डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पर्यावरणीय संकट : तरुणांचा आंतरजालावरील कृतिकार्यक्रम

ही तरुण पिढी किती काळपर्यंत आपला उत्साह टिकवून ठेवते ते पाहावे लागेल हे नक्कीच. त्यांना लगेच डोक्यावर घ्यायचे कारण नाही. मला स्वत:ला मात्र हे महत्त्वपूर्ण वाटत आहे. मीही तरुणपणी किंबहुना तरुणपण संपता संपता, 30 च्या सुमारास, मुले काहीशी मोठी झाल्यावर अशाच काही वर्षे तगून राहिलेल्या संघटनेबरोबर समाजपरिवर्तनाचे काम केलेले आहे. आमचा गट फुटला. पण जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली ती आयुष्यभर पुरेशी ठरली. आयुष्याला दिशा मिळण्यासाठी खूप उपयोग झाला. जमिनीवर काम करणारे पुष्कळ पत्रकार अशा प्रकारच्या सोशल मीडियाच्या मार्गाने प्रसिद्ध होणाऱ्या स्थानिक प्रश्नांची नोंद घेऊन त्यांचा शोध घेण्यासाठी जाऊ शकतील. अशा प्रकारचे माहिती तंत्रज्ञान त्यांच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणारे आहे हे नक्की.   

दिशा रवी नाव आठवतंय? फेब्रुवारीमध्ये शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी तिने ग्रेटा थुनबर्ग या जागतिक पातळीवर प्रसिद्ध झालेल्या स्विडिश मुलीच्या ट्वीटर अकाउंटवरून टूलकिट कॉपी केले आणि आपल्या ट्वीटर अकाउंटमधून हा पाठिंबा जाहीर केला. अर्थात तिने ग्रेटालाही या संपाची माहिती दिली आणि तिनेही शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे शेतकरी संपाची माहिती जगजाहीर झाली. दिशाच्या ट्वीटलासुद्धा 2 लाख लोकांचा पाठिंबा मिळाला. टूलकिट म्हणजे थोडक्यात एखाद्या मोहिमेमध्ये निषेध कसा नोंदवायचा याचे प्रशिक्षण. तिला पकडण्यासाठी युद्धपातळीवरून दिल्लीहून पोलिसांची फौज बंगळुरूला पोचली आणि दिल्लीच्या न्यायालयात तिच्यावर देशद्रोहाची केस नोंदविण्यात आली. पुढे दिल्ली उच्च न्यायालयाने तिला सोडून देण्यास सांगितले. कारण त्यांना त्या टूलकिटमध्ये काही हिंसेचा प्रचार आढळला नाही, देशद्रोहाची कृती आढळली नाही. केवळ सरकारने पारीत केलेल्या तीन धोरणांचा निषेध कसा कराल, त्याच्या काही सूचना केलेल्या होत्या- असे आढळले होते. मात्र या घटनेच्या निमित्ताने या युवा ॲक्टिव्हिस्टांच्या अनेक गटांचा मागोवा घेतला गेला आणि फार मोठी ऊर्जा हवामान बदलाच्या विरोधात तरुणांमध्ये कार्यरत आहे हे लक्षात आले. 

केवळ 19 वर्षांची दिशा ही बंगळुरूच्या माउंट कार्मेल कॉलेजमधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचा कोर्स करून बाहेर पडली आहे आणि तिने ‘फ्रायडेज फॉर फ्युचर इंडिया’ हा तरुणांचा गट स्थापन केला आहे. दर शुक्रवारी त्यांची आंतरजालावर भेट होते आणि ठिकठिकाणच्या पर्यावरणीय प्रश्नांवर चर्चा करून ट्वीटरवरून एखाद्या पर्यावरणीय प्रश्नावर प्रसिद्धीचा भडिमार करण्याचा व त्या निमित्ताने त्या प्रश्नाची बाजू लोकांपुढे मांडण्याचा संकल्प केला जातो. तसेच हवामान बदलाला कारणीभूत होणारे प्रकल्प, सरकारी धोरणे अशा अनेक प्रश्नांचा त्यात समावेश असतो. शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा मिळण्यासाठी जो संदेश तयार केला गेला, त्यालाही प्रचंड फॉलोअर्स मिळाले. 

कॅरावान वेबपोर्टलवर हवामान बदलाच्या विरोधात काम करणाऱ्या अशा अनेक युवा गटांची माहिती प्रसिद्ध झाली आहे. त्यांनी घेतलेले विषय पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. किती समजूतदारपणे ते हवामान बदलासारख्या गंभीर विषयाला हात घालत आहेत आणि सातत्याने त्यासाठी कारणीभूत असणारे प्रकल्प ओळखून त्यांना विरोध करणे, जाणीव-जागृती करणे, अशी कामे स्वत:चे अभ्यास आणि नोकऱ्या करून करत आहेत; याचे कौतुक वाटते. 

आंतरजालावर फार वेळा न जाणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला हे सारे अद्भुत वाटते. तुम्हांला माहिती आहे, की ‘अदानी वॉच’ नावाची एक वेबसाइट तयार झाली आहे? जवळजवळ 25 पर्यावरणीय गट त्यामध्ये भाग घेत आहेत. ‘युथ ऍक्शन टु स्टॉप अदानी-27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी’ अशी एक मोहीम नुकतीच पार पडली. या मोहिमेमध्ये अदानींवर आरोप करण्यात आले होते. ते लोकशाही सरकारांना पोखरून काढत आहेत, लोकांचे हक्क भंग करत आहेत. आणि त्यांच्या प्रकल्पांविरुद्ध कोणी टीका केली की त्यांचा छळ करत आहेत. हे अदानी ऑस्ट्रेलियामधील कोळशाच्या खाणीतून कोळसा आणण्याचा जो प्रकल्प उभा करत आहेत आणि त्याला तेथील मूळ रहिवाशांचा व तेथील पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे, ह्या संदर्भातील ते विधान होते. अदानींच्या भारतातही अनेक कोळशाच्या खाणी आहेत आणि इतरही प्रदूषित करणारे उद्योग आहेत. या वेबसाइटवर या उद्योगांची ज्यांना झळ लागते तेथील लोकांच्या मुलाखती; तसेच ऑस्ट्रेलियातील ज्या लोकांवर या प्रकल्पांचे परिणाम होणार आहेत त्यांच्या मुलाखती; यांचे व्हिडिओ, विरोध करणारी अनेक गाणी हवामान बदल या विषयावरील डॉक्युमेंटरी फिल्म्स अशा अनेक माहितीपूर्ण गोष्टी आंतरजालावर उपलब्ध करून दिलेल्या होत्या. नफ्याच्या मागे लागलेल्या जगभरातील कॉर्पोरेट्‌स कशा प्रकारे हवामान बदलासाठी कारणीभूत होत आहेत, या विषयावरील अनेक फिल्म्स त्यामध्ये होत्या. या आठवड्याच्या शेवटी अमिताभ घोष या प्रसिद्ध पर्यावर्णीय बदलांबाबत जागरूक असणाऱ्या कादंबरी लेखकाबरोबर प्रश्न-उत्तरांचे सत्र ठेवण्यात आले होते. 

ही मोहीम संघटित करणाऱ्यांपैकी चेन्नईच्या जयरामन नावाच्या ॲक्टिव्हिस्टने सांगितले की, ही तरुण मंडळी अनेक प्रकारच्या प्रश्नांवर काम करत आहे. कोळशाच्या खाणी, पाणथळ जागा, जंगलतोड अशा प्रकारची कामे जेथे जेथे चालू आहेत तेथील स्थानिक मंडळी तर विरोध करत आहेतच. तसेच त्यांना संघटित करणारी काही जमिनीवर काम करणारी मंडळीही आहेत. पण त्यांचा आवाज मोठा करण्यासाठी अशा प्रकारच्या सोशल मीडियाचीही मदत होते आहे. आणि म्हणूनच सरकार अस्वस्थ आहे. ‘व्हेट्टीवर कलेक्टिव्ह’ तामिळनाडूमधील एन्नोर-पुल्लीकट भागामधील कट्टुपल्ली बंदराच्या विस्ताराचे काम चालू आहे त्याला विरोध करत आहे. हे कामही अदानी करत आहेत. त्यामध्ये समुद्रामध्ये मोठा भराव घालण्याचे काम चालू आहे. तेथील सगळ्या पाणथळ जागा नष्ट होणार आहेत. 

या सगळ्या पर्यावरणवादी गटांची सुरुवात आणि एकत्र येणे सुरू झाले ते 2020 मध्ये एनव्हायर्न्मेंटल इम्पॅक्ट ॲसेसमेंट नोटिफिकेशन काढले गेले त्या वेळी. 2006 मध्येही काँग्रेस सरकारने अशा प्रकारचे नोटिफिकेशन काढले होते. कोणत्याही प्रकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी त्या प्रकल्पाचा हवामान व एकूणच प्रदूषणपातळी यावर दूरदर्शी परिणाम काय होऊ शकतो, याचा अभ्यास करणे आवश्यक असते. याचे मापदंड नोटिफिकेशनद्वारा ठरविले जातात. आणि या अभ्यासावर अवलंबून प्रकल्पाला होकार किंवा नकार दिला जातो. 2020 मध्ये जे नोटिफिकेशन मसुदा म्हणून जारी केले गेले, त्यामध्ये पूर्वीचे पर्यावरणीय संरक्षणासाठी आवश्यक असलेले अनेक मापदंड सैल करण्यात आले आहेत असे लक्षात आले. किंबहुना अनेक प्रकल्पांच्या बाबतीत तर तेथे राहणाऱ्या ज्या वस्त्यांवर परिणाम होणार आहेत, त्या रहिवाशांशी संवाद साधून सल्लामसलत करण्याची आवश्यकता नाही; असेही नमूद करण्यात आले. विशेषत: राष्ट्रीय हायवेज आणि देशाच्या अंतर्गत जलमार्ग हे प्रकल्प गाळले गेले. शिवाय काही अभ्यास न करताच सुरू झालेल्या प्रकल्पांना नंतर पर्यावरणीय मंजुरी देण्याची परवानगी देण्यात आली. 

या वेळी जन्माला आलेला आणि अजूनही कार्यरत असलेला गट म्हणजे ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’. दिशा रवी ही त्याची प्रतिस्थापना करणाऱ्यांपैकी एक आहे. आरे येथील झाडांना तोडण्यास मनाई करणाऱ्यांमध्ये बरेच युवक व युवती यांना या गटामुळे प्रेरणा मिळाली. शिलाँगमधील यांच्या विभागाने तेथील कोळशाच्या खाणी बेकायदेशीररीत्या  चालू असल्याच्या विरोधात मोहीम घेतली होती. शिलाँगमध्ये श्रीमंत आणि मध्यमवर्गीय लोक आपापली घरे बांधताना मोठ्या सोसायट्या निर्माण करून त्यांची प्रवेशद्वारे सामान्यांना बंद करत आहेत. आतमध्ये मॉल्स बांधत आहेत. हे नव-भांडवलशाहीचे प्रतिमान आहे. म्हणून या विकासाच्या प्रतिमानाला त्यांनी विरोध केला. 

‘गोव्याला कोळसा नको’, असे म्हणत गोव्यातील रेल्वेच्या विकासाला विरोध करणारा ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ गट येथेही आहे. परदेशांहून जहाजाने कोळसा आणल्यावर गोव्यातील मार्मागोवा बंदरावर कोळसा उतरून घेणे आणि मग रेल्वेने तो देशभर पोचविणे असा हा प्रकल्प आहे. ह्यासाठी एक हायवे व एक विद्युतवाहिनीही बांधण्याची गरज आहे. ह्या प्रकल्पातील रेल्वेचा प्रवास पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या ‘मोलेम नॅशनल पार्क’ व ‘भगवान महावीर वाइल्डलाइफ सँक्च्युरी’ यांतून जाणार आहे. युनेस्कोने वेस्टर्न घाटावरील हा 240 चौरस किलोमीटर प्रदेश हेरिटेज, म्हणजेच वारसा असे घोषित केले आहे. 

लोकांच्या संमतीचा जो मापदंड आहे त्याला मान तुकवावी लागू नये म्हणून या प्रकल्पाचे डिझाइन सरकारने असे केले आहे की, त्याचे 13 छोटे प्रकल्प तयार केले आणि कामाला परवानगी मिळविली. या प्रकल्पाचा गोव्याला काही उपयोग नाही. उलट बायोडायव्हर्सिटी असलेल्या प्रदेशांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे ‘सेव्ह मोलेम’ नावाची पर्यावरणवाद्यांची स्थानिक फळी तयार झाली आहे. परंतु या सोशल मीडियावरील गटामुळे स्थानिकांच्या विरोधाची माहिती सर्वदूर पसरायला मदत झाली. गोव्याच्या बाहेरील अनेक गट प्रभावीत झाले आहेत. विशेषत: रस्त्यावर उतरून निषेध करणे या कोरोनाच्या काळामध्ये शक्य नव्हते, त्यामुळे ट्वीटर हे माध्यम उपयोगी पडले. ट्वीटर स्टॉर्म, टॅगिंग, राजकीय नेते वगैरे मार्ग वापरले गेले. 

अर्थात या नव्याने घडणाऱ्या घटनेबद्दल काही जुने आणि जाणते पर्यावरणीय गट थोडे नाराज आहेत असे दिसते. ते काही वेळा या गटांना ‘क्लिक ऍक्टिव्हिस्ट्‌स’ असे म्हणताना आढळतात. त्यांना वाटते की अनेक स्थानिक प्रश्नांवर बरेच परिश्रम घेऊन त्यांनी लोकांना संघटित करण्याचे काम केले आहे. आणि त्या प्रश्नांचा गाजावाजा नंतर जगभर व्हायला मदत झाली आहे. आज या नव्या तंत्रज्ञानामुळे माहिती संचाराच्या नव्या पद्धतींमुळे ही तरुण पिढी ग्रेटा थुनबर्गने आवाहन केलेल्या ‘फ्रायडे फॉर फ्युचर’सारख्या जागतिक पातळीवर ट्रेण्डी बनलेल्या मार्गाने जायला तयार झाली आहेत. त्यामुळे काही वेळा त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी या युरोपसाठी महत्त्वाच्या असतात. युरोपमध्ये वैविध्य नष्ट होणे, काही जीवप्राणी कायमचे पुसून टाकले जाणे याला महत्त्वाचे मानले जाते. मात्र जेव्हा जमिनीवर संघटना केली जाते तेव्हा त्यासाठी एक वेगळीच शक्ती उभी राहते आणि करावी लागते. ही मंडळी शेतकरी संपाचे उदाहरण देत आहेत. स्थानिक नेते या संपामागे आहेत हे खूप महत्त्वाचे आहे. हा महत्त्वाचा पर्यावरणीय बदलाला विरोध करणारा प्रकल्प आहे. 

ही तरुण पिढी किती काळपर्यंत आपला उत्साह टिकवून ठेवते ते पाहावे लागेल हे नक्कीच. त्यांना लगेच डोक्यावर घ्यायचे कारण नाही. मला स्वत:ला मात्र हे महत्त्वपूर्ण वाटत आहे. मीही तरुणपणी किंबहुना तरुणपण संपता संपता, 30 च्या सुमारास, मुले काहीशी मोठी झाल्यावर अशाच काही वर्षे तगून राहिलेल्या संघटनेबरोबर समाजपरिवर्तनाचे काम केलेले आहे. आमचा गट फुटला. पण जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली ती आयुष्यभर पुरेशी ठरली. आयुष्याला दिशा मिळण्यासाठी खूप उपयोग झाला. जमिनीवर काम करणारे पुष्कळ पत्रकार अशा प्रकारच्या सोशल मीडियाच्या मार्गाने प्रसिद्ध होणाऱ्या स्थानिक प्रश्नांची नोंद घेऊन त्यांचा शोध घेण्यासाठी जाऊ शकतील. अशा प्रकारचे माहिती तंत्रज्ञान त्यांच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणारे आहे हे नक्की. 

Tags: इंटरनेट दिशा रवी फ्रायडे फॉर फ्युचर पर्यावरणीय बदल पर्यावरण ग्रेटा थुनबर्ग greata weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

छाया दातार,  मुंबई
chhaya.datar1944@gmail.com

मागील अर्धशतक स्त्रीमुक्ती चळवळीतील महत्त्वाच्या कार्यकर्त्या व लेखिका असलेल्या छाया दातार, विचारवेध संमेलनाच्या अध्यक्ष राहिल्या आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके