डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सौराष्ट्रात भेटलेल्या प्रत्येक मतदाराने जीएसटीविषयी नाराजी प्रकट केली, त्याचबरोबर नोटाबंदीचीही आठवण काढत होते. जीएसटीच्या दोषपूर्ण स्वरूपाने व घाई- गडबडीने झालेल्या अंमलबजावणीमुळे छोट्या-मोठ्या सर्व व्यापाऱ्यांना गैरसोईला सामोरे जावे लागले. त्यात प्रत्येक व्यापाऱ्याचे कमी-अधिक नुकसानही झाले. हे काही प्रमाणात टाळता आले असते, अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. पाटीदार व जीएसटी या दोन्ही घटकांमुळेच भाजपच्या जागा कमी होतील, पण भाजपला निसटता विजय मिळेल याला भाजपसमर्थक व भाजपविरोधक दुजोरा देतात; परंतु पाटीदार समाजाचा रोष व जीएसटीविषयी नाराजी पाहता, भाजपविरोधी एक प्रभावी अंडरकरंट अस्तित्वात असण्याची शक्यता राहतेच. परिणामी, भाजप पराभवाच्या छायेतही उभा असल्याचे चिन्ह आहे.  

सीएसडीएस-एबीपीने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केलेल्या पाहणीनुसार भाजप व काँग्रेस दोहोंनाही 43 टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. जागांबाबत त्यांनी भाजपला निसटता विजय बहाल केलेला असला, तरी तो काँग्रेसच्या पारड्यात जाऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गुजरातच्या विधानसभा निवडणूक निकालाची उत्सुकता 18 तारखेपर्यंत टिकून राहील, अशी स्थिती आहे. भाजप पराभूत होऊ शकतो असे वातावरण गेल्या 22 वर्षांत पहिल्यांदा निर्माण झाले आहे. असे वातावरण होण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत. एक- म्हणजे पाटीदार समाजाची बदललेली भूमिका. आणि दोन- जीएसटीच्या दोषपूर्ण अंमलबजावनीमुळे निर्माण झालेली नाराजी.

पाटीदार समाज

ऐंशीच्या दशकात काँग्रेसने खाम (क्षत्रिय, दलित, आदिवासी व मुस्लिम) फॉर्मुला वापरण्यास सुरुवात केली. या काळात एक व्होटबँक म्हणून पाटीदार समाजाने भाजपला साथ देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून पाटीदार समाज भाजपची परंपरागत व्होटबँक राहिलेला आहे. एकूण मतदानात या समाजाचा वाटा 12 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. सत्तर ते ऐंशी मतदारसंघांत त्यांची संख्या निवडणुकीचा निकाल निश्चित करण्याइतपत लक्षणीय आहे. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या निर्वाचित आमदारांपैकी जवळपास एक-तृतीयांश आमदार पाटीदार समाजाचे होते. त्यामुळे भाजपसाठी पाटीदार व्होटबँक महत्त्वाची राहिलेली आहे.

पाटीदार समाज सधन समजला जातो. उद्योग व व्यापारामध्ये तो आघाडीवर आहे. ग्रामीण भागात हा शेतीवर अवलंबून आहे. शेतीचे तुकडीकरण, हवामानबदल आणि नव्वदोत्तर कालखंडात बदललेल्या आर्थिक धोरणांचा शेतीवर विपरीत परिणाम झाला. उत्पादनखर्च वाढत असताना उत्पन्नाला मिळणारा भाव मात्र किफायतशीर राहिलेला नाही. दुसरीकडे जीवन महत्त्वाकांक्षी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अपरिहार्यतेने असंतोष निर्माण झाला. त्यातून देशभरात शेतकऱ्यांची आंदोलने वर्षभरात ठिकठिकाणी झाली. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला जातीय परिमाण प्राप्त होताना दिसत आहे. गुजरातसंदर्भात पाटीदार शेतकरी समाजाचा प्रश्न म्हणून शेतीच्या प्रश्नाकडे पाहताना दिसून आले. भाजप सरकार शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यात अपयशी ठरले, अशी जनभावना आहे. केंद्रात भाजप आल्यापासून स्थिती अधिकच बिघडली, हे पाटीदार शेतकरी निदर्शनास आणून देतात. ते सांगतात- कापसाला भाव यूपीएच्या काळात 1400 रुपये होता, आता तो भाव 750 ते 900 रुपये इतका कमी झाला आहे. भुईमुगाबाबतही अशीच स्थिती आहे. दुसरीकडे खत व मजुरीचे दर वाढले आहेत. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना भाजपला शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीसाठी केंद्राला दोष देता येत असे. राज्यात व केंद्रातही 2014 नंतर भाजप असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बिकट स्थितीची जबाबदारी टाळणे भाजपला मुश्किल झाले आहे.

दुसरीकडे 2015 मध्ये पाटीदार समाजाचे अनामत (आरक्षण) आंदोलन सुरू झाले. त्या वेळी 22 वर्षे वय असणाऱ्या हार्दिक पटेल या युवकाने नेतृत्व केले. भाजपने ते आंदोलन व्यवस्थित हाताळले नाही. हार्दिक पटेलसह पाटीदार युवकांवर देशद्रोहासह इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसी गोळीबारात 14 पाटीदार युवक मारले गेले. पाटीदार महिलांना पोलिसांकडून मारहाण होण्याचे काही प्रकारही घडले. यातून निर्माण झालेला रोष इतका आहे की, त्याचा मतपेटीद्वारे बदला घेण्याची भावना पाटीदार युवकांनी व्यक्त केली. पोलिसांनी पाटीदार महिलांना केलेल्या कथित मारहाणीच्या व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमातून इतरांना पाठवून जातीय अस्मिता टोकदार केली जात असल्याचे निदर्शनास आले. भाजपने व्होटबँक म्हणून आपले हितसंबंध सांभाळणे अपेक्षित असताना शेतमाल भाव, आरक्षणविषयक धोरण आणि पोलिसांकरवी हिंसा यातून विेशासभंग केल्याचा आरोप या समाजाकडून केला जातो. त्यामुळेच भाजपला पराभूत करण्याची जी सामूहिक शपथ सभेअंती हार्दिक पटेलकडून घेतली जाते, तिला लोकांचा मोठा प्रतिसाद दिसून येतो. कच्छ जिल्ह्यातील काही गावांमध्ये ‘भाजपने इथे प्रचार करायला येऊ नये’ अशा आशयाचे फलक लावण्यात आले.

हार्दिक पटेल हा पाटीदार समाजाचे प्रतीक झाला आहे. या समाजात कडवा व लेवा अशा दोन उपजाती आढळतात. हार्दिक पटेल कडवा आहे, त्यामुळे लेवा कसे फुटून निघतील यासाठीचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसतो. त्यामुळे या समाजाची एकसंध व्होटबँक ठेवण्यासाठी हार्दिकने पाटीदारांची गावे पिंजून काढली. ‘आपण पाटीदार आहोत’ हीच आपली खरी ओळख आहे, हा संदेश हार्दिककडून दिला गेला. ग्रामीण भागात तसेच शहरातील त्याच्या सभेला व रोड-शोला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच हार्दिकच्या कथित विवादास्पद सीडी आणून भाजपला लाभ तर होत नाहीच, पण भाजपविरोधी रोष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येते. ‘काँग्रेसला मत द्या’ म्हणण्यापेक्षा ‘भाजपला मत देऊ नका’ असा प्रचार करण्यावर हार्दिकचा भर होता. हार्दिकने काँग्रेस पक्षात प्रवेश केला असता तर पाटीदार व्होटबँकेत फूट पडली असती. तसेच ‘हार्दिक हे काँग्रेसचे प्यादे आहे’ असाही आरोप विरोधकांनी केला असता. त्याने प्रवेश न केल्यामुळे आपण पाटीदार समाजाचे हित पाहणारे आहोत, अशी प्रतिमा हार्दिकला कायम ठेवता आली. भाजप पराभूत झाल्यास त्यात हार्दिकचा वाटा सिंहाचा असेल, यात शंका नाही. याचबरोबर या समाजासाठी धार्मिक अस्मितेपेक्षा जातीय अस्मिता अधिक महत्त्वाची झाली आहे. परिणामी, धार्मिक ध्रुवीकरणाचा फॉर्मुला या वेळी या मतदारांवर फारसा परिणाम करणार नाही, असे दिसते.

गब्बरसिंग टॅक्स

सौराष्ट्रात भेटलेल्या प्रत्येक मतदाराने जीएसटीविषयी नाराजी प्रकट केली. त्याचबरोबर नोटाबंदीचीही आठवण ते काढत होते. जीएसटीच्या दोषपूर्ण स्वरूपात व घाई- गडबडीने झालेल्या अंमलबजावणीमुळे छोट्या-मोठ्या सर्व व्यापाऱ्यांना गैरसोईला सामोरे जावे लागले. त्यात प्रत्येक व्यापाऱ्याचे कमी-अधिक नुकसानही झाले. हे काही प्रमाणात टाळता आले असते, अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. राहुल गांधी यांनी जीएसटीचे केलेले ‘गब्बरसिंग टॅक्स’ हे वर्णन अतिशयोक्ती नाही, हे मतदारांशी बोलताना जाणवले. यामुळे सर्व नाराज भाजपविरोधी मतदान करतीलच याची खात्री नाही, पण काही प्रमाणात भाजपला फटका बसणार, असे चिन्ह आहे.

पाटीदार व जीएसटी या दोन्ही घटकांमुळेच भाजपच्या जागा कमी होतील पण भाजपला निसटता विजय मिळेल, याला भाजप-समर्थक व भाजपविरोधक दुजोरा देतात; परंतु पाटीदार समाजाचा रोष व जीएसटीविषयी नाराजी पाहता, भाजपविरोधी एक प्रभावी अंडरकरंट अस्तित्वात असण्याची शक्यता राहतेच. परिणामी, भाजप पराभवाच्या छायेतही उभा असल्याचे चिन्ह आहे.

Tags: भाऊसाहेब आजबे जीएसटी हार्दिक पटेल गुजरात विधानसभा निवडणूक २०१७ Bhausaheb Ajabe GST Hardik Patel Gujraat Aseembly Election 2017 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भाऊसाहेब आजबे
bhausaheb.ajabe@gmail.com


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके