डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आपल्या शाळेची भिंत रंगवा. चित्रांकित करा. फलाटाला रेलून असलेल्या भिंतींवर छान चित्रं, एखाद्या बागेचं कंपाऊंड, आपल्या गच्च्या, बसस्टॉपच्या पाठीमागच्या भिंती... काही सोडू नका! दिसेल ती वास्तू, भिंत सुशोभन करून अधिक सुंदर करा. मुख्य म्हणजे स्वतः कचरा करू नका नि करणाऱ्याला परावृत्त करा. हेही नसे थोडके.

 

रल्वे स्थानक म्हणजे हमखास वाटेल तिथे कचरा टाकायची. हवे तेथे थुंकायची जागा असा काही प्रवाशांचा समज असतो की काय, कोण जाणे? मग ते आपणहून स्वच्छ करावे असे कुणास वाटणार?

पण मला वाटलं! त्या वाटण्याला अर्थात कारण नाली कॅथे पॅसिफिकची एक ‘स्वच्छ पर्यावरण’ स्पर्धा त्यावेळी ही स्पर्धा, म्हणजे स्पर्धेचा कागद माझ्या हाती देण्यात आला आणि विचार करीत मी विक्रोळी स्थानकावर पोचले. पोचताच प्रतिक्षिप्त क्रियेने साडी थुंकाऱ्यांपासून वाचवायला आपोआप किंचित उचलली नि झपकन् वाटलं. रोज रोज इथे येते. मी, माझे सहकारी, माझे विद्यार्थी, पालक हे स्थानकच स्वच्छसुंदर करून टाकू. बस्! ठर्‍या!

शाळेत प्रार्थनासभेत मुख्याध्यापिकेच्या परवानगीने प्रस्ताव मांडला. मुलं तैयार! अगदी कोरसात होss! “स्टेशन झाडणार?”

“होss”

“झाडं लावणार?”

“हो”

“चित्रं काढणार?”

“हो हो होss”

पण मनात धाकधूक होती. पोरं “होss” करतायत. पालक? मना त्यांची लेखी परवानगी मागितली. आश्चर्य म्हणजे ते एकाचंही होssला नोss आलं नाही. याचा अर्थ हिरवा बावटा.

मुख्याध्यापिका पाठीशी... त्यामुळे प्रकल्प आकारास येताना व्यावसायिक अडचण आली नाही. प्रथम स्टेशनमास्तरला भेटले. म्हटलं, “बाबारे, माझी मुलं तुझं स्टेशन झाडणार आहेत. नटवणार, सजवणार आहेत. चालेल ना?”

त्यानं छत्रपती शिवाजी टर्मिनल्सच्या दिशेने बोट केलं. मला कळेचना! मग तो समजेलसं वदला. “उधर हेड ऑफिसमें अॅप्लिकेशन दो. सफाई का!” अरे बापरे! झाडायची परवानगी मागायला हेड ऑफिस?

गेले! खाज खूप ना! आश्चर्य म्हणजे लगेच परवानगी मिळाली. मात्र झाडू आमचे न्यावे लागतील ही अट. मान्य केली. झाडं कुंड्यांत लावा. म्हटलं लावू! चित्र देवांची नकोत. ख्रिश्चन, हिंदू, मुसलमान देवांची भांडण लावू नका. म्हटलं, नाही लावणार. आम्ही एक मानतो. देव फुलापानांत आहे, प्राण्या-पक्ष्यांत आहे. त्यांची चित्रं काढू, चालेल ना? “चलेगा.” त्यांनी संमती दिली.

मग काय? माझी पाचशे मुलं या प्रकल्पात सहभागी झाली. अवघी उदयाचल शाळा फलाटमय झाली. मुलं झाडू लागली की मोठे थबकत, विचारत, “काय रे? शिक्षा झाली? फलाट झाडायला लावला?”

“नाही हो. आपलं स्थानक चांगलं दिसावं म्हणून...”

“असं होय! पण लाज नाही का रे वाटत?”

“नाही काका. लोकांना थुंकताना लाज वाटत नाही, मग साफ करताना आम्हांला कशाला वाटायला हवी?”

शपथ सांगते... माझ्या विद्यार्थिनीचं उत्तर ऐकून माझं हृदय आनंदानं भरून आलं होतं. माझ्या नवर्‍यानं मोठ्या हौसेनं हिरवे मास्क शिवून आणले त्यांच्यासाठी. तोंडात, नाकात धूळ नको जायला पोरांच्या शिक्षकांनी अतिउत्तम साथ दिली. फलाटावर धूळ दिसेना. भिंती पानाफुलांच्या नक्षीने रंगल्या आणि रंगाच्या रिकाम्या डब्यांना नटवून सजवून इतक्या आकर्षक कचराकुंड्या तयार झाल्या की बघत राहाव्यात! कुंडीतली हिरवीगार रोपं तर येणाऱ्याजाणाऱ्याला खुणावू लागली. सतत चार महिने माझी मुलं या सौंदरीकरणासाठी झटत होती. चार क्रमांकाच्या फलाटावरचे कुष्ठरोगी हलवायला पोलिस मदतीला आले. त्यांना कुष्ठधामात हलवले. आणि हो.... स्टेशनवर दाखवायला एक सुंदर व्हीडिओ फिल्मसुद्धा तयार झाली. रंजन, देशभक्ती, पर्यावरणभक्ती... असा सुंदर सुंदर कार्यक्रमांचा चढता क्रम, यासाठी मी तहानभूक विसरून रात्री एकपर्यंत एडिटिंग केलंय, “अगं, तुला कुणी नोबेल पारितोषिक का देणारे?” नवरा विचारीत होता. पण मला त्या सुंदरतेची झिंग चढलेली ना!

पाचशे मुलं. मदत करणारे शिक्षक यांनी स्वप्न साकारलं. रेल्वेतून येताजाता लोकांच्या नजरांचे टकमक बुरूज होत. मला नोबेल नाही मिळालं... पण शाळेला 50 हजारांचं अ‍ॅवॉर्ड नि दोन मुलांना आफ्रिकेतल्या लापलाला इथे जंगलभ्रमणाची संधी मिळाली. मी खरंच सांगते ‘मोगॅम्बो खुश हुआ!’

गांधी जयंतीला सुरू केलेला हा प्रकल्प आम्ही गांधी पुण्यतिथीस पुरा केला. एक सुंदर श्रमसार्थक या गोष्टीला आता सहा वर्ष झाली. आहेत का काही श्रमखुणा? नाहीत. कुंड्या चोरीला गेल्यायत. भिंतीच पाडल्या मग चित्र कुठली? कुष्ठरोगी परत सुखेनैव 4 क्र. फलाटावर नांदतायत, म्हणून काय झालं? कुणी नवा उभा राहील. कंबर कसेल. धडपडेल नि पुनःश्च कायापालट घडवील. आहे काय त्यात?

आपण ‘हिरवा वसा’ घेतला तो टाकायचा मात्र नाही. आता तर मी एका मोठ्या प्रशाळेची मुख्याध्यापिका आहे. राजा रामदेव पोदार शाळा नि प्रशाळा. इथे आम्ही निसर्गकवितांची मोठमोठी चित्रप्रदर्शन भरवली. सगळी मुलांची कला! हीss धमाल!

नुसत्या निसर्गगीतांची, गोष्टींची, नाटकाची ध्वनिचित्रफीत तयार केली. ‘एक हिरवी गोष्ट!’ पद्मजा फेणाणी, निशिगंधा वाड, अनंत भावे यांनी ती इतकी सुंदर सजविलीय आपल्या आवाजानं की बस!

मित्रांनो, हा हिरवा वसा, सुंदरतेचा ध्यास आपलं अवघं जीवन इतकं आनंदमय करून टाकतो म्हणून सांगू! एकदा करून बघा! माझ्यासाठी.

आपल्या शाळेची भिंत रंगवा. चित्रांकित करा. फलाटाला रेलून असलेल्या भिंतींवर छान चित्रं, एखाद्या बागेचं कंपाऊंड, आपल्या गच्च्या, बसस्टॉपच्या पाठीमागच्या भिंती... काही सोडू नका! दिसेल ती वास्तू, भिंत सुशोभन करून अधिक सुंदर करा. मुख्य म्हणजे स्वतः कचरा करू नका नि करणाऱ्याला परावृत्त करा. हेही नसे थोडके. काय? मग करणार ना सुरुवात? मला कळवा हा! मला खूप खूप आनंद होईल.

बगीचे, रेल्वेस्थानके, बसथांबे स्वच्छ ठेवणारे छोटे मित्र मला फार आवडतात. मोठेही! जे स्वच्छतेला सुंदरता मानतात... ते खरोखर ‘मनसुंदर’ असतात. निदान मलातरी खूप आवडतात अशी मनसुंदर माणसं!

Tags: संपादक हिरानंदानी पवई राजा रामदेव पोदार कुष्ठरोगी जंगलसफारी लापला आफ्रिका शिक्षक विद्यार्थी विक्रोळी छत्रपती शिवाजी टर्मिनल्स स्टेशनमास्टर शाळा मुख्याध्यापक कॅथे पॅसिफिक रेल्वे स्थानक साधना साप्ताहिक Editor Hiranandani Powai Raja Ramdev Poddar Africa Teachers Students Vikhroli Chhatrapati Shivaji Terminals Station Master School Principal Catha Pacific Railway Station #Sadhan Weekly weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके