डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चिखलात हात घालण्याचे धैर्य दाखवणाऱ्या कार्यकर्तीचे पुस्तक

वृषाली मगदूम ह्या अध्यापक आणि स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्या. विशेषत: त्यांच्या कचरावेचक महिलांच्या संघटनेबरोबर काम करणाऱ्या. मुंबईतील कचऱ्याच्या ढिगांसमवेत जीवन व्यतीत करणाऱ्या महिलांच्या त्या मदतनीस, सखी, दोस्त; त्यांना माणुसकीचे जीवन मिळावे म्हणून त्यांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देतांना व्यक्तिगत प्रश्नही सोडविण्यासाठी झगडणाऱ्या. व्यवस्था कोणत्याही प्रकारची असो, भांडवलशाही, की समाजवादी; राज्य कोणाचेही असो, भाजप, काँग्रेस-पुलोद किंवा महाविकास आघाडी. ही व्यवस्था तळागाळाला तशीच काम करत राहते. या व्यवस्थेच्या एका स्पोकला हात घातला की, तो न सोडता त्याच्याभोवती फिरत त्यात अडकलेल्या स्त्रियांना सोडविणे किती कठीण असते हे आपणाला माहीत आहे. पण न कंटाळता, त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करत राहणे हे वृषालीचे वैशिष्ट्य आहे.

वृषाली तिच्या सभोवतालचा भवताल ती खूप संवेदनाशील वृत्तीने पाहते. त्याचीच काही उदाहरणे येथे सापडतात. ती जेव्हा एखाद्या स्त्रीच्या समस्येमध्ये उतरते आणि व्यवस्थेशी, प्रशासनाशी संघर्ष करते त्याचे तपशीलवार वर्णन तिच्या चिकाटीची साक्ष देते. वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्यांची माहिती असणे आणि नसेल तर ती समजून घेणे आणि न वैतागता आपला रस्ता चालत राहणे हे वृषालीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. मी या तीन-चार घटनांची थोडी माहिती देत या पुस्तकाची ओळख करून देणार आहे.

‘लढाई एका संघर्षाची’ ही एका मंजुळा नावाच्या गरोदर मुलीची आणि तिला फसविणाऱ्या हृदय नावाच्या मुलाची आणि त्याच्या घरच्यांची; आणि याला उत्तर म्हणून सामाजिक हस्तक्षेपाची गरज कशी जाणवते याच्या तपशीलवार वर्णनाची. पोलिस हातावर हात टाकून बसून राहिले असताना काय करता येईल याचा अंदाज येथे येतो. वृषालीने मुद्दामच मंजुळाची केस घेतली. कारण त्या गावातील जवळजवळ सर्व मंडळी साक्ष द्यायला तयार होती. सर्वांनाच माहीत होते की हृदय सतत मंजुळाला घेऊन घरी जात असे. त्यामुळेच जेव्हा मंजुळाला सहा महिने होऊन गेले तेव्हा तिच्या आईवडिलांची घाई सुरू झाली. हृदयचे वडील तयार झाले आणि आता मुहूर्त काढायचा का- याची विचारणा करताना लक्षात आले की ते अळंटळं करत आहेत. गोष्ट पंचायतीमध्ये न्यायचे ठरले. या गव्हाणगावच्या कारभाराची रोचक माहिती मिळाली. 99 टक्के प्रश्न गावातल्या गावात सोडविले जातात. मंजुळा नववी शिकली होती. पायात थोडे व्यंग होते. पण तिच्या भावाने एक टपरी टाकून दिली होती. हृदय 12वी पर्यंत शिकलेला होता. वडिलांच्या बरोबर सुतारकाम करत असे. परंतु हृदयच्या वडिलांची अळंटळं लक्षात आल्यावर पोलिस कमिशनरकडे जायचे ठरविले. तेथे हृदय अगोदरच येऊन बसला होता आणि हवालदार त्याची लेखी तक्रार लिहीत बसला होता. पोलिस इन्स्पेक्टरने मीटिंग घेऊ असे आश्वासन दिले. त्या वेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले की इन्स्पेक्टर थातूरमातूर करून बोळवण करणार. म्हणून कमिशनरच्या मीटिंगसाठी आग्रह धरला. साहेब बरेच समजूतदार होते. त्यांनी हृदयच्या वडिलांना बरेच समजाविले. पण एकच उत्तर मिळत होते. ‘‘मुलगा नाही म्हणतोय.’’ त्याने तर मी तिला ओळखत नाही हाच धोशा लावला. कमिशनर साहेबांनी सांगितले की आता, नाही म्हणतोस, पण उद्या बाळाची डीएनए टेस्ट केली आणि पॉझिटिव्ह आली तर लग्न करावे लागेल. गावच्या लोकांचाही आग्रह होता. हृदयने शेवटपर्यंत ऐकले नाही.

वृषालीच्या डोक्यात भयंकर वादळ माजले होते. अशा तरुण पोरी रस्त्यावर पडल्या आहेत का? मुले नामानिराळी राहतात. ही केस शेवटपर्यंत लढवायचीच असा तिने निश्चय केला होता. वकिलाशी बोलणे झाले. कायदेशीर अडचणी काही येणार नाहीत याची खात्री पटली. आणि मग एक प्लॉट रचला गेला. गावाच्या लोकांची संमती होतीच. संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन बसने वृषाली गावात आली. तिने आधीच पोलिस इन्स्पेक्टरना सांगून गावामध्ये पोलिस तैनात असतील अशी व्यवस्था केली होती. मात्र जबरदस्तीने हे लग्न लावले गेले तर पोलिस केस होऊ शकते असेही तिला सांगितले होते. मात्र ही घटना गाजवायचीच, असे संघटनेने ठरविले. या निमित्ताने मुलींना फसविण्याचा मुद्दा जोरदार पुढे आणायचा. तिने दृष्टी केबलवाल्यांना बोलावून ठेवले होते. पोलिस मनाई करत होते. त्यांना दंगा-बखेडा नको होता. हृदयच्या घरासमोर बस थांबविली. पोलिस तेथे बसू देत नव्हते. पण बाजूला सावलीत बसविले. हृदयच्या घरात शिरल्यावर लक्षात आले की, तो व त्याचे वडील बाहेर गेले होते. ज्या गावातील लोकांनी शपथेवर सांगितले की आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू, बाहेर जाऊ देणार नाही, त्यांनी ही शब्द पाळला नव्हता. पोलिसांनीही अडविले नव्हते. वृषालीने पोलिससाहेबांना फोन लावला. ‘‘आमची भूमिका सामंजस्याची आहे. तरीही तुम्ही आम्हांला का अडवता आहात? आम्ही कोणत्याही पक्षाचे राजकारण करत नाही.’’ साहेबांनी सांगितले की आलाच आहात तर तासभर थांबा आणि जा. तेथे राडा नाही झाला पाहिजे. वृषालीला गावातील स्त्रियांची आणि पुरुषांचीही मजा वाटली. केवढ्या उत्साहाने आम्ही लग्न लावून देऊ म्हणणाऱ्या स्त्रिया पोलिस आले म्हटल्यावर पुढे येईनाशा झाल्या. संघटनेच्या बऱ्याच महिला जमल्या होत्या. गाणी म्हणायला सुरुवात केली. दृष्टी केबलवाले मुलाखती घ्यायला लागले. मंजुळाला घेऊन मुली पुढे आल्या. मग दोघे पंचायतीवाले पुढे आले. वृषाली सगळ्यांना उद्युक्त करू लागली. ‘‘मुलाला उचलून न्यायची तुमची तयारी होती आणि आता पोलिसांना बघून काय घाबरायला झालं का?’’ तेवढ्यात नगराध्यक्ष म्हात्रे तेथे आले. त्यांना बोलावले होतेच, त्यांनी कबूलही केले होते. पोलिस स्वत:ही येणार होते. लग्न झाले असते तर आशीर्वाद द्यायला. पण एकदा मुलगा मागे फिरला म्हटल्यावर जबरदस्तीचा चार्ज, ए़फआयआर लागण्याची भीती होती. म्हात्रेसाहेबांची मुलाखत सुरू झाली आणि लोक आपणहून पुढे यायला लागले. म्हात्रेसाहेबांना कोणीतरी विचारले, ‘‘मंजुळा प्रकरण खरे आहे का?’’ त्यावर नगराध्यक्ष म्हात्रेसाहेब बोलू लागले. ‘‘मीही मुलाशी बोललो होतो. स्त्री मुक्ती संघटनेने जे पाऊल उचलले ते कौतुकास्पद आहे, मग दुसरी एक जण उभी राहिली आणि तिने बजाविले, ‘‘मंजुळाची जशी फसवणूक झाली तशी इतर मुलींची होऊ नये. गावातील मुलींनी सावध राहावे. अशा मुलांना धडा शिकवावा म्हणून आमचे महिला मंडळ येथे आले आहे.’’ अशी एकेक भाषणे होत राहिली. दृष्टी चॅनेलवाले आल्यावर पोलिस पळून गेले होते. पण आता आवरणे भाग होते. मंजुळा व तिच्या भावाला मात्र शांत करणे कठीण होते. मंजुळाला गावात राहणे कठीण होते तरी ‘‘तिने तेथेच राहावे, मूल झाल्यावर डीएनए चाचणी करून कोर्टात जाऊन न्याय मिळवावा लागेल आणि तोपर्यंत संघर्ष चालू ठेवावा लागेल. आम्ही तुझ्याबरोबर तोपर्यंत असूच,’’ असे आश्वासन वृषालीने दिले.

ह्या सर्व घटनेत शेवटपर्यंत राहण्याची आणि हे विविध मार्ग शोधून सामाजिक हस्तक्षेप करण्याची वृषालीची चिकाटी कौतुकास्पद आहे. समाजसेवेच्या अभ्यासामधील ही एक केस स्टडी नक्कीच होईल.

‘आख्यान राशनकार्डाची’ कथा कदाचित जास्त परिचित असेल. आधारकार्ड आल्यापासून रेशनकार्डची तुमची-आमची गरज संपली आहे. आपल्यापैकी पुष्कळ जण रेशन घेतही नसतील. पण श्रमिकांसाठी रेशनकार्ड अत्यावश्यक आहे हे अनेक प्रसंगांनी पुन्हापुन्हा सिद्ध होत असते. ही एका रेशनकार्डवाल्याची कथा. त्याचे मोठे कुटुंब. हातात रेशनकार्ड होते ते नवरा बायकोचे आणि दोन मुलग्यांचे. त्यानंतर त्यांची लग्ने झाली, त्यांना मुले झाली. एकीला घरीच मूल जन्माला आले. एकीचे रुग्णालयात जन्मले. त्याचे जन्मदाखले जाऊन आणावे लागले. आता या जुन्या रेशनकार्डात ह्या सर्वांची नावे घालायची होती. रेशन दुकानदार कार्ड नवे करून आणा म्हणत होता. त्याशिवाय तो रेशन द्यायला तयार नव्हता. अर्ज घेऊन तो म्हातारा रेशनऑफिसमध्ये गेला आणि त्याला परत पाठवले गेले. ‘‘एवढे दिवस काय झोपला होतात काय?’’ शिवी मिळाली. अर्ज नेमका कसा भरायचा याची माहिती कोण देईल विचारल्यावर ‘‘तुम्ही भरलेला फॉर्म ठेवून द्या पंधरा दिवसांनी या,’’ असे उत्तर मिळाले. पंधरा दिवसांनंतर गेल्यावर बघतात तो खुर्चीवरचा माणूस गायब. मग परत सर्व माहिती सांगितली. त्यावर त्या गृहस्थाने बरेच आख्यान लावले. सुनांच्या माहेरच्या रेशनकार्डावरील नावे रद्द झाली आहेत का? त्याच्या कॉपीज पाहिजेत, जे मूल घरी जन्मले त्याचा पुरावा पाहिजे. जन्मदाखला म्युनिसिपालिटीत मिळेल. त्याला टिके लावले असतील तर त्याचे सर्टीफिकेट असेल तर ते आणा- अशी बरीच मोठी कागदांची पूर्तता करण्याची यादी मिळाली. हे सर्व एका खेपेत नाहीच. एखाद्या टेबलावरच्या माणसाने दुसरीकडे बोट दाखवायचे हीच पद्धत. महिन्याभराने पुन्हा वृषालीबाई स्वत: म्हाताऱ्याला घेऊन रेशनच्या ऑफिसमध्ये लाइनमध्ये उभ्या राहिल्या सर्व कागदपत्रे बरोबर असल्याची खात्री करून घेऊन. पण टेबल्याशी आल्यावर पुन्हा त्या गृहस्थाने समोरच्या बोर्डाकडे बोट दाखविले. चौकशीची लाईन होती ती. तेथील मॅडम जरा बरी होती. तिने सांगितले. ‘‘बाई हे सर्व एकदम होत नाही. तुम्हांला जुने कागद नवीन करून घ्यावे लागतात. नवीन कार्ड मिळाल्यानंतर प्रथम जुनीच नावे राहतात. नंतर जादा नावांसाठी तुम्हांला परत अर्ज करावा लागेल. जुनी दुहेरी कार्डपद्धती बंद झाली आहे.’’

तरीही वृषालीचे अरिष्ट संपलेच नव्हते. शेवटी ती साहेबांना भेटायला आत गेली. तिने तिची सर्व मेहनत साहेबांना सांगितली. चिडूनच गेली होती. तिच्यासारख्या बाईलाही ही सगळी प्रोसेस काय आहे ते कळत नव्हते ते अशिक्षित माणसांना काय कळणार? नकळत म्हणून गेली ती. साहेबांचा सल्ला होता. ‘‘त्यांनाच येऊ दे. तुमच्यापेक्षा जास्त हुशार असतात ते.’’ त्यानंतर त्यांनी भराभर एक यादी तयार करून दिली. भरमसाठ कागदपत्रे व त्यातील काहींच्या झेरॉक्स प्रती वगैरे. शेवटी ‘‘एक रेशन ऑफिसमधील अधिकारी घरी येऊन, घराचा पत्ता आणि माणसे बघून जाईल. नंतर 15 दिवसांनी कार्ड तयार होईल ते घ्यायला या,’’ साहेब म्हणाले. या सर्व ऑफिसमधील वाऱ्यांनंतर सहा महिने गेले आणि या उपद्‌व्यापला फळ आले.

याच काळात वृषालीकडे काम करणारी बाई तिच्या मुलीचा जन्मदाखला काढून द्या, म्हणून मागे लागली होती. शाळेत घालायचे होते. ती आली आणि म्हणाली ‘‘हा बघा 350 रुपयेला मिळाला.’’ तिचे मालक गेले होते दाखला काढायला. त्यांच्याकडे आधी मागणी झाली रेशन कार्ड दाखवा. पोरगी येथेच राहते त्याचा पुरावा दाखवा. त्यांच्याकडे काहीच नव्हते. मग त्यांनीच सांगितले की 350 रुपये द्या. वरून काम करून आणतो. चार वाजता गेलो आणि दाखला तयार होता.

‘आख्यान राशकार्डाचे’ ही लढाई सरकारी कचेरीतील उडवाउडवीची. टोलवाटोलवीची. तर्कविसंगत नियमांच्या जाळ्यात लोकांना अडकवून शेवटी पैसे देऊन काम करून घेणे हाच शेवटचा उपाय हे लोकांपर्यंत पोहोचविण्याची.

‘रुपेरी कडा’ ही रस्त्यावर पडलेल्या नीलाची. पुढ्यात नुकतेच जन्मलेले मूल आणि जाणाऱ्या येणाऱ्यांना त्या दृश्याबद्दल काहीही न वाटणे. कचरावेचक वस्तीतील संघटनेच्या सभासद असलेल्या दोन-चार स्त्रिया आल्या होत्या एका मुलीला घेऊन ऑफिसमध्ये. ऑफिसमधील कार्यकर्त्यांनी तिला पोलिस स्टेशनला नेले होते. तेथे केस नोंदवून पोलिसांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. पण हॉस्पिटल प्रवेश द्यायला तयार नव्हते म्हणून परत आणले होते. मुख्य मेडिकल ऑफिसर बार्इंना फोन करून विचारले तर कारण मिळाले, ‘‘त्या मुलीच्या डोक्यावर परिणाम झाला आहे म्हणून ती केस मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावी लागेल. त्यासाठी पोलिसांच्या मदतीने कोर्टाची ऑर्डर आणावी लागेल. तेवढे झाले की मग मेंटल हॉस्पिटलमध्ये लगेच घेतले जाईल. नाहीतर जे.जे. हॉस्पिटलला घेऊन जा. त्यांच्याकडे सायकियाट्रिक वॉर्ड आहे.’’ नवी मुंबईहून मुंबईला घेऊन जाणे सोपे नव्हतेच. पोलिसांची मदत लागणार होती. तेथेच गोची झाली. त्यांच्याकडे त्यांची व्हॅन नव्हती. बसने जावे लागेल. शिवाय संघटनेच्यापैकी कोणीतरी जाणे आवश्यक होते. संध्याकाळची वेळ. पोलिस म्हणत होते, ‘‘आमचे कोणी तेथे ऐकून घेणार नाही.’’

ही सगळी तयारी चालू होती तोवर नवा मुद्दा पुढे आला. जे.जे. मध्ये वेड्या बाईला ठेवून घेतील, पण बाळाला नाही. आई असेल तरच बाळाला प्रवेश मिळेल. सातव्या महिन्यातील बाळ. त्याला बराच वेळ दूध मिळाले नव्हते. पुन्हा एकदा निदान एका रात्रीपुरती सोय म्हणून नवी मुंबईच्या हॉस्पिटलला विनंती केली की, बाळासाठी आईलाही ठेवून घ्या. ती आता जोरजोरात हसताना दिसते आहे. पण झोपेची गोळी दिली की शांत होईल. तिच्यावर अन्याय झालाय म्हणून ती डोके फिरल्यासारखे करतीय. एवढी चर्चा होऊनही हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या मनावर परिणाम झाला नाही. शेवटी एका खाजगी डॉक्टरकडे नेण्यात आले आणि नीलाच्या डोक्यावरील तात्पुरता उपाय म्हणून तिला झोपेचे औषध मिळाले. तोपर्यंत पोलिसबाई बाळाला ‘बालविश्व’मध्ये ठेवून आल्या होत्या. अनाथ मूल म्हणून त्याची सोय लावणे शक्य झाले होते. नीलाला ऑफिसमध्येच ठेवण्यात आले आणि दोन कार्यकर्त्या मदतीला थांबल्या.

दुसऱ्या दिवशी नीलाला मेंटल हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी असाच खटाटोप करावा लागला. हे सगळे पोलिसांचे काम- पण त्यांनी हात वर केले. मेंटल हॉस्पिटलला पोहोचल्यावरसुद्धा पोलिसबाई पोहोचल्याच नाहीत. पुन्हा पुन्हा फोन करून बोलवावे लागले. जणू वृषालीच्याच घरचे कार्य आहे अशी त्यांची वागणूक. तेथेही प्रवेश देताना अशीच अडवणुकीची वागणूक. तेथे नीलाला चार दिवस ठेवण्यात आले. वृषालीने तेथील एकूणच थंडगार वागणूक, आणि लांब लांब खोल्यांचे केलेले वर्णन ऐकून वाचून शहारे येतात. तेथे निदान झाले की तिच्या डोक्यावर तात्पुरता परिणाम आहे. मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची गरज नाही.

एवढ्या सगळ्या काळात नीलाची माहिती काढायला बराच वेळ मिळाला. लक्षात आले की ती या कचरावेचक झोपडपट्टीतच राहते. वडिलांनी दुसरे लग्न केले आणि त्यांना ही मुलगी नकोशी झाली. तोपर्यंत तिची ओळख कोण्या विजयशी झाली होती आणि गरोदर राहून बाळ झाले. हे पाहिल्यावर वडिलांनी तिला रस्त्यावर नेऊन टाकले, पुलाच्या खाली- रक्ताच्या थारोळ्यात. मुलासकट. असेही कळले की तिला त्यांच्या कळपात घ्यायला आणि धंद्याला लावायला एक टोळीही येऊन गेली होती. बोलताना ‘‘आमची संस्था आहे, आम्ही अशा स्त्रियांना आधार देतो आणि मुलांचीही देखभाल करतो,’’ असा आव त्यांनी आणला होता. पोलिसांना पाहून ते पसार झाले.

मेंटल हॉस्पिटलमध्येही तेथील सामाजिक स्वयंसेविकेचा अनुभव चांगला आला नाही. सतत टाळाटाळ. मात्र तेथून तिला बाहेर काढायला एक कायदा कामी आला. तिच्या एका काकाचा शोध घेऊन त्याने स्वत:च्या जबाबदारीवर तिला बाहेर काढले आणि त्यांच्या दुसऱ्या एका नातेवाईक बाईच्या घरी एक रात्री राहायला ठेवले. तो एकटाच होता आणि त्या रात्री त्याला कारखान्यात पाळी होती. दुसऱ्या दिवशी तो तिला घेऊन जाऊन तिची सोय लावणार होता. संघटनेच्या कार्यकर्त्यांना थोडा हुरूप आला. पण दुसऱ्या दिवशी मेंटल हॉस्पिटलच्या लोकांनी एक नवाच मुद्दा पुढे आणला. नातेवाइकाकडे पेशंट सुपूर्द करायचा असेल तर 5000 रुपये काकाला द्यावे लागणार. पण पोलिसांनी बेवारस म्हणून आणून सोडले होते म्हटले तर फुकट बाहेर पडता आले असते. काका पैसे भरायला तयार नव्हता. शेवटी काही मार्ग निघाला. नीला बाहेर आली. बाळाची आठवण काढत होती. आत्याकडे राहायला गेली. तोपर्यंत संघटनेने एका संस्थेची माहिती मिळवून तिच्या राहण्याची सोय करण्याचे ठरविले होते. मात्र त्याच रात्री वृषालीची आई अत्यवस्थ झाल्याचे कळले आणि तिला दोन दिवसांसाठी गावाला जावे लागले. येऊन बघते तो तिला कळले की काकाला कंपनीने कामाला पाठविले आणि त्या आत्याने फक्त एक रात्र ठेवून घ्यायचे कबूल केले होते, तसे रात्र संपल्यावर काका आला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी तिला रस्त्यावर आणून सोडले. त्यानंतर ती कोठे गेली, कशी गेली काहीच कळले नाही. कोणाची शिकार झाली, ज्या विजयचे नाव घेत होती तो कोठे आहे कोणालाच काही माहीत नव्हते. एक कळी उमलता उमलता खुडून गेली होती. वृषालीला हा फार मोठा धक्का होता. गेले काही दिवस या मुलीने दिवसरात्र तिचे जीवन व्यापून टाकले होते. अनेक प्रकारच्या माणसांचे स्वभाव, सरकारी संस्थांची निर्लज्ज वागणूक आणि माणुसकी सांभाळण्यासाठी केलेला अट्टाहास, हे अनुभव ही तिची कमाई होती.     

आपण अनेक जण भवतालाबद्दल कुरकुर करत बसतो. व्यवस्थेला दोष देत बसतो. पण त्या चिखलात हात घालायचे धैर्य आपल्याला होत नाही. वृषालीचे कौतुक अशासाठी की ती त्याला भिडते. उद्या जर रेशनकार्डचे कायदे बदलायचे झाले- तर काय बदल असावेत हे वृषालीसारखी व्यक्ती नक्कीच सांगू शकेल. 

भवताल : वृषाली मगदूम
प्रकाशन : स्त्री मुक्ती संघटना, मुंबई.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

छाया दातार,  मुंबई
chhaya.datar1944@gmail.com

मागील अर्धशतक स्त्रीमुक्ती चळवळीतील महत्त्वाच्या कार्यकर्त्या व लेखिका असलेल्या छाया दातार, विचारवेध संमेलनाच्या अध्यक्ष राहिल्या आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके