डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

निर्मिती शांत माणसाची : कसे असेल ते जग? 

आज सर्वत्र नीतिशून्यता, भ्रष्टाचार वाढताना दिसतो. मूल्यांचे बुलंद बुरुज ढासळताना दिसतात. विकसित राष्ट्राच्या यंत्र-तंत्र प्रगतीने मानवी गरजा भागविणे शक्यतेत आणले आहे. पण त्यांना तरी शांती-समता सापडली आहे का? ...आम्हास हवी आहे ती त्यांची शिस्त, कर्मकौशल्य.... भूतपूर्व राजदूत, ख्यातनाम वितचारवंत बॅ. आप्पासाहेब पंत यांनी मनाच्याच व्यवहाराबद्दल व्यक्त केलेले हे चिंतन. आमचे भूतपूर्व संपादक श्री. यदुनाथ थत्ते यांना लिहिलेल्या पत्रातील हा भाग त्यांच्या अनुमतीने साभार प्रसिद्ध करीत आहोत.

खेडुती रस्ता नं. 1.
इन्व्हेरारी,
आँटारिओ,
कॅनडा.

प्रिय यदुनाथ,

अचानक जमून आलेल्या या पश्चिमेच्या यात्रेच्या गडबडीत तुमची भेट होऊ शकली नाही.

चि. डॉ. अनिकेत राहतो, ते 'इन्व्हेरारी' अगदी खेडेच आहे. वस्ती 375 च्या आसपास. या 'खेडुती, नं.1' रस्त्यावर, गावापासून 6 कि.मी.वर चि.अनिकेत राहतो, ती तर एक वस्तीच आहे. घरे आहेत 20-25. पण प्रत्येक घरी व आसपास किमान दीड- दोन एकर हिरवळ, सुपीक जमीन आणि जंगल आहे. 100 फुटांवर एक मोठे सरोवर आहे. अनेक प्रकारचे मासे, पक्षी, येथे दिसतात. 10 वर्षांची अनिला, अमेया, 4 वर्षांचा अरुण, कणाद, आंद्रिया या शुद्ध हवेत हिरवळीवर मोकाट दौडू लागले म्हणजे जीवनातील सौंदर्य, ऊर्जा, आनंद उफाळून प्रकट होतात. श्री.स्टेफनो आल्बने 1950 मध्ये कॅनडात स्थायिक झाले. आज वय 80 वर्षाचे आहे खरे, पण खरे 'भूमिपुत्र' आहेत. रोज 7-8 तास जमिनीची मशागत, झाडे लावणे, भाजीपाला, फळफळावळांची लागवड, चालू असते. खरा 'योगः कर्मसु कौसलम्', पपा काम करू लागले की प्रत्यक्ष पाहावयास मिळतो. जमीन-आकाश- पाणी यांच्याशी समरस होऊन 'बोन्नो' (पपा) काम करीत असताना, तसेच त्यांच्या वर्कशॉपमध्ये अत्याधुनिक यंत्रावर ते काम करू लागले की अरुण त्यांच्या सभोवती गडबड करीत असतो. त्यांच्या कर्मकुशलतेचे व कामातील सहजानंदाचे संस्कार चि. अरुणवर सहजच होत आहेत. 

आँटारिओ हा कॅनडाचा सर्वात प्रगत आणि जास्त लोकसंख्येचा प्रांत. निदान 60 टक्के लोक तरी, अनिकेत राहतो त्या थाटात राहतात. या समतेमुळे या प्रांतात अशांतता कमी आहे. सर्व सोयी, सुविधा जवळजवळ सर्वांनाच सहज उपलब्ध आहेत. निसर्ग सुंदर स्वच्छ, शांत, समृद्ध आहे.

पण सतत किमान 8 तास कसून कष्ट केल्याशिवाय या सर्वांचा उपभोग घेणे शक्य नाही. नवरा-बायको, दोघांनाही काम करावेच लागते. मग या सर्व सुविधा उपभोगण्यास वेळ तरी राहतो का? यासंबंधी चि.सौ. हेलन (श्री. स्टेफनो यांची कन्या) परवाच नलिनीबाईंशी बोलत होती. धावपळ, धडपड, स्पर्धा, मनाची ताणाताणी, यांमुळे थकावटच जास्त होते. पण या धावपळीत, अशांततेतच, ताण-तणावात, स्पर्धेतच मनाला काही समाधान असावे का? नाहीतर इतके लोक सतत त्यांतच रमतील कसे? आपल्या हिंदुस्तानातही आज धावपळ, ताणतणाव, खूप वाढतच आहेत. पण अनिश्चितता, निराशा, भय इथे कमी आहेत. दुःख, भित्रेपणा, लाचारी नाही. तरीही या चैतन्यपूर्ण, चंचल, उपभोगक्षम समाजातही आज जीवनाचा मूळ उद्देश, फक्त धावपळ, मनाची ताणाताणी हाच आहे का? याचा विचार करावासा वाटू लागला आहे.

आँटारिओ टेलेव्हिजनने परवाच एक भारदस्त कार्यक्रम प्रसारित केला. विख्यात शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ, उद्योगपती, विचारवंत, राजकीय पुढारी, यांनी त्यामध्ये भाग घेतला. प्रेरेगन, सेक्रेटरी गोर्बाचेव्ह, मार्गारेट थॅचर, जपानचे प्रधानमंत्री, प्रो.गालब्रेथ, वगैरे 20-25 जण त्यात सहभागी होते.
कार्यक्रमाचे शीर्षक होते- 'अमेरिकेची दिवाळखोरी जीवनपद्धती व तिचा कॅनडासारख्या लहान देशांवर होणारा दुष्परिणाम आणि त्यावर उपायपोजना.' दोन तासांच्या या कार्यक्रमाचा मथितार्थ असा : तथाकथित भांडवलशाही, तसेच साम्यवादी या दोन्ही प्रकारच्या समाजव्यवस्था अत्यंत खर्चिक, 41 टक्के संपत्तीची विनाकारण उधळपट्टी करणाऱ्या, महाभ्रष्ट; जीवनात विकृती-दुःख-लाचारी-अस्थैर्य निर्माण करणाऱ्या, आहेत. दोनही व्यवस्था सत्ता-स्पर्धा, विशिष्ट गटांचेच वर्चस्व कायम राखण्याच्या खटपटीत असतात. साम्यवादी व्यवस्थेत अधिकारी वर्ग व सैन्याधिपतींच्या तर भांडवलशाहीत पूंजीपती व भ्रष्टाचारी यांच्याच फायद्याचा विचार केला जातो. मानवता, माया, औदार्य, आस्था यांचा दोन्हीकडे पूर्ण अभावच आहे. 

कॅनडासारख्या लहान देशांनी एकत्र बसून या महाभयंकर शक्तिशाली साम्राज्यांपासून अलग अशी समाजरचना कशी निर्माण करता येईल, याचा विचार जरुरीने करावयास हवा. पण, या रचना कितीही विकृत, नजीकच्या काळात प्रचंड विनाशकारी असल्या, तरी याच समाजरचनेद्वारा आज जगातील 2 अब्ज कुटुंबे उदरनिर्वाह करीत आहेत. बहुतेक सर्वांना पुढील भविष्य समजतच नाही, किंवा समजून घेण्याची इच्छा नाही. आज युरोप, साम्यवादी देश, उत्तर अमेरिका, सर्वत्र अशा भविष्याबद्दलच नाही, तर आजच्या प्रत्यक्षाबद्दलही अनास्थाच आहे. येथील रेडिओ, टी.व्ही.आदी प्रसारमाध्यमांतून आशिया, आफ्रिका; यांसंबंधी मजकुराचा अभावच असतो.

युरोप, अमेरिकेतील बहुजनांच्या भोवती ग्राहकोपभोगी समाजव्यवस्था निर्माण झाली आहे. या 'ग्राहकीभोगी' संसारापलीकडे बघण्याची त्यांना इच्छाच नाही. येथील हिंदी वसाहतवालेही याला अपवाद नाहीत.

वरीलपैकी काही मुद्यांवर बोलण्याचा योग मला सिराक्यूज विद्यापीठात आला. अमेरिकेतील, मोठ्यापैकी हे विद्यापीठ. त्यांनी मला त्यांच्या अत्युच्च पदवीचा मान दिला.

या 'कमेन्समेंट' (पदवीदान) समारंभात माझ्याबरोबर सिराक्यूज विद्यापीठातर्फे अमेरिकेचे सुप्रसिद्ध मानवतावादी कार्यकर्ते आणि अमेरिकेचे दक्षिण अफ्रिकेतील पहिले निग्रो राजदूत फ्रँकलिन हाल विल्यम्स यांना हा मान दिला गेला. हा सोहोळा भव्य, उत्साहवर्धक, नीटनेटका पण खेळीमेळीचा होता. समारंभास तीस हजार विद्यार्थी, विचारवंत, अध्यापक, अधिकारी हजर होते. या समारंभाच्या आदल्या रात्री 4000 लोकांचे सहभोजन आणि नंतर नृत्य झाले.

या वेळी आम्हां दोघांना 4-5 मिनिटेच औपचारिक भाषण करण्याची विनंती युनिव्हर्सिटीचे चॅन्सेलर श्री. मेलव्हिल ए. एग्बरस यांनी केली. सन्मानित अँबेसिडर विल्यम्स यांनी टाळ्यांच्या कडकडाटात आपले स्पष्ट, सुंदर भाषण 5-7 मिनिटांत संपविले.

मी खास 10,000 मैलांवरून फक्त 4-5 मिनिटेच बोलण्यास आलो नव्हतो.

आधी मी हा माझा मान नाही, असे आवर्जून सांगितले. माझे वडील राजे भवानराव पंत, महात्मा गांधी व पंडित नेहरू, यांनी मला गेली 50 वर्षे जीवनातील रहस्य व मानवी कर्तृत्वकर्म-धर्म-ड्यूटी-यांचे धडे दिले. आधी छोट्या औंध संस्थानचे खेड्यात व पुढे जगातील अनेक देशांत सत्य, अहिंसा व विश्वबंधुत्व यांचे पालन करण्याची शिस्त व संयम हे शिकविले, त्यांचे हे श्रेय आहे. याच जीवनमूल्यांची व तत्त्वांची चाड आपल्याला आहे, म्हणूनच हा मोठा मान आपण मला दिला, हे मी समजू शकतो. आज जिकडे तिकडे असेच दिसत आहे की, सत्य, सुंदर, कल्याणकारी, सर्वोदयी, समाजजीवनाचा विसर पडला आहे. सर्वत्र भीती, स्पर्धा, द्वेष, असूया, हिंसाच थैमान घालीत आहेत. कधी कधी मनात स्पष्ट व उच्च उद्देश असूनही प्रत्यक्षात समाजजीवन विकृत, दुःखी, कष्टी, भ्रष्टच, होत आहे. 

आपल्यासारख्या विकसित राष्ट्रनी यंत्र -तंत्र-शास्त्र यांचा काही प्रमाणात तरी शिस्तबद्ध-नियमबद्ध उपयोग करून आपले जीवन सुविधा-सोयींनी समृद्ध केले आहे, आपले समाज प्रचंड शक्ती व अचाट महत्वाकांक्षा यांनी भारून टाकले आहेत.

आपल्या या शक्ती-संपत्ती सोयी-सुविधा व प्रभुत्व यांचे प्रचंड आकर्षण आम्हां विकसनशील देशांना आहे. पण यंत्र-तंत्र-शास्त्र यांच्या वापराकरिता जी शिस्त, जो संयम, जी नियमबद्धता व कर्मकुशलता हवी, ती अजून आम्हांस अवगत नसल्याने आमच्या समाजात आज खरी गोंधळ, अंदाधुंदी, उधळपट्टी आणि नुसतीच जाहिरातबाजी बोकाळली आहे.

खरे तर आपल्याकडील अत्युच्च व अत्याधुनिक यंत्रे आम्हांला नको आहेत. यंत्र-तंत्र-शास्त्र यांचा समाजजीवनाकरिता, योग्य अर्थोत्पादनाकरिता, सर्वोदयी वितरणाकरिता सदुपयोग करण्याचे नियम, शिस्त, संयम हे आम्हांस हवे आहेत. शिवाय या यंत्र-तंत्र-शास्त्राचा नियमबद्ध उपयोग करून आपण आपापल्या समाजातले ताणपणाव, हिंसा, अस्थिरता, किती प्रमाणात कमी करण्यात यशस्वी झाला आहात, याचा अनुभव आम्हाला हवा आहे. भ्रष्टाचार गेला का?

-की मानवी मनाच्या स्पंदनातच मूलभूत असे काही गौण आहे की, सहजच त्याने निर्माण केलेले सर्वच्या सर्व विकृतच होणार? 

मग शिस्त, संयम, नियम, हे मानवी मनाने निर्माण केलेल्यावर, का निर्माण करण्यावरच हवे? 

हा मूल्य विचार ऑंन्टारिओ टेलेव्हिजनच्या कार्यक्रमात अस्पष्टच राहिला. आपल्यासारख्या सुसंस्कृत विश्वविद्यालयाने आंतरराष्ट्रीय स्तरावर यासंबंधी ऊहापोह करण्याचे हाती घ्यावे, असे या वेळी मी सुचविले. हिंदुस्थानातून यासंबंधी जरूर प्रतिसाद मिळेल, असे मी म्हटले.
संध्याकाळी मोठ्या भक्तिभावाने बोन्नो संत मेरीची इटालियन भावगीते गाऊ लागले की, चिमुकला अरुण त्यात आनंदाने सामील होतो. सकाळी चि.अनिकेत सूर्यनमस्कारानंतर गंभीर स्वरांत सहमुद्रा ओमचा उच्चार करू लागला म्हणजे अरुणची बोटेही वळू लागतात. जेव्हा आनंद-करुणा विनाकारण स्फुरू लागतात, तेव्हा मनाची स्पंदने सहजच शिस्तबद्ध होतात आणि मग अशा प्रशांत स्थितीत मन असताना ते जे जे काही निर्माण करील, ते सर्व आल्हादकारी; हितकारी, सर्वोदयी, सुंदर-सुसंस्कृतच असणार.

पश्चिमेच्या देशांतून यासंबंधी विचार चालू झाले आहेत. आनंद, करुणा, यांच्या सहजस्फुरणास काय हवे? ती स्थिती कशी येते? हे प्रश्न सर्वत्र निर्माण होत आहेत. माझ्या मते एक नवीनच, अद्भुत मानवी संस्कृतीचा स्तर गाठण्याची ईर्ष्या निर्माण होऊ पाहात आहे.

अशा प्रशांत मनाच्या स्पंदनांतून जी सहज कर्मकुशलता, 'कोसलम्' स्फुरू लागेल, असे जग कसे असेल?                       

आपला,     

आप्पासाहेब.

Tags: फ्रँकलीन विलियम्स. सूर्यनमस्कार मानवी मन कॅनडा शांतता गोंधळ भ्रष्टाचार मूल्यशिक्षण यदुनाथ थत्ते Franklin Williams.  आप्पासाहेब पंत Suryanamaskar Human mind Canada Peace Chaos Corruption Value education Yadunath Thatte Appasaheb Pant weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके