डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मागील पाच वर्षांच्या या पुरस्कारांच्या कार्यवाहीवर नजर टाकली, तर आमच्या मनात समाधानाची भावना आहे; पण आणखी बरेच काही करायला वाव आहे, याची जाणीवही आहे आणि यापुढील काळात त्यात सुधारणा होत राहणार आहेत, हा आत्मविश्वासही आहे. परंतु काही लोकांकडून येणाऱ्या दोन प्रमुख शंका किंवा आक्षेप यांचे निराकरण करणे इथे भाग आहे. एक प्रश्न असा उपस्थित केला जातो की, ‘तुम्ही लेफ्ट टू द सेंटर अशा विचारांच्याच कार्यकर्त्यांना व पुस्तकांना पुरस्कार देता.’ दुसरा असा एक प्रश्न विचारला जातो की, ‘तुम्ही जीवनगौरव दिला आहे, त्यातील काही व्यक्तींना साहित्यिक म्हणता येणार नाही.’ या दोनही आक्षेपांच्या संदर्भात, महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारनिवडीचे निकष सांगणारे एक पूर्ण पान या विशेषांकात समाविष्ट केले आहे. (हे निकष सुरुवातीपासूनचे असून, यापूर्वीच्या काही अंकांतूनही ते आले आहेत.) वैचारिक लेखन हा केवळ एक साहित्यप्रकार आहे असे नाही, तर तो साहित्यातील प्रमुख प्रवाह आहे. त्यामुळेच, ललित साहित्य व वैचारिक साहित्य या दोन प्रवाहांतील मान्यवरांना आलटून-पालटून जीवनगौरव पुरस्कार प्रदान केले जातात... दुसऱ्या आक्षेपाबाबत सांगायचे तर, पुरस्कारांची निवड करताना भारतीय राज्यघटनेशी विसंगत नसणारे आणि लोकशाही व धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा परिपोष करणारे साहित्य व समाजकार्य विचारात घेतले जाते. यासंदर्भात महाराष्ट्र फाउंडेशन व साधना ट्रस्ट यांच्या भूमिकेत कसलीही तफावत नाही.

अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने दर वर्षी साहित्य आणि समाजकार्य या दोन क्षेत्रांतील नऊ-दहा व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय व अनुकरणीय योगदानासाठी पुरस्कार देऊन गौरविले जाते. सन 1994 पासून साहित्य पुरस्कार तर 1996 पासून समाजकार्य पुरस्कार दिले जात आहेत. मुंबईतील केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या वतीने 2008 पर्यंत या पुरस्कारांचे संयोजन केले जात होते. या पुरस्कारांचे संयोजन साधना ट्रस्टमार्फत 2009 पासून केले जात आहे. पाच वर्षांपूर्वी या पुरस्कारांचे संयोजन करण्याचा प्रस्ताव साधनाकडे आला तेव्हा ‘साधना ट्रस्ट’ने अतिशय विचारपूर्वक तो प्रस्ताव स्वीकारला, त्यात साधना ट्रस्टचे विश्वस्त सचिव व साधनाचे संपादक असलेले डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या दूरदृष्टीचा भाग बराच जास्त होता. तेव्हा साधना साप्ताहिकाचा हीरकमहोत्सव नुकताच संपला होता आणि साधनाची वाटचाल अमृतमहोत्सवाच्या दिशेने दमदार व सुरळीत करण्यासाठी काही उपक्रम दीर्घकालीन हेतू ठेवून सुरू केले होते. 

त्या दीर्घकालीन प्रक्रियेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारांचे संयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वैचारिक व परिवर्तनवादी नियतकालिक अशी साधना साप्ताहिकाची ओळख आहे, ती अधिक गडद होण्यामध्ये या पुरस्कारांचे संयोजन उपयुक्त ठरेल असा विचार त्यामागे होता. या पुरस्कारांची निवडप्रक्रिया, पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आणि पुरस्कारप्राप्त व्यक्तींवरील विशेषांक या तिन्हींच्या कार्यवाहीतून साहित्य व समाजकार्य या दोनही क्षेत्रांतील अनेक व्यक्ती व संस्था प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, साधनाशी जोडल्या जातील आणि नवे लेखक, नवे वाचक व नवे विषय यांच्याशी आदान-प्रदान होईल, असा अंदाज होता. आता पाच वर्षे हा काही फार मोठा कालखंड नाही, पण तरीही वरील हेतू साध्य करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात या पुरस्कारांच्या संयोजनाचा महत्त्वाचा वाटा राहतो आहे, हे इथे कृतज्ञतापूर्वक नोंदवणे भाग आहे. त्यासाठी महाराष्ट्र फाउंडेशन व या पुरस्कार योजनेचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचे आभार!

मात्र याबरोबरच हेही इथे नोंदवणे आवश्यक आहे की, या पुरस्कारांचे संयोजन करण्यामुळे साधना ट्रस्टला काहीही आर्थिक फायदा होत नाही! पुरस्कारांची रक्कम, पुरस्कार विशेषांकाची निर्मिती व पुरस्कार वितरण समारंभ यासाठी येणारा खर्च इतकाच आर्थिक निधी साधना ट्रस्टला मिळत असतो. या वर्षीचे पुरस्कार जाहीर झाले तेव्हा (17 डिसेंबर) महाराष्ट्राच्या विधिमंडळात जादूटोणाविरोधी कायदा संमत करण्याची प्रक्रिया चालू होती. त्या वेळी कायद्याच्या काही विरोधकांनी असा आरोप केला होता की, डॉ.दाभोलकर चालवीत असलेल्या साधना ट्रस्ट व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांना परदेशातून पैसा मिळतो. ते आरोप पूर्णत: चुकीचे आहेत, हे आम्ही त्या वेळीच जाहीर केले होते. साधना ट्रस्टला केवळ या पुरस्कारांचे संयोजन करण्यासाठी निधी मिळतो हे जसे स्पष्ट आहे, तसेच हेही सांगितले पाहिजे की, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला महाराष्ट्र फाउंडेशनने पहिल्याच वर्षी (1996) सामाजिक कार्य पुरस्कार देऊन गौरविले होते आणि डॉ.दाभोलकर यांना डिसेंबर 2006 मध्ये ‘दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता’ हा दहा लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविले होते. डॉ.दाभोलकरांना तो पुरस्कार अमेरिकेत प्रदान केला होता (डॉक्टरांनी केलेला तो एकमेव परदेश दौरा होता), ती दहा लाख रुपयांची रक्कम त्यांनी महाराष्ट्र अंनिसला दिली होती. अंनिसने ‘चमत्कार दाखवा व 11 लाख रुपये मिळवा’ या त्यांच्या आव्हानासाठी जी रक्कम बँकेत ठेवली आहे, तिच्यात त्या दहा लाखांची भर घालून ते बक्षीस 21 लाख रुपयांचे केले आहे... हे सर्व तपशील यापूर्वीही अनेक वेळा जाहीरपणे सांगितले गेले आहेत. पण निराधार आरोप करणारे लोक आजही आहेत आणि डॉ.दाभोलकर आता हयात नाहीत, म्हणून हे पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगत आहोत.

मागील पाच वर्षांच्या या पुरस्कारांच्या कार्यवाहीवर नजर टाकली, तर आमच्या मनात समाधानाची भावना आहे; पण आणखी बरेच काही करायला वाव आहे, याची जाणीवही आहे आणि यापुढील काळात त्यात सुधारणा होत राहणार आहेत, हा आत्मविश्वासही आहे. परंतु काही लोकांकडून येणाऱ्या दोन प्रमुख शंका किंवा आक्षेप यांचे निराकरण करणे इथे भाग आहे. एक प्रश्न असा उपस्थित केला जातो की, ‘तुम्ही लेफ्ट टू द सेंटर अशा विचारांच्याच कार्यकर्त्यांना व पुस्तकांना पुरस्कार देता.’ दुसरा असा एक प्रश्न विचारला जातो की, ‘तुम्ही जीवनगौरव दिला आहे, त्यातील काही व्यक्तींना साहित्यिक म्हणता येणार नाही.’ या दोनही आक्षेपांच्या संदर्भात, महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारनिवडीचे निकष सांगणारे एक पूर्ण पान या विशेषांकात समाविष्ट केले आहे. (हे निकष सुरुवातीपासूनचे असून, यापूर्वीच्या काही अंकांतूनही ते आले आहेत.) वैचारिक लेखन हा केवळ एक साहित्यप्रकार आहे असे नाही, तर तो साहित्यातील प्रमुख प्रवाह आहे. त्यामुळेच, ललित साहित्य व वैचारिक साहित्य या दोन प्रवाहांतील मान्यवरांना आलटून-पालटून जीवनगौरव पुरस्कार प्रदान केले जातात... दुसऱ्या आक्षेपाबाबत सांगायचे तर, पुरस्कारांची निवड करताना भारतीय राज्यघटनेशी विसंगत नसणारे आणि लोकशाही व धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा परिपोष करणारे साहित्य व समाजकार्य विचारात घेतले जाते. यासंदर्भात महाराष्ट्र फाउंडेशन व साधना ट्रस्ट यांच्या भूमिकेत कसलीही तफावत नाही.

दर वर्षी मे-जूनमध्ये पुरस्कारनिवडीची प्रक्रिया सुरू करायची आणि त्यानंतर येणाऱ्या जानेवारीमध्ये पुरस्कार वितरण समारंभ घडवून आणायचा, अशी गेल्या पाचही वर्षांची कार्यपद्धती राहिली आहे. या निवडीसाठी कोणाकडूनही अर्ज मागवले जात नाहीत, ग्रंथ पुरस्कारांसाठी पुस्तकेही मागवली जात नाहीत. मात्र महाराष्ट्रातील 300 मान्यवरांना पत्र पाठवून काही व्यक्तींच्या/पुस्तकांच्या नावांची शिफारसी करण्याचे आवाहन केले जाते. त्यांच्याकडून आलेल्या शिफारसी निवड समितीसमोर ठेवल्या जातात. साधना ट्रस्टने नियुक्त केलेल्या निवड समित्यांतर्फे त्या नावांचा व त्याबाहेरील अन्य नावांचा एकत्रित विचार करून प्रत्येक पुरस्कारासाठी तीन नावांची शिफारस अमेरिकेतील निवड समितीकडे केली जाते. त्या तीन नावांतून एका नावावर शिक्कामोर्तब केले जाते. ज्या व्यक्तींची पुरस्कारांसाठी निवड झाली आहे, त्या व्यक्तींची पुरस्कार स्वीकारण्यासाठी संमती घेतली जाते आणि मगच पुरस्कार घोषित केले जातात.     

असा हा सर्व एका बाजूला गोपनीय आणि दुसऱ्या बाजूला पारदर्शक कारभार चालतो. या पुरस्कारांना केशव गोरे स्मारक ट्रस्टने प्राप्त करून दिलेली प्रतिष्ठा-डॉ.दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली साधना ट्रस्टने जपली आहे, वाढवली आहे... हा प्रवाह असाच पुढे वाहत राहील, अशी ग्वाही या निमित्ताने द्यावीशी वाटते!

Tags: साधना साप्ताहिक सुनील देशमुख अंधश्रद्धा निर्मुलन समिती महाराष्ट्र फाउंडेशन डॉ.नरेंद्र दाभोलकर संपादकीय Sadhana Sapatahik Sunil Deshmukh Andhshrddha Nirmulan Samiti Mharashtra Foundation Dr. Narendr Dabholkar Sampadkiy weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रतिक्रिया द्या

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके