डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अहमद नदीम कासमी हे पाकिस्तानातील श्रेष्ठ उदर्दू-प्रगतिशील कथाकार आहेत. पाकिस्तानी कनिष्ठ मध्यमवर्गाची स्थिती कशी आहे आणि ती दिवसेंदिवस कशी खालावतच चालली आहे, याचं वास्तववादी चित्रण त्यांनी या कथेतून केलं आहे. अशा तऱ्हेच्या कथा पाकिस्तानी नागरिकांचं मनोरंजनच करीत नाहीत तर त्यांना विचार करायला प्रवृत्त करत आहेत.

रहमान ऑफिसमधून घरी आला तेव्हा 12 डोळे त्याची वाट पहात होते. मग त्या डोळ्यांतून लहानलहान लाल जिभा बाहेर आल्या आणि त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. 'कुठेय? कुठेय?'... 

आहे बाळांनो... ' रहमान बेचैन झाला, पण हसत हसत म्हणाला... "3 मी घेऊन आलोय. " त्याने खिशातून एक रुपया काढला आणि बायकोच्या हातात ठेवला. पाचही मुलं बटन दाबल्याप्रमाणे उडाली आणि आपल्या आईजवळ येऊन पडली. "अम्मी... अम्मी... अम्मी!" त्यांनी त्यांच्या मागण्या मांडायला सुरुवात केली. 

रहमान कपडे बदलण्यासाठी आतल्या खोलीत गेला. दोन वर्षांपासून त्याच्याकडे खाकी रंगाची एकच पॅन्ट होती. ती तो उशीखाली घडी करून ठेवत असे. डोक्याच्या वजनाने रात्रभरात त्याला इस्तरी होऊन जाई. तो पायजमा घालून बाहेर आला, तर आई आणि मुलांची चर्चा चालली होती. तो त्यात सहभागी होण्यासाठी पलंगावर बसला, आणि म्हणाला... "तो आपला शाकिर आजही उपयोगी पडला. त्याने घरच्यांसाठी कुठून तरी दोन रुपये मागून आणले होते. मी त्याला म्हणालो, "मला पैशांची गरज आहे," तर त्या वाघाच्या बछड्याच्या कपाळावर आठीदेखील आली नाही. लगेच त्यांतला 1 रुपया त्याने माझ्या हातावर ठेवला. या महिन्यात त्याचे किती रुपये झाले?" 

त्याने हा प्रश्न स्वत:लाच विचारलेला होता. पण त्याचं उत्तर जणू बाहेरून आलं. दरवाज्यावर कुणीतरी थाप मारली. रहमान बाहेर गेला आणि बराच वेळ झाला तरी परत आला नाही. तेव्हा त्याच्या बायकोने त्याला हाक मारली, "अहो, बराच वेळ बोलायचं असेल तर घरात या. मी बाजूला जाते. "

रहमानकडून काहीच उत्तर आलं नाही, त्यावेळी ती चमकली. दंगा करणाऱ्या मुलांना तिने दरडावलं आणि आपल्यापासून दूर केलं. नंतर ती बाहेरच्या दरवाज्याकडे जाण्यासाठी उठली, तेवढ्यात रहमानच आत आला. त्याचा चेहरा उतरला होता आणि हात पिवळे पडले होते!... "यांना आपणच सापडलो. " त्याचा आवाजही बदलला होता. "बारा आणे राहिलेत तर, जणू बारा हजार रुपये राहिलेत असं बोलतोय. " मग त्याने बायकोसमोर हात पसरत म्हटलं.. "तो रुपया दे. "

बायकोला सगळं समजलं होतं. तिने मूठ उघडली. रहमानने चुरगाळलेली नोट सरळ केली. क्षणभर त्याने त्या नोटेकडे निरखून पाहिलं. मग तो बाहेर निघून गेला! मग गेला तसाच परत आला. बायकोच्या समोर तो पलंगावर बसला. "डॉक्टरलाही मला दूध प्यायचा सल्ला द्यायला आत्ताच सुचावं ना! हे डॉक्टर लोकही सल्ले देण्याच्या बाबतीत आघाडीवर असतात. दुधासाठी आजारी माणसाला आपलं रक्त तर विकावं लागणार नाही ना? याचा विचार ते करीत नाहीत!!"

"तो गवळी आला होता ना?" बायकोने विचारलं. तिचा आवाजही बदलला होता. 

"हो. तोच होता. " रहमान म्हणाला. "म्हणत होता- मुलगी आजारी आहे. सुई टोचून आणायचीय. त्याचे बारा आणे होतील. "

बायकोने विचारलं, "या मोहल्ल्यात त्यानं फक्त आपल्यालाच उधारीमध्ये दूध विकलंय?"

रहमान म्हणाला-"मीही त्याला हेच विचारलं, तर म्हणाला, "उधार विकतो पण लोक दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पैसे देऊन जातात. तुमच्याप्रमाणे पंधरा-पंधरा दिवस वाट पहायला लावत नाहीत. "

बायको हैराण झाली. "चौदा-पंधरा दिवस!... किती दिवस झाले? रविवारी तुम्हांला ताप आला होता. आणि डॉक्टरांनी दूध-पोळी खायला सांगितलं होतं. आज कोण वार आहे? बुधवार आहे? बुधवार ना… म्हणजे रविवार रविवार आठ दिवस झाले; सोमवार नऊ, मंगळवार दहा आणि आज बुधवार अकरा दिवस तर झालेत!"

रहमान म्हणाला- "मीही त्याला हेच म्हणालो, तर तो म्हणाला- 'देणार असाल तर द्या. नाहीतर सोडून देतो. ' तेव्हा मला त्याचा राग आला. मी म्हणालो, 'चौधरी, आम्ही भिकारी थोडेच आहोत!' तर म्हणाला- 'भिकाऱ्याच्या खिशातदेखील बारा आणे असतात. मग मी तुझ्याकडून रुपया घेऊन त्याच्या तोंडावर मारला. आता या चार आण्यांत या सगळ्यांचे पोट भरेल असं काय मागवावं?" त्याने आपल्या मुलांकडे पाहिलं. आणि मग बायकोच्या दंडाला धरून तो तिला घेऊन आतल्या खोलीत गेला. 

नवरा-बायकोतील चर्चा अधिक काळ चालली नाही. चार आण्याचं दही मागवावं असं ठरलं. रोट्या तंदुरवाल्याकडून उधार आणता येतील. मुलं दही आणि रोटी खातील. आपण दोघं कांद्याबरोबर भागवू, बायकोने त्याच्या हातात अॅल्युमिनियमची छोटी बादली दिली आणि ते पंचवीस पैसे मुठीत घट्ट पकडून तो दही आणण्यासाठी बाहेर पडला. 

सव्वा दोन वाजत होते. घरांच्या भिती आणि जमीन तापल्यामुळे उन्हाळा अजूनच तीव्र भासत होता. दही-दूधवाला रिकामी भांडी आत उचलून ठेवत होता. रहमानला बघून तो म्हणाला-- "दही तर संपलंय, गरमीमुळे लोक दह्यावर तुटून पडतात. दहा- बारा वाजताच दही संपून जातं आणि यावेळी... किती वाजलेत?"

रहमानपाशी घड्याळ नव्हतं. त्याने जवळून जाणाऱ्या एका माणसाला वेळ विचारली. त्या माणसाने उजव्या हाताची शर्टाची बाही झटक्यात मागे सरकवली आणि घड्याळात पाहिलं आणि रहमानच्या हातावर जणू पैसे ठेवतो आहे अशा थाटात त्याने वेळ सांगितली. "सव्वा दोन!"

"सव्वा दोन ही काही दही घ्यायला यायची वेळ आहे का रहमानभाई!" दही- दूधवाला भांडी आत ठेवत म्हणाला. रहमानने विचार केला. पुढे जाऊन बघूया. सगळ्या मोहल्ल्यातून तर दही गायब झालं नसेल ना? दोन दुकानांत चौकशी करून तो निराश होऊन मोठ्या रस्त्यावर आला. मोठ्या रस्त्यावरून जवळच एका गल्लीत दूध-दहीवाला बसत असे. दिवसभर त्याच्याकडे लस्सी पिणान्यांची गर्दी असे. एकदा ऑफिसातून परतताना शाकिरने रहमानला तिथे नेऊन लस्सी पाजली होती. 

गल्ली तेथून बरीच दूर होती; आणि लस्सीवाल्याचं दुकान गल्लीच्या दुसऱ्या टोकाला होतं. रहमान घाईघाईने चालू लागला. तो थोडंच पुढं गेला होता, इतक्यात समोरून एक मोर्चा येताना त्याने पाहिला. 

"हा मोर्चा कसलाय?" त्याने कुणाला तरी विचारलं. 

उत्तर मिळालं- "मजुरांचा दिसतोय. ट्रक नाही, स्कूटर नाही की सायकलही नाही. फक्त माणसंच आहेत. असे मोर्चे मजुरांचेच असतात. "

अजून त्याला बरंच अंतर कापून गल्लीमध्ये वळायचं होतं. त्यामुळे तो मोर्चाच्या दिशेने चालत राहिला. त्याला दुरून लस्सीवाल्याच्या गल्लीचं वळणही दिसू लागलं होतं. पण आता त्याच्या आणि गल्लीच्यामध्ये तो मोर्चा आलेला होता. गल्लीच्या समोर जाऊन तो मोर्चा पुढे जाण्याची वाट पहात उभा राहिला. पण मोर्चा संपता संपेना. सगळा रस्ता इथून तिथपर्यंत गर्दीने भरून गेला होता. तो एका झाडाच्या सावलीत उभा राहिला. तिथे पूर्वीच वीसएक लोक उभे होते. 

एक बॅनर वाचून रहमान चमकला- ''आम्हाला कुणाकडूनही कर्ज काढावं लागणार नाही अशा वेळेची आम्ही वाट पाहतो आहोत. "

बादलीमधले पैसे त्याने आपल्या खिशात टाकले आणि पुढे होऊन त्याने एका तरुणाला विचारलं- "भाईसाहेब, हा मोर्चा... "

पण तो आपला प्रश्न पूर्ण करू शकला नाही. त्या तरुणाने वळून त्याच्याकडे पाहिलं. तर तो तरुण हुबेहूब रहमान सारखाच दिसत होता. आपण

आरशाच्या समोरच उभे आहोत असं त्याला वाटलं. 

"काय झालं?" त्या तरुणाने विचारलं, पण तो आपला आवाज ओळखू शकला नाही. 

"तुझे नाव रहमान तर नाही ना?" रहमानने त्याला विचारलं. 

तरुणाने चकित होऊन त्याच्याकडे एकटक पाहिलं. 

"तुझ्या खिशात फक्त पंचवीस पैसे तर नाहीत?" तरुण हसला. 

"तू तुझ्या मुलांसाठी डेअरीतून दही आणायला तर चालला नाहीस ना?"

तरुण पुन्हा हसला, म्हणाला- "आपण सगळेच रहमान आहोत. सगळ्यांच्याच खिशात पंचवीस पैसेच आहेत. आणि आपण सगळेच आपल्या मुलांसाठी दही आणायला निघालेलो आहोत. '

रहमानने आपल्या आजूबाजूला बघितलं, तर सगळीकडे त्याला तोच दिसत होता. 

त्याच्याबरोबर चालणारा रहमान म्हणाला, "हैराण कशासाठी होतोस? आपण एक-दुसऱ्याची प्रतिबिंबं आहोत. जेव्हा आपण एकत्र चालतो त्यावेळी आपण एकसारखेच असतो. तू या गर्दीतून एका बाजूला जाऊन उभा रहा, तुला इतर सगळे अनोळखी वाटतील. "

"पण मी या गर्दीतून बाहेर जाणार नाही. " रहमान म्हणाला. मीही तुमच्याप्रमाणे त्या दिवसाची वाट पहातोय.... मलाही कुणाचं कर्ज घ्यावं लागणार नाही, त्या दिवसाची... पण तुम्ही लोक निघालायत कुठे?"

"दूध-दहीवाल्या गवळ्याकडे. " त्याचा साथीदार हसून म्हणाला. 

रहमान हैराण होऊन म्हणाला... "पण ते दुकान तर मागेच राहिले. "

"पुढेही दुकान आहे. " साथीदार म्हणाला. "इथे सगळीकडे अशी दूध-दह्याची दुकानं आहेत. जसे आपण सगळेजण रहमान आहोत तसंच प्रत्येक दुकान हे दह्या-दुधाचंच दुकान आहे. 

एकाएकी मोर्चा थांबला आणि त्याचं सभेत रूपांतर झालं. हा एक मोठा चौक होता. त्यामध्ये मोर्चातील हजारो माणसं एका बाजूला बसली. चौकाच्या मधोमध ट्रॅफिक पोलिसाला उभं राहण्यासाठी सिमेंटचा एक मोठा चौकोन तयार केलेला होता. त्यावर एक माणूस उभा राहिला. त्या सिमेंटच्या चौथऱ्यावर आपणच उभे आहोत असं रहमानला वाटलं. मग तो माणूस भाषण देऊ लागला. हा मोर्चा एका मिलमधून 100 कामगारांना काढून टाकल्याच्या निषेधार्थ होता. त्यांना उद्या कॉर्टरमधून देखील काढले जाणार होते. तो चौथच्यावर उभा असलेला माणूस म्हणत होता-- "आम्ही.. मिलच्या मालकांकडे बघून घेऊ. चार दिवस मिल बंद राहिली म्हणजे तो ठिकाणावर येईल, पण ज्या 100 बांधवांना काढून टाकलं गेलंय ते खूप अडचणीत आहेत. त्यातील काहीजण तर मोर्चातदेखील येऊ शकले नाहीत. कारण गेले काही दिवस त्यांच्या पोटात अन्नाचा कण गेलेला नाही. त्यामुळे ते चालूच शकत नाहीत.

क्वॉर्टरमध्ये कुणाची बायको आजारी आहे तर कुणाचा मुलगा आजारी आहे. कुणाचे आईबाप अंथरुणाला खिळून आहेत. आत्ता मोर्चाबरोबर आलेला एकजण चालता-चालता बेशुद्ध पडला तर मी त्याला दोघांच्याबरोबर टांग्यातून घरी पाठवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे बाकी गोष्टी तर ठरवता येतील आणि त्या पदरात पाडूनच आम्ही माघार घेऊ. पण आपल्याला या बेकार बांधवांसाठी काहीतरी करायला हवं असं मला वाटतं. आपण त्यांच्यासारखेच मजूर आहोत, पण बेकार तर नाही? आपण इकडून-तिकडून कर्ज घेऊ शकतो, पण या बेकारांना कर्ज तरी कोण देणार? आपल्या खिशात पाचपाच पैसे तर असतील? इथं माझ्यासमोर बसलेला साथी बिडी पितोय.

तो बिडीचं बंडल खरेदी करून बिडी पितोय. उद्या जर आपण बिडी प्यायलो नाही आणि ते पैसे जमा करून या बांधवांना देऊन आलो तर?... कदाचित एखादं मूल मरता मरता वाचू शकेल. एक बहीण मरणार नाही... पंचवीस पैशाची गोळी खरेदी करता न आल्याने एखाद्या बाप आणि मुलाची ताटातूट झालेली असेल. ती ताटातूट कदाचित आपण थांबवू शकू. म्हणून दहा बांधवांनी उठावं आणि सभेमध्ये फिरून असे पंचवीस-पंचवीस पैसे जमा करावेत. मग जमा झालेली रकम मोजली जाईल. ती जाहीर केली जाईल आणि नंतरच मोर्चा पुढे जाईल... 

झोळी प्रथम रहमानच्या शेजारच्याच्या समोर पसरली गेली. त्याने खिशातून पंचवीस पैसे काढून झोळीत टाकले. मग झोळी रहमानच्या समोर पसरली गेली. त्याने खिशात हात घातला. तो थोडासा थांबला. पंचवीस पैसे हातात काढून त्याने त्यामुळे बघितलं. जणू तो परदेशी जाणाऱ्या मित्राला निरोप देतोय. त्याने ते पैसे झोळीत टाकले. झोळी पुढे गेली तेव्हा रहमानचा साथीदार तक्रारीच्या स्वरात त्याला म्हणाला, "काय झालं, पैसे देताना तुझा हात थांबला का होता?" 

"यार, माझी मुलं भुकेलेली आहेत. " रहमान म्हणाला. 

"मग काय माझी मुलं भुकेलेली नाहीत?" साथीदार म्हणाला, "भुकेलेल्या मुलांचा बाप असून तुला माहिती नाही की, दुपारनंतर भुकलेल्या मुलांची भूक मरून जाते. "

"हो. " रहमानने त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. 

"भुकेलेल्या मुलांचं पोट भुकेनंच भरून जातं... मी हे कितीतरी वेळा अनुभवलंय... ते दुपारपर्यंत ओरडतात, रडतात... पण नंतर झोपी जातात. पण झोपेतून उठल्यावर जणू पोटभर जेवून उठल्यासारखं उठतात. आपण भुकेले आहोत हेच ते विसरून जातात. "

"ते भुकेले नसतातच. " साथीदार त्याला म्हणाला. "ते आपलं पोट आपल्या रक्तानेच भरतात. " रहमानने आश्चर्याने बघत विचारलं, "पण ते हातभर तर असतं. त्यांचे रक्त त्यांना किती वेळ साथ देईल?"

"जर त्यांच्या रक्ताने त्यांना साथ दिली नाही तर ते मरून जातात.. "

रहमान घाईघाईने उठून उभा राहिला आणि रिकामी बादली खडखडवत घराकडे धावत सुटला.

(मूळ उर्दू कथा : अहमद नदीम कासमी)

(मराठी अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ)

Tags: कामगार मोर्चा कामगार भूकबळी भूक गरिबी पाकिस्तान Workers Union Agitation Unemployment Hunger Poverty Pakistan Story weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके