्रमाणात दिसायला लागलं आहे. हा सामान्य माणसाचा हरवलेला चेहरा शोधून तो पुनःस्थापित करावा लागेल. आपण स्तिमित होतो आहोत. स्तिमित करणारी रुग्णमानसिकता सामान्य माणसांना भ्रमित करते आहे. उच्चार आणि वर्तन यामधला आंतरविरोध चकित करतो आहे. ही सद्य:स्थिती म्हणजे भ्रमयुगात प्रवेश. या भ्रमयुगाबाबत साहित्याने आणि अर्थात साहित्यिकाने वास्तव लेखनातून सत्य प्रकट करीत राहण्याची गरज आहे. 

विश्व मराठी परिषदेच्या वतीने आयोजित पहिल्या विश्व मराठी संमेलनातील एक भाग असलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या, भारताबाहेरच्या मराठी मित्रांशी संवाद करताना मला अतिशय आनंद होतो आहे.

मित्रहो, मराठी असणं म्हणजे रक्तात एक वेगळंच रसायन वागवणं आहे. भारताबाहेरच्या जवळपास एकतीस देशांतील विविध राज्यांमध्ये राहून आपण जगत्‌व्यवहाराची एक वेगळीच लढाई लढत आहात. स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आणि एका अर्थाने जग जिंकण्यासाठी आपण मातृभूमी सोडली. बाहेर जाऊन आपल्या अस्तित्वाचा पिसारा कसा फुलवता येईल याचा विचार केला. त्या-त्या देशातील कायदे, रीती-रिवाज समजावून घेऊन तिथल्या समाजातच नव्हे तर जगाच्या पटलावर ताठ मानेने उभे राहून कर्तृत्वाचा एक वेगळाच ठसा उमटवण्यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे. म्हणून ही लढाई सोपी कधीच नव्हती आणि पुढेही ती सोपी असणार नाही. बाहेर गेल्यानंतर महत्त्वाकांक्षी स्वप्न उराशी बाळगणारा हा मराठी माणूस स्थानिक परिस्थितीत व तिथल्या देशात, तत्काळ व एका क्षणात अल्पसंख्य आणि परका होऊन जातो. एक तुटलेपणाची भावना निर्माण होतेच. इकडून तर आपण तिकडे गेलो आणि तिकडे आपण परकेच, अशी भावना अस्वस्थ करणारी आहे.

माझ्या परदेशस्थ मित्रांनी अशाच स्वरूपाची काहीएक भावना माझ्याजवळ व्यक्त केली असल्यामुळे, मनाच्या तळाशी चालू असलेला हा तुमचा जो संघर्ष आहे किंवा ही जी खळबळ आहे- त्या खळबळीचा थोडासा अंदाज मला येऊ शकलेला आहे. पण एका बाबतीत मी निश्चिंत आहे. मराठी माणूस कोठेही गेला, अस्तित्वाच्या लढाया लढत जरी राहिला, आर्थिक-सामाजिक व राजकीय परिस्थितीमध्ये झगडत जरी राहिला; तरी तो कधीही एकटा असत नाही. त्याच्या रक्तातून मराठी संस्कार वाहत असतात. त्याच्या व्यक्तित्वातून मराठी मातीचा हुंकार उमटत राहिलेला असतो. पूर्वज ज्या वारीतून गजर करीत चालले, त्या विठ्ठलाच्या वारीचे पडसाद परदेशस्थ मराठी माणसाच्या मनात घुमत राहिलेले असतात. त्याच्यासोबत संतांची वाणी आश्वासक रीत्या वावरत राहते. छत्रपती शिवाजीमहाराजांचा पराक्रम, संतांचं अध्यात्म, शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार आणि अपार कष्ट करण्याची तयारी- हे सगळं सोबत असल्यामुळे हा मराठी माणूस विश्वाच्या पटलावर आपलं स्वतःचं अस्तित्व आणि व्यक्तिमत्त्व सिद्ध करीत ताठ मानेने उभा आहे. म्हणून कितीही दूर गेला आणि कोठेही राहिला तरी तो कधीच एकटा नसतो. मराठी अस्मिता, संस्कृती आणि मराठी संस्कार त्याच्यासोबत सतत राहतात. तुम्हीदेखील त्यामुळे एकटे नाही आहात. महाराष्ट्र तुमच्या हृदयात सतत जागृत असतो आणि सोबत असतो. तुमची मुळे, तुमचे रूट्‌स इथे या मराठी मातीत घट्ट आहेत. तुमचे अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि प्रणाम करतो.

तुम्ही एकटे असू शकत नाही, हा दिलासा तर आहेच आहे; पण एका वेगळ्याच समस्येबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. ही समस्या वैश्विक आहे. मला आर्थिक किंवा स्थानिक-सामाजिक समस्यांबद्दल बोलायचं नाही. कारण त्या समस्या तर नेहमीच असणार आहेत, पूर्वीही होत्या आणि पुढेही राहतील. प्रमुख समस्या माझ्या मते, मानसिक आहेत. वेगळेपणा कायम ठेवून प्रमुख प्रवाहामध्ये मिसळून जाण्याची ही समस्या आहे. दूरस्थ गेलेल्या प्रत्येक पराक्रमी मराठी माणसाची ही समस्या आहे. डिझॉल्व्ह होताना- विरघळून जाताना तुम्ही तुमचं अस्तित्व आणि वेगळेपण कायम ठेवू शकता का, ही ती समस्या. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. एखादा मराठी माणूस दूरस्थ देशामध्ये राहून आपलं करिअर घडवतो आहे. हे करिअर घडवीत असताना त्याला अनेक स्थानिक समस्यांना तोंड द्यायचं आहे. स्थानिक कायदे समजून घ्यायचे आहेत. तिथे, दूरस्थ देशात त्याला- म्हणजे मराठी माणसाला जेवढं आकाश प्राप्त झालेलं आहे, त्या आकाशात त्याला स्वतःचे पंख पसरायचे आहेत. भरारी घ्यायची आहे. तो यशस्वी झाला तर त्याच्या मागोमाग त्याच्या अस्तित्वाचे धागे विणले जाणार आहेत. त्याची पुढची पिढी तिथे स्थिरावणार आहे. त्याचा भूतकाळ महाराष्ट्रात आहे. त्याचे पूर्वज महाराष्ट्रात राहिले होते. त्यांचे आशीर्वाद घेऊन त्याला पुढे जायचं आहे. त्याचा भविष्यकाळ तिथे असणार आहे. पण जिथे कुठे त्याला राहायचं आहे, तिथल्या समाजाने त्याला पूर्णांशाने आपल्यामध्ये सामील करून घेतलं की नाही- ही ती समस्या. या समस्येतून एक तुटलेपणा, एक एकटेपणा, एक विलक्षण अमूर्त अशी हुरहूर मनामध्ये निर्माण होत राहते. भारताबाहेर राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात काही तुटलेपणा, एकाकीपणा किंवा अमूर्त हुरहूर निर्माण झालीच असेल, असा माझा दावा नाही. पण अशी शक्यता असते, अशी मानसिक समस्या निर्माण होते- असं मला सांगण्यात आलं आहे. आता अशीच काही समस्या असेलच, तर त्यावर काही उपाययोजना आहे की नाही याचाही विचार येथे आपण केला पाहिजे. कारण साहित्य आणि प्रत्यक्ष जगणं यामध्ये विशेष अंतर नसतं. जगण्यातून साहित्य निर्माण होतं आणि साहित्यामध्ये जगणं प्रतिबिंबित होत राहतं.

मित्रहो, मराठी साहित्य समृद्ध आहे. ते वैश्विक उंचीवर जाणारं आहे. सर्वसमावेशक, चिंतनशील आणि संपन्न असं आहे. प्राचीन अणि अर्वाचीन-आधुनिक मराठी साहित्याशी आपण आपली नाळ जोडून घेतली पाहिजे. याच नाळेतून आपल्याला अमृतमयी जीवनरस प्राप्त होऊ शकतो. याच साहित्यातून आपल्याला जगण्याचं बळ प्राप्त होऊ शकतं. याच साहित्यातून संघर्ष करण्याची शक्ती प्राप्त होऊ शकते. या साहित्यात अध्यात्म आहे, संतांचं जीवनविषयक शहाणपण आहे आणि सुधारक विचारवंतांचे बळ देणारे विचार आहेत. मराठी वाङ्‌मयासंदर्भात विचार केला तर तुकाराममहाराजांच्या अभंगांचा पहिला अनुवाद अलेक्झांडर ग्रँट यांनी केला आहे. ग्रँट, चित्रे, नेमाडे, कोलटकर यांनी केलेल्या अनुवादाच्या प्रयत्नांमुळे तुकाराममहाराजांचे साहित्य वैश्विक उंचीवर गेलेले आहे. ज्ञानेश्वरी मराठी माणसांच्या श्वासातून जगभर पसरली. चोखामेळांचा अभ्यास परदेशातील विद्वान करीत आहेत. संतसाहित्याने काळाची आणि भाषेची मर्यादा ओलांडली आहे. ते कालजयी असं मराठी साहित्य आहे.

व्यावहारिक कारणासाठी दूरस्थ गेलेली मंडळी खऱ्या अर्थाने दूरच गेली पाहिजेत, असा काही नियम नाही. मराठी मातीशी, इथल्या श्वासाशी आपण आपले धागे जोडून घेऊ शकता. चांगलं मराठी वाचन आणि त्या अनुषंगाने आपली मराठी भाषा आपल्या विचारातून जिवंत ठेवणं, हा एक चांगला मार्ग आहे. निदान एकतीस देशातील महाराष्ट्र मंडळांचे अनेक सदस्य या विश्व मराठी संमेलनाशी आज जोडले गेले आहेत. मराठी भाषेबद्दल त्यांना आस्था आहे. मराठी संस्कृतीबद्दल त्यांना प्रेम आहे. दूरस्थ देशांमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाने जुनं आणि नवं मराठी साहित्य स्वतःच्या विचारांशी जोडून घेतलं, तर एक वेगळीच ऊर्जा त्याला प्राप्त होऊ शकते. वैश्विक स्तरावरून प्राप्त होणारी ऊर्जा मराठी माणसाला संपन्न करतेच आहे. सीमित आणि मर्यादित राहू न देता वैश्विक ऊर्जा त्याला व्यापक आणि विशाल करणारच आहे. पण त्याचबरोबरीने मराठी साहित्यातून जे अमृत त्याला प्राप्त होऊ शकतं, त्यातूनच त्याला मनःशांती आणि आश्वासक असं स्थैर्य प्राप्त होऊ शकेल. त्याचं व्यक्तिमत्त्व विशाल आणि सजग होऊ शकेल. इथे लिहिलं जाणारं, प्रसिद्ध होणारं आणि यापूर्वी प्रसिद्ध झालेलं जे काही वाङ्‌मय आहे, ते आपल्या हृदयाशी जपून ठेवणं महत्त्त्त्वाचं राहील. त्यामुळे विरघळून जातानासुद्धा अस्वस्थता येणार नाही.

पण अडचण भाषेची आहे. तुमच्यासोबत राहणारी तुमची पिढी मराठी बोलत नाही. त्या पिढीला मराठी येत नाही. आणि मराठी संस्कृतीबद्दल कितीही सांगितलं, तरी ते त्यांना परकंच वाटणार आहे किंवा त्यांना समजणारच नाही. मग विकृती आणि दुर्दैवी विनोद निर्माण होतात. हे विनोद हस्ते-परहस्ते इथे राहणाऱ्या स्थानिक मंडळींच्या कानांवर येत राहतात. उदाहरणार्थ- मंकी गॉड किंवा एलिफंट गॉड इत्यादी. ही केवळ भारताच्या बाहेर राहणाऱ्या मराठी माणसांची समस्या आहे असं नाही. महाराष्ट्राबाहेर जी मराठी मंडळी भारतातच राहतात, त्यांचीदेखील हीच समस्या आहे. हिंदी टापूमध्ये राहणाऱ्या मराठी मंडळींची पुढची पिढी हिंदीच बोलते आणि स्थानिक पद्धतीने विचार करते. मध्यमवयीन मंडळी कसंबसं मराठी टिकवून आहेत आणि कदाचित घरामध्ये मराठीच बोलली जाते. उंबरठ्याबाहेर मात्र मराठी बोलली जात नाही. उंबरठ्याबाहेर स्थानिक भाषाच बोलावी लागते. त्यामुळे मराठी भाषा कशी टिकवावी, मराठी अस्मिता कशी जिवंत ठेवावी इत्यादी समस्या बृहन्‌महाराष्ट्र प्रदेशातील मराठी माणसाला भेडसावते आहे. मी असं ऐकलं की, हीच समस्या अधिक प्रकर्षाने भारताबाहेरील मराठी माणसाची आहे. त्यावर उपाय काय?

मराठी भाषेवरचं प्रेम आणि मराठी असण्याचा अभिमान ही तर बलस्थानं आहेतच. पण आणखी एक समस्या आहे. तुम्ही ज्या देशातून परदेशात गेलेले असता, त्या देशाबद्दलचे समज आणि गैरसमजांतून तुमच्याकडे पाहिलं जातं. स्थानिक व्यक्तींना सामान्य ज्ञान आणि भारताबद्दलची माहिती असलीच पाहिजे असा नियम नाही. भारत म्हणजे हत्ती, टर्बन, साप, रोपट्रिक, गारूडी, ताजमहाल आणि क्वचित गांधी- इतकीच माहिती सामान्यतः असते. हा झाला माहितीचा सामान्य स्तर. दुसरा स्तर सतारवादन, भारतीय रहस्यवादी म्हणजे ओशो इत्यादींबाबतचे काही गैरसमजूत बाळगणारा असतो. भारतातून गेलेल्या टुरिस्ट मंडळींनी आपला जो बदलौकिक पसरवलेला असतो, त्याही कारणासाठी तेथे राहायला गेलेल्या मराठी माणसाकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. आता, या ज्या गैरसमजुतीतून निर्माण झालेल्या नजरा आहेत, त्या सहन करत स्वतःचं अस्तित्व कसं घडवायचं- ही समस्या आहे.

मराठी साहित्य वैश्विक उंचीचं आहे, हे मी आपल्याला सांगितलंच आहे; पण हे जगाला नक्की असं माहीत नाही. त्याचं कारण पुन्हा भाषेची अडचण हेच आहे. मराठीमध्ये पूर्वी जे लिहिलं गेलं आणि आता जे समर्थ असं लिहिलं जात आहे, त्याचे अनुवाद इंग्रजी व अन्य भाषांमध्ये जास्त प्रमाणात होत नाहीत. त्याचं कारण समर्थ अनुवादक उपलब्ध होतील असं नाही आणि उपलब्ध झाले तरी त्या अनुवादांचं प्रकाशन कोण करणार, याबद्दल मोठी कुंठावस्था आहे. अनुवादक हा ती साहित्यकृती जगणारा, समजून घेणारा आणि अन्य भाषांमधून मांडणारा असा प्रतिभावान माणूस असला पाहिजे. परदेशी विद्वानांना भारतीय साहित्याबद्दल थोडी माहिती असते. त्यातून त्यांना ‘गीतांजली’ इत्यादीबद्दल माहीत असतं. भारतीय वंशाचे जे लेखक आहेत, ते जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवीत असले तरी त्यांच्याबाबत कमी आस्था बाळगली जाते. अशा पार्श्वभूमीवर मराठी साहित्याबद्दल काय आणि कोण सांगणार? मराठी लघुकथा-दीर्घकथा क्षेत्रामध्ये स्वतःचा विलक्षण असा ठसा उमटविणारे लेखक आपण इंग्रजीमध्ये कसे आणायचे? ग्रेस नावाच्या कवितेतल्या जादूगाराची भाषा अन्य भाषांमध्ये कशी आणि कोणी न्यायची? आपले समर्थ कादंबरीकार इंग्रजी आणि अन्य भाषांमध्ये किती पोहोचले आहेत? तर, या सगळ्या अनुवादाच्या समस्या आहेत. भारताबाहेर राहणाऱ्या मराठी माणसांना निदान या समस्येची जाणीव असावी, म्हणून हे सांगितलं. मराठीचे अन्य भाषांमध्ये व विशेषतः इंग्रजीमध्ये झालेले अनुवाद जाणकार संस्थांपर्यंत आणि जाणकार व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी काही संघटित प्रयत्न करता येतील का, इतकंच सूतोवाच मी करतो आहे.

इथे मला सांगितलं पाहिजे की, ही समस्या केवळ भारताबाहेरच आहे असं नाही. मराठीत काय लिहिलं जातं आहे- असा हिंदी-भाषीक जाणकारांनी प्रश्न केल्यास त्यांना दाखविण्यासाठी आपल्याकडे चांगले हिंदी अनुवाद नसतात. आणि त्यांचे गैरसमज दूर करण्याचा मराठी-भाषीक मंडळी प्रयत्न करीत नाहीत.

आयडेंटिटी क्रायसिस, भाषेचा अभिमान बाळगण्यातली अडचण, भाषा टिकविण्यातील अडचण, मराठी साहित्याबाबत अद्ययावत वृत्तांत सांगता न येण्यातली अडचण, अनुवादाची अडचण इत्यादींबाबत बोलल्यानंतर एका वेगळ्याच पण महत्त्वाच्या समस्येकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे.

मित्रहो, कोविडने जगातल्या कानाकोपऱ्यात थैमान घातलं. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा प्राणभय आपल्याला भेडसावू लागलं. जगामध्ये सर्वत्र भीतीची भावना निर्माण होऊन स्थिर होत राहिली. या भीतीला वेगवेगळे पैलू होते आणि आहेत. विलगीकरणाची समस्या, एकत्र येण्यातली अडचण, कोरोना दिसून आल्यानंतर घ्यावयाची काळजी आणि निर्माण होणारी सामाजिक समस्या यातून जगातली सर्व माणसं वाट काढत आहेत. भारताबाहेरच्या मराठी माणसालासुद्धा या समस्या भेडसावलेल्या असतील. पण इतकीच एक समस्या नव्हती, तर कोविडच्या आधीपासूनच भयाची एक वेगळीच भावना विश्वपातळीवर मराठी माणसाच्या मनात स्थिर झालेली आहे. जेव्हा जेव्हा राजकीय उलथापालथ होते, तेव्हा तेव्हा समाजातले घटक असुरक्षित व्हायला लागतात. त्यांना आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असतं. अमेरिकेमध्ये सध्या सत्तांतराची प्रक्रिया सुरू आहे. तिथला मराठी माणूस अबोध अशा आतंकाच्या छायेमध्ये असणारच आहे. तेथे आपण ‘श्वेत आणि अश्वेत’ यांच्यामधला झगडा पाहिला. माणसं माणसापासून विभाजित करण्याचा खेळही पाहिला. मराठी माणसाला या सगळ्या घडामोडींची झळ बसलीच असणार आहे. पण हे फक्त अमेरिकेतच घडतं आहे असं नाही. अन्य देशांमध्येदेखील मंदी आहे, आर्थिक समस्या आहेत, सामाजिक प्रश्न आहेत आणि घरापासून- आपल्या देशापासून दूर गेलेल्या मराठी माणसाच्या मनात एक विचित्र अशी कुंठावस्था निर्माण झालेली आहे. भयांकित छायेखाली राहणारा हा माणूस आहे. यातून बाहेर कसं यायचं, हा प्रश्न आहे.

भारताबाहेर राहणाऱ्या मराठी माणसाच्या मनात काय चाललं आहे, हे कसं समजणार? त्यांना बोलतं करण्याची आपल्याकडे कोणतीच व्यवस्था नाही. विश्व मराठी परिषदेने पहिले विश्व मराठी संमेलन आयोजित केले आणि त्यानिमित्ताने मी आपल्याशी बोलतो तरी आहे आणि आपण मला ऐकता तरी आहात. पण विचारांच्या आदान-प्रदानाची कोणतीही व्यवस्था आपण अद्याप निर्माण करू शकलेलो नाही. भारताबाहेर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि क्षितिज विस्तारण्यासाठी झगडा देणाऱ्या मराठी माणसाला एकत्र करून काही मेळावे घेता येणं शक्य आहे का, याबाबत मी येथे केवळ सूचन करीत आहे. उपरोक्त परिषद कदाचित असं काही काम करू शकेल.

मराठी साहित्यविश्वाला पुन्हा जोडून घेणं, मराठी पुस्तकं वाचणं, जास्तीत जास्त दिवाळी अंक प्रकाशित करणं, अन्य भाषांमधून झालेले मराठी पुस्तकांचे अनुवाद बाहेरच्या जाणकारांपर्यंत पोहोचवणं अशा काही उपाययोजना मला सुचत आहेत. आणि म्हणून, त्यांचा केवळ इथे निर्देश.

2

मनुष्यासाठी आवश्यक असलेला कल्याणकारी मार्ग शोधणं, माणसाच्या सुख-दुःखाचा शोध घेणं, शक्य झाल्यास सुखाचा मूलमंत्र सांगणं- अशी काही माझ्या मते, साहित्याची भूमिका आहे.

लेखकाची भूमिकादेखील इथे सांगितली पाहिजे. विश्वकरुणा, मानवतेबाबतचा आदर, जगण्यातली सचोटी व आत्मभान, सर्वसामान्य माणसाच्या सुख-दुःखाचा आवश्यक असलेला शोध, मानवी गरिमेबाबत जाणीव, विशाल व स्वागतशील दृष्टिकोन, श्रेयस व प्रेयस याबाबतचे भान तसेच सत्यान्वेष, विश्वबंधुत्व इत्यादी घटक लेखकाच्या भूमिकेत समाविष्ट असतात, अशी माझी धारणा आहे. जागतिक स्तरावरील सर्वच श्रेष्ठ लेखकांची अशीच काही भूमिका असणार, याबाबत मला संशय नाही.

मित्रहो, ‘काळ तर मोठा कठीण आला’ असं विषादपूर्ण विधान काळाच्या प्रत्येक टप्प्यावर चिंतनशील लेखकाने नोंदवून ठेवलेलं आहे. प्रत्यक्षात ‘काळ’ ही भव्य संकल्पना आपल्या चिंतनपरंपरेमध्ये आपण स्वीकारलेली आहे. भर्तृहरीने असं म्हटलं आहे की, दिवस-रात्रीच्या एकाआड एक असलेल्या काळ्या-पांढऱ्या पटावर स्त्री-पुरुषांचे विविध मोहरे फेकून त्यांचा चालू असलेला प्रारब्धविषयक खेळ ‘काळ’ स्वतःच पाहत रमत बसलेला असतो. मला स्वतःला भर्तृहरीची ही कल्पना मोठी भव्य आणि थरारक वाटलेली आहे. ही संकल्पना आपल्याला अंतर्मुख करते. स्वतः काळच कर्ता आणि भोक्ता असेल तर सामान्य माणूस कोण आहे, असा प्रश्न यातून निर्माण होतो. साहित्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं- द्यावं लागणार असतं.

आपल्या सर्वांना माहीत आहे की, बोटाला धरून ‘काळा’ने आपल्याला हळूहळू वेगवेगळ्या कालखंडांतून फिरवून आणलेलं आहे. आपण यंत्रयुग अनुभवलं. त्यानंतर तंत्रयुग अनुभवलं. अणुयुग आणि अवकाशयुग अनुभवलं. आणि आता आपण भ्रमयुगात प्रवेश केला आहे. या युगात सर्वसामान्य माणूस भ्रमित झालेला आहे. संमोहित झालेला आहे. मुख्य म्हणजे, त्याची वाचा हरवलेली आहे. एक अबोध दहशत, भीती आणि आतंक त्याच्या जगण्याला वेढून-व्यापून पसरायला लागलेला आहे. या भीतीबद्दल साहित्याने बोलणं, सांगणं अपेक्षित असतं. याबाबत आधीपासूनच साहित्याने वेळोवेळी काहीएक सूचन व्यक्त केलेलं आहे.

उदाहरणार्थ- अब्दुल बिस्मिल्लाह नावाच्या हिंदी लेखकाने ‘दंतकथा’ नावाची लघुकादंबरी लिहिलेली आहे. मी या लघुकादंबरीचा मराठीतून अनुवाद केला होता. पुस्तकरूपाने हा अनुवाद आता उपलब्ध आहे. एक कोंबडा खाटीक मंडळींकडून स्वतःला वाचवून जीवाच्या आकांताने धावतो आहे आणि धावता-धावता तो एका नालीच्या पोकळीमध्ये आतपर्यंत जाऊन बसलेला आहे. त्याला शोधण्यासाठी व मारण्यासाठी आलेली मंडळी कोंबड्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि जीवाच्या भीतीने हा कोंबडा पुढे-पुढे सरकत राहिलेला आहे. आता पुढे सरकण्याचा रस्ता जवळपास बंद आणि मागे सरकण्याचा रस्ताही बंद. मृत्यू तर केव्हाही उपस्थित होऊ शकतो... आणि रात्र झाली आहे. अशा परिस्थितीत हा कोंबडा वाचकांना विश्वासात घेऊन संवाद करायला लागतो, आपल्या बालपणीपासूनच्या आठवणी सांगायला लागतो. एका कोंबड्याने सांगितलेल्या आठवणी म्हणून आपण या निवेदनाकडे पाहायला तर लागतो; पण आपल्या असं लक्षात यायला लागतं की, इथे सांगितलं जाणारं निवेदन हे सामान्य माणसाच्या आठवणींपेक्षा वेगळं नाही. खुराड्यातलं जगणं, क्षुद्र अहंकार व लढाया, छोटी-मोठी प्रेमप्रकरणं आणि सामान्य पातळीवरचा सामान्य असा संघर्ष आणि या सगळ्या जगण्यावर विशाल अशी आतंकाची छाया- मृत्यूच्या भीतीची सावली. मनुष्याला असाच अनुभव येत असतो आणि त्याचंही जगणं यापेक्षा वेगळं नाही. क्षुद्र जीवन, क्षुद्र जीवनपद्धती आणि सततचं वावरणारं भय याचा अनुभव माणूस घेत आलेला आहे.

युद्धातल्या अनुभवाने भय निर्माण केलं, फाळणीने उद्‌ध्वस्त केलं आणि महानगरीय जीवनव्यवस्थेने सर्वसामान्यांच्या वाट्याला निरर्थक, यंत्रवत्‌, किड्या-मुंगीसारखं आयुष्य दिलं. या सर्वांतून एक विशाल अशी भीतीची भावना माणसाला- अगदी मराठी माणसालासुद्धा व्यापून राहिली. पण या लघुकादंबरीच्या अखेरीस पहाट होता-होता हा मरणासक्त कोंबडा निर्भयतेने आरवलेला आहे. त्याचं आरवणं अंधाराच्या चादरीला लखलखीत सत्याच्या सुरीने फाडून टाकतं आहे. आपण कोठे लपलो आहोत हे आपल्या आरवण्यामुळे लक्षात येईल, इत्यादी भयोत्पन्न क्षुद्र सावधगिरी आता मागे पडलेली आहे. उगवत्या सूर्याला सलाम करायचा आहे. व्यर्थ व क्षुद्र भयावर निर्भयता मात करते आणि अशी मात केल्यामुळेच नवजीवनाचं स्वागत केलं जाऊ शकतं, असंच हा कोंबडा सांगतो आहे. अलीकडे कोंबड्यांचं आरवणं बहुतेक बंद झालं असताना आणि भीतीची काजळी सर्वत्र व्यापून राहिली असताना निर्भयतेने आरवण्याचं महत्त्व ही लघुकादंबरी अधोरेखित करते. प्रस्तुत भ्रमयुगाशी ही लघुकादंबरी जोडली जाते आहे, हे पाहून आपण स्तिमित होतो. साहित्य आपल्या द्रष्टेपणातून वेळेच्या आधीच आपल्याला इशारे देत असतं, ही साहित्याची शक्ती.

माणूस म्हणजे क्षुद्र जीव आहे असं न मानता, मनुष्याच्या जगण्याची गरिमा केवळ साहित्यच अधोरेखित करू शकतं. आणि म्हणून माणूस कोण आहे, हे सांगण्याची जबाबदारीदेखील साहित्यावर येऊन पडते. आपल्याला आठवत असेल- पंधरा वर्षांपूर्वी समाजामध्ये आपल्याभोवती वावरणारी सुबुद्ध माणसं बोलण्यातून काही चमत्कारिक विधानं सहजपणे करीत असत. त्या विधानांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची त्या वेळेस सहसा कुणाला आवश्यकता वाटली नाही. अशा विधानांकडे हसून दुर्लक्ष करण्याची प्रथा होती. या देशाला एकाधिकारशाहीच पाहिजे, हंटर मारल्याशिवाय शिस्त येणारच नाही, खूप लोकांना विचारत बसलं की विकास कधीच होत नसतो, एकहातीच निर्णय असावा लागतो, माणसं मेंढरासारखी आहेत, त्यांना फक्त हाकावं लागणार आहे- इत्यादी स्वरूपाची मुक्ताफळं आपण निश्चितपणे ऐकली असणार. इंग्रजीत बोलायचं झाल्यास, अशा उद्‌गारांमागे काहीएक विचार ‘हवेमध्ये’ होता- म्हणजे दॅट वॉज्‌ इन द एअर. हाच विचार आश्चर्यकारक मार्गाने आणि आश्चर्यकारक पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या जगण्यावर आता सद्य काळात हळूहळू लादला जातो आहे. जबाबदार संस्थाप्रमुखांनी नुकतंच एक विधान केलं आहे. आपल्याकडे जरा जास्तच लोकशाही आहे आणि त्यामुळे विकासाच्या मार्गात आडकाठी निर्माण होते आहे, असं हे विधान. या विधानामागून एक दहशत अमूर्तपणे बाहेर येऊ पाहते आहे आणि हळूहळू भोवताल ग्रस्त करू पाहते.

मला वाटतं, सध्या सर्वसामान्य माणूस सर्वाधिक संभ्रमावस्थेत आहे. त्याचा आंधळा प्रवास सुरूच असून कोणती तरी अगम्य बधिरावस्था त्याला घट्ट लपेटून आहे. परिवर्तन त्याला हवं आहे, शोषणमुक्त समाज त्याला हवा आहे. भ्रष्टाचारातून पिळवटून निघणं त्याला नको आहे. पण आपल्या दुःखाचा परिहार कसा होणार, हे मात्र त्याला समजलेलं नाही. कोणी तरी मसीहा येईल आणि परिस्थिती बदलेल, आपली सुटका करेल- असं त्याला वाटतं आहे. म्हणून तो कल्की अवताराच्या प्रतीक्षेत आहे. पण असा कोणी मसीहा येत नाही आणि त्याचं वाट पाहणं थांबत नाही. द्रष्ट्या कवींनी ती ‘उद्याची सकाळ उजाडेल’ असा दिलासा जरी दिला असला तरी त्याचबरोबर तीव्र उपहासदेखील नोंदवलेला आहे, कारण उद्याचा दिवस उजाडणारच नसतो. या सर्वसामान्य माणसाच्या नशिबी केवळ वाट पाहणं आहे. चुकीचे विचार समाजामध्ये जाणीवपूर्वक प्रसृत करणे हा भ्रष्टाचार असून, असे विचार नकळतपणे प्रसृत करणे हा प्रमाद आहे, हे कोणी सामान्य माणसाला सांगत नाही. राजकारण नावाचा लांडगा सर्वांच्या- अगदी झोपडीच्या दरवाजाबाहेरसुद्धा येऊन बसलेला आहे, हे त्याला कोणी सांगत नाही. हा लांडगा लबाड आहे. त्याचा चेहरा क्रूर नाही, मोहक आहे, हसरा आहे हे त्याला कोणी सांगत नाही. या सामान्य माणसाला स्वतःला विचार करण्याची सवड व्यवस्थेने दिलेलीच नाही. पण द वुल्फ इज ॲट द्‌ डोअर! माणूस भयभीत आहे. त्याच्या भयमुक्तीची घोषणा कधी व कोणत्या पीठावरून केली जाईल याची प्रतीक्षा आहे. पण त्याऐवजी, म्हणजे अशा घोषणेऐवजी उद्याच्या चांगल्या दिवसांचं स्वप्न त्याला दाखविण्यात येतं आहे.

या सर्वसामान्य माणसाला समजून घेणं, मुळात त्याला शोधणं हे अवघड असं काम लेखकाला करावं लागतं. माणूस चिमटीत सापडतच नाही, पाऱ्यासारखा निसटून जातो. त्याच्या सुख-दुःखाचा शोध लेखकाला घ्यावा लागतो. त्याची कथाच फक्त मांडायची नसते, तर कथेमागची कथादेखील शोधायची असते. कथेमागची कथा आपल्याभोवती सतत घडत असते. ती पाहण्याची नजर मात्र असावी लागते. लेखकाचं हेच मोठं आव्हान असतं आणि ते तो कसं पेलतो, यावर त्याचं यश अवलंबून असतं.

माझं लेखन म्हणजे न संपणारी शोधयात्रा असून सर्वसामान्य माणसाच्या सुख-दुःखांचा शोध गांभीर्यपूर्वक घेत राहणं मला आवडतं. माणसाचं माणूसपण कशात आहे हे शोधत असताना त्याच्या जीवनसंघर्षातून, त्याच्या जगण्यातून, छोट्या-मोठ्या लढायांतून कथेमागची कथा दिसत असते. त्यातूनच कलाकृती निर्माण करावी लागते, त्यातूनच कलाकृती निर्माणही होत असते. माणसाची गरिमा साहित्याने व साहित्यिकांनी मांडायची असते. राजकारणी लोक सामान्य माणसाचा पालापाचोळा करून टाकतात, हे सत्य कटू असलं तरी साहित्याला ते समजून घ्यावं लागतं. मांडावही लागतं. अभिनिवेशशून्य व आविर्भावरहित सत्यकथन ही साहित्याची भूमिका असते. सत्यान्वेष, आनंदप्राप्ती व विश्वकरुणा या संदर्भातदेखील साहित्याला आणि साहित्यिकाला सजग राहून लेखनकार्य करावं लागतं. सर्वसामान्य माणसाच्या दुःखाचा परिहार करता आला तर त्यासाठी प्रयत्न करणं, हे साहित्याचं श्रेय. आणि म्हणून सापडला आणि सापडवला, तर दुःखाचा मूलमंत्रदेखील शोधावा लागतो.

आजच्या साहित्याकडे पाहताना असं निदर्शनास येत आहे की, या साहित्यातून सामान्य माणसाचा चेहरा हरवत चाललेला आहे. कधी काळी नारायण सुर्वेंच्या कवितांतून किंवा तेंडुलकरांच्या नाटकांतून किंवा अन्य वास्तववादी लिखाणातून क्वचितपणे तो दिसला होता. आता मात्र हा चेहरा पुन्हा हरवला आहे. पुनरुज्जीवनवादी, स्मरणरंजनवादी किंवा मनोरंजनपर असं साहित्य जास्त प्रमाणात दिसायला लागलं आहे. हा सामान्य माणसाचा हरवलेला चेहरा शोधून तो पुनःस्थापित करावा लागेल.

आपण स्तिमित होतो आहोत. स्तिमित करणारी रुग्णमानसिकता सामान्य माणसांना भ्रमित करते आहे. उच्चार आणि वर्तन यामधला आंतरविरोध चकित करतो आहे. ही सद्य:स्थिती म्हणजे भ्रमयुगात प्रवेश. या भ्रमयुगाबाबत साहित्याने आणि अर्थात साहित्यिकाने वास्तव लेखनातून सत्य प्रकट करीत राहण्याची गरज आहे. सत्याचा सूर्य उगवतच राहतो. त्याला सलाम करीत निर्भयपणे आरवण्याची गरज आहे.

भयमुक्त होऊन जीवनाचा रसास्वाद घेतला पाहिजे, या संदर्भात मी वर सांगितलंच आहे. पण मराठी साहित्याशी स्वतःला जोडून घेऊन त्यात दडलेलं अपार असं सामर्थ्य स्वतःमध्ये शोषून घेऊन आनंदात सहभागी होणं गरजेचं आहे. भारताबाहेर राहणाऱ्या मराठी माणसांनीसुद्धा आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसांनीसुद्धा. पुस्तकं अर्थात साहित्य आपल्याला काही तरी सांगू इच्छितं. कवी शंकर वैद्य यांच्या एका कवितेने या कथनाचा समारोप करावयाचा आहे. पुस्तकांना येथून पुढे आपल्याला निराश करावयाचं नाही, कारण ज्ञानप्राप्तीशिवाय येथून पुढे माणसाला भवितव्य नाही. व्यर्थ पुनरुज्जीवनवाद विनाशाकडे नेणारा आहे. कविता अशी-

कपाटातील पुस्तके

पुस्तके स्वप्नांत येतात आणि विचारतात

तू आम्हांस ओळखले का?

बोलता बोलता पुस्तके वितळतात

आणि अथंग पाणी होऊन हेलावत विचारतात,

तू आमच्यात कधी न्हालास का? पोहलास का?

पुस्तके मग घनदाट वृक्ष होतात

आणि विचारतात,

आमची फळे खाल्लीस का?

छायेत कधी विसावलास का?

पुस्तके भुरूभुरू वाहणारा वारा होतात

नि विचारतात,

श्वासाबरोबर आम्हाला कधी उरात साठवलेस का?

पुस्तके असेच काही विचारीत राहतात

एकामागून एक.

प्रत्येक प्रश्नाला माझे काही उत्तर नसते

मी गप्प बसतो त्यांच्याकडे नुसता पाहत

तेव्हा पुस्तके सजावटीच्या कपाटात जाऊन बसतात

नि म्हणतात,

म्हणजे एकंदर आमचे आयुष्य व्यर्थच ना?

पुस्तके मूक होतात,

झुरत जातात,

स्वतःला वाळवीच्या स्वाधीन करतात,

शेवटी आत्महत्या करतात,

घरातल्या घरात,

बंद कपाटाच्या कारागृहात...

पुस्तकांची आत्महत्या आपल्याला पाहावयाची नाही, कारण तसं झाल्यास सामान्य माणसाचा मार्गक्रम विनाशाकडे जाणार आहे. माझं प्रदीर्घ चिंतन आपण शांतपणे ऐकून घेतलंत, याबद्दल भारताबाहेरच्या आणि भारतातील तसेच महाराष्ट्रातील सर्व मराठी मित्रांचा मी अतिशय आभारी आहे. धन्यवाद!

​​​​(28 ते 31 जानेवारी 2021 या काळात, विश्व मराठी परिषदेने आयोजित केलेले पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन (ऑनलाईन) पार पडले. त्यातील हे एक अध्यक्षीय भाषण.)

Tags: लेखन साहित्य स्मरणरंजनवादी पुनरुज्जीवनवादी विश्व मराठी साहित्य संमेलन भाषण भारत सासणे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भारत सासणे,  पुणे
bjsasane@yahoo.co.in

मागील चार दशके भारत सासणे हे मराठीतील आघाडीचे साहित्यिक मानले जात असून, त्यात कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, अनुवाद इत्यादी प्रकारचे लेखन आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके