डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांनी एक मोर्चा 15 डिसेंबर रोजी संघटित केला होता. त्या वेळी पोलिसांकडून इतकी हिंसा करण्यात आली की, 2014 पासून, म्हणजेच भाजपचे शासन सुरू झाल्यापासून मुस्लिमविरोधाला जी सुरुवात झाली होती, ती या सहा वर्षांत किती सर्वसामान्य झाली आहे याची प्रचिती आली. सिरवाल सांगत होता की, तो आणि झरगर यांच्यांमध्ये चर्चाही सुरू झाली होती की, या वातावरणामध्ये भारतात राहणे शक्य होईल का? अनेक मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबांमध्ये अशा चर्चा होणे स्वाभाविक होते. तो म्हणत होता की, त्याला स्वत:ला त्याच्या ऑफिसमध्ये किंवा इतर मित्रांमध्ये कधी कोणी अशी अस्वस्थ करणारी भावना बोलून दाखविली नाही. हा विषय कधी निघतही नसे. पण मनातून अनेक मुस्लिमांना ती त्यांच्या अस्तित्वाला आव्हान देणारी घटना वाटत होती.

माझ्या बायकोला कॉफी आणि चीज-केक फार आवडतो- सबूर अहमद सिरवाल म्हणतो. त्याच्या मुलाखतीतील काही भाग.

त्याची बायको म्हणजे वय वर्षे 27, समाजविज्ञान शास्त्राची विद्यार्थिनी. तिला दिल्ली पोलिसांनी तुरुंगात टाकले आहे. फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये जे दंगे झाले (घडवून आणले गेले) त्यासंबंधी कट-कारस्थानात भाग घेतला म्हणून. हे दंगे हिंदू-मुस्लिम समाजात सांप्रदायिक द्वेष पसरविण्यासाठी झाले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दिल्ली पोलीस तिला पकडण्यासाठी इतके उतावीळ होते की, लॉकडाऊन चालू असताना 10 एप्रिल रोजी तिला पकडण्यात आले. एका बाजूला कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून लोकांना घरात डांबून ठेवण्याचे काम चालू असताना या तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या जामिया मिलिया इस्लमिया विद्यापीठाच्या विद्यार्थिनीला पकडून त्यांनी 13 एप्रिल रोजी कोर्टासमोर उभे केले. तिला जामीन मिळालेला असताना लगेच यूएपीए नावाच्या दुसऱ्या कायद्याखाली अटक करून तुरुंगात टाकले. हा कायदा म्हणजे ज्यामुळे कोणतीही चौकशी न करता किमान दोन वर्षे तुरुंगात टाकता येते. (आपल्याकडील एल्गार परिषद आणि भीमा कोरेगावच्या दंगलीचा कट रचल्याबद्दल ज्या लोकांना तुरुंगात टाकले आहे, तो कायदा.)

जेव्हा तिला पुन्हा जामीन मागण्यात आला, तेव्हा ॲडिशनल सेशन कोर्ट- धरमिंदर राणा यांनी हा जामीन नाकारला. खरं म्हणजे त्या वेळी कारणे दिली होती की, ती कधीही चौकशीसाठी येऊ शकते. पण ती गर्भवती आहे, रक्तदाबाचा त्रास आहे, त्यामुळे कधीही गर्भपाताचा धोका आहे आणि म्हणून तिला जामीन द्या. दिल्ली पोलिसांच्या मते, झरगर ही एक अतिशय भयानक अतिरेकी आहे. तिने या दंगलीआधी द्वेषमूलक भाषणे दिली होती आणि लोकांना चेतविले होते. या दंगलीमध्ये 53 लोकांचा मृत्यू झाला होता. तिच्या वकिलाने बाजू मांडली होती की, जिथे तिने ही भाषणे दिली असे सांगण्यात येते, तिथे ती त्या वेळी नव्हती याचा आमच्याकडे पुरावा आहे. 

झरगर सफुरा कुटुंबाचे आणि मित्र-मैत्रिणींचे सांगणे आहे की, ती खूप बुद्धिमान आणि परखड बोलणारी मुलगी आहे. तिचा गुन्हा इतकाच की, ती भारतीय जनता पक्षाच्या धोरणांविरोधात बोलली. भाजपचे संविधानविरोधी धोरण- ज्यामुळे हिंदुत्वाचा अजेंडा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होतो आहे, ते तिला मान्य नाही. शासनाचा नागरिकत्व सुधारण्याचा नवा कायदा म्हणजेच सीएए हा मुस्लिमविरोधी आहे, त्यांच्याबाबत भेदभाव दाखविणारा आहे- असे तिचे म्हणणे आहे आणि केवळ म्हणूनच तिला या दंगलीच्या निमित्ताने लक्ष्य करण्यात आले आहे.

आज तिला पुन:पुन्हा तुरुंगवासाला सामोरे जावे लागत आहे. त्या दंगलीसाठी ज्यांनी प्रोत्साहन दिले, हिंसा करण्यासाठी ‘गोली मारो उनको’ असे जाहीर आमंत्रण दिले; त्या कपिल मिश्रासारख्या भाजपच्या नेत्याबाबत मात्र काही कारवाई होत नाही, तो आज मोकळा फिरत आहे. यातूनच लक्षात येते की, पोलिसांच्या दंगलशोध प्रक्रियेला काही अर्थ नाही. एका बाजूवर ठपका ठेवण्याची ही एकांगी प्रक्रिया आहे.

कविता कृष्णन ह्या सीपीएम(एम एल)च्या पुढारी स्त्रीने सीएए विरुद्धच्या लढ्याचे कौतुक करताना म्हटले होते की, ही नागरिक स्वातंत्र्याची अतिशय ऐतिहासिक महत्त्वाची चळवळ आहे आणि ती मुस्लिम महिलांनी चालविली आहे. याची तुलना फक्त अमेरिकेतील ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ या चळवळीशी करता येईल. या पॅन्डेमिकच्या धुरामागे तुम्ही या चळवळीची बदनामी करत आहात. सध्या लोकांचे लक्ष नाही. लॉकडाऊनमुळे लोकांना निदर्शने करता येत नाहीत, रस्त्यावर उतरता येत नाही याचा फायदा घेऊन तुम्ही या चळवळीची गळचेपी केली आहे.

सिरवाल- तिचा नवरा. त्याच्याशी बोलताना कळले की, त्याच्या गर्भवती बायकोला त्यांनी  पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले आणि सात तास तिची उलटतपासणी केली. बाहेर कोरोनाचे थैमान चालू आहे आणि पोलिसांना एवढेच करायला वेळ होता. त्या क्षणांचा विचार करताना त्याला कधी कधी वाटते की, तो वेडा होऊन जाईल. तो गुरगावला एका स्टार्टअपमध्ये काम करतो. बायकोचे उदाहरण डोळ्यांपुढे ठेवून तो म्हणतो की- ही कायदेशीर लढाई लांब पल्ल्याची आहे, पण त्याचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. बायको ज्या धीरोदात्तपणे या सगळ्याला सामोरी जाते आहे, ते समजून तो धीर धरून आहे. तो तर म्हणतो की, माझे तिच्यावरील प्रेम वाढले आहे. ती तुरुंगात आहे, पण मला तिच्यामुळे स्फूर्ती मिळते. शेवटी ती माझी जीवनाची जोडीदार आहे आणि आमच्या होणाऱ्या मुलाची आई आहे. या अतिशय भयानक घटनेमुळे आम्ही अधिक जवळ आलो आहोत. आमचे नाते घट्ट झाले आहे.

तिच्या कुटुंबातील माणसे तिच्याबद्दल भरभरून बोलतात. दुसऱ्याला मदत करणे हे तिचे ध्येय होते आणि कुठेही अन्याय दिसला किंवा गोष्टी चुकीच्या तऱ्हेने चालल्या आहेत असे दिसले की, ती मदतीला धावून गेलीच म्हणून समजा. ती तिच्या नोट्‌स दुसऱ्या विद्यार्थ्यांना देऊन मदत करत असे. वसतिगृहातील मुलींना सायंकाळी परतीची मुदत वाढवून हवी होती. त्या वेळी तिने लॉबिंग करायला मदत केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानवी अधिकारांचे दमन होत असेल, तरी ती त्या निदर्शनांमध्ये भाग घेत असे. 

    

ती जामियाच्या समन्वय समितीची सभासद होती. या समितीने ॲन्टी-सीएए- निषेध कार्यक्रम संघटित केला होता. तिच्या एकूण बंडखोर स्वभावाकडे पाहता, हे नैसर्गिक होते. ती कधीही मागे हटली नाही. कोणी कितीही दबाव टाकला तरी ती बधली नाही. आमच्या वडिलांनीच आम्हाला हे धडे दिले आहेत- अन्यायापुढे झुकायचे नाही. तिची 24 वर्षे वयाची बहीण सांगत होती. तिचे वडील एका पब्लिक सेक्टर कंपनीमध्ये कामाला आहेत. आई गृहिणी आहे. फरिदाबादमध्ये शाळेत झरगर शिकली. पुढे एम.ए.साठी जामियामध्ये गेली. कोरोनाचे रुग्ण जेलमध्ये वाढत आहेत, असे ऐकल्यावर त्यांना फारच काळजी वाटू लागली. झरगरला  तुरुंगामध्ये फक्त आठवड्यातून एकदा पाच मिनिटांचा कॉल करायची परवानगी आहे. लॉकडाऊनमुळे जाऊन भेटण्याची परवानगी नाहीच. आज 45 दिवस झाले तिला तुरुंगात जाऊन. तिचा नवरा सांगत होता की, त्या पाच मिनिटांमध्ये तिच्याबरोबर बोलणे शक्यच होत नसे. कशी आहेस? खाल्लंस का? वगैरे प्रश्न उत्तरांवर बोळवण होत असते. तो पुन्हा म्हणतो की, न्यायलये आणि संविधानावर आमची श्रद्धा आहे; त्यातूनच काही तरी निष्पन्न झाले तर! कौतुकाची गोष्ट म्हणजे, सध्याच्या या परिस्थितीमध्ये झरगरचे स्वत:चे आई-वडील आणि सासू-सासरे या दोघांचाही तिला पाठिंबा आहे. कोणीही म्हणत नाही की, ‘काय हे ओढवून घेतले आहे तिने!’

जामियामध्ये गेल्यापासूनच्या अनेक आठवणी तिची बहीण समीया सतत सांगत राहते. झरगर ही तीन बहिणींमध्ये थोरली. ती पहिल्यापासून सर्वांना मदत करायला तयार असते. तिच्या बरोबरीच्या विद्यार्थ्यांना लेक्चरच्या नोट्‌स देत असे आणि घरी आम्हाला होमवर्कला मदत करत असे. मित्र-मैत्रिणींना करिअरबाबत समुपदेशन करणे आणि कोणाच्या तरी बर्थडे पार्टीचे आयोजन करणे, हे ती तितक्याच कार्यक्षम पद्धतीने करते. त्यामुळेच मोदी सरकारने जम्मू व काश्मीरचे स्वतंत्र स्थान जेव्हा खालसा केले, तेव्हा तिला अतिशय राग आला. आमचे व तिच्या सासरचे कुटुंब दोन्ही मूळ काश्मीर येथील किश्तवाडची आहेत. मोदी सरकारने जेव्हा सीएए कायदा आणला तेव्हाही तिने निषेध केला, हे स्वाभविक होते. लॉकडाऊनमुळे अनेकांना ॲडमिशन घेता आली नाही, म्हणून तिने जामिया विद्यापीठाकडे आणखी वेळ देण्याची मागणी केली.

झरगरची मैत्रीण अज़िज म्हणते की, ती अगदी जामियाचा अर्क कोळून प्यायलेली आहे. ती जामिया विद्यापीठाचीच मुलगी आहे. प्रत्येक विद्यापीठाचे काही वैशिष्ट्य असते. ती तशीच निधड्या छातीची, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी आहे. ती लिंगभेद पाळत नाही. (नुकत्याच जाहीर झालेल्या विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये जामियाचा नंबर चौथा आला आहे.)

तिच्या विरुद्धची केस अशी आहे...

झरगरचा जामीनअर्ज जेव्हा न्यायलयामध्ये विचारार्थ आला, तेव्हा सरकारी वकिलाने सांगितले की- जामियाच्या समन्वय समितीने बहुतेक सर्व सीएएविरोधी कार्यक्रम संघटित केले होते. आणि पुढे त्यांनीच ठरविले की, अशी दंगल घडवून आणायची. फेब्रुवारीमधील दंगल ही त्याचाच परिपाक आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, 23 फेब्रुवारीला चांदबाग या ठिकाणी तिने जे भाषण केले, त्यामुळेच 24 फेब्रुवारीपसून दंगलीला सुरुवात झाली.

झरगरच्या वकिलाने पुरावा दिला की, तिच्या फोनच्या सिग्नलचा शोध घेतला आणि तिचे व्हॉट्‌सॲप मेसेजेस पाहिले तरी लक्षात येते की, ती चांदबाग येथून पुढे गेली होती. तिने तिथे भाषण तर दिलेलेच नव्हते. आणि सीएएविरोधी निषेध नोंदविणे म्हणजे मोदी सरकारविरोधी काही बेकायदा कृत्य नव्हे. सरकारतर्फे सफुरासारख्या लोकांविरोधी खोटे जाळे विणणे चालू आहे आणि तेथे सफुराला प्यादे म्हणून वापरले जात आहे.

याउलट धर्मेद्र राणा या न्यायाधीशाने निर्णय दिला की, चांदबाग येथे ट्रॅफिकची अडवणूक करण्यात आली होती. तिथे सफुरा हजर नसेल तरी चालेल. मुद्दा कारस्थानाचा आहे. कारस्थान करण्यात आले होते, ह्याबद्दल पुरावे आहेत. जेव्हा तुम्ही ठिणगीबरोबर खेळत असता, तेव्हा ती कुठे जाऊन पडेल आणि आग तयार होईल हे सांगता येत नाही.

तिचा नवरा सांगतो की, जेव्हा सीएएविरोधी निषेध तीव्र झाला तेव्हा घरातील मंडळी झरगरच्या सुरक्षितेबद्दल चिंतित होती, पण कोणालाच वाटले नाही की तिने त्यात भाग घेऊ नये. कारण सर्वांनाच माहिती होते की, ती त्या प्रश्नाबाबत तिची प्रतिक्रिया तीव्र होती. पण ती काही अशी भारावलेली नव्हती. ती सीएएबद्दल बोलत असे, पण इतरही घरगुती गोष्टींबद्दलही तिला आत्मीयता होती. नातेवाइकांकडे जाणे, घरातील हवे-नको ते बघणे, हे सर्व ती करत असे. आम्हाला भीती होती की- या निदर्शनांमध्ये काही वेळा दुसऱ्या बाजूने अडथळा केला जातो, पळापळ होते; त्यामध्ये तिला काही शारीरिक इजा व्हायला नको. आम्हाला माहिती होते की, ती स्वतंत्र विचारांची आहे. एकूणच ज्या तऱ्हेचा माहोल तयार झाला होता, तो आवश्यक आहे याचेही आम्हाला भान होते. भारतामध्ये ठिकठिकाणी विद्यार्थी निदर्शने करत होते. हजारो लोक सामील होत होते.

सीएए या कायद्यामुळे अफगाणी, पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोक- ज्यांच्याजवळ भारतीय असल्याची काही कायदेशीर सर्टिफिकेट्‌स नाहीत, त्यांना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली होती; फक्त या देशांतील मुस्लिम लोक सोडून. पहिल्यांदाच धर्माच्या निकषावर नागरिकत्वाचा हक्क देण्याची ही योजना होती. एवढेच नव्हे, तर सीएएबरोबर जो एनआरसी (National Register of Citizenship) हा कायदा करण्यात येणार आहे, त्यामध्ये असे कोण लोक आहेत ज्यांच्याकडे आधीपासून भारतीयत्व सिद्ध करणारी काही कागदपत्रे नाहीत, त्यांना तुरुंगात टाकले जाऊन पुढे देशाबाहेर हाकलले जाईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. अनेकांनी या दोन्ही कायद्यांवर टीका केली होती की, अनेक मुस्लिमांना देशातून हाकलण्यासाठी या कायद्याचा उपयोग केला जाईल.

जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांनी एक मोर्चा 15 डिसेंबर रोजी संघटित केला होता. त्या वेळी पोलिसांकडून इतकी हिंसा करण्यात आली की, 2014 पासून, म्हणजेच भाजपचे शासन सुरू झाल्यापासून मुस्लिमविरोधाला जी सुरुवात झाली होती, ती या सहा वर्षांत किती सर्वसामान्य झाली आहे याची प्रचिती आली. सिरवाल सांगत होता की, तो आणि झरगर यांच्यांमध्ये चर्चाही सुरू झाली होती की, या वातावरणामध्ये भारतात राहणे शक्य होईल का? अनेक मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबांमध्ये अशा चर्चा होणे स्वाभाविक होते. तो म्हणत होता की, त्याला स्वत:ला त्याच्या ऑफिसमध्ये किंवा इतर मित्रांमध्ये कधी कोणी अशी अस्वस्थ करणारी भावना बोलून दाखविली नाही. हा विषय कधी निघतही नसे. पण मनातून अनेक मुस्लिमांना ती त्यांच्या अस्तित्वाला आव्हान देणारी घटना वाटत होती. पण जेव्हा त्याच्या बायकोचे सन्माननीय विद्यापीठ- जिथे सर्व काही सुरक्षित आहे अशी कल्पना होती- तिथे असा हल्ला झाल्यावर खचल्यासारखे झाले होते. पोलिसांनी अश्रुधूर तर वापरलाच, पण विद्यार्थ्यांना बंदुकीच्या बॅटनने मारायला सुरुवात केली होती. लायब्ररीमध्ये घुसून तिथे बसलेल्या मुलांना मारले होते. एक हिंदू व्यक्ती पिस्तूल घेऊन या विद्यार्थ्यांना मारण्यासाठी 30 जानेवारी रोजी तिथे आला आणि त्यांच्यावरे पिस्तूल रोखून त्याने नारा दिला, ‘‘ये लो आजादी!’’

दि.23  फेब्रुवारीमध्ये झालेल्या दंगलीआधी कपिल मिश्रा याने हिंसेला आमंत्रण दिले होते. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी तिला अटक केली. त्यानंतर सोशल मीडियावर अत्यंत घाणेरडे ट्रोल सुरू झाले, अश्लील टिपण्या येऊ लागल्या. तिचे लग्न झालेले नसून ती गर्भवती आहे, हेही खोटे आहे. ती वेश्या आहे. सिरवाल म्हणतो की, त्या वेळी आम्हाला वाटत राहिले की हिंदू सहकारी, मित्र-मैत्रिणी आमच्या मदतीला येतील. आलेही. पण अनेक लोक शांतही होते. तेव्हाच आमच्या लक्षात आले की, हे काही वेगळेच आहे. काही तरी अशुभ घडणार आहे.

दंगलीनंतर झरगरने बाधित लोकांना मदतीसाठी कंबर कसली. कित्येकांची घरे जळाली होती. काहींची दुकाने लुटली गेली होती. त्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करणे, कपड्यांची व्यवस्था करणे हे काम तिने मनापासून केले. त्यातच तिच्या आरोग्यामध्ये, गर्भाच्या बाबतीत काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाली आणि घरी बसून तब्येतीची काळजी घेणे तिला आवश्यक झाले. त्याच वेळी 10 एप्रिलला तिच्या घरी तीन जीपमधून आठ पोलीस हजर झाले. सिरवाल तिच्याबरोबर पोलीस स्टेशनवर गेला. तिची उलटतपासणी सात तास चालू होती. सिरवाल कॅन्टीनमध्ये बसून होता. मधे दोन-तीनदा त्यांची गाठभेट झाली. त्या वेळी ती हादरून गेलेली दिसली. त्याने दोनदा सांगून पाहिले की, आम्ही उद्या येऊ, पण आज तिला सुट्टी द्या. ती गर्भवती आहे. पण त्यांनी ऐकले नाही. रात्री दहा वाजता तिला अटक करण्यात आली. तिला अश्रू आवरत नव्हते. त्याने खूप विनवणी केली की, आम्ही रोज येथे येऊ आणि तुम्ही तपासणी करू शकता, पण आता तिला सोडा. पण त्यांनी ऐकले नाही. एकच उत्तर होते- हे झाले आहे, त्यात फरक पडणार नाही.

(‘हफिंग्टन पोस्ट’मधील लेखाचा अनुवाद)

अनुवाद : छाया दातार

Tags: जामिया सफुरा झरगर छाया दातार jamia safura jhargar chhaya datar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

छाया दातार,  मुंबई
chhaya.datar1944@gmail.com

मागील अर्धशतक स्त्रीमुक्ती चळवळीतील महत्त्वाच्या कार्यकर्त्या व लेखिका असलेल्या छाया दातार, विचारवेध संमेलनाच्या अध्यक्ष राहिल्या आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके