डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कोरियाचे एकीकरण करताना जर्मनीचा अनुभव लक्षात घ्या

कामाची सांगड कार्यक्षमतेशी आणि उत्पादनवाढीशी घालायलाच हवी आणि कामगारांना त्यांच्या कार्यक्षमतेच्या दर्जानुसार काम दिले जाईल; व त्यात प्रगती न दाखविल्यास काढूनही टाकले जाईल, असे धोरण स्वीकारायलाच हवे. कामगारांनीही ते मान्य करायला हवे. भांडवलशाहीत कामगारांना कारखाना किंवा उद्योग आपला वाटत नाही. त्याच्या फायद्याचा योग्य वाटा त्यांना मिळत नाही. कामगारांना केवळ व्यवस्थापनात नव्हे तर मालकीतही भागीदारी मिळायला हवी.

उत्तर व दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांची नुकतीच झालेली शिखर परिषद ही कोरियाच्या एकीकरणाच्या दिशेने या शतकाच्या शेवटच्या वर्षातील महत्त्वाची घटना म्हणायला हवी. दुसऱ्या महायुद्धापूर्वी अखंड असलेल्या कोरियाची फाळणी 1945 साली दुसरे महायुद्ध संपल्यावर बड्या राष्ट्रांनी आपल्या फायद्यासाठी केली आणि एका राष्ट्राची जनता दोन राष्ट्रांत कृत्रिमरीत्या विभागली गेली. उत्तर कोरिया कम्युनिस्ट नियंत्रणाखाली गेला तर दक्षिण कोरियात अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेले सरकार अधिकारावर आले, तेव्हापासून गेली 55 वर्षे कोरियन जनता दुभंगलेलीच राहिली. 

दुसऱ्या महायुद्धानंतरचे देशांचे विभाजन

दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया व कोरियाप्रमाणेच चीनची कम्युनिस्ट चीन आणि तैवानमधील राष्ट्रीय चीन अशी विभागणी झाली, तीही अजून कायम आहे. ब्रिटिशांनी सत्ता सोडताना भारताचीही फाळणी केली. व्हिएतनामचीही फाळणी झाली होती. पण यादवी युद्धात अमेरिकेला माघार घ्यावी लागली आणि त्यानंतर काही काळातच दोन्ही व्हिएतनाम भागांचे एकीकरण झाले. 

युरोपात पश्चिम युरोप व पूर्व युरोप अशी युरोपची आणि पश्चिम व पूर्व जर्मनी अशी जर्मनीची फाळणी झाली. दहा वर्षापूर्वी रशियन नेतृत्वाखालील कम्युनिस्ट महासत्ता कोसळल्यानंतर दोन्ही जर्मनीचे एकीकरण झाले. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या फाळण्यांपैकी याप्रमाणे आता दोन्ही कोरिया आणि चीन व तैवान यांची विभागणी रद्द व्हावयाची राहिली आहे. भारताची फाळणी आता कायमची मानली गेलेली असुन ती रद्द करण्याचा विचार सुद्धा मांडला जात नाही. 

दोन्ही बाजूंच्या नेत्यांची त्यासाठी तयारी होईपर्यंत तो प्रश्न विचारकक्षेतून आणि संभाव्यतेच्या कक्षेतून बाजूलाच सारायला हवा. जरूर तर लष्करी बळाने आम्ही राष्ट्रीय चीन घेऊ अशी भाषा चिनी नेते बोलत आहेत हे लक्षात घेता हा प्रश्न हे शतक संपायच्या आत निकालात काढण्याचा त्यांचा विचार असल्याचे दिसते. दोन्ही कोरियांच्या अध्यक्षांनी एकीकरणाचे निश्चित उद्दिष्ट पुढे ठेवून पावले टाकली तर शतकाअखेर एकीकरण होऊ शकेल.कोरियाच्या एकीकरणाचा विचार करताना जर्मनीच्या एकीकरणाचा अनुभव लक्षात घ्यावयास हवा. 

एकीकरणास दहा वर्षे झाली तरी पूर्व जर्मनीचा भाग विकासाच्या बाबतीत पश्चिम जर्मनीच्या बरोबरीस येऊ शकलेला नाही.

एकीकरणामुळे निर्माण झालेले प्रश्न

एकीकरण करताना पूर्व जर्मनीतील कम्युनिस्ट पद्धतीची हुकूमशाही नाकारण्यात आली. हे योग्य झाले असते तरी कम्युनिस्ट पद्धतीतील सर्वांच्या कल्याणाचे काही चांगले कार्यक्रम ठेवायला हवे होते. तसे न करता ते रद्द करण्यात आले. पूर्व जर्मनीत विकासाचा वेग पश्चिम जर्मनीपेक्षा कमी असेल पण सर्वांना रोजगार उपलब्ध होता. एकीकरणानंतर पश्चिम जर्मनीची खुली व खासगी मालकीची अर्थव्यवस्था पूर्व जर्मनीस लागू करण्यात आली. त्यामुळे काही उद्योगांचे उत्पादन वाढले तरी त्याबरोबर आर्थिक विषमता आणि बेकारीही वाढली. 

आरोग्य योजनांमध्ये गर्भपातास परवानगी देणारा कायदा पूर्व जर्मनीत होता. तर पश्चिम जर्मनीने आपला गर्भपात बंदीचा कायदा पूर्व जर्मनीच्या भागालाही लागू केला. त्यामुळे तेथील जनतेत असमाधान निर्माण झाले. पूर्व जर्मनीत उद्योगधंदे सरकारी मालकीचे होते आणि सर्वाना नोकरी रोजगाराची हमी होती. त्यामुळे वेतन कमी असले तरी कामगारांना सुरक्षितता होती, पण या सुरक्षिततेचाच एक परिणाम म्हणजे कामगारांत आळस व कामचुकारपणा वाढू लागला. 

आपणास कामावरून कोण कमी करतो, आणि काढले तरी दुसरीकडे काम मिळेल अशा वृत्तीने ते वागू लागले. केवळ पूर्व जर्मनीत नव्हे तर सर्वच कम्युनिस्ट राजवटीत उत्पादन वाढीबद्दलचा पहिला उत्साह जाऊन नोकरी टिकविण्यापुरते काम करायचे ही वृत्ती वाढू लागली. हे धोरण बदलून नोकरीची सांगड कार्यक्षमतेशी घालण्याचा आणि अकार्यक्षम कामगारांना काढून टाकण्याचा निर्णय गोर्बाचोव्ह यांनी निर्धाराने अंमलात आणण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना विरोध झाला आणि त्यांनाच सत्तेवरून जावे लागले.

कार्यक्षमता, उत्पादनवाढ आणि भागिदारी

कामाची सांगड कार्यक्षमतेशी आणि उत्पादनवाढीशी घालायलाच हवी आणि कामगारांना त्यांच्या कार्यक्षमतेच्या दर्जानुसार काम दिले जाईल: व त्यात प्रगती न दाखविल्यास काढूनही टाकले जाईल, असे धोरण स्वीकारायलाच हवे. कामगारांनीही ते मान्य करायला हवे. 

भांडवलशाहीत कामगारांना कारखाना किंवा उद्योग आपला वाटत नाही. त्याच्या फायद्याचा योग्य वाटा त्यांना मिळत नाही. कामगारांना केवळ व्यवस्थापनात नव्हे तर मालकीतही भागीदारी मिळायला हवी; आणि नफ्याचे वाटप करताना उद्योगाच्या वाढीसाठी नफ्याचा काही भाग ठेवून बाकीच्या नफ्यात कामगारांना निम्मा वाटा मिळायला हवा. अर्थात फायद्यामध्ये हा वाटा मिळविताना कारखान्यास तोटा येतो तेव्हा त्या नुकसानीतही आपला वाटा उचलण्याची कामगारांची तयारी हवी. खाजगी मालकीच्या कारखान्यात ज्यांचे भांडवल जास्त, त्यांच्या मतानुसार कारखान्याच्या उत्पादनवाढीचा कार्यक्रम ठरतो. कामगार या बाबतीत मालकांची बरोबरी करू शकत नाहीत, कारण ते कारखान्याचे भागधारक झाले तरी त्यांच्या भांडवलाचा वाटा मालकांच्या तुलनेने कमी असतो. 

उद्योगाच्या वाढीसंबंधी निर्णय संचालक मंडळावरील कामगार प्रतिनिधींच्या संमतीशिवाय घेण्यात येऊ नयेत. कोरियाचे एकीकरण करताना अशा पद्धतीने औद्योगिक व आर्थिक नियोजन करण्यात आले पाहिजे, म्हणजे पूर्व जर्मनीतील जनतेसारखा अनुभव उत्तर कोरियातील जनतेला येणार नाही. पूर्वीच्या कम्युनिस्ट राजवटींना लोकशाही समाजवाद स्वीकारायला लावताना केवळ लोकशाहीवर अधिक भर न देता समाजवादी कार्यक्रमाच्या अंगाकडेही लक्ष देण्यात आले पाहिजे. साम्यवादी अर्थव्यवस्था आणि अमेरिकन पद्धतीची भांडवली अर्थव्यवस्था ही दोन्ही टोके बाजूला सारून यापुढे लोकशाही समाजवादी अर्थव्यवस्था जगाने स्वीकारल्याशिवाय जगापुढील दारिद्र्य, बेकारी व विषमतेचे प्रश्न सुटणार नाहीत. कोरियाच्या एकीकरणाच्या प्रयोगात या दिशेने पावले टाकली जाणे आवश्यक आहे. 

कोरियाचा मार्गदर्शक प्रयोग

कोरियाच्या ऐक्याचा केवळ भावनात्मक दृष्टिकोनातून विचार न करता वरील दृष्टिकोनातून विचार व्हावा. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किमजाँग इल आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष किम यांच्यापैकी कोणाजवळही असा दृष्टिकोन सध्या दिसत नसला तरी सध्याच्या जागतिक परिस्थितीतून विकास साधायचा असेल तर हा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. त्यासाठी दोन्ही नेत्यांनी आपल्या आत्तापर्यंतच्या साम्यवादी आणि अमेरिकन भांडवलशाही चष्म्यातून पाहण्याची सवय सोडून दिली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत लोकशाही समाजवाद हीच वास्तव विचारप्रणाली मानून हे एकीकरण घडवून आणायला हवे. 

दोन्ही बाजूच्या लोकशाही समाजवादी विचारवंतांनी ह्या दृष्टीने दडपण या दोन नेत्यांवर आणायला हवे. दोन्ही नेत्यांच्या भेटीतील सध्याचा निर्णय हा पहिला टप्पा आहे. एकीकरणास अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी. दोन्ही नेत्यांनी समान भूमिकेतून बोलणीने केली पाहिजेत, दक्षिण कोरिया अधिक विकसित, तेव्हा उत्तर कोरियाने आमचे मानले पाहिजे अशी वृत्ती दक्षिण कोरियनांमध्ये असेल तर ती त्यांनी काढून टाकायला हवी. 

आमचा देश अधिक विकसित, तेव्हा शिखर परिषद आमची राजधानी सोल येथे झाली पाहिजे असा आग्रह न धरता, शिखर परिषदेसाठी उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांनी मान्य करून चांगले पाऊल टाकले. फाळणीमुळे दीर्घकाळ विभागल्या गेलेल्या दोन्ही बाजूच्या कुटुंबांच्या मीलनास प्राधान्य देण्यात येत आहे ते योग्यच आहे. पंधरा ऑगस्टला कोरियाचा मुक्तिदिन साजरा करतात. या पुढच्या 15 ऑगस्टपर्यंत एकीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या योजना आखण्यात याव्यात. 

Tags: शिखर परिषद जर्मनी कोरिया वा. दा. रानडे v.d.ranade कोरियाचे एकीकरण करताना जर्मनीचा अनुभव लक्षात घ्या koriache ekikaran karatana jarmanicha Anubhav lakshat ghya weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके