डिजिटल अर्काईव्ह

गुरुजींच्या मनाचा स्थायीभाव होता नैराश्य. तरुण मनांच्या सहवासात त्यांच्या मनाला थोडी उभारी लाभे. गुरुजींच्या स्वभावाचे एक वैशिष्ट्य होते. त्यांना आपल्यातील गुणांची फारशी जाणीव नसे. मात्र आपल्या उणीवा त्यांना फार तीव्रतेने बोचत. एखादा उत्तम गाऊ लागला की त्यांना वाटे, आपल्याला असे गाता येत नाही. आपले जीवन व्यर्थ! कुणी उत्तम चित्रकार असेल तर गुरुजींना आपल्यात त्या कलेचा अभाव असल्यामुळे खंत वाटे!

1940 साली दसऱ्याच्या सुमुहूर्तावर श्री मधू लिमये यांना युद्धविरोधी भाषणांबद्दल धुळे येथे अटक करण्यात आली. त्या काळात ते खानदेश मध्ये समाजवाद पक्ष बांधणीचे कार्य करत होते. कामगार संघटनांचेही काम चालू होते. साक्री तालुक्यात केलेल्या युद्धविरोधी भाषणांबद्दल ती अटक होती. त्यावेळी मधूचे वय अठरा वर्षांपेक्षा कमीच होते. कोर्टात त्यांनी मला वाटेल तेवढी शिक्षा द्या. हे युद्ध आमचे नाही. हिंदुस्थानला या युद्धात जबरदस्तीने लोटण्यात आलेले आहे. असे ठणकावून सांगितले होते. त्यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठाववण्यात आली होती, पण वय लहान असल्यामुळे त्याची रवानगी ‘बच्चा कोठ्या’त (ज्युवेनाईल वॉर्ड) करण्यात आली. 1930 च्या चळवळीतील राजबंदी सुदून गेल्यावर जेलमधील अधिकाऱ्यांना ‘राजबंदी’ ह्या प्राण्याचा विसर पडला होता. त्यामुळे एखादा सामान्य गुन्हेगाराप्रमाणे मधूचे केस झिरो मशीनने भादरण्यापासून त्यांची सर्व प्रकारे विटंबना करण्यात आली! मुख्य जेल अधिकारी ‘ब्लेक’ आल्यावर त्यांच्या ध्यानात ही चूक झाली व त्यांनी गुन्हेगार मुलांपासून वेगळे काढले व स्वतंत्र बराकीत ठेवले. हळू हळू जेलमधील इतर मंडळीच्यादेखील ही गोष्ट लक्षात आली. मधूचे कोवळे वय, त्यांची बुद्धिमत्ता यांचा प्रभाव जेलर, वॉर्डर इ.वर लवकरच पडला. ते त्याच्याशी सहानुभूतीने वागू लागले. त्यांना पुस्तके, कंदील इ. सोयी करून देऊ लागले. कामाची त्यांच्यावर विशेष सक्ती होत नव्हती.

धुळ्याच्या तुरुंगात पहिली भेट

1941 च्या जानेवारी महिन्यात गांधीजींच्या वैयक्तिक सत्याग्रहातील मंडळी जेलमध्ये येऊ लागली. साने गुरुजींना नाशिक जिल्ह्यात युद्ध विरोधी भाषणे केल्याबद्दल दोन वर्षांची सक्त मजुरीची सजा फर्मावण्यात आली होती. त्यांना ‘ब’ वर्ग देऊ केला होता, पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर रहाता यावे म्हणून त्यांनी ‘क’ वर्ग मागून घेतला. जनसामान्यांच्या सुखदुःखाशी समरस होणारे, त्यांच्यावर सहानुभूतीचा वर्षाव करणारे गुरुजी त्यांच्यापासून दूर कसे रहातील? शिवाय ‘ब’ वर्गातील काही दुढ्ढाचार्यांना गुरुजी बुजतही. त्यांचा स्वभाव फार संकोची होता. गुरुजी आणि मधू या दोघांचीही कर्मभूमी खानदेशच. ते एकमेकांबद्दल पुष्कळ ऐकून होते, पण त्यांची प्रत्यक्ष भेटी झाली ती धुळ्याच्या तुरुंगात!

नवे स्नेहसंबंध

साने गुरुजी धुळे जेलमध्ये आल्यानंतर काही वेळाने स्नानाच्या जागी त्यांची व मधूची पहिली भेट झाली. गुरुजींनी येताना त्यांच्यासाठी नाशिकच्या तुरुंगातून एसेम, शिरूभाऊ, बंडू गोरे इ.ची पत्रे आणली होती. युसूफ मेहेरअल्लींनी दिलेली पुस्तके आणली होती. त्यामुळे मधूचा इतके दिवस बाह्य जगाशी तुटलेला संबंध पुन्हा प्रस्थापित झाला. गुरुजींच्या प्रेमळ सहवासाने त्यांच्या हृदयात नवचैतन्य संचारले मधुनी लहान वयात देशकार्यासाठी घरादाराकडे पाठ फिरवली. ध्येयासाठी आपल्या शिक्षणाला तिलांजली दिलेली पाहून गुरुजींना फार कौतुक वाटे. त्यांच्या व्यासंगामुळे, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सखोल अभ्यासामुळे गुरुजींचे मन त्यांच्याकडे अधिकच ओढ घेई. गुरुजींमुळे मधूना अनेक स्नेही लाभले. डॉ. उत्तम पाटील, ओंकार पाटील हे सर्व त्यापैकीच होत.

साने गुरुजींची रदबदली

नवे राजबंदी आल्यामुळे राजकीय चर्चेसाठी साहजिकच मधूचा मोर्चा या कोठ्यातून तिकडे वाचनासाठी वळू लागला. त्यामुळे डेप्युटी जेलर जोशी (त्याला सर्वजण काणा जोशी म्हणत.) त्यांच्यावर जळफळे ‘बच्चा कोठ्यातून बाहेर जाण्याची तुम्हाला परवानगी नाही’ असे दरडावून सांगे. मधू त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिकडे धाव घेत. ते म्हणत ‘’मी राजबंदी आहे. मी त्यांच्याबरोबरच रहाणार.’’ अखेर जेल सुपरिटेंडेंटना गुरुजींनी सांगितले की, ‘’मधू लिमये वयाने लहान असले तरी बुद्धी, व्यासंग या सर्व दृष्टीने ते परिपक्व आहेत, ते राजबंदी आहेत. गुन्हेगार नव्हेत. त्यांना आमच्यात राहू द्या.’’ गुरुजींनी केलेली मध्यस्थी उपयोगी पडली आणि दिवसा मधूना आठ कोठ्यांत जाण्याची परवानगी मिळाली.

साने गुरुजी म्हणजे मूर्तिमंत प्रेरणा

या काळात गुरुजींचा कम्युनिस्टांच्या ध्येयधोरणाबद्दल व कार्यपद्धतीबद्दल भ्रमनिरास होऊ लागला होता. कम्युनिस्टांची परप्रत्ययनेयबुद्धी, राष्ट्रविरोधी भूमिका हिंसाहिंसेचा अविवेक या सर्व गोष्टींमुळे ते कम्युनिस्ट राजकारणाला जास्त जास्त विटू लागले. मधूनी कम्युनिस्टांच्या डावपेचांचा व आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास केला होता. त्यांच्याशी चर्चा करून गुरुजींचे मन समाजवादी पक्षाकडे ओढ घेऊ लागले. गुरुजींप्रमाणेच त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या मनात समाजवादी पक्षाबद्दल आकर्षण निर्माण झाले. गुरुजींना मुख्यतः गोरगरिबांचे, दीनदलितांचे कल्याण साधावयाचे होते. त्या दृष्टीने ते कम्युनिस्ट राजकारणाकडे पहात होते, पण लोकशाहीवादी मानवी मूल्यांची जपणूक करणारा समाजवादी पक्ष गुरुजींना अधिक जवळचा वाटला. अर्थात गुरुजींना समाजवादी पक्षाबद्दल वाटणारी आपुलकी ही वैचारिक, तात्विक दृष्टिकोणापेक्षा मधूबद्दल वाटणाऱ्या आत्मीयतेतेतून अधिक निर्माण झाली होती. मधू जेलमधून सुटल्यावर नानासाहेब गोरे यांच्यासारख्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांना गुरजींमधील वैचारिक परिवर्तनाबद्दल सांगितले. त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ते म्हणाले, ‘’तू फार मोठे काम केलेस. गुरुजी समाजवादी पक्षात येऊन मिळाले तर प्रचंड शक्ती निर्माण होईल. गुरुजी म्हणजे मूर्तिमंत प्रेरणा. तुझा या कामात सिंहाचा वाटा आहे.’’

धुळे जेलमध्ये मधूनी समाजवादावर अभ्यासवर्ग चालवावा अशी त्यांना सर्व राजबंद्यांनी विनंती केली, गुरुजींनीही फार आग्रह केला. मधू प्रथम म्हणत होते, ‘’तो माझा अधिकार नाही. तशी माझी योग्यता नाही.’’ पण सर्वांच्या आग्रहावरून त्यांनी धुळे तुरुंगात समाजवादावर 19 व्याख्याने दिली. त्याचा त्यांनी कच्चा आराखडा तयार केला. ते विवेचन अतिशय गंभीरपणे करत. समोर बघून किंवा अंतराळात दृष्टी लावून ते बोलत असत. विषय सोपा करून सांगण्याकडे त्यांची प्रवृत्ती होती. पण विषयाला ते फारसे हलकेफुलके रूप देत नसत. त्यामुळे एका कोपऱ्यात बसून गुरुजी या भाषणांच्या नोटस् घेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही.

पुढे मधू जेलमधून सुटल्यावर काही महिन्यांनी जेलचा एक शिपाई गुरुजींचे एक पत्र व दोन जाडजूड वह्या घेऊन आला. गुरुजींनी पत्रात लिहिले होते, तुझ्याच व्याख्यानांच्या आधारे हे लिखाण केलेले आहे. त्यातील विचार आशय सारे काही तुझेच आहे. माझ्या लेखनात काही चुका झाल्या असल्या तर माफ कर. मधू ते लेखन पाहून थक्क झाले! गुरुजींनी बव्हंशी आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावर ही व्याख्याने लिहून काढली होती. मधूच्या विचारांवर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, लेखनशैलीचा साज चढवला होता. आपल्या नावाने ते लेखन प्रसिद्ध करणे मधूना प्रशस्त वाटले नाही. मग मधू लिमयांच्या भाषणांच्या आधारे हा ग्रंथ गुरुजींनी लिहिला आहे, असे प्रस्तावनेत लिहावे असे दोघांत ठरले. हा प्रसिद्ध झाला असता तर त्या दोषांमधील असीम व अतूट स्नेहभावाने तो प्रतीक ठरला असता. पण 1942 मध्ये मधूची सर्व कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यातच या हस्तलिखिताची वाताहत झाली!

गुरुजींच्या गोष्टी

जेलमध्ये सारे राजबंदी एकत्र झोपत. विशेषत: उन्हाळ्यात सारे अर्धचंद्राकार पथाऱ्या पसरत आणि गुरुजींना गोष्टी सांगण्याचा आग्रह करीत. एखादी आई मुलांना ज्या प्रेमाने, वात्सल्याने गोष्टी सांगते तशा ते सर्वांना सांगत. आबालवृद्ध, सुशिक्षित-अशिक्षित सारे त्यात रंगून जात. दिवसभरात घडलेल्या एखाद्या घटनेचा, एखाद्या व्यक्तीचा ते त्या गोष्टीत खुबीदारपणे उल्लेख करीत त्यामुळे गोष्टीत अधिकच रस भरे.

अपार मायेची जाणीव

गुरुजींच्या मनाचा स्थायीभाव होता नैराश्य. तरुण मनांच्या सहवासात त्यांच्या मनाला थोडी उभारी लाभे. गुरुजींच्या स्वभावाचे एक वैशिष्ट्य होते. त्यांना आपल्यातील गुणांची फारशी जाणीव नसे. मात्र आपल्या उणीवा त्यांना फार तीव्रतेने बोचत. एखादा उत्तम गाऊ लागला की त्यांना वाटे, आपल्याला असे गाता येत नाही. आपले जीवन व्यर्थ! कुणी उत्तम चित्रकार असेल तर गुरुजींना आपल्यात त्या कलेचा अभाव असल्यामुळे खंत वाटे! आपल्या साहित्यातील मर्यादांची त्यांना जाणीव होती. समीक्षक आपल्या साहित्याची महान साहित्यात गणना करीत नाहीत त्याबद्दल त्यांना खेद वाटे. आपले साहित्य रडके आहे, हळवे आहे, भाबडे आहे; त्या टीकेमुळे ते अस्वस्थ होत. त्यांना आपले जीवन भारभूत वाटे. मधू त्यांना वारंवार सांगत की ‘’तुमच्याजवळ केव्हडा अमोल गुणांचा ठेवा आहे याची तुम्हाला जाणीव नाही. तुमची वाणी, तुमची लेखणी, तुमचा त्याग, देशभक्ती, तुमचे वात्सल्य हे सारे इतरांना किती स्फूर्तिदायक ठरते याची तुम्हाला काय कल्पना? आपल्या गुणांच्या तेजाने तुम्ही अनेकांचे जीवन उजळून टाकले आहे. सद्गुण सौरभाने सुगंधित केले आहे. कृतार्थ केले आहे. तुमच्या मायेची आम्हाला किती गरज आहे हे शब्दात सांगता येणार नाही.’’

सहवासाची ओढ

जवळ जवळ 1945 पर्यंत त्यांचा अखंड पत्रव्यवहार चालू असे. पत्रातून ते एकमेकांशी मनमोकळे हितगुज करीत. मधू धुळे तुरुंगातून सुटणार म्हटल्यावर गुरुजींना फार एकाकी वाटू लागले. इतरांना शिक्षेत सूट मिळावी म्हणून मधू प्रयत्न करीत, पण स्वतःसाठी त्यांनी कधीही अशी मागणी केली नाही. जेल सुपरिटेंडेंट ब्लेक विचारी, ‘’तू इतरांसाठी सूट मागतोस? मग ही सवलत तू स्वतःसाठी का घेत नाहीस?’’ मधू म्हणाले की, ‘’मी मनाशी ठरवून टाकलेय इतरांसाठी मध्यस्ती करायची, पण स्वतः ही सवलत कदापि घ्यायची नाही.’’ ब्लेकला त्यांचे हे उत्तर फार आवडले. मधू सांगत की, ‘’गुरुजींच्या प्रेमळ सहवासाला मुकू नये म्हणून मी शिक्षेमध्ये एका दिवसाचीही सुट घेतली नाही. एका परीने हा माझा स्वार्थच होता!’’

गुरुजींची भावनाशीलता

मधू धुळे तुरुंगातून निघाले तेव्हा ‘’तुझ्या कैदी कपड्यांपैकी एक कुडता तू परत करू नकोस’’ असे गुरुजींनी त्यांना सांगितले. मधूनी त्याचे कारण विचारले. तेव्हा “तो मला तुझी आठवण म्हणून हवा आहे.’’ असे गुरुजी म्हणाले. गुरुजींनी तो कुडता आपल्याजवळ जपून ठेवला होता. मधू तेथून सुटल्यावर गुरुजींनी आपल्या असंख्य मित्रांना शिष्यांना चाहत्यांना मधूच्या योग्यतेबद्दल व पक्षउभारणीच्या कार्यात त्यांना साह्य करण्याबद्दल पत्रे लिहून कळवले. त्यामुळे खानदेशात काम करणे मधूना खूपच सुकर झाले. पक्षकार्याचे त्यांना चांगलेच जाळे विणता आले.

उर्दूचा अभ्यास

जेलमध्ये ‘ब’ वर्गात डॉ. अब्दुल हमीद काझी नावाचे एक गांधीजींच्या परिवारातील शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांचे उर्दू, फारसी, अरबी भाषांवर फार प्रभूत्व होते. ते इस्लामी संस्कृतीचे चांगले जाणकार होते. मधुनी त्यांच्याजवळ उर्दू भाषा शिकायला सुरवात केली. गुरुजीही इस्लामी संस्कृतीचा अभ्यास करीत होते. तेही अलिफ–बे शिकू लागले. एकेक अक्षर लावून ‘भीनी भीनी खुशबूसे बाग महक रहा है’ किंवा ‘अजान का वक्त हो गया’ इ. वाक्ये वाचता आली की त्या सर्वांना ब्रह्मानंद होई! त्यांच्याजवळ शब्दकोश नसल्यामुळे त्यांना अंधारात चाचपडावे लागे. गुरुजी प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती संस्कृतवरून लावू पहात, मग बाकी मंडळी त्यांची थट्टा करीत. कधी कधी हा ठोकताळा जमे. डॉ. महमद इकबालच्या ‘सारे जहांसे अच्छा’मधील ‘अये आबरुदे गंगा’ ह्यामधील आब शब्द संस्कृत ‘आप’वरून आल्याचा आपला अंदाज खरा ठरल्याचा गुरुजींना खूपच आनंद झाला. मधू मनातल्या मनात अनेक उर्दू शब्दांचा वाक्याचा रियाज करीत. त्यामुळे तूरुंगातून सुटल्यावर त्यांना अस्खलित हिंदुस्थानी बोलता येऊ लागले.

अकृत्रिम जिव्हाळा

गुरुजी मधूना अनेकदा आर्थिक साह्य करू पाहात. मधुनी ते घेण्याचे नाकारले की गुरुजी फार व्यथित होत. ते म्हणत, ‘’तू मला परका लेखतोस का?’’ मधू म्हणत, ‘’आपणा दोघांत प्रेमाचे, जिव्हाळ्याचे जे अकृत्रिम नाते आहे ते या आर्थिक व्यवहारामुळे डागाळू नये म्हणून मी तुमच्याकडून कोणतीही आर्थिक मदत घेऊ इच्छित नाही. तुमची अपार माया हा माझा अतीव मोलाचा ठेवा आहे.’’ साधनेचे मालकी हक्क गुरुजींनी त्यांना देऊ केले होते तेही मधूनी स्वीकारले नाहीत!

गुरुजींची सेवावृती

मेधाभुवनच्या मित्रपरिवाराची गुरुजी फार काळजी घेत. मातेच्या प्रेमाने ते सर्वांचे संगोपन करीत. त्यांचे मळके कपडे धू, त्यांच्यासाठी जेवण कर, आजारी मंडळींची शुश्रूषा कर. ही सारी कामे ते आवडीने करीत. मधू म्हणत, ‘’एकही मळका कापडा बाहेर राहिला नाही हे आम्ही कटाक्षाने पाहात असू. चुकून एखादा कपडा बाहेर राहिला तर गुरुजी लगेच तो धुऊन टाकत. अगदी स्वच्छ करून टाकत. मग आम्ही शरमिंदे होत असू.’’

गुरुजींच्या प्रेमळ उदार स्वभावाचा गैरफायदा घेणारे लबाड लोक वारंवार येत. या सर्वांपासून गुरुजींना सांभाळणे फार कठीण काम होते. ते ह्या मित्रमंडळाला करावे लागे. कैक वर्षे गुरुजी रात्ररात्र जागे असत. स्वातंत्र्यानंतर देशाच्या स्थितीबद्दलची त्यांनी पाहिलेली स्वप्ने भंगून चालली होती. स्वराज्य आले की गोरगरिबांचे कोटकल्याण होईल, हे गुरुजींचे सुंदर सोनेरी स्वप्न विरून गेले होते. मुळांतील नैराश्य तीव्रतेने वर उफाळू लागले. सर्व मित्रमंडळींचा स्नेहभाव हाच त्यांना इहलोकाशी बांधून ठेवणारा धागा होता. पण अखेर मनातील तीव्र नैराश्याच्या वादळापुढे ह्या स्नेहभावाच्या मंदादीपाचेही काही चालले नाही. तो विझून गेला. आणि अखेर हा मानवतेचा पुजारी आपल्या आवडत्या मित्राबरोबर अमळनेरच्या शेतकरी परिषदेला जायचा होता. तो सर्वांच्या हातावर तुरी देऊन इहलोकाच्या सीमारेषेबाहेर उडून गेला! मागे उरला तो हृद्य आठवणींचा सुगंध. काही करुण, काही मधुर, काही उदात्त, काही विषण्ण करून टाकणाऱ्या. त्यांचा लाडका धाकटा मित्र त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहू शकला नाही! एका कोपऱ्यात मूकपणे त्याने आपल्या ह्या ज्येष्ठ जिवलगाची, अतीव प्रेमाची पाखर घालणाऱ्या विभूतीची मूर्ती आठवून अश्रू ढाळले!

आजही गुरुजींचे नाव काढले की मधूचे मन गलबलून जाते. या विषयावर आपल्या अत्यंत आवडत्या व्यक्तीबद्दल त्यांना बोलणे अवघड जाते. ती त्यांच्या मर्मबंधातली ठेव आहे. अतिनाजुक, कोमल, अमोल!

(श्री मधू लिमये यांच्या आगामी आत्मचरित्रांतील टिपणांच्या आधारे)

Tags: साने गुरुजी चंपा लिमये मधू लिमये Champa Limaye Madhu Limaye weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी