डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

उपेक्षित घटकांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते भीमराव गस्ती यांनी मे-जून 1995 मध्ये मुंबईत भेटलेल्या माणसांविषयी केलेलं अनुभव कथन…

मुंबईच्या 'तेरे दास होम्स' व 'प्रेरणा संस्थे'ने वेश्या, बालमजूर व देवदासी समस्यांसंबंधी परिसंवाद आयोजित केला होता. त्यामध्ये विचार मांडण्यासाठी मला निमंत्रण दिलेलं होतं. 'तेरे दास होम्स'च्या विद्या आपटे यांनी माझे ‘आक्रोश’ वाचलेलं होतं. ‘आक्रोश’मध्ये देवदासी आणि त्यांच्या समस्यांसंबंधी लिहिले होते, यामुळे त्यांनी मला मुंबई येथे होणाऱ्या परिसंवाद कार्यक्रमाला 'यायला हवे' असा आग्रह केला होता.

गेले चार-पाच वर्षांपासून मनोहर कदमही मुंबईला येण्यासंबंधी सांगत होता. परंतु मुंबईचं दगदगीचं वातावरण मला मानवण्यासारखं नव्हतं, म्हणून तिकडे जाण्याचं टाळत होतो. इकडे देवदासींनी स्वावलंबी व्हावं म्हणून त्यांना कुटिरोद्योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी बेळगाव जिल्ह्यात दोन ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आणि त्यांच्या मुला- मुलींसाठी शाळाही सुरू केल्या होत्या. त्या कार्यातच व्यस्त होऊन गेलो होतो. तर गेल्या वर्षी आमच्या येथील केंद्रांना प्रा.सदानंद वर्दे आणि सुधा वर्दे भेट देऊन गेले होते. त्यांना हे कार्य आवडलं होतं, जाताना ते म्हणाले होते, 'मुंबईला आलास तर भेटण्यासाठी न विसरता ये.' मुंबईला गेल्यानंतर त्यांनी संस्थेला मदतही पाठविली होती. त्यानंतर लगेच थोर साहित्यिक विंदा करंदीकर यांनीही संस्थेला मदत पाठविली होती. विंदांना तर मी पाहिले नव्हते, भेटणे तर दूरच होतं. प्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकर यांच्याकडूनही माझ्या लेखनाला उत्तेजन देणारे व येथील कामासंबंधी कौतुक करणारी पत्रे सतत येत होती. यामुळे मलाही मुंबईची ओढ लागली होती. मुंबईला जाऊन या सर्व मान्यवरांना भेटून यावे असे वाटू लागले. परिसंवादाच्या निमित्ताने हा योग जुळून येत होता. विद्या आपटे यांना मुंबईला येत असल्याचे कळविले.

बाहेरच्या कार्यक्रमांना जायचे असले की, संस्थेतील एकाद्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन जायचो. कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या संस्था दाखवायचो. वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांशी त्यांची ओळख, चर्चा होत असल्यामुळे कार्यकर्त्यांची उमेद वाढते. आपल्या कार्यावर त्यांची निष्ठा वाढते. हा अनुभव डोळ्याने पाहत होतो, यावेळी मुंबईला जाण्यासाठी शारदाबाईला सोबत घेतलं. त्या संस्थेचं बाहेरचं व्याप सांभाळायच्या. आम्ही दोघं मुंबईला गेलो, परिसंवादाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक भागांतून कार्यकर्ते आले होते. ते भाषणं देण्यासाठीच जास्त धडपडत होते. परिसंवादाचा कार्यक्रम दोन दिवस चालला होता. मालाडच्या समुद्र किनारी एका रम्य ठिकाणी कार्यक्रमाचं स्थळ होतं.

कार्यकर्त्यांची व्यवस्था तर खूपच भारदस्त ठेवण्यात आलेली होती. ती व्यवस्था पाहून मला फाय फौंडेशनच्या कार्यक्रमाची आठवण झाली. उपेक्षित वर्गाच्या प्रश्नासंबंधी चर्चा करण्यासाठी व्यवस्था मात्र अलिशान! अशाने कोणाचे प्रश्न सुटणार! माझे मन तिथं रमेना.

कार्यक्रमाच्या ठिकाणी मनोहर कदम भेटण्यासाठी आला. हायसं वाटलं, आम्हाला तो आपल्या घरी घेऊन गेला. तत्पूर्वी दादर येथे त्यानं माझ्या अनुभवकथनांचा कार्यक्र ठेवला होता. अनेक कार्यकर्ते जमले होते. प्रा.पुष्पा भावे याही उपस्थित होत्या. त्यांनीच मला अनेक प्रश्न विचारले. म्हणजे एक प्रकारे त्यांनी माझी मुलाखतच घेतली. देवदासी व गुन्हेगार जमातीचे पुनर्वसन करण्याच्या कार्यात आलेल्या अनुभवांचे मी कथन केलं. उपस्थित असलेल्या कार्यकत्यांनीदेखील वेगवेगळी माहिती विचारली. नंतर प्रा.भावे म्हणाल्या.

"आमच्या मुंबईत बोलणारे कार्यकर्तेच जास्त आहेत. तुमच्यासारखे प्रत्यक्ष कार्य करणारे कार्यकर्ते कमी आहेत."

त्याच ठिकाणी अरुण सर्वगोड याची भेट झाली. माझे 'बेरड' आत्मकथन वाचल्यापासून तो गेल्या अनेक वर्षापासून मला सारखी पत्रे लिहीत होता. परंतु त्याला भेटण्याचा योग आलेला नव्हता. वयाच्या मानाने त्याचे वाचन खूप होतं. तशी वैचारिक पातळीही होती. कार्यक्रम संपल्यानंतर तो आपुलकीनं म्हणाला. 

"तुम्ही दोघेजण आमच्याकडे चला."

परंतु मनोहर कदम आम्हाला सोडण्यास तयार नव्हता, आम्हालादेखील लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी विंदा करंदीकर, विजय तेंडुलकर, प्रा.सदानंद वर्दे यांना भेटायला जायचं होतं. त्यांना भेटण्याची वेळही ठरवून घेतलेली होती. रात्रीचा मुक्काम मनोहर कदम यांचेकडे केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही 'साहित्य सहवास’ कडे गेलो. सोबत मनोहर कदमही होता. 'विंदा’ना भेटायचं होतं. त्यांनी सकाळी नऊ वाजता भेटायला बोलावलं होतं. आम्ही ठीक नऊ वाजता त्यांच्या दारासमोर उभे राहून बेल दावली. दरवाजा उघडला गेला तर आमच्या स्वागताला विंदाच उभे! त्यांनी नुकतीच आंधोळ केली असावी. गडबडीनंच कमरेला फक्त धोतर गुंडाळून बाहेर आले होते. त्यांच्या अंगावर पाणी नितळत होतं. आम्हाला पाहून त्यांनी आपले दोन्ही हात जोडले. त्यांचा चेहरा आनंदानं फुललेला होता. 

त्यांनी नुकतीच आंघोळ केली असावी. गडबडीनंच कमरेला फक्त धोतर गुंडाळून बाहेर आले होते. त्यांच्या अंगावर पाणी नितळत होतं. आम्हाला पाहून त्यांनी आपले दोन्ही हात जोडले. त्यांचा चेहरा आनंदानं फुललेला होता. मी पुढे होऊन त्यांच्या चरणांना स्पर्श करावं म्हणून वाकलो. तर मला थांबवीत ते उद्गारले, 'माझ्या दारी प्रत्यक्ष पांडुरंगच आला. थांबा, अगोदर मीच पाया पडतो.' आणि त्यांनी माझ्या पायावर डोकं ठेवलं. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते. मला अर्थबोधच होईना. मी दिग्मूड होऊन गेलो. विंदा किती थोर, त्यांच्यापुढे मी एक क्षुल्लक माणूस! मला अजून धड बोलताही येत नाही आणि ते माझ्या पाया पडत आहेत. माझं मला लाजल्यासारखं झालं. पुन्हा माझ्या पायांचा मलाच राग आला.

माझे डोळे अश्रूंनी डबडबले. मग भानावर आलो. मीही त्यांना वाकून नमस्कार केला. आनंदाच्या भरात विंदा बोलत होते. मी पुढे होऊन त्यांच्या चरणांना स्पर्श करावं माणून वाकलो. तर मला थांबवीत ते उद्गारले, 'माझ्या दारी प्रत्यक्ष पांडुरंगच आला. थांबा, अगोदर मीच पाया पडतो.' आणि त्यांनी माझ्या पायावर डोकं ठेवलं. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते. मला अर्थबोधच होईना. भी दिग्मूड होऊन गेलो. विंदा किती थोर, त्यांच्यापुढे मी एक क्षुल्लक माणूस! मला अजून धड बोलताही येत नाही आणि ते माझ्या पाया पडत आहेत. माझे मला लाजल्यासारखं झालं. पुन्हा माझ्या पायांचा मलाच राग आला. माझे डोळे अश्रूंनी डबडबले. मग भानावर आलो. मीही त्यांना वाकून नमस्कार केला. आनंदाच्या भरात विंदा बोलत होते.

"अरे भीमराव! भी तुझ्या पाया पडलो नाही. तू करीत असलेल्या कार्याला वंदन केले. तू करीत असलेले कार्य किती मोलाचं आहे, ते तुला समजणार नाही. ते आमच्यासारख्यांनाच समजते. म्हणून हा नमस्कार! तू मला प्रत्यक्ष पांडुरंगासारखाच दिसतो आहेस रे!

मी थिजूनच गेलो होतो. शारदाबाई नि मनोहर कदम आमच्याकडे ‘आ’ वासून बघत होते. विंदांनी माझे हात धरून खुर्चीवर बसविले आणि आपणही समोर बसले. मग ते आपल्या कोकणाकडच्या व कोल्हापूरकडीत जुन्या आठवणी सांगू लागले. लहान मुलांसारखे ते निष्पापपणे बडबडत होते. ते ऐकून माझे कान तृप्त होऊन जात होते. सुमा करंदीकरांनी पोहे केले. आम्हा सर्वांना आणून दिले आणि त्याही जवळ येऊन बसल्या. विंदा पोहे खात आपल्या जीवनातील अनेक घटना सांगत होते. शेवटी म्हणाले,

"आजवर अनेकांना मी थोडेफार दिले. परंतु ते माझं स्वतःचं नव्हतं. दुसन्यांनी जे मला दिलेलं होतं, तेच मी अनेकांना दिलं. या हातांनी घेतलं, दुसऱ्या हातानं देऊन टाकलं. यात कसला आला मोठेपणा? परंतु भीमराव तू करीत असलेल्या कार्याला मात्र मी माझे स्वतःचे पैसे दिले आहेत. माझ्या घामाचे पैसे दिले आहेत. तू चालविलेलं कार्य हे देवकार्यच आहे. या कार्याचे मोल कोणीच करू शकणार नाही. म्हणून या कार्याला माझे स्वतःचे पैसे दिले. थोडेतरी पुण्य मिळेल या आशेने. भीमराव तू खरंच खूप मोठा आहेस रे! "अरे कार्य कसे असले पाहिजे, दऱ्या-खोऱ्यात वाहणाऱ्या निर्मळ झऱ्यासारखे! मगच त्या कार्याला काहीतरी अर्थ आहे. तुझे कार्य असंच निर्मळ झऱ्यासारखें आहे. तुझ्या कार्याला असेच यश मिळत राहो..

ते बोलत होते. माझे कान आणखी काय ऐकणार! जीवनात हा असला अनुभव पहिल्यांदाच अनुभवीत होतो. त्यांनी आपला कवितासंग्रह भेटीदाखल दिला. तो मी माझ्या बॅगेत जपून ठेवला. त्यांच्या चरणांना पुन्हा स्पर्श करून भरल्या मनानं बाहेर पडलो. शारदाबाई थक्क होऊन पाहत होत्या. मनोहर कदमही त्याच नजरेनं माझ्याकडे पाहत होता. तेथून आम्ही विजय तेंडुलकर यांच्याकडे गेलो. त्यांनीही आस्थेने चौकशी केली. त्यांच्याजवळ अरुण साधू बसले होते. ते हसत म्हणाले.

“भीमराव तुझे ‘आक्रोश' आवडलं, बरं का"
तेंडुलकर माझ्या पाठीवर थोपटत सहजपणे बोलून गेले.

"परंतु भीमराव तुझ्यातील कार्यकर्ता तसाच जागता ठेव. त्या कार्यकर्त्यांची लोकांना आवश्यकता आहे.”

त्यांनी आपले 'रामप्रहर' हे पुस्तक दिले. तेथून उठल्यानंतर बांद्रयाला प्रा.सदानंद वर्दे यांना भेटण्यासाठी गेलो. प्रा.वर्दे कामानिमित्त बाहेर गेले होते. सुधाताईंनी आम्हाला जेवणंच वाढलं. सुधाताईंनी संस्थेतील देवदासींची चौकशी केली. ज्यांना ज्यांना भेटायचं होतं, त्यांना त्यांना भेटून झालं. मन प्रसन्न होऊन गेलं होतं. आता अरुण सर्वगोडकडे जाण्यास हरकत नाही म्हणत शारदाबाईंकडे पाहिलं. त्यांच्याही नजरेत तेच दिसलं. अरुण सर्वगोड कुर्ला येथे राहत होता. मनोहर कदमही त्याच परिसरात राहयला होता. त्याला आम्ही विनंती केली. आम्हाला सर्वगोडकडे सोडून तो आपल्या घरी निघून गेला. सर्वगोडचे सासरे रेल्वेखात्यात होते. ते रेल्वे कॉर्टर्समध्ये राहत होते. त्यांच्याकडेच सर्वगोड राहण्यास होता. आम्ही त्यांच्याकडे मुक्काम केला. त्याच्या सासू-सासऱ्यांची आपुलकीची वागणूक, आग्रह यामध्ये दोन दिवस गेले. मुंबईत येऊन पाच दिवस होऊन गेले होते, परंतु मला मुंबईचे वातावरण मानवले नाही. सर्दी, पडसे झाले. पुन्हा पोटाचा त्रास सुरू झाला. यामुळे बाहेर फिरणे बंद झाले.

अशक्तपणा वाढला. शारदाबाईंनी मला लहान मुलासारखे जपले. मुंबईहून बेळगावला घेऊन आल्या. त्या घरापर्यंत येते म्हणाल्या. परंतु 'कमळीचं तुम्हाला विनाकारण बोलणं नको' म्हणत रिक्षाने एकटाच घरी आलो. रिक्षा घरासमोर येऊन थांबली. रिक्षातून खाली उतरलो. सुटकेस उचलण्याचीही शक्ती नव्हती. तसाच घरात शिरलो आणि पलंगावर आडवा झालो. तशी कमळीची वटवट सुरू झाली. "आता तुझी सेवा कोण करणार? रांडांना घेऊन फिरतोस. बाहेर मजा करतूस आनकी घरी आल्यावर तुला रोग येतूया! तू मरत का नाहीस?"

छताकडे सुन्नपणे पाहत राहिलो. काय बोलणार? बोलले की तिचा राग पुन्हा उफाळून येणार गप्पच पडून राहणे पसंत केलं. माझे बाहेर फिरणे तिला पसंत नव्हतं. काही वेळानंतर संस्थेतील शिपाई कानडे आला. त्याला 'डॉक्टरांना बोलावून ये' म्हणून सांगितले. डॉक्टरांनी तपासून इंजेक्शन, गोळ्या दिल्या. कानडेने चहा करून दिला, गोळ्या घेऊन पलंगावर तसाच पडून राहिलो. माझी काळजी घेणारी नीता सासरी गेली होती. तिची आठवण प्रकर्षानं झाली. 'साधना' साप्ताहिकाचे संपादक प्रा.ग.प्र.प्रधान यांच्याकडून पत्र आले.

"बेळगावला 8 जानेवारी रोजी येणार आहे. त्यावेळी तुमच्या संस्थेला भेट देण्यासाठी येईन.” ठरलेल्या दिवशी प्रा.प्रधान, गारगोटी मौनी विद्यापीठाच्या डॉ.लीला पाटील, बेळगावचे कामगार नेते राम आपटे, तरुण भारतचे पत्रकार अशोक याळगी हे आले. वेशीजवळ असलेल्या शाळेतील छोट्या मुला मुलींनी हातात फलक घेऊन त्यांचे स्वागत केले. बालवाडीत दीडशेहून जास्त लहान मुले मुली होत्या. त्या मुलांनी प्रा.प्रधान, डॉ.लीला पाटील यांना फुले दिली. बालवाडीसमोर पटांगण होतं. त्यामध्ये मुले-मुली खेळायची. परंतु त्या जागेवर कुळवाड्यांनी मुद्दामच मोठमोठी दगडं आणून टाकली होती, त्या दगडांवर मोठमोठे काटे असलेल्या बाभळीच्या ढिगासारख्या फांद्या आणून टाकल्या होत्या. त्यामुळे मुलांना बालवाडीत जाताना-येताना खूप त्रास होत असायचा. प्रा.प्रधान, डॉ.लीला पाटील यांनी ते पाहिले. माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत त्यांनी विचारले, मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी असे काटे कोणी पसरविले आहेत?"

वेशीजवळ असलेल्या कुळवाडधाच्या घरातील माणसं बाहेर येऊन थांबली होती. ती आमच्याकडेच पाहत होती. आता प्रा.प्रधान यांना उत्तरे दिले तर, कुळवाडी ते ऐकणार आणि ते भांडण काढणार हे ठरलेलंच होतं. मी उत्तर देण्याचे टाळलं. काही वेळानं त्यांना घेऊन देवदासींच्या उद्योग केंद्राकडे जाण्यास निघालो. बालवाडीपासून उद्योग केंद्र थोड्याच अंतरावर होतं. जाताना प्रा.प्रधान बाभळीच्या फांद्यासंबंधी पुन्हा-पुन्हा खोदून विचारू लागले. पत्रकार अशोक याळगी यांच्याकडे हात करीत त्यांना म्हणालो, आपल्याला यासंबंधी याळगीसाहेबच सांगतील, त्यांनाच आपण विचारलेलं बरं." 

तर अशोक याळगी ओठातच हसले. ते बोलले नाहीत. आता मलाच उत्तर देण भाग होतं.

"साहेब, आमच्या सीमा भागात भाषेच्या प्रश्राबरोबरच जातीभेदाच्याही समस्या आहेत. आम्ही मागासवर्गीय घरात कानडी बोलतो, शिकतो मात्र मराठी. परंतु आम्हाला कोण 'मराठी' म्हणत नाही. पुन्हा आम्ही खालच्या जातीचे. यामुळे गावातील कुळवाडी आम्हा लोकांना नेहमी येनकेन निमित्त पुढे करून त्रास देतात. आमच्या मुला-मुलींसाठी आम्ही वेगळी शाळा सुरू केली आहे म्हणून त्यांनी मुलांच्या जायच्या- यायच्या वाटेवर व खेळण्याच्या जागेत बाभळीचे काटे आणून टाकले आहेत."

प्रा. प्रधान गंभीर झाले. नंतर राम आपटेंना म्हणाले. "छे छे! असे प्रकार व्हायला नकोतच, तुम्ही बेळगाव येथील कार्यकर्त्यांना यासंबंधी सांगाच!"
राम आपटे माझ्याकडे पाहत फक्त हसले. तोपर्यंत उद्योग केंद्र जवळ आले. केंद्रातील देवदासी मुलींनी त्यांची आरती ओवाळली. उद्योगकेंद्रात असलेल्या देवदासी मुली, महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा.प्रधान यांनी केले. हस्तकलेचे वेगवेगळे नमुने पाहून डॉ.लीला पाटील कौतुकाने म्हणाल्या, "डॉ.गस्तीजी, अशा संस्था अनेक ठिकाणी व्हायला हव्यात. तुमची ही संस्था मला खूपच आवडली. हे, एक देवकार्य आहे."

संपूर्ण केंद्र त्यांनी फिरून पाहिले. केंद्रात असलेल्या महिलांना त्यांनी माहिती विचारली. नंतर मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. काही देवदासींनी लोकगीते गायली. दोन-अडीच तास प्रा.प्रधान कार्यक्रमात रमले. प्रा.प्रधान आमच्या चळवळीचे तसे मार्गदर्शक होते. नानासाहेब गोरे यांच्या निधनानंतर मला काही दिवस "पोरका झालो असे होऊन गेले होते. परंतु प्रधान वेळोवेळी पत्र लिहून आमच्या चळवळीसंबंधी आस्थेपूर्वक चौकशी करू लागले. चळवळीला मार्गदर्शन करू लागते. यामुळे त्यांचा मोठा आधार वाटू लागला. ते एक थोर विचारवंत होते. त्यांचे पाय आमच्या संस्थेला लागले होते. एक कृतज्ञता म्हणून त्यांना शाल व श्रीफळ दिले. माझ्या पाठीवर मायेने हात फिरवीत ते म्हणाले.

"एका जातीवंत व हाडाच्या कार्यकर्त्याकडून माझा सन्मान होतो आहे, हा प्रसंग मी केव्हाही विसरणार नाही!" ती शाल त्यांनी खुशीतच आपल्या खांद्यावर घेतली. कार्यक्रमाला अनेक भागांतून चळवळीचे कार्यकर्ते आले होते. त्या कार्यकर्त्यांची व माझ्या आई-वडिलांची त्यांनी आस्थेपूर्वक चौकशी केली. जातेवेळी ते पुन्हा म्हणाले, “भीमराव, तू पुण्याला आलास की घरी ये." ते गाडीत बसले. त्यांच्या खांद्यावर ती शाल उठून दिसत होती. ती शाल हाताच्या बोटाने धरून, पुन्हा बाहेर काढत म्हणाले, "पुण्यातील आमच्या कार्यकत्यांना ही शाल दाखवीन. आणि त्यांना सांगेन हे माझ्या भीमरावने दिले आहे म्हणून!"

गाडी सुरू झाली. त्यांनी पुन्हा पुन्हा हात उंचावले. माझ्या डोळ्यांत पाणी भरते होते. जुन्या जमान्यातील माणसंच वेगळी! त्यांचं मनही तसंच मोठं आभाळाएवढं. त्यात ते सगळ्यांनाच सामावून घेत कोणतेही भेदभाव न मानता!

जाणाऱ्या कारकडे पाहत माझे हात आपोआपच जुळले.

Tags: भीमराव गस्टी आठवणी मुंबईकर मुंबईतील लोक मुंबई People in Mumbai Bhimrao Gasti Mumbai City Mumbai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके