डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विद्या बाळ : ‘बोलत्या व्हा’ संदेशाची जननी

वैयक्तिक पातळीवर तर विद्या अतिशय उदार होती. पत्रलेखनाचा अफाट पसारा, लांबलचक नाहीत पण अचूकपणे उत्तेजन देणारी पत्रे नवनवीन लेखकांनाच नाहीत तर वैयक्तिक पातळीवर सल्ला मागायला येणाऱ्यांना ती सहजपणे लिहीत असे, तेवढा वेळ देत असे. लोकांचा संग्रह जमविण्यासाठी ही फार मोठी कला आहे आणि ती तिला कमवावी लागली नव्हती. ती तिच्या रक्तात होती. स्त्रीच्या संपादनाचे काम म्हणूनच ती कुशलपणे करू शकली. स्त्री मासिकाच्या भोवती उभी राहिलेली स्त्री सखी मंडळे ही केवळ बाजारपेठीय संकल्पनेतून जन्माला आलेली नव्हती तर तिच्या संघटना-कौशल्याचा भाग आणि स्त्री चळवळीला त्यामुळे मिळालेले प्रोत्साहन असे त्यातून साध्य झाले. त्या काळी म्हणजे साधारण 1970 ते 2000 पर्यंत गावोगावी मध्यमवर्गीय स्त्रियांची महिला मंडळे जरूर असत, पण त्यांना काही प्रमाणात वैचारिक धार लावण्याचे काम या स्त्री सखी मंडळांनी केले असे म्हणता येईल.

विद्या माझी चुलत-चुलत बहीण. ती तात्यासाहेब केळकरांची नात आणि मी गिरिजाबाई केळकरांची नात. म्हणजे दोघींच्या घरी लेखनाचा वारसा. अर्थात लेखनाचे स्वरूप वेगळे. वैचारिक बांधिलकी वेगळी, पण मागील पिढीशी बंडखोरीचे नाते आणि आम्ही केवळ नात्याने नाही तर विचारांनी बांधल्या गेलो. दोघींचाही प्रवास एका टप्प्यापर्यंत सारखा. 18 व्या वर्षी प्रेमविवाह. शिक्षण विवाहानंतर. मुलेबाळे होऊन ती मोठी झाल्यावर काही तरी करण्याची आस. मी मार्क्सवादी चळवळीत काही काळ आणि पुढे स्त्रीमुक्ती चळवळीत प्रदीर्घ काळ असा प्रवास करत आहे. माझा प्रवास हा जनप्रवाहात संपूर्णपणे झोकून दिलेला नाही; तर एका बाजूला शैक्षणिक, वैचारिक दोर धरून पुढे-पुढे जाण्याचा हा प्रयत्न आहे.

स्त्रियांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांतील काही प्रश्न घेत आणि त्यांच्यासाठी उत्तरे शोधत हा प्रवास काहीसा शैक्षणिक अंगाने पुढे जात राहतो. विद्याही तशा अर्थाने ‘मास लीडर’ नव्हती; पण तिने महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय, शिक्षित स्त्रियांची मने निश्चितच जिंकली आहेत- जातिभेदांपलीकडे जाऊन. एका अर्थाने हा स्त्रियांचा गट अधिक कुंठित जीवन जगतो, कारण घरातून नोकरी करण्याची परवानगी मिळतेच असे नाही. खाऊन-पिऊन सुखी असल्यावर बाहेर जाण्याची गरज काय, अशी भूमिका. पण छुप्या पध्दतीने हिंसा चालू राहते. मन मारणे तर सततच. अशा स्त्रियांना घराबाहेर पडण्याचे मोठे धैर्य तिने दिले. म्हणूनच तिचा मुख्य संदेश काय, असा विचार करता मला सुचले की ‘बोलत्या व्हा’ हे आवाहन.

माझी विद्याशी घरातील ओळख. तिच्या विवाह-सोहळ्याला मी उपस्थित होते. ती 18 वर्षांची, मी 10 वर्षांची. थोडीशी कुरबूर मी ऐकल्याचे आठवते की, इतक्या लवकर लग्न कशाला? शिकू दे की. पण एकदा प्रेम जमले आणि नवरा वयाने मोठा असला की लग्नाचा आग्रह दोन्ही बाजूने धरला जातो. लग्नानंतर शिकेल की, हे व्यावहारिक उत्तर तयार असते. माझ्याही बाबतीत हेच तर घडले. बाईला करिअर हवेच, असे गृहीततत्त्व तेव्हा नव्हतेच. त्यानंतर विद्याची आणि माझी इन्टिमेट भेट झाली ती मी फर्ग्युसन कॉलेजला शिकायला आले तेव्हा. मी होस्टेलला आणि ती कालव्याच्या पलीकडे राईलकरांच्या बंगल्यात. तेव्हा ती लेकुरवाळी होती आणि घरी असायची. माझे प्रेमप्रकरण सुरू झाल्यावर मी तिलाच सांगायला गेले पहिल्यांदा. आणि महिनाभरातच माझ्या प्रियकराच्या वडिलांकडून ‘प्रेमप्रकरण संपवा’ असा सल्ला मिळाल्यावर प्रेमभंगाचे दु:ख व्यक्त करण्यासाठीही तिचाच आधार मला मिळाला. माझ्या प्रियकराला अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये स्टुडन्ट एक्स्चेंज कार्यक्रमामध्ये स्कॉलरशिप मिळाल्यामुळे त्याच्या वडिलांनी ठरविले की- हे दूर पल्ल्याचे प्रेम कामाचे नाही, तेव्हा आताच बांधिलकी नको. आमच्यावर सक्त पहारा सुरू केला त्यांनी.

त्यानंतर विवाह होऊन मुलेबाळे मोठी झाल्यावर एकदम विद्याची आणि माझी भेट झाली ती स्त्री मासिकाची संपादक म्हणून. लिहिण्यासाठी प्रवृत्त करणारी. तशी मी कामगार चळवळ, स्त्रीमुक्ती चळवळ अशा रस्त्यांवरील चळवळीत रमणारी. पण विद्याने माझ्या कथाकौशल्याला वाव दिला आणि पुढे माझे दोन कथासंग्रह प्रसिध्द झाले. तोपर्यंत विद्याचे कर्तृत्व चांगलेच नावारूपाला आलेले होते. विद्याही काही प्रमाणात रस्त्यावरील चळवळीत उतरू लागली होती. मुंबईला स्त्रीमुक्ती संघटनेची स्थापना आणि पुण्याला ‘नारी समता मंचा’ची स्थापना मला वाटते, साधारण एकाच वेळी झाली होती. मंजुश्री सारडा प्रकरण नारी समता मंचाने लावून धरले होते.

1980 मध्ये मथुरा बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आरोपी पोलिसांना सोडल्याबद्दल सगळ्याच स्त्री संघटनांना संताप आला होता. उपेन्द्र बक्षी, वसुधा धागमवार, लतिका सरकार या तीन ज्येष्ठ वकिलांनी त्या वेळी कायद्यातील त्रुटी दाखवून दिल्या आणि कायद्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता दाखवून दिली. हे प्रकरण केवळ एका घटनेबाबत घडलेल्या अन्यायाबाबत निषेध करून थांबले नाही, तर पुढे लॉ कमिशनने देशभर दौरा काढून अनेक स्त्री संघटनांशी सल्लामसलत करून महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणल्या. दि.16 डिसेंबर 2012 रोजी झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणी जसा सर्व देश उसळून उठला, तसाच काहीसा तो प्रसंग होता. त्यातूनच स्त्रियांना किती प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडावे लागते याकडे लक्ष वेधले गेले. त्यातूनच पुढे हुंडाबळी प्रकरणे, कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे पुढे आली. प्रमिला दंडवतेंनी हुंडाविरोधी बिलाची केलेली मागणी पारित झाली. परित्यक्ता, विधवा, लग्नाविना राहिलेल्या- अशा स्त्रियांचे प्रश्न पुढे आले.

मला आठवते आहे की, या स्त्रियांच्या एका मेळाव्याला विद्याने नाव दिले होते, ‘अपराजिता’. नारी समता मंचामध्ये विद्या नेहमीच कार्यरत होती आणि नवनवे वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम घेण्यात तिचा पुढाकार असे. एकतर्फी प्रेमप्रकरणानंतरच्या हिंसाचाराच्या अनेक घटना त्या वेळी गाजल्या होत्या. त्यासाठी तरुण मुला-मुलींना एकमेकांसंबंधी आदरावर आधारित निखळ मैत्रीचे महत्त्व सांगण्यासाठी तिने ‘दोस्ती जिंदाबाद’ हा कार्यक्रम घेऊन आमीर खानला बोलावले होते. पालकांनाही हजर राहायचे आवाहन होते. मला याचे नेहमीच कौतुक वाटत राहिले आहे. अर्थात, त्यामध्ये नारी समताच्या इतर सर्वच कार्यकर्त्यांचा मोठाच वाटा असे.

मी मुंबईला राहत असले तरी माझे पुण्याला जाणे होई. मुंबईतर्फे संपर्क समितीची सभासद म्हणून मी हमखास जाई. मी त्या वेळी 1981 मध्ये हॉलंडहून स्त्रिया व विकास या विषयात एम.ए. ही डिग्री घेऊन आले होते. त्यानिमित्ताने माझा थोडाफार सैध्दांतिक अभ्यास झाला होता. माझे ‘स्त्री-पुरुष’ हे पुस्तक ग्रंथालीने प्रसिध्द केले होते. त्यामुळे नारी समता मंचच्या काही सभासदांबरोबर सैध्दांतिक विषयावर अभ्यास मंडळ सुरू करण्याची कल्पना निघाली होती. विद्या म्हणत असे की, मला काही सैध्दांतिक गोष्टी फारशा कळत नाहीत आणि फार खोलात जाण्याची जरुरी वाटत नाही. तरीही ती चर्चेला बसत असे याचे मला आजही कौतुक वाटते.

ती आम्हा सर्वांपेक्षा वयाने मोठी होती आणि तिला स्त्री चळवळीची कार्यकर्ती किंवा लोकप्रिय पुढारी म्हणून मान्यताही मिळाली होती. तसेच चाकोरीबाहेर जाणारे कुटुंबसंस्थेबाबत रॅडिकल विचार करणारी अशी प्रसिध्दी मिळाल्यामुळे शिव्या-शापही खावे लागत होते, तरीही ती कधीही डगमगली नाही. मात्र पुरुषसत्ता ही भांडवली समाजव्यवस्थेचाच भाग कसा आहे आणि म्हणून स्त्रीमुक्ती ही केवळ आहे त्या परिस्थितीत वैयक्तिक पातळीवर बदलून होऊ शकणार नाही, तर तिचा आवाका हा वाढवीत संबंध समाजव्यवस्था बदलण्यासाठी वापरला पाहिजे. आणि आपल्याला मिळणाऱ्या व्यासपीठांवरून हे सतत आग्रहपूर्वक मांडले पाहिजे. तसेच, पुरुषसत्ता ही लैंगिक प्रेरणेतून, लैंगिक शोषणातून, हिंसाचारातून स्त्रीवर्गावर कशी जरब बसवते याबाबत बोलले पाहिजे- असा सगळा सैध्दांतिक आग्रह तिने फार खोलात जाऊन समजून घेण्याची आवश्यकता मानली नाही. कदाचित म्हणूनही ती मध्यमवर्गाला भावली. पुरुषांनाही भावली. पुढे तर तिने ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाच्या मुखपृष्ठावर जे उपशीर्षक दिले आहे (‘ती’ आणि ‘तो’ यापलीकडचे सर्व ‘ते’ यांचा स्वत:शी आणि परस्परांशी नव्याने संवाद व्हावा यासाठी), ते तिच्या मध्यममार्गी स्वभावाला साजेसे आहे, असे म्हणावेसे वाटते.

स्त्री-मुक्ती संघटना व स्त्री उवाच गट यांनी मिळून 1985 मध्ये पश्चिम महाराष्ट्रात 10 दिवस चालणारी स्त्री-मुक्ती यात्रा काढली होती, तिलाही विद्याने आणि नारी समता मंचने चांगला पाठिंबा दिला होता. पुढे स्त्री उवाच गटाने 8 मार्चला आंतरराष्ट्रीय स्त्रीदिनाच्या निमित्ताने एक वार्षिक काढण्याचे ठरविले. विद्या नुकतीच स्त्री मासिकातून बाहेर पडली होती. किर्लोस्कर समूहाने त्यातून अंग काढून घेतले होते. तिच्यापुढे स्वत:चे मासिक सुरू करण्याचा पर्याय होताच. पण त्यासाठी तिला काही दिवसांच्या मुदतीची आवश्यकता होती. म्हणून आम्ही तिला या वार्षिकाचे संपादन करण्याचे आवाहन केले. तिने प्रतिसाद दिला आणि पहिला अंक तिच्या हातून बाहेर आला. पण तेव्हाही आमचे व तिचे थोडेफार मतभेद झाले. आम्हाला स्त्री मासिकाच्या नेमस्त भूमिकेच्या पुढे जाऊन अधिक ज्वलंत आणि मीमांसक लेख मिळवायचे होते. विश्लेषणात्मक लेख हवे होते. स्त्रीमुक्तीचा व्यापक दृष्टिकोन लोकांपुढे मांडायचा होता. शिवाय आमची संपादनाची कल्पना ही सामूहिक होती, तीही तिला पटणारी नव्हती. अर्थात आम्हाला फायदा मिळाला. कारण आमचा पहिला अंक विद्या बाळ यांच्या हातून बाहेर आला, असे आम्ही फुशारकीने सांगू शकलो.

पुढे विद्या अधिक धीट होत गेली. समलिंगी संबंधांबद्दल तिने समजून घेतले. सेक्स वर्कर्सच्या संघटनेबद्दल तिची मते बदलत गेली. इच्छामरणाबाबत तर तिने खूपच पुढाकार घेतला. तिचा मृत्यूही एक प्रकारे त्याच पध्दतीने झाला, असे म्हणता येईल. आम्ही 1987 ते 1994 असे आठ वार्षिक अंक काढून आमची हौस भागविली. पुढे ही वार्षिके काढायची कल्पना ‘पुरुष उवाच’ आणि ‘पुरुष स्पंदन’ या दोहोंनी उचललेली दिसते. यानंतर मी स्वत: टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत स्त्री-अभ्यास विभागात प्राध्यापिकेची नोकरी स्वीकारली. त्यानिमित्ताने मला ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बचत गट, सेंद्रिय शेती वगैरे प्रश्नांवर काम करण्याची संधी मिळाली. पर्यावरणीय स्त्रीवादाकडे झुकू लागले, तेव्हाही मला विद्याने लिहिण्याचा आग्रह केला. स्त्री-चळवळ हे आमचे एकत्रित काम करण्याचे व्यासपीठ कायम राहिले आहे. शेवटपर्यंत ती कार्यरत होती, याचा मला अभिमान वाटतो आणि आधारही वाटतो. विद्याची मैत्रीण म्हणून कोणत्याही मध्यमवर्गीय स्त्रियांच्या समूहामध्ये स्वीकारले जाण्याचा मानही मिळतो. तिच्या जाण्याने चळवळीमध्ये एक पोकळी झाल्याचे जाणवणार आहे.     

विद्याच्या यशस्वी वाटचालीचे आकलन करत असताना असे लक्षात येते की, विद्याला आकाशवाणीवर निवेदिका म्हणून नोकरी मिळाली आणि ती सार्वजनिक जीवनात आली. अतिशय मुलायम पण कणखर आवाज, तो आवश्यकतेनुसार कमी-अधिक फेकण्याचा चपळपणा- ही आवाजाची कसरत तिला पुढेही उपयोगी पडली, स्त्री चळवळीमध्ये लोकांना जोडण्यासाठी. आपला मुद्दा लोकांना खात्रीलायक रीत्या पटवून देण्यासाठी, ऐकणाऱ्यांच्या मनातील व्दिधा मन:स्थिती बाजूला सारून सकारात्मक बाजू ठामपणे उचलून धरण्यासाठी मदत करणारा तो आवाज असे. आवाजाला साजेसे व्यक्तिमत्त्वही तिला लाभले होते. पाच फूट सहा इंच उंची आणि उत्तम बांधा, त्यामुळे सहज लक्ष जाण्यासारखे भारदस्त व्यक्तिमत्त्व.

चेहऱ्यावर सदा हसरे भाव आणि नवे ते सर्व स्वीकारण्याची वृत्ती, त्यामुळे कोणालाही तिच्याजवळ सहज जाता यायचे. ती चळवळीत होती आणि तरीही चळवळीमध्ये असलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर जाणवणारा रुक्षपणा तिच्याकडे नव्हता. नवनवीन अनुभवांना सामोरे जाताना आवश्यक कुतूहल ती जपून होती. तिच्या व्यक्तिमत्त्वाने आणि विचाराने प्रभावित झालेल्या अनेक स्त्रिया तिच्या सहवासात होत्या, पण त्यांच्यावर तिचे दडपण नव्हते. त्या तिच्या मैत्रिणी होत्या. स्त्री चळवळीमध्ये फार टोकापर्यंत जाण्याची तिची इच्छाही नव्हती. तिला एक सूर सापडला होता, एक ताल सापडला होता. त्या तालावर जितकी पावले टाकता येतील तितकी सदासर्वदा तेवढ्याच सराईतपणे ती न दमता टाकत असे, शेवटपर्यंत.

त्यामुळेच तिचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना कार्यक्रमाची लय साधली जाईल, पुरेसे मनोरंजन होईल याची खात्री असे. खूप काही नवनवीन मिळेल अशी अपेक्षा न ठेवता, पण जमलेल्या लोकांना त्यांचे विचार नक्की आवडतील असा त्यांना विश्वास असे. विद्याचा श्रोता हा मध्यमवर्गीय स्त्रिया आणि पुढे-पुढे पुरुषही असा असे. स्त्रियांच्या मुक्तीसाठी स्त्री-पुरुष संवाद हा तिचा आवडीचा विषय होता. त्यामुळे तिच्या भाषणांना कधी एकारलेपणा आला नाही. आणि, हीच शक्ती होती तिच्या भाषणांच्या लोकप्रियतेची.

वैयक्तिक पातळीवर तर विद्या अतिशय उदार होती. पत्रलेखनाचा अफाट पसारा, लांबलचक नाहीत पण अचूकपणे उत्तेजन देणारी पत्रे ती नवनवीन लेखकांनाच नाही तर वैयक्तिक पातळीवर सल्ला मागायला येणाऱ्यांना सहजपणे लिहीत असे, तेवढा वेळ देत असे. लोकांचा संग्रह जमविण्यासाठी ही फार मोठी कला आहे आणि ती तिला कमवावी लागली नव्हती, ती तिच्या रक्तात होती. स्त्रीच्या संपादनाचे काम म्हणूनच ती कुशलपणे करू शकली. स्त्री मासिकाच्या भोवती उभी राहिलेली स्त्री सखी मंडळे ही केवळ बाजारपेठीय संकल्पनेतून जन्माला आलेली नव्हती, तर तिच्या संघटनाकौशल्याचा भाग आणि स्त्री चळवळीला त्यामुळे मिळालेले प्रोत्साहन असे त्यातून साध्य झाले. त्या काळी म्हणजे साधारण 1970 ते 2000 पर्यंत मध्यमवर्गीय स्त्रियांची महिला मंडळे गावोगावी जरूर असत, पण त्यांना काही प्रमाणात वैचारिक धार लावण्याचे काम या स्त्री सखी मंडळांनी केले, असे म्हणता येईल. स्त्रीविषयक प्रश्न असलेल्या नवनवीन साहित्याची ओळख करून घेण्याचा हा प्रयत्न स्त्रीभानाला निश्चितच पुढे नेणारा होता.

Tags: चळवळ साहित्य स्त्रीमुक्ती स्त्री चळवळ गिरिजाबाई केळकर तात्यासाहेब केळकर विद्या बाळ chalwal sahity srimukti sri chalwal girijabai kelkar tatyasaheb kelkar widhya bal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

छाया दातार,  मुंबई
chhaya.datar1944@gmail.com

मागील अर्धशतक स्त्रीमुक्ती चळवळीतील महत्त्वाच्या कार्यकर्त्या व लेखिका असलेल्या छाया दातार, विचारवेध संमेलनाच्या अध्यक्ष राहिल्या आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके