डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या भारत सासणे यांच्या ‘ऐसा दुस्तर संसार’ या दीर्घकथा संग्रहाचे प्रकाशन आणि त्या निमित्ताने ‘दीर्घकथा’ या साहित्य प्रकारावर दिवसभराचे चर्चासत्र 14 ऑगस्ट 2011 रोजी पुणे येथे ‘साधना’च्या साने गुरुजी सभागृहात झाले. हे चर्चासत्र मॅजेस्टिक प्रकाशन, अक्षर मानव संघटना आणि साधना साप्ताहिक या तिन्हींच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. या चर्चासत्रात भारत सासणे यांनी केलेले संपूर्ण भाषण प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक

 

या परिसंवादाच्या अध्यक्षा, या परिसंवादाचे बीजभाषणकार, माझ्या दीर्घकथासंग्रहाचे प्रकाशन ज्यांच्या हस्ते झाले ते मा. श्री.रमेश वरखेडे, प्रकाशक श्री.अशोक कोठावळे, या परिसंवादात आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले मान्यवर साहित्यिक व उपस्थित असलेले सर्व रसिक मित्रहो. या परिसंवादात दीर्घकथेच्या तंत्राच्या संदर्भात काहीएक चर्चा करण्यासाठी मी आपणासमोर नम्रपणे उपस्थित आहे.

हा परिसंवाद आयोजित केल्याबद्दल संयोजन समितीचे मी आभार व्यक्त करतो व त्यांचे अभिनंदन करतो. अभिनंदन अशासाठी की, ज्या अर्थी आपण दीर्घकथेवर स्वतंत्र असा परिसंवाद किंवा चर्चासत्र आयोजित केले आहे, त्या अर्थी दीर्घकथा या साहित्य प्रकाराची किंवा उपप्रकाराची आपण दखल घेतली असून त्याची स्वायत्तता आपण मान्य केली असा याचा अर्थ आहे. त्यामुळे ही चर्चा व हा परिसंवाद महत्त्वाचा असून त्या अनुषंगाने दीर्घकथा या साहित्य प्रकाराला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, व कदाचित संमतीने, निश्चित स्वरूपाची मान्यता प्राप्त होईल व हे ऐतिहासिक असे कार्य होणार आहे.

मी असे म्हणतो याचे काही कारण आहे. मुंबईला ‘शब्द’ प्रकाशनाच्या वतीने लघुकथा या साहित्य प्रकारावर दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आजच्या परिसंवादाचे बीजभाषणकारसुध्दा या चर्चासत्रासाठी उपस्थित होते. या चर्चासत्रासाठी अनेक दिग्गज उपस्थित होते. या परिसंवादात मी देखील, कथाकार या नात्याने, एक निबंध वाचला होता. माझ्या व्यतिरिक्त मेघना पेठे, रंगनाथ पठारे, ऐनापुरे अशा काही साहित्यिकांची उपस्थिती मला स्मरते आहे. या परिसंवादासाठी काहीएक कुतूहलाचा कान घेऊन मी उपस्थित राहिलो होतो. कथेबद्दल व विशेषतः दीर्घकथेबद्दल मान्यवरांकडून काय बोलले जाणार आहे याबद्दल मला कुतूहल होते. तथापि दोन दिवसांच्या चर्चेनंतरदेखील व मान्यवरांकडून झालेल्या विचारमंथनानंतरदेखील दीर्घकथेच्या कथित किंवा तथाकथित स्वायत्ततेबद्दल किंवा तिच्या स्पष्ट अस्तित्वाबद्दल काहीच विधायक असे बोलले गेले नाही.

त्याउलट, मान्यवर विद्वानांनी परिभाषेची अडचण पुन्हा पुन्हा सांगितल्याचे मला स्मरते आहे. दीर्घकथा ही दीर्घ असल्यामुळे तिला लघुकथा जरी म्हणता येत नसले तरी लघुकथेच्या मान्य अशा परिभाषेच्या प्रकाशातच दीर्घकथेचे मूल्यमापन करावे लागते अशी काहीशी अगतिकता या चर्चेनंतर पुढे आलेली आहे. दुसरे स्मरण असे की, कोल्हापूर येथे साधना साप्ताहिकाच्यामार्फत लघुकथा या साहित्य प्रकारावर दोन दिवसांचे संमेलन घेण्यात आले होते.

एक हिंदी कथाकार या संमेलनासाठी उपस्थित होते व माननीय पुष्पा भावे यांच्या हस्ते या संमेलनाचा समारोप झालेला होता. या संमेलनातील चर्चेतून देखील दीर्घकथेच्या स्वतंत्र स्वरूपाबाबत मान्यवर अभ्यासकांकडून विशेष काही सांगण्यात आले नव्हते. मला आणखीन एक घटना आठवते आहे. एका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून लेखक-समीक्षक असलेल्या एका मान्यवराची प्रकट मुलाखत सुरू होती. मी अगदी पुढे बसलेलो होतो. नागपूरच्या एका लेखक मित्राने थोडा खोडसाळपणा करून मंचावर अशी चिठ्ठी पाठविली की, भारत सासणे पुढेच बसले आहेत आणि दीर्घकथा हा स्वतंत्र साहित्यप्रकार असू शकतो असा त्यांचा ‘चिरदाह’पासूनचा दावा आहे, म्हणून त्यावर आपले काय मत आहे?

ज्यांची मुलाखत चालू होती त्यांनी दीर्घकथेला स्वायत्तता देण्याचे, स्वतंत्र साहित्यप्रकार म्हणून किंवा कदाचित स्वतंत्र उपप्रकार म्हणून मान्यता देण्याची शक्यता फेटाळून लावून असे म्हटले की, मग लघुकादंबरीला साहित्यप्रकार म्हणून मानावे लागेल किंवा खंडकाव्य, नाटकातील दीर्घांक इत्यादी प्रकारांनादेखील स्वतंत्र साहित्यप्रकार म्हणून ओळखावे लागेल.

त्यांनी तसे म्हटल्याचे ऐकल्यानंतर मी थोडा निराश झालो. कारण, ज्या अर्थी दीर्घकथा मराठीमध्ये सातत्याने लिहिली जाते आहे, ज्या अर्थी त्यामध्ये सतत वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत व दीर्घकथा स्वतःची चिंतनशीलता प्रकट करते आहे त्या अर्थी अशा सातत्यामुळे लघुकथेच्या प्रांगणातून फुटून हा साहित्यप्रकार आकाराला येतो आहे व त्यामुळे आज ना उद्या दीर्घकथेची स्वायत्तता स्पष्ट होणार आहे, असे काही सकारात्मक बोलण्याच्या ऐवजी ग्रांथिक परिभाषेतील झापड लावून नकारात्मक भूमिका घेतल्यामुळे दीर्घकथेला स्वतंत्र अशी मान्यता देण्याची संधी पुन्हा एकदा मान्यवरांनी दवडलेली आहे.

लघुकथा व दीर्घकथा याच्यामधील फरक समीक्षेने आणि तत्संबंधी अभ्यासाने वारंवार स्पष्ट केला असला तरी दीर्घकथा लघुकथेच्या प्रांगणापासून फुटून वेगळी अशी उभी राहू पाहाते आहे या वस्तुस्थितीला मान्यता दिली पाहिजे, अशी चर्चा कोठेही न झाल्यामुळे उपरोक्त काही चर्चासत्रे फारशी उपयोगी ठरली नाहीत, असे आम्हा काही लेखकांचे मत झाले होते.

त्या पार्श्वभूीवर आजच्या परिसंवादाकडे पाहिल्यास काहीएक सकारात्मक असे पाऊल उचलले गेले आहे, असे म्हणता येईल व दीर्घकथेची स्वायत्तता अधोरेखित होऊ लागली आहे असे म्हणता येईल असे वाटल्यामुळे मी संयोजन समितीचे वरीलप्रमाणे अभिनंदन केले आहे. लघुकथा व दीर्घकथा यांमध्ये कोणकोणते फरक आहेत हे या ठिकाणी सांगण्यामध्ये मी वेळ व शक्ती व्यतीत करणार नाही. कारण दोन्हीमधील असलेल्या फरकाबाबत समीक्षापर ग्रंथांमधून यापूर्वी सांगण्यात आले आहे.

लघुकथा सुईच्या अग्रासारखी असून ती एका बिंदूने छेदते किंवा भेदते व हा अनुभव देण्याइतपतच लघुकथेचे प्रयोजन असते, याउलट दीर्घकथा बहुकेंद्री असून व्यामिश्र असते व जीवनाचा मोठा पट दाखविण्याचे सामर्थ्य बाळगून असते असे काही मान्यवरांनी यापूर्वीच सांगितलेले आहे. त्या तपशिलामध्ये आता जाण्याचे प्रयोजन नाही, कारण बहुतेक रसिकांना त्या संदर्भात थोडे अधिक माहिती असते.

कोणे एके काळी ‘दोन आणे माला’ किंवा ‘चार आणे माला’ अशा स्वरूपाची पुस्तके मराठीमध्ये प्रकाशित होत असत, तसेच अन्यही प्रतिष्ठित पुस्तके प्रकाशित होत. ‘वाचन संस्कृती’ नावाचा प्रकार त्या वेळेस नुकताच रुजू लागला असावा. साक्षरतेचे प्रमाण कमीच असले तरी तत्कालीन बुध्दिवादी इत्यादी वर्ग पुस्तके वाचू लागला असावा. त्यामुळे वाचकांना तुम्ही कोणते पुस्तक वाचणार आहात या संदर्भात काहीएक टिप्पणी मुखपृष्ठावर किंवा दुसऱ्या क्रमांकाच्या पृष्ठावर छापली जात असे. उदाहरणार्थ ‘सुरस चमत्कारिक कादंबरी’ किंवा ‘समाजप्रबोधनपर कादंबरी’. वाचकांना ‘एज्युकेट’ करण्याचा हा प्रकार असावा असा माझा समज आहे.

वाचकाची वाचन सुरू करण्यापूर्वीची काहीएक मनोभूमिका तयार करणे हा हेतू या मागे असेल. विनोदी कादंबरी असेल व वाचकास तसे सुरुवातीस सांगितले नाही व कादंबरी गंभीरपणे वाचण्यास सुरुवात केली तर वाचकाला विनोदाचे बोधन होणारच नाही व काहीएक घोटाळे निर्माण होऊ शकतील असे वाटण्याचे कारण यामागे असू शकेल.

आता, लघुकथा आणि दीर्घकथेच्या संदर्भात काही वर्षांपूर्वी असेच काही झालेले आहे. लघुकथेचा वाचकवर्ग मोठा होता व नियतकालिकांच्या माध्यमातून या लघुकथा वाचकांपर्यंत पोहोचत असत. नियतकालिकांचे संपादक अनुक्रमणिकेमध्ये लघुकथा या शीर्षकाच्या खाली लघुकथेची नावे, लेखकांची नावे व पृष्ठ क्रमांक छापीत असत. त्यामुळे आपण लघुकथा वाचणार आहोत असा निश्चित असा काही समज वाचकांचा होत असणार.

दीर्घकथांचे प्रयोग होण्याची सुरुवात झाल्यानंतर देखील संपादक व समीक्षक यांनी दीर्घकथा हा काही वेगळा प्रकार असू शकतो याबाबतचे सूचन सुरुवातीपासून केले नाही. एखादी दीर्घकथा लघुकथेच्या शीर्षकाअंतर्गत अनुक्रमणिकेमध्ये समाविष्ट केली जात असे व त्यामुळे वाचक ‘एज्युकेट’ होण्यात थोडा उशीर लागलेला आहे.

‘चिरदाह’ या माझ्या दीर्घकथेच्या संग्रहाच्या यशानंतर दीर्घकथेला काहीएक मान्यता देण्यात यावी अशा प्रकारची चर्चा सुरू झाली, काही प्रमाणात या चर्चेला मी हातभार लावला व त्यानंतरच दिवाळी अंकांमध्ये नियतकालिकांच्या अनुक्रमणिकांमध्ये प्रथमच ‘दीर्घकथा’ असे स्वतंत्र शीर्षक स्वीकृत झाल्याचे आपल्याला पाहाता येईल. या नंतर मात्र आपण दीर्घकथा वाचणार आहोत अशी मनोभूमिका घेऊनच वाचक दीर्घकथेकडे पाहू लागला असे माझे निरीक्षण आहे. पूर्वसूरींसह अनेक समकालीन लेखकांनी दीर्घकथा हा साहित्य प्रकार समर्थपणे हाताळायला सुरुवात केल्यामुळे लघुकथेच्या प्रांगणापासून फुटून हा काही स्वतंत्र उपप्रकार आपल्या अंगभूत स्वायत्ततेसह अस्तित्वात असू शकतो किंवा कसे याबाबत विचार करण्यास काही प्रमाणात सुरूवात झाली ही समाधानाची बाब मानली पाहिजे.

भारताबाहेरील काही परकीय भाषांमध्ये (बहुधा जर्मन भाषेमध्ये) लघुकादंबरी स्वतंत्रपणे स्वायत्तता जपून उभी असलेली दिसते असे काही मान्यवर विद्वानांनी मला सांगितले आहे. जगामध्ये असे प्रयोग साहित्याअंतर्गत होतच असतात. दीर्घकथा स्वतःच्या परिभाषेसह व तंत्रासह अस्तित्वात आली तर दीर्घकथेलासुद्धा मान्यता मिळून एक नवे ऐतिहासिक कार्य होईल  असे वाटते. तेव्हा दीर्घकथेची काहीएक परिभाषा तयार करणे, दीर्घकथेचे तंत्र काही प्रमाणात स्पष्ट करणे असे काही काम मराठी समीक्षेच्या क्षेत्रामध्ये होणे आता गरजेचे आहे.

तुम्ही जेव्हा दीर्घकथेच्या तंत्राबद्दल बोलता तेव्हा तुम्हाला प्रोसिजर व टेक्निकबद्दल बोलायचे असते व अडचण अशी की, दीर्घकथा लिहिण्याची प्रोसिजर व टेक्निक प्रत्येक लेखकाचे वेगवेगळे असते. त्यामुळे प्रोसिजर व टेक्निकबद्दल एकवाक्यता असू शकत नाही. तरीसुध्दा दीर्घकथाकार म्हणून लेखकाला काहीएक सांगता येणे शक्य असते. ते येथे सांगण्याचा प्रयत्न आहे.

तुम्ही जेव्हा दीर्घकथा लिहिता तेव्हा तुम्ही लघुकथा लिहीत नाही आहात याची तुम्हाला जाणीव असावी लागते. तुमच्याकडे, तुमच्या आंतरमानसामध्ये, जे द्रव्य उपलब्ध असते त्या द्रव्यावर काहीएक संस्कार करून तुम्हाला व्यापक असे मानवी व्यवहार मांडायचे असतात. अपेक्षित व्यामिश्रता आपोआपच अंगभूतपणे दीर्घकथेमध्ये उपस्थित होऊ लागते.

लघुकथेमध्ये जे मावणार नाही किंवा सांगता येणार नाही व लघुकादंबरीमधून सांगणे योग्य होणार नाही असे काही द्रव्य तुमच्याकडे असते. अनेक पात्रे, अनेक जीवनांची गुंतागुंत, अनेक प्रसंग इत्यादींमधून तुम्हाला व्यापक असा मानवी जीवनपट मांडावयाचा असतो.

कादंबरी व लघुकादंबरी यामध्ये वापरावयाच्या निवेदनशैलीच्या सामर्थ्याचा उपयोग करून घेऊन दीर्घकथेची शैली व तंत्र लेखकाला राबवावयाचे असते. लघुकथेलाही क्वचितच शक्य होईल अशी अनुभवाची व्याप्ती दीर्घकथेमध्ये सांगता येते. त्यामुळे दीर्घकथा लिहिण्याची रंगत लेखक अनुभवू शकतो.

सामान्यतः दीर्घकथा बहुकेंद्री असते तथापि, या विविध केंद्रांचा परस्परांशी काहीएक अनुबंध अभिप्रेत असतो. त्यामुळे वरकरणी वेगवेगळ्या वाटणाऱ्या केंद्रांच्या अंतर्गत सूक्ष्म संबंधांचे जाळे अनेक वेळेस दीर्घकथेधून विणावे लागते. अशा अंतर्गत जाळ्यांच्या विणीचा दीर्घकथेच्या तंत्राशी संबंध आहे.

तंत्रविषयक काहीएक निवेदन करण्यापूर्वी त्यातल्या काही अडचणी सांगितल्या पाहिजेत. बुद्धिमान समीक्षक अनेक वर्षांपासून आंतरवर्तुळातील साहित्य व बाह्यवर्तुळातील साहित्य असा भेद करीत आलेले आहेत. मानसशास्त्राप्रमाणे बहिर्मुखी व आंतरमुखी प्रवृत्ती असतात. आपण लिहितो ते साहित्य कुणासाठी व कोणापुढे नेमके जाणार आहे त्याची काहीएक धूसरशी अशी कल्पना लेखकाला असावी लागते. मी स्वतः बुद्धिगम्यता व हृदयगम्यता असा भेद करीत आलेलो आहे. माझ्या कथा जर समजून घ्याव्या लागत असतील तर त्या बुद्धिगम्य असू शकतात व त्या जर निर्विवादपणे आवडल्या तर हृदयगम्य असू शकतात. काही कथांध्ये या दोन्ही प्रवाहांचे मिश्रण देखील असू शकते.

दीर्घकथा लिहीत असताना त्याचे आंतरसूत्र दुर्बोध असेल की नाही याबाबत विचार करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नसतो. आशयाचे प्रकटीकरण अबोध पद्‌धतीने होत राहते व दीर्घकथा लिहून झाल्यानंतर ती कथा किंवा त्यातील आशयसूत्र बुद्धिगम्य आहे की हृदयगम्य आहे हे कधी कधी समजू शकते. सुबोध किंवा दुर्बोधतेचा चकवा तंत्र राबविण्यापूर्वी लेखकाला पडू शकतो.

वाचकानुनय करायचा नाही असे ठरविणे किंवा न ठरविणे अशा प्रकारची संकटे देखील लेखकावर येतात. जर दीर्घकथा कलात्मक असेल तर सामाजिकतेचा आग्रह धरणाऱ्यांचे आक्षेप येतात व केवळ सामाजिकता दीर्घकथेध्ये प्रकट करावयाची झाल्यास कलात्मकतेध्ये बाधा निर्माण होऊ शकते, अशा काही अडचणी येतात. त्यावर मात करण्यासाठी त्याची स्वतःची चिंतनशीलता व तंत्रसाधना उपयोगी ठरते.

दीर्घकथा लेखन ही अनेक वेळेस निसरडी वाट असल्यामुळे काही अपघात होऊ शकतात. लेखक स्वतः जिला दीर्घकथा म्हणतो ती प्रत्यक्षात दीर्घकथा नाही व कदाचित सामान्य लघुकथा आहे असा कठोर प्रहार समीक्षकांकडून होऊ शकतो. तथापि, अमूक एक कृती ही दीर्घकथा आहे किंवा नाही हे ठरविणे अवघड असते हे लक्षात घेतले पाहिजे. दीर्घकथेला सिध्द करण्याच्या अनेक शक्यता लेखक लक्षात घेतो तेव्हा त्याला तसे करण्यासाठी प्रयोगशीलतेचा वापरदेखील करावा लागतो. अशा प्रयोगशीलतेचा वापर ही एक रिस्क असते. तंत्रशरण शैली हा दोष मानला जाऊ शकतो ही एक त्यातली रिस्क. परंतु प्रयोगशीलतेतूनच दीर्घकथेला नव्या वाटा प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे प्रयोगशीलतेकडे तिरस्काराने पाहता येत नाही. तंत्राचे शास्त्र होऊ शकेल किंवा कसे याबद्दल चर्चा करण्यापूर्वी कलावादाचा आक्षेप देखील येथे लक्षात घेऊ या.

कलाकृती हा कलावंताचा आत्मोद्‌गार असेल तर तंत्रबध्दतेमुळे हा आत्मोद्‌गार कलंकित होतो व केवळ कलाकुसरीला किंवा क्राफ्टनशिपला महत्त्व मिळते अशी कलावादाची टीका संभवते. कलेचा अविष्कार बाजारू, व चतुर तंत्रबध्दतेमुळे कलंकित होणार नाही याचे भान दीर्घकथाकाराला ठेवावे लागते. अशा काही अडचणी आणि धोक्यांचा निर्देश येथे केला असला तरी यावर लेखकाला स्वतःलाच मार्ग शोधावा लागतो व या मानसांतर्गत लढाया त्याला स्वतःलाच लढाव्या लागतात. दीर्घकथा लिहीत असताना वेगवेगळे प्रयोग किंवा वेगवेगळ्या तंत्रपद्धतींचा कसा वापर होऊ शकतो याचे शास्त्र सांगण्यापेक्षा किंवा त्याचे सविस्तर दिग्दर्शन करण्यापेक्षा माझ्या काही कथांच्या तंत्राबाबत येथे संक्षेपाने नमूद करणे मला आवडेल.

साहित्यकृती ही सांस्कृतिक वस्तू आहे. आपल्या समोर नाट्यशास्त्र व नाट्यकला आहे, एका बाजूला चित्रकला व मूर्तिकला आहे, नृत्य-गायन इत्यादी उच्च कला व विद्या समाजामध्ये अस्तित्वात आहेत. या सर्वांचा परस्परांवर आघात होऊन कलांचे आदानप्रदान होताना दिसते.

संगीतातील फ्यूजन हा  प्रकार नवनिर्मितीच्या वाटा शोधताना दिसतो. साहित्याअंतर्गत देखील कथा-दीर्घकथा यावर विचार करीत असताना अशा विविध कला व विद्यांचा प्रभाव दुर्लक्षित करून चालत नाही. चित्रपट माध्यमाचा साहित्यलेखनावर कसा परिणाम होतो यावर काही विद्वानांनी यापूर्वीच दिग्दर्शन केले आहे. दीर्घकथेला नवे परिमाण देण्याबद्दल मी जेव्हा विचार करतो तेव्हा अशा विविध शक्यतांचा उपयोग करतो. • श्रुतिकेच्या अंगाने जाणाऱ्या माझ्या एका कथेमध्ये कथानायक हा एक काष्ठशिल्पकार आहे. एका बंद खोलीमध्ये कथानायक वूडकार्व्हिंग करतो आहे. हे काम अतिशय एकाग्रतेने करावे लागते. तो ज्या बाहुलीला अस्तित्व देतो आहे त्या बाहुलीला तो ठकी असे म्हणतो. कथानायक पेर्इंगगेस्ट आहे. घरातील इतर व्यक्ती बंद खोलीच्या बाहेर वावरतात, बोलतात व त्यांचेही एक नाट्य सुरू आहे.

तिकडे बाहेर ठकी नावाच्या घरातल्या मुलीच्या लग्नाचा काही विषय चर्चिला जातो आहे. कथानायकाला एकही पात्र दिसत नाही मात्र संवाद व हालचाली ऐकू येतात. अर्थातच त्यामुळे वाचकांनादेखील घरातल्या विविध पात्रांचे दर्शन होत नाही. त्यांना देखील संवादच ऐकू येतात. या संवादांतून त्या घरामध्ये सुरू असलेले चर्चानाट्य हळूहळू उलगडून वाचकांच्या समारे येऊ लागते व एक काव्यात्म परिमाण प्राप्त करते. श्रुतिकेमध्ये जसे केवळ आवाज ऐकू येतात व त्या माध्यमातून जशी कथा कळते त्याच पद्धतीने ‘ठकीच्या लग्नाचे नाटक’ नावाची कथा मी लिहिली. या कथेध्ये हे तंत्र खेळवताना अतिशय सावधगिरी बाळगावी लागली व लिहिताना आनंद मिळाला. ही कथा आवडली, वेगळी वाटली असे अनेकांनी कळविले. श्रुतिकेचे तंत्र दीर्घकथेध्ये वापरल्यामुळे तंत्रांची सरमिसळ होऊन एक वेगळाच अनुभव तयार झाला हे येथे सांगावयाचे आहे. ठकी आणि तिचे मित्र नाटकाची तालीम करीत आहेत. या नाटकात देखील ‘लग्न’ हाच विषय आहे. घरातील कुटुंबप्रमुख, घरातील गृहिणी व ठकी यांच्यामध्ये देखील ठकीच्या लग्नाबद्दल काहीएक ताण-तणाव आहेत. नाटकातील म्हटले जाणारे संवाद, घरातल्या पात्रांमधील वास्तवातील संवाद यामधून लग्न या आशयसूत्राबद्दल दीर्घकथेत काहीएक तथ्य हळूहळू स्पष्ट होत जाते.

दूरवर एक सुतार पक्षी- वूड कार्व्हर-आपले घरटे बनविण्यासाठी ठक्‌ठक्‌ असा आवाज करीत आहे. हा पक्षीदेखील विचार करतो आहे. म्हणजे, वेगवेगळी केंद्रस्थाने एकमेकांमध्ये मिसळून श्रुतिकेच्या अंगाने काव्यात्म अनुभव प्रकट करतात. दीर्घकथेला हा प्रयोग उपकारक ठरतो.

• जीवन एक रंगमंच आहे असे नाहीतरी म्हटले गेले आहे. आपण वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतो. म्हणजेच मानसमंच व लौकिकमंच असे दोन मंच सामान्यतः प्रत्येकासाठी अस्तित्वात असतात.

माझ्या कथांमध्ये नाट्यांश येतात. ‘स्यमंतक मण्यांचे प्रकरण’ नावाच्या दीर्घकथेत, अशा मानसमंचाचा तसेच कथानायकाच्या संवादातील नाट्यांशाचा वापर मुक्तपणे केलेला आहे. अशा काही कथा नाटकाचे मीटर लक्षात घेऊन पुढे जातात.

तुम्ही लिहिताय दीर्घकथा मात्र विचार नाटकाच्या तंत्राचा करता ही मोठी मजेची गोष्ट असते. अशा दीर्घकथा सुजाण व सांस्कृतिक दृष्ट्या समृध्द असलेल्या वाचकांना वेगळाच आनंद देऊ शकतात असा अनुभव तर आहेच पण त्याचबरोबर दीर्घकथेच्या रूढ असलेल्या साहित्यप्रकाराला वेगळे परिमाण देता येऊ शकते असा अनुभव आहे. या पद्धतीने लिहिलेल्या माझ्या काही कथा अन्य भाषांधून अनुवादित झाल्यामुळे हिंदी लेखक व वाचकांच्या विशेष अशा प्रतिक्रिया प्राप्त झालेल्या आहेत. 

• ‘शुभवर्तमान’ नावाच्या कथेमध्ये (ही कथा आहे की दीर्घकथा आहे याबद्दल वाद आहे) कथानायिका नाटक लिहिते आहे. लिहिता लिहिता नाटकातील पात्रे अवतरित होतात. मात्र लौकिकातील पात्रे येण्याची चाहूल लागताच ही पात्रे लगेच दृष्टीआड होतात किंवा दाराखिडकीच्या पडद्याआड लपतात.

लौकिकातील किंवा वास्तवातील पात्रांचे संवाद ऐकतात व कधी कधी प्रत्युत्तरदेखील देतात. येथे पुन्हा लौकिक व अलौकिक अशा दोन वास्तवांच्या चौकटी एकमेकांना छेदून जातात. नाटकातील पात्रे व वास्तवातील पात्रे यांच्या सरमिसळतेतून आशय फुलत जातो, हा आनंददायी अनुभव अशी दीर्घकथा लिहिताना मिळालेला आहे. दीर्घकथेच्या लेखनामध्ये तंत्र राबवीत असताना अशा वेगळ्या प्रयोगातून दीर्घकथेला वेगळी मिती व परिमाण मिळू शकते.

• सामान्यतः कथानायक जे सांगतो त्यावर विश्वास ठेवण्याची वाचकाची सहज प्रवृत्ती असते. त्यामुळे अविश्वसनीय कथा- नायकाकडून- अनरिलायबल नॅरेटरकडून-वाचकाची फसवणूक होणे हा निवेदनशैलीतील एक प्रयोग असू शकतो. मनोविकृत माणूस जे सांगेल ते त्याच्या बाजूने सांगेल व अतिशय प्रभावीपणे व पटेल अशा पद्धतीने सांगेल. आपण एका अविश्वसनीय निवेदकाची कथा त्याच्याच मुखातून ऐकतो आहोत हे वाचकाला थोडे उशिराने कळते. अशा शैलीतल्या दोन कथा ‘उपसंहार’ व ‘अदृष्ट’ मी लिहिल्या व लिहिताना जसे आव्हान मला घ्यावे लागले तसेच आव्हान वाचकांना या कथांमधून मी दिले. ही सगळी निवेदनशैली मांडणे कौशल्याचे काम होते व ते यथाशक्ती मी पेलले आहे. अशा कथामुंळे शैलीच्या तंत्रांचा विकास होऊ शकतो असे काही जाणकार रसिक विद्वानांनी मला सांगितले आहे.

 • प्रतीकांचा उपयोग दीर्घकथेच्या तंत्रामध्ये प्रभावीपणे करता येतो. कारण दीर्घकथेचे मोठे प्रांगण अशा प्रतीकांना खेळविण्यासाठी उपयोगी ठरते.

 ‘उंट’ नावाच्या माझ्या दीर्घकथे- मध्ये एका छोट्याशा गावातील नगरपरिषदेच्या बागेतील उंट मरतो व मुलांसाठी दुसरा उंट आणण्याची योजना आखली जाते.

आपल्या समाजामध्ये सर्वच ठिकाणी राजकारण असल्यामुळे येथे  देखील राजकारण प्रविष्ट होते. उंट या प्राण्याला घेऊन येण्याची जबाबदारी ज्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर टाकली जाते ते कर्मचारी जिवावर उदार होऊन उंटाला घेऊन येतात व श्रेय मिळविण्याची मारामारी मात्र इकडे राजकारण्यांची सुरू राहाते. हे सर्व उंट पाहातो आहे.

कथेध्ये हा उंट तत्त्वज्ञासारखा मनुष्याच्या क्षुद्र व्यवहारावर भाष्य करतो. उंट फिलॉसॉफर आहे, कथेतील एका पात्राशीच संवाद करतो. उंट हे प्रतीक होत जाते व जीवनविषयक मानवी क्षुद्रतेवर व्यंगात्मक भाष्य करते.

एकदा उंट बोलेल हे लेखकाने स्वीकृत केले की, या उंटाचा पुरेपूर परंतु काटेकोर असा उपयोग करून घेता येतो.

ही कथादेखील अनेकांना आवडली असून त्यावर चित्रपट तयार करण्याची हालचाल सुरू आहे.

• ‘येशूची कथा’ नावाच्या दीर्घकथेत ‘फ्रोजनशोल्डर’मुळे कथानिवेदक असाच त्रास असलेल्या आपल्या काही अन्य मित्रांच्या आग्रहामुळे एका दवाखान्यात जातो व तेथे प्रत्येकाची कथा ऐकतो.

आपली व्यथा सांगितल्यामुळे हा सायकोसोमॅटिक डिसीस कमी होतो असा खुलासा मिळाल्यामुळे आपल्या मनातील शल्य प्रत्येक मित्र आपल्या निवेदनातून सांगतो व तरीही या प्रत्येक निवेदनाला एक अंतःसूत्र लाभते. प्रत्येकाच्या अनुभवामध्ये कुणीतरी एक कुबडा माणूस आहे हे ‘समान सूत्र’ म्हणजे उघडपणे वापरलेली क्लृप्ती असली तरी ती अडाणीपणे वापरलेली नाही. ज्या गोष्टी उघड-ऑबव्हियस-वाटतात त्या वाटतात तितक्या उघड नसतात हे वाचकाने लक्षात घेणे हे वाचकासाठी आव्हान असते. अशा प्रायोगिकतेमुळे वाचकांचेसुद्धा एज्युकेशन होऊ शकते असा माझा प्रामाणिक समज आहे.

• बालसमानसशास्त्राचा उपयोग करून घेऊन बालकाच्या दृष्टीकोनातून प्रौढांचे व्यवहार विशद करणारी कथा अथवा दीर्घकथा लिहिणे अतिशय अवघड असते. कारण बालनायकाला जे दिसते त्याचे पुरेसे आकलन त्याला होत नाही, मात्र वाचकांना ते समजू शकते, त्यामुळे एका बाजूने वास्तव अबोध व दुसऱ्या बाजूने सुस्पष्ट ठेवणे अशा काही शैलीतंत्राचा उपयोग करावा लागतो.

माझ्या काही कथा या पद्धतीने लिहिलेल्या आहेत. रसिक जाणकारांनी असे नमूद केले आहे की, बालकाचे भावविश्व समजून घेऊन त्या माध्यमातून प्रौढांसाठी कथा लिहिणे या तंत्रामुळे दीर्घकथेला अतिरिक्त परिमाण देता येते. या संदर्भातले काहीएक श्रेय मला देण्यात आले आहे.

• आपल्या भोवतालचे जग मोठे असते. समाजातील ज्ञातअज्ञात व्यामिश्रता अस्तित्वात असण्याचे भान दीर्घकथेला असावे लागते. त्यामुळे दीर्घकथाकार आपल्या अनुभवाला एकसूरी व मर्यादित ठेवू इच्छित नाही. आशय-विषयांची निवड हे मोठे आव्हान दीर्घकथेच्या परिसरात टिकून ठेवावे लागते. माझ्या अनेक कथा विविध विषय वैशिष्ट्यामुंळे महत्त्वाच्या ठरल्या आहेत असे मला सांगण्यात येते.

दीर्घकथेचे कुणीतरी शास्त्र निर्माण करणे आता गरजेचे आहे. हे काम समीक्षेच्या व्यापक वर्तुळातच केव्हा तरी झाले पाहिजे. भारतातील सर्वाधिक वाचली जाणारी जी हिंदी भाषा आहे त्यामध्ये कथा मोठी झाली की तिला ‘लंबी कहानी’ असे म्हटले जाते मात्र त्या भाषेत देखील दीर्घकथेचा विचार नाही असे जाणकारांचे मत आहे.  इंग्रजीत सुध्दा लाँग स्टोरी असा काही प्रकार नाही. त्यामुळे परकीय भाषेत किंवा भारतांतर्गत भाषांमध्ये दीर्घकथेवर काहीएक वेगळा विचार झाल्याचे मला ज्ञात नाही. त्याउलट मराठीत मात्र काहीएक सातत्याने दीर्घकथा लिहिली जाते आहे. तीमध्ये प्रयोग केले जात असून व्याप्ती व खोली वाढवली जाते आहे. त्यामुळे दीर्घकथा लघुकथेपासून फुटून वेगळी उभी राहताना दिसते. तिची व्याख्या करणे व त्या आनुषंगाने दीर्घकथेची स्वायत्तता अधोरेखित होणे ही काळाची गरज असून तसे झाल्यास मराठी साहित्याला एक स्वतंत्र, समृध्द असे अविष्काराचे दालन उपलब्ध होईल, अन्य भाषांना देखील एक समृध्द अशी देणगी मिळेल असा मला विश्वास वाटतो. माझे काही चिंतन मी आपल्यासमोर नम्रपणे ठेवले आहे, त्यावर आपण विचार करावा अशी माझी विनंती आहे.

 

Tags: भारतांतर्गत भाषा परकीय भाषा श्रुतिका निवेदनशैली दीर्घकथा Language under India Foreign Language Srutika Narrative Long story weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भारत सासणे,  पुणे
bjsasane@yahoo.co.in

मागील चार दशके भारत सासणे हे मराठीतील आघाडीचे साहित्यिक मानले जात असून, त्यात कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, अनुवाद इत्यादी प्रकारचे लेखन आहे.


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके