डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मी जेव्हा माझ्यासाठी मुलगी पहायला गेलो होतो, तेव्हा होणाऱ्या गप्पांत भांडारकर संस्थेवर संभाजी ब्रिगेडने केलेल्या हल्ल्याचे एकजण समर्थन करीत होता, त्यावेळी बाकीच्या लोकांचे आपल्या बोलण्या-वागण्याकडे बारीक लक्ष आहे हे लक्षात येत असूनही, मी माझी मते काहीही हातचे राखून न ठेवता मांडली होती. पण गेल्या चार-पाच वर्षांत मात्र व्यावसायिक जगात पूर्णवेळ उतरल्यावर, रोजच्या वर्तमानपत्रांचे वाचनसुद्धा नीट झाले नाही. प्रश्न नुसत्या वेळेचा नव्हता; तर कल कशाकडे आहे हा होता. पूर्वी रोज चार-पाच तास व्यायाम करणाऱ्या मला, गेल्या तीन-चार वर्षांत पंधरा-वीस मिनिटेसुद्धा व्यायाम करणे जमले नाही. पण आता थोडेसे स्थैर्य आल्यावर माझ्या पेशाकडे बघण्याचा दृष्टिकोन तर बदलत आहेच, पण अर्थार्जना व्यतिरिक्त इतरही तितकेच महत्त्वाचे मुद्दे मला पूर्वीप्रमाणे विचार करण्यास भाग पाडत आहेत.

‘आज भाऊ भावाला ओळखत नाही.’

‘अरे, तो तर साहेबांच्या चुलतआत्याच्या मुलीचा जावई आहे, त्यांचं काम होणारच!’

‘राजकारणी लोक कोणाचे असतात? त्यांना स्वत: पलीकडे कधी काही दिसतं का?’

‘अरे ते मंत्री त्यांचे जातवाले आहेत, त्यामुळे त्यालाच टेंडर मिळणार.’

अशी अनेक वाक्ये आपल्या कानावर पडत असतात, पण त्यातील विरोधाभास लक्षात घेतला जात नाही. बहुतेक वेळा परिस्थितीनुरूप व त्यातही व्यक्तिसापेक्ष निष्कर्ष काढले जातात. उदा. ‘हा फार जातीयवादी आहे बुवा’ किंवा ‘आजकाल सरळ माणसांना जगणंच अवघड झालं आहे’ इत्यादी. आणि शेवट एकमताने (कोणी आक्षेप घेत नाही म्हणून एकमताने म्हणू या.) ‘बी प्रॅक्टिकल! व्यवहार म्हटलं की या सगळ्या तडजोडी आल्याच!’

लोकांची आपापल्या कार्यक्षेत्राबाबतची स्वतंत्र मते, गृहीतके आपल्या बुद्धीच्या कसोटीवर पारखूनच तयार झालेली असतात. मग अशी मंडळी सामाजिक बाबतीत चिकित्सा करताना का दिसत नाहीत? विविध विषयांवरील चर्चेत मते मांडताना चिंतनाचा अभाव स्पष्ट दिसून मेतो. आपण आपल्याच विधानाच्या विरोधी मत मांडत आहोत, हेही लक्षात घेतले जात नाही.

सामान्यत: स्वत:वर वेळ येत नाही तोवर सामाजिक प्रश्नांवर आपण चिंतन करीत नाही, असा आक्षेप मी अनेकवेळा नोंदवत आलोय, विशेषत: घरच्या मंडळींसोबत! उदा. सजातीय विवाहाचा आग्रह, स्त्रियांच्या पुनर्विवाहाला विरोध.

Management हा विषय शिकताना त्यातील एक वाक्य फार संयुक्तिक वाटले. More and more is the impact of any organization on life, feabler are our responses. म्हणजे एखाद्या संस्थेचा आपल्या जीवनात जेवढा जास्त प्रभाव असतो, तेवढ्या कमी प्रमाणात त्यांची चिकित्सा केली जाते. उदा. धार्मिक अनुष्ठाने. परंतु एखादा जोरदार अनुभव बहुतेक वेळा उपजतबुद्धीला उद्दीपित करण्यास कारणीभूत ठरतो. असाच एक अनुभव मलाही आला त्याविषयी...

निमित्त होते, सी.ए.च्या सेंट्रल कौन्सिल इलेक्शनचे. ही एक संसदेने पारित केलेल्या कायद्यानुसार स्वायत्त संस्था आहे. सेंट्रल कौन्सिल मेंबर्स या संस्थेचे धोरण ठरवतात. यात काही केंद्रशासनाचे प्रतिनिधी, तर काही निवडून आलेले प्रतिनिधी असतात. या संस्थेचा अध्यक्ष मात्र निवडून आलेल्या मेंबर्सपैकी असतो आणि मतदार असतात, भारतभर वा जगभर पसरलेले भारतीय चार्टंड अकौंटंट ‘सर्व सुप्तेषु जाग्रति’ (म्हणजे, सर्व झोपलेले असतात तेव्हा आम्ही जागे असतो) या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे :

चार्टर्ड अकांऊंटंट हे आर्थिक बाबतीत बऱ्यापैकी संपन्न वर्गात मोडतात. उच्चविद्याविभूषित अशी त्यांची प्रतिमा असते. ‘आमच्या सल्ल्याने चालणाऱ्याचे आम्ही भले करू शकतो’ असा विश्वास ते बाळगतात. परंतु या वर्गाच्या दैनंदिन व्यवहाराची धोरणात्मक बाजू ठरवणाऱ्या कौन्सिलसाठीच्या इलेशनमध्ये गेल्या वेळेस मतदान किती झाले? 45 टक्के पेक्षा कमी! पोस्टाने मतदान करण्याची व्यवस्था असतानासुद्धा! (जेव्हा सगळे जागे असतात तेव्हा हे झोपलेले असतात?)

मागील निवडणुकीत पुण्यातून कोणी तुल्यबळ उमेदवार नसल्याने, तेथील मतदानाच्या आधारे मूळ उत्तर भारतीय असलेले एक उमेदवार निवडून आले होते. निवडून आल्यावर हे महाशय प्रेसिडेंट झाले. एका स्वायत्त संस्थेमध्ये प्रेसिडेंट असल्याने बरेचसे अधिकार त्यांना आपसूकच मिळाले. गेल्या 50 वर्षांतील उच्च परंपरेला तडा जाईल असे बरेचसे वर्तन त्यांच्या हातून झाले. त्यात धोरणात्मक निर्णयापासून, (सरकारकडून अँम्बॅसिडर गाडीची मान्यता असताना) महागडी स्कोडा गाडी घेण्यापर्यंतच्या निर्णयांचा समावेश करता येईल. त्यांमुळे, आपल्या स्वायत्तसंस्थेची प्रतिमा मोठ्या प्रमाणात खालावत चालली आहे, अशी भावना यापूर्वी अध्यक्षपद भूषविणाऱ्या व्यक्ती ते इतर मतदार यांच्यात दिसून येत होती. माझे व्यक्तिगत मतही तसेच होते, पण करणार काय?

सार्वजनिक जीवनात बऱ्याच नेत्यांच्या बाबतीत हा अनुभव आपल्याला येतो व आपण अगदी ‘हेल्पलेस’ असल्याचा सूर लावून मोकळे होतो. त्यातही बहुतांश वेळ जातो तो, निवडून आलेल्या इतर उमेदवारांनी वेळीच अशा उपद्‌व्यापी उमेदवारांना विरोध करण्यात दाखविलेल्या निष्क्रियतेला दोष देण्यात तर अशा परिस्थितीत पुण्यातील एस. बी. झावरे यांनी उमेदवारी जाहीर केली. ते गेली 38 वर्षे सी.ए.चे क्लासेस घेतात. ज्यांना 12 वर्षे सर्व्हिस व 12 वर्षे प्रॅक्टीसचाही अनुभव आहे; ज्यांच्या क्लासेसने थोडेथोडके नव्हे तर 7000 पेक्षा जास्त सी.ए. तयार करण्यात हातभार लावला आहे, ज्यांच्या चारित्र्यावर कधीही- कोणीही- कसलाही संशय घेतल्याचे ऐकिवात नाही, असे ते झावरे. आपला पेशा सचोटीने करून सामान्य सी.ए.च्या तुलनेत कितीतरी पट अर्थार्जन त्यांनी करून दाखविले आहे. सरांच्या वक्तशीरपणाचा दरारा वाटावा, इतकी त्यांची ख्याती आहे. थोडक्यात, निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांत झावरेसर सगळ्यात जास्त अनुभवी होते आणि सतत कार्यमग्न राहण्यात त्यांचा हात धरणे आमच्यासारख्या तरुणांसाठीसुद्धा अवघडच आहे. त्यामुळे एखाद्या संस्थेवर विश्वस्ताची भूमिका पार पाडण्यास झावरेसर अत्यंत योग्य उमेदवार होते.

दुसरा उमेदवार सर्वांत तरुण होता. तो प्रसारमाध्यमात नोकरीस होता, पण त्याने पुण्यामध्ये सी.ए. साठी स्टडी सर्कल सुरू केले होते व ते तो बऱ्याच चांगल्या प्रकारे चालवत होता. तो उत्तम संघटक होता, पण आय.सी.ए.आय. सारखी स्वायत्त संस्था चालविण्यासाठी लागणारा कुठल्याही प्रकारचा खास अनुभव त्याच्याकडे नव्हता. त्याच्याकडे एखाद्या विषयातील विशेष प्रावीण्य आहे. असेही कधी मतदारांना दिसून आलेले नव्हते. त्याने स्टडी सर्कल वा इतर ठिकाणी एखादे टेक्निकल सेशन घेतल्याचे ऐकिवात नव्हते. पण तरुण वर्गात मात्र विशेष लोकप्रिय म्हणता येईल, असा तो होता.

तिसरे उमेदवार सध्याच्या प्रेसिडेंटचे भागीदार होते व त्यांचीही प्रेसिडेंटप्रमाणेच प्रतिमा होती. त्यामुळे जे आक्षेप प्रेसिडेंटला लागू होते ते यांनाही लागू होते.

चौथे उमेदवार बहुतेकांना (ते कोण आहेत हेच) माहीत नव्हते, पण त्यांचा बायोडेटा वाचल्यावर मात्र, हेसुद्धा चांगले उमेदवार होऊ शकतात असे वाटायचे.

माझ्यापुरता विचार करता मी ठरवून टाकले, की आपल्याला चालू असलेल्या घडामोडींबाबत तीव्र आक्षेप आहेत, तर आपण या वेळी नुसतेच मतदान करायचे नाही; तर योग्य उमेदवारासाठी भरपूर वेळसुद्धा द्यायचा! आणि ही काही त्या उमेदवाराला केलेली मदत नसेल, तर तो आपला निर्णयप्रक्रियेतील सहभाग असेल. मी शक्य त्या परीने झावरेसरांसाठी प्रचार करायला सुरुवात केली. पण जेव्हा इतरांच्या नजरेत भरेल एवढ्या प्रमाणात प्रचार करायला सुरुवात केली, तेव्हा मात्र ‘चांगले’च अनुभव आले.

प्रचाराचा भाग म्हणून वेगवेगळ्या लोकांना फोन करीत असताना, एक जवळचा मित्र दुसऱ्याच उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचे कळले, म्हणून मी त्याला फोन केला.

मी : मित्रा, कोणाला मतदान करायचे?

मित्र : तू सांग.

मी : तूच सांग मी कोणाला मतदान करू?

मित्र : मी XYZ ला मत देणार!

मी : कसे काय? म्हणजे कशाच्या तरी आधारावर ठरवलेस, की तो आपल्या ओळखीचा आहे म्हणून?

मित्र : ‘हे बघ, हा आहे थोडा लफडेबाज माणूस, पण कुणीही निवडून आले तर आपल्याला काम देणार! आणि आपल्याला काही नको; पण आपल्या हातून काही चूक झाल्यास हा सावरून नेईल.’ (सी.ए. लोक आय.सी.ए.आय.ला जेवढे घाबरतात, तेवढे कोर्टालासुद्धा घाबरत नाहीत; गेल्या 50 वर्षांत आय.सी.ए.आय.ने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात एखाद्या सी.ए.ने कोर्टात केस जिंकल्याचे ऐकिवातसुद्धा नाही.)

मी : मी तर झावरेसरांना मत द्यावं म्हणतोय.

मित्र : सरांना नाव ठेवताच येणार नाही, सर आमच्या ऑफिसला आले होते, तेव्हा मीही थोडा गडबडलो होतो, पण एक गोष्ट फार अवघड आहे.

मी : काय?

मित्र : सर फार  ethical आहेत. एखादी बेकायदेशीर गोष्ट आपण सरांसमोर बोलूसुद्धा शकत नाही, मग असल्या गोष्टीत मदत करा असं म्हणणं तर दूरच राहील.

मी : बरोबर आहे, पण जर एखाद्याकडून चूक झालीच तर त्याला कमीत कमी explotation होणार नाही एवढी मदत तर निश्चित करतील, असं तुला वाटत नाही का?

मित्र : तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण...

मी : आपण जर अशा उमेदवारांना रोखलं नाही, तर हे लोक किती माज करतील? हा तर दुसरा दालमिया होईल?

मित्र : हो, तो तर तसाच आहे. पण...

(मला थोडा संशय आला आणि म्हणून If you can not convince them, then confuse them’ या रणनीतीनुसार मी माझा मुद्दा बदलला.)

मी : माझ्या जागी तू सरांना काही प्रश्न/मदत विचारायला गेल्यास तुला वेगळी व मला वेगळी वागणूक मिळेल, असं तुला वाटतं का?

मित्र : सर एकदम impartial आहेत.

मी : मग अशा माणसांना मदत करणं आपलं काम नाही का?

मित्र : मी सरांना नक्की मतदान करीन, पण पहिलं की दुसरं, हे आता तरी नक्की सांगता येणार नाही.

त्याच्या या अजब तर्कशास्त्राने मी आश्चर्यचकित झालो होतो, म्हणून झाल्या संवादाबाबत दुसऱ्या एका मित्राशी चर्चा केली.

मी : अरे त्याच्या ह्या अजब लॉजिकला काय म्हणशील?

मित्र : काही नाही, त्यांचं मूळ कारण वेगळं आहे. त्याने जवळपास 250 सी.ए.ची यादी केली आहे. बहुतेकजण एकाच जातीचे आहेत. मलाही फोन आला होता. त्याने यादीतल्या प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करून सांगायला सुरूवात केलीय, ‘हा आपला माणूस आहे आणि आपण त्याला मदत केलीच पाहिजे.’ तुझ्याशी त्याला असं बोलणं शक्य नव्हतं, म्हणून त्याने हे वेगळं कारण पुढं केलंय. अर्थात, ते कारणही बऱ्याच जणांच्या मनात आहे बरं!

मी : म्हणजे त्याला पटवत बसण्यात काही अर्थ नाही?

मित्र : तेच म्हणतोय मी तुला, पण सगळे काही तसे वागणार नाहीत. फक्त तोंडावर ‘हो’ म्हणतात एवढेच.

या दोघांशी झालेल्या चर्चेबाबत मी तिसऱ्या एका मित्राशी बोललो.

मी : तुला काय वाटतंय; जातीचा फॅक्टर खरा असेल? की, सर सरळमार्गी व तत्त्वनिष्ठ आहेत म्हणून हे लोक त्यांना नाकारताहेत?

मित्र : मूळ कारण फक्त आणि फक्त जातीचं आहे, सरांऐवजी दुसरा कोणी उमेदवार असता तर या मित्राने कुठला तरी वेगळा मुद्दा शोधून काढला असता.

मी : वेळ कमी आहे, काही तरी केलं पाहिजे. त्या 250पैकी किमान 100 मते तरी सरांना मिळाली पाहिजेत.

मित्र : तू काहीही केलं तरी जातीचाच मुद्दा राहणार, या लोकांच्या डोक्यातून तो जाणार नाही आणि...

मी : आणखी काहीतरी म्हणत होतास...

मित्र : तूसुद्धा एवढा  अँक्टिव्ह कशामुळे झालास? सर मराठा आहेत म्हणूनच ना! सरांऐवजी दुसरा कोणी उमेदवार असता तर तू एवढा अँक्टिव्ह राहिला नसतास...

मी : नाही! सर योग्य उमेदवार आहेत आणि अशा बंडल लोकांना रोखण्याऐवजी खंबीरसुद्धा आहेत. ते काही गणपुलेसारखे राजीनामा देऊन येणारे नाहीत आणि ते कितीही सरळ असले तरी निवडून आल्यावर कौन्सिलमध्ये त्यांच्या मताला सहजासहजी कोणालाही डावलता येणार नाही.

हे उत्तर देताना माझा आवाज वाढलेला होता. सामान्यत: माझा आवाज बऱ्यापैकी मोठा असला तरी, वाद-विवाद किंवा चर्चेत तो फार संयत असतो असं निदान मला तरी वाटतं.

आमची चर्चा येथेच थांबली. पण सामान्यत: बहुतांश लोकांचे सामाजिक विश्व हे नातेवाईक, काही मित्र व समव्यावसायिक एवढ्यांपुरतेच मर्यादित असते. त्यामुळे रोजच्या जीवनातील शिष्टाचार, परंपरा ह्या काही प्रमाणात का होईना, जातीनिहाय असणार. त्या अनुषंगाने असणारे स्वाभाविक आकर्षण समजण्यासारखे आहे.

निवडणुकीच्या प्रचाराच्या आखणीसाठी नियमित बैठका होत होत्या, त्यात एकाने हा मुद्दा जरा जोरात उपस्थित केला. तेव्हा सर आता काय आणि कशाप्रकारे प्रतिक्रिया देतात, याची मला उत्सुकता होती. पण सरांनी प्रश्नकर्त्याचा रोख ओळखून मध्येच त्याला अडवत प्रश्न केला.

‘मी तुम्हांला परवा ठरल्याप्रमाणे मतदारमादी पाठवली होती, ती तुम्ही एरियावाईज सॉर्टआऊट करणार होता, ते कामझालं का?’

प्रश्नकर्ता : आँ? हो करतो. पण सर....

सर : आपण आपल्या हातातल्या कामावर अधिक मेहनत घेतली पाहिजे ना!

मुद्दा वेगळ्याच पद्धतीने निकाली निघाला. थोड्या वेळाने आणखी काही लोकांनी तोच मुद्दा पुन्हा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सर म्हणाले...

‘हे पहा, एखादा माणूस सी.ए. असेल तर त्याला किमान बुद्धिमत्ता आहे असे तुम्ही मानता ना? मग त्याला स्वत:चे काही विचार असणारच की! सर म्हणो किंवा कोणीही म्हटल्याप्रमाणे तो चालणार नाही, तेव्हा तुम्ही थोडा स्वत:वर विश्वास दाखवा ना!’

सरांचे उत्तर मला फार भावले व पुढच्या प्रचारात मी त्यांच्या स्पष्टीकरणाचा भरपूर उपयोग केला. एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवत होती. सरांभोवती प्रचारकार्यात जास्त मेहनत घेणाऱ्यात सजातीय लोक बऱ्यापैकी दिसत होते व त्यातील काहीजण त्याचे नातेवाईक होते. पण त्या सगळ्यांचे विचार जातीच्या मुद्यापुरते तरी सरांशी जुळण्यासारखे वाटत नव्हते. त्यातील काहीजण मला बोललेसुद्धा. ‘आपल्यापैकी फक्त सरच निवडून येऊ शकतात, मुळात आपले लोक पाच टक्केसुद्धा नाहीत. पण सरांना सगळ्या लोकांमध्ये मान आहे. अगदी सरांना मत न देणारासुद्धा त्यांच्याशी फार आपुलकीने वागेल, त्यामुळे आपण जोरात प्रयत्न केला पाहिजे, तर आपला माणूस निवडून येईल.’ अशावेळी मी काहीच बोलत नव्हतो.

यथावकाश मतमोजणी झाली, एकूण 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत झावरेसर तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवून निवडून आले. पुण्यातील इतर उमेदवार तर हरले, पण विशेष म्हणजे प्रेसिडेंटच्या उमेदवारासमोर अगदी नवख्या असलेल्या उमेदवाराला 25 टक्के मते जास्त मिळाली होती. जातीनिहाय मतदान झाले नाही, हे तर अगदी स्पष्टच होते. अन्यथा, सर निवडून तर आलेच नसते, पण सगळ्यात शेवटी राहिले असते.

या अनुभवानंतर माझ्या मनात मात्र काही प्रश्न उभे राहिले.

1. मतमोजणी होती म्हणून नेमके चित्र बाहेर आले, पण अशी परिस्थिती नसते तेव्हा किंवा परिस्थिती असूनही स्पष्ट कौल नसतो,तेव्हा जनमानसात काय संदेश जात असेल?

2.कुठल्याही सार्वजनिक कार्यात, एखाद्या माणसाने जातीचा आधार घेऊन समूह बांधण्याचा प्रयत्न केल्यास, विरोधी मत असतानाही आपण (निदान) ते का मांडत नाही? मी स्वत:ही याला काही वेळेस अपवाद ठरलो नाही. विशेषत: या गोष्टींचा तिटकारा असूनसुद्धा!

3.आपल्या देशात होणाऱ्या अनेक निवडणुकांत वेगवेगळ्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीतील मतदार असताना, राजकीय लोकांना बोलण्यातील संयम राखण्यासाठी किती कसरती कराव्या लागत असतील?

4.एकाच वेळी जात आणि वर्ण अशा दोन्हीतही मोडणाऱ्या ब्राह्मण वर्गातील ‘भला माणूस’ सार्वजनिक निवडणुकीत उतरल्यास, लोक बऱ्याच वेळा त्यांना स्वीकारत नाहीत. अशावेळी हे लोक फ्रस्ट्रेशनमध्मे जातात व सर्व खापर जातीव्यवस्थेवर फोडताना दिसतात. यात अनेक कारणांबरोबर विशिष्ट व्यक्तिगत जीवनपद्धतीमुळे सामान्य लोकांना ते आपल्यातील वाटत नाहीत, हे कारण असेल का? की जातीव्यवस्थाच?

5.प्रसारमाध्यमात समाजाचे प्रतिबिंब उमटतेच, की गर्दीच्या मानसशास्त्रामुळे निर्माण होणाऱ्या वाचाळतेचे प्रतिबिंब उमटतेय, हे कळायला काही मार्ग दिसत नाही. यांच्याद्वारे जातीचा बागुलबुवा जेवढा उभा केला जातो, तो खरंच तेवढा आहे का?

6.माझ्यासारख्या माणसाला जातीच्या आधारावर कधीही कमी लेखणे किंवा डावलणे याचा अनुभव आलेला नाही; परंतु जेव्हा दलित वर्गातील एखाद्या व्यक्तीला रोजच्या जीवनात असा अनुभव येत असेल आणि मग त्याने आक्रस्ताळेपणाने प्रतिक्रिया तर ती किती प्रमाणात क्षम्य मानावी? अगदी याच्या विरूद्ध एखाद्या ब्राह्मण व्यक्तीने प्रकट केलेला उद्वेग, त्याला दिली एकदम संकुचित मनोवृत्तीचा ठरवणार नाही का?

7.जातीचा मुद्दा पूर्णत: कसा दुर्लक्षित करता येईल? बऱ्याचवेळा नुसत्या थोड्या बोलण्यावरून एखाद्या माणसाची जात लक्षात येते! अशा परिस्थितीत एखाद्या कुशल संघटकाने, त्या गुणदोषांचा उपयोग करून घेण्यासाठी जातीचा निकष लावला तर त्याला एक ‘मॅनेजमेंट पद्धत’ असे मानता येईल का?

या बाबतीत उदाहरण द्यायचे झाल्यास पु.ल. नी म्हटल्याप्रमाणे ‘तसं नावात काही नसतं, पण एखादा ‘बजरंग दगडू दांगट’ नावाचा मुलगा गणितात फार हुशार आहे असं म्हटल्यावर काय वाटतं?’

8.‘उदंड कायदे, पण अंमलबजावणी यथा तथा’ असा समज आपल्या देशातील कायद्यांबाबत सार्वत्रिक दिसून येतो, पण कुठल्याही सार्वजनिक कार्यात जातीच्या आधारे ‘अपील’ करणे भारतात तरी शक्य नाही. (काही तुरळक अपवाद वगळता) निदान औपचारिकपणे! अशा कायद्यांमुळे काम फरक पडला, या प्रश्नाला ‘हा कायदा नसता तर काम चित्र दिसले असते?’ हे उत्तर योग्य राहील का? आणि हे जर योग्य उत्तर असेल तर अनौपचारिक चर्चांमध्ये आपले मत मांडत राहिल्याने किती फरक पडेल?

9.काहीही ध्यानीमनी नसताना, दोन-चार लोकांनी जातीचा मुद्दा उपस्थित केल्यावर एकदम सगळे चित्र त्याआधारे फिरते की काय, अशी धास्ती मला का वाटली असावी? की दुय्यम,नेतृत्वाकडून कायमच असल्या प्रकारचे मुद्दे जोराने मांडण्यात येत असल्याने, त्यांच्या प्रभावाखाली आपली विचारप्रक्रिया पूर्वग्रहदूषित होत असेल?

वरील प्रश्न मला, हे काही अनुभव असल्याने फार प्रकर्षाने जाणवले असे वाटते पण व्यक्तिगत अनुभव प्रमाण मानून कोणी सामाजिक सिद्धांत मांडायला लागल्यास, मी तर त्यांची साधारण बुद्धिमत्तेचा माणूस (अपरिपक्व) अशी गणना करीत आलोय. निश्चितपणे मी माझा वरील अनुभव प्रमाण धरून मते बनवली नाहीत, पण जे विषय यापूर्वीसुद्धा मला चिंतन करण्यास प्रवृत्त करीत होते, त्यांच्यावर मी अधिक भर का दिला नाही, याची खंत मात्र मला जरूर वाटते.

पूर्णवेळ शैक्षणिक आयुष्य संपण्याच्या आणि व्यवहारी जगात पूर्णवेळ उतरण्याच्या काळापर्यंत जी आपली वैचारिक बैठक झालेली असते, तीच बहुतांश वेळेस व्यक्तीच्या वैचारिक वाढीची मर्यादा दिसून येते. (जसे शरीर एका विशिष्ट वयापर्यंत वाढते; पुढे बदल होत राहतात, पण विशेष नाही). विचार करीत बसायला वेळ, श्रम व तात्कालिक आराखडे यातून उसंत मिळत नाही, हे हमखास कारण पुढे करण्यात येते व त्यात बरेच तथ्य आहे. पण हे कारण ज्या वयोगटातील व्यक्तींकडून दिले जाते, त्यात प्रामुख्याने 35 च्या पुढचा वर्ग मोडतो. या वयोगटाला आपण निश्चितच तरुण म्हणत नाही!

जंगलीपणापासून ते सध्याच्या मानवी जीवन पद्धतीवर एक नजर टाकल्यास, एखाद्याचे समाजातील स्थान हे त्यांच्या शारीरिक ताकदीवरून ठरवण्याचे दिवस तर केव्हाच संपले आहेत. मग मला आणखी एक प्रश्न पडलाय...

तरुण कोण?

निकालानंतर एका जवळच्या मित्राची प्रतिक्रिया- ‘आपण मराठ्यांनी अखेर महादजी शिंदे नंतर अटकेपार झेंडा लावला.’ त्यावेळी मी त्याला काही उत्तर दिले नाही, पण...

आता?... नक्कीच उत्तर देणार!

मी जेव्हा माझ्यासाठी मुलगी पहायला गेलो होतो, तेव्हा होणाऱ्या गप्पांत भांडारकर संस्थेवर संभाजी ब्रिगेडने केलेल्या हल्ल्याचे एकजण समर्थन करीत होता, त्यावेळी बाकीच्या लोकांचे आपल्या बोलण्या-वागण्याकडे बारीक लक्ष आहे हे लक्षात येत असूनही, मी माझी मते काहीही हातचे राखून न ठेवता मांडली होती. पण गेल्या चार-पाच वर्षांत मात्र व्यावसायिक जगात पूर्णवेळ उतरल्यावर, रोजच्या वर्तमानपत्रांचे वाचनसुद्धा नीट झाले नाही. प्रश्न नुसत्या वेळेचा नव्हता; तर कल कशाकडे आहे हा होता. पूर्वी रोज चार-पाच तास व्यायाम करणाऱ्या मला, गेल्या तीन-चार वर्षांत पंधरा-वीस मिनिटेसुद्धा व्यायाम करणे जमले नाही. पण आता थोडेसे स्थैर्य आल्यावर माझ्या पेशाकडे बघण्याचा दृष्टिकोन तर बदलत आहेच, पण अर्थार्जना व्यतिरिक्तइतरही तितकेच महत्त्वाचे मुद्दे मला पूर्वीप्रमाणे विचार करण्यास भाग पाडत आहेत. थोडक्यात, मी आणखी तरुण झाल्याची जाणीव मला होत आहे.

 

(नांदेडचा चंद्रशेखर पाटील गेल्या पाच वर्षांपासून पुणे येथे चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करीत आहे. पाच वर्षांपूर्वी त्याने ‘साधना’तच लिहिलेला पहिलाच लेख (हरिभाऊ महालेंच्या सहवासातील ‘ते’ दिवस) विशेष गाजला होता. हा त्याचा केवळ दुसरा लेख.)

Tags: मतप्रभाव राजकारणात जात जातीचे राजकारण स्वायत्त संस्था निवडणुका जातप्राबल्य चार्टर्ड अकांऊटंट सीए चंद्रशेखर पाटील Cast previlage Election mode ICAI religion Cast Random Thoughts author Article charted account CA chandrashekhar patil weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके