डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्वातंत्र्यसैनिकांना दूर ठेवणारा सरकारी कार्यक्रम

या स्वातंत्र्याच्या पहिल्या कार्यक्रमातही स्वातंत्र्यासाठी आपल्या जिवाची कुरवंडी करण्याची तयारी ठेवणारे स्वातंत्र्यसैनिक गैरहजरच होते किंवा मग पिछाडीला होते. म्हणून गुलामीच्या अंताचा आनंद मनात असला तरी हळहळ कायमच होती. कृतार्थतेची भावना असली तरी मनाच्या- कोपऱ्यात कुठेतरी काहीतरी सलत होते.

मी अनुभवलेला पहिला स्वातंत्र्यदिन...

खरे पाहता 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्रीनंतर, म्हणजे मध्यरात्रीचा ठोका पडताच भारत स्वतंत्र झाला, ती रात्र आम्ही स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करण्यासाठी अक्षरशः जागून काढली. स्वातंत्र्यलढ्यात जे सोसले त्याची परिणती स्वातंत्र्यात झाली, या आनंदाने सारी वैयक्तिक दुःखे कुठल्या कुठे विरघळून गेली. त्या आनंदाचे वर्णन शब्दांत करणे शक्य नाही. मी त्या वेळी नागपूर महाविद्यालयात (जुने मॉरिस कॉलेज नागपूर) येथे शिकत होतो. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी भल्या पहाटे आम्ही सीताबर्डीवरील व्हरायटी चौकात जमलो. त्या चौकातून चार-चार जणांच्या रांगा करून मिरवणुकीने कॉलेजमध्ये पोहोचलो. मिरवणुकीत विद्यार्थी होते तसे प्राध्यापकही होते. प्राचार्य हातात तिरंगी झेंडा घेऊन पुढे होते. त्यांच्या मागे आम्ही विद्यार्थी व प्राध्यापक, हातात झेंडे घेऊन चालत होतो.. कॉलेजमध्ये पोचल्यावर मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील  गच्चीवर, प्राचार्याच्या हस्ते तिरंगा झेंडा फडकाविला गेला. आमचे कॉलेज हे सरकारी असल्याने तिरंगी झेंड्याला हा मान प्रथमच मिळत होता. त्या वेळी जो आनंद झाला तो गगनात मावेना, असा होता. 

राष्ट्रीय ध्वजाला साक्षी ठेवून म्हटलेले 'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत त्या दिवशी आगळेवेगळे वाटले. वेगळीच प्रेरणा देऊन गेले. सायंकाळी कॉलेजच्या विस्तार भावनांच्या आवारात संकल्पित स्वातंत्र्यभवनाचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला यांच्या हस्ते झाला. स्वातंत्र्यभवन बांधले जात आहे याचा आनंद होता. परंतु ते भवन खैरागडचे राजे लालबहादूर यांनी दिलेल्या पंचवीस हजार रुपयांच्या देणगीतून व इतर देणग्यांच्या रकमेतून बांधले जाणार होते म्हणून राजेसाहेबांचे नावही स्वातंत्र्यभवनाशी जोडले गेले होते. ज्यांचा जन्म इंग्रजांची नोकरी व चाकरी करण्यात गेला, त्या प्राचार्यांच्या हस्ते झेंडावंदन व्हावे, व ज्या राजेरजवाड्यांनी गुलामगिरीच्या शृंखला मजबूत करण्यासाठी इंग्रजांची साथ दिली, त्या राजेबहादुरांचे नाव स्वातंत्र्यभवनाशी जोडले जावे, हा दुर्दैवाचा भाग होता, पण त्याची खंत कुणालाच त्या वेळी जाणवली नाही, इतके सारे वातावरण भारावलेले होते. 

त्या समारंभात मी इंग्रजीत भाषण करावे, असा प्राचार्यापासूनच सर्वाचा आग्रह होता. ते मनाला पटेना. त्याच दिवशी बी.बी. सी च्या प्रतिनिधीला दिलेल्या संदेशात राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणाले होते की, 'अलम दुनियेला सांगा, की गांधीला इंग्रजी येत नाही. यात इंग्रजी भाषेचा विरोध नव्हता. पण 'इंग्रेजियत’ चा विरोध सामावलेला होता. त्याचक्षणी त्याच व्यासपीठावर मी संकल्प केला की यानंतर कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात शक्यतो इंग्रजीत बोलणार नाही. अशा प्रसंगीसुद्धा इंग्रजीचा आग्रह धरणारे, एका अर्थाने गुलामीच जोपासत होते. त्यांच्याकरिता स्वराज्यापेक्षा इंग्रजांचे राज्य चांगले व स्व-भाषेपेक्षा इंग्रजी भाषा श्रेष्ठ, ही भावना होती. आणि या भावनेला प्राणपणाने विरोध करावा. म्हणून मी तसा संकल्प केला. व तेव्हापासून आजपर्यंत मी तो त्याच भावनेने पाळीत आलो आहे. परंतु आज स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षानंतरही आपण 'अंग्रेजियत' जोपासत आहोत, हे कटू सत्य आहे. 

त्या वेळी आणखी एक इच्छा मनात होती. महात्मा गांधी नावाचा नंगा फकीर जेव्हा आताच्या राष्ट्रपतिभवनातून व तेव्हाच्या 'व्हाईसरॉय’ च्या आलिशान महालांतून, अकरा घोड्यांच्या घोडागाडीत बसून राजमार्गावरून बाहेर पडेल तेव्हा कसा दिसेल, हे बघायचे होते. तो तर नोआखलीत एकला चलो रे च्या भावनेने लोकांची मने सांधण्याच्या कामात गुंतला होता. राजधानीतील त्याची 'गैरहजेरी' इतरांच्या 'हजेरी पेक्षा बोलकी होती. किंबहुना प्रत्येक पुढाऱ्याने गांधींचे नाव घेऊनच भाषणाला सुरुवात केली. तरी जिवाला धोका होता तेव्हा खऱ्या पुढाऱ्याप्रमाणे सदैव पुढे असणारा राष्ट्रपिता सत्ताग्रहण समारंभाचे वेळी अनुपस्थित होता आणि तीच त्याची जीवनसापना होती.

कॉलेजचा सकाळचा कार्यक्रम आटोपल्यावर मुख्य सरकारी कार्यक्रम झाला. त्यावेळी अर्थातच झेंडावंदन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. परंतु तेथेही वर्दळ व महत्त्व होते ते आय.सी.एस. अधिकाऱ्याचेच,आय. सी.एस.चे  वर्णन करताना असे म्हटसे जात असे की जे इंडियन नाहीत सिव्हील नाहीत, व सर्वन्टही नाहीत, ते आय. सी. एस. कारण त्या वेळी हे अधिकारी म्हणजे इंग्रज किंवा देशी इंग्रजच असत, ते वृत्तीने सिव्हिल कधीच नव्हते. आणि सर्वन्टही नव्हते, उलट जनतेचे मालक असल्यासारखेच वागत असत, यांच्या करवीच इंग्रजांचे राज्य चालत असे. त्यांना देश, राष्ट्र आदी काही नव्हते. जे सरकार अस्तित्वात असेल, त्यावर त्याची निष्ठा असे. आणि हीच मंडळी 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात पुढे पुढे करीत होती. एवढेच नव्हते तर आमच्यासारख्यांनाही ते स्वातंत्र्याचे महत्त्व पटकून सांगून देशभक्तीचे धडे शिकवीत होते. 

या स्वातंत्र्याच्या पहिल्या कार्यक्रमातही स्वातंत्र्यासाठी आपल्या जिवाची कुरवंडी करण्याची तयारी ठेवणारे स्वातंत्र्यसैनिक गैरहजरच होते किंवा मग पिछाडीला होते. म्हणून गुलामीच्या अंताचा आनंद मनात असला तरी हळहळ कायमच होती. कृतार्थतेची भावना असली तरी मनाच्या- कोपऱ्यात कुठेतरी काहीतरी सलत होते. कारण या अनुपस्थित असलेल्या खऱ्या सैनिकांत माझी आईही होती. जिला निमंत्रणही नव्हते. आईने वैयक्तिक सत्याग्रह व 'चले जाव' आंदोलनात खऱ्या अर्थाने तुरुंगवास भोगला होता. त्यातच तिथे मानसिक संतुलन हरवले व ऐहिक जीवन संपुष्टात आले. तिला तर स्वातंत्र्य मिळून तिच्या त्यागाचे व तपश्चर्येचे मोल आहे याची जाणीवसुद्धा नव्हती. अशांना त्या सोहळ्यात काहीच स्थान नव्हते; कारण कार्यक्रमाचे सरकारीकरण झाले, व त्यातील प्राणच हरवला. ही परंपरा आजही कायम आहे.

Tags: रविशंकर शुक्ला महात्मा गांधी राजे लालबहादूर स्वातंत्र्यसैनिक न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी Ravishankar Shukla Mahatma Gandhi Raje Lalbahadur Freedom Fighter Justice chandrasekhar Dharmadhikari weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

चंद्रशेखर धर्माधिकारी

(1927 - 2019)

मराठी वकील, न्यायाधीश, लेखक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक. ते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके