डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पुढे सफदरने बंगाल इन्फर्मेशन ब्युरोमध्ये ऑफिसर म्हणून काम केले. त्या वेळी त्याने ऋत्विक घटक यांचे सिनेमे लोकांसमोर आणायचे काम केले. बंगाली नाटकांचे तीन फेस्टिव्हल भरविले. नाटक त्याच्या नसानसांत भरलेले होते. देशामध्ये 1981 नंतर ठिकठिकाणी पथनाट्य गट तयार होत होते आणि अनेकजण सफदरकडे सल्ला मागायला, मदत मागायला येत असत. लेखक स्वत: ‘जनम’मध्ये येऊ लागला तोही जे.एन.यू. मध्ये गेल्यावर. ‘औरत’ नाटकाचा त्याच्यावर खूप प्रभाव पडला. सफदरला अनेकांनी विचारले की- तू दलितांवर नाटक का करत नाहीस? तेव्हा तो म्हणाला होता की, हा खूप कठीण विषय आहे. त्याने एकदा प्रयत्न केला, पण ते पथनाट्य लोकांपर्यंत पोचले नाही. त्याच्या लक्षात आले होते की, या विषयावर एखादा रंगमंचीय प्रयोग करण्याची गरज आहे; म्हणजे मोठ्या परिप्रेक्ष्यात तो विषय हाताळता येईल. लेखक लिहितो की- सफदर असताना हा विषय घेतला गेला नाही.

सफदर हश्मी... 70 आणि 80 च्या दशकातील एक क्रांतिकारी नाटककार. ‘जनम’ या मंचाच्या साह्याने  समूहनाट्यांना नवा अर्थ देणारा लेखक, दिग्दर्शक, रंगकर्मी. कामगार व इतर वंचित समूहांचा आवाज सत्तेपर्यंत पोचवणारा आणि वास्तवाचे भान सामान्यांना देणारा एक असामान्य कलाकार. व्यवस्थेवर हल्लाबोल करणारा हा गुणी कलाकार याच व्यवस्थेने केलेल्या हल्ल्याचा बळी ठरला. याच अद्‌भुत कलाकाराबरोबर काम केलेला, गुरूच्या हाताखाली तयार झालेला सुधन्वा देशपांडे. महाराष्ट्राला परिचित असणारे गो.पु.देशपांडे यांचा मुलगा. दिल्लीमध्ये वाढलेला आणि ‘जनम जननाट्य मंच’ जगलेला- किंबहुना, अजूनही जननाट्य मंचाची ध्वजा खांद्यावर घेऊन हल्लाबोल करणारा. सुधन्वाने लिहिलेली ही सफदर हश्मीची कहाणी केवळ त्याची नाही, तर ती सुधन्वाचीही आहे आणि मुख्य म्हणजे, ती त्या वादळी पर्वाचीही आहे. मला आठवत आहे 1978 मध्ये आणीबाणीनंतरच्या राजकीय खळबळीच्या काळात देशाच्या सर्व भागांतून आलेल्या कामगारांच्या प्रचंड समुदायासमोर बोट क्लबच्या मैदानावर जननाट्य मंचाने सादर केलेले नाटक- मशीन, आणखीही इतर- आणि भारावून गेलेलो आम्ही सर्व. फुरफुरणारे बाहू आणि हल्लाबोलच्या गर्जना. सुधन्वाचे हल्लाबोल लिखाण केवळ एका व्यक्तीला दिलेली वंदना नाही; तर त्या काळाचा तो माहोल, नीतिशास्त्र, विचारधारा, सतत संघर्षशील  समूहांबरोबर काम करणारा हा कलावंत- ज्याच्यामुळे मुक्तीचे स्वप्न पाहण्याचे धैर्य मिळते, या सर्वांनाच ही वंदना आहे.

काळाच्या पडद्याआड गेलेल्या आणि 1989 मध्ये केवळ 35 व्या वर्षी शहीद झालेल्या सफदर हश्मीची आठवण सध्याच्या काळात पुन:पुन्हा येते आहे. कारण पुन्हा एकदा तरुणांनी, कॉलेज विद्यार्थ्यांनी रस्त्यावर यायला सुरुवात केलेली आहे. आपल्याकडेही पथनाट्य चळवळ कोणे एके काळी जोरात होती. आजही पथनाट्य हा फॉर्म- आकृतिबंध अनेक एनजीओ वापरत असतात. प्रचारासाठी, एखाद्या मुद्यावर जाणीव-जागृती करण्यासाठी. पण लोकांच्या चळवळीतून, त्यांच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी, कामगार युनियनच्या मदतीने वस्त्या-वस्त्यांमध्ये जाण्यासाठी आणि एक आकृतिबंध म्हणून त्याचा विचार करून त्याचे विश्लेषण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलेला हा सफदर हश्मी. त्याची ‘जनम’ नावाची नाट्यसंस्था- ज्यामध्ये आजचे अनेक बिनीचे कलाकार जोडले गेले होते- किंबहुना, त्यांना घडविण्याचे काम या संस्थेने व पर्यायाने सफदर हश्मीने केले आणि 80 हून जास्त नाटके सादर केली. काही नाट्यमंचावरून, बरीचशी पथनाट्य स्वरूपात. पुस्तकाचे लेखन सुधन्वाने केले आहे, जो त्याचा साथीदार होता- फार काळ नाही, पण खूप जवळून त्याला पाहिलेला. त्याचा मेन्टॉर, हीरो आणि त्याच्या मृत्यूनंतर काही प्रमाणात त्याच्या पालखीचा वाहक झालेला.

पुस्तक तीन भागांमध्ये विभागले आहे. पहिला भाग सफदरवरील हल्ल्याबद्दल. दुसरा भाग जनमचा जन्म आणि  सफदरचे कर्तृत्व. एका बहुमुखी, मल्टिटॅलेन्टेड व्यक्तिमत्त्वाचा परिचय. तिसरा भाग- जनमने बसविलेल्या अनेक नाटकांचा परिचय, त्यांच्या जन्माच्या कहाण्यांसकट.  पहिला भाग सगळ्यात नाट्यमय आहे. सीपीएम पक्षाचा सभासद असलेला सफदर त्यांच्या सिटू या कामगार संघटनेशी जुळलेला होता. या सिटूचा एक कार्यकर्ता दिल्लीतील झंडापूर या विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीला उभा राहिला होता. त्याच्या प्रचाराच्या निमित्ताने पथनाट्याचे तीन प्रयोग त्या भागात करण्याचे योजिले होते. पहिल्या प्रयोगासाठी जनमची सर्व मंडळी जमा झालेली होती. समोर प्रेक्षकही जमले होते आणि एक जीप तिथे येऊन उभी राहिली. काही तरी गडबड करण्यासाठी हे लोक आले असावेत, असे सर्वांनाच वाटले. त्यामुळे टीममधून कोणी तरी पुढे जाऊन जीपमधील लोकांबरोबर बोलावे, असा बेत होत असतानाच सफदरने त्यांना थांबविले. तो नेता होता, तेव्हा त्यानेच पुढे गेले पाहिजे- असे वाटून तो त्यांच्याशी बोलायला पुढे जायला लागला... तेवढ्यात जीपमधील लोक खाली उतरून प्रेक्षकांवर हल्ला करू लागले. काठ्या, सळया अशी हत्यारे त्यांच्याकडे होती. प्रेक्षक अर्थात भीतीने पळू लागले. त्यांतील काही जण या नाटकमंडळींकडे धावत आले आणि त्यांचा आक्रमक मोहरा बघून जो-तो पळत सुटला. जीव वाचण्याचा प्रयत्न करणे आवश्यक होते. त्या धावपळीचे वर्णन लेखकाने खूप तपशीलवारपणे केले आहे. त्यामध्ये नाटक कंपनीतील कोण कोण कुठे होता, त्यांनी हा हल्ला थांबविण्यासाठी काय काय प्रयत्न केले- हेही. सफदरला जेव्हा ह्या हल्ल्याचा गंभीरपणा लक्षात आला, तेव्हा त्याने सर्वांना जवळच्या सिटू ऑफिसचा आसरा घ्यायला सांगितले होते. काही लोकांना त्या आसऱ्याचा फायदा कसा घेता आला, ह्या धावपळीचे वर्णन एखाद्या कादंबरीतील प्रकरणासारखे रंगविले आहे. यामुळे उत्सुकता ताणली जाते आणि मग सफदरचे शरीर रस्त्यावर पडलेले सापडते, हा क्लायमॅक्स येतो. सफदरला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचे वर्णन येते. ही जागा मुख्य शहरापासून दूर असते.

 या सर्व गोंधळामध्ये स्वत: लेखकही सापडलेला असतो. त्याची धडधड आपल्याला जाणवत राहते. केवळ 10 व्या वर्षी, लग्नानंतर केवळ वर्षात झालेला सफदरचा मृत्यू काळजाला घर पाडून जातो. सीपीएमच्या उमेदवाराविरुद्ध उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराने- मुकेश शर्माने व त्याच्या गुंडांनी मिळवून हा हल्ला घडवून आणलेला होता, हे दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांतून उघड झाले होते. मागे बरेच राजकारण रंगलेले होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये ज्या शिखांच्या कत्तली झाल्या, त्या वेळी नफरत कमी करण्यासाठी बरीच मेहनत ‘जनम’ने केलेली होती.  सीपीएमने काँग्रेसविरोधी भूमिका घेतली होती. याचा सूड घेण्याची भावना तिथे असण्याची शक्यता होती.

हल्ल्याच्या बातम्या सर्व वर्तमानपत्रांत आल्यानंतर जवळजवळ तीनशे लोक जमले होते. त्यामध्ये भीष्म साहनी- बलराज सहानीचा भाऊ, हबीब तन्वीर, नेमीचंद जैन, बन्शीलाल, सतीश पाचुरी असे अनेक कलावंत आणि प्रतिष्ठित लोक होते. त्यातील कलाकारांनी हॉस्पिटलपासून दीड किलोमीटर दूर असलेल्या रवींद्र भवनपर्यंत निषेधमोर्चा काढला. त्यांनी नुकत्याच सुरू होणाऱ्या साहित्य कला फेस्टिव्हलवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. बुटासिंग यांनी तो फेस्टिव्हल रद्द करण्यास दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले. होम मिनिस्टरनी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली. मात्र पुढे त्या चौकशी समितीचे काय झाले, माहिती नाही. सफदरची अंत्ययात्रा खूप जोरात निघाली होती. सीपीएमच्या पक्ष ऑफिसमध्ये त्याचे शव लाल झेंड्याने लपेटलेल्या अवस्थेत ठेवले होते. हजारो लोक त्याला वंदना द्यायला आले होते. पुढे पंतप्रधान झालेले व्ही.पी. सिंहांचाही त्यामध्ये समावेश होता. फक्त काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यापैकी कोणीही दर्शनाला आलेले नव्हते. मात्र त्या हजारोंच्या समुदायाने सफदरला निरोप देताना ज्या घोषणा दिल्या, त्यामुळे सफदरच्या निधनाने देशामध्ये दु:खाची व रोषाची एक लहर चमकून गेली, असे मात्र जरूर जाणवले. दोन दिवसांनी ज्या ठिकाणी सफदरवर हल्ला झाला, त्याच ठिकाणी ‘जनम’ने पुन्हा त्याच पथनाट्याचा प्रयोग केला, असे लेखक अभिमानाने सांगतो.

दुसऱ्या भागामध्ये सफदरच्या ध्येयाची कहाणी आहे. ‘जनम’च्या जन्माचा आणि कित्येक नवी नाटके कशी बसविली गेली, याचा इतिहास आहे. हा इतिहास ‘जनम’मध्ये सामील असलेल्या किंवा जनम सोडून गेलेल्या अनेकांच्या मुलाखतींतून पुराव्यासकट कागदावर उतरला गेला आहे. सफदरचे व्यक्तिमत्त्व कसे घडत गेले... नाटक या माध्यमाबद्दलचे त्याचे प्रेम आणि कामगार चळवळीसाठी त्याचा वापर या दोन संकल्पना त्याच्या डोक्यात सतत घोळत असत. परंतु फक्त उपयुक्ततावादी पद्धतीने तो याकडे पाहत नसे, तर त्यातून कामगारांची सांस्कृतिक आकलनाची पातळी कशी वाढेल, यासाठीही प्रयत्न करण्याची त्याला उमेद होती. त्याचबरोबर बरोबरीच्या अभिनेत्यांनाही चांगल्या नाटकांमध्ये, नाट्यक्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळावी म्हणून त्याने रंगमंचीय अनेक नाटकेही सादर केली. त्याचा दृष्टिकोन व्यापक होता आणि काही तरी भव्य करून दाखविण्याची महत्त्वाकांक्षा त्याला होती. मध्यंतरी त्याने जाहिरातींसाठी किंवा सिनेमांसाठी स्क्रिप्ट लिहिण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ‘जनम’मधील लोकांनाही थोडी भीती वाटली की, हा बाजारपेठीय शक्तींना शरण जाईल की काय?

‘जनम’ या संस्थेचा जन्म कधी झाला, हे वादातीत आहे. कारण प्रेसनोटमध्ये लिहिल्याप्रमाणे सफदर 1976 मध्ये सीपीएम पक्षाचा सभासद झाला. लेखकाच्या मते तो  1972 अखेरीस किंवा 1973 साली सभासद झाला असावा. याच वर्षी सप्टेंबरमध्ये ‘जनम’चा जन्म झालेला दिसतो. इप्टा या संघटनेमध्ये असलेले अनेक जण या दिवशी जमलेले होते. सफदरनेही काही काळ इप्टाबरोबर काम केले होते. कविता आणि विनोद नागपाल हे त्यातील वयाने ज्येष्ठ जोडपे. पुढे दोघेही बरेच प्रसिद्धी पावले. त्यांनी बसविलेले विजय तेंडुलकरांचे घाशीराम कोतवाल पाहिल्याचे लेखकाला आठवते. तो खूप लहान होता त्या वेळी. कालिंदी देशपांडे ही आई कम्युनिस्ट पक्षाची सभासद. ती घेऊन जात असे तालिमी पाहायला. वडील गो.पु. देशपांडे यांनीही नाटकात काम केले होते. त्या वेळी सफदर ज्या पहाडी आवाजात गात असे, ते अजूनही  लेखकाच्या कानांत घुमत राहिले आहे, असे तो सांगतो. ‘भारत भाग्य विधाता’ हे त्याच सुमारास लिहिलेले दुसरे नाटक. काँग्रेस पक्ष आणि इंदिरा गांधी यांच्यावर बरेच विनोद त्यात होते. त्या सुमारास उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होत्या आणि सीपीआय व सीपीएमच्या मोहिमेमध्ये ‘जनम’ने भाग घेतला होता. दोन्ही पक्ष मिळून 18 जागा जिंकले होते. त्यानंतर बक्री नावाचे नाटक लिहिले गेले, तेही खूप गाजले. विशेषत: विनोद नागपालच्या अतिशय सुंदर सुरावटीने. लेखकाच्या मते, ‘जनम’ला त्यानिमित्ताने खरे क्रेडिट मिळाले. कलात्मक नाटके सादर करणारी एक संस्था म्हणून आणि त्याचबरोबर राजकारणाची पूर्ण जाणकार म्हणून. नाटकाने 50 च्यावर प्रयोग केले. आणीबाणीची वर्षे ‘जनम’साठी फुकट गेलेली वर्षे होती. मात्र इंदिरा गांधींचा अलाहाबाद कोर्टाचा निकाल व आणीबाणी जाहीर होण्याआधीचा मधला काळ यात त्यांची दोन नाटके चांगली गाजली. ‘कुर्सी, कुर्सी, कुर्सी’ व ‘जनता पागल हो गयी है.’ मुख्यत: त्यामध्ये उत्स्फूर्तता असे. नवनवे आयत्या वेळचे विनोद हे वैशिष्ट्य असे. मात्र आणीबाणीमध्ये सीपीएमशी संबंधित अनेकांना पकडल्यामुळे जनमवाले सर्व एका परीने गुप्त झाले होते. त्या वेळी सफदरने त्रोटक शब्दांत लिहिलेली एक टिप्पणी लेखकाने सादर केली आहे, त्यातून त्याचे सर्जनशील मन दिसून येते. मुख्य म्हणजे त्याला वाटत होते की, आपण पथनाट्य प्रकार सोडून अधिक व्यावसायिक नाटके घेऊ शकतो. त्यातही अनेक पुरोगामी नाटके आहेत. त्यांना परवानगी होती.

उदा.- उत्तर राम चरित्रातील मृच्छकटिक, शकुंतला, ओडिपस, टॉलस्टॉयचे पॉवर ऑफ डार्कनेस वगैरे. प्रेमचंदांचे गोदान हे त्यातील एक. आपण संहिता भराभर तयार करू या आणि सेन्सॉरला सादर करू या. गप्प बसणे त्याला मान्य नव्हते.

सफदरचा विवाह मौलेश्री रॉय या इंग्लिश शिकविणाऱ्या शिक्षिकेशी 1978 मध्ये झाला, पण त्याची तयारी 1976 पासून सुरू होती. सफदरही कॉलेजमध्ये इंग्लिश शिकवीत असे. पुढे तो श्रीनगरला गेला शिकवायला. पैसे मिळविणे भाग होते. मात्र त्याला दिल्लीला परतण्याची आस लागली होती. ‘जनम’चे काम पुन्हा सुरू करायचे होते. मौलेश्रीने त्याला आधार दिला. विवाहानंतर त्याचे नाटकाचे काम पुन्हा जोमात सुरू झाले. मौलेश्री पैसेही मिळवत असे आणि पडद्यामागची बरीच कामेही करत असे. याच काळात ‘जनम’चे काम जोरात सुरू झालेले दिसते. पण सुरुवातीला जुन्या धाटणीच्या, रंगमंचावरील नाटकांनीच त्यांनी सुरुवात केली होती. पैसे मिळवायचे होते. आणीबाणीमध्ये ट्रेड युनियन्स, किसान सभा, विद्यार्थी संघटना- सर्वच काही प्रमाणात कोसळून पडल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडून साधनांची अपेक्षा करणे चुकीचे होते. याच काळात ‘जनम’ने मशीन नावाचे छोटे पथनाट्य बसविले, केवळ  15 मिनिटांचे आणि ते खूप गाजले. ते आजही तितकेच समर्पक वाटते. आजच्या भांडवलशाहीमध्ये माणसेच मशीन झाली आहेत, हे त्याचे सूत्र आहे. त्याच्या जोडीला अर्थात गाणी आणि अभिनेत्यांच्या अतिशय लयबद्ध हालचाली. त्यानंतर 10 वर्षांत जनमने 22 नाटकांचे 2500 प्रयोग सादर केले. नाटके करण्यासाठी, तालमी करण्यासाठी पैसे नसणे हे एका अर्थाने बरेच झाले. कारण त्यामुळेच ही नाटके सिद्ध झाली आणि प्रयोगांचे लोण सर्वदूर पसरत गेले. मी सुरुवातीला बोट क्लबसमोरील  लॉनवर केलेला प्रयोग वर्णन केला आहे, तो त्यातीलच. तो माझ्या मनावर कोरला गेला आहे. मुंबईत जेव्हा या पुस्तकाचे प्रकाशन आणि अभिवाचन झाले, तेव्हा मी हजर होते. लेखक तिथे होता. पण अर्थात स़फदर नव्हता. त्याला जवळून पाहण्याचे माझे भाग्य नव्हते. मात्र, मौलेश्री होती.

या विभागाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे जेव्हा ही पथनाट्ये जोरात होती, तेव्हा सफदरने पथनाट्य या प्रकाराबद्दल सैद्धांतिक विचार करायला सुरुवात केली होती.  त्याच्या मते- हा आकृतिबंध केवळ भावनिकतेला आवाहन करणारा नाही, तर यामधून विवेकवादाला आवाहन करण्याची एक प्रक्रिया घडत असते. हा आकृतिबंध सूक्ष्म तऱ्हेने परिणाम करत असतो, असे म्हणता येत नाही; उलट तो जोरदार, नेत्रदीपक आणि एका अंगाने मजेदार असतो. योग्य वेळी हा प्रकार वापरला गेला, तर तो खूप भारी प्रभावी असू शकतो. एका बाजूने येथे मूड तयार करण्यासाठी किंवा एखादी परिस्थिती निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण अगदी थोड्याशा हालचालींनी करता येते. एका अर्थाने हा प्रकार वर्तमानपत्राची भूमिका बजावत असतो आणि भोवतालच्या घटनांबद्दल एक भूमिका घेत असतो. पण हे जाहिरातींसारखे, केवळ करमणुकीसारखे नाही. मात्र संस्कृतीला, चांगल्या कलांना वंचित असणाऱ्या कामगार वर्गाला तो चांगली, अर्थपूर्ण करमणूकही पुरवीत असतो. ही टिप्पणी कधी प्रकाशित झाली नाही. पुढे या आशयाचे काही लेख त्याने लिहिले. उदा. कन्सेप्ट ऑफ पीपल्स थिएटर, द अन्चॅन्टेड आर्च वगैरे. त्याच्या डोक्यात पथनाट्य हा प्रकार हा मुख्यत: डाव्या चळवळीचा अविभाज्य भाग होता; त्याचबरोबर पथनाट्याची कलात्मक बाजूही उच्च दर्जाची असली पाहिजे, या बाबतीत तो आग्रही होता. सरकारी पथनाट्य ह्या कल्पनेच्या तो विरोधात होता.  

या विभागामध्ये लेखकाने देशातील इतरही प्रांतांमध्ये जनमला समांतर पद्धतीने पथनाट्य चळवळ कोठे चालू होती, त्याचा थोडासा आढावा घेतला आहे. कर्नाटकमधील ‘समुदाय’ या संघटनेच्या प्रयत्नांबद्दल बरीच माहिती त्यांनी गोळा केली होती. साधारण 1978 चाच तो काळ होता. आश्चर्य म्हणजे, महाराष्ट्रातील काही प्रयत्नांचा उल्लेखही आढळत नाही. 1970 ते 1990 या काळामध्ये येथे काय चालू होते, हे एकदा तपासून बघायला हवे. या काळात स्त्रीमुक्ती संघटनेचे ‘मुलगी झाली हो’ या नाटकाचे जवळजवळ 2000 प्रयोग साऱ्या भारतभर मिळून झालेले आहेत, त्यांतील 80 टक्के महाराष्ट्रात. अर्थात या नाटकाला पथनाट्य म्हणायचे की नाही, हे नाट्य इतिहासकार ठरवतील. त्याच्या मते ‘जनम’ संस्थेने उत्तरेकडे पथनाट्य या कल्पनेला जन्म दिला. तसाच समुदायने दक्षिण प्रदेशात ही कल्पना रुजविली. डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी ही संघटना सुरू केली. सुरुवातीला त्यांनी रंगमंचावरील नाटके सादर केली. त्याचे नाव होते बीटिंग द ॲन्टहील, नंतर किंग विक्रम द विकेड याचे सादरीकरण झाले. लेसन वन आणि लेसन टू अशी दोन छोटी नाटके सादर झाली. ब्रेख्तची दोन नाटके सादर केली, त्यामध्ये झोपडपट्टीतील दोन मुलांनी भाग घेतला होता. सीपीआय आणि सीपीएमच्या पक्ष कार्यकर्त्यांनी तिकीट विक्रीचे कामही केले. त्यानंतर त्यांनी फिल्म सोसायटी आणि वाचनालय चळवळही सुरू केली. त्यानंतर बेलचीची घटना घडली. बिहारमधील दलितांना 1977 मध्ये जाळून मारण्यात आले. ह्या घटनेवरील पथनाट्य 1978 मध्ये बसविले गेले आणि त्याचे जवळजवळ 2500 प्रयोग झाले. समुदायची 18 युनिट्‌स कर्नाटकमध्ये काम करत होती. समुदायला जनचळवळ हे स्वरूप आले होते, हे लक्षात येते. जेव्हा त्यांनी जथा घेऊन गावोगावी जायला सुरुवात केली, तेव्हा. त्यासाठी लागणारा पैसा कलावंतांकडून 20000 ग्रीटिंग काडर्‌स तयार करून त्यांची विक्री करून जमा करण्यात आला. शिवाय देणग्या होत्याच. 19 पैकी 17 जिल्ह्यांतून हा जथा फिरला. 450 प्रयोग केले. असंख्य गाणी म्हटली, चर्चा केल्या.

पुढे सफदरने बंगाल इन्फर्मेशन ब्युरोमध्ये ऑफिसर म्हणून काम केले. त्या वेळी त्याने ऋत्विक घटक यांचे सिनेमे लोकांसमोर आणायचे काम केले. बंगाली नाटकांचे तीन फेस्टिव्हल भरविले. नाटक त्याच्या नसानसांत भरलेले होते. देशामध्ये 1981 नंतर ठिकठिकाणी पथनाट्य गट तयार होत होते आणि अनेकजण सफदरकडे सल्ला मागायला, मदत मागायला येत असत. लेखक स्वत: ‘जनम’मध्ये येऊ लागला तोही जे.एन.यू. मध्ये गेल्यावर. ‘औरत’ नाटकाचा त्याच्यावर खूप प्रभाव पडला. सफदरला अनेकांनी विचारले की- तू दलितांवर नाटक का करत नाहीस? तेव्हा तो म्हणाला होता की, हा खूप कठीण विषय आहे. त्याने एकदा प्रयत्न केला, पण ते पथनाट्य लोकांपर्यंत पोचले नाही. त्याच्या लक्षात आले होते की, या विषयावर एखादा रंगमंचीय प्रयोग करण्याची गरज आहे; म्हणजे मोठ्या परिप्रेक्ष्यात तो विषय हाताळता येईल. लेखक लिहितो की- सफदर असताना हा विषय घेतला गेला नाही. सफदर गेल्यावर स्वत: लेखकाने दोन नाटके बसविली. एक होते ‘सत्यशोधक’ गो.पु. देशपांडे लिखित. आणि दुसरे होते ब्रिजेश यांनी लिहिलेले ‘शंबुकवध’. पुढे 1986 मध्ये जेव्हा कम्युनल हार्मनी या विषयावर समिती नेमली गेली, तेव्हाही सफदर त्याचा सभासद होता. सहा महिने सातत्याने काम केले. त्या वेळी मोहिमेसाठी त्याने सांप्रदायिकतेविरोधी नाटक लिहिले. पुढे त्याने ‘खिलती कलियाँ’ नावाची मालिका लिहिली/बसविली. खास एखाद्या प्रसंगासाठी गाणे लिहिणे यात त्याचा हातखंडा होता. पुढे त्याने ‘पाँच मिनिटे’ नावाची मालिका लिहिली, प्रेस क्लब ऑफ इंडियासाठी. तो मीडिया इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतही असे. सफदर 1988 मध्ये भारताच्या टीमबरोबर पाकिस्तानलाही जाऊन आला आणि तिथे त्याने शिबिरे घेतली. त्याच्या टॅलेंटमुळे त्याचा परिघ वाढतच गेला. लोक त्याला पुष्कळदा विचारत होते की, तुम्ही पारंपरिक नाट्यपद्धती का वापरत नाही? लोकांजवळ जायचे असेल तर- त्यांना जे कळतंय, ज्याची त्यांना सवय आहे, असेच आकृतिबंध वापरले पाहिजेत. सफदर समजून सांगत असे की- अशा अनेक परंपरा आहेत की त्या अंधश्रद्धेला खतपाणी घालतात, सरंजामी मूल्ये जपून ठेवतात; म्हणून सर्वच परंपरा जपायच्या नाहीत. जे चांगले ते घ्यायचे आणि नवे सर्जनशील पद्धतीने शोधून काढायचे, समन्यायी पद्धतीने जायचे.

तिसऱ्या विभागामध्ये मुख्यत: अनेक नाटकजन्माच्या कथा आहेत. उदा. हबीब तन्वीर या ज्येष्ठ नाट्यकर्मीकडून कसे शिकायला मिळत होते, याचे साद्यंत वर्णन आहे. ‘मोन्तेरामचा सत्याग्रह’ हे नाटक कसे लिहिले गेले आणि त्याचे सादरीकरण कसे झाले, हा सगळा अनुभव सामूहिक होता. तसेच एखाद्या नाटकाची जन्मकथा लिहिण्याच्या निमित्ताने दिल्लीतील सिटूच्या कामाचे आणि एकूणच कामगार चळवळीचे वर्णन दिलेले आहे. सर्वच नाटके ही सामूहिकतेने लिहिली गेली, तरी सफदर हा या नाटकांचा कर्ता होता- किंबहुना, स्फूर्तिदाता असे म्हणता येईल, असे लेखक आवर्जून सांगतो. स्वत: लेखक या सर्व वातावरणात कसा ओढला गेला आणि सफदरच्या हत्येनंतर जनमच्या नाटकांची व कारभाराची जबाबदारी कशी त्याने उचलली याचेही दर्शन येथे घडते. सफदरची हत्या होण्याआधीचे महत्त्वाचे नाटक होते ‘चक्का जाम’. हेच पुढे बदलून ‘हल्लाबोल’ नाव मिळाले. त्याचा बराच तपशील लेखकाने दिला आहे. सन 1988 मध्ये जो 8 दिवसांचा संप दिल्लीतील सर्व कामगार संघटनांनी घडवून आणला, त्यासाठी मोहीम आखण्याची जबाबदारी जनमने घेतली होती. या मोहिमेचा अहवालही लेखकाने तयार केला होता. त्याप्रमाणे पहिले 29 प्रयोग 16 दिवसांत झाले होते. त्यातले 27 प्रयोग हे प्रत्यक्ष संपासाठी केले गेले. दोन प्रयोग जे.एन.यू. व अल्वर या ठिकाणी झाले होते. जवळजवळ 1800 ते 2000 लोकांपर्यंत जनमचे कार्यकर्ते/अभिनेते पोचले होते आणि त्यांनी 3641 रुपये कमावले होते. नाटक बसवितांना व प्रवासासाठी 800 रुपये खर्च आला होता. तेवढे वजा करून उरलेल्या पैशांतून निम्मे पैसे त्यांनी सिटूला देणगीरूपाने दिले. या यशानंतर एकूण मोहिमेचा आढावा घेतांना मात्र कलाकारांच्या एकूण वर्तनाची प्रयोगाआधी व नंतरही नोंद घेतली गेली आणि त्यात त्यांना खूप टीकेला तोंड द्यावे लागले होते. विशेषत: प्रयोगानंतर आलेल्या प्रेक्षकांशी, कामगारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न न करणे, एखाद्या प्रोफेशनल नटाप्रमाणे अलिप्त राहणे. त्यानंतरच्या चर्चेतही नेहमीप्रमाणे पथनाट्य हे सामाजिक परिवर्तन करण्याचे प्रभावी साधन आहे का, हा प्रश्न उपस्थित केला गेलाच. त्यामध्ये पावलो फ्रेररी, कार्ल मार्क्स अशा सर्वांच्या सिद्धांतांचे चर्विकरण झाले. लेखक या सर्व चर्चेचे आकलन फार प्रभावी पद्धतीने करतो. तो म्हणतो की, आमचा विश्वास होता की- नाट्यकर्म आम्हाला उद्याच्या अतींद्रिय भविष्याकडे जाण्यासाठी मदत करते, केवळ भ्रामक स्वर्ग म्हणून नाही किंवा वर्तमानाच्या पाईपातून दूर दिसणारे स्वप्न म्हणून नाही. पण नाटकातून आम्ही ठोस शक्यता दाखवू शकतो; केवळ स्वप्न नाही, बदलता येणारे वास्तव अधोरेखित करू शकतो.

सफदर गेल्यानंतर त्याच जागी जेव्हा जनमने हल्लाबोल नाटकाचा प्रयोग केला, तेव्हा पर्चम संघटनेने खालील गाणे म्हटले होते-

तू जिंदा है, जिंदगीकी जीत में यकीन कर

अगर कहीं है स्वर्ग तो उतार ले जमीन पर

तू जिंदा है, तो ट्रस्ट इन ट्रायंफ ऑफ लाइफ

इफ देअर इज अ हेवन समव्हेअर, देन ब्रिंग इट टू अर्थ!

लेखकाने उपसंहारामध्ये म्हटले आहे, ‘स़फदरच्या जीवनातून शिकता येते की, कलावंत जगामध्ये कसा जगू शकतो- कोणत्याही एका अस्मितेला कवटाळून नाही, तर आपल्या हृदयात मानवाच्या मुक्तीचे स्वप्न बाळगत कोणत्याही एका अस्मितेच्या अतीत जात.

 

हल्ला बोल : द डेथ ॲन्ड लाईफ ऑफ सफदर हश्मी

लेखक : सुधन्वा देशपांडे, लेफ्ट वर्ड पब्लिकेशन,

नवी दिल्ली.

Tags: छाया दातार सुधन्वा देशपांडे सफदर हश्मी sudhanva deshpande hallabol chhaya datar safadar hashmi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

छाया दातार,  मुंबई, महाराष्ट्र
chhaya.datar1944@gmail.com

सामाजिक कार्यकर्त्या 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके