डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वाचकांच्या मनातही घर करणारी लेखकाच्या ‘मनातली माणसे’

व्यक्तिचित्रण करताना व्यक्तीचे बाह्य रूप वर्णन करणे, तिच्या वेषभूषेचे वर्णन करणे किंवा तिच्या वेगवेगळ्या लकबींचे वर्णन करणे या बाबींना चपळगावकर फारसे महत्त्व देत नाहीत. अत्यावश्यक तेवढेच त्यांचे वर्णन येते. चपळगावकर महत्त्व देतात ते त्या-त्या व्यक्तीच्या जगण्याचे/ अस्तित्वाचे सत्त्व ओळखून ते ठळकपणे शब्दांद्वारे साकार करण्याला. त्यामुळे त्यांचे लेखन पाल्हाळिक होत नाही, ते नेमके आणि नेटके होते. क्ववित वर्णन-विश्लेषणाला त्यांच्या लेखनात स्थान मिळत असले, तरी त्यांचा भर असतो तो व्यक्तींच्या कृति-उक्तींच्या, त्यातही त्यांच्या कृतींच्या चित्रणाला.

‘मनातली माणसे’ हा नरेंद्र चपळगावकर यांनी 2006 ते 2011 या कालावधीत रेखाटलेल्या त्यांच्या अत्यंत जवळच्या अशा बारा जणांच्या व्यक्तिचित्रांचा संग्रह. त्यांपैकी अकरा महाराष्ट्राच्या- विशेषत: मराठवाड्याच्या- सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत महनीय कार्य केलेल्या आणि त्यामुळे बहुपरिचित असणाऱ्या व्यक्ती आहेत. त्या व्यक्तींचे जीवन या सर्व क्षेत्रांना समृद्ध करणारे असे आहे. चपळगावकरांना त्यांचा अत्यंत निकटचा सहवास लाभला. त्यांच्या कार्याचे आणि व्यक्तिमत्त्वांचे जवळून निरीक्षण करता आले. काही जणांच्या कार्यात चपळगावकरांना सहभागी होण्याची संधीही मिळाली. त्या व्यक्ती चपळगावकरांच्या जगण्याचा भाग झाल्या, जीवन घडवणाऱ्याही झाल्या. त्यामुळे ही व्यक्तिचित्रे प्रत्यक्ष अनुभवातून तर निर्माण झालीच, पण त्यांच्या चित्रणातून 1920 ते 2000 या प्रदीर्घ कालखंडातील मराठवाड्याचे समाजजीवनही सहजपणे साकार झाले. त्यामुळे चपळगावकरांचे हे व्यक्तिचित्रणपर लेखन त्या-त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व साकार करणारे तर झाले आहेच; पण मराठवाड्याच्या समाजजीवनाचा अधिकृत ऐतिहासिक दस्तावेज म्हणून महत्त्वाचे असे झालेले आहे. व्यक्तिचित्रणपर लेखनाला असे द्विपरिमाणात्मक यश मिळाल्याची उदाहरणे मराठीत तरी फार कमी सापडतील. या द्विपरिमाणात्मक यशाचे श्रेय काही प्रमाणात त्या-त्या व्यक्तींच्या जीवितकार्याला द्यावे लागते हे खरे असले; तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सत्त्व नेमकेपणाने ओळखून ते सर्व अंगांनी साकारणाऱ्या चपळगावकरांच्या लेखनदृष्टीला हे श्रेय फार मोठ्या प्रमाणात द्यावे लागते, हेही नमूद केले पाहिजे.

लेखनविषय झालेल्या व्यक्तींशी चपळगावकरांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. आदर, प्रेम, जिव्हाळा, स्नेह, मैत्री, श्रद्धा, प्रेरकता, विचारसाम्य या सर्व विशेषणांनी ज्यांचे वर्णन करता येईल, इतके जवळचे हे संबंध आहेत. पण उल्लेखनीय बाब ही की, चपळगावकरांच्या लेखनाला या ‘जवळपणाचे बंधन’ मात्र पडलेले नाही. अतिशयोक्ती किंवा उनोक्ती यांच्यापासूनही हे लेखन दूर राहिलेले आहे. आत्यंतिक आत्मीयतेने केलेले हे लेखन पुरेसा तटस्थपणाही बाळगत असल्यामुळे वास्तवापासून तिळमात्रही दूर जात नाही. (हे विधान मी अधिकारवाणीने करू शकतो, याचे कारण लेखनविषय झालेल्या व्यक्तींपैकी बऱ्याच जणांशी माझेही जवळचे संबंध होते, हे होय.)

या पुस्तकातील ‘काका’ आणि ‘आई’ ही दोन व्यक्तिचित्रे या संदर्भात आवर्जून उल्लेख करावा अशी आहेत. या पुस्तकातील सर्वांत यशस्वी म्हणावीत अशीच ही व्यक्तिचित्रे आहेत. आई आणि वडील यांचे व्यक्तिचित्र लिहिणे हे कोणत्याही लेखकाच्या दृष्टीने अवघड असेच काम असते. चपळगावकरांनी त्यांच्या वयाची साठी उलटल्यानंतर ती लिहिलेली आहेत, हे लक्षात घेतल्यावर त्यातील अवघडपणा अधिकच स्पष्ट होतो. या अवघडपणाचे कारण असे की, या वयातील लेखकाची एकूणच गतजीवनाचे- त्यात स्वत:बरोबरच आई-वडिलांचेही जीवन ओघानेच आले- चिकित्सक पुनर्विलोकन करण्याची इच्छा आणि क्षमता प्रबळ झालेल्या असतात. क्वचित नाकारात्मक दृष्टिकोनही बळावलेला असतो, सफल संपूर्णतेपेक्षा विफल अपूर्णता अधोरेखित करण्याकडे कल झुकलेला असतो. अशा स्थितीत आई-वडिलांचे वस्तुनिष्ठ तरीही भावोत्कट असे चित्रण करणे, हे एक मोठे आव्हानच असते. चपळगावकरांनी हे आव्हान समर्थपणे पेलले असून मराठी व्यक्तिचित्रणपर लेखनात आवर्जून उल्लेखिली जावीत इतक्या यशस्वीपणे ही दोन व्यक्तिचित्रे साकारली आहेत. साठी उलटलेल्या आणि आज सुस्थितीत असणाऱ्या मध्यमवर्गीय वाचकांना ही व्यक्तिचित्रे वाचताना- विशेषत: आईचे चित्रण वाचताना- आपल्या आईचे स्मरण होऊन त्यांचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत; इतकी ही व्यक्तिचित्रे सरस उतरलेली आहेत.

 स्वार्थरहित, निरपेक्ष, समाजहितैषी सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांचे जीवन जाणीवपूर्वक स्वीकारलेल्या ‘काकांचे’ (चपळगावकरांच्या वडिलांचे) व्यक्तिचित्रण करताना त्यांच्या सामाजिक कार्याबरोबरच त्यांच्या कौटुंबिक जीवनाचे हृद्य असे चित्रण चपळगावकरांनी केले आहे. निम्न-मध्यमवर्गीय स्तरातील जीवन जगणाऱ्या काकांनी सार्वजनिक, राजकीय पदांचा कौटुंबिक कामासाठी उपयोग करून घेणे कटाक्षाने टाळले. त्या काळात भरपूर पैसा मिळवून देणारा वकिलीचा व्यवसाय त्यांनी अत्यंत सचोटीने केला. कायदेविषयक ज्ञानाचा लाभ त्यांनी अर्थनिरपेक्षपणे पक्षकारांना करून दिला. बदलत्या काळातील तत्त्वशून्य राजकारणाशी जुळवून घेणे शक्य नाही, हे लक्षात आल्याबरोबर पक्षीय राजकारणापासून दूर होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. एक पाय सतत तुरुंगात असणाऱ्या काकांची कुटुंबवत्सलता चपळगावकरांनी उत्कटपणे चित्रित केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कचेरीवर काढण्यात आलेल्या मोर्चाचा प्रसंग आवर्जून उल्लेख करण्यासारखा आहे. एरवी जीवाची पर्वा न करता बेधडकपणे दंगलीत घुसून ती मिटवणारे काका... आपला मुलगा मोर्चात सामील झालेला आहे, हे समजताच कोर्टातले काम बाजूला ठेवून मोर्चापासून एक विशिष्ट अंतर ठेवून कसे चालत होते, याचे चटका लावणारे चित्रण चपळगावकरांनी केले आहे.

व्यक्तिचित्रण करताना व्यक्तीचे बाह्य रूप वर्णन करणे, तिच्या वेषभूषेचे वर्णन करणे किंवा तिच्या वेगवेगळ्या लकबींचे वर्णन करणे या बाबींना चपळगावकर फारसे महत्त्व देत नाहीत. अत्यावश्यक तेवढेच त्यांचे वर्णन येते. चपळगावकर महत्त्व देतात ते त्या-त्या व्यक्तीच्या जगण्याचे/ अस्तित्वाचे सत्त्व ओळखून ते ठळकपणे शब्दांद्वारे साकार करण्याला. त्यामुळे त्यांचे लेखन पाल्हाळिक होत नाही, ते नेमके आणि नेटके होते. क्ववित वर्णन-विश्लेषणाला त्यांच्या लेखनात स्थान मिळत असले, तरी त्यांचा भर असतो तो व्यक्तींच्या कृति-उक्तींच्या, त्यातही त्यांच्या कृतींच्या चित्रणाला. व्यक्ती खऱ्या स्वरूपात प्रकट होतात त्या त्यांच्या वर्तनातून, कृतींमधून अशी चपळगावकरांची यथार्थ धारणा आहे. त्यामुळेच ज्या कृतींमुळे/वर्तनामुळे ही माणसे त्यांच्या मनात रुजली, त्यांचे चित्रण कथन करण्यावर चपळगावकरांचा भर असतो. परिणामत: त्यांच्या लेखनातून त्या व्यक्ती सगुण रूपात साकार होतात.

चपळगावकरांच्या या लेखनवैशिष्ट्यांचा विशेषत्वाने प्रत्यय येतो तो त्यांच्या आईचे जे व्यक्तिचित्रण त्यांनी केले आहे, त्यातून. सार्वजनिक कार्यासाठी समर्पित वृत्तीने जीवन वाहून घेतलेल्या, नुकतीच सुरुवात केलेली वकिली सचोटीने करणाऱ्या, एकत्र कुटुंबाची जबाबदारी आत्मीयतेने पार पाडणाऱ्या तरुणाची पत्नी म्हणून चंद्रपूर-नागपूरमध्ये आतापर्यंतचे जीवन घालवलेली ही ‘आई’ निजामीतील बीडसारख्या सर्व दृष्टींनी अप्रगत गावात आली आणि अर्धशतकापेक्षा अधिक काळ निगुतीने संसार करून सफलसंपूर्ण जीवन कशी जगली, याचे प्रत्ययकारी चित्रण चपळगावकरांनी केले आहे. सावत्र-चुलत-पालत अशी तीन पिढ्यांची नाती तिने जपली, अधिक घट्ट केली. परंपरेतील सत्त्व श्रद्धेने जपतानाच नव्याच्या संदर्भात समन्वय व स्वीकाराची समंजस कृती तिने केली. त्यामुळे सुना- नातवंडांशी तिचे संबंध सुसंवादी आणि जिव्हाळ्याचे राहिले. घरातील नोकर-माणसांनाच नव्हे, तर घराचे बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीशीही तिचे वागणे आत्मीयतेचे असे. संसाराच्या धबडग्यातही स्वत:ची गाणे ऐकण्याची, जुनी नाटके पाहण्याची आवडही तिने जपली. स्वयंपाकघरातील सोवळ्या-ओवळ्यापेक्षा स्वच्छतेकडे तिचे अधिक लक्ष असे. परजातीची मुलगी नातसून म्हणून आणि मुलगा नातजावई म्हणून तिने मनापासून स्वीकारले. चपळगावकरांनी हे सारे साध्या साध्या घटना-प्रसंगांचा चित्रण-वर्णनातून साक्षात केले आहे. वयाच्या नव्वदीच्या जवळ गेलेल्या या आईने ‘तिच्या हातचे गुळपापडीचे लाडू खाण्याची’ इच्छा सत्तरीच्या जवळ गेलेल्या मुलाने गमतीने बोलून दाखवल्यावर तशा अशक्त अवस्थेत ते लाडू करून त्याला खायला दिले, याचे चपळगावकरांनी केलेले वर्णन कोणाही सहृदय वाचकाचे डोळे भरून येतील असे आहे. आई आणि काका यांच्या दांपत्य-जीवनाचे चपळगावकरांनी केलेले वर्णनही असेच लोभस आणि हृदयंगम उतरले आहे.

आई आणि काका या दोन व्यक्तिचित्रांचा सलग वाचनातून 1920 ते 2000 या काळातील मराठवाड्यातील मध्यमवर्गीय कुटुंबजीवनाचे- चालीरीती, रिवाज, वागणे, बोलणे, स्थित्यंतरे या सर्वांसहित- एक जिवंत चित्र वाचकांपुढे साक्षात उभे राहते, हे यशही चपळगावकरांच्या खात्यावर जमेच्या बाजूने नोंदवले पाहिजे.

स्वामीजी, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, अनंत भालेराव आणि दिगंबरराव बिंदू या हैदराबादच्या मुक्तिसंग्रामातील आघाडीच्या सेनानींची चपळगावकरांनी रेखाटलेली व्यक्तिचित्रेही त्या-त्या व्यक्तीच्या अंतरंग-दशर्नाबरोबरच हैदराबादच्या मुक्तिसंग्रामाचे, त्यांतील अनेक प्रवाह-उपप्रवाहांचे ऐतिहासिक दर्शन घडवणारी आहेत.  विशेषत: नव्या पिढीतील वाचकांना तर ती पूर्णपणे अज्ञात; अशा व्यक्तित्वविशेषांचे आणि गतकालीन देश-काल- परिस्थितीचे दर्शन प्रत्ययकारीपणे घडवणारी आहेत. सर्वस्वाचा त्याग करून सर्व प्रकारच्या अडचणींचा सामना करत ध्येयवादी जीवन जगलेली ही थोर माणसे आजच्या आदर्शरहित जीवनात नव्या पिढीच्या मनात आशेचा किरण निर्माण करतील, असेच त्यांचे चित्रण चपळगावकरांनी केले आहे.

हैदराबाद मुक्तिसंग्रामातील सैनिक म्हणून सार्वजनिक जीवनाची सुरुवात करणारे अनंतराव भालेराव, उमरी बँक प्रकरणात सशस्त्र कारवाईत सहभागी होणारे अनंतराव, ‘मराठवाडा’ या संग्रामाच्या मुखपत्राचे संपादन करणारे अनंतराव आणि ‘मराठवाडा’ला मराठवाड्यातील जनतेच्या मुखपत्राचे स्थान प्राप्त करून देणारे निर्भीड-नि:स्पृह, मूल्याधिष्ठित पत्रकारिता करणारे श्रेष्ठ संपादक अनंतराव हे चपळगावकरांनी आपल्या लेखनातून शब्दश: जिवंत केले आहेत. वारकरी संप्रदायातील शुचित्व, मार्क्सवादातील शोषणविरोध, गांधीवादातील साधनशुचिता; ज्या लो.टिळकांचा छोटासा अर्धपुतळा त्यांच्या संपादकीय टेबलावर असे. त्या टिळकांची समाजहिताचा निर्भयपणे पुरस्कार करणारी व प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी असणारी पत्रकारिता, विचारभेदांना ओलांडून जाणारा लोकसंग्रह आणि स्नेहभाव, यांसारखे अनंतरावांचे व्यक्तित्वविशेष चपळगावकरांनी ठळकपणे शब्दांकित केले आहेत. अनंतरावांची गुणग्राहक वृत्ती आणि वयाचे बंधन न येऊ देता सर्व वयोगटांतील माणसांशी मैत्री करण्याचा त्यांचा स्नेहभावही चपळगावकरांनी उत्तमपणे साकार केला आहे.

‘मराठवाडा’चे सराफ्यातील कार्यालय आणि त्यातील उजव्या हाताची अनंतरावांची खोली यांचे चपळगावकरांनी रेखाटलेले शब्दचित्र वाचताना माझ्या डोळ्यांपुढे 1960-61 मधील ते दृश्य प्रत्यक्ष उभे राहिले, हा माझा अनुभव इथे त्यासंदर्भात आवर्जून नमूद करावासा वाटतो. घटना-प्रसंग आणि व्यक्ती यांचे शब्दांतून, वर्णनातून प्रत्यक्षीकरण करणे हे चपळगावकरांच्या व्यक्तिचित्रणाचे लक्षणीय वैशिष्ट्य आहे, हे येथे नोंदवणे योग्य ठरेल.

गोविंदभाई श्रॉफ यांच्या व्यक्तिचित्रणाच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. गोविंदभार्इंचे कार्य हैदराबादच्या मुक्तिसंग्रामापुरतेच मर्यादित नव्हते; स्वातंत्र्योत्तर काळातही मराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. मराठवाड्याचा विकास हा तर त्यांचा जीवनध्यासच होता. नि:स्वार्थीपणे लोकहिताचे कार्य सातत्याने करत राहणे, त्यासाठी प्रसंगी लोकलढे उभारणे, त्यासाठी पडतील ते परिश्रम करणे- हे त्यांचे जीवनवैशिष्ट्य होते. त्यांना स्वत:साठी काहीही नको होते; अविरत कार्यमग्नता हे आयुष्यभर त्यांचे वैशिष्ट्य राहिले. असा हा ध्येयनिष्ठ कर्मयोगी त्याच्या संस्थात्मक कार्यासहित आणि या काळातील त्यांच्या कालसंगत नसणाऱ्या काही समजुतींसह चपळगावकरांनी साकार केलेला आहे.

स्वामी रामानंद तीर्थ यांचे विस्तृत व अधिकृत चरित्रच चपळगावकरांनी लिहिलेले आहे. हैदराबादच्या मुक्तिसंग्रामाचा हा सेनापती स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणातून अलग होऊन विधायक कार्यात मग्न झाला. मराठवाड्याच्या शैक्षणिक विकासाचे महनीय कार्य स्वामीजींनी केले. लोकप्रियतेच्या शिखरापासून लोकविस्मृतीच्या अधोलोकापर्यंतच्या सर्व अवस्था स्वामीजींनी समयज्ञतेने अनुभवल्या. त्यांचे यथार्थ चित्रण चपळगावकरांनी केलेले आहे.

हे सर्वच नेते गांधीवाद आणि मार्क्सवाद या दोन्ही विचारसरणींनी प्रभावित झाले होते. त्यांचा समन्वय (जो प्रत्यक्ष साधला जाणे अशक्यप्राय होते) करून लोकलढे उभारावेत, असे त्यांना वाटे. यातूनच त्यांच्याविषयी पटेल- नेहरू या राष्ट्रीय नेत्यांचे गैरसमज झाले, हेही चपळगावकरांनी स्पष्ट केले आहे. संघर्षमय मुक्तिसंग्रामाचे हे यशस्वी नायक स्वातंत्र्योत्तर सत्ताकारणात मात्र अयशस्वी ठरले. त्याची काही कारणेही चपळगावकरांनी नोंदवलेली आहेत. त्यांच्याविषयी वाटणारी अतीव आत्मीयता आणि आदरामुळे त्यांच्या नेतृत्वाच्या मर्यादांची चिकित्सा करणे चपळगावकरांनी टाळले असावे. मात्र, ‘लोकजीवनातील सदसद्‌विवेकबुद्धीचे विश्वस्त’ हे त्यांचे स्थान अखेरपर्यंत अढळ राहिले. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांवर त्यांचा अंकुश कायम राहिला, हे चपळगावकरांनी यथार्थपणे स्पष्ट केले आहे.

दिगंबरराव बिंदू या मुक्तिसंग्रामातील आज पूर्णपणे विस्मृत झालेल्या नेत्याचे चपळगावकरांनी रेखाटलेले व्यक्तिचित्रही असेच उल्लेखनीय आहे. त्यांचे मध्यममार्गी, सौम्य, फार मोठ्या महत्त्वाकांक्षा नसणारे कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व या लेखनातून नव्या पिढीतील वाचकांना प्रथमच वाचावयास मिळेल.

बापू काळदाते या सर्वज्ञात समाजवादी नेत्याचे जीवितकार्यही चपळगावकरांनी त्यांच्या बलस्थानांसह यथार्थपणे साकार केले आहे.

स्वामीजी, भाई, अनंतराव, बिंदू आणि बापूसाहेब ही पाच व्यक्तिचित्रे सलगपणे वाचली की; मराठवाड्याच्या 1935 ते 2000 या कालखंडातील राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक  जीवनाचे एक अधिकृत चित्र आपल्यापुढे उभे राहते. त्याला व्यंकटराव देशपांडे या ‘इतिहास घडवणाऱ्या न्यायाधीशां’च्या व्यक्तिचित्राची जोड दिली की, न्याय-व्यवस्थाविषयक जीवनाचे चित्रही साकार होते.

वा.ल.कुलकर्णी, भगवंतराव देशमुख आणि सुधीर रसाळ या गुरुजनांची व्यक्तिचित्रे ही या पुस्तकातील व्यक्तिचित्रणाची उत्कृष्ट उदाहरणे ठरावीत अशी उतरलेली आहेत (माझेही हे तिघे गुरू. त्यांचा आवडता विद्यार्थी होण्याचे भाग्य मलाही लाभले आहे). वा.ल. आणि भगवंतराव हे चपळगावकरांचे वयाने ज्येष्ठ- त्यांच्या आधीच्या पिढीतील प्राध्यापक. रसाळ तर चपळगावकरांचे आधी परममित्र आणि एम.ए.च्या वर्गातील प्राध्यापक. एकाच वेळी त्यांच्याविषयीचा आंतरिक जिव्हाळा आणि पुरेसा तटस्थपणा कायम ठेवून चपळगावकरांनी ही व्यक्तिचित्रे साकार केली आहेत. त्यामुळे या तिघांशीही संबंधित असणाऱ्या वाचकांनाही त्यांचा अस्सलपणा आणि त्यांची प्रत्ययकारिता नव्याने जाणवल्याशिवाय राहत नाही.

भगवंतरावांचे अध्यापनकौशल्य, त्यांचे प्रभावी वक्तृत्व, त्याची अप्रतिहत रसिकता, मध्ययुगीन साहित्याबरोबरच समकालीन साहित्याचाही अभ्यास, वाङ्‌मयाचे निर्णायक पण समतोल मूल्यमापन करण्याची क्षमता, लेखन-भाषणसंभाषण यातील सौजन्य, मराठी भाषेच्या लेखनातील शुद्धतेबद्दलचा आग्रह, वाङ्‌मयातील असंस्कृतपणाबद्दल व अपप्रवृत्तीबद्दलची सात्त्विक नाराजी, परभाषिक शब्दांच्या अनावश्यक आणि अनाठायी वापराबद्दलची नापसंती, वाङ्‌मयीन संस्थांच्या उभारणीतील व वाटचालीतील सक्रिय सहभाग, स्नेहशील आतिथ्य आणि जवळीक निर्माण करणारे वागणे-बोलणे या सर्वांचे दर्शन चपळगावकरांनी भगवंतरावांच्या व्यक्तिचित्रणातून उत्तमपणे घडवले आहे. भगवंतराव आणि त्यांच्या पत्नी दोघेही आतिथ्यशील होते, हे चपळगावकरांनी नोंदवले आहेच; पण त्यासंदर्भातच ते जीवन अत्यंत आनंदाने, आस्वाद घेत-घेत जगणारे होते आणि ते स्वत: चवीने खाणारे व खिलवणारेही होते. त्यांच्याबरोबर भोजन करणे ही एक आनंदपूर्ण आस्वादकृती असे याचा आणि भगवंतरावांचे उत्साहाने बागेत काम करून बहरलेल्या फुलझाडांकडे तृप्तपणे पाहणे, सहलीला गेल्यानंतर आडबाजूच्या एखाद्या तृणपात्यावर फुललेले नाजूक फूल आणून त्याच्या नजाकतीसह सर्वांना दाखवणे, त्यांचे श्वानप्रेम यांचाही उल्लेख केला गेला असता, तर या व्यक्तिचित्राला अधिक परिपूर्णता आली असती, असे वाटते.

वा.लं.च्या संबंधीचे लेखनही माझ्यासारख्या त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनात 1963 ते 1966 या काळातील वा.ल. पुन्हा एकदा सजीव साकार करणारे आहे. वाङ्‌मयाचे अध्यापक, मराठीतील समीक्षक म्हणून वा.लं.नी केलेल्या महनीय कार्याचे चित्रणच चपळगावकरांनी यथार्थपणे केलेले आहे. शेवटच्या आजारात रसाळांबरोबर वा.लं.ना भेटण्यासाठी चपळगावकर गेल्याचा आणि ‘डायरीतील पाने’ हे पुस्तक थरथरत्या हातांनी स्वाक्षरी करून चपळगावकरांना दिल्याचा प्रसंग मन गलबलून टाकणारा आहे.

‘बापू’ हे आजचे मराठीतील श्रेष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांचे व्यक्तिचित्रही अशाच उत्कटपणाने लिहिलेले आहे. अध्यापक, समीक्षक, संपादक या नात्याने रसाळांनी केलेले आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या संदर्भातील संस्थात्मक कार्य सर्वज्ञातच आहे. पण अत्यंत तटस्थपणे, तर्कशुद्धपणे, अवाजवी भावनाशील न होता विवेचन करणाऱ्या रसाळांमध्ये एक भावकोवळेपणही आहे, हे चपळगावकरांचे लेखन वाचल्यावरच अनेकांना समजेल. त्यांची कुटुंबात, मुला- नातवंडांत रमण्याची वृत्ती, घरकामही उत्साहाने व मन:पूर्वक करणे, त्यांचे उत्कट मित्रप्रेम आणि संगीतातील जाणकार रुची यांचेही दर्शन अनेकांना प्रथमच या लेखनातून समजेल. चपळगावकरांची हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर आतापर्यंत बाह्यत: अत्यंत संयमाने, संतुलितपणे वावरणाऱ्या रसाळांनी स्वच्छतागृहात जाऊन दाबून ठेवलेल्या भावनांना करून दिलेली वाट हा प्रसंग हृदयस्पर्शी ठरेल असाच चित्रित केला आहे.

असे हे चपळगावकरांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक वाचतांना त्या-त्या व्यक्तींना सगुण-साकार स्वरूपात साक्षात तर करतेच; पण त्याबरोबरच मराठवाड्याचे 1920 ते 2000 या काळातील कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, वाङ्‌मयीन आणि राजकीय जीवनही वाचकांपुढे साकार करते. मला स्वत:ला तर या पुस्तकामुळे 1959 ते 1966 हा काळ पुन्हा एकदा जगता आला, हे आवर्जून नमूद केले पाहिजे. चपळगावकर त्यांच्या अन्य पुस्तकांमुळे महाराष्ट्रातील एकोणिसाव्या शतकातील समाजजीवनाचे अधिकारी अभ्यासक म्हणून प्रतिष्ठित झाले आहेतच; या पुस्तकामुळे इरावती कर्वे, विद्याधर पुंडलिक, स.ह.देशपांडे यांच्या बरोबरीने श्रेष्ठ व्यक्तिचित्रणकार म्हणून सर्वमान्य होतील, अशी खात्री वाटते.

मनातली माणसं 
लेखक : नरेंद्र चपळगावकर 
मौज प्रकाशन गृह, मुंबई 
किंमत : 225 रुपये 

 

Tags: डॉ.सुधीर रसाळ मनातली माणसं  नरेंद्र चपळगावकर बाळकृष्ण कवठेकर दिगंबरराव बिंदू  स्वामी रामानंद तीर्थ बापूराव काळदाते मराठवाडा अनंतराव भालेराव Digambarrao Bindu   Swami Ramanand Tirth Bapurao Kaldate Marathwada Anantrao Bhalerao Dr. Sudhir Rasal Manatil Manas Narendra Chapalgaonkar Balkrushna Kavethekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

बाळकृष्ण कवठेकर
balkrishna.kawathekar@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके