आंत्रप्रेन्युअरशिप मात्र नेहमी बदलत राहते. तुम्ही बेसिकली त्या त्या काळातील समस्या सोडवत असता. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी, बहुतेक उद्योग हे विज्ञानावर आधारित होते. जसं की, बल्बचा शोध लावणे. आता फायनान्सियलायझेशन हा एक मोठा ट्रेंड आहे. ही बाब योग्य का अयोग्य हा वेगळा मुद्दा. पण सगळ्या गोष्टी पैशाची संबंधित होणे हा आताच ट्रेंड आहे खरा ! त्या-त्या काळातल्या समस्या वेगवेगळ्या असतात. एक उद्योजक त्या समस्या शोधतो आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. समजा, मी पन्नास वर्षांपूर्वी जन्माला आलो असतो, म्हणजे 1991 च्या खुल्या अर्थव्यवस्थेच्या धोरणापूर्वी, तर बॉन्ड वगैरेचा बिझनेस अस्तित्वात आलाच नसता. त्यावेळी मी दुसरं काहीतरी केलं असतं. शंभर वर्षांपूर्वी जन्माला आलो असतो, तर स्वातंत्र्यसैनिक व्हायला आवडलं असतं, कारण ती तेव्हाची एक मोठी समस्या होती. त्यामुळे आजपासून पन्नास वर्षांनंतरचे प्रश्न वेगळे असतील आणि तेव्हाचे आंत्रप्रेन्युअर्स ते सोडवण्यावर लक्ष केंद्रित करतील.
मूळचा नाशिकचा असणारा अजिंक्य कुलकर्णी सध्या बंगलोर येथे 'विन्ट वेल्थ' हा 'फिनटेक' क्षेत्रातील स्टार्टअप चालवतो. आजवर फक्त मोठमोठ्या संस्थांना उपलब्ध असणाऱ्या 'बॉण्ड मार्केट'मध्ये गुंतवणूक करायची संधी सामान्य नागरिकांना उपलब्ध व्हावी यासाठी त्यांची कंपनी काम करते. अवघ्या पाच वर्षांत विन्ट वेल्थ या संस्थेने या क्षेत्रात स्वतःचे वेगळे नाव केले असून, भारताच्या आर्थिक वर्तुळातील बहुतांश मोठ्या व विश्वासार्ह संस्था आणि व्यक्तींनी या कंपनीला पाठबळ दिलेले आहे. आजमितीला त्या कंपनीचे बाजारमूल्य 700 कोटी रुपयांहून अधिक आहे.
सामान्य माणसाला किचकट वाटणाऱ्या आर्थिक जगतात अजिंक्यचा प्रवास कसा सुरू झाला, आयआयटी मधील इंजिनिअर ते स्टार्टअपचा संस्थापक या प्रवासात तो काय काय शिकला, यावर या मुलाखतीत दृष्टिक्षेप टाकला आहे.
सध्या आजूबाजूला उद्योजकतेला पूरक वातावरण असताना उद्योजक असणे व स्टार्ट अप चालवणे यातला मूळ वैचारिक फरक काय आहे, अपयशाला कसे सामोरे जायचे, कमी वयात खूप पैसे हातात आल्यावर त्याचा सम्यक वापर कसा करावा, मुळात उद्योजक होण्यासाठी आपल्यामध्ये काय गुण असले पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत, हे सर्व समजून घेण्यासाठी अजिंक्यशी झालेली चर्चा फक्त उद्योग करण्याची इच्छा असणाऱ्या नव्हे तर प्रत्येकच तरुणासाठी महत्त्वाची आहे.
प्रश्नः 'विंट वेल्थ' चालू करण्यापर्यंतचा प्रवास कसा होता आणि त्यातले महत्त्वाचे टप्पे काय आहेत? म्हणजे इंजिनिअरिंग ते फिनटेक कंपनी हा प्रवास कसा होता ?
- याचा फार मोठा प्रवास असा नाहीये. हे सगळं नैसर्गिकरीत्या घडलं. काही घटना अशा घडल्या, ज्यांची या प्रवासात बरीच मदत झाली. काही घटना बरंच काही शिकवून गेल्या. त्याची परिणती शेवटी 'विंट वेल्थ' सुरू करण्यात झाली.
नाशिकला माझ्या वडिलांचा ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगचा छोटा व्यवसाय आहे. ते महिंद्रासाठी स्पेअर पार्ट्स बनवतात. तो व्यवसाय पुढे चालवायचा, म्हणून मी मेकॅनिकल इंजिनियरिंग केलं. आयआयटी जेइइ मध्ये मला चांगला रँक आला, तेव्हाही मी फक्त आयआयटी मधील मेकॅनिकल इंजिनियरिंग या शाखेचाच पर्याय भरला होता. पण कॉलेजमध्ये गेल्यावर सुरुवातीला मी कल्चरल सेक्रेटरी झालो, नंतर जनरल सेक्रेटरी. त्यावेळी ठरवलं की राजकारणामध्ये जायचं. मग विचार केला की, जेएनयूला जाऊन 'एम. ए. पॉलिटिकल सायन्स' करू. जेएनयूमध्ये दोन दिवस फिरूनही आलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, हे आपल्याला जमणार नाही. मग मी पब्लिक पॉलिसीच्या क्षेत्रात किंवा एखाद्या एनजीओमध्ये काम करायचा विचार केला.
कॉलेज झाल्यावर मी गुजरात राज्य सरकारसोबत 'व्हायब्रेट गुजरात' साठी चार-पाच महिने काम केलं. त्यानंतर डॉ. अभय बंग यांच्या 'सर्च' नावाच्या एनजीओमध्ये काही काळ काम केलं. पण तीन-चार महिन्यांत माझ्या लक्षात आलं की, मला धंदाच चांगला जमतो आणि बहुधा मी तेच करायला पाहिजे.
दरम्यान, मी वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालत होतो. पण मला त्यात फार मजा येत नव्हती. कारण मॅन्युफॅक्चरिंग हा एक तुलनेने छोटा व्यवसाय आहे आणि त्याची अशी बेसिक शिस्त असते. बँक पाच-सात वर्षांसाठी कर्ज देते. ते घ्यायचं, व्यवसाय चालवायचा आणि कर्जाचे हफ्ते फेडत राहायचं. तोपर्यंत दुसरं काही करायचं नाही. आणि असंही नाही की फक्त एकच कर्ज असतं, दरवर्षी नवीन कर्ज घ्यावं लागतं. असं त्या व्यवसायाचं ठरलेलं गणित असतं. मला त्यात फार मजा येत नव्हती. म्हणून 2015 च्या सुरुवातीला मी स्वतःचा स्टार्टअप चालू करायचं ठरवलं.
मी वडिलांसारख्याच व्यावसायिकांना कच्चा माल विकण्यासाठी एक प्लॅटफॉर्म सुरू केला. तो विकताना लक्षात आलं की, त्यांचा मुख्य प्रश्न मटेरियल मिळत नाही, हा नाही. तर त्यांना त्या मालाचे पैसे देताना क्रेडिट पिरीयड पाहिजे असतो. म्हणजे आज माल दिल्यावर हे मॅन्युफॅक्चरर्स त्यांच्या वर्किंग कॅपिटलचा विचार करून सप्लायर्सला 90 दिवसांनी पैसे देतात. तेव्हा लक्षात आलं की, जर हा क्रेडिट पिरीयड थर्ड पार्टीने दिला, तर त्यांची परिस्थिती सुधारेल. त्यामुळे 'इनव्हॉइस बिल डिस्काउंटिंग' च्या क्षेत्रात आलो. म्हणजे मॅन्युफॅक्चरर्सला रॉ मटेरियल द्यायचे आणि त्यांच्या सप्लायरला त्याच दिवशी पैसे द्यायचो. क्रेडिट पिरीयडनंतर मॅन्युफॅक्चरर्सकडून ते पैसे परत घ्यायचो. मग आम्ही टॅली या सॉफ्टवेअरचा रॉ डेटा घेऊन त्यावर अंडररायटिंगचं एक मॉडेल तयार केलं. त्या वेळी आमच्या लगेच लक्षात आलं की, आमच्या को-फाउंडिंग टीममध्ये कुणालाच फायनान्सचा काहीच अंदाज नव्हता. आम्ही कधीच लेंडिंग (कर्ज देणे) केलेलं नव्हतं. मग आम्ही ठरवलं की, एकतर आपण हे सॉफ्टवेअर कोणाला तरी विकू किंवा पूर्णपणे बंद करू किंवा काहीतरी दुसरं करू. म्हणजे 'धिस इज नॉट आवर कप ऑफ टी' असं वाटलं. 2017 च्या सुरुवातीला आमचा तो व्यवसाय एका कंपनीने विकत घेतला मग मी विचार केला की, आपण एक-दोन वर्ष जॉब करू. म्हणून मी दोन फिनटेक स्टार्टअप्समध्ये 2017 ते 2019 या काळात जॉब केला. आणि मग 2019 च्या शेवटी 'विंट वेल्थ' सुरू केलं. त्या जॉबची तीन वर्ष म्हणजे माझ्यासाठी एक 'पिट स्टॉप' होता. एक गोष्ट माझ्या मनात स्पष्ट होती, स्टार्टअप नाही चालला तर मी वडिलांच्या धंद्यात लक्ष घालेन.
या सगळ्या काळात माझ्या असं लक्षात आलं की, आता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जमतंय. स्टार्टअपचं यश कशावर अवलंबून असतं तर तुम्ही कोणता प्रश्न सोडवण्यासाठी निवडता यावर. एकदा एखादा प्रॉब्लेम डोक्यात आल्यावर वाटू लागतं की, याचं सोल्युशन जग बदलेल. मग तुम्ही भावनिक दृष्टीने जोडले जाता. त्या वेळी मी विचार केला की, आपण पहिल्यांदा आपल्याला भेडसावणारे 100 प्रश्न लिहून काढू. जोपर्यंत ते लिहून होत नाहीत, तोपर्यंत सोल्युशनबद्दल विचार करण्याची गरज नाही. पहिले 15 प्रश्न तर लगेच सुचले, पण नंतर ते सुचायला अवघड जायला लागलं. मग मी माझ्या सगळ्या मित्रांना (ज्यांना स्टार्टअपमध्ये रस होता) सांगितलं की, तुम्हीही यात तुम्हाला सुचणाऱ्या प्रश्नांची भर टाकू शकता. आणि कुणाला यातला एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर इथून कॉपी करू शकतो. असं काही नाही की, हे मी सुरू केलंय म्हणून ते फक्त माझंच झालं. जर तो प्रॉब्लेम हजार लोकांना आहे, तर तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता. 100 प्रश्न लिहिल्यावर आम्ही काही निकष लावले आणि त्यातून टॉप 5, टॉप 10 प्रश्न निवडले. त्यातूनच 'विंट वेल्थ'ची सुरुवात झाली. त्याची सुरुवात खूप इंटरेस्टिंग होती.
मी नोकरी करत असताना जे पैसे साठवले होते, ते मी माझ्या वडिलांना दिले. त्यांची बँक 12 टक्के व्याज घेत होती आणि माझे वडील मला 11 टक्के देत होते. माझ्यासाठी ती एक चांगली डील होती की, माझे पैसे घरच्या घरी सुरक्षित आहेत. माझ्या एक-दोन मित्रांनाही हे खूप आवडलं आणि त्यांनीही मला 20-25 हजार रुपये यासाठी दिले होते. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की, आपल्या देशात लोकांना फिक्स डिपॉझिटपेक्षा दोन-तीन टक्के जास्त परतावा देणारं काहीतरी हवं असतं. पूर्वी पतसंस्था, सहकारी बँका, भिशी गट या पद्धतीने काम करायचे, पण हे सगळं गेल्या 20 वर्षांत मोडकळीस आलंय. जास्त परतावा देणाऱ्या बँका बुडाल्या. ज्या वाचल्या, त्या जास्त परतावा देत नाहीत, एखादाच टक्का जास्त देतात.
हाच मूळ प्रॉब्लेम होता. फिक्स्ड इन्कम इन्व्हेस्टमेंट मधून जवळपास 10 टक्के मिळतील असं काही करता येईल का? याचं उत्तर होतं, 'डबल डेट फिक्स्ड इन्कम प्रॉडक्ट'. मग आम्ही ठरवलं की, अनेक एनबीएफसी (बँकेव्यतिरिक्त काम करणाऱ्या इतर अर्थविषयक कंपन्या) आणि कॉर्पोरेट इश्यूअर्स आहेत, ज्यांना कर्जाच्या स्वरूपात पैसे हवे आहेत. त्यांच्यासाठी आपण एक प्लॅटफॉर्म बनू. यात एका बाजूला रिटेल इन्व्हेस्टर आहेत, जे या बॉन्ड्समध्ये पैसे गुंतवतात आणि दुसऱ्या बाजूला इश्यूअर्स म्हणजे अशा कंपन्या, ज्यांना बँक पैसे देऊ शकत नाहीत किंवा खूप जास्त व्याज आकारतात. आम्ही त्यांना बॉन्ड्स इश्यू करायला मदत करतो. हे बॉन्ड्स एक्सचेंजवर लिस्ट होतात आणि मग रिटेल इन्व्हेस्टर त्यात सबस्क्राईब करतात. हाच 'विंट वेल्थ'चा मुख्य व्यवसाय आहे.
प्रश्न : पण हा जो फायनान्सचा, विशेषतः फिक्स्ड इन्कम नॉन-बँकिंग प्रॉडक्ट्सचा व्यवसाय आहे, याबद्दल लोकांच्या मनात खूप शंका आहेत. कारण कुणाचे पतसंस्थेत पैसे बुडाले आहेत तर कुणाचे चिट फंडमध्ये. अशा वेळी हा व्यवसाय करताना तुम्हाला काय-काय ट्रस्ट इश्यूज आणि कमप्लायन्स रिस्क आल्या आणि तुम्ही त्या कशा दूर केल्या?
- विश्वासाचा प्रश्न हळूहळूच सुटत जातो. कमप्लायन्सच्या बाबतीत मात्र थोडे आव्हान होते. आम्ही सुरू केलं, तेव्हा याबद्दल काही रेग्युलेशनच नव्हतं. 2022 च्या दुसऱ्या सहामाहीत सेबीने यावर 'ऑनलाईन बॉन्ड प्लॅटफॉर्म' नावाचं एक रेग्युलेशन आणलं. त्यामुळे दोन वर्ष काहीच झालं नाही, कारण ते रेग्युलेशन आलं आणि त्यानुसार टेक प्लॅटफॉर्म तयार झाला. मग डिसेंबर 2024 मध्ये सगळं क्लिअर झालं. आम्ही थोडे लकी होतो, कारण आम्ही आमच्या स्टार्टअपसाठी गुंतवणूक मिळवलेली होती. त्यामुळे आमच्या बँकेत पैसे होते आणि म्हणून आम्ही टिकू शकलो. पण आता बॉण्ड मध्ये ऑनलाईन पैसे गुंतवणे हे सेबीच्या चौकटीत बसून पूर्णपणे स्ट्रीमलाईन झालेले आहे. विश्वास मात्र हळूहळू निर्माण होत जातो.
प्रश्नः समाजाचा विश्वास संपादन करण्याच्या कोणत्या पद्धती तुम्ही वापरल्या?
- विश्वास कधीच रॅशनल नसतो. एक ग्राफ थेअरी किंवा नोडल थेअरी नावाची संकल्पना आहे. त्यानुसार, जर माझा 'अ'वर विश्वास असेल आणि त्याने मला 'ब'वर विश्वास ठेवायला सांगितला, तर माझा विश्वास बसेल. पण असा कोणीतरी रँडम माणूस, भले त्याची काही क्रेडिबिलिटी असेल, तरीही त्याच्यावर सहजासहजी विश्वास बसत नाही. त्यामुळे आम्हाला हे माहीत होतं की, आपल्याला हजार ग्राहक मिळवायचे आहेत. मग आम्ही विचार केला, हे कसं करायचं? तर सुरुवातीला मी लिंक्डइनवर लिहायला सुरुवात केली. मी एक इंफ्फुएन्सर बनलो आणि 2020 मध्ये मला लिंक्डइनचा टॉप इंफ्फुएन्सर म्हणून गौरवण्यात आलं. तिथून काही लोक आमच्याकडे आले. त्यानंतर आणखी लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी आम्ही वेगळा प्रयत्न केला. आमच्या सुरुवातीच्या वेबसाईटच्या होमस्क्रीनवर एक झूमचं बटन होतं. या झूम कॉलवर आमच्या चार संस्थापकांपैकी कोणीतरी असायचं, थेट वन ऑन वन. माझा सहसंस्थापक सुरुवातीच्या जवळपास पाच हजार लोकांसोबत स्वतः थेट बोलला आहे. त्यातून आम्हाला हजार गुंतवणूकदार मिळाले. त्यानंतर आम्ही फिन्फुएन्सर्ससोबत काम करायला सुरुवात केली. तिथूनही काही नवे गुंतवणूकदार आले. मग रेफरल प्रोग्राम सुरू केला. अशा पद्धतीने व्यवसाय तयार होत जातो.
बरेचदा अनेक प्रश्न तुम्हाला ग्राहकांशी संवाद साधूनच सोडवता येतात. उदाहरणार्थ, ज्यांनी गुंतवणूक केली, त्यांनी का केली? आणि ज्यांनी नाही केलं, त्यांनी का नाही केलं? हे आम्ही स्वतःहून त्यांना विचारायचो. यामुळे आम्हाला कळत गेलं की, आपलं प्रॉडक्ट कसं सादर करायचं, काय टाळायचं आणि काय करायचं, लोकांना याबद्दल कसं शिक्षित करायचं. याला वेगळा काही फॉर्म्युला नाहीये.
कन्झ्युमर स्टार्टअपमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे, 'जर तुम्ही तुमच्या ग्राहकाला चांगल्या प्रकारे समजून घेतलं, तर तुमचा जिंकण्याचा हक्क कुणीही हिरावू शकत नाही.'
प्रश्न : हे सगळे करताना तुम्ही सातत्याने स्वतःचे मार्ग बदललेले दिसतात, राजकारण, एनजीओ, पहिला व्यवसाय, मग नोकरी आणि आता फिनटेक स्टार्टअप... हे सतत स्वतःला बदलत राहणे म्हणजेच स्टार्टअपच्या भाषेत 'पिव्होट' करणे कसे शक्य होते ?
- उद्योजक होणं म्हणजे आयुष्याची सर्वोच्च पातळी आहे, असं मला वाटत नाही. खरेतर, तुम्ही कोणता गेम खेळताय, हे तुम्हाला स्पष्ट पाहिजे. ही स्पष्टता जशी येते तसे तुम्ही बदलत जाता. यात बऱ्याच गोष्टी येतात, जसं की, तुमच्या मर्यादा काय आहेत आणि धाडस करायची क्षमता किती आहे, स्वतःबद्दल हे तुम्हाला माहीत असायला हवं. माझे काही मित्र आहेत, ज्यांना दर महिन्याला घरी पैसे पाठवावे लागतात. त्यांच्यासाठी जास्त जोखीम घेणं आणि व्यवसाय करणं अवघड आहे.
दुसरी गोष्ट, आजकाल कोणत्याही गोष्टीला स्टार्टअप म्हणण्याची खूप फॅशन आहे. तुम्ही स्टार्टअप करताय की व्यवसाय करताय, याची स्पष्टता लोकांमध्ये कमी दिसते आणि ती असणं फार गरजेचं आहे. मला एक थिअरी खूप आवडते. ती अशी की, तुमचं आयुष्य एक प्रकारचा गेम आहे आणि कोणता गेम खेळायचा हे तुम्ही निवडता. बऱ्याच लोकांचा हा निर्णय इतरांच्या प्रभावावरून किंवा जो कन्टेन्ट ते कन्झ्युम करतात, त्यातून नकळत तयार होतो. पण कुणीतरी खूप जाणीवपूर्वक हा चॉईस घेतोय, हे मला खूप कमी दिसतं. हे निर्णय सजगपणे घेत राहिले की सगळे बदल सुकर होतात.
प्रश्न : स्टार्टअप आणि व्यवसाय यातला नेमका फरक समजावून सांगा.
- स्टार्टअपचा उद्देश जग बदलण्याचा असतो. तो फक्त पैसे कमवण्यासाठी सुरू केलेला नसतो. उलट, पैसे कमावणं हा त्याचा एक बाय प्रॉडक्ट असतो. जसं, इलॉन मस्कचं स्पेसएक्स (SpaceX) आहे. त्याचं मत आहे की, मानवजातीचं वास्तव्य फक्त एकाच ग्रहावर नसावं. त्यामुळे त्याला मंगळावर जाण्यासाठी यान सोडावी लागतात. मग त्यात तो पेलोड घेऊन जातो, आणि त्यातून त्याचं बिझनेस मॉडेल तयार होतं. इथे व्यवसाय होतो, पण तो अंतिम उद्देश नाही. व्यवसायाचा मुख्य उद्देश पैसे कमावणं असतो. यात तुम्ही फक्त एखादा छोटा प्रॉब्लेम सोडवता, तुम्हाला जग वगैरे बदलायचं नसतं. उदाहरणार्थ, माझे वडील महिंद्रा कंपनीला लागणारे पार्ट्स बनवून देतात. आज माझ्याकडे जी मशीन आहे, त्यावर मी पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक अशा सगळ्या गाड्यांचे पार्ट्स बनवेन. तेव्हा माझं असं काही नसेल की, जगात पेट्रोलच्या गाड्याच नसाव्यात आणि त्यासाठी संशोधन करावं वगैरे.. हाच एक खूप मोठा फरक आहे. स्टार्टअपमध्ये तुम्ही जग बदलण्याचा विचार करत असता. पण बाय डेफिनेशन, हे होण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे त्यात तुम्हाला पैसे मिळाले तर खूप मिळतील, नाहीतर काहीच मिळणार नाही. तुमची अशी मानसिक आणि आर्थिक तयारी आहे का की, तुम्ही सात-आठ वर्षं एखाद्या कल्पनेमध्ये घालवले आणि शेवटी काहीच मिळालं नाही? बोलायला खूप सोपं आहे, पण जेव्हा तुम्हाला कुटुंब असतं, मुलं असतात, किंवा आई-वडिलांना आर्थिक सहकार्य करायचं असत, तेव्हा हे खूप अवघड होतं. तुम्हाला कळलं की स्टार्टअप खूप जोखमीचं आहे, तर एक पर्याय असा असू शकतो की, आधी साधा व्यवसाय करून एक निश्चित पैसा कमवावा आणि मग त्यानंतर स्टार्टअपसारखं काहीतरी करावं. म्हणजे जर माझी खरंच इच्छा असेल, तरच मी ते करेन, आणि तो फेल झाला तरी मला काही टेन्शन येणार नाही. स्टार्टअप हा पैसे कमावण्याचा बिझनेस नाही, पण बिझनेस हा पैसे कमावण्याचा स्टार्टअप आहे. दुर्दैवाने, ही स्पष्टता लोकांमध्ये खूप कमी असते.
प्रश्न: ही स्पष्टता आणायची कशी? कारण आजच्या 'जेनझी'मध्ये व्यावसायिक होण्याची/आंत्रप्रेन्युअरशिपची मोठी क्रेझ आहे, त्यांनी हे सगळं कसं समजून घ्यायचं?
- क्रेझ असण्यात काहीच चूक नाही! माणूस हा एक नॉर्मेटिव्ह प्राणी आहे. मी व्यावसायिक का झालो, कारण फ्लिपकार्टने ते 'कूल' बनवलं होतं. तुम्ही कशावरून तरी प्रेरणा घेताच. माणसाचा प्रत्येक निर्णय काही रॅशनल असतोच असं नाही. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ठरवता, तेव्हा ती कशी सर्वोत्तम करायची, यावर काम करणं खूप महत्त्वाचं आहे. त्या प्रक्रियेवर तुमची किती पकड आहे, तुम्ही किती शांतपणे सगळ्या गोष्टी करू शकता आहात, हे फार महत्त्वाचं आहे. यावर लोकांनी मेहनत घ्यायला पाहिजे. जे ती घेतात, त्यांचं चांगलं चालतं.
मी नुकताच माझ्या कॉलेजला गेलो होतो, तिथे एकाने आंत्रप्रेन्युअरशिप क्लब काढला होता. तो म्हणाला, 'तुम्ही लेक्चर द्या.' मी त्याला म्हणालो, 'मी लेक्चर देणार नाही. जर तू आंत्रप्रेन्युअरशिपबद्दल गंभीर आहेस, तर तो क्लब बंद कर.' व्यावसायिक होण्यासाठी काय लागतं ? कोणताही एक प्रॉब्लेम सोडवावा लागतो आणि तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी कोणीतरी तुम्हाला पैसे द्यायला पाहिजेत. नुसता कॉलेजमध्ये क्लब चालवून थोडीच हे होणार आहे!
म्हणून असा विचार करायला पाहिजे की, मला उद्योजक व्हायचं आहे म्हणजे नक्की काय व्हायचं? मी कोणाला माझा आयडॉल मानतो? त्यांची पुस्तकं वाचा, इंटरव्ह्यू बघा. त्यातून तुमचं स्वतःचं विचारमंथन चालू होतं आणि मग तो प्रवास सुरू होतो. तुमची मेहनत घेण्याची तयारी पाहिजे.
प्रश्न : तुमच्या प्रवासात तुमच्यावर कोणाचा प्रभाव आहे किंवा होता?
- मला आठवतंय की, सुरुवातीला मी वडिलांच्या व्यवसायात काम करत असताना आमच्या आयआयटी कॉलेजला गेलो होतो. तिथे माझा एक बॅचमेट स्टार्टअप करत होता आणि ते पाहून मला खूप कूल वाटलं की, 'अरे, असं काहीतरी करायला पाहिजे. खरं तर, माझ्या वडिलांच्या कंपनीतही आंत्रप्रेन्युअरशिप चालू होती, पण मला त्यात काही कूल वाटत नव्हतं, तो फक्त एक 'धंदा' आहे, असं वाटायचं. नंतर फ्लिपकार्ट आलं आणि तेही कूल वाटलं. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, आपणही काहीतरी करू शकतो आणि त्यातूनच पुढची वाटचाल सुरू झाली.
माझे असे कोणी खास आयडॉल नाहीत, पण काही आंत्रप्रेन्युअर मला खूप आवडतात. उदाहरणार्थ, 'झीरोधा'चे नितीन कामत, आमचे इन्वेस्टर आणि 'ग्रो'चे संस्थापक ललित केशरे, 'बाउन्स'चे संस्थापक विवेकानंद, नितीन गुप्ता, 'रुपीक'चे संस्थापक सुमित. अशा लोकांसाठी माझ्या मनात खूप आदर आहे. त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळतं. पण मी कोणा एकाचा 'फॅन' नाहीये. या बाबतीत, मी थोडा अधिक परिपक्व झालो आहे, असं मला वाटतं.
प्रश्न : समजा या मुलाखतीतून प्रेरणा घेऊन कुणाला स्टार्टअप सुरू करायचा असेल, तर त्या व्यक्तीने काय काय करावं?
- वाय कॉम्बिनेटर (Y Combinator) या संस्थेकडून सुरुवात करता येईल. त्यांच्याकडे खूप लिटरेचर, ब्लॉग्स आणि व्हिडिओज उपलब्ध आहेत. ते दरवर्षी 'स्टार्टअप स्कूल' नावाचा एक उपक्रम चालवतात. हा जगातील सर्वात मोठा स्टार्टअपबद्दलचा कार्यक्रम आहे, ज्याने जवळपास 120 युनिकॉर्न्स तयार केले आहेत. त्याचे संस्थापक पॉल ग्रॅहम यांनी उद्योजकतेवर खूप छान निबंध लिहिले आहेत, ते त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ते दरवर्षी 60-60 स्टार्टअप्सची एक बॅच बनवतात, त्यात ते बेसिक गोष्टी शिकवतात. उदाहरणार्थ, स्टार्टअप कसं सुरू करायचं, युजर्ससोबत कसं बोलायचं, बी-टू-बीसाठी काय करायचं. या सगळ्याचे व्हिडिओज ते यू ट्यूबवर टाकतात. तर, हा एक चांगला स्टार्टिंग पॉइंट आहे. पण फक्त वाय कॉम्बिनेटरचे व्हिडिओज पाहून कोणी युनिकॉर्न बनत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष काम करण्याची तयारी लागते. आणि म्हणून आपण यासाठी तयार आहोत की नाही, हेही प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे. हा प्रवास दिसतो त्यापेक्षा खूप कठीण आहे. स्टार्टअप करायचा असेल, तर तो करा. Just Do It! त्यासाठी फार वाचत बसायची गरज नाहीये.
प्रश्न : स्टार्टअप करा असं तुम्ही म्हणालात, पण आजकाल एआयमुळे असं झालंय की, जी कल्पना सुचते ती कोणीतरी आधीच केलेली असते किंवा कोणीतरी पटकन आपली पाहून ती बनवतं. कॉपी होण्याची शक्याता खूप वाढलीय. एखादी कल्पना प्रत्यक्ष राबवून जग बदलण्याची क्षमता खरंच कशात उरली आहे का, की एआयने ती क्षमता मारून टाकली?
- वाय कॉम्बिनेटरकडे याचं एक छान उत्तर आहे. तुम्ही स्टार्टअप तेव्हाच करायला पाहिजे, जेव्हा तुम्हाला ते केल्याशिवाय पर्यायच नाही (You should only do startup when you cannot not do it). व्यक्तिगत मत सांगायचं तर, तुम्ही स्टार्टअप करायलाच नको. आंत्रप्रेन्युअरशिपचं खूप ग्लोरिफिकेशन झालं आहे, पण म्हणतात ना, 'छत्रपती शिवाजी महाराज जन्मावेत, पण दुसऱ्याच्या घरात', तशी आपली मानसिकता असते, कारण हे करणं खूप जोखमीचं आहे. मी तर लोकांना सांगतो की, स्टार्टअप करू नका.
तुम्ही स्टार्टअप तेव्हाच करायला पाहिजे जेव्हा तुम्हाला इतकी ऊर्मी आहे की, तुम्ही स्वतःला थांबवू शकत नाही. आणि यातूनच तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. जर तुम्हाला वाटत असेल की एआयमुळे हे शक्य नाही, तर करू नका. तुम्हाला वाटतंय की आपली कल्पना कॉपी होईल? तर मग करू नका. नाहीतर मग कॉपी न होणारी कल्पना शोधणं ही तुमची जबाबदारी आहे.
दर पाच वर्षांनी असं वाटतं की, आता या फिल्डमध्ये सगळं इनोव्हेशन झालंय, पण तरीही एखादा नवीन स्टार्टअप येतो आणि काहीतरी नवीन घेऊन येतो, आणि ते मोठे होतात. आणखी पन्नास वर्षांनी जगातली जी क्षेत्रं आज आहेत, त्यात बहुतेक ठिकाणी नवे प्लेअर्स /नव्या कंपन्या असतील. प्रत्येक क्षेत्रात आजही खूप संधी आहे. तुम्ही सक्षम आहात का आणि सक्षम बनण्यासाठी स्वतःला झोकून द्यायची तुमची तयारी आहे का? भावनिक प्रवास, त्यातले चढ-उतार सहन करण्याची तयारी असेल तर करा, नाहीतर करू नका.
प्रश्न : या संपूर्ण प्रवासात, तुम्ही आता जे काम करताय त्याचा आणि तुमच्या औपचारिक शिक्षणाचा तसा थेट संबंध दिसत नाही. तर, एक इंजिनियर असण्याचा स्टार्टअप मालक किंवा आंत्रप्रेन्युअर होण्यात कसा फायदा झाला किंवा झाला नाही?
- एक इंजिनियर असण्याचा तसा काही फरक पडत नाही. मी आयआयटी मध्ये असताना काहीच धड केलं नाही, कारण माझं हे पक्कं ठरलं होतं की, वडिलांचा बिझनेस जॉईन करायचा. आयआयटी मध्ये आलो, मग मी नुसत्या उनाडक्या केल्या. मी कल्चरल सेक्रेटरी झालो, अनेक इव्हेंट्स ऑर्गनाईज केल्या आणि नंतर जनरल सेक्रेटरी झालो. त्यामुळे मी अभ्यास काही धड केला नाही.पण, इंजिनियरिंगमुळे एक गोष्ट नक्की चांगली घडते, ती म्हणजे तुमची थिंकिंग प्रोसेस, तुमची ऑपरेटिंग सिस्टिम चांगली बनते, ज्यामुळे तुम्ही गुंतागुंतीचे प्रश्न सोडवू शकता. तुम्हाला मेंटल मॉडेल्स ही एक संकल्पना सुचवतो. फारनाम स्ट्रीट नावाचा एक ब्लॉग आहे, त्यावर 100 मेंटल मॉडेल आहेत. जर तुम्ही आयुष्यात या मेंटल मॉडेलचा वापर करून विचार करायला सुरुवात केली, तर तुम्ही एक खूप चांगले ऑपरेटर व्हाल. मला वाटतं की, इंजिनिअरिंग काही प्रमाणात तेच काम करतं. जर तुम्हाला एखादा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सोडवायचा असेल, तर त्याप्रति, तुमचा मॉड्युलर अप्रोच असावा लागतो. या मेंटल मॉडेल्ससाठी फारनाम स्ट्रीट हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्हाला नोकरी करायची असेल, शिक्षक बनायचं असेल किंवा साधू बनायचं असेल, तरीही ही मेंटल मॉडेल्स कामाची आहेत. जर तुमचं त्यांच्यावर नियंत्रण असेल आणि तुम्ही त्या दिशेने विचार करायला लागलात, तर मला वाटतं, इंजिनिअरिंग तेवढं महत्त्वाचं नाही.
प्रश्न: ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे कल्चरल सेक्रेटरी होणं, जनरल सेक्रेटरी होणं; असा एक ट्रेंड दिसतो की जे विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या कॉलेजमध्ये हे सगळं करतात, ते आयुष्यात काहीतरी वेगळं आणि चांगलं करून दाखवतात. तर या एक्स्ट्रा, को-करिक्युलर अॅक्टिव्हिटीज आयुष्यात किती महत्त्वाच्या असतात ?
- खरं तर, असे विद्यार्थी मुळातच तसे असतात, त्यांच्यात एक ऊर्मी असते, म्हणूनच ते अशा गोष्टींमध्ये भाग घेतात. त्यांना जगात काहीतरी करून दाखवायचं असतं. त्यांच्यामध्ये हाय एनर्जी असल्यामुळे ते कल्चरल सेक्रेटरी बनतात. पण कल्चरल सेक्रेटरी बनल्यामुळेच ते यशस्वी होतात, असं म्हणणं चुकीचं आहे. मला असे कितीतरी मित्र माहीत आहेत, जे कधीच सेक्रेटरी वगैरे नव्हते, तरीही ते चांगलं काम करत आहेत. कारण ते मुळातच हाय एजन्सी, हाय एनर्जी असलेले लोक आहेत. त्यामुळे, हे फक्त तुम्ही एखादं विशिष्ट पद मिळवण्याशीच संबंधित आहे, असं अजिबात नाही.
प्रश्न : आत्ताचा काळ 'अबंडन्स'चा काळ आहे. मोठ्या वर्गातल्या प्रत्येक पिढीला त्यांच्या आधीच्या पिढीकडून खूप काही मिळाले आहे, त्यामुळे ते सुस्थितीत असलेल्या कुटुंबातून येतात. यातून 'डिसओरिएंटेशन', एन्जॉय करणे आणि लांब राहणे, असा एक ट्रेंड वाढताना दिसतो, त्याच्याबद्दल टीकाही होते. अशा वेळी, हे 'हाय एजन्सी' असणं शिकता येतं का? कोणीही 'हाय एजन्सी' व्यक्ती कसा बनू शकतो ?
- खरं सांगायचं तर, हे शिकता येतं असं मला वाटत नाही. मला 'हाय एजन्सी'पेक्षा 'हाय एनर्जी' असणं जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण, एनर्जीच नसेल, तर कोणीही काही करू शकणार नाही. एखाद्याच्या डोक्यात चांगली कल्पना येईल, जी कदाचित दुसऱ्यांनाही सुचू शकते, पण ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याच्याकडे हाय एनर्जी असायलाच हवी.
प्रश्न : या सगळ्या प्रवासात सातत्य किती परिणाम करतं?
- सातत्याला खूपच जास्त महत्त्व आहे. पण तुमच्यात हाय एनर्जी असेल, तर हळूहळू तुमच्या लक्षात येईल की, यशस्वी होण्यासाठी सातत्याची गरज आहे. पण तेवढीच असून चालणार नाही.
प्रश्न : आता ट्रम्प आणि टॅरिफ मुळे प्रत्येक माणसाच्या घरात कधी नव्हे ती फायनान्स आणि बिझनेसची चर्चा सुरू झाली. कोविडनंतर इन्व्हेस्टमेंटची संकल्पना घरोघरी पोहोचली. पुढच्या पाच-दहा वर्षांत फायनान्स या क्षेत्राचा प्रवास आणि आंत्रप्रेन्युअरशिपचा प्रवास भारतात कसा होईल असं तुम्हाला वाटतं?
- एआयचा जो ट्रेंड आहे, तो संपूर्ण जग बदलेल. मला खूप स्पष्टपणे दिसतंय की, लवकरच जे आर्थिक सल्लागार असतात, त्यांची जागा एआय घेईल. श्रीमंतांना पैसे देऊन जो सल्ला मिळत होता, तो आता चॅट-जीपीटी किंवा तशाच इतर मॉडेलच्या मदतीने सामान्य माणसालाही मिळेल. एआयमुळे फायनान्सला एक नवीन रूप मिळेल.
आंत्रप्रेन्युअरशिप मात्र नेहमी बदलत राहते. तुम्ही मूलतः त्या-त्या काळातील समस्या सोडवत असता. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी, बहुतेक उद्योग हे विज्ञानावर आधारित होते. जसं की, बल्बचा शोध लावणं. आता फायनान्सियलायझेशन (Financialization) हा एक मोठा ट्रेंड आहे. ही बाब योग्य का अयोग्य हा वेगळा मुद्दा पण सगळ्या गोष्टी पैशाची संबंधित होणे हा आताच ट्रेंड आहे खरा !
त्या-त्या काळातल्या समस्या वेगवेगळ्या असतात. एक उद्योजक त्या समस्या शोधतो आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. समजा, मी पन्नास वर्षांपूर्वी जन्माला आलो असतो, (1991 च्या खुल्या अर्थव्यवस्थेच्या धोरणापूर्वी) तर बॉन्ड वगैरेचा बिझनेस अस्तित्वात आलाच नसता. त्या वेळी मी दुसरं काहीतरी केलं असतं. शंभर वर्षांपूर्वी जन्माला आलो असतो, तर स्वातंत्र्यसैनिक व्हायला आवडलं असतं, कारण ती तेव्हाची एक मोठी समस्या होती. त्यामुळे आजपासून पन्नास वर्षांनंतरचे प्रश्न वेगळे असतील आणि तेव्हाचे आंत्रप्रेन्युअर्स ते सोडवण्यावर लक्ष केंद्रित करतील.
फक्त या सगळ्या ट्रेंड्समध्ये एकच गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे, 'सतत शिकत राहणे!' आजकाल ट्रेंड्स पाच वर्षांत बदलतात, पण सतत शिकत राहणे मात्र गरजेचे आहे.
प्रश्न : ही मुलाखत वाचणारे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, पालक या सगळ्यांनी काय वाचावं, काय ऐकावं, काय पाहावं? काय काय शिफारस कराल?
- मला वाटतं, सर्वात महत्त्वाचा एक सल्ला म्हणजे, आंत्रप्रेन्युअर बनणं सध्या 'कूल' आहे म्हणून तसं बनू नका. खरंच पोटात आग असेल तरच उद्योजकता निवडा! हा एक मूलभूत सल्ला आहे. बाकी, जर तुम्हाला बिझनेस करायचाच असेल किंवा आंत्रप्रेन्युअर बनायचंच असेल, तर तुम्ही मेंटल मॉडेल्स वापरून बघा. फारनाम स्ट्रीट या ब्लॉगवर 100 मेंटल मॉडेल अगदी मोफत उपलब्ध आहेत.
तुम्हाला स्टार्टअप करायचा असेल, तर वाय कॉम्बिनेटर आहे. तुम्ही आता चॅट-जीपीटीला विचारलं तरी तो तुम्हाला काय वाचायचं आणि काय बघायचं हे सांगेल. मुळात, काय वाचावं आणि काय बघावं ही समस्या नसून, लोकांना ते करण्याची इच्छाच नसणं ही समस्या आहे. आणि यावर माझ्याकडे काही उत्तर नाही.
प्रश्न : या सगळ्या अनुभवातून भारतीय लोकांची पैशांबद्दलची मानसिकता काय लक्षात आली? ते काय आणि कसा विचार करतात? त्यांच्या विचारांमध्ये वयानुसार किंवा डेमोग्राफीनुसार बदल होतो का?
- एक स्टॅटिस्टिक असं सांगतं की, आजही पाश्चात्त्य देशांत शिक्षण मोठ्या प्रमाणात मोफत असतं. त्यांच्याकडे पेन्शन सर्विसेस आणि आरोग्य विमा असतो, त्यामुळे त्यांना खरंच जास्त बचत करण्याची गरज नसते. याउलट आम्ही भारतात एका सर्वेमध्ये पाहिलेलं की, 70 टक्के कुटुंबं गरिबीपासून फक्त एक मोठं संकट दूर आहेत. म्हणजे, एखाद्या मोठ्या आजारपणात लोकांची सगळी बचत खर्च होऊन जाते. त्यामुळे आपल्या देशात लोकांचा भर फिक्स्ड इनकम टिकवण्यावर असतो आणि हे फक्त भारतात नाही, तर कोणत्याही विकसनशील देशाची ही खासियत आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे, विकसनशील देशाची इन्फ्लेशन (महागाई) खूपकमी असते, त्यामुळे साहजिकच एफडीवर मिळणारं व्याज कमी असतं. तुम्ही अमेरिकेचा इतिहास पाहिला, तर तिथे साधारण एक-दोन टक्के महागाई आणि तेवढ्याच टक्क्यांचं फिक्स्ड डिपॉझिटवरचं व्याज होतं, तर तिकडे इक्विटीमध्ये 12-13 टक्के रिटर्न्स मिळाले आहेत. भारतात कधी काळी एफडीवर 10 टक्के आणि इक्विटीवर 12 टक्के व्याज होतं. त्यामुळे साहजिकच गेल्या पिढीनं एफडीला जास्त प्राधान्य दिलं. हे फक्त भारताचंच चित्र नाही, तर सगळ्या विकसनशील देशांमध्ये लोकांना आहे तो पैसा टिकवून ठेवायचा असतो. त्यांच्यात लाँग टर्म रिस्क आणि व्होलॅटिलिटीची भीती असते. आणि विकसित देशांच्या तुलनेत, इथे फिक्स्ड इनकम आणि इक्विटीमध्ये जास्त फरक नाही.
प्रश्नः पण हे असतानाही, लोकांना मुळात इन्वेस्टमेंट म्हणून सोनं आणि जमीन घ्यावीशी वाटते. ते तसंच आहे की बदललंय? आणि काय दिसतंय?
आम्ही ज्या डेमोग्राफिकसाठी काम करतो, ते 25 ते 45 या वयोगटातील आहेत. त्यांच्यात आम्हाला दिसतं की, हे लोक इक्विटी प्रो आहेत. म्हणजे आमचे जे बॉन्ड इन्वेस्टर आहेत, विशेषतः, ते आधीपासूनच इक्विटीमध्ये इन्वेस्ट करतात. ते रिअल इस्टेटमध्ये अजिबात इन्वेस्ट करत नाहीत. म्हणजे, घर घेतलं तर घेतलं, पण त्यापलीकडे ते रिअल इस्टेटला गुंतवणूक म्हणून बघत नाहीत. सोनं अजूनही गुंतवणूक म्हणून न घेता, घरातल्या बायकांसाठी दागिने म्हणून घेतलं जातं आणि लोक त्यामागे तसं कारण देतात. सोन्याकडे गुंतवणूक म्हणून बघण्याची वृत्ती थोडी कमी झाली आहे. पण गेल्या एक-दीड वर्षात सोनं ज्या पद्धतीने वाढलंय, त्यामुळे कदाचित हा विचार थोडा बदलेल. मात्र, कोणी गोल्ड बीईएस (Gold BeES) किंवा गोल्ड ईटीएफ (Gold ETF) मध्ये गुंतवणूक केलीय, असं अजूनही भारतात खूप कमी आहे.
प्रश्न : पण असं म्हटलं जातं की, मराठी माणूस श्रीमंत व्हायला घाबरतो. पैशाबद्दल बोलायला घाबरतो, पैशाबद्दल जोखीम घ्यायला घाबरतो. याच्या उलट गुजराती माणसं असतात, जी पैशाला एक साधन म्हणून वापरतात. अशा वेळी मराठी कुटुंबातून येऊन पैशाचा व्यवसाय करावा, फायनान्शिअल कंपनी काढावी, हे कसं वाटलं ? आणि स्वतः तुम्ही या भीतीकडे पैशाबद्दलच्या, श्रीमंत होण्याबद्दलच्या कसं बघता?
- खरं तर, यात जोखीम ही स्वतःची कंपनी काढण्याची आहे, मग तो कोणताही व्यवसाय असो. पण हा फायनान्सचा बिझनेस आहे म्हणून जास्त मोठी जोखीम आहे, असं मला वाटत नाही. व्यवसाय करणं हे आमच्यासाठी खूप नैसर्गिक होतं. माझे वडील खूप गरीब कुटुंबातून आले. लहानपणी त्यांनी रोजगार हमी योजनेत काम केलं, रस्ते खोदायचं वगैरे. एवढी गरिबी असतानाही त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. या अर्थाने, मी खूप प्रिव्हिलेज्ड आहे. लहानपणापासूनच व्यवसाय करायचा असतो, असंच घरात वातावरण होतं. त्यात कुटुंबाचा आणि माझ्या बायकोचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे हे खूप नॅचरल वाटलं. यात फार मोठी रिस्क आहे, असं मला कधीच वाटलं नाही.
प्रश्न : श्रीमंत झाल्यावर काय करावं? म्हणजे आता मला पोटापाण्यासाठी पैसे कमवण्याची गरज नाही, हे कळल्यावर काय करावं?
- मला वाटतं, श्रीमंत बनण्याच्या प्रवासातच माणूस या प्रश्नाचं उत्तर शिकतो. मलाही नक्की माहीत नाही की, मला पोटापाण्यासाठी पैसे कमावण्याची गरज राहिली नाही, तर मी काय करेल. पण माणसांबद्दल एक गोष्ट अशी आहे की, ते नेहमीच विकसित होत राहतात. मला पाच वर्षांपूर्वी जे हवं होतं, ते आता माझ्याकडे असलेल्या गोष्टींपेक्षा पूर्णपणे वेगळं असू शकतं. तो प्रवासच तुम्हाला घडवतो. आता काही लोक असे आहेत, जे नोकरीत असताना त्यांच्या मुलांसोबत जास्त वेळ घालवू शकले नाहीत.
मला अशाच एका व्यक्तीबद्दल माहीत आहे, जो आता त्याच्या मुलींना शाळेत सोडायला आणि घ्यायला जातो. कारण तो आधी परदेशात काम करायचा. तेव्हा त्याचं म्हणणं होतं की, 'मी जेव्हा निघायचो, तेव्हा रात्रीच जायचो, कारण माझ्या मुली मला जाऊच द्यायच्या नाहीत.' त्यामुळे घरात खूप रडारड व्हायची. या गोष्टीमुळे त्याला खूप भावनिक त्रास झाला.
आता त्याचं असं म्हणणं आहे की, 'मी घरात दुसरं कोणतं काम करेल ना करेल, पण मुलींना मी सकाळी तयार करून शाळेत सोडायला जाईल आणि घ्यायलाही जाईल. आणि त्या जेव्हा घरात असतील, तेव्हा माझ्यासाठी दुसरी कोणतीही प्रायॉरिटी नसेल.'
प्रश्न : खूप पैसे मिळाल्यावर लोकांना ते हाताळता येतात का? कारण वाया गेल्याच्या कथा जास्त आहेत.
- ज्यांची प्रगती हळूहळू होते, ती शिस्तीतून होते. त्यामुळे त्यांना तो पैसा हाताळण्याचं तंत्र आधीच आलेलं असतं.समजा, तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळाली किंवा लॉटरी लागली, तर ते मिळवण्यासाठी तुम्हाला फारशी मेहनत करावी लागत नाही किंवा तुमचा कस लागत नाही. अशा वेळी तुम्हाला त्या पैशाची किंमत नसते किंवा तो सांभाळण्याची शिस्त नसते. अशा प्रवृत्तीचे लोकच उधळपट्टी करतात. मी माझ्या इतक्या वर्षांत जे संघर्ष केलेले लोक पाहिले आहेत, त्यांच्यापैकी कोणीही अशी उधळपट्टी करणारी प्रवृत्ती दाखवलेली नाही.
संवादक - विनायक पाचलग
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या