डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

केंद्र सरकारने विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतल्यानंतर 'डॉ.मनमोहन सिंगांबद्दलची उलटसुलट मते', या विषयावर 'आऊटलुक' या साप्ताहिकाच्या ४ ऑगस्टच्या अंकात शीला रेड्डी यांचा अभ्यासपूर्ण लेख आहे. या लेखातील राष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त अभ्यासू व्यक्तींची मते 'साधना'च्या वाचकांसमोर यावीत म्हणून त्या लेखाचा हा मराठी अनुवाद.

लोकसभेतील विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेच्या दरम्यान भाजपाच्या तीन खासदारांनी सभागृहात नोटांची बंडले दाखवून सर्वांना थक्क करून सोडले. या प्रक्रियेमध्ये पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्याभोवती हुशार, प्रामाणिक, अ-राजकारणी पण धूर्त या विशेषांचे जे वलय आहे, त्यालाच छेद देण्याचा प्रयत्न होता. पण ही नोटांची बंडले दाखवणे, दंगा करून हुल्लडबाजी करणे यामुळे झाले ते एकदम उलटेच. डॉ.मनमोहनसिंग एका अशक्य वाटणाऱ्या नव्या रूपात समोर आले. एका सज्जन गृहस्थाचे मुरलेल्या राजकारणीच्या रूपात परिवर्तन झालेले दिसले आणि ते जनतेच्या दीर्घकाळ स्मरणात राहील असे अनेक बुद्धिवंतांचे मत आहे. 

मानसशास्त्रज्ञ आशीश नंदी यांच्यामते 'थोड्याशा चिखलफेकीने डॉ.मनमोहनसिंग यांची प्रतिमा मलिन होण्याऐवजी एक धूर्त राजकारणी अशी प्रतिमाच आणखी प्रकाशमान होईल. मुख्य प्रवाहातील राजकीय नेत्याला कधीही साधूसंतांचा आव आणून चालत नाही. प्रागतिक राजकीय नेतृत्वाला हे जाणून घेणे अवश्यकच असते की कुठले कुरण हिरवेगार आहे.' 

समाजशास्त्रज्ञ आंद्रे बेलेल हे मान्य करून म्हणतात की, 'सरकार चालवण्यासाठी आवश्यक तो घोडेबाजार अस्तित्वातच नाही किंवा त्याची मला माहिती नाही, असे कोणत्याही पंतप्रधानाने म्हणणे हे अगदी अविश्वसनीय व अवास्तव आहे. पंडित नेहरूंच्या काळातही हे होत नव्हते असे नाही. कारण तत्त्वांना चिकटून कोणीही राजकारणात टिकू शकत नाही.'

माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी म्हणतात, 'आता पंतप्रधानांनी हिकमतीने सरकार टिकवून दाखवल्यावर त्यांना इतर कोणी सहजासहजी मोडीत काढू शकणार नाही.' तमिळ लेखक अशोक मित्रन हेही मान्य करतात की, 'मनमोहनसिंग यांनी स्वतःला राजकारणी म्हणून शाबीत केले आहे. ते एक व्यवहारी, प्रागतिक राजकारणी आहेत, फक्त तत्त्वांना चिकटून राहणारे नाहीत हे सिद्ध झाले आहे.'

सामाजिक इतिहासकार मुकुल केशवन् म्हणतात, 'आघाड्याचा खेळ सुरू करून त्याला हे मान्यच करावे लागते की या आघाड्यांच्या गाड्यांचे वंगण म्हणजे पैसा आहे. आपल्या पक्षातील एकी, नेकी भरभरून बोलत असतानाही मनमोहनसिंगांना सत्य परिस्थितीचे पूर्ण भान आहे. अपघाताने कोणीही अर्थमंत्री, नंतर प्रधानमंत्री बनत नाही. त्यासाठी राजकीय गुंतागुंतीचे रहस्य कळणे महत्त्वाचे आहे.

रामचंद्र गुहा म्हणतात, 'तडजोडी किती आणि कशा कराव्या लागतात, हे नीट कळण्याइतपत ते राजकारणात मुरले आहेत.' या सर्व प्रकरणात घोडेबाजार जोरावर होता याबद्दल नव्हे तर त्याची प्रसारमाध्यमांनी जी चर्चा केली त्याचे आश्चर्य वाटले.'

'गेल्या कमीत कमी २० वर्षांपासून भ्रष्टाचार आपल्या राजकारणात खोल रूजलेला आहे. थोड्याच दिवसांपूर्वी कर्नाटकात भाजपा सरकारला पाच स्वतंत्र उमेदवारांना विकत घेऊन सरकार स्थापावे लागले. मग आताच श्री.अडवानींनी याबद्दल साधूपणाचा आव का आणावा? आपल्या मतांची किंमत मोजून घेणे हे नवीन राहिलेले नाही हे श्री.आशिश नंदी मान्य करतात. जर काही बदलले असेल तर तो लोकसभेचा सामाजिक पोत. ज्यांच्याकडे स्वत:ची काही मालमत्ता नाही ते उमेदवार (खासदार) रोख रकमा स्वीकारतात. इतर मार्गांनी स्वत:चा फायदा करून घेणारे वरच्या स्तरातील लोक पकडले जात नाहीत, पण रोख रक्कम घेणारे पकडले जातात. डॉ.मनमोहनसिंगांनी हे कटुसत्य स्वीकारले आहे. तसेच ते आपल्या तत्त्वे जपणाऱ्या (किंवा तसे भासवणे) मध्यम वर्गानेही स्वीकारावे असे श्री.नंदी सुचवतात.

असे 'राजकीय व्यवस्थापन' असतेच हे सरदार खुशवंतसिंगही मान्य करतात, पण त्याची माहिती असणे वेगळे व त्यात स्वतःचे हातही काळे करणे यात फरक आहे. डॉ.मनमोहनसिंह हे स्वतः 'तंत्रज्ञ' आहेत व त्यांनी त्यांच्या सहकार्यांना त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे 'कार्य' करण्याची सूट दिली. मुशिरुल हसन यांच्यामते हे डॉ.मनमोहनसिंहांचे एका सद्गृहस्थाचे राजकारण्यात झालेले रूपांतर आहे.

मग 'मिस्टर क्लीन' अशी जी त्यांची प्रतिमा होती त्याचे काय झाले? मि.बेतेल म्हणतात की 'डॉ.मनमोहनसिहांनी स्वत:ची अशी प्रतिमा कधीही प्रदर्शित केली नाही. कोणी म्हणतील की राजीव गांधींच्या अशा प्रतिमेची नंतर काय अवस्था झाली हे जाणूनच त्यांनी हा शहाणपणा केला. सोली सोराबजी म्हणतात की, 'सध्याच्या काळात राजकारणात 'मि. क्लीन' होऊन सरकार चालवू शकत नाही. मि.बेतेल म्हणतात की त्यांनी एवढेच दाखवून दिले आहे की तो एक प्रामाणिक व स्पष्टवक्ता माणूस आहे. जो


आपले कर व्यवस्थित भरतो व ऑफिसमध्ये नेहमी अगदी वेळेवर हजर असतो. त्यांच्या स्वत:बद्दल कोणत्याही भ्रामक कल्पना नाहीत. ना ते स्वत:चे प्रसिद्धीवलय बनवू पाहतात. ते महात्मा गांधी नव्हेत व तेच ठीक आहे. कारण आजच्या काळातील सरकार चालवणे गांधी तत्त्वज्ञानात बसणारे नाही. गांधींनाच लोकांनी खड्यासारखे बाजूला काढून फेकले असते. राजकारण हे सिद्धांतावर आधारित असले तरी त्यासाठी धूर्तपणाची गरज असते. किंवा असे म्हणतात येईल की वैयक्तिक शुचिता वेगळी व प्रामाणिक राजकारणी असणे वेगळे, पण ते दोघे एकत्रित नांदू शकतात.
'इंडिया अनबाऊंड' या पुस्तकाचे लेखक गुरुचरणदास म्हणतात, 'राजकारणात आपल्याला आदर्शवादींची गरज नाही. महाभारताची पारायणे करीत मोठ्या झालेल्या भारतीयांना हे पक्के ठाऊक आहे की सत्यवादी युधिष्ठिरालाही असत्याचा आधार घ्यावा लागला. आपण भारतीय असेच व्यवहारी आहोत व आपले नेतेही व्यवहारी असावेत अशीच आपली अपेक्षा असते.'

मुशिरुल हसन म्हणतात, 'राजकारणात राहून कोणीही निष्पाप, निरागस राहू शकत नाही. सरकारे चालवताना जी देवाण घेवाण चालते, चालवावी लागते त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करणे हे नेहरूंपासून सर्व प्रधानमंत्र्यांना करावे लागले आहे. यात मनमोहनसिंगाचा वेगळेपणा असा आहे की चातुर्याने स्वत:ची स्वच्छ प्रतिमा डागाळू न देता आपले सरकार वाचवण्यात ते यशस्वी झाले. त्यांची प्रतिमा डागाळली नाही याचे कारण त्यांनी ही अवघड लढाई स्वत:च शिरावर घेतली होती- स्वत:ला सिद्ध करण्यासाठी. सत्तेला चिकटून राहण्याची इच्छा असलेला कोणी अशी जोखीम उचलणार नाही, असे केशवन् म्हणतात. 

रामचंद्र गुहाही या मताशी सहमत होऊन म्हणतात, 'मनमोहनसिंह हे आदरणीय आहेत, पण त्यांना सरकार चालवायचे आहे व त्यासाठी तडजोडी कराव्याच लागतात हे त्यांना माहीत आहे. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेच्या दरम्यान हे दिसून आले की तेही रागावू शकतात.' खुशवंतसिंहजी म्हणतात की, 'त्यांची प्रतिमा संपूर्ण देशातील जनमानसात उंचावली आहे. संपूर्ण सत्रात सर्व गदारोळात ते निश्चलपणे बसून होते. शांतपणे, चेहेऱ्यावर भावना न आणता बघत होते व शेवटी विश्वासमत प्राप्त झाल्यावर त्यांनी अतिरेकी आनंद व्यक्त केला नाही.'

अस्तित्व पणाला लावून त्यांनी स्वत:वरचा दृढ विश्वासच प्रकट केला नाही, तर अडवाणींच्या 'निकम्मा, दुबळा, निर्णयक्षमता नसलेला' या शेरेबाजीचाही पराभव केला, पण आता त्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. पुढे येणाऱ्या प्रत्येक संकटातून सरकारला वाचवण्याची जबाबदारी त्यांचीच- असे त्यांचे सहकारी म्हणतील.

Tags: डॉ. मनमोहनसिंह राजीव गांधी पंडित नेहरू पंतप्रधान Dr. Manmohan Singh. महात्मा गांधी Rajiv Gandhi Pandit Nehru Prime Minister Mahatma Gandhi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके