डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मला सिनेमातही रिझल्टपेक्षा प्रोसेस महत्त्वाची वाटते!

सिनेमाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगतो की, केवळ सिनेमे पाहून तुम्ही सिनेमे बनवू नका. खऱ्या आयुष्यात येणारे अनुभव हे तुमचं रॉ मटेरिअल असायला हवं. डिसायपल बनवण्यापूर्वी मी दोन वर्षं त्याच्या संशोधनात घालवली होती. संशोधनाची प्रक्रिया चालू असताना मी खरोखरच नवीन जन्म घेत असतो, दहा नव्या गोष्टी मला त्या प्रक्रियेतून कळत असतात. दहा वेळा माझा मृत्यू होत असतो. कारण माझ्या कित्येक धारणांवर प्रश्नचिन्ह उभं राहत असतं. पण एकदा सिनेमा लिहून पूर्ण झाला की पुढच्या गोष्टी त्या मानाने सरळ मार्गाने घडत जातात.

प्रश्न - तुझं बालपण, कौटुंबिक पार्श्वभूमी, याच्याविषयी सांग.

- माझा जन्म वरळीला झाला. माझे आईवडील दोघेही मुंबईचेच. दोघांचाही सिनेमा किंवा नाटक या क्षेत्रांशी थेट काहीच संबंध नव्हता. माझी आई इंडियन रेल्वेमध्ये काम करत होती आणि वडलांचा दागिन्यांचा व्यवसाय होता. माझे काका शेखर ताम्हाणे हे लेखक होते. नुकतंच एप्रिलमध्ये त्यांचं आणि माझ्या काकूंचंही निधन झालं. माझ्या वडलांचे चुलत भाऊ राजन ताम्हाणे हे प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक. मी जिथे वाढलो त्या बिल्डिंगमध्येच एक रेकॉर्डिंग स्टुडिओ होता. तिथे नाटकात काम करणारे बरेच कलाकार यायचे आणि तिथून ते चहापाण्यासाठी आमच्या घरी यायचे. माझ्या आईवडलांना नाटक बघण्याची आवड होती. लहानपणी मलाही ते नाटक बघायला घेऊन जायचे. अर्थात ती सगळी त्या वेळची व्यावसायिक नाटकंच असायची. मला लहानपणी अभिनय करण्यात जास्त रस होता. कारण तोपर्यंत अभिव्यक्तीचं दुसरं कुठलं माध्यम माहीतच नव्हतं. आईवडलांनीही मला त्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिलं. आई मला बालनाट्यं बघायला घेऊन जायची. लहानपणी काही बालनाट्य शिबिरांनाही मी गेलो आहे, बालनाट्यांमध्ये अभिनयही केला आहे. शाळेतल्या कार्यक्रमांत, वक्तृत्व स्पर्धांत मी बऱ्याचदा भाग घ्यायचो. माझे वडील मला त्यासाठी भाषण लिहून द्यायचे. लहानपणापासूनच मी सांस्कृतिक विषयांत मला खूप रस होता. पण बाकी आमचं कुटुंब इतर एखाद्या सर्वसामान्य मध्यम वर्गीय कुटुंबासारखंच होतं.

माझ्या वयाच्या पाचव्या वर्षी आम्ही वरळीहून अंधेरीला राहायला गेलो. तिथे डहाके कॉलनीत जे नवं घर आम्ही घेतलं, ते एका फिल्ममेकरचंच घर होतं. आपली एक फिल्म त्याला पूर्ण करायची होती म्हणून त्याने ते थोडं स्वस्तात विकलं होतं. त्या व्यक्तीचं नाव अमोल शेडगे आणि ती फिल्म होती अबोली. पुढे त्या फिल्मला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. हा माझ्या लहानपणचा एक गमतीशीर योगायोग आहे.

‘बॉम्बे केम्ब्रिज स्कूल’ ही माझी शाळा होती. आपण आटर्‌सला जायचं हे मी शाळेत असतानाच ठरवलेलं होतं. ‘‘तू डॉक्टर किंवा इंजिनिअरच बनायला हवंस’’ असा घरातल्यांचा आग्रह अजिबात नव्हता. उलट माझे बाबा मला म्हणायचे की, तुला ज्या विषयांमध्ये रस आहे त्यांत काम करत राहण्यासाठी तू आटर्‌सला जाणंच योग्य आहे. मिठीबाई कॉलेज हे ‘कल्चरली ॲक्टिव्ह’ आहे म्हणून मी तिथे प्रवेश घेतला. तिथेही चारेक वर्षं मी एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेत होतो. पण हळूहळू मला लक्षात आलं की, अभिनय करणं आपल्याला फारसं जमणारं नाही. लहानपणापासून मला लिहायचीही सवय होती. कॉलेजमध्ये असताना मी एकांकिका लिहायचो. त्यामुळे कॉलेजमध्ये असतानाच मी ‘बालाजी टेलिफिल्म्स’साठी काम करू लागलो. तेव्हाही टेलिव्हिजनसाठी लिहिल्यावर पैसे चांगले मिळत असत.

प्रश्न - आटर्‌सला जाण्याचा निर्णय तू आणि तुझ्या घरातल्यांनी फार कमी वयात ठामपणे घेतला, त्याची कारणं काय होती?

- लहानपणी मी मिमिक्री करायचो, डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचो, अभिनय करायचो. स्वतःचं स्क्रिप्ट लिहिण्याएवढी बुद्धी त्या वयात नव्हती. पण हेच आपलं आवडतं क्षेत्र एवढं नीट कळलेलं होतं. ह्या सगळ्याला आईवडिलांचा विरोध नव्हता. उलट त्यांनाही त्याचं आकर्षण वाटायचं. माझ्या वडलांचे त्यांच्या भावाशी संबंध खूप चांगले होते, त्यामुळे निर्मितीची प्रक्रिया काय असते याविषयी वडिलांना जाणीव होती. ते पुलंची पुस्तकं मला आणून द्यायचे. आई मला लहान मुलांसाठीच्या गोष्टींच्या कॅसेट्‌स ऐकून आणून द्यायची. गणेशोत्सवामध्ये किंवा सोसायटीच्या वार्षिक कार्यक्रमात मी सहभागी असायचो.

प्रश्न - फिल्म तू कधीपासून पाहायला लागलास?

-फिल्म पाहण्याचा माझा प्रवास खूप वेगळा आहे. लहानपणी मी सगळे व्यावसायिक चित्रपटच पाहायचो. वरळीत असताना घरी वडिलांनी व्ही.एफ.एच. आणला होता. आणि आमच्याकडे ‘मैने प्यार किया’ची कॅसेट होती. ती मी जवळजवळ 73-74 वेळा पाहून खराब करून टाकली होती. त्या वयात मला इंग्लिश तर फारसं येत नव्हतं आणि इंग्लिश कलाकारांची भाषेची लकब समजायचीच नाही. त्यामुळे हिंदीत डब केलेले हॉलिवुडचे सिनेमे, व्यावसायिक मराठी नाटक-सिनेमे, मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन हेच मी पाहत होतो. सिनेमाकडे गंभीरपणे पाहण्याचा माझा प्रवास वेगळाच आहे. सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक निशिकांत कामत एकदा आमच्या कॉलेजमध्ये एक एकांकिका दिग्दर्शित करण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांची ‘डोंबिवली फास्ट’ ही फिल्म पूर्ण झाली होती. पण प्रदर्शित झाली नव्हती. त्याआधी मी प्रत्यक्ष सिनेमा बनवणारी अशी कुठली व्यक्तीच कधी पाहिली नव्हती. वर्ल्ड सिनेमाची आवड मला त्यांच्यामुळे निर्माण झाली. ‘सिटी ऑफ गॉड्‌स’ नावाची एक ब्राझिलियन फिल्म आहे, ती तू पाहा, असं त्यांनी मला सांगितलं. मी तो सिनेमा पाहिला आणि माझं आयुष्य बदललं. हॉलिवुड आणि बॉलिवुडच्या बाहेरही सिनेमा होतो आहे; वेगवेगळ्या देशांतले लोक आपली परिस्थिती सिनेमाच्या माध्यमातून मांडत आहेत हे मला तेव्हा लक्षात आलं. आणि त्यानंतर मला वर्ल्ड सिनेमाचं व्यसनच जडलं! त्यानंतर मी जगभरातले खूप वेगवेगळे सिनेमे पाहिले. त्या काळात खूप वेगवेगळ्या डीव्हीडी लायब्ररीज मुंबईत होत्या. शंभर रुपये देऊन तुम्ही डीव्हीडी भाड्याने घेऊ शकत होता.

माझ्या घरची आर्थिक परिस्थिती खूप चांगली नव्हती. त्यामुळे अख्ख्या कुटुंबाने थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणं आम्हांला परवडायचं नाही. पण नाट्यक्षेत्रामध्ये आईवडलांच्या खूप ओळखी होत्या. त्यामुळे कधी फ्री पासेस मिळाले किंवा कोणी आमंत्रण दिलं तर आम्ही नाटक पाहायला जायचो. सामान्यतः आज जसं एखादा सुपरहिट सिनेमा लोक थिएटरमध्ये जाऊन पाहतात तसं मी त्या काळातले सिनेमे थिएटरमध्ये पाहिलेले नाहीत. अनेक सिनेदिग्दर्शक लहानपणापासून सिनेमा हॉलमध्ये सिनेमे बघून ते या क्षेत्राच्या प्रेमात पडले आणि स्वतः सिनेमे बनवायला लागले तसं माझ्या बाबतीत झालेलं नाही. सुरुवातीला डीव्हीडी प्लेअरवर मी सिनेमे पाहिले आणि नंतर मी फिल्म फेस्टिव्हलला जायला लागलो. जगभरातले सिनेमे त्या त्या ठिकाणी जाऊन पाहिले.

प्रश्न - आपण स्वतः सिनेमा करायचा हा निर्णय नेमका कसा झाला? तू सुरुवातीला काही डॉक्युमेंटरी केल्यास त्यांच्याविषयीही सांग.

- टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करताना किंवा ‘मिठीबाई’मध्ये शिकत असताना काही लोक असे भेटले ज्यांच्यामुळे मला खूप मनस्ताप झाला. तिथे खूप पॉवर डायनॅमिक्स होतं. त्या सगळ्याला मी कंटाळलो होतो. ‘इंटरकॉलेजिएट’मध्ये ज्या प्रकारचं नाटक होत होतं ते मला फारसं आवडत नव्हतं. आपणच आता आपल्या मनासारखं काम केलं पाहिजे, याला पर्याय नाही असं मला वाटायला लागलं. आणि मी कॉलेजमध्ये असतानाच माझी पहिली डॉक्युमेंटरी केली. आपल्याकडच्या सिनेमांमध्ये जगभरातून कुठून कुठून काय काय चोरलं गेलं आहे यावर मी ‘फोर स्टेप प्लॅन’ नावाची डॉक्युमेंटरी केली.

प्रश्न - या डॉक्युमेंटरीपासून तू खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष निर्मितीला सुरुवात केलीस. त्या वेळी तुला त्रासदायक ठरलेले आणि प्रोत्साहन देणारे घटक कोणते होते?

- या इंडस्ट्रीमध्ये काही जणांचा असा प्रयत्न असतो की, आपण कायम त्यांच्या हाताखाली राहावं, फार पुढे येऊ नये. असे लोक आपल्याला हे पटवून देतात की, मी तुझ्या आयुष्यात नसेन तर भविष्यात तुझं काहीच होणार नाही. मलाही असे लोक भेटले. पण स्वतंत्र बुद्धीचा असल्यामुळे मी ते फार मनावर घेतलं नाही, उलट त्यामुळे माझा काहीतरी करून दाखवण्याचा निश्चयच पक्का झाला.

‘फोर स्टेप प्लॅन’ मी माझ्या दोन मित्रांसोबत बनवली होती. सचिन मोडक (जो आता अभिनेता आहे) आणि समीर लुक्का या दोघांच्या पाठिंब्यामुळे ती झाली. रामू रामनाथन हे मुंबईतले एक प्रसिद्ध पत्रकार आणि नाटककार- त्यांच्याशी या डॉक्युमेंटरीमुळेची माझी ओळख झाली. या डॉक्युमेंटरीसाठी त्यांची मुलाखत घेतली होती. त्या आधी पृथ्वी थिएटरला मी त्यांची नाटकं पाहिली होती. ते माझे गुरूच आहेत. पुढे ‘कोर्ट’साठीही त्यांच्यामुळे मला खूप मदत झाली. त्यांच्यामुळे मला राजकारण-समाजकारण यांचं भान आलं,  खूप लेखकांशी ओळखी झाल्या. मी एक सामान्य मध्यम वर्गीय मुलगा होतो, आमच्या घरात फार पुस्तकं नव्हती. पण त्यांच्यामुळे मला साहित्याच्या क्षेत्रातल्या खूप गोष्टी शिकता आल्या आणि एका वेगळ्या जगाशी माझा परिचय झाला. ‘बालाजी टेलिफिल्म्स’मध्येसुद्धा मला असे काही मित्र मिळाले की, ज्यांच्याकडून मला तेंडुलकर आणि एलकुंचवार कोण आहेत, त्यांचं नाटक ही काय चीज आहे हे कळलं. कोणकोणते सिनेमे आपण पाहिले पाहिजेत हे सांगणारे लोक तिथे होते. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधले काही लोक तिथे पैशासाठी काम करत होते. या सगळ्यांकडून मला खूप शिकायला मिळालं. असे जे जे लोक मला माझ्या आयुष्यात भेटले त्या सगळ्यांचा मी एक ‘प्रॉडक्ट’ आहे.

कॉलेजमध्ये असतानाच 2009 मध्ये मी एक नाटक केलं होतं. त्याचं नाव होतं ‘ग्रे एलिफन्ट्‌स इन डेन्मार्क’. ग्रे एलिफंटचंच एक स्पिरिचुअल प्रोग्रामिंग म्हणून ‘द डिसायपल’ हा माझा अलीकडचा सिनेमा आहे. या नाटकामुळे मी विवेक गोंबरला भेटलो. तो त्या नाटकात मुख्य अभिनेता होता. त्या नाटकासाठीही रामू रामनाथन यांनी मला खूप मदत केली होती. आनंद गांधीनी त्या नाटकाची निर्मिती केली होती. आनंद गांधीकडूनही मला खूप काही शिकायला मिळालं. तो माझ्याहून सात-आठ वर्षांनीच मोठा आहे. ‘यू टीव्ही पॅलेडॉक’ नावाची एक कंपनी आहे, तिथे आम्ही दोघं काम करत होतो. ‘फोर स्टेप प्लॅन’मुळे मला तिथे काम मिळालं होतं. तिथेच मी आनंदला भेटलो आणि आमची खूप चांगली मैत्री झाली. ‘ग्रे एलिफन्ट्‌स’ची निर्मिती सोहम शहा यांनी केली होती.

प्रश्न - पुढे साधारण 22-23 व्या वर्षी तू दार्जीलिंगला जाऊन ‘सिक्स्थ स्ट्रँड’ ही फिल्म केलीस, त्याविषयी थोडं सांगशील काय?

- झालं असं की, रामू रामनाथनना भेटल्यावर एखाद्या थीमवर संशोधन करण्याची आवड माझ्यात निर्माण झाली. ज्यांच्याबद्दल मुख्य प्रवाहात कुणी फारसं लिहीत नव्हतं अशा मुंबईतल्या वेगवेगळ्या लोकांवर त्यांचे कॉलम्स यायचे ‘मुंबई मिरर’मध्ये. त्यात खूपच रंजक गोष्टी असायच्या. ते वाचून मलाही संशोधन, अभ्यास यांची आवड निर्माण झाली. एकदा मी टीव्हीवर ‘टी टेस्टिंग’ची प्रक्रिया बघत होतो. तो सगळा प्रकार मला खूप अनोखा वाटला. मग मी त्याचा अभ्यास  सुरू केला. जगातला सगळ्यांत महागडा चहा भारतात दार्जीलिंगमध्ये तयार होतो. त्याच्याविषयी खूप अद्भुत मिथकं प्रसिद्ध आहेत. माकडांना तो चहा आणण्यासाठी प्रशिक्षण दिलेलं असतं, पौर्णिमेच्या रात्रीच तो चहा तयार होतो, तो बनवण्याची पद्धत अतिशय गुप्त आहे वगैरे, वगैरे... शेवटी मी माझ्या एका मित्राबरोबर दार्जीलिंगला गेलो आणि आम्ही तिथे बऱ्याच जणांच्या मुलाखती घेतल्या. तिथे गेल्यावर मला जाणवलं की, त्या कामगारांना दिवसाचे फक्त पन्नास-साठ रुपयेच मिळत होते आणि त्या चहाच्या दंतकथा बनवून तो बाहेर लाखो रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. हा काय विरोधाभास आहे असा प्रश्न माझ्या मनात आला आणि त्यातूनच ती फिल्म तयार झाली. आजवर माझी कामाची पद्धत हीच आहे की, दर वेळी काहीतरी नवीन गोष्ट मला सापडते. त्या नव्या विश्वात मी बुडून जातो, अभ्यास करतो आणि मग ते विश्वच मला काहीतरी सांगत जातं. शेवटी या सगळ्यांतून एक कथानक आकाराला येतं.

प्रश्न - मधला एक काळ असा होता की, तू खूप निराश झाला होतास. तुला आर्थिक मदत मिळत नव्हती आणि त्यामुळे पुढचा रस्ता दिसत नव्हता. तो काळ नक्की काय होता?

- ‘सिक्स्थ स्ट्रँड’ तयार झाली होती. पण चरितार्थ नीट चालावा म्हणून मला कुणाचा सहायक म्हणून काम करण्याची इच्छा नव्हती. परदेशात जाऊन सिनेमाचं शिक्षण घेण्याची इच्छा होती. पण ते परवडणारं नव्हतं. ‘कोर्ट’ची थीम तेव्हा माझ्या डोक्यात आकाराला आलेली होती. पण मी पंचविशीच्या उंबरठ्यावर होतो. त्यामुळे घरातून ‘‘आता तू काहीतरी कमवायला हवं, स्थिर व्हायला हवं’’ असा तगादा होता. त्यातच त्या काळात मी अभिनय करणंही सोडून दिलेलं होतं. खरं तर ‘सिक्स्थ स्ट्रँड’साठीची आर्थिक मदत मला माझ्या वडलांनीच केली होती. एका दृष्टीने फिल्म करणं हेच माझं शिक्षण होतं. कारण जे पैसे एरवी ‘फिल्म स्कूल’ला घालायचे त्याच्याऐवजी मी ही फिल्म बनवली होती. पण पुढे काय? ती फिल्म घरच्यांनी पाहिली आणि ते घाबरलेच! त्यांना वाटलं होतं की, आता हा टीव्हीवर येणार, कुठलीतरी सिरियल बनवणार. पण हे काहीतरी भलतंच झालं, हा वेगळ्याच दिशेला चाललाय असं त्यांना वाटायला लागलं. त्याचा ताण माझ्यावर होता. पैसे मिळावेत म्हणून मी जाहिरात क्षेत्रात नोकरीसाठी प्रयत्न करत होतो. पण कुठूनच प्रतिसाद येत नव्हता आणि मुख्य प्रवाहातल्या सिनेमाकडे वळायचं तर तिथे जे काही चाललं होतं, त्याच्या बाबत मी नेहमीच पूर्णपणे असमाधानी होतो; त्यामुळे तिकडे वळण्याची इच्छाच होत नव्हती. ‘ग्रे एलिफंट’नंतर विवेक (त्याच्या वडलांची तब्येत खूप खराब झाली होती म्हणून) सिंगापूरला गेला होता. दोन वर्षांनी तो भारतात परत आला. ‘सिक्स्थ स्ट्रँड’ बऱ्याच फेस्टिव्हल्सना गेली, तिथे नावाजली गेली हे सगळं त्याच्या कानांवर आलेलं होतं, ती फिल्म त्याने पाहिलेलीही होती. तो परत आल्यावर मी त्याला भेटून सांगितलं की, मी खूप वाईट परिस्थितीत आहे. मला नवीन फिल्म करायची आहे. पण माझ्याकडे पैसे नाहीत. पैसे नसतील तर माझं पुढे कसं होणार ही आईवडलांची चिंता योग्यच आहे. पण मला माझंच काम करण्यात इतकी मजा येते, की कुठेतरी 9 ते 5 जाऊन कुणासाठीतरी काम करण्यात मला फारसा रस नाही. मला स्वतःच्या कल्पनांवर काम करायचं आहे. तेव्हा विवेक मला म्हणाला, ‘‘तुला महिन्याला किती रुपये लागतात?’’ मी म्हटलं, ‘‘पंधरा हजार रुपये.’’ ‘‘आणि ही फिल्म लिहायला किती दिवस लागतील?’’ ‘‘वर्ष-दीड वर्षं तरी लागेल.’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘मी देतो तुला पैसे, तू लिही ती फिल्म.’’ त्यातून अचानक एक आशा निर्माण झाली आणि मला संहिता लिहायला उसंत मिळाली. दीड-दोन वर्षं मी ‘कोर्ट’ची संहिता लिहीत होतो. पण शेवटी संहिता लिहून पूर्ण झाली तेव्हा ती वाचून विवेक म्हणाला की, हा सिनेमा आपण करायलाच पाहिजे. सिनेमाच्या क्षेत्रात आसपास जे काम चाललं होतं त्याच्याबद्दल तोही माझ्याइतकाच असमाधानी होता. तो म्हणाला की, आता फक्त बोलून काही फायदा नाही. आपल्याला जे पडद्यावर बघायचं आहे ते आपणच करायला पाहिजे. दुसरं कुणी करत नसेल तर...

प्रश्न - ‘कोर्ट’चा ‘जर्म’ तुला कसा सापडला?

- त्याच्या दोन स्टोरीज आहेत. मी एकदा एक टिपिकल अमेरिकन कोर्टरूम ड्रामा बघत होतो. त्यातले वकील अतिशय ठाम शब्दांत आणि सोफेस्टिकेटेड बोलत होते. न्यायाधीशसुद्धा खूप नाट्यमयरीत्या ते संमत करून घेत होते. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, आपल्याकडच्या कोर्टात तरी 100 टक्के असं काही अजिबात नसणार. एखाद्या न्यायालयात जाऊन पाहिलं पाहिजे की, तिथे नक्की काय घडतं. रामूने मला त्यांच्या एका विद्यार्थ्याचा किस्सा सांगितला होता. त्या विद्यार्थ्याला पोलिस स्टेशनला जावं लागलं होतं, तिथे त्याला कशाचातरी प्रिंटआउट हवा होता आणि त्यासाठी त्याला दीड-दोन तास थांबावं लागलं. कारण तिथे कुठल्याच कर्मचाऱ्याला हे माहीत नव्हतं की, प्रिंटर वापरायचा कसा! मी अंधेरीच्या मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये, गोरेगावच्या सेशन कोर्टमध्ये गेलो. तिथेही मला जाणवलं की, तिथे एका पातळीवरचं विनोदी वातावरण आहे. तिथे लोक बोलताना अडखळत आहेत, त्यांचा एखादा शब्द चुकतो आहे. आणि ही सगळी सामान्य माणसंच आहेत. यातला एखादा माझ्या नातेवाईकही असू शकतो. पण इथे मात्र ती वेगवेगळ्या पदांवर आहेत. तिथे ॲफिडेव्हिटचं काम करून देणारे काही वकील चुरगळलेले कोर्ट घालून सेल्समनसारखे उभे होते. हे सगळं पाहून मला धक्काच बसला. तिथून मग ‘कोर्ट’चा प्रवास सुरू झाला आणि मग त्या कथानकातले निरनिराळे पदर मला उलगडत गेले. 2011च्या सुमारास मी ‘कोर्ट’ लिहायला सुरुवात केली आणि 2012 च्या शेवटच्या महिन्यात ती संहिता लिहून पूर्ण झाली. त्यापूर्वी मी कोणतीही फीचर फिल्म केलेली नव्हती. विवेकनेही कुठल्या सिनेमाची निर्मिती केलेली नव्हती त्यामुळे आमच्यासाठी हे नवीन होतं. फंडिंगसाठी आम्ही खूप ठिकाणी विचारणा केली होती. पण आम्हांला कोणीही भाव दिला नाही. त्यामुळे सगळे पैसे विवेकलाच उभे करावे लागणार होते. ‘फोर स्टेप’ आणि ‘सिक्स्थ स्ट्रँड’ केलेलं असल्यामुळे खूपशा चुका पूर्वीच करून झालेल्या होत्या. फिल्ममध्ये व्यग्र असणाऱ्या कुठल्याही मोठ्या ‘स्टार’मागे पळायचं नाही, खूप इगो असणाऱ्या अभिनेत्यांसाठी वर्ष-वर्षभर थांबायचं नाही अशा सगळ्या गोष्टी पक्क्या होत्या. एखादं पथनाट्यसुद्धा जेव्हा तुम्ही स्वतः करता आणि त्यासाठी दहा लोकांना गोळा करता तेव्हा तुम्हांला जे शिक्षण मिळतं ते कुठल्याही फिल्म स्कूलमध्ये मिळत नाही. ‘कोर्ट’ करण्याआधी माझे एवढे अपमान सहन करून झाले होते, इतके वाईट लोक भेटले होते, इतके वाईट अनुभव आले होते की या वेळेला काही गोष्टी माझ्या मनात अगदी स्पष्ट होत्या. मला माझ्या व्हिजनवरती विश्वास ठेवणारे लोक माझ्या फिल्ममध्ये हवे होते. विवेकचा खंदा पाठिंबा तर होताच. मला वास्तव चित्रणाची आवड होती. वर्ल्ड सिनेमामधल्या तशा फिल्म्सचा माझ्यावर प्रभाव होता. त्याशिवाय रामूंमुळे मुंबईला समजून घेण्याचं माझं एक फॅसिनेशन होतं. संभाजी भगत, कबीर कला मंच या सगळ्यांची मुंबईत एक दुनिया होती; त्याविषयी मला आकर्षण होतं.

‘कोर्ट’ची सगळी टीम चांगली होती. त्याआधी मला जितके वाईट अनुभव आले होते तितकेच चांगले अनुभव मला ‘कोर्ट’च्या निमित्ताने मिळाले. तशी ती बरीच मोठी फिल्म आहे आणि ती मुंबईत चित्रित करणं खूप कठीण होतं. त्यात बरेच नॉनॲक्टर्स होते, खरीखुरी लोकेशन्स होती, संहितासुद्धा पारंपरिक पद्धतीची नव्हती; त्यामुळे कामाचा ताण खूप होता. पण स्वतंत्रपणे आपल्या मनासारखी एखादी गोष्ट करण्याची एक मजा असते त्यामुळेच हे सगळं शक्य झालं. कुठल्या ‘स्टार’साठी किंवा ‘स्टुडिओ’साठी आपण आपल्या संहितेत बदल करत नाही आहोत आणि सगळ्या टीमला आपल्या ‘थीम’वरती विश्वास आहे ही जाणीव खूप आनंददायक होती. ‘कोर्ट’मध्ये खूप वेगवेगळे प्रयोग आम्ही केले. त्यातून आम्हांला सगळ्यांनाच खूप काही शिकायला मिळालं. "That was my proper film school."

प्रश्न - सिनेमाचं प्रचलित शिक्षण तू घेतलं नव्हतंस; मग सिनेमा बनवण्यासाठी, लोकांकडून आपल्याला अपेक्षित असलेलं काम करवून घेण्यासाठी आवश्यक तंत्रं तुला कशी सापडत गेली?

- मी पूर्वी नाटकांमध्ये खूप काम केलं होतं आणि रूढार्थाने सिनेमाचं शिक्षण घेतलेलं नसलं तरी सिनेमानिर्मितीचा अभ्यास खूप केला होता. आपल्याला सिनेमाचं प्रशिक्षण नाही या काहीशा असुरक्षिततेच्या भावनेमुळे उलट मी सिनेमाचा जास्तच अभ्यास केला होता. त्याशिवाय प्रत्यक्ष काम करताना मला खूप गोष्टी कळत गेल्या. आपल्या शिक्षकांचे, आपल्याला प्रभावित करून गेलेल्या व्यक्तींचे परिणाम आपल्यावर असतात, त्याशिवाय आपल्या अंतःप्रेरणासुद्धा असतात, या सगळ्यांतून माझा दृष्टिकोन आकाराला आला. या क्षेत्रात काम करण्याचा काहीएक विशिष्ट ‘फॉर्म्युला’ नसतो. दहा अभिनेत्यांशी संवाद करायचा असेल तर संवादाच्या दहा वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागतात. नॉनॲक्टर्सच्या बाबतीत तर कुठलाच सुसंगत फॉर्म्युला नसतो. आजूबाजूच्या लोकांचं सहकार्यसुद्धा गरजेचं असतं. उदाहरणार्थ, आमचा कॅमेरामन मृणाल देसाई याचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. डीओपीने (directors of photography) आणि निर्मात्याने दिग्दर्शकाचा मान ठेवला तर अख्खा सेट दिग्दर्शकाचा मान ठेवतो. मी जवळपास पंचविशीत होतो तरी मला या सगळ्यांचं सहकार्य होतं. कारण एकोणीस वर्षांचा असल्यापासून मला कामाचा अनुभव होता. पडद्यावरच्या कास्टिंगइतकीच पडद्यामागची कास्टिंगही महत्त्वाची आहे हे मला लक्षात आलेलं होतं. आपल्या सेटवर कामाची पुरेशी ऊर्जा असणं चांगल्या सिनेमासाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे खूप यशस्वी लोकांसोबत काम करण्यापेक्षा सकारात्मक ऊर्जेने भारलेल्या लोकांसोबत काम करणं मला माझ्या सिनेमाच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं वाटतं. आपल्यासोबत काम करणारे लोक आपल्या सिनेमाला किती गांभीर्याने घेतात आणि त्यात किती इमानदारीने काम करतात हे जास्त महत्वाचं आहे. 'More than the result, process is everything.' हा माझा मंत्र आहे.

प्रश्न - सिनेमा तयार झाला तेव्हा आपण त्यासाठी घेतलेले कष्ट सार्थकी लागले असं तुला वाटलं?

- त्यासाठी मी टीमविषयी खूप कृतज्ञ आहे. आम्हांला वाटलं होतं त्यापेक्षा खूप चांगला प्रतिसाद या सिनेमाला मिळाला. मोठमोठे पुरस्कार मिळाले. ‘व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल’सारख्या जगातल्या सर्वांत जुन्या फेस्टिव्हलमध्ये ती दाखवली गेली. हे सगळं आम्हांला अपेक्षित नव्हतं. मला माझा पहिला सिनेमा बनवता आला, आणि आपल्याला जी गोष्ट सांगायची होती ती आपल्याला अटी-शर्तीवरती सांगता आली याचाच आनंद मोठा होता. त्यानंतर त्या सिनेमाला जे यश मिळत गेलं ते तर आमच्यासाठी ‘सरप्राइज’ होतं.

प्रश्न - ‘कोर्ट’ प्रदर्शित होऊन आता पाच-सहा वर्षांचा काळ लोटला आहे आणि अजूनही तो  'one of its kind' असाच सिनेमा आहे. त्याचं कौतुक तर झालंच; पण काही विचित्र संकटंही ‘कोर्ट’च्या प्रवासात होती. जो सिनेमा ‘सेन्सॉरशिप’विषयी भाष्य करतो त्याच्याच बाबतीत ‘सेन्सॉर’चे आक्षेप असणं हा विरोधाभास गमतीशीर होता?

- सेन्सॉर बोर्डच्या ज्या सदस्यांनी हा सिनेमा पाहिला त्यांच्या लक्षातच आलं नाही की, हे फिक्शन आहे की डॉक्युमेंटरी आहे? सेन्सॉर बोर्डच्या मीटिंगच्या वेळी मी इटलीला होतो. विवेक त्या मीटिंगसाठी गेला होता. फिल्म पाहिल्यावर बोर्डच्या सदस्यांनी त्याला विचारलं की, काय झालं या माणसाचं? तो तुरुंगात आहे की कुठे आहे? असं कसं? तुम्ही या केसचा शेवट दाखवलेला नाही. विवेकला त्यांना समजवावं लागलं की, ही डॉक्युमेंटरी नाही तर फिक्शन आहे. सिनेमात, एका दृश्यात नारायण कांबळेच्या तोंडी ‘त्याची आयमाय करीन’ असा एक संवाद आहे. त्यातला ‘आयमाय’ हा शब्द त्यांनी आम्हांला सेन्सॉर करायला सांगितला. यात सेन्सॉर करण्यासारखं काय होतं? वकील गीतांजलीला कोणीतरी म्हणतं, ‘आता यांना जज बनवा. यांना रोज नवीन नवीन चेहरे पाहायचे आहेत’ यावरही त्यांचा आक्षेप होता. सध्याच्या काळातलं राजकीय वातावरण पाहता आम्हांला भीती होती की, ते संपूर्ण सिनेमावरच बंदी घालतील. कारण त्यांना तो कितपत कळला आहे याविषयी मला शंका होती. त्या मानाने ‘सस्ते में छूट गये’ असंच आम्हांला वाटलं.

प्रश्न - तुझ्या स्वभावाला आणखी एक पैलू आहे, त्याविषयी मला विचारायचं आहे. तू म्हणालास तसं फिल्ममध्ये वास्तववादी चित्रण करण्याला तू महत्त्व देतोस. पण त्याशिवाय तुला ‘मॅजिक’ या विषयाचीही खूप आवड आहे...?

- वयाच्या एकोणिसाव्या वर्षी जेव्हा मी सिनेमाच्या प्रेमात पडलो तेव्हाच जादूच्याही प्रेमात पडलो. गेली पंधरा वर्षं मी स्वतःसाठी जादूचे प्रयोग करत असतो. त्यातून मला सिनेमासाठीही खूप काही शिकायला मिळालं आहे. अनेक मोठमोठ्या दिग्दर्शकांना जादूचे खेळ करण्यात खूप रस होता. दादासाहेब फाळके, सत्यजित राय, ऑरसन वेल्स, वूडी ॲलन अशी काही नावं सांगता येतील. या दोन्ही क्षेत्रांमध्ये अनेक साम्यं तर आहेतच, पण पूर्वी जादूगार असणाऱ्या अनेकांनी सिनेमाच्या क्षेत्राला मोठं केलेलं आहे. लुमिये ब्रदर्स, जॉर्ज मेलिए, हॅरी हुडिनी हे जगप्रसिद्ध जादूगार सिनेमे बनवत होते.

जादूमध्ये समोरच्या व्यक्तीच्या अंतर्मनाशी (subconscious) शी संवाद घडत असतो; तसं सिनेमातही, जे पडद्यावर सूचित केलेलं आहे ते प्रेक्षकाच्या मनात पूर्ण होतं. जादू म्हणजे 90 टक्के मानसशास्त्रच आहे. लोकांना जादू म्हणजे हातचलाखी वाटते. पण खरं तर जादू ही पाहणाऱ्याच्या मनात घडत असते. सिनेमातही पडद्यावर तुम्ही जे पाहता त्याच्याशी तुम्ही सतत संवादात असता. पडद्यावर साकारणाऱ्या दोन कल्पनांमधून तिसरी कल्पना तुमच्या मनात निर्माण होते. प्रकाशयोजनेमधून, ध्वनीमधून, लोकेशन्समधून, प्रत्यक्ष अभिनयातून, एडिटिंगमधून सतत तुमच्या अंतर्मनामध्ये एखादा अनुभव निर्माण करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करत असतो. हे मी जादूमधूनच शिकलो. सिनेमाप्रमाणेच तीही गोष्ट मी स्वतः अभ्यास करूनच शिकून घेतली आहे. जादूमुळे माझी सॅनिटी टिकून आहे. खूप काम केल्यानंतर इतर लोक बाहेर पार्टीला जातात किंवा इतर लोकांसोबत बसून गॉसिप करतात. अशा वेळी मी मात्र घरी बसून जादूचे प्रयोग करतो. ‘डिसायपल’चं शूटिंग संपल्यासंपल्या मी दुसऱ्याच दिवशी लंडनच्या फ्लाइटवर होतो. कारण मला तिथल्या ‘मॅजिक कन्व्हेन्शन’ला उपस्थित राहायचं होतं.  सिनेमासारखाच जादू हाही एक किडा आहे; एकदा तो तुम्हांला डसला की सहजासहजी सुटत नाही!

भारतात जादूविषयीची कल्पना काहीतरी भलतीच आहे. कोणा लहान मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये चित्रविचित्र कपडे घालून येणारा आणि टोपीतून काहीतरी काढून दाखवणारा तो जादूगार- अशीच आपली समजूत असते. पण हा खूप खोल विषय आहे. जगातल्या अतिशय जुन्या व्यवसायांपैकी हा एक व्यवसाय आहे. आणि माझ्या दृष्टीने प्रत्येक चांगली कला ही एक जादूच असते. कारण तिचा आपल्यावर परिणाम का होतो हे आपण सांगू शकत नाही; आपण केवळ थक्क होऊन गेलेलो असतो. या दृष्टीने, स्वयंपाक करणे ही गोष्टसुद्धा मला सिनेमासारखीच वाटते. एखादा पदार्थ आपण जिभेवर ठेवतो आणि वेगळ्याच विश्वात हरवून जातो. वास्तविक तो पदार्थ कशाकशाचा बनलेला आहे हे आपल्याला सांगता येईलच; पण त्याचा परिणाम आपण तितक्या ठोसपणे सांगू शकत नाही.

प्रश्न - आता आपण तुझ्या अलीकडच्या सिनेमाकडे वळू या. ‘द डिसायपल’ 2020मध्ये प्रदर्शित झाला. त्याला व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट स्क्रीन प्ले ॲवार्ड’ही मिळालं. आता नेटफ्लिक्सवर उपलब्ध झाल्यामुळे सामान्य प्रेक्षकांपर्यंतही तो पोहोचला आहे.  शास्त्रीय संगीत, त्यातलेही अभिजात घटक आणि लोकप्रिय घटक, त्यातली गुरुशिष्य परंपरा, आणि मुख्य म्हणजे होतकरू कलाकाराच्या मनातलं द्वंद्व हे सगळं वास्तववादी पद्धतीने पडद्यावर दिसू शकतं ही गोष्ट मला हा सिनेमा पाहताना अभिनव वाटली होती. ‘कोर्ट’सारखा यशस्वी सिनेमा झाल्यानंतर या थीमपर्यंत येण्याचा आणि मग पुढे या सिनेमाचा प्रवास कसा होता?

- काही दिग्दर्शक सिनेमाचा प्लॉट आधी लिहितात, तर काही एखाद्या प्रसंगाने लिहायला सुरुवात करतात. माझी पद्धत अशी असते की, थीम माझ्या डोक्यात आधी तयार होते आणि सगळ्यांत शेवटी प्लॉट लिहून होतो. कोर्ट झाल्यानंतर मी एका नव्या थीमवरती काम करत होतो. त्याच दरम्यान मला अचानकच शास्त्रीय संगीताचा नाद जडला. आणि मग मी खूप मैफलींना जायला लागलो. पण मी ठरवलं होतं की, भारतभर प्रसिद्ध असणाऱ्या कुठल्याही मोठ्या गायकाकडे आपल्याला जायचं नाही. जे व्यावसायिकदृष्ट्या फारसे यशस्वी नाहीत,  मुख्य प्रवाहाच्या बाहेर काम करतात अशा कलाकारांमध्ये मला रस होता. यशस्वी लोकांमध्ये एक survival bias असतो आणि ते fairy-tale examples असतात, ज्यांच्याकडे पाहून इतर लोकांना प्रेरणा मिळते. पण 99 टक्के लोकांचं आयुष्य तसं नसतं. मला त्यांच्यात जास्त रस होता. त्या दृष्टीने मुंबईतच मला खूप काही ऐकायला-बघायला मिळालं.  एनसीपीएमधल्या मोठ्या कॉन्सर्ट्‌सनासुद्धा मी गेलो होतो. पण पार्ले, डोंबिवली, ठाणे, चेंबूर इथे कुठल्यातरी लहान हॉलमध्ये किंवा शाळेमध्ये होणारे कार्यक्रमही मी आवडीने जाऊन ऐकले. त्या काळात मला शास्त्रीय संगीत ऐकायचं भूत लागलं होतं! मी रोज सकाळी पेपर उघडून आज कुठे कुठे काय आहे ते पाहायचो, तिथे माझ्या मित्रांना घेऊन जाऊन गाणं ऐकायचो. 'The story took hold of me I didn't took hold of the story या 'classic cliche' प्रमाणे मग पुढे सगळं होत गेलं.

‘डिसायपल’साठी मी खूप प्रवास केला. कोलकता, दिल्ली, अहमदाबाद अशा ठिकाणी गेलो, खूप गायकांशी बोललो. या सगळ्या प्रक्रियेतून खूप नवीन गोष्टी कळत गेल्या; नवीन विचार, नवीन जीवनपद्धती दिसल्या. शास्त्रीय संगीत त्या पातळीवर खूपच समृद्ध आहे. त्याला कित्येक वर्षांचा इतिहास आहे. ते खऱ्या अर्थाने ‘भारतीय’ आहे. अनेक धर्म, अध्यात्म, संस्कृती यांच्याशी ते जोडलेलं आहे. हे भारतातच घडू शकतं. ‘डिसायपल’मध्ये जी थीम होती ती मी ‘ग्रे एलिफंट’मध्ये पूर्वीही हाताळली होती. तिथे एका जादूगाराची कथा होती. ‘डिसायपल’मध्ये शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या एका सामान्य कलाकाराची गोष्ट आहे. कालांतराने त्याच्या लक्षात येतं की, त्याचं गाणं सर्वसामान्य दर्जाचं आहे. पण या कलेतून कुठपर्यंत जाता येऊ शकतं हे त्याला माहीत आहे. मात्र त्याला हेही माहीत आहे की, तो स्वतः तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि मग तो त्या जाणिवेसोबतच जगत राहतो. ही ढोबळ थीम माझ्या डोक्यात होती. पण पुढच्या सगळ्या अभ्यासातून त्या सिनेमातली पात्रं, त्यातल्या घटना, त्यांचे लोकेशन्स हे सगळं मलाही सापडत गेलं. या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतोच. या सिनेमामध्ये बऱ्याच थीम्स आहेत- त्यातल्या काही माझ्या मनातल्या आहेत, काही मला सतावणारी स्वप्नं आहेत, मला वाटणारी भीती आहे; तर काही थीम्स मला बाहेरून मिळालेल्या आहेत. हे सगळं झाल्यानंतर ‘लिहिणं’ ही माझ्यासाठी फक्त एलिमिनेशनची प्रक्रिया असते. कारण मी त्या विषयातला माझा अभ्यास दाखवण्यासाठी किंवा कुठला संदेश देण्यासाठी सिनेमा बनवत नाही. निरनिराळ्या अनुभवांचा साठा तुमच्यापाशी जमा होतो आणि मग शेवटी त्यातून सिनेमा या माध्यमासाठी काय आवश्यक आहे तेवढंच तुम्ही ठेवता.

सिनेमाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगतो की, केवळ सिनेमे पाहून तुम्ही सिनेमे बनवू नका. खऱ्या आयुष्यात येणारे अनुभव हे तुमचं रॉ मटेरिअल असायला हवं. डिसायपल बनवण्यापूर्वी मी दोन वर्षं त्याच्या संशोधनात घालवली होती. संशोधनाची प्रक्रिया चालू असताना मी खरोखरच नवीन जन्म घेत असतो, दहा नव्या गोष्टी मला त्या प्रक्रियेतून कळत असतात. दहा वेळा माझा मृत्यू होत असतो. कारण माझ्या कित्येक धारणांवर प्रश्नचिन्ह उभं राहत असतं. पण एकदा सिनेमा लिहून पूर्ण झाला की पुढच्या गोष्टी त्या मानाने सरळ मार्गाने घडत जातात. तुम्ही केवळ लोकांची भावना चाळवण्यासाठी काम करत नसाल, आपल्या कलेतून सत्य शोधण्यासाठी तुमची धडपड असेल तर हे आपसूक तुमच्याकडून होतंच.

‘डिसायपल’मध्ये सगळ्यांच तांत्रिक गोष्टी ‘कोर्ट’पेक्षाही जास्त काळ चालल्या होत्या. ‘कोर्ट’मध्ये निदान दोन मुख्य पात्रांत व्यावसायिक कलाकार होते ‘डिसायपल’मध्ये सगळेच नॉनॲक्टर्स आहेत. ‘डिसायपल’चं बजेटसुद्धा ‘कोर्ट’पेक्षा पाच पटींनी मोठं होतं. बऱ्याच लोकांना ‘कोर्ट’ ‘डिसायपल’पेक्षा जास्त आवडतो; तर काही लोकांना ‘डिसायपल’ जास्त आवडतो.  मला विचाराल तर तांत्रिक पातळीवरती ‘डिसायपल’ हा सिनेमा ‘कोर्ट’पेक्षा फारच पुढे आहे.  शिवाय मीही एक कलाकार असल्यामुळे वकील किंवा कार्यकर्ता यांच्या प्रवासापेक्षा शरदचा प्रवास मला जास्त जवळचा वाटतो.

प्रश्न - 'Rolex Mentor and Protµgµ Arts Initiative' या प्रकल्पाच्या अंतर्गत तुला अल्फान्सो कोरॉन या एका मोठ्या दिग्दर्शकाचा जवळून सहवास मिळाला. चिल्ड्रेन ऑफ मेन, ग्रॅव्हिटी, रोमा असे सर्व स्तरांवर नावाजले गेलेले सिनेमे बनवणाऱ्या या दिग्दर्शकाकडून तुला कोणत्या गोष्टी शिकता आल्या?

- या प्रोग्रॅमविषयी मला 2012 पासूनच ठाऊक होतं. पण त्यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हांला त्यांच्याकडून आमंत्रण यावं लागतं, आपण स्वतःहून त्यासाठी अर्ज करू शकत नाही. त्यामुळे ते आमंत्रण आलं तेव्हा मला अतिशय आनंद झाला. त्या अंतर्गत ‘रोमा’ या सिनेमाची निर्मिती प्रक्रिया मला पाहता आली आणि अल्फान्सोंशी अनेक गोष्टींवर थेट चर्चा करता आली. मला या क्षेत्रामध्ये कोणी एक विशिष्ट गुरू नव्हता. त्यामुळे अल्फान्सोंसारखी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात हवी असं मला खूप तीव्रतेने वाटत होतं. ते माझं स्वप्न पूर्ण झालं. त्यांच्यामुळे तांत्रिक बाबतीत माझ्या जाणिवा अधिक सूक्ष्म झाल्या. ‘डिसायपल’ला तर त्यांनीच आकार दिला. अनेक महत्त्वाचे तांत्रिक सल्ले तर दिलेच, शिवाय ते त्या सिनेमाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत.

प्रश्न - तुझ्या या दोन्ही सिनेमांमध्ये काम करणाऱ्या, महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या व्यक्ती नुकत्याच हे जग सोडून गेल्या. वीरा साथीदार आणि सुमित्रा भावे या त्या दोन व्यक्ती. त्यांच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?

- एप्रिलचा महिना माझ्यासाठी अतिशय धक्कादायक होता. माझे काका, काकी, वीराजी आणि सुमित्रामावशी हे चौघेही त्या महिन्यात गेले आणि डिसायपल त्याच महिन्यात प्रदर्शित झाला. त्यामुळे मला त्याच काळात पत्रकारांशी बोलावं लागत होतं. तो काळ माझ्यासाठी खूप धक्कादायक होता. कोरोनाची दुसरी लाट तेव्हा सुरू होती. वीरा साथीदार हा अद्भुत माणूस होता. ‘कोर्ट’मधलं त्यांचं पात्र हे इतकं अवघड होतं की, ते भेटण्याआधी त्या पात्रासाठी योग्य व्यक्ती मिळण्याची आशा आम्ही सोडूनच दिली होती. त्या पात्राचं काम करणाऱ्या व्यक्तीला गाता येणं, अभिनय करता येणं गरजेचं होतं; शिवाय त्या पात्रासाठी योग्य दिसणं आवश्यक होतं. त्यासाठी वेळ देणंही आवश्यक होतं. वीराजींनी हे सगळं अतिशय हसत-खेळत आणि सहजपणे केलं. ते नसते तर सिनेमा इतका यशस्वी झाला नसता. या सिनेमासाठीचा अभिनय हा त्यांच्या आयुष्यातला एक भाग झाला; त्यापलीकडे भारतभरच्या दलित चळवळीला असलेलं त्यांच्या कवितांचं, नियतकालिकाचं योगदान खूप मोठं आहे. नॉनॲक्टर्ससोबत काम करत असताना 30 ते 40  वेळा मला एकेका व्यक्तीचा टेक घ्यावा लागे. पण नारायण कांबळेचा कोर्टातला जो प्रसंग आहे तेवढ्याच एका प्रसंगासाठी त्यांना फक्त पाच ते सहा टेक घ्यावे लागले; आणि तेसुद्धा अधिकचे असावेत म्हणून! सिनेमासाठी, त्यातल्या गाण्यांसाठी त्यांनी खूप मेहनत केली होती.  सिनेमासाठी त्यांची निवडही खूप ऐन वेळी झाली होती आणि प्रत्यक्षात ते कसं काम करू शकतील याविषयी आम्हांला काहीच कल्पना नव्हती. पण थोड्या दिवसांनी ते मला म्हणत की, चैतन्य ही खूप मोठी फिल्म होणार आहे.

सुमित्रामावशीच्या बाबतीतही असंच होतं. ती आमच्या सेटवर आली तेव्हा तिने एखाद्या आजीसारखे माझे लाड केले. कारण ती पहिल्यांदाच सेटवर दिग्दर्शक म्हणून आलेली नव्हती. तिच्या रेकॉर्डिंगसाठी मी तीन दिवस ठेवले होते. कारण तिची काम करण्याची पद्धत काय आहे याचा मला अंदाज नव्हता. पण ती आली आणि जवळजवळ निम्म्या दिवसात तिने काम संपवलं. तिच्या सोबतच्या गप्पांतून मला अनेक गोष्टी कळत गेल्या. स्वतःची लाज वाटली की, मी इतका ताण का घेतो? मी इतकी तक्रार का करतो? 84व्या वर्षी त्या स्त्रीचा - फक्त काम करण्याचाच नव्हे तर एकूण जगण्यातला - उत्साह मला लाजवणारा होता. आयुष्य जगणं हे कशाहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे असं ती मला म्हणायची. या दोघांबरोबर काम करण्याचा अनुभव मला खूप प्रेरणा देणारा होता. मला नेहमी असं वाटतं की मी यांच्या वयाच्या असताना यांच्यासारख्या असू शकलो तर मी गड जिंकला!

मुलाखत व शब्दांकन: सुहास पाटील
suhas.horizon@gmail.com
Mob. : 8668870869

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

चैतन्य ताम्हाणे,  मुंबई
tamhane.chaitanya@gmail.com

सिनेदिग्दर्शक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके