डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

या चरित्रकहाण्या मुळातूनच वाचण्यासारख्या आहेत. नशीब अजमावयाला लोक कोठून कुठे जात होते आणि कसे यश मिळवीत होते किंवा अपयश सहन करत होते, याची विविध रूपे लेखकाने सादर केली आहेत. लेखकाने किती भाषांचा अभ्यास केलेला आहे, किती दस्तऐवज त्याने नजरेखालून घातले आहेत आणि आपल्या तथ्याला अधिक परिपोष कसा करता येईल, याची तो सतत काळजी कशी घेतो याचे आश्चर्य आणि कौतुक वाटत राहते. अरेबियन नाईट्‌सच्या सुरस आणि चमत्कारिक कथा लहानपणी वाचलेल्या आठवत होत्या. याही अशाच विद्वत्तापूर्ण सुरस कथा वाचायची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजते.  

हे पुस्तक ज्या ऐतिहासिक व्यक्ती मुख्यत: मोगलकालीन भारतात येऊन गेल्या आणि बऱ्याचशा येथेच राहून गेल्या, त्यांच्याविषयी अतिशय सुरस कहाण्या सांगते. मात्र या कहाण्या केवळ सुरस आणि चमत्कारिक नाहीत, तर त्या व्यक्तींची चरित्ररेखा पुरेशी स्पष्ट करण्यासाठी आणि त्यांची ऐतिहासिक सत्यता पटवून देण्यासाठी केलेली अनेक भाषांतील मुशाफिरी आहे. ही चरित्रे तर वाचताना आनंद देतातच, पण त्यांचा शोध घेण्यासाठी लेखकाने केलेली तडफड मनाला जाऊन भिडते. त्याचप्रमाणे हे पुस्तक अनुवादित करणाऱ्या रेखा देशपांडे यांचे शेवटी दिलेले मनोगत ‘अनुवाद- एक शोधयात्रा’ वाचताना त्यांनी केलेल्या अफाट प्रयत्नांनाही दाद द्यावीशी वाटते. मूळ लेखन पोचविण्याची ही असोशी विरळाच म्हणावी लागेल. 

हा लेखक स्वत: ब्रिटिश असून आता भारतीय झालेला आहे आणि म्हणून भारतीय होणे म्हणजे काय याचा शोध त्याला घ्यावासा वाटतो. पुस्तकाच्या सुरुवातीला त्याचे छोटेसे निवेदन आहे- ‘परकाया प्रवेश’ आणि मग अगदी शेवटी त्याला ह्या संशोधनाची कल्पना कशी सुचली याबद्दल सविस्तर लेख आहे. परदेशी चष्म्यातून किंवा भिंगातून भारतातील जीवन, माणसे, त्यांचे स्वभाव, त्यांची मानसिकता समजून घेताना खूप मजा येते आणि त्यातून आपण आपल्याला अधिक ओळखू लागतो, असा माझाही अनुभव आहे. या पुस्तकात 13 व्यक्तिचित्रणे आहेत, त्यातील दोन स्त्रिया आहेत आणि हे केवळ परदेशी- प्रवासी नाहीत तर येथील जीवनात रमलेले परदेशी, पुष्कळसे येथेच स्थायिक झालेले आहेत. आणि हा काळ मुख्यत: 16-17 व्या शतकातील आहे, म्हणजेच बहुतेक मोगल आणि इतर दक्खनी मुस्लिम राजवटी भारतात स्थिरावल्याचा काळ आहे. तसेच मसाल्यांच्या शोधात भारतात आलेल्या युरोपियन कंपन्यांचा काळ आहे. व्यापाराच्या निमित्ताने ह्या कंपन्या येथे आल्या होत्या. वसाहतवादी राज्यसंस्थेला अजून अवकाश होता. 

लेखक काही वेळा दोन जीवनकहाण्यांमध्येही एक छोटे चिंतनात्मक टिपण टाकतो. त्याला आपण स्वत: भारतात कसे समायोजित होत जात आहोत, याचे एक भान दिसते  आणि त्यातून त्याला या तीन-चार शतकांपूर्वी आलेल्या परदेशी लोकांशी आत्मिक पातळीवर जोडून घेता आले, असे तो मानतो. हे केवळ मानसिक मीलन नाही; तर येथील भूमीवर शारीरिक रीत्या राहण्याचा, येथील हवामानाशी सरावण्याचा, येथील जेवण्या-खाण्याचा, येथील लोकांच्या आचार-विचारांचा जो परिणाम व्यक्तीवर होत राहतो, त्याची तो फार बारकाईने अनुभूती घेत राहतो- हे मला फार रुचीपूर्ण वाटले. स्वत:च्या अनुभूतीतून त्याला या लेखनाची प्रेरणा मिळाली आणि म्हणून केवळ सरळ-सपाट जीवनकहाण्या असे या लेखनाचे स्वरूप नसून अतिशय सखोलतेने त्याला या चरित्रांच्या मनात शिरकाव मिळू शकला असावा, असे वाटते. 

लेखक सांगतो, या फिरंगी स्थलांतरितांमध्ये एक खास वर्ग होता. हा वर्ग आहे गुलामांचा. अमेरिकन वसाहतींमध्ये जशी गुलामगिरी होती, त्यापेक्षा सोळाव्या शतकातील भारतातील गुलामगिरीचे स्वरूप वेगळे होते. रशिया, मलाया, हॉलंड, पूर्व आफ्रिका अशा जगातील अनेक भागांतून बऱ्याच लोकांना पकडून आणून पहारेकरी, सैनिक आणि नाविक म्हणून निमलष्करी कामांना जुंपले जायचे. अमेरिकेतील शेतात राबणाऱ्या गुलामांपेक्षा हे लढाऊ गुलाम सामाजिक, शारीरिक दृष्ट्या किती तरी अधिक स्वतंत्र असत. त्यातले काही तर हिंदुस्थानात मोठ्या राजकीय आणि लष्करी पदांवरही पोचले. हिंदुस्थानच्या भूमीवर व समुद्रातही प्रतिकूल वातावरणात सतत लढाया करत राहून त्यांनी कमावलेल्या कौशल्यामुळे त्यांना मोठमोठ्या भूभागांचे अधिकारही बहाल करण्यात आले होते. मी केवळ चार चरित्रांचा विचार येथे करणार आहे, परंतु या चरित्रकहाण्या सांगताना लेखकाने घेतलेली शोधशैली त्यातून उलगडत जाते. केवळ एका साधनावर न थांबता तो सत्य शोधायला इतर अनेक ऐतिहासिक साधने धुंडाळत जातो आणि तर्कशुद्ध ताळेबंद मांडून सत्य उलगडण्याचा आनंद देतो. 

मलिक अंबर 

मलिक अंबर हे नाव महाराष्ट्रीय लोकांना परिचित आहे ते खडकी ऊर्फ औरंगाबाद या शहरासंदर्भात. या औरंगाबादला संभाजीनगर असे नाव देण्यात यावे, अशी मागणी बरेच दिवस होत आहे. औरंगजेबाने जिंकलेले हे शहर म्हणून त्याची नामोनिशाणी राहू नये, असे अनेकांना वाटते. याच औरंगजेबाने संभाजीशी दगाबाजी करून त्याचा खात्मा केला, म्हणून संभाजीला न्याय देण्यासाठी एक प्रतीकात्मक कृती म्हणून औरंगाबादचे नाव पुसून टाकावे, अशी ही मागणी आहे. पण खरं पाहिलं तर हे शहर संभाजीचे नाही, औरंगजेबाचेही नाही; ते मलिक अंबरचे आहे. एका हबशाने वसविलेले. अतिशय उत्तम प्रशासकीय गुण दाखवून येथे पाण्याची केलेली सोय, जी जगातील सर्वांत आधुनिक, सुसज्ज अशा जल-आपूर्ती व्यवस्थांपैकी एक होती. गोवळकोंड्याच्या आदिलशहाने याच सुमारास हैदराबाद वसविले. तसेच मलिक अंबरने सुंदर मशिदी, मंदिरे, चर्चेसही या खडकीमध्ये वसविली होती. ते त्या काळचे एक बहुसांस्कृतिक शहर होते. जवळचा दौलताबादचा किल्लाही त्याने मजबूत करून घेतला होता. 

मलिक अंबरचे महत्त्व एवढेच नाही; तर शहाजी आणि त्याचा मुलगा शिवाजी यांनी मोगलाविरोधी लढण्यासाठी जे युद्ध तंत्र वापरले- ज्याला मार्शल आर्ट म्हटले जाते- ते तंत्रही याच मलिक अंबरने विकसित केले हे फारच थोड्यांना माहिती असेल. त्याला पुढे ‘बारगिरी’ म्हटले गेले. मलिक अंबर ज्या आफ्रिकी प्रदेशातून आला- इथिओपियातून आला, तेथे त्याने हे तंत्र पाहिलेले होते. महाराष्ट्रातील सह्याद्रीतील डोंगराळ भाग हा त्यासाठी अनुकूल होता आणि त्याचा फायदा घेऊन त्याने मोगलांशी लढत दिली. आदिलशहा आणि अहमदनगरची सल्तनत येथे बरेचसे मराठे सरदार नोकरीला होते. अहमदनगरच्या सुलतानाकडे असलेल्या सैन्यामध्ये मलिकने बरेच हबशी किंवा सिद्दी सैनिक आणले होते आणि त्यांच्या समान भाषेमुळे ते एकमेकांशी इमानाने वागत. मोगलांच्या मोठ्या सैन्यापुढे, हत्तींपुढे आणि तोफखान्यापुढे मलिकची फौज अगदीच कमकुवत असे; परंतु गनिमी काव्याच्या युद्धतंत्रामुळे या प्रचंड सैन्याला बेजार करून सोडणे त्यांना शक्य होत असे. अहमदनगरची चांदबीबी ही मलिक अंबरच्या काळातीलच होय. मुघल हे तुर्की वंशातील होते आणि दक्षिणेकडील मुस्लिम राज्ये ही अरबी संस्कृतीतील होती. त्यांच्या संघर्षातूनच शिवाजीचा उदय झाला आणि मावळ्यांचे खास ‘बारगिरीचे’ तंत्र उदयास आले. 

या सर्व पार्श्वभूमीवर लेखकाने प्रश्न विचारला आहे की, मलिक अंबर स्थलांतरित होता का? मूळचा इथिओपिया या ख्रिस्तीधर्मीय प्रदेशामध्ये जन्मलेला- पण ख्रिस्ती नव्हे,  गुलाम म्हणून भारतात आला आणि मध्ययुगीन सल्तनती व अप्रत्यक्षरीत्या आजचा महाराष्ट्र ज्यातून उदयाला आला, त्या आफ्रिकन लष्करी व इस्लामी राजकीय संस्कृतीचा भाग झाला. त्याला इथिओपियन म्हणायचे की भारतीय म्हणायचे? लेखकाने मुघल संस्कृतीसंदर्भात मलिक अंबरला तपासले आहे. तो म्हणतो की, तो भटका होता. हे भटकेपण मुघल संस्कृतीला मान्य नव्हते. पण या भटकेपणानेच त्याला सामर्थ्य दिले. त्याचे मूळ नाव चापू- मग तो अंबर झाला आणि विदर्भात राजाच्या पदरी असताना त्याच्या प्रशासकीय कौशल्यावर खूष होऊन त्याला मालिक म्हणजेच मलिक अंबर अशी पदवी मिळाली. त्याच्या जीवनाचा दीर्घ प्रवास झाला तो आफ्रिका-आफ्रिकन द्वीपकल्प व मेसोपोटेमिया आणि भारत या मार्गाने. अहमदनगरमध्ये तो डोंगर-दऱ्यांतून आणि दक्खनच्या पाणथळ भागातून भटकत असे. ते त्याच्या बारगिरीसाठी अत्यंत आवश्यक होते. भारतीय मराठा भूमीत खऱ्या अर्थाने घर थाटण्यासाठी, ती भूमी आपलीशी करण्यासाठी ते आवश्यकच होते. भटकत राहणे आणि स्थायिक होणे यातील विरोधाभास आहे, तोच या सोळाव्या शतकातील भारतात फिरंगी असण्याच्या मुळाशी आहे. या काळात तो स्वत: बदलत होता शरीराने, मनाने आणि आजूबाजूच्या वातावरणावरही परिणाम करत होता, असे विश्लेषण लेखक करतो. 

या चरित्रकथेच्या सुरुवातीलाच लेखक म्हणतो की, या गुलामाची कथा म्हणजे आणखी एका अधिकच प्रसिद्ध असलेल्या शौर्यकथेची नांदीच आहे. ही शौर्यकथा आहे 1670 च्या दशकातील महान मराठा योद्धाराजा छत्रपती शिवाजी भोसले याची. मुस्लिम मुघलांच्या वर्चस्वाला यशस्वी आव्हान देत शिवाजीने आपले स्वतंत्र मराठा राज्य स्थापन केले. त्यामुळे त्याला अस्सल भारतीय राष्ट्रवादाचा उद्‌गाता म्हणून गौरवतात. परंतु या अस्सल भारतीय राष्ट्र्‌वादाच्या उद्‌गात्याला ऋण मान्य करावे लागते ते एका मुस्लिम स्थलांतरिताने विकसित केलेल्या युद्धकलेचे, म्हणजेच मार्शल आर्टचे. 

लेखक सांगतो की, कोणत्याही मार्शल आर्टसाठी शारीरिक क्षमता वाढवणाऱ्या विलक्षण उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाची गरज असते. मार्शल आर्टमध्ये मुक्के, ठोसे, लाथेने उडविणे, ढकलणे, पकडणे, पिरगाळणे इत्यादी विविध शारीरिक हालचालींचा अनंत काळ सराव करत राहावा लागलो. अशा सरावाने त्या योद्ध्याचे शरीर नकळत चाली खेळून जाते. युद्धात त्याला निर्णय घेण्यासाठी जाणीवपूर्वक थांबावे लागत नाही. मग तो एखाद्या स्वयंचलित यंत्रासारखा भासतो. योद्धा केवळ त्याच्याजवळच्या शस्त्रांनी लढत नसतो; तर तो किंवा ती ज्या वातावरणात युद्धकला शिकलेला असतो/ते, त्या वातावरणासहित लढत असतो. मार्शल आर्ट शिकणे म्हणजे विशिष्ट भूभागाच्या आगळ्या-वेगळ्या वैशिष्ट्यांचा सराव शरीराला होऊ देणे. मार्शल आर्ट योद्‌ध्याला त्या भूभागाचे जे ज्ञान अवगत असते, ते त्या भू्‌भागाच्या विविध वैशिष्ट्यांचे-स्थलविज्ञानाचे. स्थलविज्ञान हे त्रिमितीय असते. 

लेखकाच्या मते, मलिक अंबरने जन्माला घालून विकसित केलेल्या युद्धकलेच्या जोरावर शिवाजी आणि त्याच्या मराठा सैनिकांनी विजय मिळविले. लेखकाचे हे मत दुसऱ्या एखाद्या ऐतिहासिक लेखकाच्या सिद्धांताशी ताडून पाहिले पाहिजे. मात्र मलिक अंबरने हे युद्धतंत्र विकसित केले असावे, या तथ्याला लेखकाने दिलेल्या अंबरच्या आयुष्यातील लहानपणापासून घडलेल्या अनेक घटनांची पार्श्वभूमी उपयोगी आहे, असे म्हणता येईल. 

गार्सिया द गोर्ता 

‘गार्सिया द गोर्ता’ याची ओळख मुंबई व अहमदनगरचा हकीम म्हणून दिलेली आहे. गार्सियाचे भारतातील आगमन अतिशय वेधक पद्धतीने रेखाटले आहे. 1538 च्या जानेवारी महिन्यामध्ये मेर्तिस अफाँस द सूझा हा हिंदुस्थानातील पोर्तुगीज वसाहतींचा कारभार पाहणाऱ्या पोर्तुगीज अधिकाऱ्याबरोबर जहाजातून केरळातील मलबार किनारपट्टीवर यायला निघाला होता. त्याच्याबरोबर बोटीवर गोर्ता होता. सूझाने आजपर्यंत अनेक मोपला शिपायांशी लढाई करून त्यांना आणि त्यांची जहाजे नष्ट करून टाकली होती. 

पोर्तुगीज हिंदुस्थानात आले होते ते या मसाल्यांच्या बेटांबर नियंत्रण ठेवून मिरी आणि इतर मसाले यांच्या व्यापाराचे केंद्र आपल्या ताब्यात घेण्यासाठी. त्याआधी अरब, चिनी, पर्शियन आणि मलबारी व्यापाऱ्यांच्या हाती हा व्यापार होता. केरळकडून गोव्याकडे येताना बोटीवर गोर्ताला विलक्षण सुंदर सुगंध येऊ लागला. या सुगंधी झाडांचे दाट जंगल जवळपास असावे, असे गोर्ताला वाटू लागले. तो शिक्षणाने डॉक्टर होता. या मसाल्यांच्या मिळविलेल्या ज्ञानाने त्याने पुढे आपल्या वैद्यकशास्त्रात बरीच भर घातली. लवंग हा पदार्थ औषधी आहे, हे  त्याच्या लक्षात आले होते. त्यानंतर तो पाकक्रियेतही वापरला जाऊ शकतो, असे त्याला वाटत असे. 

गोर्ताविषयी लेखक लिहितो की- त्या रात्री गोर्ता जेव्हा द सूझाच्या जहाजावर असताना ह्या मसाल्यांच्या सुगंधाने तो भारावून गेला, हा प्रसंग दोन ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. एक- पोर्तुगीजांच्या वसाहवादाची सुरुवात आणि दुसरी पोटाच्या विकारांवर गुणकारी ठरणाऱ्या उष्णकटिबंधीय औषधी द्रव्यांमुळे व अन्नपदार्थांमुळे फिरंग्यांत झालेल्या शारीरिक बदलांची सुरुवात. ह्या गोर्ताला लेखक धर्मद्रोही म्हणतो आणि तो भारतात कसा रमला, भारतीय संस्कृती त्याला कशी आपलीशी वाटली; तसेच तो गोवा, मुंबई, अहमदनगर असा कसा फिरस्ता झाला याच्या कहाणीचा साग्रसंगीत शोध घेतो. 

हा शोध घेण्याआधी पुस्तकात ज्या नाण्याचा फोटो दाखविलेला आहे, त्याचीही कहाणी तो सांगतो. 1991 मध्ये 200 इस्कुदोंचे एक नाणे पोर्तुगालमध्ये पाडले गेले. ते उष्ण्कटिबंधीय औषधविज्ञानाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या डॉक्टरच्या स्मृतिप्रित्यर्थ होते. अंगावर पायघोळ अंगरखा, डोक्यावर डॉक्टरची खास टोपी, हातात एक पुस्तक आणि दुसऱ्या हातात उष्णकटिबंधीय औषधी रोप- असे चित्र त्यावर कोरलेले आहे. तो एक राष्ट्रपुरुष होता. त्याने 1561 मध्ये ‘कोलोक्युयुश दोश सिम्प्लिश ई दोग्रास’ नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्या अनेक नकला युरोपमध्ये निघाल्या. पोर्तुगालमध्ये त्याचे पुतळे उभारले गेले. रस्त्यांना, बागांना, इस्पितळांना त्याचे नाव दिले गेले. 

त्याचा 1500 च्या सुमारास एका खेड्यात जन्म झाला. स्पेनमधील वैद्यकीय विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. मग तो लिस्बनच्या विद्यापीठात अध्यापक म्हणून आला. नंतर सूझाबरोबर डॉक्टर म्हणून तो रुजू झाला आणि भारतात येऊन पोचला. वर्षानंतर सूझा परत गेल्यावरही तो येथेच राहिला. सूझानंतर आलेल्या मस्कारेन्हान्स या व्हाईसरॉयच्या सेवेत तो होता. हा व्हॅईसरॉय लवकरच आजारी पडून गेला. पण जाताना त्याने मुंबई बेट लीजवर दिले. ते पोर्तुगीजांनी नुकतेच जिंकून घेतले होते. तो जन्मभर अविवाहित राहिला आणि 80 व्या वर्षी गोव्यात मरण पावला, असे गोव्यातील त्याचे चरित्रकार लिहितात. पण लेखकाला ते बिलकुल मान्य नाही. त्याने इतर अनेक नवी साधने शोधून गोर्ताच्या चरित्राचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये 1572 मध्ये लिहिल्या गेलेल्या एका पोर्तुगीज लेखकाच्या पुस्तकातील मजकुराचाही उल्लेख आहे. या लेखकाच्या गोव्यातील चार वर्षांच्या वास्तव्याच्या कालावधीत त्याचा व गोर्ताचा चांगला परिचय झाला होता आणि त्याने गोर्ताच्या बागेचे वर्णन केले आहे. गोर्ताच्या बगीच्यात भारतीय वृक्षांची, फुलझाडांची, औषधी वनस्पतींची, मसाल्यांच्या पदार्थांच्या झाडवेलींची आणि फळझाडांची गच्च दाटी होती. आपला लेखक म्हणतो की, गोर्ताचे कौतुक म्हणजे त्या बागेने अशी जादू केली होती की, त्यामुळे बागवानाचाच कायापालट झाला होता! वर उल्लेख केलेल्या गोर्ताच्या ग्रंथामध्ये हेच दिसून येते. या ग्रंथातील 59 संवाद केवळ भारतीय औषधी द्रव्यांविषयी आहेत. तसेच आंबा हे फळही गोर्ताला हिंदुस्थानात राहण्यासाठी कारणीभूत झाले असावे, असे लेखकाला वाटते. 

लेखकाने मुंबईतील त्याचे वास्तव्य कसे असावे याचा काही अंदाज बांधला आहे. तो त्या वेळच्या मुंबई बेटाचे वर्णन करतो. बेटावर दोन गावे असावीत. सध्याच्या वेस्टर्न नेव्हल कमांडच्या भागात किल्ला होता. तिथे गोर्ता राहत असावा. दुसरीकडे कोळ्यांची वस्ती होती. त्यातील बहुतेक ख्रिस्ती झाले असावेत. गोर्ताच्या बागेची निगराणी त्याच्याकडे काम करणारा सिमाँव तोस्कानो नावाचा पोर्तुगीज माणूस करत असावा, असे त्याला वाटते. आंब्याच्या दोन वेळा बहरणाऱ्या झाडाच्या वीस आंब्यांची टोपली त्याच्या कुळाने त्याला आणून दिली. उत्तम आंबे व्हाईसरॉयकडे पाठवावेत, असेही तो सांगतो. 

आंब्याच्या कोयीच्या औषधी गुणांविषयी माहिती करून घेण्यासाठी केवळ स्वत:च्या अनुभवावर न विसंबता त्याने स्थानिक वैद्य-हकीम लोकांशीही मैत्री केली होती. त्यांच्या सांस्कृतिक वर्तुळात तो सहभागी होऊन गेला होता. गोव्यात असताना त्याच्याकडे घरकाम करणारी धर्मांतरित भारतीय गोव्याच्या बागेतील झाडा-पेडांच्या गुणांची चांगली जाणकार असल्याचे उल्लेख येतात. लेखकाच्या मते, गोर्ताने जे वैद्यक ज्ञान मिळविले ते मुख्यत: इस्तादु द इंदिया म्हणजेच पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीच्या अखत्यारीच्या बाहेर असलेल्या प्रदेशातून. 

येथे त्याच्या इतिहासातील अहमदनगरचे स्थान महत्त्वाचे ठरते. तेथील सुलतान बुर्हान निजाम शहा (1503-1530) याचा खासगी डॉक्टर म्हणून त्याने अनेक वर्षे सेवा बजावली. अहमदनगर हे त्या काळातील  अतिशय समृद्ध शहर होते, असे वर्णन लेखकाने केले आहे. गोर्ता नेमका किती काळ या सुलतानाच्या पदरी होता ह्याचा उल्लेख सापडला नाही. पण निजामाने स्वत:साठी व मुलांसाठी देशी-विदेशी हकीम लोकांचे एक पथक पदरी बाळगले होते; तेव्हा त्याने गोर्ताला आपल्या पदरी बोलाविले, यात नवल नाही. त्याला भरपूर पगारही देण्यात येत होता असा उल्लेख सापडतो. येथे निजामाच्या मुलांना पोर्तुगीज शिकविण्याच्या बदल्यात निजामाने ‘मला रोगांची आणि औषधांची अरबी भाषेतील नावे शिकविली’ असे त्याने त्याच्या पुस्तकात लिहिले आहे. 

एवढेच नव्हे, तर पारंपरिक पाश्चिमात्य औषधशास्त्रात ग्रीक डॉक्टर गॅलेन याचा आधार घेतला जातो, परंतु अहमदनगर येथे निजामाकडे आल्यावर त्याची अविसेन नावाच्या उझबेकिस्तानी डॉक्टरच्या सिद्धांतनाचा परिचय झाला. निजामाच्या दरबारातील अरेबिक भाषक बहुसांस्कृतिक हकीममंडळींच्या ज्ञानाला अविसेनच्या सिद्धांतांची पार्श्वभूमी होती. त्यांच्याकडून गोर्ता खूप शिकला. म्हणूनच त्याने त्याच्या पुस्तकात लिहिले आहे की- पाश्चिमात्य वैद्यक व्यावसायिक- ज्यांना हिंदुस्थानविषयी काही माहिती नाही, अशा ग्रीक वैद्यक व्यवसायिकांची गुलामीच करतात. ग्रीकांपेक्षा अरबांना हिंदुस्थानविषयक माहिती अधिक आहे, म्हणूनच ते ग्रीकांपेक्षा कमी चुका करतात. त्या काळात युरोपमध्ये गॅलेनविरुद्ध बोलण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती, परंतु हिंदुस्थानात आल्यावर तो ग्रीकांच्या विरोधात वारंवार बोलत असे. अहमदनगरमध्ये त्याला आंब्यांच्या कोयीचे औषधी गुणधर्म समजले आणि त्याला आंबे आवडू लागले. दक्खनी आंब्याची तो भरभरून स्तुती करतो. 

गोर्ताच्या या अधिकृत माहितीबरोबरच लेखकाने त्याची एक दुसरी बाजू शोधून काढली आहे. लेखाची मांडणी करतानासुद्धा तो ह्या दुसऱ्या बाजूबद्दल नंतर बोलतो, म्हणून ते रसपूर्ण वाटते. एका बाजूला देशभक्त पोर्तुगीज ख्रिश्चन डॉक्टर अशी त्याची प्रतिमा तयार करण्यात आली आहे, त्यामुळे त्याच्या मूळ चरित्राविषयी काही तरी झाकण्याचा प्रयत्न आहे, असे लेखकाला वाटले. गोर्ता स्वत: त्याच्या दुसऱ्या बाजूबाबत काही बोलत नाही. पण त्याच्या मनात काही तरी असंतोष खदखदत असावा, असे लेखकाला वाटते. त्याने हिंदुस्थानी-इस्लामी पद्धतीच्या वैद्यकीय व्यवसायाचा आणि देशी खाद्य पदार्थांचा खुल्या दिलाने स्वीकार केला, हा युरोपीय संस्कृतीला दिलेला एक प्रकारचा नकार होता, असे त्याला वाटते आणि म्हणून प्रस्तुत लेखकाने त्याची दुसरी बाजू खोदून काढली. 

त्याच्या लक्षात आले की, गोर्ता मुळात जन्माने पोर्तुगीज ख्रिश्चन नव्हताच. त्यानिमित्ताने त्या वेळच्या युरोपच्या सांस्कृतिक व राजकीय वातावरणाचे चित्र थोडक्या शब्दांत अतिशय प्रभावीपणे रंगविले आहे. युरोपची राजेमंडळी दर्यावर्दी लोकांना प्रोत्साहन देऊन नवनवीन देश शोधून काढण्यासाठी मदत देत आहेत. हिंदुस्थान शोधायला निघालेला कोलंबस अमेरिकेत पोचला आणि वास्को द गामा हिंदुस्थानच्या किनाऱ्याला लागला आहे. सर्व जग वसाहतवादाच्या नव्या पर्वाला सुरुवात करत आहे. व्यापारी लोकांना महत्त्व आले आहे. ज्यू-अरब संबंध तोडून ज्यूंना आपल्या बाजूला घेऊन त्यांना आपल्या नोकरीत ठेवण्याचे प्रयत्न ख्रिश्चन राजेमंडळींनी सुरू केले आहेत असा तो काळ. तेव्हा गोर्ता हा त्या काळी जन्मलेला ज्यू होता. लेनोर हे स्पेनमधील ज्यू लोकांचे केंद्र होते. पण ख्रिश्चन राजांनी जेव्हा स्पेनमध्ये आपली सत्ता ताब्यात घेतली, तेव्हा ज्यू घाबरून जवळपासच्या पोर्तुगालमधील काश्ताल द व्हीद या शहरात राहू लागले. तिथे गोर्ताचा जन्म झाला. 

त्या वेळी ज्यूंना ख्रिश्चन करण्याचे आणि धर्मांतरासाठी दबाव आणण्याचे प्रयत्न झाले. पोर्तुगीजांनी नवख्रिश्चनांना संरक्षण पुरविण्याची घोषणा केली आणि गोर्ताचे कुटुंबही बळी पडले. लेखकाने गोर्ताच्या कुटुंबाचा विस्तृत परिचय दिला आहे. ज्यू कसे विखरले गेले, त्याचीही कहाणी त्याने दिली आहे. गोर्ताला पोर्तुगाल सोडून हिंदुस्थानात का यावेसे वाटले, याचेही स्पष्टीकरण येथे मिळते. म्हणूनच लेखक सांगतो की, गोर्ताला मोठा मानसन्मान मिळाला तरी तो मनाने ज्यू राहिला आणि ज्यू रीती-विधी पाळत राहिला. 

एखाद्या चरित्राचे वर्णन करताना त्याच्या भोवतालचा जागतिक पट शोधून काढून त्या चरित्रनायकाच्या मनाचा वेध घेण्याचा हा प्रयत्न हे या लेखकाचे वैशिष्ट्य या पुस्तकात वारंवार दिसून येते. त्याची ऐतिहासिक दृष्टी सर्व कानाकोपऱ्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करते. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य दाखविण्यासाठी गोर्ताच्या कहाणीचा थोडा विस्तृत परिचय दिला आहे. 

बीबी ज्युलियाना फिरंगी 

बीबी ज्युलियाना फिरंगी ही अकबराची लाहोरची बेगम मारिया हिची बहीण होती. तिचा काळ आहे साधारण 1526 ते 1604. ती अर्मेनियन होती की पोर्तुगीज होती, याबद्दल दुमत आहे. पण ती व तिची बहीण मारिया यांना 16 व्या शतकाच्या मध्यावर अरबी समुद्रातील चाच्यांनी पकडून भारतात आणून सोडल्याचे सांगितले जाते. या दोघी बहिणी मोगल दरबारी पोचल्या, तेव्हा अकबराने मारियाशी लग्न केले. जुलियानाचे लग्न अकबराच्या दरबारी असलेल्या जॉ फिलिप बूर्बो द नावार या फ्रेंच घराण्यातील धाडसी सरदाराशी झाले. 

हा राजपुत्र एका द्वंद्वयुद्धात हरल्यामुळे पळून देशांतराला निघाला होता. त्याला इथिओपियामधील ख्रिश्चन राजाने मोठी पदवीही बहाल केली होती. तिथून तो जहाजांच्या एका ताफ्याबरोबर भारतात आला आणि पुढे अकबराच्या पदरी सरदार म्हणून राहिला. मोगल राज्यकर्ते नेहमीच परकीयांशी परिचय करून घ्यायला उत्सुक असत, असे लेखक म्हणतो. ज्युलियानाचे लग्न झाल्यावर तिला मोगल जनानखान्याची प्रमुख हकीम म्हणून जबाबदारी देण्यात आली. युरोपियन औषधशास्त्राचे ज्ञान व कौशल्य या जोरावर तिची नियुक्ती झाली. किंबहुना, जनानखान्याच्या संरक्षणाची जबाबदारी कायमस्वरूपी या कुटुंबाकडे सोपविण्यात आली. हे दोघे शेवटपर्यंत ख्रिस्तीच राहिले व त्यांनी 1604 मध्ये तिथे एक चर्चही बांधले. मात्र 1630 मध्ये पोर्तुगीजांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये शहाजहानने ते पाडून टाकले, असा कथित इतिहास आहे. आजही बूर्बोची वंशावळ भारतामध्ये राहते आहे. मध्यंतरी फ्रेंच राजदूताने त्यांची भोपाळमध्ये भेट घेतली होती.

मात्र लेखक ही साधी-सरळ कहाणी सांगून थांबत नाही. त्याला या कहाणीमध्ये बरीच तफावत आढळते. मग तो एका जेसुईट पाद्रीने लिहिलेल्या पत्राचा माग घेतो. ज्युलियाना नावाची एक स्त्री 1580 ते 1590 च्या दशकात लाहोरमध्ये राहत होती. मग त्याला कळतं की, त्यानंतर थोड्या काळातच तिथे आणखी एक पोर्तुगीज स्त्री ज्युलियाना या नावाने आलेली होती. मग तो दोन्ही स्त्रियांचा माग काढायचा ठरवितो. पहिल्या ज्युलियानाचे बूर्बोशी लग्न झालं होतं की नाही, यात त्याला रस वाटत नाही. दंतकथा बऱ्याच असतात. पण एकूणच या परदेशी अर्मेनियन स्त्रिया भारतात काय करत होत्या, हे जाणून घेण्यात त्याला रस वाटतो. 

त्यातच त्याला मोगल जनानखान्यात ‘खिल’अत देण्याच्या समारंभाचे महत्त्व कळते आणि त्या समारंभाचा शोध घेत असताना त्याच्यासमोर वेगळेच सत्य उलगडत जाते. तुझुक-ए-जहांगिरीमध्ये सिकंदर-झूल-कर्नेन नावाचा एका मुघल उमरावाचा उल्लेख येतो. तो राजस्थानमधील संभर या सरोवरांच्या शहराचा फौजदार असल्याचा उल्लेख सापडतो. इस्कंदर नावाच्या अर्मेनियन फौजदाराचे लग्न अकबराने अब्दुल हाई फिरंगी नावाच्या आर्मेनियन ख्रिस्ती माणसाच्या मुलीशी लावून दिले. तिच्यापासून इस्कंदरला दोन मुले झाली. पुढे लेखकाला ऐन-ए-अकबरीमध्ये माहिती मिळते की, हाई नावाचा अकबराचा प्रमुख न्यायाधीश होता. त्याच्या कुटुंबाबद्दल कोर्सी नावाच्या इटालियन जेसुईट पाद्रीने व्हॅटकिनमधील त्याच्या वरिष्ठांना पत्रे लिहून माहिती कळविली होती. त्यामध्ये या हाईच्या मुलीचा उल्लेख येतो- ज्युलियाना. लेखक निष्कर्ष काढतो की, आपल्या दरबारातील उच्चपदस्थ उमरावाच्या मुलीचा विवाह हा दुसऱ्या उमरावाशी म्हणजेच इस्कंदरशी लावून देण्याचा विचार अकबराने केला असावा. याचा अर्थ- अर्मेनियन ख्रिस्ती जमातीत हा विवाह लावून देऊन ज्युलियानालाही अकबराने आपल्या जनानखान्यातील हकीम हे महत्त्वाचे स्थान दिले असावे. इस्कंदरला पुढे मिर्झा इस्कंदर असेही संबोधण्यात आले आहे. ज्युलियानाच्या मुलाने पुढे आग्रा येथील चर्चसाठी पैसा पुरविल्याचा उल्लेखही सापडतो. एकूणच अर्मेनियन व्यापारी मंडळींनी त्या काळी सिरिया ते भारतापर्यंत व्यापारी जाळे निर्माण केले होते आणि बऱ्याच ख्रिश्चन लोकांना अकबराने आश्रय दिला होता, असे दिसून येते. याचा अर्थ लेखक सांगतो की, ज्युलियाना बूर्बोची कहाणी केवळ दंतकथा वाटते.

ज्युलियानाची दोन्ही मुले अकबराने जनानखान्यात एखाद्या अपत्यहीन बेगमेकडे सोपविली असावीत आणि त्यामुळे ज्युलियानाला इकडे-तिकडे हिंडण्याचे स्वातंत्र्य मिळाले असावे. तिची दोन्ही मुले जहांगीराचा मुलगा खुर्म (शहाजहान) याच्याबरोबर वाढली, असे उल्लेख आहेत. ज्युलियानाला ही व्यवस्था कितपत मान्य होती, याबद्दल लेखक काही सांगू शकत नाही. तिच्या अल्पवयीन निधनाची बातमी मात्र जेरोम झेवियर या पाद्रीने लाहोरमधून लिहिलेल्या पत्रात त्याला मिळाली. या त्रोटक माहितीच्या आधारे लेखक तिचे आयुष्य कसे असावे, याचे चित्र रंगविण्याचा प्रयत्न करतो. त्या काळी हिंदुस्थानात अर्मेनियन ख्रिस्ती लोकांना फारसी व ख्रिस्ती अशी दोन नावे सर्रास असत. ज्युलियानाच्या मुलाच्या मुलांची अशी दोन नावे होती, असे दिसते. पण ज्युलियानाचे एकच नाव  कोर्सीला माहिती होते. लेखक म्हणतो की, तिला कदाचित ‘जुलेना’ या फारसी नावाने संबोधले जात असावे. मात्र कोर्सी या पाद्य्राने लिहिलेल्या पत्रांमध्ये तिचा उल्लेख बीबी ज्युलियाना असा करण्यात आलेला आहे. मुघल दरबारात बीबी हे उर्दू व तुर्की भाषेत सन्मानदर्शक संबोधन समजले जात होते. 

लेखक जुलियानाचे जनानखान्यातील आयुष्याचे वर्णन मात्र कल्पनारम्यतेने करतो. अनेक ठिकाणी जनानखान् यातील स्त्रियांना कलमदान देण्यात आल्याचे वाचले होते, परंतु लिहिताना टेबल-खुर्ची नसे. जमिनीवर बसून लिहिण्याची सवय तिला करावी लागत असे. ती जनानखान्यातील इतर स्त्रियांशी फारसीतूनच बोलत असावी. लेखकाने लाहोर येथील त्या काळात बांधलेला किल्ला पाहिला होता. तिथे आजही पर्यटकांना जनानखाना दाखविला जातो. 

तेथील एक वैशिष्ट्य म्हणजे आरसे महाल. पण हा शहाजहानने बांधल्याचे सांगण्यात येते. अकबराच्या वेळी तिथे अनेक दालने होती आणि प्रत्येक स्त्रीच्या दर्जाप्रमाणे त्यांना ती देण्यात आली असावीत, असे त्याला वाटते. ज्युलियानाची बहीण मरियम- जिचे अकबराशी लग्न झाले होते- तिला सर्वांत मोठे दालन असावे. दालनाभोवती खुले अंगण असून त्यामध्ये आडवे- उभे पाण्याचे पाट वाहत असावेत, असे दिसते. किल्ल्याच्या बाहेरच्या भिंतीला नक्षीदार जाळ्या आहेत. त्यातून आतील स्त्रियांना बाहेरचे दिसत असावे. या किल्ल्यामध्ये तळघरेही होती. जमिनीखाली अनेक दालने आणि भूलभुलैया वाटावा, अशा गल्ल्या होत्या. उन्हाळ्यात येथे स्त्रिया आराम करत. या भुयारातून येणारी बाहेरच्या जगातील ताजी हवा दालनातून खेळत राही. येथेच हमाममध्ये स्नान करणे, संध्याकाळच्या वेळी मोठ्या दिवाणखान्यात ध्रुपद गायकीचा आणि कथक नृत्याचा आस्वाद घेण्यासाठी या स्त्रिया जमत असत. लेखक म्हणतो की, तिलाही या सर्व सुविधा उपलब्ध असणार. पण शिवाय शाहजादा खुर्मबरोबर शिकारीच्या मोहिमांमध्ये तीही सामील होत असणार. फार थोड्या स्त्रियांना ही संधी मिळत असे. इतर वेळी काही ख्रिस्ती विधींसाठी ती बहिणीबरोबर मेण्यातून चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असेल. 

लेखकाला अर्मेनियन ख्रिस्ती लोकांच्या चाली-रीतींची बरीच माहिती दिसते. त्यामुळे त्याने ज्युलियानाच्या जीवनक्रमाचे वर्णन बऱ्याच तपशिलाने केले आहे. विशेषत: शिकारीला किंवा एरवीही कोणत्या प्रकारचे कपडे वापरले जात असावेत, तेही तो तर्कशुद्धपणे उलगडून सांगतो. लांब घेराचा जामा आणि जाकीट हे त्या वेळचे प्रचलित कपडे होते. छातीला घट्ट बसणारा पण कमरेखाली खूप लांब आणि त्याच्या आतमध्ये परकर- असा हा पेहराव आढळतो. नूरजहानचे पिस्तुलाने शिकार करण्याचे चित्र त्याने पाहिले आहे. ज्युलियानासुद्धा त्याच पद्धतीने शिकारीला जात असावी, अशी त्याची कल्पना आहे. त्या वेळच्या दागिन्यांचेही वर्णन त्याने केलेले आहे. हे सर्व ‘खिल’अत या समारंभात तिला मिळालेले असल्यामुळे मुघल दरबारची एक सदस्य म्हणून तिच्यावर शिक्कामोर्तब झाले असणार, असे लेखक म्हणतो. 

लेखकाच्या मते तिच्या अकाली मृत्यूमुळे तिच्या कर्तृत्वाच्या फार काही महत्त्वाच्या कहाण्या ऐकू येत नाहीत. पण तिच्या निमित्ताने अर्मेनियन समाजाचे अकबराच्या दरबारातील स्थान, त्या काळच्या पडद्यात राहणाऱ्या मुस्लिम स्त्रिया आणि मग त्यामध्ये एखादीच उठून दिसणारी ही अर्मेनियन ख्रिस्ती स्त्री- असे एक अनोखे चित्र इतिहासातील पानांमध्ये उठून दिसते. 

या चरित्रकहाण्या मुळातूनच वाचण्यासारख्या आहेत. नशीब अजमावयाला लोक कोठून कुठे जात होते आणि कसे यश मिळवीत होते किंवा अपयश सहन करत होते, याची विविध रूपे लेखकाने सादर केली आहेत. लेखकाने किती भाषांचा अभ्यास केलेला आहे, किती दस्तऐवज त्याने नजरेखालून घातले आहेत आणि आपल्या तथ्याला अधिक परिपोष कसा करता येईल, याची तो सतत काळजी कशी घेतो याचे आश्चर्य आणि कौतुक वाटत राहते. अरेबियन नाईट्‌सच्या सुरस आणि चमत्कारिक कथा लहानपणी वाचलेल्या आठवत होत्या. याही अशाच विद्वत्तापूर्ण सुरस कथा वाचायची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजते. 

द फर्स्ट फिरंगीज : जोनाथन गिल हॅरिस 
अनुवाद : रेखा देशपांडे 
पद्मगंधा प्रकाशन, पुणे 
पृष्ठे 424, किमत : 500 रुपये  

Tags: रेखा देशपांडे जोनाथन गिल हॅरिस द फर्स्ट फिरंगीज छाया दातार पद्मगंधा प्रकाशन अनुवाद शिवाजी शहाजी मलिक अंबर नवे पुस्तक मराठी साहित्य Rekha Deshpande Marathi books chhaya datar jonathan gil harris the first firangis Marathi book weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

छाया दातार,  मुंबई, महाराष्ट्र
chhaya.datar1944@gmail.com

सामाजिक कार्यकर्त्या 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात