डिजिटल अर्काईव्ह

माझ्या सर्व बाया कामात फार तरबेज होत चालल्या होत्या. विचारांची चाके आता सुसाट फिरत होती. बोलण्यात वजन आणि जगण्यात आत्मविश्वास येऊ लागला होता, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा कायापालट होतोय, अशी अनेक उदाहरणं माझ्यासमोर आली, पण माझ्या बाया प्रजासत्ताक भारताचा पाया रोवू लागल्यात असा विश्वास निर्माण करून देणारा एक प्रसंग घडला, तो म्हणजे संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय. CSR फंडातून गावात अनेक कार्यक्रम व्हायचे, ज्याद्वारे गावागावात लहान मुले, तरुण पिढी आणि स्त्रियांपर्यंत पोहोचता यायचं. अशाच एका मीटिंगमध्ये, आपण गावात कशा पद्धतीचे कार्यक्रम घेतले पाहिजे ह्यावर चर्चा सुरू होती आणि माझ्या बाया उत्तरल्या, 'आपण संविधान आठवडा साजरा करू.' हा एक प्रकारचा सुखद धक्का होता.

तीन वर्षांआधी सावित्रीमाईंबद्दलही अजाण असणाऱ्या माझ्या बाया, बाबासाहेब म्हणतात तसं शिक्षणरूपी वाघिणीचं दूध पिऊन गुरगुरू लागल्या होत्या. जागरूक नागरिकाचं कर्तव्य पार पाडत, लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी घेऊ पाहत होत्या. त्यांनी स्वतःच युया शोधून काढल्या, सर्व गावांतील, सर्व वयोगटांतील लोकांना कसं सामील करून घेता येईल, ह्यावर चर्चा करू लागल्या.

सरतेशेवटी त्यांनी एक योजना तयार करून पुढ्यात ठेवली. सर्वांत आधी तर लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, त्यातही दोन वयोगटांसाठी वेगळे विषय ठरवले. त्याचबरोबर स्त्रियांसाठी रांगोळी स्पर्धा आणि तरुणांसाठी 'माझे गाव समस्या व समाधान' ह्या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. खरंतर माझ्या बायांना हा विषय सुचला, ह्याचंही मला खूप कौतुक वाटलं. आणि सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सर्व स्पर्धा एखाद-दोन गावांत नाही, तर चक्क 15 गावांमध्ये घेतल्या जाणार होत्या, म्हणजे ढोबळमानाने प्रत्येक गावातून एक बाई ह्या सर्व नियोजनाचं नेतृत्व करणार होती. आठवडाभर विविध स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण मात्र संविधानदिनाला करायचं, हे प्रामुख्याने ठरलं.

बायांचा उत्साह एवढा होता की, त्यांचं बघून माझ्या   पार्लरच्या प्रशिक्षणामधील 16 मुलीही जबाबदारी घेण्यास पुढे आल्या, सयागोया मैत्रिणी जोडत आमची 45 मुलींची झुंड तयार झाली. कुठल्या तारखेला, किती वाजता, कुठली स्पर्धा घ्यायची ह्याची आखणी करून घेतली. सर्व जणींना एकमेकींच्या गावात जाऊन मदत करता येईल, अशाप्रकारे कार्यक्रम आखून घेतले. सगळ्या जणींनी मिळून कामांची विभागणी केली. सपनाताई व संध्याताई जाऊन सर्व मोठ्या अधिकाऱ्यांना भेटून आल्या, तहसीलदारांपासून तर कंपनीच्या प्रमुखांपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन आल्या. विजयाताई व मीनाताई यांनी गावातील पोलीस अधिकारी, शिक्षकवृंद, ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच या सर्व लोकांच्या घरी जाऊन भेटी दिल्या, त्यांना आग्रहाने कार्यक्रमाला बोलावून घेतलं. प्रियाताई, सुदर्शना व आम्रपाली ताईंनी चित्रकलेचे साहित्य, निबंध लेखनाचे साहित्य, तसेच बक्षिसे सन्मानचिन्ह, भेटवस्तू अशा सगळ्यांची जबाबदारी घेतली. नंदाताई, सुनीताताई व गीताताईंनी मिळून संविधान दिन साजरा करण्यासाठी गावातील समाजमंदिराची जागा मिळवली. त्यात साफसफाई, लहान मुलांनी काढलेली चित्रे संपूर्ण सभागृहाच्या भिंतींवर लावणे अशा अनेक कामांच्या जबाबदाऱ्या घेतल्या जात होत्या. संपूर्ण मंचाचे डेकोरेशन, हिशोब, कुणाला किती पैसे द्यायचे,पाहुणे कधी येणार, त्यांची सोय करण्याची जबाबदारी सुधा आणि भावनाताईंनी घेतली. माधुरीताई आणि रंजनाताईंनी स्पर्धेतील निबंध तपासण्यासाठी थेट शिक्षण अधिकाऱ्यांना गाठलं, म्हणाल्या, 'तुमच्या उत्साही शिक्षकांना निबंध तपासायला सांगा, कारण त्यानंतर क्रमांक पटकावणाऱ्या मुलांचे निबंध आम्ही तुमच्या पंचायत समितीला सुपुर्द करणार आहोत.'

सगळीकडे माझ्या बायांच्या उपक्रमांच्या चर्चा सुरू होत्या, एखाद्या भरारी पथकाप्रमाणे बाया ह्या गावातून त्या गावी, त्या गावातून ह्या गावी फिरत होत्या. कंपनीच्या CSR च्या गाडीत सर्व सामान भरायच्या, गावात जाऊन स्पर्धेची तयारी करायच्या, झाडण्यापासून तर सतरंज्या उचलण्यापर्यंत सर्व कामे एकदम कार्यतत्पर होऊन करायच्या, शिस्त म्हणजे शिस्त, असा तगडा नियम होता. कार्यक्रम झाला की सगळ सावरून स्वारी पुढच्या गावाला निघायची.

संविधान दिनापर्यंत आम्ही सगळ्या फार व्यस्त आहोत, असं सगळ्यांनी आपापल्या घरी सांगून ठेवलं होतं. जिथं जिथं घरून परवानगी मिळणं कठीण वाटत होतं, तिथं तिथं शक्कल लावून त्या गटानं सोबत जायच्या, आणि घरातल्या सगळ्यांना राजी करूनच बाहेर पडायच्या. ह्या सर्वांत पुढे होत्या त्या नंदाताई आणि विजयाताई. सर्वांत अनुभवी व गावात वर्चस्व असल्याने घरच्यांना पटवणं म्हणजे ह्या दोघींच्या 'बाए हाथ का खेल' होता. त्यामुळे माझ्या बिनधास्त बायांना आता गावात सगळे ओळखू लागले होते. स्पर्धांच्या शेवटच्या दिवशी आम्हाला सगळं आवरून घरी जायला फार उशीर झाला, तेव्हा मी मुद्दाम कंपनीची गाडी घेऊन माझ्या बायांना त्यांच्या गावी सोडायला गेली. आम्ही पोहोचलो तोवर गाव झोपलं होतं, कदाचित रात्रीचे 12-1 वाजले होते. आम्ही आठ-दहा जणी होतो. आम्ही सुप्रियाच्या घरासमोर गाडी थांबवली. तिचं घर गावाच्या मुख्य चौकात होतं, जिथं दिवसभर रहदारी असते; पुरुषांचा गलबला असतो; भाजी विकणाऱ्यांच्या गाड्या असतात; रिक्षा, बस, काळी-पिवळी ह्यांची सतत गर्दी असते. आता मात्र रस्ते कसे नग्न, निपचित, शांत पडले होते. एवढ्या रात्री चौक असा दिसतो ह्याचं माझ्या बायांना फार कुतूहल वाटत होतं. तेवढ्यात सुप्रियाच्या आईने सगळ्यांसाठी चहा आणला. माझ्या बाया आपापसात काहीतरी बोलून नुसता हशा पिकवत होत्या. सपनाताई व सुदर्शनाताई चहाचा कप घेऊन डायरेक्ट रस्त्यावर बसल्या. संध्याताई अन् प्रियाताई पानटपरीवर गावातील उनाड पोरं कशी उभी राहतात, तसं उभं राहून दाखवत होत्या, सुप्रिया भाग्यश्री ह्या दोघी, दारुडे पुरुष रस्त्यावर कसे आडवे चालतात, कसे अस्पष्ट बोलतात ह्याची नक्कल करून दाखवत होत्या. मी कंपनीच्या गाडीच्या बॉनेटवर बसून एका हातात चहा घेऊन पोट धरून हसत होती, आमचा गाडीचा ड्रायव्हर विशालदादा मात्र गाडीत बसून हे दुर्मीळ दृश्य टिपत होता. एखाद्या ड्रोनमधून बघितलं असतं तर हे दृश्य आजन्म डोळ्यात टिपण्यासारखं होतं. सावित्रीच्या लेकी गावाच्या निर्मनुष्य चौकात पोट धरून हसत होत्या आणि संविधान दिनाची पहाट होणार होती.

संविधान दिनाच्या कार्यक्रमाला माझ्या बायांनी मोठा सोहळा घडवून आणला, पंचक्रोशीतले सगळे लोक आले होते. सगळ्या गावांतली लहान मुलं आणि पालक वर्ग, रांगोळी स्पर्धेतल्या बाया आल्या होत्या. एकूण हजार-दीड हजार लोकं जमली होती. माझ्या बायाही सुंदर साड्या नेसून नटूनथटून तयार झाल्या होत्या. सगळी कामं कशी नेमानं करून ठेवली होती. कौतुकाची गोष्ट म्हणजे कार्यक्रमाचे टप्पे आखून, प्रत्येकीला स्टेजवर बोलता यावं ह्या अनुषंगाने सूत्रसंचालनाची जबाबदारी वाटून घेतली होती. हे केवढं सर्वसमावेशक नियोजन होतं, अगदी भारतीय संविधानाला शोभेल असं. कार्यक्रमाची दखल घेण्यासाठी गावातील पत्रकार लोकांनाही निमंत्रणं पाठवली होती. सगळं कसं वेल ऑर्गनाइज्ड होतं. कार्यक्रमाचं आकर्षण म्हणून विदर्भातील नावाजलेली इन्क्लुएन्सर नेहा ठोंबरे हिलाही कार्यक्रमाला बोलावून घेतलं होतं.

माझ्या बायांच्या ह्या कार्यक्रमाचं गावभर कौतुक झालं, मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांनीही अभिनंदन करत पाठ थोपटली. पण ह्याच्या पल्याड माझ्या डोळ्यासमोर त्यांचा माणूस म्हणून प्रगल्भ होत चाललेला प्रवास सरकत होता. जाणीवपूर्वक समाजाने त्यांच्यापासून हिरावून ठेवलेलं स्वातंत्र्य त्या हिसकावून मिळवत होत्या. दोन वर्षांआधी सावित्रीमाई माहीत नसलेल्या बाया आज तिचा फोटो मंचावर सजवत होत्या. बाबासाहेब म्हणतात ते इथं सिद्ध होत होतं, "एखाद्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील स्त्रियांची प्रगती मोजावी."

ह्यानंतर एक प्रसंग घडला आणि माझ्या स्वयंप्रकाशित झालेल्या बार्याना कुणाचीही गरज उरली नाही हे सिद्ध झालं. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला, सर्व पाहुणेराउळे गेले, मीही नेहाला सोडायला निघाले. बायांना जाताना सांगून गेले की, सर्व उरकून घ्या, बिछायतवाल्याचा हिशोब करून घ्या, पार्टी करा, नाचा, मज्जा करा आणि जाताना मात्र सभागृहाची चावी समाजमंदिराच्या अध्यक्षाला सुपुर्द करा. एवढं सांगून मी आणि नेहा पुढे निघालो. माझ्या बायांनी साउंडवाल्याला त्यांची गोंडी भाषेतली गाणी लावायला सांगितली. त्यासोबतच बाबासाहेबांची गाणी वाजवून बाया जल्लोष साजरा करायला लागल्या. तेवढ्यात तिथं समाजमंदिराचा अध्यक्ष आला, माझ्या बाया हातात सावित्रीमाईंचा आणि बाबासाहेबांचा फोटो घेऊन नाचत होत्या. मनुवादी विचारसरणीच्या पदाधिकारी पुरुषाला संताप येण्यासाठी हे चित्र पुरेसं होतं. त्याने दंगा करत बायांचं गाणं थांबवायला लावलं, साउंडवाल्याला धमकी देत ताकीद दिली. माझ्या बायांशी भांडू लागला.

त्यानं भांडणात एक वाक्य चुकीचं म्हटलं, 'ह्यांचे गाणे इथे वाजवाचे नाही. मग काय माझ्या वाघिणी पेटल्या, अंगावर जाऊन भांडू लागल्या, त्या माणसापेक्षा दुप्पट आवाज वाढवू लागल्या. मग त्या सगळ्यांमध्ये समोर आली ती मंदोदरीताई, तिने पदर खोचला, बांगड्या आवळल्या आणि त्याला डायरेक्ट एकेरी शब्दात जाब विचारला, "ह्यांचे गाणे वाजवायचे नाही म्हणजे कोणाचे गाणे? तू असं म्हटलंच कसं? आत्ताच्या आत्ता माफी माग, नाहीतर आम्ही पोलिसात जाऊ." सगळ्या बाया आता त्याच्या अंगावर चढल्या होत्या. त्याचा आवाज आता नरम झाला, कारण माझ्या बाया त्याला कायदा शिकवत होत्या. माझ्या बायांच्या गटात सर्व जाती-धर्माच्या बाया होत्या. आज त्या एकोप्याने समतेसाठी लढत होत्या, हा प्रसंग पाहिल्यावर मला आपण आता पुढच्या प्रवासाला निघू शकतो ह्याची खात्री झाली. माझ्या बाया आजही त्यांच्या कामात मग्न आहेत, स्वच्छंदी जगण्यात गुंग आहेत, चिकाटीने अभ्यास करताहेत आणि लवकरच सावित्रीमाईंच्या घरी माहेरपण साजरं करायला पुण्यात येताहेत बरं का?

Tags: rangoli competition my village program savitribai phule CSR zari jamini constitution day vanshree vankar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी