डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वंदना किणीकरांचा 'अरुणोदय' हा पहिला काव्यसंग्रह असूनही, या काव्यसंग्रहातील बऱ्याच कविता लक्षवेधी आहेत, व काव्यगुणांनी नटल्या आहेत. ज्या ज्या वेळेला जे जे भावलं ते कविता रुपानं प्रगट झालं, असं या कवितांचं स्वरूप आहे. त्यामुळे काही कल्पनांना व विचारांना कवितेचं रूप बहाल केलं जातं. जीवनातील वास्तव किणीकरांनी टिपले आहे.

महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून मिळणाऱ्या नवलेखक अनुदान योजनेतून प्रसिद्ध झालेला 'अरुणोदय' हा श्रीमती वंदना किणीकर यांचा पहिला काव्यसंग्रह आहे. हे अनुदान चांगल्या काव्यसंग्रहास मिळाले, याचा आनंद वाटतो. अनुदानाविना काव्यसंग्रह वाचकांपर्यंत पोहोचू शकला नसता. या अनुदान योजनेतून चांगले कवी, कथाकार, कादंबरीकार, प्रथितयश साहित्यिक महाराष्ट्राला लाभले आहेत. त्या मालिकेत श्रीमती वंदना किणीकर बसाव्यात ही शुभेच्छा. 

वंदना किणीकरांचा 'अरुणोदय' हा पहिला काव्यसंग्रह असूनही, या काव्यसंग्रहातील बऱ्याच कविता लक्षवेधी आहेत, व काव्यगुणांनी नटल्या आहेत. ज्या ज्या वेळेला जे जे भावलं ते कविता रुपानं प्रगट झालं, असं या कवितांचं स्वरूप आहे. त्यामुळे काही कल्पनांना व विचारांना कवितेचं रूप बहाल केलं जातं. कवितेचं स्वरूप असं असू नये. काळानुसार कवितेचं रूप बदलत गेलं आहे याचं भान कवीने ठेवावयास पाहिजे. वंदना किणीकरांच्या कवितेतून वात्सल्य, शृंगार, भक्ती, मानवता, देशभक्ती असे सर्व विषय आले आहेत. पण त्यांत नकलीपणा नाही हे वैशिष्ट्य. एखादे वेळेस प्रासंगिक कविता ठीक असते. ती चांगली उतरतेदेखील. पण तो स्थायीभाव होता कामा नये. अशा कवितांतूनही चिंतनाचा व तादात्म्याचा मोठा भाग असला तर ती कविता 'कविता' होऊ शकते. म्हणूनच "किल्लारीची झाली माती' या कवितेत किणीकर म्हणून जातात-

'कुण्या ताइने डबा खाऊचा 

असेल जपला भावासाठी 

कुण्या भाभीचे नयन लाजरे

असतील खिळले गुलाबदेठी 

त्या रातीला कुण्या आईने

चंद्र दाविला असेल बाळा 

कुण्या माइच्या पदराखाली 

गोजिरवाणा घुंगुरवाळा 

आकाशीच्या निळ्या अंगणी 

स्वप्नफुलांच्या निजल्या ज्योती 

आणि अचानक पहाट समयी

 किल्लारीची झाली माती'

भूकंपाच्या दिवशी पहाटे साडेसहाला आम्ही काही मंडळी तेथे पोहोचलो होतो. पत्त्याचा बंगला कोसळावा तशी सर्व घरं उद्ध्वस्त झाली होती. एकाच अंथरुणावर कुटुंबातील मंडळी चिरनिद्रा घेत पडलेली होती. ही कविता प्रासंगिक असूनही चांगली ठरते. 'अरुणोदय' या काव्यसंग्रहातील काही कविता चांगल्या उतरल्या आहेत. 'साहित्य' ही बा. भ. बोरकरांच्या शैलीवर गेलेली कविता गाताना चांगली वाटते. शब्दरचना जमली आहे. 'त्या झालेल्या क्षितिजाखाली' या कवितेतील, 

'संभ्रम मनिषा हळुच विचारी 

कोण कुणास्तव इथे थांबले 

दूर तिथे त्या टेकडावर 

सांग कुणास्तव क्षितीण झुकले' 

ही कल्पना मनोरम आहे. 'टेकडी' हा शब्द चपखल. 

'जीवनाचे गाणे 

स्वप्नस्वरांनी सजवायाचे 

भैरवीच्या रागानेच 

अखेर असते तोलायचे'

हे जीवनातील वास्तव किणीकरांनी टिपले आहे. 'आई'ची महती उत्तम रीतीने गाईली आहे. 'मुखवटे' घालून समाजात वावरणाऱ्या लोकांची संभावना योग्य प्रकारे केली गेली आहे. 

'मुखवट्यांची ही जत्रा 

त्यात आपलं कोण 

साऱ्यांना फसवून 

ते उजळ माथ्याने फिरतात 

आपला मात्र 

बळी जातो 

कारण आपल्याला

मुखवटाच नसतो' 

'फिरतात' ऐवजी 'वावरतात' हा शब्द योग्य होता. 

'अबोलीच्या वेडया फुला' या कवितेत एक सत्य सहजपणे त्या सांगून जातात-

'खोटी आशा जीवनाची

सौख्य खोट्या स्वप्नांचे 

असे खेळ रंगतात

औट घटकेच्या संसारांचे..'

'माणूस' कसा असावा हे सांगताना त्या म्हणतात-

'दिलेल्या दानाचे कधी

फळ मागत नव्हता

आजच्यासारखा स्वार्थासाठी 

माणसांनाच विकत नव्हता.'

नात्यातील कटुता पण श्रीमती किणीकर सहजतेने वर्णन करतात -

'ओठांतून स्तुतीची,

पोटातून स्वार्थाची।

गोड साखर पेरणीतून,

कडवटपणा जपणाऱ्यांची।

नाती, अशी नाती ॥'

सध्याच्या काळात भारताला कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल, तर ती ऐक्याची.

''जातीयता नष्ट करून

मातृभूमी व दलितांची

जिवंत राष्ट्राचे चिरंतन सत्य आहे." अशी हाकही त्या नवयुवकांना देतात .

अश्वत्थाम्याला माणुसकी कशी कळणार असा प्रश्नही त्यांनी उभा केला तो योग्यच आहे.

'विध्वंसाचा अभिशाप

तुला अखेरपर्यंत

भोगावाच लागेल

गलितगात्र होऊन

भटकणाऱ्या शापित

अश्वत्थाम्यासारखा.'

'जर आम्हांला येती जादू' या कवितेतील बालसुलभ कल्पना मन आनंदून टाकतात.. आईचा जीव आपल्या मुलीत कसा गुंतलेला असतो याचे नेमके वर्णन 'जीव माझा गुंतला' या कवितेत उतरले आहे.

या काव्यसंग्रहातील दोन लक्षणीय कविता म्हणजे 'किल्लारीची झाली माती' व "दुभंगलेली कलम कवीची' या आहेत. किल्लारीची झाली माती या कवितेचा उल्लेख येऊन गेला आहे. 

'दुभंगलेली कलम कवीची' या कवितेत त्या म्हणतात-

'सत्य जगातील एकच साचे 

सत्य जगातील माध्यान्हीचे 

ऐकू न येते व्याकुळ क्रंदन 

मुक्या मनाचे मुकेच स्पंदन 

चिमणचारा भरण्यासाठी 

दारिद्र्याने ममता विकली 

त्या मातेची मुकी कहाणी 

तिच्याच कंठी विरून गेली'

दारिद्र्याची दाहकता यापेक्षा वेगळी कोणती असेल? मानस रेशीम, गौळण, संभ्रम, इथेच, अजून, अस्तित्व या कविताही चांगल्या आहेत. पण प्रा. वि. पां. देऊळगावकर यांनी म्हटल्याप्रमाणे श्रीमती किणीकरांनी चौफेर वाचन, बहुश्रुतपणा (शब्दसंपदा) व अनुभूतींनी आपली कविता समृद्ध करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. रामदासांनी म्हणूनच कवीचे वर्णन करताना 'ना तरी शब्दसृष्टीचे ईश्वर' असे म्हटले आहे. जीवनाच्या अधिक खोल अंतरंगात जाऊन शोध घेण्याची क्षमता कवितेत यावी. तरीही पहिला प्रयत्न या दृष्टीने हा काव्यसंग्रह चांगलाच आहे.

अरुणोदय
लेखक : श्रीमती वंदना किणीकर
स्नेहल प्रकाशन, पुणे.
किंमत : २० रुपये.

Tags: साहित्य कविता स्नेहल प्रकाशन वंदना किणीकर अरुणोदय डॉ. चंद्रकांत देऊळगावकर Chandrakant deulgavkar vandna kinikar arunoday poem literature weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके