डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भाजप नेत्यांची बेताल बडबड

‘‘हा संघर्ष आपण प्रदेशावर काबू मिळवण्यासाठी करायचा नाही, तर काही मूल्यांच्या जपणुकीसाठी करायचा आहे. काही वांशिक गटांना चिरडून टाकणारा हा नवीन आन्तरराष्ट्रीय दहशतवाद आता आम्ही सहन करणार नाही.’’

सत्ता हातातून गेल्यावर भाजपच्या नेत्यांचा सगळा सांस्कृतिक मुखवटा गळून पडलेला दिसतो. त्यांची बेताल वक्तव्ये ऐकली तर ही सर्व मंडळी किती पिसाळली आहेत हे कळते. आतापर्यंत आदर्श आचरणाचे आणि निःसीम देशभक्तीचे लोकांना धडे देणाऱ्या भाजपचे खरे स्वरूप या वर्षभरात सर्वांना दिसले आणि त्यामुळे त्याच्या कच्छपी लागणाऱ्या मध्यम वर्गाला मोठा धक्का बसला आहे, हेही खरेच आहे. खरे तर त्यांची सत्ता गेली ती त्यांनीच लाडावून ठेवलेल्या जयललितांमुळे. पण त्याचे खापर मात्र ही मंडळी काँग्रेसवर फोडत आहेत. सोनिया गांधींबद्दल बोलताना तर या मंडळींच्या जिभेला विलक्षण धार आली आहे. सोनिया गांधींना लक्ष्य करून साऱ्या ख्रिश्चन समाजाला झोडून काढण्याची त्यांची तयारी सुरू झाली आहे. 17 तारखेला भाजप सरकार लोकसभेत पराभूत झाले, त्या रात्री लगेचंच म्हैसूरमध्ये ख्रिश्चनांवर चिखलफेक करणारे मोठमोठे फलक लावण्यात आले. त्याची जबाबदारी स्थानिक भाजप खासदाराने घेतली आहे. ‘

‘सोनिया प्रधानमंत्री झाल्या तर मी या देशात घरोघर फिरून त्यांच्या विरुद्ध प्रचार करीन आणि काँग्रेसवाल्यांनाही टिळक, गोखले, गांधी आणि जवाहरलाल या त्यांच्या नेत्यांची आठवण करून देईन,’’ असे उमा भारती दूरदर्शनवरील मुलाखतीत म्हणाल्या. सोनिया सरकार बनविण्याच्या खटापटीत होत्या त्या वेळी भाजप खासदारांनी संसद भवनात धरणे धरले होते आणि 'सोनिया चले जाव' अशा घोषणाही ते देत होते. वाजपेयी सरकारचा पाडाव हा अमेरिका आणि ख्रिश्चन मिशनरी यांनी मिळून केलेला कट आहे असा प्रचार संघ परिवार करू लागला आहे.

अमेरिकेला भारतात इतके राष्ट्रनिष्ठ सरकार नको आहे. पोखरण अणुचाचण्यांमुळे संतप्त झालेल्या अमेरिकेपुढे वाजपेयी सरकार पाडणे हा महत्त्वाचा कार्यक्रम होता, असे रा. स्व. संघाचे सरचिटणीस श्री. के. एस. सुदर्शन म्हणतात. अमेरिकेच्या या कारवाईत ख्रिश्चनांच्या व्हेटिकन येथील धर्मपीठाचाही मोठा हात आहे. कारण त्यांना ख्रिश्चन धर्मोपदेशकांची इथे चणचण भासू लागली आहे. सन 2000 पर्पंत भारतातील प्रत्येक पिनकोड क्षेत्रात एकतरी चर्च आणि प्रत्येक घरात बायबलची एक प्रत, हा व्हेटिकनचा कार्यक्रम होता; वाजपेयी सरकारने त्यात अडथळा आणला म्हणून कट करून सरकार पाडण्यात आले असे संघ परिवारातील मंडळी विरोधी पक्षांना दोष देत छातीठोकपणे सांगतात.

विश्व हिंदू परिषदेचे सहचिटणीस आचार्य गिरिराज किशोर तर म्हणतात की, सोनिया या आन्तरराष्ट्रीय कटाचा एक भाग आहेत. इंदिरा गांधींना त्यांनी बुलेटप्रूफ जाकीट घालू दिले नाही म्हणून त्यांची त्या दिवशी हत्या झाली. राजीव गांधी निवडणूक प्रचारासाठी दक्षिणेत गेले तेव्हाही त्या त्यांच्यासमवेत गेल्या नाहीत आणि तिथेच राजीव गांधींना ठार मारण्यात आले. काँग्रेस संघटनेत प्रत्येक महत्त्वाच्या पदावर ख्रिश्चन माणसाची नेमणूक झाली आहे आणि देशातील काही जिल्ह्यांत तर ख्रिश्चनांची संख्या चाळीस टक्कयांनी वाढली आहे. भाजपचे उपाध्यक्ष आणि पक्षाचे वैचारिक मार्गदर्शक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते मलकानी म्हणतात, ‘‘सोनिया म्हणजे गौडबंगाल आहे.

पडद्यातील मुस्लीम महिलेसारखी ती गूढ आहे. बुद्धीने सामान्य आहे आणि कोणावर विश्वास टाकावा ते तिला कळत नाही. ती प्रधानमंत्री झाली तर देशाला तो दिवस विलक्षण दुर्दैवाचा ठरेल.' सरकार पाडणाऱ्यांना जनतेने पाहून घ्यावे.’’ असे तर भाजप नेते चडफडत बोलतातच, पण आता वर्तमानपत्रांत सुद्धा पूर्णपान जाहिराती, 'यांना धडा शिकवा' या शीर्षकाखाली छापून येऊ लागल्या आहेत. धडा कोणाला शिकवा? तर सोनिया, जयललिता, मायावती, लालूप्रसाद आणि सुरजित यांना. त्यांचे फोटो जाहिरातीत आहेत. पण मुलायम सिंगांचे नाव नाही.

खरे तर तेही भाजपचे कट्टर विरोधक. त्यांनीही विश्वासदर्शक ठरावाविरुद्धच मत नोंदवले. पण त्यांनी सोनियाला सरकार बनवू दिले नाही म्हणून भाजपची प्रेमळ दृष्टी त्यांच्याकडे वळली आहे असे म्हणायचे काय? जॉर्ज फर्नांडिस त्यांच्याकडे आघाडीत येण्याचा सांगावा घेऊन गेलेच आहेत! प्रश्न हा आहे की हे जे काही चालले आहे. त्याचा लोकहिताशी आणि दबल्या गेलेल्या लोकांच्या जीवनाशी कितपत संबंध आहे? गेल्या वर्षभरात भाजप सरकारने सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील कितीशा हालअपेष्टा कमी केल्या? देश प्रगतिपथावर नेला म्हणजे काय केले? अणुबॉम्बचा स्फोट हा देशाच्या प्रगतीचे गमक आहे काय? घटनेने धर्मनिरपेक्षता हे मूल्य स्वीकारले असता सरकार पक्षाच्याच हस्तकांनी अल्पसंख्य नागरिकांवर हल्ले करणे योग्य आहे काय? या सरकारने देशाची आर्थिक परिस्थिती सुधारली म्हणजे काय केले? या 'सुधारलेल्या’ आर्थिक परिस्थितीचा देशातील कोट्यवधी लोकांच्या जीवनावर काय प्रभाव पडला ? केवळ बसप्रवासाने परराष्ट्र संबंध सुधारतात काय? भाजप नेते आगामी निवडणुकीत 'जनादेशा'साठी लोकांकडे येणारच आहेत. वरील प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून देशाने मिळविलीच पाहिजेत,

हाउस ऑफ लॉर्ड कोरोव्हा ते काश्मीर

ब्रिटिश पार्लमेंटच्या हाउस ऑफ लॉर्ड्‌समध्ये कोसोव्होबद्दल चर्चा चालू असताना काही दिवसांपूर्वी अनेक ब्रिटिश खासदारांना काश्मीरचा उमाळा आला. कोसोव्होमधील जनतेवर होणारे वांशिक अत्याचार आणि युगोस्लाव्हियावर बॉम्बहल्ले करून ते थांबविण्याचे अमेरिकेचे तथाकथित प्रयत्न, या संबंधात विचार करून नाटोचे आक्रमण थांबविण्यासाठी प्रे. क्लिंटन यांच्याशी बोलणी करणे शक्य आहे काय, याचा अंदाज घेण्यासाठी हाउस ऑफ लॉर्ड्‌सची ही बैठक; पण तिच्यामध्ये काही खासदारांनी पाकिस्तानात भेटलेल्या काश्मिरी निर्वासितांच्या ‘करुण’ कहाण्या सांगण्यास सुरुवात केली. एक खासदार म्हणाले की, बाल्कन राष्ट्रांमध्ये जी कारवाई योग्य ठरली ती दक्षिण आशियायी देशांतही योग्य ठरणारी आहे. या विधानाची दखल घेऊन लंडनमधील एक भारतीय पत्रकार भारताचे माजी संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांचे वाक्य उद्धृत करून भारताला सावधानतेचा इशारा देतो, ‘‘नाटोची लढाऊ विमाने फक्त एकाच दिशेला जातात असे नाही.’’

आझाद काश्मीरच्या दौऱ्यावरून परतलेले एक खासदार काश्मीरमधील जनतेच्या स्वयंनिर्णयाच्या हक्काबद्दल आग्रहाने बोलत होते. काश्मीरमध्ये वांशिक उच्छेदाचे वातावरण निर्माण झाले आहे असे सांगून मग त्यांनी प्राइम मिनिस्टर टोनी ब्लेअर यांच्या कोसोव्होवरील भाषणातीलच वाक्ये उद्धृत केली. ते म्हणाले, ‘‘हा संघर्ष आपण प्रदेशावर काबू मिळवण्यासाठी करायचा नाही, तर काही मूल्यांच्या जपणुकीसाठी करायचा आहे. काही वांशिक गटांना चिरडून टाकणारा हा नवीन आन्तरराष्ट्रीय दहशतवाद आता आम्ही सहन करणार नाही.’’ हाउस ऑफ लॉर्ड्‌सचे एक सदस्य लॉर्ड इव्हान्स ऑफ बॅटफोर्ड म्हणाले, ‘‘आझाद काश्मीरला भेट देण्याचा सन्मान मला मिळाला. तेथील लोकांनी आमचे प्रेमाने स्वागत केले. ही मंडळी ब्रिटिशांच्या बाजूची आहेत.

आपण त्यांना मदत करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. या वादाच्या मुळाशीच आपण संबंधित आहोत. कारण एक मुस्लीम बहुसंख्याक राज्य आपण हिंदुराष्ट्राच्या हवाली केले आहे. म्हणून या बाबतीतील जबाबदारीचा आपला वाटा आपण उचलला पाहिजे.’’ हाउस ऑफ लॉर्ड्‌समध्ये कोसोव्हो हा विषय सोडून काश्मीरवर जी चर्चा झाली त्यात बहुतेकांचा रोख, काश्मीर हा केवळ भारत-पाकिस्तानचा प्रश्न नसून त्याला आन्तरराष्ट्रीय स्वरूप आले आहे. पन्नास वर्षे इतका दीर्घ काल भिजत पडलेला, जगात प्रदीर्घ काळ अस्तित्वात असलेला हा प्रश्न असून या बाबत ब्रिटिशांची नैतिक जबाबदारी आहे. कारण त्याच्या मुळाशी ब्रिटनचे ऐतिहासिक संबंध आहेत, या बाबत होता. बॅरोनेस विल्यम्सनी या प्रश्नाच्या दुसऱ्या बाजूवर प्रकाश टाकला.

पाकिस्तान प्रशिक्षित अतिरेकी काश्मीरमध्ये घुसून तेथील हिंदू नागरिकांची जीवने उद्ध्वस्त करीत आहेत अशी विश्वासार्ह माहिती आपल्याला मिळाली आहे असे त्या म्हणाल्या. कोसोव्हो किंवा उत्तर आयर्लंड या भागांसारखीच मूलभूत कडव्या द्वेषभावनेची पार्श्वभूमी या प्रश्नाला असल्यामुळे तो काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे, असाही इशारा त्यांनी दिला. बॅरोनेस सेटिंग नावाच्या दुसऱ्या एक सदस्या भारताच्या अण्वस्त्रसिद्धतेबद्दल बोलताना म्हणाल्या की त्यामुळे भारत-पाकिस्तानमधले संबंध ताणले गेले आहेत, म्हणून काश्मीरप्रश्न आणखीच कठीण झाला आहे. चीनने केलेल्या अणुस्फोटानंतर भारताचे पंतप्रधान अटल बिहारी यांनी 1964 साली लोकसभेमध्ये जे उद्गार काढले होते त्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘‘अ‍ॅटम बॉम्बला अ‍ॅटम बॉम्ब हेच एकमेव उत्तर आहे’’, असे वाजपेयी चीनच्या ॲटम बॉम्बचे भारतावर काय परिणाम होतील, या संदर्भात झालेल्या चर्चेत बोलले होते. या चर्चेत ज्यांनी भाग घेतला त्यांत भारत, पाकिस्तानी, बांगलादेशी तसेच इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या इतर युरोपिअन देशांचेही लॉर्ड्‌स होते. काहींनी या चर्चेत कोसोव्होचा नामोल्लेखही केला नाही. काश्मीरवर इथे चर्चा होऊ नये, कारण त्यामुळे ब्रिटिश समाजात फूट पडेल असाही इशारा काहींनी दिला. सरकारी प्रवक्त्यांनी मात्र आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भारत आणि पाकिस्तान यांनी पुन्हा बोलणी सुरू केली आहेत याबद्दल समाधान व्यक्त केले आणि मानवी हक्कांवर आक्रमण करणाऱ्या अतिरेकी कारवायांचा निषेध केला. अशा प्रकारे कोसोव्होवर हाउस ऑफ लॉर्ड्‌सवर सुरू झालेली चर्चा काश्मीरप्रश्नावर संपली.

महापौर परिषदेचे विसर्जन - युतीच्या नगरसेवकांनी लावलेले दिवे

युती शासनाचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी गाजावाजा करून मुंबई आणि नागपूर येथे अस्तित्वात आणलेली महापौर परिषद अखेर नवे मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आदेशाने अलीकडेच विसर्जित करण्यात आली. मुंबईसारख्या महानगरातले प्रश्न चटकन मार्गी लागावेत यासाठी महापौर आणि त्यांनी नियुक्त केलेले नगरसेवकांचे मंडळ यांच्या हाती विशेष अधिकार महापौर परिषदेत देण्यात आले होते. योजना चांगली दिसली तरी ती राबवणाऱ्यांना आपली तुंबडी भरून घेण्याची एक अमूल्य संधी पुढे आल्यासारखे वाटले.

महापौर नंदू साटम तर स्वतःला मुंबईचे मुख्यमंत्री समजू लागले आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी स्पर्धा करू लागले. त्यांना सभा आणि कार्यक्रमांना जाण्यासाठी हेलिकॉप्टर हवे झाले! मुंबई शहराचे अवाढव्य प्रश्न ‘आ’ वासून समोर उभे असताना महापौर आणि त्यांचे सहकारी चैन आणि चंगळ यांच्यात बुडून गेले. महापालिका भवनात त्यांच्यासाठी सहा कोटी रुपये खर्च करून अद्ययावत सोयीच्या केबिन्स तयार झाल्या. शोफर असलेल्या गाड्याही त्यांनी स्वतःसाठी मंजूर करून घेतल्या. एका वेळी त्यांच्यासाठी नवीन निवासस्थानांच्या योजनाही तयार होऊ लागल्या होत्या. या सर्व वाढत्या खर्चाला आळा कसा घालायचा हे कोणालाही समजत नव्हते, म्हणून मग वेगवेगळ्या खात्यांतील अपेक्षित उत्पन्नाचे आकडे फुगवून सांगण्यास सुरुवात झाली. कितीतरी महत्त्वाच्या योजना अधिकाऱ्यांकडून पुन्हा पुन्हा इशारे मिळत असतानाही लांबणीवर टाकल्या गेल्या. महापौर परिषदेच्या या सदस्यांना आपल्यावर सर्व शहराची जबाबदारी आलेली आहे हेही कळत नव्हते. ते आपल्या वॉर्डातलीच कामे नेहमीच्या पद्धतीने करीत होते. नागरी सुविधांचा एकीकडे ऱ्हास होत चालला असताना महापौर परिषदेतील नगरसेवकांचा मात्र भरपूर उत्कर्ष होत चाललेला दिसत होता.

गेल्या दहा महिन्यांत महापौर परिषदेत घेतलेले अनेक निर्णय संशयास्पद आहेत. मग ते गटारे स्वच्छ करण्याचे कंत्राट असो वा दादर टी.टी.च्या फ्लायओव्हरचे. या निर्णयांबाबत महापालिका प्रशासनात कुजबूज आहे. अधिकाऱ्यांचा असहकार त्यामुळे वाढत चाललेला आहे, हे स्वच्छपणे समजत होते. महापालिकेतच विरोधी पक्षांकडून सडेतोड टीका होऊ लागली आणि प्रसारमाध्यमांनीही महापौरांना धारेवर धरले होते. निवडणुकीच्या वर्षातच सेनेची अब्रू जाऊ लागल्यामुळे ही योजना मागे घेण्याखेरीज गत्यंतर राहिले नव्हते. शिवसेनेला हा राजकीय धक्का असेल, पण त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांना आणखी कार्यकारी अधिकार प्रदान करून लोकशाही प्रक्रिया थेट जनतेपर्यंत नेण्याच्या प्रयत्नांनाही या प्रकारामुळे खीळ पडण्याचा संभव आहे असे जाणत्यांना वाटते.

Tags: राजकीय चालू घडामोडी current political events weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके