डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सगळे चकित झाले. भोवती जमा झाले सुनंदाताईच्या. उत्तेजित दिसू लागले. शोध तर लागला होताच, काही तरी. पण काय, अर्थ काय या ओळीचा? ‘‘काहीच कळत नाही!... अर्थ काय याचा?’’ हरीने विचारलं. बाकीच्यांजवळ उत्तर नव्हतंच. सगळे समशेरकडे पाहू लागले. पण तो कोणाकडेच पाहत नव्हता, दूर पाहत होता. जणू त्याच्या मेंदूत काहीतरी गणित मांडलं जातंय. उत्तर... ते सोडवलं पण जातंय.

१/ नवे आव्हान

‘चाळीस मिनिटांचं आव्हान’ यशस्वीपणे सोडवल्यानंतर आपल्या दोस्ताला- समशेर कुलूपघरेला पुन्हा नव्या आव्हानाच्या प्रकरणात गुंतावं लागेल याची कोणालाच कल्पना नव्हती. पण झालं असं की, संगणकाच्या शिकवणीवरून परत येत असतानाच त्याला शोधत आपली सुनंदाताई तिच्या वेगवान स्कूटरवरून येऊन पोहोचली आणि तिने त्याला जवळजवळ उचलूनच मागे बसवलं आणि स्कूटर तुफान वेगाने पळवली.

आपल्या ‘शेरलॉकहोम्स्‌’ला तत्काळ घेऊन येण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली होती ना! समशेरने आधी काही विचारण्याचा प्रयत्न केला, पण नंतर तो शांत बसून राहिला मागे. सुसाट वेगाने शेवटचं वळण घेऊन स्कूटर गोपाळकाकांच्या बंगल्याच्या आवारात शिरली. तिथे आधीच सगळे उपस्थित होते. हरी, भीमू शक्तिमान, लीला, पिंकी आणि इतर मित्रमंडळी. झालंच तर त्यांचा नंदूभय्या अर्थात सबइन्स्पेक्टर नंदकिशोर कडक गणवेषात उभा होता आणि त्यावरून प्रकरणाचं गांभीर्य समशेरच्या लक्षात आलं. हे काही तरी तातडीचं प्रकरण दिसतंय, हे त्याने ओळखलं. काय असेल हे अर्जंट प्रकरण? चला, बघू या!

२/ तातडीची बैठक

बैठक सुरू झाली. नंदूभय्याने सांगायला सुरुवात केली. ‘‘हे घर गोपाळकाकांचं आहे, हे तुम्हाला माहीतच आहे!...तुम्ही इथे अनेक वेळेला आला आहात!...बुद्धिबळ खेळण्यासाठी. पुस्तकं वाचण्यासाठी. हो ना?’’

‘‘होऽ! त्यांना प्राचीन नाणी जमवण्याचा छंद आहे!... त्यांनी आम्हाला ‘अलेक्झांडर दि ग्रेट’चं ओरिजिनल नाणं दाखवलं होतं...’’

‘‘आणि हो- त्यांनी आम्हाला दुर्मिळ तिकिटंही दाखविली होती!’’

‘‘अगदी बरोबर! आणि हे प्रकरण तिकिटातूनच निघालं आहे... लक्षपूर्वक ऐका!’’

मुलं लक्षपूर्वक ऐकू लागली. आपला शेरलॉकहोम्स्‌सुद्धा एकाग्रपणे ऐकू लागला. काय होती ती हकिगत?

३/ नंदूभय्याने सांगितलेली हकिगत

नंदूभय्याने जे सांगितलं, ते संक्षेपाने पुढे देत आहे-लहरी व विद्वान संशोधक असले तरी गोपाळकाकांची समशेर आणि त्याच्या मित्रमंडळींशी मैत्री होती. मागच्या एका प्रकरणापासून तर गोपाळकाका समशेरचे फॅन झाले होते. ते समशेरला बुद्धिबळ शिकवीत असत. हरीला, लीलाला पुस्तके वाचायला देत असत. सुनंदाताई त्यांची प्रवासवर्णने वाचीत बसे. तर, अशा या गोपाळकाकांना पोस्टाचं एक दुर्मिळ असं तिकीट सापडलं आहे. या तिकिटाची हकिगत अशी...

स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटिशांनी भारतात टपालखातं सुरू केलं. त्यांनी टपालाची अनेक तिकिटं छापली. स्वातंत्र्यपूर्व भारतात हा प्रयोग नवा होता. मात्र त्यांची तिकिटे प्रामुख्याने व्हिक्टोरिया राणीची असत. मात्र एकदा गफलत झाली आणि ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच ‘महात्मा गांधीं’वरचं एक तिकीट छापून घेतलं. महात्मा गांधींनी ‘चले जाव’ची घोषणा केली होती आणि महात्मा गांधी ब्रिटिशांचे ‘नंबर एक’चे शत्रू बनले होते. पण तरीही काही गफलतीमुळे हे तिकीट छापायला गेलं. लक्षात येईपर्यंत तीन तिकिटे छापून झाली होती. त्यांपैकी एक संग्रही ठेवण्यात आलं होतं आणि दोन तिकिटे वितरित करण्यात आली होती. दोनपैकी एक पोस्टातच मिळालं आणि उरलेलं एक विकलं गेलं होतं. खूप शोधूनही ब्रिटिशांना ते तिकीट मिळालं नाही. ब्रिटिशांच्या कार्यपद्धतीची टिंगल झाली असती, म्हणून ब्रिटिशांनी या तिकिटाची बाब गोपनीय ठेवली. मग, अगदी अलीकडे आणि अचानक, त्रावणकोर येथे गोपाळकाकांना हे दुर्मिळ तिकीट सापडलं.

याच सुमाराला एका पोर्तुगीज माणसाने आंतरराष्ट्रीय मासिकात लेख लिहून या तिकिटाची हकिगत प्रकाशात आणली आणि हे दुर्मिळ तिकीट कुठे असेल, असा सवाल विचारला. सापडलेलं हे तिकीट ‘स्वतंत्रभारताच्या अभिमानाची वस्तू’ आहे हे लक्षात न घेता, उत्सुकतेपोटी आणि भोळेपणाने गोपाळकाकांनी या पोर्तुगीज माणसाला पत्र लिहून आपल्याला ते तिकीट सापडलं आहे, असं कळवलं आणि संकट ओढवून घेतलं.

‘‘या दुर्मिळ तिकिटाची किंमत किती आहे, असं तुम्हाला वाटतं?... सतरा कोटी रुपये!’’

‘‘काऽय? सतरा कोटी?... मग काय झालं?’’सगळ्यांनी ओरडून विचारलं.

‘‘तो पोर्तुगीज माणूस गोपाळकाकांना भेटायला आला. त्याने त्यांच्याशी दोस्ती वाढवली. घरीच मुक्काम ठोकला, अगदी इथेच आणि नंतर त्याने ते तिकीट गोपाळकाकांना मागायला सुरुवात केली. नंतर त्याने गोपाळकाकांना जवळपास ताब्यातच ठेवलं. त्या माणसाचे दोन हस्तकसुद्धा इथेच राहू लागले. गोपाळकाका आपल्याच घरात जवळपास तुरुंगात सापडले. मात्र ते तिकीट त्या माणसाला देण्याइतके गोपाळकाका भोळे नव्हते. त्यांनी त्या माणसाला तिकीट दिलं नाही; तेव्हा त्या माणसाने गोपाळकाकांचा छळ पण केला, त्रास पण दिला आणि सगळ्या घरात तिकीट शोधण्याचा प्रयत्न केला.’’

‘‘आई गंऽ! मग?’’

‘‘ते तिकीट त्याला सापडलं नाही. गोपाळकाकांनी संधी शोधून ते तिकीट घरातच कुठे तरी लपवून ठेवलं आणि त्यांनी खिडकीतून उडी टाकून कसंबसं पलायन केलं.’’

‘‘मऽग? मग काय झालं?’’ मुलांनी एकसुरात उत्सुकतेने ओरडून विचारलं. नंदूभय्या पुढे सांगू लागला...

‘‘गोपाळकाकांनी पाठलाग चुकवत कसाबसा आपल्या हरीच्या वडिलांचा दवाखाना गाठला आणि हरीच्या वडिलांच्या सतर्कतेमुळे गोपाळकाका त्या बदमाशांच्या हाती लागले नाहीत.’’

हे ऐकून अर्थातच, हरीला अत्यानंद झाला. नंदूभय्या पुढे सांगू लागला- ‘‘गोपाळकाका पोलिसांच्या पहाऱ्यात आता सुरक्षितपणे उपचार घेतायत. पण, मैत्री वाढवून झालेल्या विश्वासघातामुळे गोपाळकाका इतके खचून गेलेयत की, ते तिकीट कोठे लपवलं आहे ते पोलिसांनासुद्धा सांगत नाहीएत. फक्त, ‘मुलांना खोलीत बोलवा’ एवढंच बोलतायत.

‘‘आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना इथं बोलावलं आहे!’’ नंदूभय्याने हकिगत संपवली. सुन्न शांतता पसरली. पहिल्यांदाच समशेरनं म्हटलं, ‘‘मग आता?... आम्ही ते तिकीट शोधायचं?’’

‘‘राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक असलेलं हे दुर्मिळ तिकिट तुम्ही आता शोधायचं आहे!... आणि वेळ दोनच तास!... कारण राष्ट्रीय सुरक्षावाले अधिकारी घराला सील करणार आहेत... तेव्हा, काय शेरलॉक-घेणार ना हे आव्हान?’’

शेरलॉक तत्काळ उभा राहिला आणि त्याने आव्हान स्वीकारलं. तो एकदम गंभीर दिसू लागला. काय करणार होता तो?

४/ हसणारा बुद्ध

‘सरकारी गुप्त भाषा वाचणाऱ्या तज्ज्ञ अधिकाऱ्या’चे नाव डॉ. बुद्धिसागर असं होतं. तो सतत तिथे उपस्थित राहणार होता आणि मुलांवर लक्ष ठेवणार होता. कारण, शोधाशोधीमध्ये काही पुरावा नष्ट होण्याची भीती होती. त्यांनी समशेरकडे जरा आढ्यतेनेच पाहिलं आणि ते छद्‌मीपणे म्हणाले, ‘‘शेरलॉक होम्स्‌?... अरे वाऽ!’’ आणि ते एका खुर्चीवर जाऊन बसले. समशेर नेत्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. त्याने लगेचच मित्रांनाजवळ बोलावलं आणि तो म्हणाला,

‘‘ज्या अर्थी काकांनी आपल्याला इथे बोलावलं आहे, त्या अर्थी काही तरी आपल्याला माहीत असणार!... चला तर... शोधायला लागू...’’

समशेर आणि मित्रमंडळींनी कशालाही हात नलावता गोपाळकाकांच्या खास खोलीची पाहणी करायला सुरुवात केली.

समशेरने म्हटलं, ‘‘काही बदल दिसतोय का रे- एनी चेंज?’’

हरी म्हणाला,‘‘हा ढेरपोट्या हसऱ्या बुद्धाचा पुतळा इथे कधीच नव्हता... आता हा पुतळा समोर ठेवलेला आहे आणितो समोरच्या पुस्तकाच्या कपाटाकडे बोट दाखवतोय...’’

‘‘खरंच की!’’सुनंदाताईंनी म्हटलं.

समशेरने त्या पुतळ्याकडे, मग कपाटाकडे पाहिलं. नंतर तो टेबलाकडे पाहू लागला. टेबलावर बुद्धिबळाचा डाव अर्धवट मांडलेला होता. समशेर त्या डावाकडे एकाग्रपणे पाहत उभा राहिला आणि नंतर अचानक त्याने आश्चर्योद्‌गार काढला. पिंकी आणि लीला त्याच्याकडे पाहू लागल्या. समशेरचे डोळे चमकू लागले. थोडासा उत्तेजित होऊन त्याने आपल्या डायरीत काही तरी लिहिलं आणि तो टेबलावरच्या चौकोनी कागदाकडे पाहू लागला. कागद बुद्धिबळाच्या पटाच्या शेजारी व्यवस्थित ठेवला होता आणि कागदाच्या चारही कोपऱ्यांवर पेपरवेट ठेवले होते. त्या कागदावर काही तरी कविता लिहिलेली दिसत होती. कागदाला हात न लावता आपल्या शेरलॉकने ती कविता डायरीत जशीच्या तशी उतरवून घेतली. नंतर त्याने ती मोठ्याने वाचली. ती कविता पुढीलप्रमाणे होती-‘दर्पणात दिसते दूरवर आकाश

पहा, पडला आहे छानसा प्रकाश

चरणाऱ्या गाईशेजारी वाजते जोरात वाद्य

छत्तीसगडला पायऱ्या आहेत, पायऱ्या आद्य!’

सगळेच समशेरभोवती गोळा झाले. ‘‘अर्थ काय आहे या कवितेचा?’’सगळ्यांनी विचारलं.समशेर जणू स्वतःशीच बोलत राहिला.‘‘गाय... वाद्य... दर्पण! काय बरं असेल याचा अर्थ?’’

बुद्धिबळाच्या पटाकडे पाहता-पाहता त्याची नजरएकदम चमकू लागली आणि तो उत्तेजित दिसू लागला. त्याला काही तरी सापडलं होतं, वाटतं.

५/ पियानो बुद्धिबळाच्या पटावरून नजरही न हलवता

समशेरने जवळजवळ ओरडून म्हटलं, ‘‘सुनंदाताईऽऽ तू उंच आहेस...’’

‘‘अं?’’

‘‘तू कपाटाकडे जा- पटकन्‌!’’ सुनंदाताईने उडीच मारली आणि ती पुस्तकाच्या कपाटाकडे गेली.

‘‘बघ!... गाईवरचं पुस्तक दिसतंय का तिथे?’’

‘‘गाय? अं... अं! येस्स्‌!... काऊज्‌... आहे, पुस्तक आहे...बाहेर काढू?’’

‘‘नाहीऽ ते पुस्तक नको!... त्याच्या शेजारी..अंऽ... पियानोचं पुस्तक आहे?’’

‘‘पियानो?... तो वाजतो तो?... म्युझिकल इन्स्ट्रूमेंट?... आहे!... तुला कसं रे कळालं न पाहता,समशेर?’’

‘‘काढ ते पुस्तक बाहेर!’’

‘‘काढलं!... पुढे?’’

‘‘पान क्रमांक छत्तीस!... बघ- काय सापडतंय?’’

सुनंदाताईने उत्सुकतेने पानं उलटली. सगळे तिच्याकडे पाहत राहिले.

तिने म्हटलं,‘‘होऽ!... एक कागदाचा तुकडा आहे!’’

‘‘हळूच बाहेर काढ आणि वाच... काय लिहिलंय त्यावर? ’’

‘‘वाचते! पण काही कळत नाहीए!’’

‘‘वाच ना मोठ्याने-’’

तिने ती ओळ वाचली- मोठ्याने. ती अशी होती

६/ आरसा

सगळे चकित झाले. भोवती जमा झाले सुनंदाताईच्या. उत्तेजित दिसू लागले. शोध तर लागला होताच, काही तरी. पण काय, अर्थ काय या ओळीचा?

‘‘काहीच कळत नाही!... अर्थ काय याचा?’’ हरीने विचारलं. बाकीच्यांजवळ उत्तर नव्हतंच. सगळे समशेरकडे पाहू लागले. पण तो कोणाकडेच पाहत नव्हता, दूर पाहत होता. जणू त्याच्या मेंदूत काहीतरी गणित मांडलं जातंय. उत्तर... ते सोडवलं पण जातंय. सुनंदाताईकडे न पाहता तो म्हणाला,‘‘सुनंदाताई!... आपल्या कवितेच्या दोन ओळींचे पहिले दोन शब्द काय आहेत?’’

‘‘दर्पणात पहाऽ-’’

‘‘मग पाहा ना, आरशात!... क्वि्‌क्‌-’’

तिने लगेच आरशाकडे धाव घेतली. कागद आरशासमोर धरला. जे दिसतं ते तिने जसंच्या तसं मोठ्याने वाचलं. ती ओळ अशी होती-‘गाईच्या आणि टेकडीच्या मध्ये मंदिर आहे!’

७/ मंदिर सापडलं...

आणि युरेका! सगळे आश्चर्याने ओरडलेच. पण अजूनही कोडं उलगडलं नव्हतं. पुन्हा गाय, पुन्हा शेतातली टेकडी...काय बरं अर्थ आहे या वाक्याचा? पण आता समशेरने जणू सूत्रं हाती घेतली. तो स्वतःच पुस्तकाच्या कपाटाकडे गेला.

‘‘सुनंदाताई!... गाईचं पुस्तक तर आहेच! आता बघ... टेकडी... टेकड्या... काही दिसतंय?’’

‘‘येस्स्‌!... हिल्स्‌!’’

‘‘गाईच्या आणि टेकडीच्या मध्ये मंदिराचं पुस्तक आहे?... बघ लवकर!’’

‘‘होऽ! टेंपल्स्‌ ऑफ्‌ इंडिया!... मोठं पुस्तक आहे!’’ सुनंदाताईने ते पुस्तक बाहेर काढलं.

तो एक कॅटलॉग होता, अनेक छायाचित्रं असलेला.

‘‘आता, यात कोणतं मंदिर बघायचं?... किती तरी मंदिरांचे फोटो आहेत!... सूर्यमंदिर... सोरटीसोमनाथ...’’ लीला आता एकदम पुढे झाली. ती उत्तेजित होऊन म्हणाली, ‘‘मोहन करमचंद गांधी!. मोहन म्हणजे श्रीकृष्ण?’’

‘‘शाब्बास!’’समशेर ओरडला आणि त्याने श्रीकृष्णाच्या मंदिरांची छायाचित्रं तपासायला सुरुवात केली. ‘‘पुन्हा पायऱ्या छत्तीस!... म्हणजे पान नंबर छत्तीस... अं!.. हे बघा, इथे काही तरी आहे!’’

‘‘काय आहे?... काय सापडलं?’’नंदूभय्याने आणि डॉ.बुद्धिसागर यांनी एकाच वेळेस विचारलं.

समशेर म्हणाला,‘‘इथे काळ्या बॅकग्राऊंडच्या काळ्या रंगावर त्याच रंगाचा छोटासा कागद चिकटवलेला दिसतोय!’’ समशेरने तो कागद हळूच ओढून काढला. देशाला अभिमान वाटेल असा दुर्मिळ आणि मौल्यवान ठेवा म्हणता येईल असे ते पोस्टाचे तिकीट त्या कागदामागून दिसू लागले... आणि सगळे ओरडले,‘‘युरेकाऽ!!’’

८/ खुलासा

सबइन्स्पेक्टर नंदकुमार ऊर्फ नंदूभय्या व डॉ.बुद्धिसागर यांनी ते तिकीट लगेचच ताब्यात घेतलं आणि प्लॅस्टिकच्या पाकिटात ठेवून सील केलं. त्याने बातमी सांगितली की, त्या पोर्तुगीज बदमाशाला त्याच्या सहकाऱ्यासह विमानतळावर पकडलंय. आता, दुर्मिळ तिकीट सरकारच्या ताब्यात आलंय, -नोटेन्शन! आणि होऽ, गोपाळकाका सुखरूप आहेत.

‘‘पण हे तुला समजलं तरी कसं, शेरलॉक?... तू तर पुस्तकाच्या कपाटाकडे पाहतसुद्धा नव्हतास!’’ नंदूभय्याने विचारलं. डॉ. बुद्धिसागरनीसुद्धा विचारणा केली. ते आता आदराने पाहू लागले समशेरकडे.

एखादा जादूगार प्रेक्षकांसमोर जसा ऐटीत उभा राहतो तसा आणि त्या थाटात उभा राहून समशेरने खुलासा करायला सुरुवात केली.

‘‘तो बुद्धिबळाचा डाव!... हा डाव माझ्यात आणि गोपाळकाकांत झाला होता!... मी हरलो होतो!... या डावावर आमची चर्चा झाली होती!... माझ्या चुका त्यांनी दाखवून दिल्या होत्या! हाच डाव नेमका मांडून ठेवल्यामुळे मी ओळखलं की, हा संदेश माझ्यासाठी आहे-’’

‘‘मग?’’

‘‘या बचावपद्धतीचं नाव गायको-पियानो असं आहे!... मी नेहमी हसायचो आणि म्हणायचो की,गाईचा आणि पियानोचा काही संबंध तरी आहे का?... त्या नावावरून मला थोडं समजलं!’’ ‘‘काय?’’

‘‘आणि मग ती कविता मदतीला आली...’’

‘‘ती कशी काय?’’

‘‘त्या चरणाऱ्या गाई आणि वाद्य म्हणजे पियानो! म्हणून आपण पियानोचं पुस्तक कपाटातून बाहेर काढलं... छत्तीसगड हा एक मक्ल्यूफ आहे... म्हणजे पान क्रमांक छत्तीस!... त्यात तो कागद सापडला!...आपण तो आरशातून वाचला... कारण तो उलटा लिहिला होता!... कवितेच्या पहिल्या दोन ओळींतली पहिली अक्षरं आठवा!... ‘दर्पणात पहा’ असाच तो संदेश होता... हो, ना?’

‘‘करेक्ट!...’’

‘‘गाय आणि टेकडी यांच्या मध्ये मंदिर आहे!...हरीमुळे पुस्तकाचं कपाट आणि लीलामुळे श्रीकृष्णाचं मंदिर सापडलं... पुढचं तुम्हाला माहीत आहेच!’’

‘‘वेल्‌ डन्‌ समशेर!... शाब्बास शेरलॉक होम्स्‌!’’ आता मात्र हे उद्‌गार डॉ. बुद्धिसागर यांचे होते. त्यांनी समशेरशी आदराने शेकहँड केलं आणि सगळे कौतुकाने अन्‌ अभिमानाने आपल्या दोस्ताकडे समशेर कुलूपघरेकडे पाहत राहिले. किती आनंद झाला होता त्यांना! आणि त्यांच्या आनंदात तुम्हीही सामील आहात... हो, ना?आता, समशेरला तुम्हाला भेटायचं असेल? त्याचा पत्ता सांगू?

Tags: भारत सासणे कथासमशेर कुलूपघरे बालकुमार story samsher kulupghare bharat sasane balkumar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भारत सासणे,  पुणे
bjsasane@yahoo.co.in

मागील चार दशके भारत सासणे हे मराठीतील आघाडीचे साहित्यिक मानले जात असून, त्यात कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, अनुवाद इत्यादी प्रकारचे लेखन आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके