डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

‘भीक नको, हवे घामाचे दाम’ या घोषणेतून शेतकऱ्यांच्या ‘घामाच्या दामाचा’ लढा शरद जोशींनी आयुष्यभर चालवला. ‘शेतीमालाला रास्त भाव हा शेतकऱ्यांचा श्रमसिद्ध अधिकार आहे’ असे म्हणत शेतकऱ्यांची स्वातंत्र्यभावना चेतविण्याचा अविरत प्रयत्न केला. ‘जगातील कामगारांनो, एक व्हा’ म्हणणाऱ्या मार्क्सप्रमाणेच ‘शेतकरी तितुका एक एक’ म्हणत शेतकऱ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला; आणि म्हणूनच शरद जोशी अल्पावधीतच शेतकऱ्यांचे ‘पंचप्राण’ बनून गेले.

जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आंदोलनातून ‘संपूर्ण क्रांती’ या शब्दाने जन्म घेतला आणि संपूर्ण क्रांती घडवून आणण्यासाठी ‘छात्र-युवा संघर्षवाहिनी’ या संघटनेची स्थापना जयप्रकाशजींनी केली. या देशातील गोरगरीब, दलित, पीडित, शोषित, शेतमजूर, भूमिहीन, आदिवासी यांना केवळ सत्तापरिवर्तनाने न्याय मिळणार नाही; तर त्यासाठी व्यवस्थापरिवर्तन झाले पाहिजे. संपूर्ण क्रांती व्हायला हवी आणि या व्यवस्थापरिवर्तनाची वाहक असेल छात्र-युवा संघर्षवाहिनी. ही जयप्रकाशजींची भूमिका. यानंतर देशभर झालेली उलथापालथ, देशावर लादली गेलेली आणीबाणी, आंदोलनातील नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा तुरुंगवास, अठरा महिन्यांच्या कालावधीनंतर नेत्या-कार्यकर्त्यांची तुरुंगातून सुटका, जनता पक्षाची स्थापना, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा धुव्वा, केंद्रात जनता पक्षाचे प्रथमच राज्य, त्यातही नंतर फाटाफूट वगैरे... हा सर्व इतिहास सर्वज्ञात आहे.

त्या वेळेस छात्र-युवा संघर्ष वाहिनीत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून मी काम करीत होतो. आणीबाणीनंतर बिहारमधील बोधगयाचा लढा संघर्षवाहिनीने तीव्र केला होता. मठाची असलेली हजारो एकर जमीन भूमिहीन शेतमजुरांना द्यावी,    यासाठी हा लढा होता. बिहारच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बोधगयाच्या लढ्यात झोकून दिले होते. छात्र-युवा संघर्ष- वाहिनीच्या राष्ट्रीय समितीच्या एका बैठकीत बोधगयासारखेच लढे इतरही प्रांतांत उभारले जावेत, त्यासाठी प्रमुख कार्यकर्त्याने व्यापक कामाऐवजी एखादे गाव निवडून तिथे ‘सघन क्षेत्र’ म्हणून काम करावे, असा निर्णय झाला. महाराष्ट्रात मी यवतमाळ जिल्ह्यातील ‘मेटीखेडा’ हे गाव निवडले आणि १९८० पासून मी व माझी पत्नी तिथेच राहायला गेलो. बोधगयासारखाच लढा उभा करायचा तर येथे कोणी महंत नव्हता, त्याचा मठ नव्हता; त्यामुळे त्याची हजारो एकर जमीन नव्हती. बोधगया मठाच्या महंताची हजारो एकर जमीन विरुद्ध भूमिहीन अशी संघर्षरेषा बोधगयात जेवढी स्पष्ट होती, तशी ती मेटीखेड्यात नव्हती. शेतकरी विरुद्ध शेतमजूर असा संघर्ष आम्ही सुरू केला. मालक विरुद्ध मजूर. शेतमजुरांना, सालदारांना किमान वेतन कायद्यानुसार मजुरी द्यावी.

शेतमजुरांचं आंदोलन आम्ही आमच्या परिसरात करीत होतो. त्याच वेळेस शरद जोशींच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलनानेही वेग पकडला होता. शेतमजुरांच्या आंदोलनाचा नायक होता शेतमजूर आणि पर्यायाने आमचा दुश्मन म्हणा किंवा खलनायक होता शेतकरी; उलटपक्षी शेतकरी आंदोलनाचा नायकच शेतकरी, त्यामुळे स्वाभाविकपणेच ह्या आंदोलनाविषयी व आंदोलनाचे नेते शरद जोशी यांच्याविषयी मनात अढीच होती. वृत्तपत्रांतून झिरपणाऱ्या बातम्यांनी ती अधिकच वाढत गेली. धनदांडग्या शेतकऱ्यांचे आंदोलन. शेतीमालाला रास्त भाव हा एककलमी कार्यक्रम. केवळ ह्या एका कलमाने सर्व प्रश्न कसे सुटतील? शेतीमालाचे भाव वाढले, तर अन्नधान्य महाग होईल. त्यामुळे शेतमजूर व गोरगरिबांचे कसे होणार? शेतकऱ्यांना शेतीमालाचे भाव वाढवून मिळाले, तर ते शेतमजुरांची मजुरी वाढवून देतील याचा भरवसा काय? ब्राह्मणाला शेतकऱ्यांच्या कळवळा कसा काय? शेतकऱ्यांचा नेता ब्राह्मण? मधेच कोणी आरोप करायचा की, शरद जोशी सी.आय.ए.चे एजंट आहेत. यातील खरे काय, खोटे काय- काही कळत नव्हते. पण एक स्पष्ट होते की, आमच्यासाठी खलनायक असलेल्या शेतकऱ्यांचा नेता म्हणजे तो आमच्याहीसाठी खलनायकच होता.

यादरम्यान पुण्याच्या ‘ग्रामायण’ संस्थेने आयोजित केलेल्या बैठकीचे निमंत्रण मिळाले. बैठकीत डॉ.अभय बंग यांनी लिहिलेल्या एका प्रदीर्घ लेखावर चर्चा होती. वि.स.पागेंच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने रोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजुरी निश्चित केली होती. ती चुकीची आहे, त्यासाठी वापरण्यात आलेली पद्धत पूर्णत: चुकीची आहे; मजुरीचे दर ठरविताना वापरलेले गृहीतक अशास्त्रीय आहे, असा अभय बंगांचा दावा होता. मजूर हा कष्टाचे काम करतो, त्यामुळे त्याला अधिक उष्मांकांची गरज असते. ते उष्मांक (कॅलरीज) शरीरात तयार होण्यासाठी इतक्या अन्नाची गरज भासते. त्याला आवश्यक असलेले प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट मिळण्यासाठी हे अन्न इतक्या प्रमाणात लागते. त्यामुळे या प्रमाणात अन्नाची गरज भागवायची असल्यास त्याला एवढी मजुरी दिली पाहिजे. पागे समितीने निश्चित केलेले दर कमी आहेत, ते एवढे असावयास हवेत, असा डॉ.अभय बंग यांच्या लेखाचा ढोबळमानाने निष्कर्ष होता. याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी ग्रामायनने बैठक बोलाविली होती.

महाराष्ट्रात प्रामुख्याने शेतमजुरांमध्ये काम करणाऱ्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना त्यासाठी निमंत्रित केले होते; परंतु निमंत्रितांमध्ये शरद जोशींचा समावेश पाहून आश्चर्य वाटले. शेतकऱ्यांच्या नेत्याला या बैठकीत का बोलावण्यात आले? बैठक शेतमजुरांची योग्य मजुरी ठरविण्यासाठी; ह्या बैठकीत शरद जोशींचे काय काम? ते येणार म्हणजे  शेतमजुरांच्या वाढीव मजुरीला निश्चितच विरोध करणार, त्या विरोधी बोलणार; असे गृहीत धरूनच शरद जोशींनी याला विरोध केलाच, तर तो कसा खोडून काढायचा, या तयारीनिशी आम्ही बैठकीला हजर झालो. अपेक्षेप्रमाणे आम्ही सर्व सजातीय (शेतमजूरवाले) तिथे जमलो होतो. त्या बैठकीत आमच्या दृष्टीने एकमेव विजातीय होते ते शरद जोशी. बैठकीतील सर्वांचे मत डॉ.अभय बंग यांच्या बाजूने होते. पागे समितीने अशा प्रकारे शेतमजुरांवर अन्याय केला असेल, तर डॉ.अभय बंग म्हणतात त्याचप्रमाणे मजुरांची मजुरी निश्चित केली पाहिजे, यावर सर्वांचे एकमत होते. परंतु या सर्व चर्चेत शरद जोशी एका शब्दानेही भाग घेत नाहीत, याचे आश्चर्य वाटत होते. त्यांनी याला कडाडून आक्षेप घ्यावा, विरोध करावा, ही आमची अपेक्षा होती; पण ते बोलतच नव्हते. त्यामुळे त्यांचे समर्थन आहे का विरोध, हेही कळणे शक्य नव्हते. आपण काही बोलल्यास या बैठकीत उघडे पडू, असे तर त्यांना वाटत नसेल? या भीतीपोटी तर ते बोलत नसतील, असेही वाटू लागले. तसे असेल तर त्यांना उघडे पाडण्यासाठी का होईना, बोलते केले पाहिजे. त्यांना एक्सपोज करण्याची ही संधी चांगली आहे, असं वाटून त्यांना आम्ही आग्रहाने बोलण्यास भाग पाडले.

आमच्या विनंतीला मान देत ते बोलू लागले. म्हणाले, ‘‘डॉ.अभय बंग यांनी ज्या पद्धतीने शेतमजुरांची मजुरी निश्चित केली आहे, त्याला माझा तीव्र आक्षेप आहे.’’

त्यांच्या या पहिल्या वाक्यावरच आम्हाला आनंदाच्या उकळ्याच फुटल्या. आता बरा सापडला ठोकून काढायला, अशी आमची भावना झाली. पहिले वाक्य बोलून झाल्यावर ते थांबले व पुढे म्हणाले, ‘‘मी या बैठकीत फार मोठ्या अपेक्षेने आलो होतो. महाराष्ट्रभर शेतमजुरांमध्ये आत्यंतिक निष्ठेने तुम्ही सर्व काम करता. त्यामुळे तुम्ही सर्व तरुणमंडळी शेतमजुरांच्या बाबतीत कसा विचार करता, हे जाणून घ्यायची उत्सुकता होती. परंतु दुर्दैवाने तुम्ही मला प्रचंड निराश केले आहे. माझ्याकडे पोल्ट्री फार्म आहे. कोंबड्यांचा विचार करताना मी असाच विचार करतो. प्रत्येक कोंबडीला किती खाद्यान्नाची गरज आहे? त्यामधून त्यांना प्रोटिन्स-कार्बोहायड्रेट कसे मिळतील? कोंबड्यांना आवश्यक ते उष्मांक (कॅलरीज) त्या खाद्यान्नातून कसे मिळतील? याचा मी विचार करतो, तसाच विचार तुम्ही मजुरांच्या बाबतीत करता? माणसात आणि जनावरांमध्ये काहीच फरक नाही? कोंबड्यांप्रमाणे शेतमजुरांची गरज केवळ अन्नाचीच आहे? त्यांचे आरोग्य, शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजांचे काय? त्याच्या सामाजिक, सांस्कृतिक गरजांचे काय? अन्नासोबतच त्याच्या इतरही गरजा त्याच्या मजुरीतूनच पूर्ण झाल्या पाहिजेत, कारण श्रमाशिवाय त्यांच्याजवळ विकण्यासारखे दुसरे काही नाही. त्यामुळे मांडणी करताना सैद्धांतिक पातळीवर तरी किमान अशा प्रकारची मांडणी केली पाहिजे. अर्थात मागणी कशी, कोणत्या स्वरूपात करता येईल आणि ती मान्य कशी करवून घेता येईल, हा स्वतंत्र वेगळा विषय आहे.’’ एवढे बोलून ते थांबले.

त्यांना उघडे पाडण्यासाठी आम्ही त्यांना बोलते केले होते; परंतु त्यांच्या बोलण्यानंतर आम्ही उघडेच नव्हे, तर अक्षरश: उताणे पडलो होतो. आमच्या अहंकाराचा फुगा त्यांनी फोडला होता. शरद जोशी व त्यांच्या शेतकरी आंदोलनाबद्दल आपण किती चुकीचा विचार करतो, हेही ध्यानात आले होते. अर्थात, कालांतराने शेतमजूर आंदोलनाच्या मर्यादाही लक्षात येत गेल्या. शेतकरी जमिनीचा मालक आहे, म्हणून ‘आहे रे’; भूमिहीन शेतमजूर मालक नाही म्हणून ‘नाही रे’. गावात किमान वेतनाची लढाई जमीनमालकाविरुद्ध म्हणून शेतकरी वर्गशत्रू, तर शेतमजूर वर्गमित्र. पण हाच शेतकरी दहा-दहा, पंधरा-पंधरा एकरांचा मालक रोजगार हमी योजनेवर खड्डे खोदताना पाहायचो, खडी फोडताना पाहायचो. तेव्हा तो वर्गशत्रू की वर्गमित्र?- कळायचे नाही. जमिनीचा मालक म्हणून शेतकरी आहे रे, वर्गशत्रू, शोषक; पण या शोषकांचीही परिस्थिती फारशी समाधानकारक नाही, हे प्रत्यक्ष अनुभवातून लक्षात येत होते.

गावात बरा होता तो पुढारी शेतकरी, व्यापारी शेतकरी, नोकरदार शेतकरी; पण निव्वळ शेतीवर ज्याचे पोट आहे, त्याची परिस्थिती शेतमजुरांपेक्षा फारशी वेगळी नव्हती. एकूण गावच दारिद्य्ररेषेच्या दिशेनेच जात आहे, हे समजत होते. त्यामुळे शेतकरी विरुद्ध शेतमजूर ही संघर्षरेषा म्हणजे ‘लंगोटी आहे रे’ आणि ‘लंगोटी नाही रे’ यातीलच संघर्ष आहे, हे समजायला फारसा उशीर लागला नाही. लंगोटीच्या मर्यादेतला संघर्ष व्यापक होण्याची सुतराम शक्यता नाही, हेही लवकरच कळायला लागले. आणि फार ताणले तर लंगोटीच्या फक्त चिंध्याच हातात येतील, हे जसजसे जाणवू लागले तसतशी शेतकरी आंदोलनाशी व पर्यायाने त्या आंदोलनाच्या नेत्याशी- शरद जोशींशीही जवळीक वाढत गेली. आयुष्याचे पुढील एक दशक शरद जोशींच्या प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सहवासात व त्यांच्या प्रभावातच गेले, हे नाकारण्यात अर्थ नाही. नंतर त्यांच्याशी तीव्र मतभेद झाले, तरीही त्या आंदोलनातून भरपूर शिकायला मिळाले. त्या आंदोलनानेच व्यापक ओळख दिली, हेही तेवढेच खरे.

 सन १९८०-९० हे दशक खऱ्या अर्थाने शेतकरी संघटनेचे होते. याच काळात शेतकरी संघटना जोमात वाढली, महाराष्ट्रातच नव्हे तर देशव्यापी झाली. नाशिकचे कांदा-ऊस आंदोलन, निपाणीचे तंबाखूचे आंदोलन यांसारख्या आंदोलनांतून संघटना विस्तारत गेली. रेल रोको, रास्ता रोको, राजीवस्त्रांची होळी यांसारख्या आंदोलनांतून शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होत गेले. सन १९८४ च्या परभणी अधिवेशनात ‘औंदा स्वराज्य मिळवायचे’ची घोषणा झाली. त्यासाठी शरद जोशींच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर प्रचारयात्रा निघाली. या प्रचारयात्रेने महाराष्ट्र पिंजून काढला. तिचा समारोप नाशिक जिल्ह्यातील टेहरे या गावी होता. लाखालाखांच्या संख्येने शेतकरी या मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून जमला होता; परंतु मेळावा सुरू असतानाच पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येची बातमी आली आणि संपूर्ण मेळाव्यावर पाणी पडले. शेतकरी संघटनेच्या ‘औंदा स्वराज्य मिळवायचे’ या घोषणेवरसुद्धा इंदिरा गांधींच्या हत्येचा व्हायचा तोच परिणाम झाला. सहानुभूतीच्या लाटेत आंदोलनच जवळपास वाहून गेले.

राजीव गांधी पंतप्रधान झाले. ‘मिस्टर क्लीन’ म्हणून त्यांची प्रतिमा बनविण्यात येत होती. इंदिरा गांधींच्या हत्येची सहानुभूती व मिस्टर क्लीन म्हणून त्यांची बनलेली प्रतिमा ह्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षदेखील गर्भगळीत झाले होते. पण त्याही अवस्थेत शेतकरी संघटनेने राजीवस्त्र विरोधी आंदोलन छेडले. कृत्रिम धाग्यांपासून बनलेल्या कापडांची जागोजागी होळी होऊ लागली. स्वातंत्र्याच्या लढ्यात महात्मा गांधींनी विदेशी कपड्यांची होळी केली, त्याचे स्मरण व्हावे असाच हा कार्यक्रम होता. पंजाब पेटले होते. हिंदू विरोधी शीख असे वातावरण पंजाबात होते. अशा पार्श्वभूमीवर चंडीगड येथे शेतकरी संघटना, भारतीय किसान युनियनने राज्यपाल भवनाला घेराव आयोजित केला होता. त्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकरी पंजाबमध्ये गेले. शीख शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून घेरावात सामील झाले. हिंदू विरुद्ध शीख हा संघर्ष किती कृत्रिम आहे, हे सिद्ध केले. या आंदोलनाने भिंद्रानवालेंचीही हवा टाईट केली होती.

शेतकरी संघटनेच्या गावबंदी आंदोलनाने तर गावोगावी पुढाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते. कोणत्याही गावात पुढारी गेले की, गावातला फाटका शेतकरीसुद्धा प्रश्न विचारून पुढाऱ्यांच्या नाकात दम आणत होता. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील शेतकरी महिला आघाडीचा मेळावा तर ऐतिहासिक असाच होता. आठ ते दहा लाख महिला या मेळाव्यासाठी जमल्या होत्या. पुरुषांची तर गिनतीच नव्हती. शेतकरी आंदोलनापूर्वी जमीन हे उत्पादनाचे साधन आहे, अशीच मान्यता होती; परंतु शेतीविरोधी धोरणांमुळे जमीन हे तोट्याचे साधन आहे, हे शरद जोशींनी सप्रमाण सिद्ध केले. एवढेच नव्हे, तर शेती तोट्यात राहावी हीच सरकारची अधिकृत भूमिका व धोरण आहे; त्याचाच परिणाम म्हणून या देशात गरिबी आहे, ही मांडणी त्यांनी आपल्या मांडणीतून व आंदोलनांतून प्रभावीपणे केली. गरिबी हटविण्यासाठी काहीही करण्याची गरज नाही; फक्त ती टिकावी व वाढावी म्हणून जे प्रयत्न सुरू आहेत, ते फक्त थांबवावेत म्हणजे गरिबी आपोआप हटेल- हे त्यांचे विधान सर्वसामान्य लोकांना धक्का देणारे होते.

श्रमाच्या शोषणासंबंधी अनेक ग्रंथ लिहिले गेले, अनेक तत्त्वज्ञाने मांडली गेली, अनेक क्रांत्याही झाल्या; परंतु कच्च्या मालाच्या शोषणाचा प्रश्न कधी मांडलाच गेला नाही, तो धसास लागला नाही. रोझा लुक्झेम्बर्ग ह्या कम्युनिस्ट विदुषीने कच्च्या मालाच्या शोषणाची मांडणी केली होती, हा अपवाद वगळता कच्च्या मालाच्या शोषणाचा प्रश्न कायम उपेक्षितच राहिला. शरद जोशींनी हा मुद्दा मुख्य केला आणि कच्च्या मालाच्या शोषणाकडे सर्वांचे लक्ष प्रभावीपणे वेधले. एवढेच नव्हे, तर ‘शेतीमालाला रास्त भाव’ हा एककलमी कार्यक्रम देऊन त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलनही छेडले. शरद जोशींची ही एका अर्थानं ऐतिहासिकच कामगिरी म्हटली पाहिजे.

‘जमीनवाटपाच्या मुद्यालाच ज्या देशामध्ये सर्वाधिक महत्त्व दिले गेले, त्या पार्श्वभूमीवर जमीन हे तोट्याचे साधन आहे आणि शेती ही तोट्याची गोष्ट असेल तर भूमिहीनांच्या गळ्यात जमीन बांधणेही मूर्खपणाचे आहे. भिकाऱ्याला हत्ती देणे आणि विधवेला कुंकू लावून तू सधवा आहेस असे सांगणे यात आणि भूमिहीनांना जमीनवाटप करणे यात फरक नाही’, असे धाडसाने स्पष्टपणे बजावणारा व त्यामुळेच तथाकथित विचारवंतांच्या रोषाला सामोरा जाणारा शरद जोशी हा एकमेव नेता होता. त्यांचा विचार विचारवंतांना  पटो अथवा न पटो, परंतु सर्वसामान्यांना तो पटत होता. म्हणूनच मोठ्या संख्येची ताकद शरद जोशी आपल्या बाजूने १९८० ते १९९० च्या दशकात उभी करू शकले. शरद जोशी व शेतकरी संघटना यांना मिळणारा मोठ्या प्रमाणावरील पाठिंबा हा विचारवंतांसाठी नेहमीच कुतूहलाचा व तेवढाच आकसाचा मुद्दा राहिला.

स्वातंत्र्यानंतर या देशात डाव्यांच्या ज्या चळवळी झाल्या, त्या प्रामुख्याने एक तर भूमिहीनांना जमीन मिळावी यासाठी झाल्या किंवा शेतीवरून उखडून फेकल्या गेल्यानंतर तोच शेतकरी जेव्हा झोपडपट्टीत गेला, हमाल झाला, रिक्षेवाला झाला किंवा गिरणीत कामगार झाला- त्याच्यासाठी परत सर्व डावे धावून गेले. म्हणजे एक तर ज्याला जमीन नाही त्या भूमिहीनांना जमीन मिळवून देण्यासाठी डावे झटले किंवा जमिनीवरून जो शेतकरी विस्थापित झाला त्याच्यासाठी ते झटले; परंतु जमिनीवर असलेल्या शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या समस्यांसाठी डाव्यांकडे कोणताही कार्यक्रम नव्हता. उलट, जमीनमालक म्हणून त्यांच्याविषयी त्यांच्या मनात आकसच होता. या आकसापोटी मोठ्या प्रमाणात असलेला शेतकरीसमूह हा डाव्यांकडून कायम उपेक्षित राहिला.

नेमकी हीच मोठी मोकळी जागा शरद जोशींनी हेरली आणि त्यांच्या अडी- अडचणी, समस्या जाणून घेऊन त्यांची प्रत्ययकारी मांडणी केली. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांतील छोटा-मोठा शेतकरी त्यांच्या मागे मोठ्या संख्येने उभा राहिला. शरद जोशींनी शेतकऱ्यांना आत्मभान दिले, तसेच त्याच्या बाजूने तत्त्वज्ञान उभे केले. इंडिया विरुद्ध भारत अशी व्यापक संघर्षरेषा आखून भारताच्या बाजूने लढा उभा केला. ‘शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण’ असे सांगून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतचा आंधळेपणा दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

महात्मा फुलेंचा केवळ सामाजिक अंगाने स्वीकार करणाऱ्या व ‘शेतकऱ्याचा आसूड’ उपेक्षित ठेवणाऱ्यांना फुलेंच्या आसूडानेच फटकारून काढले. ‘गोरा इंग्रज- काळा इंग्रज’ या केवळ दोन शब्दांच्या माध्यमातून शासनाची शोषणनीती उघडी-नागडी केली. ‘भीक नको, हवे घामाचे दाम’ या घोषणेतून शेतकऱ्यांच्या ‘घामाच्या दामाचा’ लढा शरद जोशींनी आयुष्यभर चालवला. ‘शेतीमालाला रास्त भाव हा शेतकऱ्यांचा श्रमसिद्ध अधिकार आहे’ असे म्हणत शेतकऱ्यांची स्वातंत्र्यभावना चेतविण्याचा अविरत प्रयत्न केला. ‘जगातील कामगारांनो, एक व्हा’ म्हणणाऱ्या मार्क्सप्रमाणेच ‘शेतकरी तितुका एक एक’ म्हणत शेतकऱ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला; आणि म्हणूनच शरद जोशी अल्पावधीतच शेतकऱ्यांचे ‘पंचप्राण’ बनून गेले. खेडोपाडी शेतकऱ्यांच्या घरात शरद जोशी देव्हाऱ्यात जाऊन बसले. शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या लग्नप्रसंगानिमित्त निघणाऱ्या लग्नपत्रिकेवर शरद जोशींचा फोटो देवस्थानी असायचा.

घरात किंवा शेतात असलेल्या शेतकऱ्यांना लाखोंच्या संख्येने रस्त्यावर किंवा रेल्वे रुळावर आणून शरद जोशींनी रास्ता रोको, रेल रोको केला. हजारोंच्या संख्येने शेतकरी तुरुंगात गेले. शेकडो लोकांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. डझनांनी शेतकऱ्यांनी छातीत बंदुकीच्या गोळ्या झेलल्या. शेतकरी संघटनेचा मेळावा असो वा अधिवेशन वा महिला मेळावा; लाखोंच्याच संख्येने शेतकरी स्त्री-पुरुष त्याला उपस्थित असायचे. परंतु दुर्दैवाने ही सगळी आंदोलनांची ताकद मतांमध्ये रूपांतरित करण्यामध्ये चळवळीला अपयश आले आणि प्रामुख्याने हे अपयशच शेतकरी आंदोलनाच्या ऱ्हासाला कारणीभूतही ठरले. शरद जोशींसोबत मला अनेक वर्षे राहायला मिळाले, त्यांचे निवासस्थान असलेल्या आंबेठाण येथील ‘अंगार मळ्यात’ शेतकऱ्यांसाठी दहा-दहा दिवसांचे प्रशिक्षण शिबिर चालायचे. शरद जोशींनीच स्थापन केलेल्या ‘कृषिअर्थ प्रबोधिनी’ या संस्थेमार्फत ही शिबिरे चालविली जात. वर्ष- दोन वर्षे या शिबिरांची मुख्य जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे त्या काळात मी आंबेठाणलाच होतो आणि पर्यायाने शरद जोशींच्या सहवासात अधिकच राहता आले.

त्या काळात त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा व्हायची, वाद व्हायचे, वादविवाद व्हायचे. त्या वेळेस चिरडीला येऊन मी म्हणायचो, ‘द्रोणाचार्याने गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याचा अंगठा मागितला, तो त्याने दिलाही; पण कृपा करून गुरू या नात्याने, गुरुदक्षिणा म्हणून माझा मेंदू तुम्ही मागू नका. कारण तुम्ही मागितला म्हणून मी काही तो देणार नाही.’ यावर शरद जोशी खळाळून हसायचे व म्हणायचे, ‘काय माझे दुर्दैव! शिवाजीमहाराजांचे अष्टप्रधान होते, पण माझे अष्टमुजोर आहेत. त्या अष्टमुजोरांतील तू एक मुजोर.’ शरद जोशींच्या एका मुजोर शिष्याची गुरूला विनम्र श्रद्धांजली.

Tags: २०१६ साप्ताहिक साधना साधना विकलीसाधना चंद्रकांत वानखेडे आंदोलन शेतकरी संघटना शेती शरद जोशी Chandrakant Wankhede Agriculture Sheti Shetkari Sanghatana Sharad Joshi 2016 Editorial Sadhana SadhanaSaptahik WeeklySadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Kailas Tawar- 07 Sep 2021

    लेख खुप आवडला

    saveसाधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके