डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

‘युगाणी’ हा आंतरराष्ट्रीय बालक वर्षाच्या अखेरच्या दिवशी साधना प्रकाशनाने मुलांना दिलेला वैशिष्ट्यपूर्व उपहार आहे.

आन्तरराष्ट्रीय बालक वर्षाचा अखेरचा दिवस एकतीस डिसेंबर एकूणऐंशी.

वेळ सायंकाळची. 

नूतन मराठी विद्यालय प्रशालेचे सभागृह. 

मोजक्या मंडळींच्या हजेरीत ‘युगाणी’ ह्या विज्ञानाधारित बालगीतांच्या पुस्तकाचे प्रकाशन. 

डॉ. आनंद यादव आणि कविवर्य बा. भ. बोरकर कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे आहेत. 

श्री. विश्वनाथ खैरे युगाण्यांमागील आपली प्रेरणा आणि अनुभव कथन करतात. 

एक युगाणे सुस्वरपणे सादर केले जाते. स्वरांकित झालेल्या युगाण्याला त्यामुळे एक देखणेपणा येतो.

डॉ. आनंद यादव ह्या नव्या प्रयोगाचे स्वागत करतात. पण त्याचबरोबर आपल्या मनातील शंकाही बोलून दाखवतात. योग्य दिशेची ही वाटचाल आहे, पण या प्रयोगाला मान्यता मिळण्याचा समय आला आहे असे दिसत नाही, असे म्हणतात. 

कविवर्य बोरकरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झालेले असते. 

बोरकर हे मराठी भाषेतले एक ज्येष्ठ कवी. त्यामुळे या प्रयोगाबद्दल त्यांचा अभिप्राय जाणून घेण्याची सर्वांनाच खूप उत्सुकता. 

आनंद यादवांनी योग्य दिशेची वाटचाल म्हणून पुस्तकाची केलेली प्रशस्ती बोरकर मान्य करतात. या पुस्तकाच्या निमित्ताने आपले चिंतन ते करतात.

विज्ञानासाठी प्रश्न आवश्यक असतात. पण, आजच्या भारतीय नागरिकांच्या मनात बैचेन करणारे प्रश्न क्वचितच निर्माण होतात. प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेतांनाच विज्ञानाची वाटचाल सुरू होते.

आज सर्वसामान्य भारतीयांची विज्ञानबुद्धी जागृतच होत नाही. 

 भारतात स्टोव्ह ही वस्तू आल्याला दशके लोटली, पण अद्याप स्टोव्हने भाजून बायका मेल्याच्या बातम्या येतात, याचा अर्थ काय? 

भारतीयांनी आधुनिक विज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या सुखसाधनांचे स्वागत केले असले, तरी विज्ञानाचे स्वागत केले आहे, असे दिसत नाही. विज्ञानाशी सुसंवाद इथे साधला गेलेला नाही. 

काव्य म्हणजे कवी आणि रसिक यांच्यातील हृदयसंवाद. संवादासाठी समान भाषा असावी लागते. विषयाबाबत उत्सुकता हवी. 

माहिती देण्यासाठी व ध्यानी ठेवण्यासाठी कवितेचा उपयोग करणे वेगळे आणि काव्य वेगळे. छंदवृत्तीचा वापर करून विविध विषयांची माहिती ध्यानी ठेवण्याचे प्रयोग इथे पूर्वी झालेले आहेत. पण कल्पना मनात मुरून त्यांना भावरुप आले म्हणजे त्यातून काव्याची निर्मिती होते. 

कुसूमाग्रजांचे ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ हो एका अर्थी विज्ञान कविता आहे. पण अनुभूतीत रसायन झाल्यावर ते गीत उमलले आहे. माहितीपर कविता आणि कुसुमाग्रजांची कविता यांची कोटीच वेगळी आहे. माणसाच्या पंचप्राणांचे पंचमृत म्हणजे काव्य. ट्या कोटीची वैज्ञानिक कविता जन्माला येण्याची चाहूल खैरे यांच्या युगाण्यातून लागू शकते. 

प्रतिभेच्या रसायनात विज्ञान मुरले पाहिजे. माहिती अनुभूतीत परिणत झाली पाहिजे. इन्फरमेशनचे व्यापार एक्सपिरीयन्समध्ये होते, तेव्हाच काव्य उमलते. 

 अतींद्रिय इंद्रियांच्या कक्षेत आणणे ही काव्याची प्रतिज्ञा आहे. अध्यात्म, नीती, मूल्ये ज्याप्रमाणे काव्यविषय

झाली, त्याप्रमाणे विज्ञानही काव्यविषय होऊ शकेल. एका पोर्तुगीज कवीने ‘एच. टु. ओ.’ (पाणी) हाही मी काव्यविषय केला आहे. आणि समर्थपणे केला आहे.

कधीकधी मनाला एक शंका चाटून जाते. अद्भूताने भारावून जाण्याची आमची शक्ती तर संपूष्टात नाही आली? आम्हाला अद्भुत झेपत नाही, म्हणून नवे जगच मुलांच्यापुढे करण्याचे टाळतो की, काय? अमेरिकेतील एक समृद्ध म्युझियम पाहिल्यानंतर प्रकर्षाने ही गोष्ट मला जाणवली. 

वडीलधारी मंडळी मुलांचे कुतूहल विज्ञानाच्या साह्याने शमवण्याऐवजी ती खुडून टाकण्याचा अघोरी उपाय वापरतात. अनेक उमलणाऱ्या प्रतिभा इथे पायदळी तुडवल्या जातात. 

युगाणी मुलांचे विज्ञानविषयक कुतूहल चाळवू शकेल आणि ह्या चाळवलेल्या कुतूहलाला योग्य दाद मिळाली तर अस्सल कसाचे विज्ञान काव्य जन्माला असल्यावाचून राहाणार नाही. 

विज्ञानात नित्य नूतनता असल्याने ते रमणीय आहे आणि रमणीयता आणि काव्य यांच्यांत अतूट असे नाते आहे. अस्ट्रो फिजिक्ससारखी विज्ञानाची नवनवी दालने महाकाव्यसदृश आहेत. त्यातील ज्ञानाचे अनुभवात रूपान्तर झाले की, नवी विज्ञान काव्यधारा वाहू लागेल.

विज्ञान रोमहर्षण आहे. त्यात अपरंपार वैभव आहे. विविध प्रतिमांनी ते जीवनात उतरले की, काव्यरूपात त्याची अभिव्यक्ती होऊ लागेल.

श्री. विश्वनाथ खैरे यांना त्यांच्या 'युगाणी’च्या प्रयोगाबद्दल धन्यवाद दिले.

‘युगाणी’ हा आंतरराष्ट्रीय बालक वर्षाच्या अखेरच्या दिवशी साधना प्रकाशनाने मुलांना दिलेला वैशिष्ट्यपूर्व उपहार आहे.

Tags: आन्तरराष्ट्रीय बालक वर्ष युगाणी: योग्य दिशेची वाटचाल #Weekly sadhana International Children's Year Yugani: Qualified Dishechi Watchal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके