डिजिटल अर्काईव्ह

अहर्निश धडपडीचा अहंशून्य अहवाल

भाऊंना जाणून घ्यावयाचे असेल तर भाऊंचे अहवाल वाचले पाहिजेत. किती प्रचंड व्याप आणि प्रश्न यात भाऊ गुंतलेले असतात. कोणाची नोकरी, कोणाचे लग्न, कोणाचे आजारपण, कोणाची आर्थिक अडचण या सर्व गोष्टींचे दर्शन भाऊंच्या अहवालातून मिळते, अन् आपली मती कुंठित होते की भाऊ हे सर्व करतात तरी कसे?

शनिवारी पहाटेच दौऱ्यावर निघावे लागणार. सारा दिवस मग वेळ व्हायचा नाही; आणि उद्या पोस्टानं अहवाल टाकला नाही तर वेळेवर कचेरीत पोहोचणार नाही. दिवसभरच्या कामाने थकलो होतो. झोप तर आलीच होती, पण तशाही स्थितीत रात्री 11 ते 1 पर्यंत जागून अहवाल पुरा केला आणि लगेच पोष्टात टाकून मगच झोपलो...

नानासाहेब हे माझे स्नेही आहेत. त्यांचेकडे मी मधून-मधून विश्रांतीसाठी जात असतो. मी येणार हे समजताच गाईचे साजूक तूप त्यांच्या पत्नीने माझ्यासाठी राखून ठेवले. घरातील कोणालाही वाढले नाही. हे मला समजताच माझे डोळे पाणवले....

रोह्याचा वर्ग काल संपला. ठरल्याप्रमाणे आम्ही काहीजण सकाळी मोटारने पुण्याकडे निघालो. वातावरण प्रसन्न होते. गाणी म्हणण्याचा एकमेकांना आग्रह सुरू होता. त्यातल्या त्यात सुधाने गाणे म्हणावे हा सर्वांचा आग्रह. सुधा तयार नव्हती. सर्वांची इच्छा म्हणून मीही तिला आग्रह केला. ती म्हणाली, ‘तुम्ही म्हणा आधी, मग मी म्हणेन.’ शेवटी मलाच प्रथम गाणे म्हणणे भाग पडले. कितीतरी वर्षांनी मी आज गाणे म्हटले.

टॉयफॉईड मधून नुकताच खंडू उठला होता. खूप अशक्तता होती, अंथरुणावर पडून कंटाळला होता. त्याला आज मी मालिश केले. मालिश करता करता त्याला झोप लागली.

फोर्टमध्ये माझे एक स्नेही भेटले. त्यांना कलापथकाचे तिकिट हवे होते. पण तिकिटे दादरला राहिली होती. त्यांना मी देण्याचे कबूल करून लगेच ट्रामने दादरला गेलो आणि ट्रामनेच फोर्टमध्ये परतलो. तिकिट त्यांना दिले. ट्राममध्ये जरूर ती विश्रांतीही मिळाली आणि खर्चही वाचला. शिवाय अधिक तिकीट विक्री करण्यासाठी फिरण्याएवढी हुषारी वाटली....

उद्या अण्णा गावी जाणार म्हणून आज मित्रांनी एकत्र जमण्याचे ठरवले होते. माझे कपडे दुसरीकडे राहिले होते म्हणून मित्राचा सदरा घालूनच घाईघाईने लोकलने निघालो. गर्दीत कोणीतरी माझे पैशाचे पाकीट पळवले. मला अतिशय वाईट वाटले. मित्राच्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून अनिच्छेने मी समारंभात सहभागी झालो प्रायश्चित म्हणून उपवास करावा असे मनात आले. पण मित्रांनी तसे करू दिले नाही. सारा दिवस खिन्नता होती...

लीला दंडवतेने मुलीचा सकाळचा व्यायाम वर्ग मा. हा. मध्येच काढला आहे, तो पहावयास गेलो. सुमारे 25 मुली होत्या. नमस्कार व आसने शिकविली... बापूसाहेब गुप्तेकडे गेलो. कुमुदचा पत्ता टिपून घेतला. शशीची प्रकृती थोडी बरी आहे... महाराष्ट्र मंडळात गेलो. शिवा दामलेच्या आग्रहास्तव त्यांच्या मुलाला कुस्ती शिकविली...

कार्यक्रम संपल्यावर आवाबेनच्या घरी जाण्याचे ठरले होते. आवा मोटारींतून निघाली. ती जागा आहे म्हणाली म्हणून मी त्यात बसलो; पण कोणी तरी अधिक आले म्हणून उतरावे लागले. मी बसण्यापूर्वी जागा आहे ना असे हडसून खडसून विचारले नव्हते. पडल्या फळाची आज्ञा घेऊन बसण्याच्या मोहात पडलो. त्याने चांगले प्रायश्चित पडले. जन्मामध्ये अशी चूक प्रथमच झाली...

उत्तूर येथे अण्णांचा मुक्काम व्हावयाचा होता. तेथे चार वाजल्यापासून अण्णांचा कार्यक्रम सुरू होणार म्हणून तेथे तपूर्वी पोचणे जरूर होते. मोटार 6 वाजता पोचणार होती म्हणून मी अडीच वाजता तसाच निघाली. गडहिंग्लजहून उत्तर 7 मैलच आहे. रस्ता वाटेत काही जागी अतिशय खराब. मी चाराच्या पूर्वी पोचलो...

कुरुंदवाडचे सुरेंद्र आलासे यांनी कुरुंदवाडहून निघतेवेळी साडेतीनशे रुपये दिले असताना (मी त्यांना तशा माझ्या सहीची पावती दिली होती ती त्यांनी आणली होती ती दाखवली.) मी माझ्या रोजनिशीत त्यादिवशीच्या तारखेस फक्त तीनशे रुपयेच कसे लिहून ठेवले वहीत चूक कशी झाली समजेना. माझी यामुळे चमत्कारिक अवस्था झाली. असे कधी झाले नव्हते. या दिवशी रात्री किती तरी वेळ या चुकीमुळे मला झोपच आले नाही. हिशेबाच्या बाबतीत माझ्या हातून घोडचुका होत आल्या आहेत...

प्रधानांकडे गेलो. शहर सेवादल विद्यार्थी समितीस शहरातील कोणीच आले नाही विशेषत: XXX आला नाही. या खेद व्यक्त केला. प्रधान त्याला बोलले. XXX मजकडे आला तो ढसढसा रडतच त्याला वाटले माझी अशी समज की त्याने माझा उपमर्द केला. मला तसे मुळीच वाटले नव्हते. मला एवढेच म्हणायचे होते की पहिली सभा स्वतःच रद्द करणे युक्त नव्हते. विचारून, सल्ला घेऊन ठरवावयास हवे होते. ही चूक XXच्या लक्षात यावी, एवढीच माझी इच्छा होती... XXचे सांत्वन करू शकलो असे वाटते......

निवडणुकीबाबत प्रांतमंडळाची बैठक घेतली असता दलप्रमुखांनी सूचना केली होती की यापुढे कार्यकर्त्यांनी आपल्या गळ्यांतील पिशवीत पक्ष निवडणूक वाङ्मय ठेवावे पण मला असा कटु अनुभव आला आहे की फारच थोडे लोक दलप्रमुखांच्या सूचनेची अंमलबजावणी करतात. नाना, मी, अंबिके, मुंबईस अण्णा रणदिवे याबाबत खबरदारी घेत असतो. सर्वांना अशी खबरदारी का येऊ नये ... एकाही मुलाच्या गळ्यात निळी पिशवी cross-wise वापरली दिसत नाही. सांगली शिबिरात ही पिशवी गणवेषाचा भागच जणू व्हावा म्हणून अंबिकेनी मुद्दाम दोन तीन पिशव्या तयार करवल्या; पण मुलींनी त्या भराभर वापरण्याचे बंद केले. आता तर एकही मुलगी आढळत नाही. तशी पिशवी वापरणे फॅशनच्या आड येत असावे.... दलाची मुलगी म्हणून ओळखण्यास कोणताही मार्ग नाही. शाखेवर काचा मारून जावे. हा नियम पूर्ण लुप्त झाला आहे. म्हणून मी मुलीच्या शाखेवर जाण्याचे सोडले आहे. शाखेवर जाताना नऊवारी साडी वापरणे का जड जावे? आम्हाला काही एवढी साधी गोष्टही करुन दाखवता आली नाही. बॉय स्काउट मुलींनी ती करून दाखवली आहे. पुण्यात कितीतरी बॉब स्काउटच्या मुली नऊवारी साडी नेसून जाताना दिसतात ते काय छान दिसत नाही का?

...तासखेड केंद्रासाठी श्याम काकांना सेवापथक पुस्तिकेची एक प्रत भेट म्हणून नजर केली. श्याम काकांना लिहिता वाचता येत नाही हे बरे नव्हे. काशीनाथ पाटील यांनी त्यांना शिकविण्याची हमी घेतली आहे. श्याम काकासाठी ताबडतोब स्लेट पाटी मागवली. त्यांनी ग म ही दोन अक्षरे काढून दाखवली. म्हणून पुढील भ न ही अक्षरे त्यांच्याकडून काढून या अक्षर त्यांना म लिहून सही करण्याइतकी तयारी प्रत्यक्ष करून घेतली. लोटण पाटलांबद्दल श्याम काकांनी तक्रार केली की, ते हल्ली सिगरेट फार ओढीत असतात. लोटण पाटील आत गेले होते. ते बाहेर आल्यावर आम्ही त्यांना त्यांचे बद्दल काय बोलणे झाले सांगितले; व नंतर त्यांना सुचविले: “रोज तीन सिगरेटवर तुमचे भागेल का? प्रयत्न करून पहा.” ते होय म्हणाले आहेत.......

...अंतुर्लीस सखुबाई, सरुबाच्या घरी गेलो. त्यांना सेवा पुस्तिका नजर केली, पुस्तिका त्यातील त्यांचा फोटो पाहून त्यांना साहजिकच फार आनंद झाला. आम्ही बसलो होतो तेथे सोप्यावर येईनात. खुणेने त्यांनी सुचवले की पुरुष मंडळी असताना मी सोप्यावर कशी येऊ? व मलाच आत या म्हणू लागल्या. मी म्हटले, ‘मी आत येणार नाही. तुम्हीच सोप्यावर आले पाहिजे. इतक्यात त्यांचे यजमानही म्हणाले, ‘येऊ द्यात.’ मग त्या सोप्यावर आल्या. त्यांना बजावले आहे की सरला बरोबर त्यांनी आजूबाजूच्या गावी जाऊन भाषण देण्यास सुरुवात केली पाहिजे अर्थात् स्त्रियांच्या सभेत.

सांगली कँपला व तासखेड केंद्रावर आलेली Xx ही मुलगी दुपारी आपल्या घरी येऊन गेली. घरची अत्यंत गरिबी आहे. तिला मॅट्रिकला बसायाचे आहे म्हणून तिने दहा रुपयांची खाजगी शिकवणी धरली आहे; व या पायी धाकट्या भावाचे शिक्षण बंद ठेवावे लागले आहे. जे विद्यार्थी एकाच शाळेत नीट रीतीने वर्षानुवर्षे शिकले व शाळेत नीट रीतीने पास झाले त्यांना खासगी शिकवणीची आवश्यकता का असावी? तिच्या खासगी शिकवणीपायी भाऊ शिक्षणास मुकला याचे पातक सर्वस्वी शाळेतील सदोष शिक्षणावर नाही का?

...दुपारी सासवडला गेलो. स्टँडवर राजाभाऊ कुलकर्णी भेटले. डॉ. गणपुलेकडे गेलो. पक्ष कचेरीला जागा मिळाली आहे. तालुक्याचा नकाशा कागदावर उतरून घेतला व त्यावर प्रचारगावे टिपली. त्या त्या ठिकाणी कार्यकर्ते किती आहेत याची नोंद केली. मोटार रस्ते कसे गेले आहेत तेही दाखवले व नंतर राजाभाऊचा चार दिवसांचा दौरा आखला...

पा. वा. गाडगीळांची सामाजिक परिषदेच्या पत्रिकेवर सही घेण्यास गेलो. पण गाठ पडली नाही. अत्रेंना फोन केला; पण ते बाहेरगावी गेल्याचे समजले. नवरे रस्त्यावरच भेटले. त्यांची सही घेतली. ना. हिरे व चव्हाण यांना भेटण्यासाठी सेक्रेटरिएटवर गेलो. पण ते बाहेरगावी गेले होते. काका कारखानीस अचानक भेटले; त्यांची सही घेतली. बेडेकरांकडे गेलो. तेथे बराच वेळ बोलण्यात गेला. सुधा व प्रमिला चर्चगेटजवळ नृत्याची प्रॅक्टिस करतात. तिकडे गेले. आज प्रॅक्टिस होऊ शकली नाही. नंदलाल बोस यांचे चित्राचे प्रदर्शन पहावयास गेलो....

भोपाळच्या बेगमसाहेबांनी दिल्लीच्या जुम्मा मशिदीच्या तोलाची प्रचंड मशिद बांधण्याचा उपक्रम केला. पण पुढे द्रव्याभावी तो प्रयत्न अर्धवट सोडावा लागला. एवढ्या मशिदींतील स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे. मशिदीच्या प्रशस्त आवारात पंधरा-वीस शिक्षण वर्ग चालू आहेत. संध्याकाळी गावालगतच्या टेकडीवरील एका देवळात गेलो. देवीपुढे नारळाच्या कच्च्या व शेंडी पसरलेली. ओट्यावर तशाच करवंट्या व इतर केर. ही सारी अनास्था पाहून खेद वाटला. भोपाळच्या प्रचंड मशिदीतील स्वच्छता व येथील एका लहानशा देवळातील घाण पाहून मन उद्विग्न झाले... देवीच्या दर्शनास बरेच लोक येत जात. त्यांपैकी दोन पोक्त गृहस्थांजवळ या अनास्थेबद्दल बोलण्याखेरीज माझ्याच्याने राहवेना. आम्ही ती सारी जागा झाडून काढताना त्यात विड्यांची थोटकेही सापडली - ही आमच्या देवीच्या दर्शनच्छूनी देवीवरील भक्ती व श्रद्धा!!

...राजघाटावर गेलो. रात्रींचे 8-30 वाजले होते. दरवाजास कुलूप पाहून निराशा झाली. पण मी लांबचा मनुष्य आलो आहे असे समजल्यावर कुलूप उघडले व दर्शनाचा लाभ घडला. अनेक आठवणींचे काहूर डोक्यात उठले.

Tags: Senapati Bapat Bhausaheb Ranade S. M. Joshi सेनापती बापट भाऊसाहेब रानडे एस्. एम्. जोशी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी