डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक चळवळींचा दस्तऐवज ठरावीत अशी ‘पायपीट समाजवादासाठी’- पन्नालाल सुराणा,  ‘लढे आणि तिढे’- पुष्पा भावे आणि ‘फकिरीचे वैभव’- विजय यशवंत विल्हेकर ही तीन आत्मकथनं मनोविकास प्रकाशनाकडून सप्टेंबर 2020 मध्ये वाचकांच्या हाती सोपवली जात आहेत. त्यानिमित्ताने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांच्या ‘लढे आणि तिढे- चिकित्सक गप्पा... पुष्पाबाईंशी’ या मुलाखतस्वरूपाच्या आत्मकथनातील कौटुंबिक पार्श्वभूमीविषयीचा हा संपादित अंश...  

प्रश्न - तुमच्या घरातलं वातावरण कसं होतं? देवधर्म, कुळाचार वगैरे काही चालायचं का घरात? तुमच्या आई- माई, तुमचे वडील यांच्याबद्दल?

- आमचं ‘सरकार’ कुटुंब मुंबईचंच. पुढे मी सामाजिक कामात पडल्यावर माझा गावांशी संबंध आला; पण तसे आम्ही शहरवासीच. आमच्या घरात थोडं विचित्र होतं. आमचे आजोबा गजानन सरकार हे प्रार्थना समाजाचे  कट्टर पुरस्कर्ते होते. सरकारांचं घर देवधर्म मानणारं होतं. माहिमला सरकारांचा मोठा वाडा होता. माझ्या वडिलांच्या काकांना मूलबाळ नव्हतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने तो वाडा माझ्या वडिलांचा- प्रभाकर सरकार यांचाच होता. त्यांना आम्ही पप्पा म्हणत असू; पण ज्या घरात पूजा-अर्चा होते, तिथे मी राहणार नाही, असं माझ्या आजोबांनी ठरवलं आणि ते आपल्या बायको-मुलांसोबत दोन खोल्यांच्या घरात राहायला निघून गेले. दुर्दैवाने लवकरच त्यांचा हृदयविकाराने अकाली मृत्यू झाला. पण माझी आजी खूप खंबीर विचारांची होती. ती म्हणाली की- माझ्या नवऱ्याने जे घर काही तत्त्वांसाठी सोडलं, तिथे मी माझ्यावर वाईट वेळ आली म्हणून परत जाणार नाही. तिने कष्टाने मुलं वाढवली, पण मुलं एकापाठोपाठ एक गेली. शेवटी वडील आणि त्यांची बहीण असे दोघंच राहिले. एकट्या आजीनेच त्यांना वाढवलं. आजीचं नाव सरस्वती. पुढे कधी तरी प्रार्थना समाजाच्या ‘सुबोध’ पत्रिकेत ‘सरस्वती सरकार यांचं भाषण झालं’ असा कुठे तरी बारीकसा संदर्भ मिळाला. पुढे यातल्या एकाही माणसाने पप्पांकडे वळूनही पाहिलं नाही. त्यांना कोणीही शिक्षणाला किंवा पुढे जायला मदत केली नाही. ते त्या वेळचे मॅट्रिक झाले होते. त्यानंतर त्यांना लगेच नोकरी लागली.

माझी आई पूर्वाश्रमीची रेडकर, नंतर सुनंदा सरकार. आई खूप लहान असतानाच तिचे वडील गेले. त्यानंतर आईच्या काकांनी- आम्ही त्यांना अण्णा म्हणत असू, त्यांनी- आईला आणि आजीला मुंबईला आणलं. कोकणात एका विधवेने एक लहान मूल घेऊन एकटीनंच राहणं त्या वेळी अशक्यच होतं. त्यांना घरी आणल्याने अण्णा आणि त्यांची पत्नी यांच्यात ताण निर्माण झाला. पण अण्णा अन्‌ पप्पा यांनी एकत्र राहायचं ठरवलं आणि अण्णा शेवटपर्यंत आमच्याबरोबर राहिले. माझा भाऊ रमेश हा दोन्ही घरांत खूप वर्षांनी झालेला मुलगा. त्यामुळे अण्णांचा आणि आईचा खूप जीव होता दादावर. मुलांच्या शिक्षणात अडथळा येईल म्हणून सारखं आजोळी जाणं आईला पसंत नव्हतं. म्हणून मग सगळ्यांनी एकत्र राहायचं ठरलं. याच दादरच्या घरांत तेव्हापासून राहायला लागलो आम्ही सगळे. त्यामुळे चार पालक आणि तीन मुलं असं होतं आमचं कुटुंब. आमच्या पालकांचं कडक लक्ष असायचं आमच्यावर. अण्णा अत्यंत कडक आणि शिस्तबद्ध होते. ते आम्हाला मोसमातली सगळी फळं खाऊ घालायचे. ते ‘मनोरंजन मंडळा’शी निगडित होते. ‘दामोदर हॉल’मध्ये ते तबला वाजवायला जायचे. त्यांना हृदयविकाराचं दुखणं होतं. त्यातच ते गेले. अण्णा गेले तेव्हा मी शाळेत होते आणि दादा दहावीत होता.

प्रश्न - तुमच्या वडिलांना वाचनाची आवड होती ना?

- हो, हो! त्यांचं वाचन फार दांडगं होतं. लहानपणी ते आम्हाला खूप छान संस्कृत शिकवत. लग्न झाल्यावर त्यांनी आईला मासिकं लावून दिली होती. आईला पप्पांनी पाडव्याची भेट म्हणून दिलेला कवी यशवंत यांचा काव्यसंग्रह आत्ता-आत्तापर्यंत होता माझ्याकडे. दिवाळीला नात्यातल्या सगळ्या मुलांना अशी पुस्तकं देण्याचा पप्पांचा नियमच होता. पुस्तकाबरोबर एक फुलबाजीची पेटीही भेट मिळायची! पुस्तकांना पैसे मिळतील, कपड्यांना नाही- असं पप्पांचं सांगणं असायचं. जेव्हा मी टिळक ब्रिज एकटीने ओलांडायला शिकले, तेव्हा पप्पांनी मला रानडे रोडवरच्या ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’चं आणि आताच्या विसावा हॉटेलसमोर ‘डेव्हिड ससून लायब्ररी’ होती, तिचं सभासदत्व घेऊन दिलं. या दोन्ही लायब्रऱ्यांत जायचं, एक इंग्रजी आणि एक मराठी पुस्तक घ्यायचं आणि चालत परत यायचं, अशी सवयच लागली होती. 

प्रश्न - तुमचे आजोबा प्रार्थनासमाजी होते आणि तुमच्या वडिलांना त्याबद्दल नावड होती. हे कसं काय? याचा घरात काही परिणाम? 

- आजोबा गेले. काकाही गेले. घरात काकीचा प्रभाव होता आणि असं बोललं जात होतं की, काकांवर विषप्रयोग झाला आणि काकी कमरेला किल्ल्या लावून रडायला बसली! या सगळ्या परिस्थितीतून पप्पांच्या मनात एक आकस तयार झाला. काकीने नंतर पप्पांना बोलावून सांगितलं की, तू हे देव घेऊन जा. पप्पांनी सांगितलं की, मी यातलं काही नेणार नाही; पण तुझ्या वाटचं गणपती, नवरात्र करेन. त्यामुळे पप्पा यात मानसिक दृष्ट्याही अडकले. आम्ही पप्पांना कित्येक वेळा विचारलं की, तुम्ही यासाठी तयारच कसे झालात? माझ्या आईचा उपास-तापासावर विश्वास नव्हता. आम्ही त्यांना म्हणत असू की, तेव्हा देवाचं केलंत ते ठीक; पण आता कशाला ते सगळं चालू ठेवता? पण दादाचं लग्न झालं आणि ते घटस्फोटित मुलीशी वगैरे... असं सगळं विचित्रच घडलं आणि त्या परिस्थितीत आई-पप्पा त्या देवाधर्मात गुंतत गेले. 

प्रश्न - तुमचे दादा- रमेशचंद्र सरकार- पुढे थिऑसॉफिकल सोसायटीच्या कामात पूर्ण वेळ गुंतलेले. लहानपणापासूनच त्यांचा कल तिकडे होता का? भाऊ आणि तुम्ही दोघी बहिणी... तुम्हा तिघा भावंडांमध्ये समान चर्चेचे कोणते विषय असत?

- रमेशदादा माझ्याहून सात वर्षांनी मोठा होता आणि बहीण तिलोत्तमा पाच वर्षांनी मोठी होती. ती इंग्रजीत एम.ए. करत होती. वाचनाची आवड हा आमच्यातला एक समान धागा होता. त्यामुळे साहित्यविषयक चर्चा आपोआप होत असत आमच्यात. वयात अंतर असूनही एका विशिष्ट वयात आम्हा तिघांचं एकत्र असं काही छान सुरू असायचं. आम्हा भावंडांची गँगच होती म्हण ना! त्यात आम्हा तिघांचे मित्र-मैत्रिणीही असत. माझी बालपणापासूनची मैत्रीण सरोज म्हणायची की, तिलाही रमेशसारखा दादा मिळाला. माझी दुसरी मैत्रीण सुधा हिचं आणि दादाचंही छान जमायचं. सरोजची मोठी बहीण माझ्या ताईच्या वर्गात होती. दादा वडिलांचा लाडका होता. ताई आमच्या आजीची लाडकी होती. मी भावंडांत सर्वांत धाकटी असल्याने माझे लाड जास्त झाले. ताई महत्त्वाकांक्षी होती. ती रेटून अभ्यास करत असे. आपण दिसायला आकर्षक नाही तर अभ्यासात तरी पुढे असावं, असा विचार तिच्या मनाच्या तळाशी कुठे तरी असावा. मी आणि दादा ताईसारखे महत्त्वाकांक्षी नव्हतो. त्या वेळी आमच्या घरात चणचणच असायची. आमचं कुटुंब तसं मध्यमवर्गीय होतं.

दादा खूप हुशार होता. पुढे दादाने अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास सुरू केला. नंतर तो आपल्या वेगळ्या जगातच असायचा. कधी माझ्या आईने त्याला  माझ्या वेगवेगळ्या उपक्रमांविषयी काही सांगितलं तरी तो फक्त ऐकून घ्यायचा. तो मलाही कधी काही म्हणत नसे. डाव्या चळवळीला मात्र त्याचा विरोध होता. पुढे आणीबाणीलाही त्याने विरोध केला होता. राघवन अय्यर नावाचा आमच्याकडे येणारा एक अत्यंत बुद्धिमान ‘ऱ्होड्‌स स्कॉलर’ (Rhodes scholar)  होता. तो नंतर ऑक्सफर्डला गेला. तो आणि त्याचं सगळं कुटुंबच थिऑसॉफिस्ट  होतं. त्याचा प्रभाव दादावर पडला. बीएला असताना त्याला टाटा कंपनीकडून नोकरीसाठी बोलावणं आलं होतं; पण तोपर्यंत थिऑसॉफीला पूर्ण वेळ द्यायचा, हे त्याचं जवळजवळ निश्चित झालं होतं. त्याने टाटा कंपनीला नकार दिला! थिऑसॉफीचा अर्थ आहे आत्मविद्या. व्यक्ती ही ईश्वराचाच आविष्कार असल्याने स्वत:चं ज्ञान- आत्मज्ञान म्हणजेच ईश्वराचं ज्ञान. सर्व भूतमात्र हा ईश्वराचाच आविष्कार असल्याने स्वाभाविकपणेच त्यात जात, धर्म, लिंग, वर्ण या भेदांपलीकडे जाऊन बंधुभाव असतो, असं थिऑसॉफी मानते. या विचाराकडे दादा ओढला गेला. चणचणीचा अनुभव आयुष्यभर घेतलेल्या आमच्या वडिलांना त्याचं हे कार्यकर्ता होणं पटलेलं नव्हतं. नंतर, त्याच्या लग्नाचा निर्णयही आई-वडिलांना पटला नाही. माझी एक मावशी होती. आईची मामेबहीण. फार गोड व्यक्तिमत्त्वाची होती ती. तिचा दादावर फार जीव होता. एकदा ती झोपेतून उठून देवाला जाब विचारत होती की, आमचा रमेश इतका आध्यात्मिक आहे, तर त्याच्या वाट्याला सुख का येऊ नये... वगैरे.  

प्रश्न - तुमची शाळा, कॉलेज, तेव्हाचे मित्र-मैत्रिणी... मुंबईतलं, माटुंगा-दादरमधलं, हिंदू कॉलनीतलं त्या वेळचं वातावरण याविषयी काय सांगाल? 

- छान वातावरण होतं त्या वेळी. आम्ही दादर पूर्वेला राहायचो, पण दादर पश्चिमेला येणं-जाणं असायचंच. पश्चिमेकडचं दादर सांस्कृतिक दृष्ट्या सजग होतं. पूर्व-पश्चिम ये-जा टिळक ब्रिजवरून व्हायची. तेव्हा फार वाहनं नसायची. टिळक ब्रिजवर चालताना सहजच अत्रे दिसायचे. साने गुरुजी गेले, ही बातमी अत्रेंनीच मला टिळक ब्रिजवर भेटले तेव्हा दिली होती. आंबेडकरांचे सहकारी दादासाहेब गायकवाड पपांच्या ओळखीचे होते. तेव्हा, आंबेडकर हयात असतानाच त्यांची जयंती साजरी व्हायला सुरुवात झाली होती. दादासाहेबांनी एकदा मला आंबेडकर जयंतीच्या एका कार्यक्रमात आंबेडकरांवर बोलण्यासाठी बोलावल्याचं आठवतंय. तेव्हा मी चौथीत होते. त्यांनी मला चक्क उचलूनच स्टेजवर ठेवलं आणि बोलायला सांगितलं. आंबेडकरांचा काळ तेव्हा सुरू झालेला होता. 

सरोजही (देशपांडे- पूर्वाश्रमीची सोहोनी) हिंदू कॉलनीतच राहायची. खूप हुशार होती. तिच्या घरी सगळ्यांनीच आमची मैत्री स्वीकारली होती असं नाही. कारण ते सोहोनी आणि आम्ही सरकार! सरोजची आई देवभोळी होती. सोवळंओवळं वगैरे पाळायची. तिचं मात्र माझ्यावर फार प्रेम होतं. आमची शाळाही एक- किंग जॉर्ज. शाळेतल्या शिक्षक-शिक्षिकांकडून विद्यार्थ्यांशी वागताना जातिभेद कधीही होत नसे. मुली आहात म्हणून बांगड्या घाला, कुंकू लावा असा आग्रह धरणाऱ्या शिक्षिकाही क्वचितच होत्या. माझं आणि सरोजचं पुढे कॉलेजही एकच होतं- एल्‌फिन्स्टन. तिचे मराठीचे, तर माझे संस्कृतचे दोन-दोन पेपर्स. एक वर्ष आजारपणामुळे तिचं कॉलेज अनेक दिवस बुडलं. अशा वेळी परीक्षेला बसायला देत नसत त्या वेळी; पण तिला मात्र परवानगी दिली. 

‘हिंदू कॉलनी स्पिरिट’ मात्र होतं. तिथले काही लोक इतरांपेक्षा स्वत:ला जास्त प्रतिष्ठित समजायचे. पुढे मी आणि सरोज यांनी जेव्हा आपापली लग्नं ठरवली तेव्हा तर आम्हाला हे लोक म्हणायचे- काय, तुम्ही पलीकडच्या दादरमधल्या चाळीत राहाणाऱ्या मुलांशी लग्नं ठरवलीत? दादरच्या चाळी या ब्लॉकवाल्यांना जरा मागास वाटायच्या. काही ब्राह्मण कुटुंबांनी तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीला विरोध केला होता. महाराष्ट्र राज्य झाल्यावर ‘मराठ्यां’चं वर्चस्व तयार होईल आणि ब्राह्मणांची किंमत कमी होईल, असं भय त्यांना वाटत असावं.

आमचा वावर मुंबईभर असायचा. साहित्यिक-सांस्कृतिक वातावरण चांगलं असायचं तेव्हा. प्रकाशभाई मोहाडीकर यांनी सुरू केलेली पहिली एसएससी व्याख्यानमाला तेव्हाचीच. अनेक लेखक-कवींना बोलावलं होतं त्यांनी. कुसुमाग्रज आले होते तेव्हा. पावसाळ्यात न.र. फाटकांची व्याख्यानं असायची. ‘सत्यकथा’, नवीन कविता हे तर आमचे जिव्हाळ्याचे विषय. ‘सत्यकथे’चा प्रत्येक नवा अंक आमच्यासाठी एक इव्हेंट असायचा. कोणत्या दिवाळी अंकात कोणाच्या कविता असतील, यावर चर्चा चालायची. गोपाळ मयेकर हा आमचा एक मित्र. तो पुढे गोव्यात मंत्री झाला. रजनी पंडित ही मैत्रीण. ती स्कॉटिश हायस्कूलमधून एल्‌फिन्स्टन कॉलेजला आली होती. ‘टायटन’ या टाटाच्या ब्रँडचे फाउंडर आणि पहिले व्यवस्थापकीय संचालक झर्क्सेस देसाई यांच्याशी तिने लग्न केलं. रजनी नंतर ‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली’ची संपादक झाली. त्या वेळी दुसऱ्याच कॉलेजमध्ये जाऊन एखाद्या तासाला बसू शकत असू आम्ही.

नॅशनल कॉलेजला जाऊन वसंत बापटांची संस्कृत विषयाची लेक्चर्स, एसएनडीटीत जाऊन मायदेवांची लेक्चर्स ऐकायची, असं आम्ही करत असू. ब्राह्मण सभेत संस्कृत नाटकं बघायला जात असू. सुहासिनी मुळगावकरांनी केलेलं ‘स्वप्नवासवदत्तम्‌’, आणखी कुणी केलेलं ‘वेणीसंहार’ ही नाटकं पाहिल्याचं आठवतं. मराठी संगीत नाटकांच्या वळणाने ही संस्कृत नाटकं केली जायची. मो. दि. पराडकर, गो. के. भट यांची भाषणं, संस्कृतसंबंधी उपक्रम हेही असायचं. ज्यांना इतिहाससंशोधन, नाट्यशास्त्र, काव्यशास्त्र शिकायचं असे, त्यांच्यासाठी मुंबई विद्यापीठ चांगलं होतं. पुणे विद्यापीठात व्याकरण शिकवण्यावर भर असायचा. तरीही तिथे संस्कृत अधिक चांगलं शिकवलं जायचं. मुंबईत भाषांतराच्या अंगाने जास्त शिकवलं जात असे. संस्कृत भाषा टिकली पाहिजे, टिकवली पाहिजे, असा मतप्रवाह  सुरू झालाच होता. भाषा मूळ स्वरूपात राहिली-टिकली पाहिजे, टिकण्यासाठी भाषेत पाणी घालून उपयोगी नाही, असं एक मत होतं; तर लोकांना समजेल असे बदल भाषेत करायला हरकत नाही, असं दुसरं मत होतं. खरं तर शिकण्यासाठी भाषा सोपी केली, तिच्यात पाणी घातलं, तर तिची प्रस्तुतताच जाते. नंतरच्या काळात भाषेबाबत हे केलं गेलंच. 

मुलाखत : मेधा कुलकर्णी

लढे आणि तिढे
मनोविकास प्रकाशन, पुणे
पृष्ठे : 271, किंमत : 300 रुपये

 

Tags: लढे आणि तिढे मेधा कुलकर्णी पुष्पा भावे manovikas prakashan ladhe ani tidhe medha kulkarni pushpa bhave weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

पुष्पा भावे

समाजवादी नेत्या आणि मराठीतील एक विचारवंत लेखिका. 
माजी प्राध्यापक, सिडनहॅम महाविद्यालय, मुंबई.   दयानंद कॉलेज, म.ल. डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि शेवटी रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके