डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

निर्भयता आणि सत्याची चाड ही तत्त्वे मला येशूने दिली!

महाराष्ट्रीय ख्रिस्ती समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट घडली. ज्याची कुणीही दखल घेतली नाही.  माझी चर्चच्या धर्मगुरू/प्रिस्ट पदासाठी दीक्षा झाली, अशी विविध नैपुण्य असणारी मी महाराष्ट्रातली पहिली आणि एकमेव महिला धर्मगुरू होते. मी ज्या ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया पंथा’ची सभासद आहे, तिथलीही पहिली महिला धर्मगुरू होते. त्यामुळं दिल्लीतल्या काही बिशपनी मला पहिली महिला बिशप करण्याचा निर्णय घेतला होता. तो माझा, माझ्या शिक्षणाचा सन्मान होता. मात्र चर्च आणि धर्मव्यवस्थेचं कार्य असतानाही तिथंही भ्रष्टाचार, वाममार्ग अंगीकारलेले लोक होते. हे सगळं धर्मासाठी नसून सत्तेसाठी आहे असं स्पष्ट जाणवायचं. मी त्याला निक्षून विरोध करायचे. 

मी ख्रिस्ती आहे, मात्र येशूच्या शिकवणुकीतून घडलेली. मी अंधश्रद्धांना आणि भोंदूगिरीला थारा देत नाही. आणि म्हणूनच येशूच्या शिकवणुकीपासून भरकटलेल्या चर्चच्या शिकवणीला मी धर्म मानत नाही. माझा हा विचार काही एका रात्रीत घडला नाही. माझ्या कुटुंबात येशूने सांगितलेलं आचरण प्रत्यक्षात दिसत होतं. मात्र समाजबांधवांच्या आचरणात किंवा चर्चेसमधल्या शिकवणीनं गोंधळ वाढायचा. कुणाचं वागणं खरं? कुठला धर्म खरा? धर्म भेदभाव शिकवेल का? घरी जे दिसत नाही ते बाहेर का दिसतं? असे प्रश्न पडायचे. पुढं मी स्वत: धर्माचा अभ्यास केला. धर्माबाबतचा दृष्टिकोन टप्प्याटप्प्यानं आकारत गेला; तरी त्याची सुरुवात कुटुंबापासून झाली.

माझे आईवडील दोघंही शिक्षक होते. लहानपणी आम्ही अलिबागमधील पोयनाड या गावी होतो. आमच्या गावात आम्ही एकटेच प्रोटेस्टंट ख्रिस्ती होतो. आमच्या गावात चर्च नव्हते. सुट्टीत पुण्यात आजी-आजोबांकडे आल्यावर मात्र आम्ही दर रविवारी चर्चला जात असू. संस्कारक्षम वयात आम्ही धार्मिक नीतिनियमांपासून, संस्कारांपासून दूर तर जाणार नाही ना- या भीतीनंही खास एवढ्यासाठी पुणे-अलिबाग असा प्रवास होई. त्यात कट्टरता नव्हती. पण आम्हां दोघी बहिणींना योग्य वयात धर्मशिक्षण मिळावं अशी त्यांची भावना होती. तसं पाहता घरातलं वातावरण खुलं होतं. कुटुंबात शिक्षणाचा प्रभाव पूर्वीपासून राहिल्यानं शिक्षणाची संधी सहज मिळाली. आम्ही मुलीच आहोत याचा बाऊ घरात व्हायचा नाही. वडलांना काही वेळा खंत वाटायची, पण ती अर्थातच त्यांच्या कुटुंबीयांच्या दबावामुळे. आई मात्र खूप खंबीर, डॅशिंग होती. काही वेळा आमच्या वडलांकडून सहकार्य मिळालं नाही तरी तिनं आम्हांला कायमच मुक्त वातावरण दिलं.

म्हणजे आमच्या घरातच आजी-आजोबांपासूनच्या काळातली समानता आम्ही अनुभवत होतो. शेजारधर्माबाबतही आईचा खूप कटाक्ष असायचा. पूर्वी चाळ पद्धत होती. त्यामुळे आसपास पाटील, गुप्ते, ब्रह्मे तसेच काही जैन-मारवाडी-मुस्लीम कुटुंबंही होती. त्यांच्या घरी संध्याकाळच्या शुभंकरोतीला जाणं असेल किंवा सणासुदीला पदार्थांची देवाणघेवाण, आम्ही आवडीनं सहभागी व्हायचो. ख्रिसमसच्या वेळी शेजारपाजरच्या ताया-काकवा करंज्या करायला यायच्या. अंड्याचा केक न खाणाऱ्यांसाठी आई आठवणीनं अंडाविरहित केक करायची. ईदच्या दिवशी गळाभेट घेऊनच शुभेच्छा दिल्या जायच्या. आजही गणपतीचे दिवस आले की मला उकडीचे मोदक आठवतात. थोडक्यात, येशूनं शिकवलेला ‘शेजाऱ्यांवर प्रेम करा’ आणि ‘एकात्मतेचा भाव’ आम्ही घरात प्रॅक्टिकली बघत होतो.

उलट नातेवाईक मंडळी किंवा चर्चमध्ये बऱ्याचदा देवाचा प्रसाद खाऊ नये, अन्य देवस्थानांमध्ये जाऊ नये, गेलोत तर ‘तुम्ही धर्मच धाब्यावर बसवला’ असं म्हटलं जायचं. आमच्या ख्रिश्चॅनिटीवरच प्रश्नही उपस्थित केले जायचे. घरात तर असा भेद नव्हता. येशू म्हणतो, ‘‘तुमच्या मनातला विश्वासच महत्त्वाचा. विश्वासच तुम्हांला तारतो वा मारतो.’’ मग माझ्या शेजारी बांधवानं माझ्यासाठी काहीतरी गोड पदार्थ आणि तोही खाण्यायोग्य असा दिलाय असा विश्वास वाटत असेल तर तो का नाकारायचा? प्रसाद म्हणजे शेवटी अन्नच ना? आम्ही प्रसाद नेहमीच आदरानं स्वीकारला आणि खाल्ला; पण यातून धर्म कसा बुडतो विचारलं तर लोकांना सांगता यायचं नाही. ‘‘तुम्ही पटवून द्या. पटलं तर मान्य करीन,’’ असं सांगूनही लोक उत्तर देत नसत. पण माझ्याही मनात गोंधळ व्हायचा. आपल्या अशा वागण्यानं आपण ख्रिश्चन नसू तर मग पुढचे विधिसंस्कार का होत आहेत? आधीचे संस्कार पुसून गेलेत का? भीतीत राहणं हा धर्म आहे का? याची समाधानकारक उत्तरं मिळायची नाहीत आणि मग कोंडमारा व्हायचा.

आई अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सभासदही होती. तिचा आणि अंनिसचा संबंध कसा आला ते काही मला ठाऊक नाही. मात्र ती स्वत: त्या अनुषंगानं धर्मचिकित्सा करायची. तिलाही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळायची नाहीत. त्यामुळं तिचा स्वत:शी काही वेळा झगडा होतोय, हे जाणवायचं. ती अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बैठकांना, कार्यक्रमांना जाऊन आली की घरी त्याबाबत सांगायची. एकदा लोणावळा येथे झालेल्या अंनिसच्या बैठकीला ती आम्हाला घेऊन गेली होती. मी तेव्हा आठवी-नववीत असेल. डॉ. नरेंद्र दाभोलकरांना तिथं पहिल्यांदा भेटल्याचं आठवतंय. तेव्हा डॉ. दाभोलकर कोण आणि ते काय करतात हे काही ठाऊक नव्हतं. पण त्यांनी जवळ घेऊन प्रेमानं विचारणा केली होती. बैठकीतल्या इतरही लोकांनी सामावून घेतलं होतं. शेजारीपाजारी वगळता, ख्रिस्तेतर समाजाकडून झालेलं असं उबदार स्वागत, मी पहिल्यांदाच अनुभवत होते. चिकित्सक वृत्ती, धर्माची कालसुंसगता पाहणं हे मला आईकडूनच लाभलेले गुण. तेव्हा अर्थातच काही कळायचं नाही; पण तिच्यातला धर्मचिकित्सेचा भाग माझ्यातही नंतर आला.

आमच्या समाजात, एखादं बाळ ख्रिस्ती कुटुंबात जन्मलं की ते जन्मत: ख्रिस्ती होत नाही. ख्रिस्ती समाजात बाळ जन्मल्यानंतर सहा महिन्यांत किंवा पहिल्या वाढदिवशी बाळाला चर्चमध्ये नेऊन ‘बाप्तिस्मा’ किंवा ‘समर्पण’ या नावानं विधी केला जातो. याचा अर्थ जणू कुटुंबीय चर्चकडे बाळाची नोंद करत आहेत आणि त्याचा सांभाळ ख्रिस्ती रिवाजाप्रमाणं होणार आहे, अशी सूचना देत आहेत. बाळानं मोठं होऊन ख्रिस्ती धर्म स्वीकारायचा की नाही याचा निर्णय तो स्वत: पंधरा ते अठरा वर्षांच्या काळात ठरतो. यासाठी ‘दृढीकरण’ या नावानं विधी होतो. वेगवेगळ्या चर्चमध्ये त्याला वेगवेगळी नावं आहेत. मूल स्वेच्छेनं, आनंदानं धर्माचा स्वीकार करते; असा त्याचा अर्थ. यासाठी आम्हांला चर्चच्या संडे स्कूलमध्ये धर्मशिक्षणही दिलं जातं. बायबलचं वाचन, अभ्यास करून परीक्षा दिली जाते आणि त्यात पास झाल्यानंतर तुम्हांला चर्चचं सभासदत्व मिळतं. त्या वेळेसच हा ‘दृढीकरणा’चा विधी होतो.

बऱ्याच वेळा हा विधी रीती-भातीने युक्त असा पूर्ण होतो. सहसा, मुलांना विचार करण्याची मुभा दिली जात नाही. आमच्या सुदैवाने तिथल्या शिक्षकांनी शंका, प्रश्न विचारण्याची पूर्ण मुभा दिली होती. मी तेव्हा दहावी- अकरावीत होते. स्त्री-पुरुष समानता ही जर बायबलमध्ये आहे, तर चर्चमध्ये किंवा प्रत्यक्ष समाजात का दिसत नाही. उलट महिलांबाबत तर हीन भाषेत बोललं जातं. मासिक पाळीच्या काळात बायबलला स्पर्श करायचा नाही, काही विधी करायचे नाहीत, चर्चला जायचं नाही असं धर्मगुरू का सांगतात? अर्थात आमच्या घरी आजीनं, आईनं कुठलाच भेद केला नाही.  यातून गोंधळ वाढायचा. प्रश्न पडायचे. पण शिक्षकांकडेही उत्तरं नसायची. आपणच याची उत्तरं शोधली पाहिजेत असं वाटू लागलं.

पुढं बी.एस्सी. झाले. दरम्यान चर्चमध्ये धर्मशिक्षण देण्यासाठी लोक कमी आहेत, तर तरुण-तरुणींनी पुढं यावं असं आवाहन बिशप करताना पाहत होते. अर्थात आधी ते फक्त तरुणांना करत होते. पण कालांतराने त्यांनी तरुणींनाही त्यात समाविष्ट केलं. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मी धर्मशिक्षण घेण्यास तयार झाले. मात्र तेव्हाच्या बिशप्सना मी उत्तर भारतात शिक्षणासाठी जावं असं वाटत होतं, तर मी दक्षिणेकडे आताच्या बंगळूरू इथं थिऑलॉजी कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जाण्याचा विचार करत होते. तिथं प्रवेश परीक्षेतून देशातील केवळ 14 विद्यार्थ्यांची निवड व्हायची. मात्र तिथं प्रवेश घेणार म्हणून चर्च आणि बिशप्सनी माझा खर्च नाकारला. चर्चची मर्जी राखणं, मिंधेपण मिरवणं या गोष्टींचा मला प्रचंड राग आला. धर्माची अशी शिकवण आहे का असाही प्रश्ना पडला. सुदैवानं मला त्या कॉलेजच्या शिष्यवृत्त्यांची मदत मिळाली. तिथं भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत धर्मशिक्षण शिकवलं जातं. साडेचार वर्षांचा अभ्यास पूर्ण करून मी ‘बॅचलर्स इन डिव्हिनिटी’ ही पदवी मिळवली. या शिक्षणकाळात मी डेन्मार्कलाही जाऊन आले. परतल्यानंतर एका सेमिनरीत धर्मगुरूंचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षिका झाले. हे सर्व कार्य सेवाभावी असल्यानं पगार अत्यल्प होता. मात्र याची आधीच जाणीव असल्यानं खंत नव्हती.

दरम्यान महाराष्ट्रीय ख्रिस्ती समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट घडली. ज्याची कुणीही दखल घेतली नाही.  माझी चर्चच्या धर्मगुरू/प्रिस्ट पदासाठी दीक्षा झाली, अशी विविध नैपुण्य असणारी मी महाराष्ट्रातली पहिली आणि एकमेव महिला धर्मगुरू होते. मी ज्या ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया पंथा’ची सभासद आहे, तिथलीही पहिली महिला धर्मगुरू होते. त्यामुळं दिल्लीतल्या काही बिशपनी मला पहिली महिला बिशप करण्याचा निर्णय घेतला होता. तो माझा, माझ्या शिक्षणाचा सन्मान होता. मात्र चर्च आणि धर्मव्यवस्थेचं कार्य असतानाही तिथंही भ्रष्टाचार, वाममार्ग अंगीकारलेले लोक होते. हे सगळं धर्मासाठी नसून सत्तेसाठी आहे असं स्पष्ट जाणवायचं. मी त्याला निक्षून विरोध करायचे. आवाज उठवायचे. यामुळं लोकांसाठी मी नकोशी झाले होते. हे अर्थातच आज जाणवतं.

पुढे लग्न झालं. पतीदेखील मिशनरी स्वरूपाच्या कामात असल्याने पगार कमी होता. पहिल्या मुलाच्या गर्भारकाळत आरोग्याच्या कारणानं डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितला. मी कार्यरत असलेल्या संस्थेत रजेचा अर्ज केला. मात्र तेव्हा राजीनामा देण्याची जबरदस्ती झाली. आरोग्य महत्त्वाचं म्हणून मी पदाचा राजीनामा दिला; तर मी धर्मपदाचा, धर्माचा राजीनामा दिल्याचा बोभाटा झाला. पहिली महिला धर्मगुरू होऊन आज वीस वर्षे झाली. अन्यथा मी माझ्या सत्य, न्यायाच्या बाजूनं चांगले धर्मगुरू घडवले असते. पण ते सत्तेसाठी म्हणून योग्य ठरले नसते (म्हणून मलाच बाजूला काढण्यात आलं.) मला विनाकारण बहिष्कृत मानण्यात आलं. जिवे मारण्याचे प्रसंग घडले. अनेक संकटं आली. तरीही माझा परमेश्वरावरचा विश्वास कायम राहिला. येशूच्या शिकवणुकीचा आधार राहिला. संकटसमयीदेखील कुठल्या ना कुठल्या मार्गे त्यानंच बचावही केला. पायाखालची जमीन आणि डोक्यावरचं आभाळ शाबित राहिलं. याच कारणाने कुठली तरी शक्ती तारते याकडे मी दुर्लक्ष कशी करणार. मी तारले गेले त्याला आणखी एक कारण, माझ्यावर आजी वासंती आणि आजोबा रत्नाकर वामन निंमगावकर, आई विद्युल्लता आणि पती आशिष या कुटुंबातल्या व्यक्तींचा प्रचंड आधार आणि प्रभाव राहिला. त्यांच्या जगण्या-वागण्यातली सत्यता, निर्भिडपणा मला प्रभावित करत होती. आजोबा तर इंडियन आर्मीमध्ये होते. त्यांच्याइतकीच लढवय्यी वृत्ती आईकडं होती. पुढं बायबलमधून थेट येशूची भेट झाली. बंगळूरूमधील शिक्षकांनी धर्माला समजून घेण्यात खूप चांगली मदत केली. रेव्हरंड डॉ.जॉन ऑर्टबर्ग, सोरेन किर्कगार्ड, मार्टीन ल्युथर, पंडिता रमाबाई, इंदिरा गांधी, ओ. हेन्री, रोजमेरी रूथर या साहित्यिकांच्या लेखनातही पुन्हा कुठल्या ना कुठल्या तुकड्यांतून येशूचं चिंतन दिसत होतं. आणि आपला मार्ग योग्य आहे याची पुन्हा खात्री व्हायची.

मला येशू ख्रिस्ताच्या धर्मानं काय दिलं? तर समानता, व्यापक दृष्टिकोन, वैश्विक बंधुत्व, आत्मसन्मान, परमेश्वराची कन्या म्हणून जगण्याचा अधिकार दिला. ख्रिस्ताची शिकवण काय- तर ‘देवावर प्रेम करा. शेजाऱ्यांवर प्रेम करा.’ शेजारी कोण? तर जो गरजवंत, या अनुषंगानं आम्ही धर्म जगतो. येशूवर प्रेम आहे आणि तो तर जगावरच प्रेम करतो. येशूची शिकवण मुक्ततेची, उदारमतवादी आहे. तो धर्माधर्मांतल्या भेदाबद्दल बोलत नाही. जातीयवादाबाबत बोलत नाही. पण हे सर्व तुम्हांला प्रत्यक्षात दिसतं.

बऱ्याच चर्चेसमध्ये कूपमंडूक वृत्ती बघायला मिळते. 2013 मध्ये मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीत सहभागी झाल्यानंतर चर्चमधल्या जातीयवादाची माहिती झाली. ख्रिस्ती धर्मातही जातवास्तव असेल याची कुटुंबातून कधीही जाणीव झाली नव्हती. त्यामुळे हा मोठा धक्का होता. आमच्याकडे घरात कुणालाही प्रवेश होता. सोबतची मदतनीस चहाच्या वेळात आली तर तिलाही चहा दिला जातो. त्यात अस्पृश्यता काहीच नाही. हा जर मुद्दा आरोग्याचा असेल तर मग धर्मबांधवांबाबतही तेच नियम. जसे आता कोविडकाळात धर्मगुरू आले तरी सॅनिटाइज होण्याचा नियम त्यांनाही आहेच. मग चर्चमध्ये जातीयता कशी काय? समानतेची शिकवण बायबलमध्ये असताना ह्या मंडळींना धर्म कळलाय का, असा प्रश्न पडतो. माझ्या शिक्षण आणि नोकरीत आडकाठी करणारेे धर्मपुढारीच होते. तेव्हा त्यांच्या धार्मिक कल्पना, त्यांचं आचरण पाहून जर कुणी धर्म फॉलो करेल तर त्यांच्याविषयी प्रचंड कणव निर्माण होते.

त्यामुळेच मी म्हणते की, मला उमेदीनं जगण्याची, प्रेम करण्याची शिकवण येशूच्या धर्मानं दिली. ह्याच मूल्यांचं पालन चर्चने करणं अपेक्षित आहे. मात्र ते बहुतांश चर्चमधून होत नसेल, प्रॅक्टिकली मूल्य अंगिकारण्यात फेल होत असतील, स्त्रीविरोधी भूमिका घेत असतील, सत्यविरोधी वागत असतील, कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असतील तर त्यांना धर्माबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार कुठं राहतो, ते बोलतातच कसे? उलट तिथं तर सगळा अंधारच आहे असं म्हणायला हवं. आणि जर चर्च ही अशी जागा, की जिथं भयमुक्त वातावरण आहे, तेच जर भीतियुक्त जगणं मान्य करत असेल तर अशा तऱ्हेचा धर्म मी तरी मानू शकत नाही. मानतही नाही. म्हणून मी विरोधाची पात्र ठरते. पण, पण ही निर्भयता आणि सत्याची चाड राखणं हे तत्त्व मला माझ्या येशूनेच दिलेलं आहे... त्यापासून मी परावृत्त तरी कशी होणार?

(शब्दांकन : हिनाकौसर खान-पिंजार)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके