डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वामन निंबाळकरांच्या ‘महायुद्ध' या काव्यसंग्रहामुळे मराठी काव्याच्या प्रांतात निश्चितच मोलाची भर आहे. डॉ. यशवंत मनोहर म्हणतात त्याप्रमाणे “महायुद्धातील कविता, आंबेडकरी विद्रोही कवितेला पुन्हा एक सामर्थ्य प्रदान करीत आहे. अनुभवाशी आणि क्रांतीशी बांधलेली ही कविता दलित कवितेतील खूप निराळया शक्यतांची हमी घेऊन आली आहे.

दलित लेखकांचे लेखन मराठीत आता चांगलेच स्थिरावले आहे. मराठी वाङ्मयविश्वावर आलेली ही एक ‘लाट,' वाङ्मयाला आलेली ही ‘तात्पुरती सूज,’ पुरोगामी जीवनवाद्यांचे एक 'नसते फॅड, 'सामाजिक बांधिलकी मानणाऱ्यांचा हा, स्वतःला दलितांचे  सहानुभूतिदार म्हणवून घेण्याचा भोंगळ कावा आहे.’ इत्यादी पंधरा-वीस वर्षापूर्वी केली जाणारी विधाने आता “सामाजिक जाणिवेचा अभाव” आणि 'साहित्यिक खुजेपणाचे' दर्शन घडविणारी सिद्ध झाली आहेत.

कोणतीही क्रांती घडत असताना खरोखर छातीवर गोळ्या झेलून झेंडे नाचविणारे हुतात्मे वीर जसे असतात, त्याचप्रमाणे आपापल्या कुवतीनुसार, गल्लीबोळांतून नुसत्याच घोषणा देत हिंडणारे हौसे नवशेही त्यात सामील असतात. शेवटी मूल्यमापनासाठी हाती इतिहास राहतो तो बिनीच्या लढवयांचा. साहित्यिक जगात होणाऱ्या क्रांतीचेही असेच आहे. शंकरराव खरात, बाबूराव बागूल, यशवंत मनोहर, दया पवार, प्रेमानंद गज्वी इ. अनेक दलित लेखकांबरोबरच कृतक ऊरबडवे, दिशाहीन लेखन करणारे दलित साहित्यिक होते, आणि अल्पांशाने अजूनही आहेत. पण त्यांचा विचार करणे आवश्यक नसते. ते स्वत:हून काळाच्या ओघात नष्ट होत असतात. जे आपल्या लेखनसामर्थ्याने दलित- वाङ्मयप्रवाहात पाय रोवून उभे आहेत, आणि ज्यांच्यामुळे दलित साहित्य एकूण मराठी वाङ्मयात स्ववैशिष्ट्यांनिशी सामर्थ्यसंपन्न झालेले आहे, अशा बिनीच्या लेखक कवींपैकी श्री. वामन निंबाळकर हे एक आहेत. 

वामन निंबाळकर यांचा ‘महायुद्ध’ हा नुकताच प्रसिद्ध झालेला दुसरा काव्यसंग्रह. त्यांच्या ‘गावकुसाबाहेरील कविता’ या पहिल्या काव्यसंग्रहाच्या दोन आवृत्त्या संपून आता तिसरी आवृत्ती निघत आहे. मराठी काव्यसंग्रहाची एक हजार प्रतींची एक आवृत्ती संपायला साधारणपणे दहा वर्षे लागतात. हा हिशेब लक्षात घेता निंबाळकरांचे रसिकमान्य यश हे कौतुकास्पदच मानावे लागेल.

‘गावकुसाबाहेरील कविता’ मधील नवखेपणा 'महायुद्ध' या काव्यसंग्रहात पुसटसाही सापडत नाही. ‘महायुद्ध’ मधल्या कवितांमधून आपल्याला सामोरे येते ते वेदनांनी पीडलेले पण तक्रारखोर नसलेले, अन्यायाविरुद्ध दंड थोपटून उभे असलेले, पण ऊरबडवे नसलेले संयमी, चिंतनशील मन.

'पुढे टाकलेल्या प्रत्येक पावलाचे

संदर्भ मागे सोडीत गेलो

म्हणून एका अलिखित

परंतु अक्षर कादंबरीचा नायक झालो’

याची जाणीव असलेले कवी 'दुपारी जेवायला बसलो, गोल ताट चक्राकार मला घेऊन फिरू लागले - अशोक चक्रासारखे’ ...असला अनुभव असो, की थेट अंत:स्पर्शी ‘आमच्या सर्वांगाला चिकटल्या आहेत जळवा, रक्ताचे प्राशन त्यांचे न संपणारे पायाखालील जमिनीला  भूकंपाचे हादरे... कोठेही काहीही स्वच्छ नाही, काहीही सुरक्षित नाही'... असला शोषणाच्या जाणिवेचा अनुभव असो - अनुभवाच्या प्रकटीकरणासाठी व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शब्द हेच माध्यम निवडतात. शब्द हे सामाजिक क्रांतीचे प्रभावी हत्यार म्हणून तो वापरू इच्छितो आणि या अपेक्षित वदलाला संकुचिततेचा जराही स्पर्श नाही. कवी म्हणतात : ' तुमच्यासाठी घेऊन आलोय मी कवितांचे ऊर्जायन : त्यातील तुमचेच असेल सारे, असो काहीही येथे – उन्हं, पाऊस, वादळ, वारे .... गाणार मी तुमच्याचसाठी. 

माझे शब्द तुफानात पेटलेल्या मशाली:

त्यातच प्रकाशमान करीन

तुमची ख्याली खुशाली.'

शोषणाची पराकोटी झालेल्या या भारतीय समाजाचे चित्र वामन निंबाळकर यांनी फार प्रत्ययकारीरित्या रेखाटले आहे. यातील शब्दांचा उपयोग वरवर साधा - सरळ पण अंतर्यामी भेदक वाटतो. झोपडपट्टीचे हे साधे चित्रच बघा

ह्या झोपड्या, ठिकठिकाणी, घोळक्या घोळक्यांनी खाली माना घालून बसलेल्या,

सडलेल्या, पीडलेल्या, खंगलेल्या देहविक्रय करण्याऱ्या स्त्रियांसारख्या किंवा ...

उदास, चिंताग्रस्त, करपलेल्या चेहऱ्यांच्या 

गिरणीबाहेर बसलेल्या कामगारांसारख्या.'

वामन निंबाळकरांचे ‘शहर’ देखील ‘माणसांप्रमाणेच माणसांच्या हजारो पिढ्या खाऊन पचवून टाकणारे आहे. 'वळणावळणावरचे प्रदेश कसे निवडुंगांच्या काटयांनी भरून गेले आहेत. 'विश्व बगलेत घेऊन मिरवणारा माणूस नावाचा प्राणी देव नावाच्या दगडासमोर' वाकत चालला आहे. सर्वत्र असे औदास्याचे बातावरण दिसत असले, तरी वामन निंबाळकरांच्या साऱ्याच कवितांतून आशेचाच सुस्वर उमटतो. ते जणू निराश जीवांना संदेशच देतात:

“भरत आलेल्या जखमा चिघळण्यात अर्थ नाही ! तुम्ही हताश होऊ नका, मी हताश झालो नाही.”

कंटाळून, थकून, निराश होऊन या मोहिमेतून पाऊल मागे घेणाऱ्यांना प्रोत्साहित करीत ते म्हणतात,  ‘आत्ताच कुठे रक्तात पेटवलेल्या मशाली : 

तुम्ही का विझवता मला समजत नाही. 

तुम्ही हताश होऊ नका, मी हताश झालो नाही.'

दलित साहित्य म्हणजे फक्त आक्रसताळेपणा, असे विधान करणाऱ्यानी या ओळी जरूर वाचून बघाव्यात – “अस्तंगत झालेल्या या सूर्याच्या किरणांची माझ्या लेखणीत आहे साठवण,

माणसाशी माणसासारखे वागावे: याचीच करून देणार पुन्हा आठवण.”

सामाजिक जाणिवेचा प्रकट उद्घोष हा स्थायीभाव असलेली दलित कविता गेयता, नादमाधुर्य इत्यादी बाह्य रूपसौंदर्याला कायमची पारखी होणार की काय, अशी रास्त भीती काही काळ वाटू लागली होती. गद्यप्रायता, विधानात्मकता, हा जणू दलित कवितेचा प्रमुख विशेष होऊन बसला होता. पण हळू हळू यांत बदल घडून येत असल्याचे दिसते. आशयानुसार रूपाकार कविता घडू लागली आहे. 'नेल्सन मंडेला,’ ‘बाबासाहेब अंबेडकर,' 'सावित्री ज्योतिबा फुले ' ह्या कवितांमध्ये प्रायः विधानात्मक गद्यप्राय असलेली निंबाळकरांची शब्दकळा पुढील कवितांत कसे रूप घेते बघा -

झाड खाते फळ । कुंपण खाते शेत, 

न्यायाला खाण्याचा । अन्यायाचा बेत 

कसा कुठे टाका घालू । सारे आकाश फाटले 

तिथे बारमाही वर्षा । इथे सागर आटले, 

प्रकाशाचे लाख डोळे । गेले अंधारी बुडून सारी फुले कुस्करली । नेल्या कळ्याही खुडून 

किंवा

कधी राहावे मौनात कधी बोलत राहावे, 

डोळे उघडे ठेवून कधी घोरत राहावे.

कधी विझवून घ्यावे कधी ठेवावे जाळत 

कधी ओलेचिंब आधी मग ठेवावे वाळत.

पूर्ण कवितांबरोबरच काही चारचार ओळींच्या, उपहासिकांच्या वळणावर जाणाऱ्या (पण निखळ उपहासिका नसलेल्या) अशा छोटया स्फुट कवितांचाही ‘महायुद्ध' या काव्यसंग्रहात समावेश करण्यात आला आहे. अर्थात् त्यामुळे काव्यसंग्रहाच्या एकूण परिणामात कुठेही विसंगती आलेली नाही. कारण आशयाचा सूर एकूण तोच आहे. उदा.

झाला प्रकाश बंदिस्त, सारे तम पसरले : माणसांचे बाजारात - पार भाव घसरले.

किंवा : 

विळयाभोपळयाची जोडी एका गाडीत बसली 

दिली टाळी एकमेका चाके गालात हासली.

वामन निंबाळकरांच्या ‘महायुद्ध' या काव्यसंग्रहामुळे मराठी काव्याच्या प्रांतात निश्चितच मोलाची भर आहे. डॉ. यशवंत मनोहर म्हणतात त्याप्रमाणे “महायुद्धातील कविता, आंबेडकरी विद्रोही कवितेला पुन्हा एक सामर्थ्य प्रदान करीत आहे. अनुभवाशी आणि क्रांतीशी बांधलेली ही कविता दलित कवितेतील खूप निराळया शक्यतांची हमी घेऊन आली आहे.

“महायुद्ध”

कवी – वामन निंबाळकर 

प्रबोधन प्रकाशन, नागपूर 

Tags: स्पृश्य-अस्पृश्यता सामाजिक जाणीव दलित वामन निंबाळकर Untouchability Social awareness Dalit Vaman Nimbalkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके